डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

गांधीविचारधारा आणि साने गुरुजींचे साहित्य

साने गुरुजींच्या साहित्यनिर्मितीमागे गांधीवादी विचारधारेचा प्रेरणस्रोत होता, हे निर्विवाद सत्य आहे. ही विचारधारा साहित्याच्या माध्यमातून संक्रमित करताना गुरुजींनी कोणत्या विचारांना अग्रक्रम दिला, त्यासाठी कोणती कथानके निर्माण केली, कोणती निरुपणपद्धती वापरली, भाषा व शैली यांची कोणती नवी प्रारूपे धुंडाळली याचा तपास करणे, हे या निबंधाचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. या तपासासाठी गांधीविचारांचा एक संकल्पनात्मक नकाशा हाताशी असावा या उद्देशाने गांधीजींच्या ‘माझ्या स्वप्नांतील भारत’ या पुस्तिकेचा आधार घेतला आहे. तसेच एका छोट्या निबंधात साने गुरुजींच्या समग्र साहित्याचा मागोवा घेणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या निवडक कलाकृती घेऊन हा तपास करावा लागणार आहे, ही या निबंधाची मर्यादा आहे.

गांधीजींनी ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तिकेतून त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताच्या राजकीय, सामाजिक, नैतिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या पुनर्घटनेचे स्वप्नचित्र रेखाटले आहे. गरिबातल्या गरिबालासुद्धा आपला वाटावा आणि ज्याच्या निर्मितीत त्याच्या मताला महत्त्व राहील असा भारत गांधीजींना निर्माण करावयाचा होता. जेथे उच्च आणि नीच असा वर्गभेद राहणार नाही, जेथे निरनिराळ्या पंथांमध्ये पूर्णपणे सामंजस्य राहील, जिथे अस्पृश्यता किंवा दारू वा इतर नशेच्या वस्तूंना स्थान राहणार नाही, स्त्रीपुरुषा ंना समान हक्क असतील, कुणी कोणाचे शोषण करणार नाही आणि कोणाकडून शोषण होऊही देणार नाही, असा नवा भारत त्यांना निर्माण करावयाचा होता. अहिंसेच्या दैवी संपत्तीच्या साह्यानेच भारतवासी जनता हे ध्येय साध्य करू शकेल असा विेशासही त्यांनी या निरुपणातून व्यक्त केला आहे. 

गांधीजींच्या नजरेत भारत ही भोगभूमी नसून कर्मभूमी आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतील भोगसाधनांच्या कांचनमृगाकडे धावण्याऐवजी ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या जीवनसूत्राचा उद्‌घोष करण्यावर त्यांनी भर दिला आहे. या विचारसरणीतून भारताची पुनर्घटना झाल्यास भारत जागतिक नकाशावर शांतिदूताची भूमिका निभावण्याइतका सक्षम होईल, अशी गांधीजींची धारणा होती. मात्र त्यासाठी भारतवासीयांनी अंधविेशास व भ्रमाची धूळ झटकून, विवेकशून्यतेचा संपूर्ण त्याग करून, तितिक्षा आणि तपस्येचे अग्नीदिव्य करण्यासाठी सरसावले पाहिजे, असा संदेश गांधीजींनी या पुस्तिकेतून दिला आहे. या नवभारत निर्माणासाठी अहिंसा, सत्याग्रह, असहकार, ‘सविनय कायदेभंग’ ही चळवळीची अस्त्रे त्यांनी सुचविलेली आहेत. लोकचळवळीसाठी लागणारी ही आयुधे भारतवासीयांना नवी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘तपस्या’ व ‘आत्मत्यागा’च्या संकल्पनेचीच ही नवी रूपे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आत्मत्याग याचा अर्थ ‘जुलूम करणाऱ्याला भिऊन त्याच्यापुढे गुडघे टेकणे नव्हे, तर जुलूम करणाऱ्याच्या इच्छेच्या विरोधात संपूर्ण आत्मिक बळ पणाला लावणे.’ आत्मबळ आणि स्नायूबळ

स्वराज्याचा अर्थ आम्हाला सभ्य बनविणे आणि आमच्या सभ्यतेला अधिक शुद्ध व शक्तिशाली बनविणे, या महात्मा गांधींच्या विचारधारेमुळे ‘स्वातंत्र्या’ची संकल्पना अधिक व्यापक बनली. राजाची सत्ता प्रजेत वाटली जाणे हा स्वातंत्र्याचा एक अर्थ होताच, परंतु केवळ राजकीय सत्तांतर होऊन एतद्देशीयांच्या हाती सत्तेचे सुकाणू येणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. लोकशाही निर्माण व्हायची असेल तर सामाजिक समतेचे अधिष्ठान आवश्यक आहे; त्यासाठी स्पृश्यास्पृश्यभाव, धार्मिक-जातीय तेढ, लिंगभावात्मक विषमता ही सामाजिक दुफळीची प्रारूपे समाजमनातून हटविण्याला अग्रक्रम दिला पाहिजे, हा विचार दृढ होऊ लागला. ज्ञान आणि परस्परविेशासाच्या आधारावर राजकारण ही लोकशाहीची पूर्वअट आहे, हे सूत्र गांधीजींच्या राजकीय कृतिकार्यक्रमांतून आकार घेत होते. लोकशाहीचे हे पायाभूत मूल्य समाजात रूजविणे हे एक मोठे आव्हान होते. हे आव्हान खांद्यावर घेऊन सुशिक्षितांमध्ये बौद्धिक आणि आत्मिक जागरणाचे क्रांतिकारी पर्व सुरू झाले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि वैचारिक दास्यातून मुक्ती साधण्यासाठी लोकशाही मूल्यचौकटीत कार्यरत असणारी लवचिक अशी सामाजिक उतरंड हवी; आर्थिक स्वावलंबनातून मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला हवा, या दृष्टीने सामाजिक पुनर्घटनेचे नवे प्रयोग सुरू झाले. खादी आणि ग्रामोद्योगाच्या जनचळवळीतून, बुनियादी शिक्षण-प्रणालीतून ग्रामीण पुनर्रचनेचे नवे आयाम रचले जाऊ लागले. साक्षरताप्रसार, अस्पृश्यतानिवारण, स्वच्छता, दारूबंदी, अंधश्रद्धानिर्मूलन अशी नानाविध अभियाने सुरू झाली. अभिजनांपासून लोकजनांपर्यंत नवपरिवर्तनाचे वारे वाहू लागले. रोमप्रमाणे भारताचे नवनिर्माण करण्यासाठी सुशिक्षितांमध्ये ‘परिवर्तनवादी संप्रदाया’ची गुरुकुले निर्माण होऊ लागली. विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज, साने गुरुजी यांची गुरूकुले आपापल्या पद्धतीने गांधीविचारधारा जनमानसात रूजविण्यासाठी लोकप्रबोधनाचा कृतिकार्यक्रम हाती घेऊन क्रियाशील झाली होती. साने गुरुजी यांची क्रांतीदर्शी साहित्यनिर्मिती ही या परिवर्तनवादी चळवळीचीच फलश्रुती होती. 

1924 साली साने गुरुजी अमळनेरच्या छात्रालयात रूजू झाल्यानंतर त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. त्यावेळी महाराष्ट्रात ‘कलेसाठी कला’ या कलावादाचा पुरस्कार होत होता. साने गुरुजी यांना कलेसाठी कला हे थोतांड वाटत होते. ‘गुलगुल गोष्टी करणारे, व्रात्य विनोद करणारे, गुळमुळीत लिहिणारे लोक का राष्ट्र तयार करतात?’ असा प्रश्न त्यांनी ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीतून उपस्थित केला होता. त्यांच्यामते, ‘कला ही कधीही निर्विचार व निर्विकार असू शकत नाही. ‘समाजाचे मंगल’ हे कलेचे ध्येय आहे. त्या त्या काळातील महापुरुष समाजाला ध्येये देत असतात; कलावंत या ध्येयबळाला वाढविण्यासाठी, या युगप्रवर्तकाचे विचार प्रत्येक झोपडीत नेण्यासाठी साहित्यनिर्मिती करीत असतो.’ महात्मा गांधी हे आपल्या काळातले महापुरुष असल्याने त्यांनी दिलेल्या ध्येयवादाला पुढे नेणारे साहित्य निर्माण करण्याचे व्रत आपण स्वीकारले असल्याची नोंद साने गुरुजींनी या कादंबरीत करून ठेवली आहे. महात्माजींचे लेखन ही आपल्यासाठी ‘सत्यनारायणाची पोथी’ असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

गांधीजींप्रमाणे गुरुजींचे लेखनही आत्मदर्शनाच्या स्वरूपातच रूपबद्ध झालेले दिसते. त्यांच्या कादंबऱ्यांतील माणुसकीवर डोळस श्रद्धा ठेवणारा श्याम (श्यामची आई) किंवा ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीतले ‘स्वामी’ हे पात्र म्हणजे स्वत: साने गुरुजीच आहेत. खानदेशातील राष्ट्रीय चळचळीच्या बांधणीत साने गुरुजींचा मोठा सहभाग होता; त्यातल्या अनुभवांचे द्रव्य हेच इथे कलाद्रव्य म्हणून उपयोजिले आहे. गांधीविचारांनी भारलेले स्वामी अमळनेरात विेशधर्ममंडळाची स्थापना करतात, हिंदू- मुस्लिमांमधील झगडे नाहीसे करण्यासाठी पुढाकार घेतात, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, मिश्रविवाहाला आणि  वृक्षसंवर्धनाला चालना देण्यासाठी विविध कृतिकार्यक्रम चालवतात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन देवपूरला आश्रमशाळा काढतात. मुलांची कलापथके तयार करून प्रबोधनाचे मेळे आयोजित करतात. महाराष्ट्रातील कलावंतांना ‘राष्ट्रातील दु:खाला वाचा फोडणारे व पांढरपेशा सुखासीन लोकांना बेचैन वाटेल असे लेखन करण्याचे’ आवाहन करतात. स्वामी म्हणतात, ‘‘हे राष्ट्र जगायला हवे असेल तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालण्यास सर्वांनी उठले पाहिजे. कमळाला फुलवायचे असेल तर खालचा देठ शाबूत हवा... हा खेड्यातील जनतारूपी देठ चिखलात, शेवाळात धडपडत आहे. तेथला ओलावा कमी होत आहे. हा देठ सुकेल, गळून पडेल; आणि ही वरची हसणारी पांढरपेशी कमळे, तीही धुळीत पडतील! महापुरुष या देठांची काळजी घ्यायला बोलावीत आहे... युगपुरुषाच्या हाकेला ओ द्या.. राष्ट्राची नवीन ध्येये रंगवून, नटवून घरोघर न्या.. अंधार दूर करणे, आनंद निर्माण करणे, दु:ख दैन्य निराशा झडझडून दूर करणे, ध्येयपूजेला प्रेरणा देणे, सर्वांना चैतन्य, स्फूर्ती व उत्साह देणे हे कलावंतांचे काम आहे.’’ साहित्यनिर्मिती ही क्रांतिकारी चळवळीला पूरक ठरणारी पर्यायी नैतिक कृती आहे, अशा धारणेतून त्यांनी आपले लेखन केले. या ध्येयवादातूनच हिंदू-मुसलमानांचे ऐक्य, हरिजनोद्धार, खेड्यातील लोकांची दुर्दशा, खादीचा प्रसार, बंधुभाव, प्रेम, असहकार, निर्भयता, ऐक्य यांना कलेची वस्त्रे चढविण्याचे ध्येय ठेवून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. 

महाराष्ट्रातील सुशिक्षितांमध्ये कलावंतांमध्ये, वर्तमानपत्रक र्त्यांमध्ये राष्ट्रनिर्माणाविषयी अपेक्षित असलेली उत्कटता व बांधिलकी आढळत नसल्याची तक्रारही गुरुजींनी ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीत ठळकपणे नोंदवली आहे. तत्कालीन वर्तमानपत्रे समाजात ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी द्वेष-मत्सराचे विषारी वारेच सोडत असतात, असे त्यांचे निरीक्षण होते. ‘हिंदू- मुसलमानांच्या दंग्यांची तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, कोट्यवधी हिंदू- मुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतू जातात. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळवावे. अंक खपवावे हे वर्तमानपत्रांचे ध्येय! मग भारत मरो का तरो,’ अशा शब्दांत गुरुजींनी वृत्तपत्रीय अभिव्यक्तीविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. या पोर्शभूमीवर ‘कलावंतांनी आपल्या अहंकाराचे विषारी बुडबुडे उडविणे बंद करून या दिव्य जीवनकलेचे उपासक झाले पाहिजे,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली गांधीविचारदर्शनाशी असलेली बांधिलकी जाहीर केली होती. 

‘चित्रकार रंगा’ या कादंबरीचा नायक महात्मा गांधींच्या स्वप्नातल्या भारताचे चित्ररूप रेखाटण्याचा प्रकल्प हाती घेतो. मुंबईच्या खादी प्रदर्शनासाठी तो ‘ग्राम-गोकुळ’ ही संकल्पना घेऊन काही चित्रफलक तयार करतो. गरीब मायबहिणींना खादी कसा आधार देत आहे, हे दाखविणारी चित्रे, भीक मागण्याऐवजी आंधळा माणूस चरख्यावर सूत कातून स्वाभिमानपूर्वक आपली भाकरी मिळवतो आहे, या आशयाचे चित्र, जुन्या खानदानातील मुसलमान अम्मा रूढीमुळे घराबाहेर पडून शेतात वा कारखान्यात कामाला जाऊ शकत नाही; परंतु घरात चरखा आल्याने ती आणि तिच्या मुली स्वावलंबी झाल्याचे चित्र, गुराखी वर्तमानपत्र वाचीत आहे, गावातल्या मुली ऐक्याचा गोफ विणीत आहेत, रात्रशाळेत निरक्षर लोक नवे शिक्षण घेत आहेत, स्वच्छतेच्या मोहिमेत सर्व गाव कामाला लागले आहे, महात्माजी मुरली वाजवीत आहेत आणि त्यांच्या पाठीमागून लहान-थोर मार्गक्रमण करीत आहेत, अशी चित्रमाला हा कलावंत रेखाटतो. ग्रामीण जीवनातली अस्पृश्यता गेली आहे, भाऊबंदकी कमी झाली आहे, निरक्षरता जात आहे, नवे सुधारलेले ग्रामोद्योग येत आहेत, राष्ट्रीय भावना वाढत आहे, अशी गांधीजींच्या स्वप्नातल्या भारताची मूर्तचित्रे रंगविण्याचे काम चित्रकार रंगा करतो आहे. 

फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनात बंगालचे चित्रकार नंदलाल स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन अधिवेशनस्थळी बांबूच्या झिलप्या, शेणमातीच्या ग्रामीण द्रव्यसाधनांतून एक नवे गोपूर उभे करीत असल्याचे घटनाचित्र ‘चित्रकार रंगा’ या कादंबरीत रेखाटले आहे. नंदलाल रंगाला कलेचे सारतत्त्व समजावून सांगत आहेत: कलेचा शेवटी अर्थ काय? कला आनंद देते. कला परिस्थितीवर स्वार होते. अरे एखादा गरीब मनुष्य घे. तो गरीब असला तरी कुडाच्या भिंतींना गेरूचा रंग देईल. त्या शेणाने सुंदर सारवील. घरासमोर चार झेंडूची फुलझाडे लावील. घरातील मडकीच, परंतु त्यांना पांढरा तांबडा रंग देईल. त्या दारिद्य्रातही कलेने तो सुंदरता आणतो. श्रमणारी सर्व जनता कलाविलासात भाग घेत आहे. शेते हिरवीगार करणारा शेतकरी हाही कलावानच असतो. श्रमातून  नवनिर्मितीचा आनंद हे गांधीवादी सौंदर्यशास्त्रातले कलामूल्य प्रस्थापित करण्याचे काम साने गुरुजींच्या साहित्याने केले आहे. कलावंतांनी धनिकांचे रंजन करण्यासाठी आपल्या कलेला गुलाम बनविण्याऐवजी पारतंत्र्याच्या बेड्यात अडकलेल्या समाजात बंधमुक्तीच्या प्रेरणा जागविणारा आशय आपल्या कलाकृतीतून संज्ञापित करावा, ही लोकजागरणाची भूमिका गुरुजींनी स्वीकारली आहे. चित्रकार रंगा आपल्या चित्रकलेतून भारतीय अस्मितेची चित्रे रंगविण्याची स्वप्ने पाहतो. स्वतंत्र हिंदुस्थानातील पार्लमेंटच्या भिंतीवर राष्ट्रनिर्माणाचा इतिहास रंगवण्याची त्याची मनीषा आहे. लोकमान्य न्यायाधीशासमोर गंभीरपणे म्हणत आहेत, ‘येथल्या न्यायासनापेक्षा श्रेष्ठ असे ईेशरी न्यायासन आहे. त्याच्यासमोर मी निर्दोषच आहे. माझ्या हालअपेष्टांनीच माझे कार्य पुढे जाईल,’ हा प्रसंग त्याला चितारायचा आहे. मिठाचा खडा उचलताना ‘हे रावणी राज्य मी समुद्रात बुडवतो’ असे निर्धाराने उद्‌गार काढणारे महात्माजी त्याला रेखाटायचे आहेत. गांधीजींचे मुक्तोहास्य कुंचल्यात पकडण्याचे स्वप्न पाहणारा रंगा ही एका अर्थाने साने गुरुजींचीच वाङ्‌मयमूर्ती आहे. 

सामाजिक विषमता घालविण्यासाठी ‘समाजवादी परंपरे’तून आलेले विचारधन गांधीजींनी स्वीकारले होते. आपल्या स्वाभाविक गरजा भागविण्यापुरती प्रत्येकाजवळ संपत्ती असणे, म्हणजे आर्थिक समता, अशी समतेची समाजवादी विचारचौकटीतली व्याख्या गांधीजींनी स्वीकारली होती. त्यामुळे प्रत्येकाला पचनशक्तीनुसार मिळावे ही दारिद्य्ररेषेची संकल्पनाही त्यांनी मान्य केली होती. सर्वांचा सामाजिक दर्जा सारखाच असावा; शेतकरी, विणकर आणि शिक्षक यांच्यात कदापि भेदभाव होणार नाही, अशी समताधिष्ठित समाजरचना हा साम्यवादी आदर्श त्यांनाही भावलेला होता. मात्र तरीही साम्यवादी अर्थशास्त्रापेक्षा गांधीजींचे अर्थशास्त्र काहीसे वेगळे होते. ‘मी अर्थशास्त्राला नीतिशास्त्राहून वेगळे मानत नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. ‘सब भूमी गोपालकी’ या तत्त्वज्ञानावर आधारलेला समाजवाद त्यांना अभिप्रेत होता. धनिकांनी विेशस्ताप्रमाणे वागण्याची कल्पना त्यांच्या अर्थविचाराच्या मुळाशी होती. त्यामुळे आर्थिक समतेसाठी भांडवलदार आणि मजूर यांच्यातील वर्गलढ्याला वावच राहणार नाही; श्रीमंत गरिबांचे विेशस्त म्हणून काम करू लागले, तर संघर्षाशिवाय एक मूक सामाजिक क्रांती घडून येईल असा त्यांचा विेशास होता. समाजाने गरजा कमी करून अपरिग्रहाचे तत्त्व जीवनमूल्य म्हणून स्वीकारावे, अशी त्यांची भूमिका होती. हातकताई आणि विणाई यांच्या पुरस्काराने भारताच्या आर्थिक आणि नैतिक परिस्थितीचे पुनरुज्जीवन होईल, या भूमिकेतून त्यांनी कुटिरोद्योगांचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यांच्या या विचारसरणीत चरखा हे व्यापारी युद्धाचे प्रतीक नसून व्यापार क्षेत्रात शांती निर्माण करण्याचे प्रतीक होते. सुताच्या प्रत्येक तारेत त्यांना शांती सद्‌भाव आणि प्रेम भरलेले दिसत असे. ग्रामपुनर्रचनेचा हा कल्याणकारी विचार समाजात रूजविण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांनी लोकजागरणाचे अनेक उपक्रम सुरू केले होते. साने गुरुजींच्या साहित्यातून गांधीजींच्या या कल्याणकारी अर्थशास्त्राचे वाङ्‌मयीन नमुने चित्रित झालेले दिसतात. गांधींच्या स्वप्नातील नवभारताचे चित्र रंगवणारा चित्रकार रंगा, खादीचा प्रचार करणारा व विलायती वस्त्रांची होळी करणारा दिगंबरराय, आर्य आणि नाग यांच्यात सांस्कृतिक ऐक्य घडवून आणण्यासाठी पुढे सरसावणारा ‘आस्तिक’ कादंबरीतील नागानंद, श्रमणाऱ्याला सुखी करणे म्हणजे ‘क्रांती’ असा संदेश देणारा रामदास, श्रमप्रतिष्ठा, सफाई व गरिबांशी एकरूपता साधून सुंदरपूर येथे संस्कृतिमंदिर उभारण्यास चालना देणारा ‘नवा प्रयोग’मधील सखाराम, स्त्रियांची व अस्पृश्यांची गुलामगिरी संपविण्यासाठी प्रयत्नशील असणारी ‘रामाचा शेला’मधील सरला, ही गांधीजींना अभिप्रेत असलेल्या समाजवादी भारताच्या नवनिर्माणासाठी कृतिशील असणारी पात्रे आहेत. कम्युन्सच्या धर्तीवर शेतकरी-कामगारांच्या सामुदायिक वसाहती अर्थात ‘स्वराज्यवाड्या’ उभारण्याच्या कल्पना अशी सामाजिक पुनर्घटनेची विविध पर्यायी रूपे ‘क्रांती’, ‘नवा प्रयोग’, ‘आपण सारे भाऊ’ या कादंबऱ्यांच्या माध्यमातून साने गुरुजी यांनी सुचविली आहेत. 

आस्तिक : गांधीवादी तत्त्वज्ञानाला वाङ्‌मयीन रूप देताना कथनपद्धती आणि शैलीचे कोणते प्रयोग गुरुजी करतात व त्यातून गांधीवादी साहित्यशास्त्राची पायाभरणी कशी होत गेली हे समजावून घेण्यासाठी इथे ‘आस्तिक’ या कादंबरीच्या घाटाची पाहणी करावयाची आहे. नाग व आर्य यांच्यातील वर्णद्वेषाची पौराणिक कथा ही या कादंबरीची प्राथमिक विषयवस्तू आहे. मात्र या विषयवस्तूची हाताळणी गांधीवादी विचारधारेतून होत  असल्याने ही केवळ भूतकाळाचे उत्खनन करणारी ऐतिहासिक गोष्ट अथवा पुराणकथा राहात नाही. तर ती भूतकालीन वर्णविद्वेषाच्या पारंपरिक चौकटीतून मुक्त होण्याची कथा म्हणून नव्या रूपात संरचित केली जाते. कादंबरीच्या संघटनेचे रचनातंत्रही याच मूल्यदृष्टीतून घडविले जाते. या कादंबरीच्या कथानकाला पुढे नेण्यासाठी वाचकाला महाभारतकालीन इतिहासाच्या पोर्शभूमीची एक सांस्कृतिक संदर्भचौकट पुरवली जाते. राजा परीक्षिताच्या चित्रशाळेत महाभारतातील घटना-प्रसंगांवर आधारलेल्या विविध चित्रांचा एक मालिकापट असतो. भाऊबंदकीमुळे कुरूक्षेत्रावर कापल्या गेलेल्या वैभवशाली क्षत्रियांच्या कुलक्षयाचा रक्तरंजित व शोकार्त इतिहास या चित्रशाळेतील चित्रांतून परीक्षिताच्या नजरेसमोर येत राहतो. महाभारतातील अर्जुनानेही नागकन्यांशी विवाह लावला होता; पण त्याने या नागकन्यांना कधीही सुभद्रेचा आणि द्रौपदीचा मान दिला नव्हता. वीरांच्या करमणुकीचा विषय एवढेच त्या नागकन्यांचे स्थान होते. नाग स्त्रीपासून झालेला पुत्र बभ्रुवान यालाही अर्जुनाने अभिमन्यूच्या बरोबरीचे स्थान कधीच दिले नाही. नर्मदेच्या तीरावर तक्षक कुळातील नागांची वसाहत होती. महर्षि अग्नीला आश्रम स्थापण्यासाठी परीक्षिताच्या आजोबांनी ही नागांची वसाहत भस्मसात केली होती. कृष्णानेही गंगा-यमुनेच्या सुपीक प्रदेशातून नागांना हद्दपार केले होते. कालिया जात नव्हता, तर त्यालाही स्नायुबलाने हाकलून लावले होते. या घटनाचित्रांतून परीक्षिताच्या पूर्वजांचा इतिहास हा नागांना हाकलून देण्याचा इतिहास असल्याचे कथन केले जाते. आताही आर्य आणि नागांचा संस्कृतीसंकर टाळण्यासाठी नागांचा संहार करावा, असा सल्ला वक्रतुंड परीक्षिताला देत आहे. चित्रशाळेतील या रंगपटातून नाग व आर्यांच्या सांस्कृतिक संबंधांचा पूर्वकालीन इतिहास वाचकाला कादंबरीतील आशयद्रव्याकडे पाहण्यासाठी एक भिंग पुरवतो. हा सांस्कृतिक संघर्ष प्रामुख्याने प्रतिष्ठितांच्या तथाकथित अस्मितेतून फुलत असतो; वर्णद्वेषा्‌च्या या राजकारणाला सामान्य माणसांच्या जीवनात अग्रक्रम नसतो, हे गांधीजींनी अधोरेखित केले आहे. 

कादंबरीतील आर्य कुटुंबातील वत्सलेचे आजोबा आणि वडील दोघेही नाग-आर्य संघर्षाचे बळी आहेत. आजोबांची तलवार आणि वडिलांचे धनुष्य त्यांच्या वीरगतीचे स्मारक म्हणून ह्या घराण्याने जपून ठेवले आहे. कादंबरीचा प्रारंभ नागांच्या एका लहानशा वसाहतीला आर्यांनी आग लावली होती, या घटनेच्या स्मरणातून होतो. वत्सलेचा पिता रत्नाकर याने आगीत उडी घेऊन नागांच्या दोन मुलांना वाचवले; स्वत: मात्र आगीत होरपळल्याने जीव गमावून बसला. वत्सलेची आई पतीबरोबर सती गेली. सुश्रुता आजीने वत्सलेचा सांभाळ केला. वत्सलेचा पिता स्वत: आर्य असला तरी भेदभावाला त्याच्या जीवनात स्थान नव्हते. तो कधीही नागांची निंदा करीत नसे, नागपूजेच्या उत्सवात तो आनंदाने सहभागी होई. किंबहुना त्याला नाग जातीच्या मुलीबरोबर विवाह करायची इच्छा होती; पण आईच्या शब्दाखातर ती त्याने सोडून दिली होती. रत्नाकरला नागांची काळीसावळी मुले म्हणजे गगनाची बाळे, समुद्राची मुले असल्यासारखी वाटत. आर्य जातीच्या लोकांना रत्नाकरची ही नागांबरोबरची सामिलकी रुचत नव्हती. ते त्याला नावे ठेवीत. रत्नाकरच्या नाग मित्राने एक चंदनाची डबी त्याला भेट दिली होती. नाग आणि आर्यांच्या परस्पर प्रेमाची, सांस्कृतिक ऐक्यभावनेची ही खूण सुश्रूता आजीने जपून ठेवली होती. सुश्रूताच्या नवऱ्याने कुरूक्षेत्रावर लढाईला जाण्यापूर्वी अशोकाची फुले त्या डबीत साठवून ठेवली होती. अशोकाची ही फुले अनासक्तीचे प्रतीक समजली जातात. 

या कादंबरीतले आस्तिक ऋषींचे पात्र महत्त्वाचे आहे. आस्तिक ऋषी हे आर्यपुत्र होते आणि त्यांची आई मात्र नागकन्या होती. आर्यांची संस्कृती वाढावी यासाठी अनार्यांना नष्ट करावे, ही भूमिका स्वत: आस्तिक ऋषींना मान्य नव्हती. उंबराच्या फळात असंख्य बिया आनंदाने राहतात, तसे नाग आणि आर्य यांनी न भांडता परस्पर सहकार्याने आनंदात रहावे, अशी त्यांची शिकवण होती. प्रेमाची पताका खांद्यावर घेऊन नाग व आर्य यांच्यात ऐक्य व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत होते. आपल्या आश्रमातील तरुणांनी मानव्याची उपासना करावी, यावर त्यांचा कटाक्ष असे. गुरुजींनी आस्तिकाच्या व्यक्तिरेखेवर भाष्य करण्याची उचित संधी घेऊन गांधीवादी विचारधारेतून सौंदर्याची व्याख्या केली आहे. शरीराची सर्वांगीण प्रमाणबद्ध वाढ झाली की शारीरिक सौंदर्य उत्पन्न होते; मनाची व बुद्धीची परिपूर्ण वाढ झाली की ज्ञान जन्मते आणि मानव्याची परिपूर्ण वाढ झाली की दिव्यता जन्माला येते. ही सौंदर्ये एकापेक्षा एक अधिक उच्च तर आहेत. पण शारीरिक सौंदर्य म्हणजे घराची शोभा, बौद्धिक सौंदर्य म्हणजे माजघरातील शोभा  आणि मानव्याच्या परिपूर्णतेचे सौंदर्य म्हणजे गाभाऱ्यातील सौंदर्य असे सुबोध विश्लेषणही त्यांनी दिले आहे. गांधीजींना आणि पर्यायाने गांधीविचारधारेला अनुसरणाऱ्या कलावंताला अभिप्रेत असलेल्या मानव्याच्या सौंदर्याची व्याख्या या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला मिळते. 

सुश्रूता आजीने आपल्या नातीला- वत्सलेला आस्तिक ऋषीच्या आश्रमात शिकायला पाठविले होते. वत्सलेला या आश्रमात शिकून ब्रह्मवादिनी होण्याची आकांक्षा होती. आणि प्रत्यक्षात विवाहवेदीवर चढायची वेळ आली तर नाग तरुणाला तिची पसंती असणार होती. वत्सला ज्या आश्रमात शिकत होती, त्याच आश्रमात कार्तिकही शिकत होता. कार्तिकच्या घरात नागांचा द्वेष केला जाई. कार्तिक मात्र समन्वयवादी विचारांचा होता. कार्तिकला वत्सलेशी लग्न करायचे होते पण वत्सलेची पसंती नाग तरुणाला असल्याने, त्याचा कोंडमारा झाला होता. एकदा खळाळणाऱ्या नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्यात वत्सलेला वाचविण्याचे आव्हान समोर आले होते पण त्यावेळी कार्तिक पुढे सरसावला नाही; नागानंद नावाच्या एका नाग तरुणाने प्रवाहात उडी घेऊन वत्सलेला वाचविले होते. वत्सलेला भित्र्या कार्तिकापेक्षा मरणाशी खेळणारा नागानंद भावतो. नाग लोक कलावान होते. सृष्टीच्या सान्निध्यात राहून नागानंदला शेती करता येई, तीर मारता येई, भाला फेकता येई, बासरी वाजवता येई. त्याच्या आईने त्याला दुसऱ्यासाठी श्रमायला, दुसऱ्यासाठी मरायला शिकवले होते. त्यामुळे आर्य वत्सलेची पसंती नागानंदाला होती. तिच्या लेखी लग्न म्हणजे एक प्रकारची पूर्णता. एकमेकांतील उणीवा भरून काढून उभयतांतील समानधर्माची वाढ! नाग आणि आर्य या जातीतील समानधर्माचा विकास साधणारे जातीय ऐक्य साध्य करणारे कथानक रचणे हे साने गुरुजींच्या कादंबरीलेखनाचे ध्येय होते. या दृष्टीने त्यांनी कथानकात संघर्ष व सलोख्याच्या विविध प्रसंगांची रचना साधली आहे. मिथके, प्रतिके, निसर्गवर्णने यातून वैिेशक सामंजस्याचे भरण-पोषण होईल अशी ठिकाणे निवडली आहेत. मानव्याची साधना करणारे अगस्ती ऋषी, प्रेमभावाचे मूल्य प्रमाण मानणारे व जीवन सौंदर्यसन्मुख करण्याचा सल्ला देणारे शुक्राचार्य; भिन्न जातीवंशाचे घटक असूनही प्रेमबंधाचे मूल्य जपणारे व आपल्या वर्तनव्यवहारातून ‘प्रेमाला जात नसते’ हा संदेश संज्ञापित करणारे नागानंद व वत्सला ही पात्रे गांधीवादी मूल्यादर्श जपणारी प्रातिनिधिक पात्रे आहेत. ‘सर्व माणसे समान आहेत आणि समान हक्क आणि समान संधींसाठी ते पात्र आहेत’ हे गांधीविचारधारेतील समतेचे मूल्य या कादंबरीतून अधोरेखित होते. 

जन्मेजयाच्या सर्पसत्रात नागांची होळी होत असताना इंद्राने केलेली मध्यस्थी, युद्ध टाळण्यासाठी आस्तिकाने केलेली आत्मसमर्पणाची तयारी, शांतिसूक्ते गात राजाचे सैन्य परतवून लावणारी स्त्रियांची शांतिसेना, अशा विविध घटनानाट्यातून आर्य-नाग संघर्षाच्या कथेचा विकास साधत गुरुजी कादंबरीच्या अखेरीस आर्य-नाग मिलनाचे सुंदर चित्र उभे करतात. द्वेषासाठी द्वेष नको, बहुजन समाजातले प्रेमाचे धागे घट्ट राहोत हा विचार पुढे आणतात. आर्यांचा विष्णू व नागांचा सहस्र फणांचा नागदेव या दोन दैवतांच्या एकात्मतेतून शेषशायी भगवानाच्या निर्माणाचे, नव्या संमिश्र संस्कृतीचे एक आदर्श प्रारूप पुढे आणतात. 

या कादंबरीत मानव्याच्या आदर्श समाजरचनेचे एक स्वप्नचित्र पूर्ण झालेले असले, तरी भविष्यात ते खरोखर किती टिकेल याविषयीची साशंकताही गुरुजींनी कादंबरीच्या अखेरीस नोंदवून वाचकाला एक वास्तववादी धक्का दिला आहे. ही अखेरची घंटा अशी आहे : 

‘ज्या नागांची व आर्यांची आज एकी झाली त्यातूनही पुढे निराळे प्रश्न उत्पन्न होतील. आर्य लोक नागांची संस्कृती आत्मसात करतील, परंतु नागांना खाली लटकवतील. त्यांना एक प्रकारे ठिकठिकाणी अस्पृश्य करतील. त्यांच्या शेतीभाती जप्त करतील. त्यांना परावलंबी करतील. त्यामुळे आर्य व नाग यांच्या झगड्याऐवजी स्पृश्य व अस्पृश्य या नावाने झगडा सुरू होईल. परंतु त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. काही उदार स्पृश्य ह्या अस्पृश्यांना पुन्हा प्रेमाने जवळ घेऊ पाहतील. परंतु मग अस्पृश्यच रागावून दूर राहू लागतील. ते म्हणतील, ‘आम्ही अलगच राहू’. परंतु त्यांचा हा राग हळूहळू दूर होईल... हे प्रवाह पुन्हा जवळ येतील. तसेच हिंदू व मुसलमान असे झगडे होतील. परंतु मागाहून ते एकमेकांची संस्कृती अभ्यासू लागतील. एकमेकांच्या सुंदर चालीरीती घेतील. निरुपद्रवी धार्मिक आचारविचारांना मान्यता देतील... या देशाचे तुकडे करा असे म्हटले जाताच झोपलेलेही जागे होतील, न बोलणारेही बोलू लागतील. सर्व सत्प्रवृत्तीचे लोक पांगलेले होते, ते एक होतील. म्हणतील, नाही होऊ देणार तुकडे. आम्ही एकत्र राहू. परस्परांचे मांगल्य पाहू. तडजोड करू. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन सारे उठतील व ऐक्याचे प्रयत्न करू लागतील.’  

भारतातील सामाजिक दुहीची संपूर्ण जाण आणि तरीही एकात्म भारताची तितिक्षा असणारे कलावंताचे मन यातून आलेले हे एक स्वगत आहे. गांधीवादी मूल्यादर्शाचा नमुनापाठ आणि एतद्देशीय वास्तवाची राखाडी बाजू या दोन्हींचे एक सम्यक दर्शन घडविणारी ही कादंबरी गांधीवादी साहित्यशास्त्राच्या बांधणीसाठी पथदर्शक ठरू शकेल. 

अस्पृश्योद्धार : जीवनमूल्ये आणि कलामूल्ये, आध्यात्मिक मूल्ये आणि सौंदर्यमूल्ये, श्रद्धा आणि विवेक, परंपरा आणि नवता यांच्यातली अतूट सलगता हे साने गुरुजींच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. गांधीवादी साहित्यशास्त्राला अनुसरणाऱ्या साहित्यकृतीचा नमुनादर्श म्हणून त्यांच्या ‘अस्पृश्योद्धार’ या नाटकाची समीक्षा येथे करावयाची आहे. या नाटकात लोकसंवादाच्या सांस्कृतिक मुशींचा कलात्मक वापर केला आहे. साहित्याने शोशत मूल्यांचा शोध घ्यावा, जाती-धर्म-लिंगाधिष्ठित भेदभावाच्या पारंपरिक समजुतींमुळे निर्माण झालेला दुरावा संपविण्यासाठी समाजाला सदाचाराचा मार्ग दाखवावा, त्या मार्गावरून चालण्यासाठी लोकांना वैचारिक व आध्यात्मिक आत्मबळ पुरवावे, आत्मपरीक्षण व हृदय परिवर्तनाच्या मार्गाने चित्तशुद्धी साधता येते याचे नमुने साकार करावेत, ही गांधीविचाराची बांधिलकी ‘अस्पृश्योद्धार’ या नाटकात तंतोतंत उतरलेली दिसते. अस्पृश्यतेच्या रूढीमुळे तुटलेल्या हिंदू समाजाची संलग्नता साधण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांची चाललेली धडपड हा या नाटकाचा विषय आहे. नाटकाच्या पहिल्या प्रवेशात महार वस्तीत तापाने फणफणलेला ‘राघू’ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तडफडतो आहे; अंगारा-धुपाऱ्याऐवजी वैद्यकीय उपचार करवून घेण्यासाठी लागणारा पैसाही नाही आणि अस्पृश्य वस्तीत येऊन उपचार करणारा डॉक्टर मिळणेही दुरापास्त असल्याने अगतिक होऊन बसलेला राघूचा बाबा पांडू आणि कुठे पाणी मिळते का त्याचा शोध घ्यायला बाहेर पडलेली राघूची आई यांच्यातल्या संवादातून भविष्याच्या पोकळीतले शून्य गरगरावे तसे नाटकात संवाद सरपटत येतात. 
‘‘गरिबीची दोरी।पडे की अपुरी । 
क्षणी न घेणारी।पंचप्राणा।। 
मृत्यूच्याहीपेक्षा।करी हाल भारी । 
देवा सुरी बरी।प्राण घ्यावा।।’’ 

या अभंगाच्या आर्ततेने ही पोकळी अधिकच गडद होते. गावातल्या लक्ष्मीकांत सावकाराचा पुत्र नारायण हा नव्या पिढीतला सुशिक्षित तरुण घरातल्या परंपरेने चालत आलेल्या शोषणाच्या आकृतिबंधांचा निषेध करणारा आहे. त्याला सावकारी पाशातून खऱ्याचं खोटं करून, लोकांच्या जमिनींवर जप्त्या आणून मिळवलेल्या संपत्तीचा तिटकारा असतो. गांधीविचारांनी प्रेरित झालेला हा नवा शिपाई रूढींच्या बेड्या तोडून महारवाड्यात जाऊन अस्पृश्यांच्या सेवेचे कंकण बांधून काम करीत असतो. तापलेल्या राघू्‌ला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी तो पुढे सरसावतो. पारंपरिक लोकाचारांपेक्षा तो असा लोकविलक्षण निर्णय का घेतो, या प्रश्नाचे उत्तर त्याची गांधीजींच्या कार्मिक नैतिकतेशी असलेली बांधिलकी! गावात नव्याने शिकून आलेल्या डॉक्टरला नारायण महारवाड्यात घेऊन येतो. परंपरेचे संस्कार डोक्यातून गेले नसल्याने हा डॉक्टर सुरुवातीला महारवस्तीत यायला नकार देतो. या दु:खदायी प्रसंगाची संवेद्यता 
देश आपुला दीन झाला । 
झोप त्यास, बहु बाजूंनी जडाला । 
जरी नाही सावध झाला तरी बुडाला। 
या उत्कट काव्यातून घनगर्द होत जाते. वैद्यकीय शिक्षण घेताना उंदीर, बेडूक, प्रेतं फाडताना न कचरणारा हा डॉक्टर माणसाला शिवताना मात्र मागे हटतो. तेव्हा नारायण त्याला सदसद्‌विवेकाचे खडे बोल सुनावतो. लोकमताच्या तलवारीच्या धारेखाली राहून तुम्हीही आपल्या शिक्षणानं सुधारलेल्या बुद्धीचा उपयोग देशदैन्याकडे डोळेझाक करण्याकडे करणार काय? या खणखणीत वैचारिक प्रश्नाने डॉक्टरची सद्‌सदविवेकबुद्धी जागी होते आणि तो उपचाराला तयार होतो. राघू दुरुस्त होतो. नारायण त्याला सूतकताईचे काम शिकवतो, चरखा आणून देतो, तो गांधीजींच्या चळवळीचा सदस्य बनतो. लक्ष्मीपंत मात्र महाराच्या मुलाच्या मदतीला धावून गेलेल्या नारायणला घरातून हाकलून लावतो. तेथेही नारायण आपल्या बापाला खडे बोल सुनावतो. तुम्हाला मांजर, पोपट, कुत्रे चालतात; 84 लक्ष योनींनंतर जन्म घेतलेला माणूस मात्र चालत नाही. 

नाटकाच्या उत्तरार्धात, घरातून हद्दपार झालेला नारायण तापाने फणफणलेला आहे. बालवीर चळवळीचे शिक्षक त्याला आश्रय देतात, वैद्यकीय उपचार मिळवून देतात; महाराचा पुत्र राघू नारायणाची सेवा-सुश्रूषा करतो. पुत्र मरणासन्न पडल्याचे कळल्यावर बापाचे हृदय पाझरते; महाराच्या मुलाने सेवा करून आपल्या मुलाला  वाचविल्याचे पाहिल्यावर आपल्या पूर्वीच्या वर्तनाचा पश्चाताप होतो. अहंकाराचा डोंगर वितळून सपाट होतो. हृदयात कारुण्याची गंगा वाहू लागते. परपीडन हे पाप आणि परोपकार हे पुण्य, याचा साक्षात्कार होऊन नैतिक मार्गाने चालण्याची प्रेरणा मिळते. लक्ष्मीपंत बालवीर चळवळीचा आश्रयदाता बनतो. चळवळीला आपला बंगला देतो. कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो. लक्ष्मीधरांनी समाजाचे विेशस्त बनले पाहिजे या गांधीजींच्या भूमिकेला अनुसरणारा वर्तनव्यवहार अस्तित्वात येतो. सत्याचे नवे क्षितिज आकाराला येते. ‘सर्वोदय’ हे साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे, या भूमिकेतून हे लेखन झाले आहे. गुरुजींनी व्यक्ती हे एकक न मानता, खेडे हे एकक मानून कथानकाची रचना केल्याने, या नाटकाचा शेवट सार्वजनिक सुखाच्या संवेदनेचा प्रत्यय जागविणारा होतो. त्यामुळेच ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण’ हा विचार रुजविण्यात या नाटकाला यश प्राप्त होते. 

या नाटकात एक उपकथानक आहे. लक्ष्मीकांतचा वसुली करणारा गुमास्ता एका गरिबाची गाय बळजबरीने विकत घेतो. ही गाय हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा मूलाधार असते. त्यामुळे घरातली गाय गेल्यावर त्याच्या वाट्याला येणारा शोक गुरुजींनी सूफी भजनाच्या धाटणीने, शहिदांना श्रद्धांजली वाहावी अशा भावनेने एका ‘मरसिया’ कव्वालीतून व्यक्त केला आहे : 
वैभवांच्या निर्झरांचा । गाय जाता नाश झाला । 
दूध जाई, वासरूही । काय शोभा या गृहाला ।। 
या विलापामुळे नाटकात करुणरसाची निर्मिती होते. गायीच्या दुराव्याचे दु:ख स्वरबद्ध करणाऱ्या या विलापिकेसाठी गुरुजींनी अभंग वा श्लोकाच्या वृत्ताऐवजी ‘कव्वाली’ची योजना केली आहे. गोरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी कव्वालीचे सप्रयोजक उपयोजन करून धर्माच्या हृदयात ओलावा असतो, ही भावना अप्रत्यक्षपणे संज्ञापित होते. हिंदू-मुस्लिम ऐक्यभावनेच्या गांधीविचारांना उजळून टाकणारी ही सौंदर्यदृष्टी आहे. अभंग, फटका, गझल, कव्वाली, रागदारी संगीतातली पदरचना यांच्या सांस्कृतिक परिघात नाट्यसंवादांची प्रवेशरचना करून ही नाट्यनिर्मिती झाली आहे. सर्वमान्य सांस्कृतिक अस्मितेच्या प्रतीकांमागच्या अंधविेशासांना धक्का देऊन सामाजिक दंभस्फोट करण्याचे नाट्यतंत्र उपयोगात आणले जाते. अस्पृश्यांनी पांडव-प्रतापाची मिरवणूक काढली म्हणून स्पृश्यांनी पांडवप्रतापाची प्रत जाळली. या घटनेचा संदर्भ घेऊन नाटककाराने समाजबांधवांना प्रश्न केला आहे की, पांडवप्रतापाच्या प्रतीकात्मक स्वरूपात असलेल्या श्रीकृष्णाच्या वाङ्‌मयीन मूर्तीला जाळून तुम्हाला कसा काय स्वर्ग लाभणार आहे?’ नाटकातल्या दैवी-आसुरी संपत्तीतल्या द्वंद्वाचा शेवट ‘लोक नांदो एकमताने/आनंदाने संसार करो’ या सर्वमांगल्याच्या पसायदानाने होतो. सर्वोदय हे साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन होय. संघर्षाचे विसर्जन, संवादाचा उदय आणि त्यातून उदयाला येणारे सत्याचे नवे भान हे टप्पे साधित या नाटकाचे संविधान भरतवाक्याप्रत येऊन पोचते. 

लोकांनी आत्मज्ञान आणि आत्मपरीक्षणातून शहाणपणा आणि भलेपणा कमावणं हे भारतवासीयांपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे, हे साने गुरुजींनी ओळखलं होतं. आपल्या भूतकाळाविषयी पश्चाताप करणे किंवा त्याचे ओशाळवाणे ओझे पुढे वागविण्याऐवजी ज्याची लाज वाटणार नाही अशी स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्यावर भर देणारे विचारमूल्य समाजात रूजविण्यासाठी गुरुजी लेखनाला प्रवृत्त झाले होते. त्यांच्या ‘पुनर्जन्म’ कादंबरीचा निवेदक विचारतो की, ‘राष्ट्राला उभे करील ते वाङ्‌मय खरे? की राष्ट्राला चिखलात ठेवील ते खरे?’ साहित्य हे साध्य नसून समाजाच्या सर्वांगीण उत्थानाचे, अभ्युदयाचे एक प्रभावी साधन आहे, या बांधिलकीतून त्यांनी आपल्या लेखनाचे घाट शोधले. जीवाला शिवत्वाकडे घेऊन जाणारा शब्दसोपान म्हणून ते साहित्याकडे बघत असत. विेशाविषयी वाटणारी प्रेममय करुणा हा त्यांच्या वाङ्‌मयाचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या साहित्यातील अश्रूंनाही तीर्थाचे मूल्य प्राप्त होते. गांधीवादी विचारधारेचे ललितरूप म्हणून साने गुरुजींच्या साहित्याचे वाचन झाले, तर या साहित्याच्या माध्यमातून शोशत सत्याच्या आकलनाचा मार्ग प्रशस्त व्हायला नक्कीच मदत होईल असा विेशास वाटतो.

‘साहित्य अकादमी’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’चे मराठी विभाग व ‘गांधी विचारधारा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात 14 सप्टेंबर 2019 रोजी वाचलेला हा निबंध आहे.  

Tags: Ramesh Narayan Warkhede Sane Guruji Mahatma Gandhi साहित्य साने गुरुजी महात्मा गांधी रमेश नारायण वरखेडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात