डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रेहाना आध्यात्मिक अनुभवाबाबत बोलत असे. ‘हार्ट ऑफ अ गोपी’ हे तिचे आत्मचरित्र असेल, असं अनेकांना वाटतं. तिच्या अनुभवांवर तिने हे पुस्तक लिहिले आहे. त्यात आपल्या गतजन्मीच्या समर्पणाबद्दल ती लिहिते. रेहानाबद्दल योगी अरविंद म्हणाले होते की, ही विस्मयकारक स्त्री नक्की कृष्णाच्या गोपींपैकी एक होती. (आता आपल्या या गूढ गोष्टींचा अनुभव व गम्य नसल्याने काही लिहू शकत नाही.) तिच्या खोलीत दर्शनी भागात कृष्णाची प्रतिमा असे. दर शुक्रवारी तिच्याकडे एक मौलवीजी कुराणातील एक प्रकरण वाचून दाखवायला येत, त्यांना ते चित्र पाहून धक्का बसला होता. पण ती आत्यंतिक आदराने आणि प्रेमाने त्यांचे वाचन ऐकून घेत असे, कुराणाच्या प्रतीचे चुंबन घेत असे. तसेच- या दोन विचारांत काही फरक नाही, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे. आजच्या वा तेव्हाच्या वातावरणातही हिंदू आणि इस्लाम या दोन धर्मांत तेढ असताना तिचा विेशास व साधना महत्त्वाची वाटते.

मुंबईतील जहांगीर पेटिट यांचा आलिशान बंगला... पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. कुणी तरी खास पाहुणे येणार होते. सिल्कच्या साड्या, मोजके किमती दागिने घातलेल्या रमणी दबक्या पावलांनी ये-जा करीत होत्या. नोकर-चाकर आपलं काही चुकणार तर नाही ना, या दडपणाखाली अदबीने वावरत होते. बंगल्यातील पुरुष पाश्चात्त्य पोषाखात रुबाबात वाट पाहत होते. सगळीकडे अभिजन पाहुण्यांच्या येण्याचा उत्साह दाटला होता. अशा वातावरणात एक तरुणी रेहाना, मैत्रिणीच्या बोलावण्याने तिथे आली होती. दाराआडून उत्सुकतेने बाहेरचे दृश्य पाहत उभी होती. गाड्या थांबल्याचा आवाज आला, सारे उभे राहिले. समोरून एक देखणा, तेजस्वी, छातीपर्यंत रुळणारी दाढी असलेला, उंची पायघोळ पोषाख घातलेला पुरुष येत होता. सर्व अभिजनमंडळी त्याच्या दर्शनाने भारावली गेली. त्यांच्या शेजारून जाडेभरडे कपडे घातलेला, बुटका, किरकोळ व्यक्तिमत्त्वाचा तरुण होता. तोही कुणी मोठा माणूस असावा, कारण सगळे जण त्यालाही वाकून नमस्कार करीत होते. देखणा माणूस अर्थातच रवींद्रनाथ टागोर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभाव टाकणारे होतेच; पण त्यांच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या माणसात नक्कीच काही तरी चुंबकीय शक्ती असावी की, ज्यामुळे त्याच्यावरून नजर हटत नव्हती. रेहानाला जाणवले की, या व्यक्तीत नक्कीच काही तरी योगिक ताकद असावी- जी तिला नि अनेकांना त्याच्याकडे खेचत होती.

स्वत: रेहाना (1900-1975) अत्यंत घरंदाज, धनाढ्य घराण्यातली तरुणी होती. पेटिट घराण्याशी त्यांचे दृढ संबंध होते. तिचे आजोबा मुंबई हायकोर्टाचे पहिले भारतीय जज होते. वडील बडोद्याला जज होते. हे सारे मूळचे अरबस्तानच्या धार्मिक, धनाढ्य बोहरी परिवारातले. अत्यंत फॅशनेबल राहणीचे, तरी राजकारण-समाजकारण यात अग्रगण्य. जेव्हा तिच्या वडिलांना जालियनवाला बाग खटल्याच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात आली, तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला. वडील बद्रुद्दीन तय्यबजींनी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले नि काँग्रेसमध्ये सामील झाले. अनेक समविचारी मुस्लिमांना चळवळीत ओढले.गांधींच्या विचारांचे महत्त्व पटून रेहानाची आई श्रीमंती, अभिजन राहणीतून बाहेर पडली आणि तिने सार्वजनिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. स्त्रिया आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. रेहाना लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीची होती. इस्लामच्या तत्त्वांचा तिचा अभ्यास होता, तसेच हिंदू विचारही ती जाणत होती. गांधींच्या सभेत ती तन्मयतेने, मधुर आवाजात भक्तिगीतं गात असे. कुराणातील समर्पक भाग वाचून दाखवत असे. ती पाश्चात्त्य संगीतदेखील शिकलेली होती. अत्यंत आधुनिक आणि संपन्न घरातून ती आलेली होती. घरी ऐषारामाच्या सवयी होत्या. शब्द झेलायला, कामं करायला अनेक नोकर-चाकर तत्पर होते. अशा वातावरणातून तिने गांधींचे विचार हे विवेकाची पाठराखण करणारे, माणसांमधील भेदभाव मिटवायला लावणारे आहेत हे पटल्याने एकदम आश्रमीय जीवन पत्करले.

गांधींना आपली ही नाजूक लेक सदोदित देशाचाच विचार करते याचे कौतुक वाटे. तिने फार कष्टाची कामं करू नयेत, साक्षरता व खादीचा प्रसार करावा, असे ते वारंवार सांगत; पण तीही निश्चयी होती. गांधींचे विचार पटले तरी ती प्रत्येक बाबतीत त्यांचे आचरण करत होती, असे मुळीच नाही. त्यांच्या अनेक विचारांचा ती कडाडून विरोध करीत असे. ब्रह्मचर्य हे त्यापैकी एक होते. स्त्री-पुरुषांमधील ही नैसर्गिक भावना दडपल्याने लोक विचित्र वागतात, असे ती सांगत असे. फ्रेड ब्लूम या पत्रकाराला दिलेल्या एका मुलाखतीत तिने नमूद केलंय की, गांधींची अनुयायांवर माया असे. त्यांची काळजी असे. मग तो हरिजन असो वा इतर मोठा नेता असो; ते आस्थेने त्यांची चौकशी करीत. तिच्या मते, गांधीजी एक महान योगी होते. तिने त्यांना कधी चिंतेत पडलेले, घाईत असलेले पाहिले नाही. आजारी, गरीब माणसांबद्दल त्यांच्या मनात असीम करुणा असे, ती त्यांच्या वागण्यात दिसे. ते त्यांना औषधं देत, जखमा धुवत, मालिश करून देत. हे अगदी सहजपणे करून पुन्हा राष्ट्रकामाला लागत. त्यांची अनेक गोष्टींवर गाढ श्रद्धा होती. मुळात माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा विेशास असे. ते जे बोलत-सांगत, ते स्वत:देखील आचरणात आणत असत. त्यामुळेच त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांवर प्रभाव पडे. त्यांचा आश्रम म्हणजे एक सतत चालणारे प्रात्यक्षिकासहचे प्रशिक्षण असे. तेथे शिकलेली व्यक्ती मग कुठल्याही अडचणीला घाबरत नसे. ठाम निर्धाराने राष्ट्रकार्य करण्याचे गांधी हे विद्यापीठ होते.

 रेहानाचे आई-वडील राजेशाही पद्धतीने राहत आले होते. घरातल्या स्त्रिया पडद्यात राहणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानत असत. पण माहिती नाही, काय जादू झाली... ती स्वत:, आई-वडील, पुतणी या साऱ्यांनी राष्ट्रकार्यात गांधीजींसह जायचे ठरल्यावर प्रथम राजप्रासादाचा निवास सोडून खेड्यात जायला सुरुवात केली. हे काही खेड्याचे पर्यटन नव्हते. त्यांच्यासारखेच राहणे, जमिनीवर निजणे, जे असेल ते शाकाहारी खाणे- अशा वागण्यातून ते खेडुतांशी एकरूप होत होते. तिथल्या लोकांशी संवाद साधणे, त्यांची सुख-दु:खं समजून घेणे, त्यांच्या साक्षरतेची व्यवस्था करणे, अस्पृश्यतेबाबत जागृती करणे, खादी प्रसार-विक्री अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. हे एक प्रकारचं प्रशिक्षणच होतं.

गांधींच्या मते, स्त्रिया म्हणजे मूर्तिमंत अहिंसा आहेत. अहिंसा म्हणजे असीम प्रेम, सहनशीलता. त्या देशकार्यात आल्या तर जगात चांगले बदल होतील. त्यांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे. विधवांचे एकाकी जीवन, बालविवाह यांबद्दलही ते तीव्रतेने बोलत. या साऱ्या विचारांना राबवण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार दृढ करणारे अनुयायी असे तयार होत  असत. गांधींचा विचार फक्त परकीय सत्तेला हाकलून देणे एवढाच नव्हता, तो विचार केंद्रस्थानी जरूर होता. स्वराज्य तर हवेच होते, पण त्या जोडीने सुराज्य कसे निर्माण होईल याचा आचारधर्म तिथे रुजवला जात होता. या मुशीत रेहाना तयार झाली होती. तिथे सत्याग्रही तयार करण्याचे जणू वर्गच होते. सत्याग्रहातून अन्यायाला विरोध जरूर शिकवला जाई. तिथे गटनेते, तालुका-गाव पातळीवरचे नेते, राष्ट्रनेते तयार होत असत. हजारोंच्या संख्येने लोक मनापासून या कामात सामील झाले होते. ते विचाराने जोडले गेले, परंतु मनात अन्यायी व्यक्ती वा सत्तेविषयी राग मात्र किंचितही नसे. म्हणूनच ब्रिटिश इथून गेले तरी आपण त्यांचा द्वेष करीत नाही, त्यांच्याविषयी कटुता राहिली नाही. लोक ज्या झपाटलेपणाने स्वातंत्र्यलढ्यात सामील होत होते, ती रेहानाच्या दृष्टीने गांधींच्या योगिक शक्तीची करामत होती. खरं पाहिलं तर तिच्या मते, अल्लाने त्यांना दिलेली ही शक्ती होती. जिहादचा धार्मिक अर्थ चांगल्या कामासाठी सज्ज होत संघर्ष करणे, हा आहे. लहान मुले, आजारी, वृद्ध, अनाथ, स्त्रिया यांच्यासाठी करायचे हे धर्मयुद्ध आहे.

गांधींच्या योगिक शक्तीची प्रचिती तिच्या मते हजारोंनी जे कष्ट, मारहाण, तुरुंगवास भोगला आणि त्याबद्दल ब्रदेखील काढला नाही यातच होती. कुठलाही वैयक्तिक स्वार्थ वा काही पदरी पडेल, याची अपेक्षा न करता तरुण, लेकुरवाळ्या, वयस्क स्त्रिया या राष्ट्रकार्यात उतरल्या होत्या. लेकुरवाळ्यांची मुले सांभाळण्याचे काम त्यांच्या घरच्या वयस्कर-वृद्ध स्त्रिया आनंदाने, उत्साहाने करत. क्षुद्र स्वार्थासाठी, लोकांत मिरवण्यासाठी वा वाकडे पाऊल टाकण्यासाठी पोरीबाळी घराबाहेर जात नाहीयेत याची त्यांना खात्री होती. कारण हा बाबा काही तरी देवकार्य करतोय, गरिबांच्या भल्याचं काम नि:स्वार्थपणे करतोय आणि आपल्यासारख्या सामान्यांना त्यात सामील करून घेतोय, ही गोष्ट त्यांना आत्मिक समाधान देत होती. एरवी स्वयंपाकघरातून ओटीवर येताना दचकणाऱ्या बायका थेट रस्त्यावर उतरणे, ही सामान्य घटना नव्हती. जगाच्या इतिहासाला इतक्या मोठ्या संख्येने स्त्रिया लढ्यात उतरलेल्या ठावूक नाही. तिला आणि तिच्यासारख्या अनेकींना तुरुंगात राहणे, कदान्न खाणे याची जाणीवदेखील होत नसे. हे सारे भारावलेपण केवळ गांधींच्या प्रभावामुळेच साध्य झाले होते.

कस्तुरबांच्या निधनानंतर सभा घ्यायला बंदी असताना तशी ती घेतल्यावर मुंबईमध्ये चौपाटीवर जमलेल्यांना अटक करताना ‘तुम्ही असं करू नका, नाही तर आम्हाला कडक पावलं उचलावी लागतील’ असं पोलिसांनी सांगताच सामान्य सत्याग्रही स्त्रीदेखील ठाम उभी राहत असे. रेहानाने उत्तर दिले होते, ‘‘आम्ही आमचे कर्तव्य करतोय. तुम्ही तुमचे कर्तव्य करून आम्हाला अटक केलीत, तरी जे करायचं ते आम्ही सोडणार नाही.’’ त्या साध्यासुध्या बायका नि त्यांच्या नेत्यांना पाहून पोलिसांच्या डोळ्यांतही पाणी येत असे. रेहानासारखे समर्पित सत्याग्रही सतत युद्धाच्या तयारीत असत. कुठल्याही क्षणी ‘चला, आपलं काम संपलंय’ अशी भावना नसे. काही ना काही राष्ट्रकार्य समोर उभे असेच. रेहाना एकदा गांधीजींना भेटायला सेवाग्रामला गेली होती. ते तेव्हा आजारी होते. अगदी कृश झाले होते. हातापा याच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या.

तिला पाहताच तिला जवळ बोलावले,

‘‘माझी लेक कशी आहे?’’ म्हणून अगोदर चौकशी केली.

त्यावर घरची हकिगत सांगत ती म्हणाली, ‘‘आमच्या बंगल्यातील सर्व कामं आम्हीच करतो.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘ते ठीक आहे; पण तुमचा माळी, स्वयंपाकी, ड्रायव्हर, धोबी, केरकचरा काढणारे- त्यांचे काय झाले? त्यांची काय व्यवस्था केलीत?’’

‘‘त्या सर्वांना व्यवस्थित नोकऱ्या दिल्यात आणि पैसे दिलेत.’’ हे समजल्यावर त्यांना विलक्षण समाधान वाटले. तळातल्या लोकांविषयीची त्यांची करुणा मनात सदा जागी असे, त्याचे हे उदाहरण आहे.

गीतेचा उपदेश त्यांच्यासाठी शिरसावंद्य होता. आपल्या अनुयायांना ते समजावीत- आपल्या तत्त्वानुसार शुद्ध बुद्धीने अविरत काम करीत राहा. त्याचे परिणाम काय होतील याची चिंता करू नका. त्या फळाची जबाबदारी तुमच्यावर नसेल. रेहानाच्या आध्यात्मिक साधनेची त्यांना चिंता असे. ‘‘त्यांनी जी साधना सांगितली होती, तिने मला त्रास होई. त्यांनी ‘तीच करीत राहा’ म्हटलं, पण मी ते मुळीच मानलं नाही. मी आज्ञाधारक होते, पण स्वत:ला बंधनात अडकवून घेत नसे’’ असं तिने नमूद केलंय. राजेशाही जीवनाचा तिने सहज त्याग केला. काही सवयींचा, अन्नाचा तिला आश्रमात त्रास होई. प्रकृतीने ती नाजूक होती. तिचा हा त्रास जाणून गांधींनी तिला सांगितले की, तू कमोड मागवून घे म्हणजे  तुझा त्रास कमी होईल. आताच्याप्रमाणे त्या काळात कमोड सर्वत्र मिळत नव्हते. मोठ्या शहरातून आणावा लागला. घरातले सगळे विलायतेत शिकलेले, अत्यंत सोफिस्टिकेटेड वागणारे-बोलणारे. काय कुठले विषय स्त्रियांनी बोलायचे याचेही नियम असत. त्यात ‘ही’ कमोड गाडीत ठेवून सर्वांसमक्ष नेणार याचे अवघडलेपण होते. पण तिने ते बिनधास्तपणे केले.

गांधी तिला ‘वेडी मुलगी’ म्हणत. ‘‘किती विलक्षण आहेस तू. आजारी पडतेस म्हणून घरी जातेस, बरी होतेस नि पुन्हा संग्रामात येऊन पुन्हा आजारी पडतेस. तुझी तळमळ नि निष्ठा असीम आहे.’’

गांधींना ती उर्दू शिकवत असे. पत्रव्यवहारातून त्यांची उर्दूतील मोठमोठ्या शायरांबद्दल चर्चा होई. ती गुजराती लिहायला-वाचायला शिकली होती. गांधींना गुजरातीतून पत्रं लिहीत असे, ते दुरुस्त करीत व कौतुकही करीत. रेहानाला वाटे की, गांधींची काही मते पटण्याजोगी नि सर्वसामान्यांना आचरणात आणण्याजोगी नाहीत. सदासर्वदा अहिंसाही जमत नाही. माणसं आतून बदलली नाहीत, तर दमनाने विकृत होताना दिसतात- जसे ब्रह्मचर्य आतून आले पाहिजे. पती-पत्नींच्या संबंधांबाबत इस्लामचा विचार तिला मध्यम मार्ग वाटत होता. तिने स्वत: लग्न केले नाही. तिचा विश्वास होता की, विवाह हे बंधन पवित्र आहे नि माणसाला, कुटुंबाला एकत्र ठेवणारा विचार आहे. हे मैत्र सहज जुळावे. ‘माझ्या मते सर्वच बाबतीत टोकाचे वागून भागत नाही. स्वदेशी, अस्पृश्यतानिवारण हे मला पटले. आमच्यात अस्पृश्यता नव्हती. स्वदेशीने विणणारा व वापरणारा यांना एकत्र आणले. गांधीजींची एकादश सूत्रं मला भावली. त्यातील निवडूनच मी ती आचरणात आणली.

हिंदू धर्माचं, सत्य-अहिंसा-सदाचाराचं गांधी कठोरपणे पालन करत. स्वातंत्र्याचे सैनिक म्हणून स्त्रियांनी साधं राहणे, शिस्त पाळणे, खाण्यापिण्यावर बंधनं असणं हे गांधींचे नियम लष्करासारखे होते. पण रेहानाच्या मते, बांगड्या घालणं, रंगीत साड्या नेसणं या गोष्टी स्त्रीच्या अस्तित्वाला गोडवा आणतात. शिवाय तिच्या मते कपाळावरील कुंकवाचा बिंदू हा कुंडलिनीच्या विशिष्ट चक्राला गती देतो. (तिचा कुंडलिनी, चक्र यांवर विश्वास होता. ती तशी साधना करीत असे) या गोष्टीही नाकारून त्यांनी आमच्या जीवनातले रंगच संपवले, असे तिने म्हटले होते. बांना बांगड्या-कुंकू नसल्याची खंत वाटे, पण बापूंसाठी त्यांनी ते केलं खरं. त्यामागे ‘आपल्या समाजात काहींना ते करू दिलं जात नाही, तर काहींना तेवढंही परवडत नाही’ याची आठवण करून देऊन हा मुद्दा पटवल्यावर सर्वांनी ते मानलं. एकदा ‘बां’नी ते स्वीकारल्यावर इतर स्त्रियांनाही ते पटलं.

स्वदेशीसाठी रेहानाने इतर स्त्रियांप्रमाणेच पिकेटिंग, धरणा, असहकार, या मार्गांचा वापर करून चले जाव चळवळीत अटक करवून घेतली. पण तिच्या मते, तिच्यातील आध्यात्मिक शक्तीने तिला यात कष्ट कधीच जाणवले नाहीत. गांधींनी स्त्रियांतील शक्ती जागवली. सत्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी सात्त्विकतेला आवाहन केले नि त्यात लहान-थोर, श्रीमंतगरीब, सर्व जाती-धर्माचे लोक हसत-हसत आपले सर्वस्व टाकून सामील झाले. त्यासाठी ना पदवीची गरज होती, ना वयाची अट होती. फक्त ती हाक थेट आतवर पोहोचली की, तसे वागणे सोपे होत होते. स्वातंत्र्य जवळ येऊ लागल्यावर लोकांमध्ये होऊ लागलेला बदल तिला जाणवू लागला होता. गांधींच्या मार्गाने जाणारे त्यांचे सच्चे अनुयायी मागे पडू लागले. सत्तेच्या अभिलाषेने काँग्रेसमधील काहींचा वैयक्तिक स्वार्थ मोठा होऊ लागला. सत्याग्रह जोवर आदर्शाची गोष्ट होती, तोवर लोकांनी संतांचे म्हणणं ऐकलं; पण सत्तेच्या लालसेपुढे ते मागे पडले. नैतिकतेचा सर्वांनीच त्याग केला असे नाही. अनेकांनी सत्ता नाकारली. खेड्यात जाऊन तेथे काम करणं, व्यसनमुक्ती- खादी-अस्पृश्यता निवारण अशी कामं करणं पसंत केलं. साधेपणाने राहत, सत्यावरील निष्ठा कायम ठेवली. कारण सत्याग्रह ही काही कुणाच्या विरोधातली उन्मादी प्रतिक्रिया नव्हती, तर योग्य गोष्टीसाठी समोरच्या व्यक्तीला शांततेने समाजावून सांगणं होतं. त्यानेच सामान्य कार्यकर्त्याला बळ दिलं होतं. ती एक आंतरिक प्रेरणा होती. ते आपल्या विचारांवर ठाम राहिले.

Tags: ब्रिटिश सत्याग्रह अहिंसा ब्रह्मचर्य कस्तुरबा फ्रेड ब्लूम महात्मा गांधी मुंबई रवींद्रनाथ टागोर जहांगीर पेटिट संजीवनी खेर रेहाना तय्यबजी गांधींचे गारूड Kasturba Fred Bloom Mahatma Gandhi Mumbai Ravindranath Tagore Jahangir Petit Sanjivani Kher Rehana Tayyabji Gandhinche garud weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके