डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तसा तो एकलकोंड्या नव्हता, इमानदार होता. सरकारी नोकरीत बरेच लोक टाळटाळ करतात. त्याचं तसं नव्हतं. पगाराएवढं- किंबहुना, त्यापेक्षा जास्त काम करावं, असं त्याला वाटे. तो सर्व शिपायांमध्येे सर्वांत आधी ऑफिसला येऊन सर्वांत शेवटी जायचा. आमच्या माळ्यावरील कोणत्याही अधिकाऱ्याने सांगितलेली कामे तो आनंदाने ऐकायचा. कोणाची फाईल शोधून दे, व्यापाऱ्यांना बसायला खुर्च्या देणे, पाणी-चहा वगैरे देणे, त्यामुळे त्याला सर्व जण मानीत. अधिकारीकर्मचाऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. मीदेखील त्याच्याकडून शिकत होतो. माझा हा परिविक्षाधीन कालावधी होता. मला अधिकाऱ्याकडून जेवढं शिकायला मिळालं, त्यापेक्षा किती तरी जास्त मला कारभारीनं शिकवलं. कार्यालयीन कामकाजापेक्षा जगण्याचं तत्त्वज्ञान त्याने मला शिकवलं.   

विक्रीकर विभागात निरीक्षक असतानाची गोष्ट... माझगावातल्या नऊ मजली विक्रीकर भवनाच्या पाचव्या माळ्यावर आमचं ऑफिस. सहायक विक्रीकर आयुक्तांच्या छोट्या-छोट्या केबिन. एक टेबल, एक कपाट, समोर दोन खुर्च्या बसण्याएवढी जागा आणि बाहेर तीन टेबल, तीन खुर्च्या- दोन विक्रीकर निरीक्षकाला दोन अन्‌ एक लिपिकाला- शिपायासाठी स्टुल- झालं. पाच स्टाफ. असे एका विंगमध्ये स्वतःचं कार्यालय. तसे आमच्या कार्यालयात येणारे लोक म्हणजे कंपन्याचे अकाऊंटट सी.ए. किंवा सेल्सटॅक्स प्रॅक्टिशनर. कधी कधी मॅनेजर, डायरेक्टर- बस्स. 

या पदावर मला रुजू होऊन दोन-तीन महिनेच झाले होते. शिखरेसाहेब असिस्टंट कमिशनर- त्यांच्याकडे अतिरिक्त दोन चार्ज. मी व आवटी दोघे इन्स्पेक्टर. मोकळे लिपिक. अन्‌ सर्वांत महत्त्वाचे पद म्हणजे शिपाई. कारभारी गरकळ, वय वर्षे 42. काटक, कामसू, निर्व्यसनी. पुणे जिल्ह्यातला. मी हजर झाल्यानंतर मला सर्वांत जास्त मदत करणारा. उदा. ऑफिसची सर्व खडान्‌खडा माहिती, साहेबांच्या स्वभावाचे कंगोरे- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुर्वे आणि त्यांच्या कडकपणाचे किस्से, ऑफिस प्रोसिजर, आपल्याकडील व्यापाऱ्यांची संख्या, नोंदणी रद्द केलेल्या कंपन्या- वसुली करायची रक्कम- नेहमीचे करबुडवे- मोठे व्यापारी- मोठमोठे ॲडव्होकेट, सी.ए. वगैरे... कॅन्टीनचे वेळापत्रक, रेल्वेचे वेळापत्रक, बसचे वेळापत्रक- अगदी पहिल्या माळ्यावरील बँक, वाचनालय, जिमखाना इत्यादींची इत्थंभूत माहिती- कारभारीनं मला दिलेली. भाषेवरून त्यानं मला ओळखलेलं. 

‘‘साहेब, तुम्ही आमच्याच भागातले. ही मुंबई आहे आणि तुमचा स्वभाव खूपच शांत आहे. घाबरायचे नाही. घडाघडा बोलायचं. इथं कोणाला कोणासाठी वेळ नाही. सर्व जण फक्त एकाच गोष्टीच्या विचारात असतात, तो  
म्हणजे पैसा- पैसा मिळवणे आणि तो खर्च करणे. मुंबईत एकदा स्थायिक झालेला माणूस पुन्हा गावाकडे जायचं नाव घेत नाही. इथं करमून गेलेला माणूस अडकतो पुरता या मायाजाळात. साहेब, तुम्ही भले माणूस आहात. हुशार आहात. पण बाकीच्या लोकांपासून सावध रहा. इथे कोण कोणाला फसवील, कळणार नाही. काही अडचण आली तर मला विचारीत जा. 

‘‘आणि त्या बेंद्रे आणि शिवणीकरांपासून लांबच राहा. बेरकी लोकं आहेत ते. मजा करतात. दर आठवड्याला दोन दिवस व्हीटी ते ठाण्यापर्यंतचे सर्व डान्स बार फिरून येतात. आठ दिवस मिळवलेला पैसा अय्याशीत खर्च करतात. दारू, हॉटेलिंग, डान्सबार- एवढंच काय तर टॅक्सीने प्रवास करणार, वरून टॅक्सी ड्रायव्हरला मोठी टिप देणार. यांचे टॅक्सी ड्रायव्हरही ठरलेले. शुक्रवार 5.30 ला बरोबर तयार असणार. साहेबाला कुठं न्यायचं, ते सगळे तोंडपाठ असतं त्यांच्या. साहेब, तुम्ही या भानगडीत पडू नका 

‘‘आणि हो सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्या वसईकर बाईपासून सावध राहा. फार चॅप्टर बाई आहे. जाळ्यात ओढते. नवीन माणसाला त्यांच्या जवळचा सर्व पैसा संपेपर्यंत खर्च करायला लावते, फिरवते. हॉटेल, शॉपिंग, पिक्चर, गार्डन वगैरे वगैरे. सुरुवातीला आपल्या डब्यातून दररोज नवे पदार्थ तयार करून आणते. नवीन रुचकर पदार्थ सर्वांना देते. नवीन माणसाला फार जीव लावते. खाऊ-पिऊ घालते. मधुर बोलते. मग हळूहळू ओळख वाढवते. मग जाताना-येताना चहा-नाश्ता, कॅन्टीनला बरोबर. मग शॉपिंगला बरोबर ट्रेनमध्ये बरोबर... असं करता-करता पुरतं जाळ्यात घेते त्याला. किती तरी लोकांना बरबाद करून टाकलं तिनं!’’ 

कारभारी असं सारखं सांगत राहायचा. त्याच्या डोळ्यांत माझ्याबाबत काळजी अन्‌ हृदयात कळवळा दिसून यायचा. एखादा वडिलधारा माणूस पोरांना जसा सारखा उपदेश करतो, तसा तो मला सल्ला-उपदेश करायचा. त्याच्या बोलण्यात जिव्हाळा होता, आपलेपणा होता, ओलावा होता अन्‌ एका भागातून आल्यामुळे ही आपलेपणाची जाणीव अधिक घट्ट झालेली. 

मी कारभारीला त्याच्याबद्दल विचारायचो. कारभारी एकुलता एक. गावाकडे शेती दोन एकर- कोरडवाहू. आई- वडील वयस्कर. बायको, एक मुलगा, मुलगी- एवढं कुटुंब. या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख कारभारी. नावाप्रमाणेच तो कारभारी होता. दर पंधरा दिवसांतून तीन दिवस गावाकडे जायचा, ट्रेननं. तिथे शेतीची कामे करायचा. पुढच्या 12 दिवसांचे नियोजन करून परत मुंबईला यायचा. कारभारी मुंबईत खूप लांब राहायचा. चाळीत 300 रुपये भाडे होते. 90 रु. महिना रेल्वेचा पास. 

एक वेळ गव्हर्न्मेंट कॅन्टीनला चौरस आहार घेणार. 4 रु. गुणिले 25 दिवस म्हणजे 100 रु. संध्याकाळचा स्वयंपाक घरी स्वत:च बनवणार. खूप कमी पैशांत गुजराण करी. एकेक रुपया वाचवे. चहा घेत नसायचा. बिडी-काडीतंबाखू- एवढंच काय, तर बडीशेप-सुपारीचंही व्यसन नाही. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर अष्टगंध. वारकरी. तो म्हणायचा- ‘‘मी हे जगतोय ते माझ्या कुटुंबासाठी. म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. श्रावण-बाळासारखं त्यांना जपतो. बायको पोरांनादेखील हवं-नको ते घेऊन जातो. पोरं पण हुशार आहेत माझी. त्यांना खूप शिकवून मोठं बनविणार. तुमच्यासारखं अधिकारी करणार... 

‘‘बायको पण खूप चांगली भेटली. सुस्वभावी. कामदारीन. खूप समजदार. असं एकूणच खूप चांगला संसार चाललाय. आर्थिक विवंचना नाही. कर्ज काढून विहीर खणली. पाईपलाईन केली. ऊस लावला. काही पालेभाज्या करतो. कोबी, टॉमेटो, भेंडी, मिरच्या वगैरे. उत्पन्न चांगले येते. पगारातून बरेच पैसे वाचवतो. बचत करतो. पोरांच्या भविष्यासाठी नियोजन केलंय. पोस्टात आर.डी.चे खाते उघडलेय. एलआयसी काढलीय.’’ 

कारभारी बोलत राहायचा. त्याचं बोलणं ऐकून मी अवाक्‌ व्हायचो. मुंबईत एकटा राहणारा, वर हा सेल्स टॅक्ससारख्या डिपार्टमेंटमध्ये- जिथे पैशाला कमी नाही. त्याच्याबरोबरीचे किती तरी लोक खाऊन-पिऊन मजा करायचे. हॉटेलिंग, पार्टी, इ... 

‘‘कारभारनीनं मला आर्थिक शिस्तीचे धडे दिले. काटकसरीचे महत्त्व पटवून दिले. बँकिंग व्यवहार शिकवले. जी.पी.एफ. वर्गणी वाढवायला लावली. एलआयसीची एक विमा पॉलिसी काढायला लावली- तिसऱ्या माळ्यावरील पंडितकडून.’’ पंडितचा मुलगा मतिमंद होता. त्यामुळे तोदेखील जादा मेहनत करायचा. कारभारी प्रत्येक पगारवाढीनंतर आणि महागाई भत्तावाढीनंतर वाढलेली रक्कम जीपीएफमध्ये वाढवायचा. त्याचं म्हणणे असं की, माणसानं वारेमाप खर्च करू नये. भविष्यासाठी तरतूद   करावी. आज जगतो तसेच भविष्यात जगता यावे. कोणत्याही प्रसंगात कोणापुढं हात पसरवण्याची वेळ येऊ नये. उधार कधी घ्यायचे नाही. विनाकारण कर्ज काढायचे नाही. महागड्या चार चाकीचा पांढरा हत्ती पोसत बसायचा नाही. कर्जबाजारी होऊन उद्‌ध्वस्त होण्यापेक्षा जे कर्ज तुम्हाला रिटर्न्स देणार आहे, ते प्रॉडक्टिव्ह कर्ज घ्यावे. बचत करावी. जुगार, लॉटरी, मटका इ. कधीही खेळू नये. त्यातून संसार लयाला जातो. 

जुगारी माणूस कोणीही मोठा झालेला नाही. आपण आपल्या कष्टाने मिळवलेला पैसा असा उधळून लावू नये. या पैशांवर आपल्या आई-वडिलांचा हक्क आहे. या पैशांवर आपल्या मुलाबाळांचा, बायकोचा हक्क आहे. त्यांच्यासाठी खर्च करावा. स्वत:च्या मौजमजेवर, शान-शौकिनीवर पैसा खर्च करू नये. लक्ष्मीचा आदर करावा. ती फार चंचल असते. राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. तिचा आत्यंतिक आदर ठेवावा. पैसा आला की माज करू नये. उत-मात करू नये. 

कारभारीचं शिक्षण कमी होतं. तो शिकला असता, तर खूप मोठा अधिकारी झाला असता. तरी तो एखाद्या इन्व्हेस्टमेंट मॅनेजरसारखा अभ्यासपूर्ण बोलायचा. अनुभवाच्या शाळेत शिकला होता ना तो. तसा तो खूप धडपड्या होता. स्वतःचं हित कशात आहे, ती गोष्ट करायचा. तो होतकरू होता. 
कारभारीला इतर शिपाई नावे ठेवत. त्याच्या काटकसरी स्वभावाची टिंगल उडवत. खा-प्या-मजा करावयाचे तत्त्वज्ञान त्यास सांगत. अरे, जिंदगी एकदा मिळते. तू मुंबईला आलास, जीवाची मुंबई करून घे... वगैरे. पण तो स्थितप्रज्ञ. आपल्या विचारावरून तसूभरही न ढळणारा. अटळ. 

तसा तो एकलकोंड्या नव्हता, इमानदार होता. सरकारी नोकरीत बरेच लोक टाळटाळ करतात. त्याचं तसं नव्हतं. पगाराएवढं किंबहुना, त्यापेक्षा जास्त काम करावं, असं त्याला वाटे. तो सर्व शिपायांमध्येे सर्वांत आधी ऑफिसला येऊन सर्वांत शेवटी जायचा. आमच्या माळ्यावरील कोणत्याही अधिकाऱ्याने सांगितलेली कामे तो आनंदाने ऐकायचा. कोणाची फाईल शोधून दे, व्यापाऱ्यांना बसायला खुर्च्या देणे, पाणी-चहा वगैरे देणे, स्वच्छता करणे इत्यादी कामे दुसऱ्या कार्यालयातलीदेखील सांगितल्यावर करायचा. त्यामुळे त्याला सर्व जण मानीत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. 

मीदेखील त्याच्याकडून शिकत होतो. माझा हा परिविक्षाधीन कालावधी होता. मला अधिकाऱ्यांकडून जेवढे शिकायला मिळालं, त्यापेक्षा किती तरी जास्त कारभारीनं शिकवलं. कार्यालयीन कामकाजापेक्षा जगण्याचं तत्त्वज्ञान त्याने मला शिकवलं. आर्थिक नियोजन, बचत, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा शिकवला आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे- इतरांना मदत करण्याचे शिकवले, माणुसकी शिकवली. मी त्याला गुरू मानी. 

मी तीन वर्षं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होतो, मग महसूल विभागात निवड झाली. तहसीलदार असताना एकदा कारभारी माझ्या कार्यालयात आला. अगदी तसाच, मुंबईत होता तसाच. तो आता निवृत्त झाला होता. त्याने नंतर सोबत मुलाला आणले होते. 

मी लगेच ओळखले. 

‘‘अरे कारभारी- कसा आहेस?’’ 

‘‘खूप मजेत अगदी. खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो मुलाला घेऊन. अरे प्रवीण, साहेबांच्या पाया पड.’’ 

अन्‌ प्रवीण माझ्या पाया पडायला लागला. मी त्याला उठवले. त्याच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली. तेव्हा कारभारीही वाकायला लागला. मी त्यांना उठवले अन्‌ मीच वाकलो, त्यांच्या पायावर हात ठेवायला लागलो. 

तो गोंधळला, गडबडला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. आपले साहेब आज मोठे अधिकारी आहेत याचा त्याला आनंद झाला होता. अभिमान वाटत होता. त्याने मुलाची व माझी ओळख करून दिली. त्याचा मुलगा इंजिनिअर होऊन पुण्याला नामांकित कंपनीत पर्मनंट झाला होता. मुलगी M.sc, Ph.d करीत होती. 

दोन्ही मुलांचे कल्याण केले होते त्याने. एक आदर्श बाप, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श कर्मचारी, आदर्श गुरू, आदर्श माणूस माझ्यापुढं होता. मी स्वतःला भाग्यवान समजत होतो. अन्‌ माझ्या हृदयातल्या पेशीचे त्याच्याप्रति असणारे ऋण डोळ्यांतून व्यक्त होत होते. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके