डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उदगीर येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांची मुलाखत

प्रस्थापित साहित्य संमेलन आहे त्याला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ म्हटलं जातं. परंतु यातले अखिल भारतीय हे दोन शब्द कसे आले ते सांगतो. सुरुवातीची दोन ग्रंथकार संमेलनं झाल्यावर ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ या नावानं काही संमेलनं झाली. त्यानंतर ‘मराठी साहित्य संमेलन’ या नावानं पुढे 1957 पर्यंत संमेलनं होत होती. 1957 मध्ये दिल्लीतल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. ते केंद्रात मंत्री होते. महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला जायचे तर त्यांना प्रवासासाठी रेल्वेच्या भाड्यात सवलत हवी होती. तेव्हा काकासाहेबांनी सूचना केली की, तुमचं हे संमेलन तर प्रादेशिक-केवळ मराठीचं आहे. तेव्हा तुम्ही त्यात अखिल भारतीय असे शब्द वाढवले की मग रेल्वे प्रवासात सवलत मिळू शकेल. तसं झालं. तर ते केवळ सोयीसाठीचंच अखिल भारतीय आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा विद्रोही साहित्य संमेलन हा एक उपक्रम आहे. परंतु तो तेवढाच फक्त असू नये, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

प्रश्न - उदगीर येथे होणाऱ्या सोळाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या अध्यक्षीय निवडीनंतर विभिन्न स्तरांतून विविध प्रतिक्रिया आल्या. दरम्यान एक प्रतिक्रिया अशीही आली की, विद्रोहीवाले सौम्य झाले आहेत की, गणेश विसपुते जहाल झाले आहेत. अर्थात या सगळ्या प्रतिक्रियांकडे तुम्ही स्वतः कसे पाहता?

- या संमेलनाच्या अध्यक्षपदावरच्या निवडीबद्दल कळल्यानंतर अनेकांनी प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर बोलणं झालं तेव्हा अभिनंदन करतानाही त्यांच्या स्वरात अशी बिचकल्याची छटा होती. अशा बातमीचं काय करावं, असा त्यांच्यासमोर प्रश्न असेल. त्यातल्या ‘विद्रोही’ या शब्दामुळे आणि त्यात आजकाल ‘द्रोह’ हा शब्द नकारात्मकरित्या कोणत्याही कारणासासाठी जोडला जात असल्याने हे बिचकणं असू शकतं. मुळात विद्रोही साहित्य संमेलनाची कल्पना म.फुल्यांच्या पर्यायी सांस्कृतिक प्रकल्पातील व्यापक संकल्पनेतून आलेली आहे. ‘तुमच्या साहित्यात आम्हाला आमचं हित दिसत नाही,’ असं ते रानड्यांना म्हणाले होते. म्हणजे अभिजनांच्या सांस्कृतिक अवकाशात अभिजनेतर इतर सर्वांना स्थान नव्हते, असं ते म्हणत होते. आता काळ आणखी पुढे गेलेला आहे आणि त्या वर्गात ब्राह्मणेतरांतील बहुसंख्य सामील झालेले आहेत. ज्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध फुले संघर्ष करीत होते, त्याच गोष्टी आता हा नवा वाढलेला अभिजन वर्ग करीत आहे. या अखिल भारतीय म्हणवल्या जाणाऱ्या संमेलनातील अध्यक्षांपासून निमंत्रितांपर्यंतच्या निवडी ज्या रीतीनं केल्या जातात, त्यात लोकशाहीची साधी मूल्यंही पाळली गेलेली दिसत नाहीत. साहित्यातील एक सुभा आपल्या सत्तेचं केंद्रीकरण करून लोकशाहीविरोधी पद्धतीनं कारभार करताना दिसत आहे. ही सुभेदारी आणि तिचे हस्तक आडमुठेपणे जे काही करत आले आहेत, ते मराठीच्या वाङ्‌मयीन पर्यावरणासाठी अजिबात उपकारक नाही. सत्तेचं केंद्रीकरण झालेलं कोणत्याही सुबुद्ध साक्षर व्यक्तीला कळू शकेल इतकं ते स्पष्ट आहे. दुसरं, यात अतिरेकी प्रमाणात राजकारणी लोकांचा सहभाग. राज्य सरकारकडून लक्षावधी रुपयांच्या अनुदानाची याचना करणं आणि त्याच्या ओझ्याखाली मग मुक्तपणे राजकीय व्यक्तींना संमेलनात मानानं वावरू देणं हे लज्जास्पद आहे. शिवाय आयोजक संस्था अशा शोधून काढणं ज्याचे कर्तेधर्ते हे गब्बर श्रीमंत आणि आधुनिक सरंजामदार म्हणजेच राजकारणाशीच पुन्हा संबंधित असतील. हे उबग आणणारं आहे. 

लेखकानं समांतर वाङ्‌मयीन चळवळींतल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे किंवा नाही, याबद्दल-विशेषतः मराठी लोकांमध्ये-मतभेद असतांना दिसतात. त्यानं केवळ लिहावं अन्‌ घरात बसावं असं म्हणणं म्हणजे मुलीनं खाली बघून चालावं, सातच्या आत घरात यावं, असं म्हणण्यासारखं आहे. समाजातल्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध लेखकांनी वेळोवेळी प्रश्न उभे केलेले आहेत, आवाज उठवलेले आहेत. साहित्य संमेलनातील आतापर्यंतच्या यादीतले सगळेच अध्यक्ष वाईट होते असं नव्हे. मला व्यक्तिशः त्यातल्या बऱ्याच जणांविषयी आदरही आहे. दुर्गाबाई स्पष्टवक्त्या होत्या. गं.बा. सरदारांच्या सच्चेपणाविषयी कोण शंका घेईल? परदेशातले किती तरी सर्जनशील श्रेष्ठ लेखक अन्याय, शोषणाविरुद्ध, जमातवाद आणि फॅशिझमविरुद्ध उघडपणे बोलत होते. जुझे सारामागु हे त्यातलं एक ठळक नाव आहे. एमिल झोलाचं प्रसिद्ध ‘आय अक्यूज’ हे सत्तेला उद्देशून लिहिलेलं पत्र सर्वांना माहीतच असेल.

ज्याप्रमाणे मोठी धरणं किंवा प्रकल्प भारतासारख्या देशाला हानिकारक आहेत तसेच मोठे उत्सवी खर्चिक साहित्याचे उरूस आणि झगमगाटी, दीपवून टाकणारी स्पेक्टॅकल्ससुद्धा हानिकारकच आहेत. अशा संमेलनाचंं या काळात औचित्य अजिबात उरलेलं नाही. त्यातून साहित्याचं ठोस काही भलं होईल असं मला वाटत नाही.

लेखकानं मौन बाळगून चालत नाही. त्यानं माणसांच्या बाजूनं सत्य आणि न्यायासाठी बोलणं ही त्याच्या लेखक असण्याची पूर्वअट आहे. आजच्या काळात जी परिस्थिती आपण अनुभवत आहोत, नागरिक म्हणून असणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्याचा संकोच होत असताना, भाषाविरोधी-बुद्धीविरोधी व्यवस्थेत लेखकानं आपलं म्हणणं निर्भयपणे मांडलं पाहिजे. ते त्याचं प्राथमिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं, याविषयी माझं काहीही मत नाही. मी जहाल किंवा मवाळ असं काहीही मानत नाही. माझ्या आवाक्यात जमेल तेवढंच करता येईल इतकंच पाहातो.

प्रश्न - सहिष्णुतेच्या विरोधातील सरकार म्हणून तुम्ही तुमचे दोन पुरस्कार दरम्यानच्या काळात परत केले, खरे तर ही असहिष्णू सरकारच्या विरोधातील एक कृती होती. आजच्या जात-धर्माच्या नावाखाली सातत्यपूर्ण धु्रवीकरण घडवून आणण्याच्या काळात समांतर संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना तुमची नक्की कोणती भूमिका आहे?

- ज्या कारणांसाठी अनेकांनी त्या वेळी ती एक प्रतिकात्मक कृती केली होती, तीच कारणं आजही मौजुद आहेत, उलट ती आता अधिक गडद झाली आहेत; असहमती एक अपराध झाला आहे. कुठल्याही अपवृत्तींविषयी असहमती म्हणजे देशद्रोह असं हास्यास्पद समीकरण उभं केलं गेलं आहे. वंशवादी, जमातवादी विकृत विचारांनी वातावरण एवढं विषाक्त करून टाकलंय की जॉर्ज फ्लॉईडचं मरतांनाचं वाक्य- आय कान्ट ब्रीद- हे कोणत्याही संवेदनशील नागरिकाचं अघोषित घोषवाक्य झालं आहे. मिलान कुंदेराचं एक वाक्य आहे की, कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, शोषणाविरुद्धचा संघर्ष हा वस्तुतः विस्मृतीविरुद्धचा संघर्ष असतो. अत्याचारी सत्ता ही स्मृती पुसून टाकण्याचं काम सातत्यानं करीत असतात. कारण पीडितांच्या मनातल्या अत्याचारांच्या स्मृतींचं त्यांना भय वाटतं. लेखकानं पुन्हा पुन्हा स्मरण करून देण्याचं काम करीत राहावं. आजचा काळ समजून घेण्यासाठी त्यातल्या घडामोडींचे अर्थ लावणं गरजेचं आहे. या स्मृती पुन्हा जागवणंही. माझ्या मर्यादेनुसार ते मी करण्याचा प्रयत्न करीन. 

प्रश्न - आजच्या कठीण काळाशी राजकीय पोत पातळ झालेल्या सत्ता व्यवस्थेचा खूप जवळून संबंध आहे. गरीब-दलित-वंचितांच्या विरोधातील सत्तेची परंपरा दृढ होत असलेल्या काळात कलावंताच्या असण्याचा अर्थ तुम्ही स्वतः कसे घेता?

- प्रचलित सत्ताव्यवस्थेचं काही राजकारण असेल तर ते वर्चस्ववादाचं, भांडवलशाहीस्नेही आणि बाजारापुढे लाचार होण्याचं आहे. दमन, दडपशाहीतून जमातवादी कार्यक्रम पुढे नेण्यासाठी त्यांनी जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उन्माद वाढवत नेला आहे, त्यात त्यांना लोकशाही आणि संविधानातल्या मूल्यांशी काही देणंघेणं आहे असं अजिबात दिसत नाही. सांस्कृतिक राष्ट्रवाद, जमातवाद आणि भांडवलशाही हे विषारी मिश्रण आहे. त्यातून गरीब, दलित, वंचित हे या सत्तेच्या खिजगणतीत नाहीत. त्यामुळेच बेमुर्वतपणे कल्याणकारी राज्यव्यवस्था संपवून टाकण्यात त्यांना कुठलीही शरम वाटत नाही. अलीकडच्या काळात झालेल्या महामारीच्या आपत्तीनं आपल्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. तीच बाब शिक्षणव्यवस्थेची आहे. या दोन गोष्टींतून तळातला माणूस जरा उभा राहून रोजगाराची स्वप्नं पाहू शकला असता, ती शक्यताच त्यांना नष्ट करायची आहे आणि एक मोठा प्रिकॅरिएट वर्ग तयार करायचा आहे. त्याला माध्यमांच्या माऱ्यातल्या गुंगीनं काबूत ठेवता येईल किंवा तो इतका हतबल झालेला असेल की त्याचं सहजपणे दमन करता येईल, हे त्यांचं कारस्थान आहे. अशा काळात समाजाच्या काटछेदातल्या या हालचाली कलावंतांनं टिपणं, त्याविषयी व्यक्त होत राहणं हे करावं लागतंच. कलावंत हा समाजाचाच एक अभिन्न हिस्सा असतो. भूकंप होतो तेव्हा भूपृष्ठाखालच्या स्तरांना त्याचे हादरे बसतात. तसंच कलावंतांना हे हादरे जाणवण्याइतकी संवेदनशीलता आणि भान असलं पाहिजे. आणि मग बोलणं-बोलकं होणंं ही असहमतीतली प्राथमिक आणि मोठी पायरी असते. काळोखाचे दिवस असतील तर असतीलच ना, पण त्याही काळात काळोखाची गाणी गावीत असं ब्रेख्त सांगून गेलेला आहेच. 

प्रश्न - कवी, अनुवादक, चित्रकार, संपादक अशी एकमेकांहून भिन्न असलेली व्यक्तिमत्त्वे तुमच्यामध्ये लिलया मिसळलेल्या आहेत, विभिन्न व्यक्तिमत्त्वे एका व्यक्तिमत्त्वात असण्याच्या स्वरूप/प्रवासाबाबत काय सांगाल?

- असं काही नाही. असे किती तरी लोक असतात, जे विविध विधांमध्ये रस घेऊन काम करीत असतात. रेनेसान्स काळात तर अशी उत्तुंग उदाहरणं दिसतील. आपण त्यांच्या मानानं कुठेही नाही आहोत. मी मुख्यतः कवी आहे. पण तेवढंच असलं असतं तरीही मला अनेक बाबींची आवश्यकता भासली असतीच. कारण या सगळ्यांचं परस्परांशी अतुट नातं असतं. संगीतात स्वरसप्तक असतं तसंच रंगांचंही रंगसप्तक असतं. लय शिल्पांतही असते, नृत्यातही असते आणि कवितेतही असते. हे सगळं जाणून घेऊन पुन्हा त्यांची पुनर्रचना किंवा मोडतोड करीत आपण काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण त्यापाठीमागे या सगळ्या कुतूहलाचं, आधीच्यांच्या हजारो वर्षांतल्या अनुभवांचं संचित असतं. मला एका गोष्टीत त्रास झाला तर दुसऱ्या आवडत्या गोष्टीत जाऊन बरं वाटतं. तिथंही बरं वाटेनासं झालं की मी तिसऱ्या गोष्टीत जाऊ शकतो. ही मीच माझं मला सुख देण्याची सोय आहे. त्यातून आपलं बळ आपणच मिळवता येतं आणि पुन्हा नव्यानं काही काम करण्यासाठी तयार राहाता येतं एवढंच. कविता लिहिणं, भाषांतरं करणं, चित्रं काढणं हे मी आठवत नाही तेव्हापासून करत आलो आहे. चाळीसहून अधिक वर्षं झाली असतील. त्यात मला आवडीचं वाचता आलं, येतंय आणि थोडंफार व्यक्त होता येतं हे ठीक असलं तरी निरंतर असमाधान असतंच. कविता, भाषांतर किंवा चित्रंही- कधीच पूर्ण किंवा परिपूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव मला असते.

प्रश्न - मोजक्याच पण दमदार कविता, ललित आणि गद्यलेखनाने तुम्ही मराठी समाजास परिचित आहात. यामध्ये तुमचे कवी असणे विशेष ठळक आहे. अशा वेळी कवितालेखनाचा तुमचा प्रवास, तुमच्या पूर्वसुरीतील कविता, तुमच्या समकाळातील कविता आणि आजची मराठी कविता याबाबत तुम्ही कसा विचार करता? याबाबतची तुमची निरीक्षणं काय आहेत?

- मी कविताच लिहिणार आहे असं कळत्या वयापासून ठरवलेलं होतं. तेव्हापासून आवर्जून कविता वाचत होतो. हळूहळू इतर भाषांमधल्या कविताही वाचू लागलो. मराठीतले अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके यांच्या कविता वाचत होतोच, पण नियतकालिकांतून प्रकाशित होणाऱ्या कविता वाचत होतो. यात आपल्याला काय लिहायचं हे गवसत होतं. मी नियमित लिहीत असतो. गद्य लिहितांनाही मध्येच थांबून कविता लिहायचे प्रसंग येतात. ते चांगलं असतं. पण वर्षाला दहा-बारा कवितांपेक्षा अधिक माझ्याकडून कविता लिहिल्या गेलेल्या नाहीत. आमच्या पिढीनं आधीच्या पिढीचा जरा जास्तच आदर केला. ते सगळे चांगलेच आणि निष्ठेनं लिहिणारे कवी होते. पण आमच्याही पिढीत भरपूर चांगल्या कविता लिहिल्या गेल्या. पण खरे प्रयोग यानंतरच्या पिढीत झालेले दिसतात. आज महाराष्ट्रात किमान पन्नास-पंचावन्न चांगले कविता लिहिणारे कवी आणि कवयित्री आहेत. यांचं भाषेचं भान अधिक चांगलं आहे. ते प्रयोगशील आहेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जात आहे आणि नियतकालिकं कमी होत गेलेली आहेत. याच वेळी सामाजिक माध्यमांचे मंच खुले झाल्यानं या कवितांसाठी एक हक्काचा मंच मिळाल्याने तिथं अमाप कविता दिसताहेत. या सगळ्या कवितांमध्ये चांगल्या कविता शोधून काढणं हे यासाठी कठीण होऊन बसतं की वाईट कविताही चांगल्या कवितेची अनेक तत्त्वं वरच्या पोषाखासारखी चलाखपणे वापरत आहेत. स्मार्टनेस आहे, धूर्तगती मार्गावर विपणनाच्या सगळ्या क्लुप्त्या वापरून सुसाट निघालेले कवी यात आहेत. अंतिमतः त्यांची ओळख करणं शक्य असलं तरी अशा प्रकारच्या कवितांनाही व्हर्च्युअल का असेना पाठराखण करणारा वर्ग आहे. टिकून राहणाऱ्या कविता दोन-तीन पिढ्यांमध्ये थोड्याशाच असतात. या समकालीन कवितांमध्ये तसं घडेल, अशी आपण केवळ आशा बाळगू शकतो.

प्रश्न - हिंदीसह अन्य भारतीय भाषांमधील साहित्य तथा कवितांशी तुमची जवळीक स्पष्ट आहे. अशा अर्थाने वाचक-लेखक म्हणून बहुभाषिक होण्याच्या प्रक्रियेशी तुमच्या मराठवाडी बहुभाषिक संस्कृतीतून तुमचे येणे कसे जोडून घेता?

- जन्मल्यानंतरची पुढची तीन दशकं मी औरंगाबादेत होतो. तिथं आसपास उर्दू, हिंदी, सिंधी, पंजाबी असे भाषकगट होते. त्यातले बरेच जण मित्र होते. त्यामुळे चौकात होणाऱ्या रात्रीच्या खुल्या मुशायऱ्यांना एकत्र जाणं, त्या माहोलमध्ये कवितेची जादू अनुभवणं, त्याविषयी चर्चा करणं यांतून निव्वळ भाषेची ओळख होत नव्हती, तर त्यातून व्यक्त होणाऱ्या संवेदनशीलतेची वेगळी कोटीही कळत होती. घरातली भाषा वेगळी, घराबाहेरची भाषा वेगळी आणि शाळेतली भाषा वेगळी असं असताना आपोआपच भाषेबद्दल तुम्ही सजग होत जाता. वेगवेगळ्या ठिकाणी संवाद करताना ती ती कौशल्यं आपोआपच अर्जित केली जातात. आज मी जी मराठी वापरतो, ज्या मराठीत लिहितो, वाचतो ती मी अर्जित केलेली भाषा आहे. ती माझ्या घरात बोलली जाणारी मराठी नव्हे. घरात अहिराणी-वऱ्हाडी-मराठवाडीचं मिश्रण असलेली भाषा होती. सुरुवातीला शाळेत मी गडबडून जात असे. पण भाषा हा माझ्यासाठी तेव्हापासून आस्थेचा भाग असावा. अतिशय सजगतेनं मी एकेक गोष्ट टिपत, समजून घेत शिकत होतो. आजही माझ्या कवितेत किंवा इतर लेखनात उर्दू शब्द आले तर मी ते तसेच ठेवतो. कारण आम्ही जसे बोलायचो त्यात ते सहजतेनं मिसळलेलेच असत. नंतर आणखी भाषांशी संपर्क आला. काही भाषा मी शिकण्याचाही प्रयत्न केला. अद्यापही एक तरी भाषा शिकत राहावी असं मला वाटतं. त्या त्या भाषेतलं अनुभवांचं, ज्ञानाचं संचितच तुम्हाला आयतं उपलब्ध होतं त्यामुळे. मोठा आनंद असतो. संस्कृती ही बहुरंगी आणि बहुपेडी असते हेही दर वेळी ठळक होत जातं. एकच एक रंगाचं असणं खूपच वैतागवाणं आहे. विविधतेत सौंदर्य आहे. त्यामुळे मला अनेक समूहांशी सहजपणे जोडून घेता येतं. ‘माय नेम इज रेड’ ही पामूकची कादंबरी भाषांतरित करतांना म्हणूनच मला त्यातलं इस्लामी संस्कृतीचं वातावरण परकं वाटलं नाही. खूपच ओळखीचं वाटलं. रसरशीतपणे अशा बहुलतावादी समूहांत राहिल्यामुळे आपण अधिक उदार, उन्नत होतो. माणूस आपल्याला त्याच्या खऱ्या रूपात सापडू शकतो. बुद्धाचा मैत्तभाव समजून घेता येतो. आणि त्याचमुळे आक्रमक सांस्कृतिक राष्ट्रवादातला विखार, द्वेष आणि सुप्त हेतू कळून त्याचं विच्छेदन करता येतं.

प्रश्न - एकीकडे ‘पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी’, ‘शासन, समाज आणि शिक्षण’ तर दुसरीकडे ‘माय नेम इज रेड’सारखी विख्यात कादंबरी मराठीमध्ये अनुवादित करताना तुमच्यातील अनुवादक मराठी वाचक समूहाने अनुभवलेला आहे. अनुवादाचे आणखी कोणते प्रकल्प मनात आहेत?

- देवीप्रसाद मिश्र आपल्या कथांना अन्यकथा म्हणतात- त्या 150 लहान-मोठ्या आकारांच्या अशा-मी नुकत्याच भाषांतरित केल्या आहेत. हिंदीत आणि मराठीत ही पुस्तकं एकाच वेळी लवकरच प्रकाशित होतील. गेल्या शतकापासून अनेक लिहित्या लेखकांनी जी भाषांतरं केली त्यांच्यावरील चिकित्सक लेखांचं एक पाचशे पानांचं पुस्तक मी संपादित करीत आहे. काल्विनोच्या कथा मराठीत करायच्या आहेत. हिंदीतले दोन कवितासंग्रहही या वर्षी भाषांतरित करायचे आहेत. शिवाय माझ्या लेखनाची दोन पुस्तकंही लवकरच येतील.

प्रश्न - आंतरभारती व त्याला जोडून ‘मायमावशी’चे संपादक  म्हणून मागील काही वर्षांपासून तुम्ही उभे केलेले काम लक्षणीय स्वरूपाचे आहे. आंतरभारतीच्या ध्येयधोरणांनुसार काम करताना सध्या काय विचार करता आहात?

- ते एक सांघिक स्वरूपाचं काम आहे. तिथं भाषांतरविषयक कार्यशाळा, शिबिरं आणि चर्चासत्रं अशी वर्षातून घेतली जातात. भारतीय भाषांमधील लेखकांची पुस्तकं मराठीत आणणे हा आमचा उद्देश आहे. परंतु, तमिळ आणि मल्याळम या भाषांमधील भाषांतरकर्ते आम्हाला सहज मिळत नाहीत. मराठीतलंही निवडक साहित्य इतर भाषांमध्ये नेण्याचे काम चालू आहे. त्यातलं काही झालेलंही आहे. मायमावशी या नियतकालिकात भाषांतरावरील गंभीर सैद्धांतिक लेखन यावं, भाषांतरकर्त्यांचे अनुभव असावेत आणि विविध भारतीय आणि आचार्य परदेशी भाषांमधील साहित्याच्या भाषांतराचे नमुने प्रकाशित करावे, असा आमचा प्रयत्न असतो. साने गुरुजी आणि जावडेकरांच्या ध्येयधोरणांनुसार अनेकानेक भाषांशी जोडून घेण्याचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. दर वर्षी भारतीय भाषांमधील लेखकांचं एक संमेलन ‘साहित्य संवाद’ या नावानं आम्ही घेत असतो. नुकतंच तसं एक संमेलन आम्ही मुंबईत ‘विस्थापितांचे साहित्य’ या सूत्राभोवती केंद्रित करून घेतलं. त्यात पंजाबी, हिंदी, सिंधी, मल्याळम्‌ असे लेखक आलेले होते. तसेच झारखंडमधील एक आदिवासी कवयित्रीही आलेल्या होत्या.

प्रश्न - आजच्या हताश-बधिरपणाच्या कडेलोट होण्याच्या बिंदूवर आपण सगळेच उभे असताना, न बोलणाऱ्या अनेक वंचितांचा बोलणारा आवाज म्हणून लेखकाकडे पाहिले जाते. अशा वेळी लिहिते लेखक म्हणून विद्रोहाच्या विचारपीठावरून अध्यक्षीय मांडणी करताना बोलण्यासाठी नेमक्या कोणत्या सूत्रांचा विचार करता आहात?

- आजचा काळ हा मानवी सभ्यतेच्या मूल्यांवरच आघात करणारा काळ आहे. संवेदनशील व्यक्तीला पार एकटं करणारा हा काळ आहे. जगभरच जमातवादी, वंशद्वेष्टे, युद्धखोर, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उन्माद वाढवणारे राज्यकर्ते एकाच वेळी सत्तेवर आहेत. आणि त्यांच्या उन्मत्त दमनशाहीतून लक्षावधी नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अल्पसंख्याक त्यांच्या निशाण्यावर आहेत. आणि क्रौर्याला पूर्ण मोकळीक दिलेली दिसत आहे. हे हताश आणि हतबल करणारं वातावरण असलं तरी आपल्याला माणूस म्हणून संस्कृतीची, लोकशाहीची पायाभूत तत्त्वं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. जोतिबा फुल्यांपासून शाहू महाराज, वि. रा. शिंदे, डॉ.आंबेडकरांनी आपल्याला पर्यायी संस्कृतीच्या आधुनिकतेचं एक प्रारूप दिलेलं आहे. ते नव्या परिस्थितीत पुन्हा वापरावं लागेल. गोष्टी आता जास्त गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. ब्राह्मणेतरांतला बहुसंख्य वर्ग आता जमातवादी विचारांचा वाहक झालेला आहे. असे कठीण काळ इतिहासात आधी येऊन गेले तेव्हा लेखक-कलावंतांनी कोणती व्यूहनीती वापरली होती, काय प्रकारे प्रतिसाद दिला हे पाहिलं पाहिजे. लेखकाचं काम पुन:पुन्हा अन्यायांचं स्मरण करून देण्याचं, जागं करत राहण्याचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा सोयीचं मौन सोडून बोलकं होणं आवश्यक आहे.

प्रश्न - उत्सुकतेपोटी शेवटचा प्रश्न असा की, प्रस्थापित साहित्य संमेलनाला समांतर जाणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभर कोणत्या स्वरूपाचा कृतिकार्यक्रम नियोजित आहे?

- प्रस्थापित साहित्य संमेलन आहे त्याला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ म्हटलं जातं. परंतु यातले अखिल भारतीय हे दोन शब्द कसे आले ते सांगतो. सुरुवातीची दोन ग्रंथकार संमेलनं झाल्यावर ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ या नावानं काही संमेलनं झाली. त्यानंतर ‘मराठी साहित्य संमेलन’ या नावानं पुढे 1957 पर्यंत संमेलनं होत होती. 1957 मध्ये दिल्लीतल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. ते केंद्रात मंत्री होते. महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला जायचे तर त्यांना प्रवासासाठी रेल्वेच्या भाड्यात सवलत हवी होती. तेव्हा काकासाहेबांनी सूचना केली की, तुमचं हे संमेलन तर प्रादेशिक-केवळ मराठीचं आहे. तेव्हा तुम्ही त्यात अखिल भारतीय असे शब्द वाढवले की मग रेल्वे प्रवासात सवलत मिळू शकेल. तसं झालं. तर ते केवळ सोयीसाठीचंच अखिल भारतीय आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा विद्रोही साहित्य संमेलन हा एक उपक्रम आहे. परंतु तो तेवढाच फक्त असू नये, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मोठी संमेलनं हा काही मला फार पटणारा मार्ग नाही. संमेलन संपल्यानंतरही मला काही ठिकाणी जावं लागणार आहेच. आतासुद्धा अनेक शहरांमधून फिरतांना लिहिणारे, वाचणारे अनेक तरुण मला भेटले तेव्हा लक्षात आलं की, त्यांना नवं समजून घेण्याची मोठी भूक आहे. त्यांच्यासाठी लहान लहान गावांत, शिबिरं-कार्यशाळा घेतल्या जाव्यात, भाषा-समाज आणि राजकारण ही सूत्रं घेऊन आणि भाषा हा स्वतंत्रपणे विषय घेऊन छोट्या प्रमाणांत अनेक ठिकाणी कार्यक्रमांची आखणी करणं शक्य आहे. अनेक ठिकाणी काय वाचू असं विचारलं जातं. त्यासाठी वाचनावरसुद्धा शिबिरं करता येतील. कसं आणि कोणत्या क्रमानं वाचावं, ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा, कोश कसे वापरावेत, प्राथमिक ओळखीच्या वाचनापासून मग वेगवेगळी पुस्तकं त्यांना कशी उपलब्ध करता येतील याचाही विचार करता येईल. गावोगावचे असंख्य गट या संमेलनासाठी निष्ठेनं राबतांना दिसताहेत. त्यांच्या सहकार्यानं अधिक रचनात्मक काही करता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे.

संवादक : गजानन अपिने

(23 व 24 एप्रिल 2022 रोजी उदगीर, जिल्हा लातूर येथे 16 वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत गणेश विसपुते. त्यांची ओळख कवी, लेखक, अनुवादक, संपादक अशी बहुआयामी आहे. त्यांनी आपले लेखन आणि विद्रोही संमेलनामागचा विचार सांगणारी मुलाखत दिली आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गणेश विसपुते,  पुणे
ganesh.visputay@gmail.com

गणेश विसपुते हे एक कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार आणि कला व सिनेमांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके