डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1903 साली भारतात जन्मलेल्या एरिक ब्लेअर यांनी 'जॉर्ज ऑरवेल' या नावाने लेखन केलं. 'अ‍ॅनिमल फार्म' आणि 'नाइंटीन एटी फोर' या दोन अभिजात कादंबऱ्यांमुळे जागतिक इंग्रजी वाङ्मयात ऑरवेल यांना विशिष्ट स्थान बहाल केलं गेलं. 23 जाने. 2006 रोजी त्यांचा 56 वा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात लिहिलेल्या 'व्हाय आय राइट' या लेखाचा हा अनुवाद…

---

1936 नंतर मी लिहिलेल्या गंभीर लेखनातील प्रत्येक ओळ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एकाधिकारशाहीच्या विरोधात आणि (मला समजलेल्या) लोकशाही समाजवादाच्या बाजूने लिहिली आहे. आजच्या काळात अशा विषयांवर लिहिणं टाळण्याचा विचार मला मूर्खपणाचा बाटतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लिहीत असतो. प्रश्न इतकाच असतो, कोण कोणती बाजू घेतो आणि कोणता मार्ग अनुसरतो. कलात्मक मूल्ये व बौद्धिक प्रामाणिकपणा यांचा त्याग न करता, पक्षपात न करण्याबद्दल एखादा लेखक जितका जागरूक राहतो, तितका तो 'राजकीय' वागत असतो.

कोणत्याही लेखकाची सुरुवातीच्या काळातील जडण-घडण समजून घेतल्याशिवाय त्याच्या लेखनामागील प्रेरणांचे मूल्यमापन करता येईल, असं मला वाटत नाही. तो कोणत्या काळात, कोणत्या परिस्थितीत वाढतो, त्यानुसार त्याच्या लेखनाचे विषय ठरत असतात. निदान आजच्या गोंधळाच्या, क्रांतिकारक म्हणावा अशा काळाच्या बाबतीत तरी हे खरं आहे. लेखक आपल्या लेखनाची सुरुवात करतो, त्यापूर्वीच त्याचा स्वतःचा असा एक भावनिक दृष्टिकोन तयार झालेला असतो, ज्यातून त्याची पूर्णतः सुटका कधीच होत नाही.

आपल्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून, आढ्यताखोर प्रवृत्ती होणार नाही याची काळजी घेणं आणि हेकेखोरपणा कमी करणं, हे लेखकाचं कर्तव्य असतं. पण हे करताना तो आपल्या सुरुवातीच्या काळात झालेल्या संस्कारांच्या प्रभावातून मुक्त झाला तर मात्र त्याची लेखन करण्याची उर्मीच नष्ट होत असते... उपजीविकेसाठी पैसे मिळविण्याचा हेतू बाजूला ठेवून मी विचार करतो, तेव्हा कोणत्याही लेखकाच्या लेखनामागे चार मोठ्या प्रेरणा असतात, असं मला वाटतं. गद्यलेखनाबाबत हे जास्तच खरं आहे. त्या चारही प्रेरणांचे प्रमाण वेगवेगळ्या लेखकांत वेगवेगळं तर असतंच, पण प्रत्येक लेखकात हे प्रमाण काळानुसार व भोवतालच्या वातावरणानुसार बदलत असतं. त्या चार प्रेरणा अशा आहेत... 

1. निव्वळ अहंभाव :-

आपण किती हुशार, बुद्धिमान आहोत हे इतरांना समजावं, त्यांनी आपल्याविषयी चर्चा करावी, आपल्या मृत्यूनंतरही आपल्याला लक्षात ठेवावं, ज्या लोकांनी (विशेषतः सभोवतालच्या प्रौढांनी) लहान असताना आपल्याला कमी लेखलंय, त्यांना दाखवून द्यावं, अशी इच्छा असणं ही निव्वळ अहंभावाची प्रेरणा असते. 'ही प्रेरणा माझ्या लेखनामागे नाही किंवा प्रबळ नाही,' असं कोणी म्हणत असेल, तर तो लेखक ढोंगी आहे, दांभिक आहे असे खुशाल समजावं!

ही वैशिष्ट्यपूर्ण प्रेरणा फक्त लेखकांतच असते, असं नाही. शास्त्रज्ञ, कलाकार, राजकीय नेते, वकील, सैनिक, यशस्वी उद्योजक यांच्यामध्ये, थोडक्यात सांगायचं तर प्रतिष्ठित मानला जातो अशा वरच्या स्तरातील सर्वांमध्ये ही प्रेरणा असते.... माणसांचा फार मोठा समूह खऱ्या अर्थाने स्वार्थी नसतो. या मोठ्या समूहातील लोक वयाची तिशी उलटल्यावर आपल्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा सोडून देतात. त्यांतील अनेकजण तर आपल्यातील 'स्व'चं अस्तित्व विसरतात आणि मुख्यतः इतरांसाठीच जगत राहतात. किंवा नावडत्या कामाच्या ओझ्याखाली गुदमरून जातात.

पण 'भाग्यशाली आणि हट्टी' लोकांचा एक छोटा वर्ग असतो, ती माणसं शेवटपर्यंत आपल्या इच्छेप्रमाणे जगत राहतात. या अल्पसंख्य लोकांच्या वर्गातच लेखकांचाही समावेश करावा लागेल. पण लेखकांतही दीर्घकालीन महत्त्वाचं, मूलभूत स्वरूपाचे लेखन करणारा छोटा गट असतो. या गटातील लेखकांना आर्थिक प्राप्तीत कमी रस असला तरी ते, तत्कालीन महत्त्वाचं लेखन करणाऱ्या पत्रकारापेक्षा अधिक अहंकारी आणि आत्मकेंद्री असतात. 

2. कलेविषयी आसक्ती :-

बाह्य जगातील सौंदर्याचा आस्वाद घेण्याची आकांक्षा किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचं तर शब्द व त्यांची मांडणी यामुळे निर्माण होणारं सौंदर्य टिपण्याची उर्मी; एखादा लेख किंवा कथा यांच्यातील शब्दांची लय, ताल, नाद-यातून मिळणारा आनंद; आपल्याला आलेला अनुभव मौल्यवान आहे, तो वाया जाऊ नये, त्या अनुभवात इतरांनाही सहभागी करून घ्यावं अशी इच्छा, ही सर्व कलाविषयक आसक्तीची लक्षणं आहेत. 

कलाविषयक आसक्ती ही प्रेरणा अनेक लेखकांमध्ये कमी असते; पण छोट्या पुस्तिका लिहिणारे किंवा पाठ्यपुस्तक लिहिणारे लेखक यांच्यामध्येही ही प्रेरणा असतेच असते. त्यांचेही काही लाडके शब्द, वाक्प्रचार असतात, जे उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसले तरी त्यांना भावतात. छपाईसंबंधी किंवा मोकळ्या जागा सोडण्यासंबंधीही त्यांना तीव्रतेने काहीतरी वाटत असतंच! एक रेल्वेचं वेळापत्रक सोडले तर त्याच्या वरच्या थरातलं कोणतंही पुस्तक कलात्मक मूल्यापासून मुक्त नसतं!

3. इतिहासाचा उमाळा :-

वस्तू जशा आहेत तशा पाहणं, काही घटनांमागील सत्य शोधणं आणि आपल्याला समजलेलं मागच्या पिढीसाठी राखून ठेवावं अशी इच्छा बाळगणं, हा इतिहासाविषयीचा उमाळा प्रत्येक लेखकामध्ये असतोच!

4. राजकीय हेतू :-

'राजकीय' हा शब्द शक्य तितक्या व्यापक अर्थाने घ्यावा. जगाला विशिष्ट दिशेने ढकलणं, इतर लोकांचं मतपरिवर्तन करणं आणि विशिष्ट समाजनिर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, हे सर्व 'राजकीय हेतू'मध्ये येतं. कोणतंही पुस्तक 'राजकीय हेतू'पासून मुक्त असू शकत नाही. 'कलेला राजकारणाशी काही देणं-घेणं नाही,' असं म्हणणं, हासुद्धा एक प्रकारचा 'राजकीय दृष्टिकोन'च आहे!

निव्वळ अहंभाव, कलेविषयी आसक्ती, इतिहासाचा उमाळा आणि राजकीय हेतू या चारही प्रेरणा परस्परांवर कुरघोडी करत असतात आणि व्यक्तीनुसार व प्रत्येक व्यक्तीत काळानुसार, परिस्थितीनुसार कमी-जास्त होत राहतात. स्वभावतः (प्रौढ अवस्थेतील स्वभाव असा अर्थ घ्यावा) मी असा माणूस आहे; ज्याच्यामध्ये पहिल्या तीन प्रेरणांची तीव्रता चौथ्या प्रेरणेपेक्षा जास्त आहे... शांततेचा काळ असता तर मी केवळ कलात्मक व वर्णनात्मक पुस्तकं लिहिली असती-आणि मग कदाचित माझ्या राजकीय बांधिलकीविषयी पूर्णतः अनभिज्ञ राहिलो असतो. छोट्या-मोठ्या माहितीपर पुस्तिका लिहिण्याचं काम करणं मला भाग पडत होतं, तेच मी करीत राहिलो असतो.

आयुष्याच्या सुरुवातीची पाच वर्षे, मी मला न मानवणाऱ्या व्यवसायात (भारतीय साम्राज्याअंतर्गत असलेल्या ब्रह्मदेशात 'पोलीस' म्हणून) घालवली आणि नंतर दारिद्र्य व अपयशाची भावना यांचा सामना करावा लागला. त्यामुळे वरिष्ठ वर्गाविषयी असलेली तिरस्काराची नैसर्गिक भावना वाढीस लागली आणि कामगार वर्गाच्या अस्तित्वाची तीव्रतेने जाणीव झाली. ब्रह्मदेशातील त्या नोकरीने मला साम्राज्यवादाचं स्वरूप थोडंफार कळलं. पण राजकीय जाणीवेचा नेमक्या उगमाचे आकलन होण्यास ते अनुभव पुरेसे नव्हते. त्यानंतर हिटलरचा उदय झाला, स्पेनमध्ये लोकयुद्ध झालं. पण 1935च्या अखेरपर्यंत निश्चित अशा निर्णयाप्रत येण्यात मी यशस्वी ठरलो नव्हतो. 

स्पेनमधील लोकयुद्ध आणि 1936-37 मधील इतर काही घटनांमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, 'आपण कुठे उभे आहोत,' हे मला माहीत झालं. 1936 नंतर मी लिहिलेल्या गंभीर लेखनातील प्रत्येक ओळ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एकाधिकारशाहीच्या विरोधात आणि (मला समजलेल्या) लोकशाही समाजवादाच्या बाजूने लिहिली आहे. आजच्या काळात अशा विषयांवर लिहिणं टाळण्याचा विचार मला मूर्खपणाचा वाटतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लिहीत असतो. प्रश्न इतकाच असतो, कोण कोणती बाजू घेतो आणि कोणता मार्ग अनुसरतो. कलात्मक मूल्ये व बौद्धिक प्रामाणिकपणा यांचा त्याग न करता, पक्षपात न करण्याबद्दल एखादा लेखक जितका जागरूक राहतो, तितका तो 'राजकीय' वागत असतो. 

राजकीय लेखनाचं कलेत रूपांतर करण्याचा प्रयत्न, मी मागील दहा वर्षांपासून करतोय. पक्षपाताची भावना, अन्यायाची जाणीव हा माझा आरंभबिंदू असतो. मी पुस्तक लिहायला बसतो तेव्हा 'मी एक कलाकृती निर्माण करणार आहे,' असं स्वतःला सांगत नाही. 

मला ढोंग उघडं पाडायचं असतं; काही घटना, वस्तुस्थिती यांच्याकडे लक्ष वेधायचं असतं, म्हणून मी लिहितो. ते करताना माझा सुरुवातीचा पवित्रा तरी फक्त ऐकवण्याचा असतो; पण त्यातून कलात्मक अनुभूती येत नसेल, तर मी पुस्तक लेखनार्थ काम तर सोडाच, पण नियतकालिकासाठी एखादा लेखही लिहू शकत नाही. माझं लेखन काळजीपूर्वक तपासण्याचे कष्ट घेणाऱ्याच्या लक्षात एक येईल, की पूर्णतः प्रचाराच्या हेतूने केलेल्या माझ्या लेखनातील बराच भाग पूर्णवेळ राजकीय काम करणाऱ्याला अप्रस्तुत वाटेल. बालवयात मला जगाचं जे दर्शन घडलं त्यापासून पूर्णतः मुक्त होण्याची क्षमता माझ्यात नाही आणि तसं करण्याची माझी इच्छाही नाही.

मी जिवंत राहीन तोपर्यंत गद्यलेखनाच्या शैलीविषयी आग्रही राहीन. पृथ्वीतलाबद्दल मला आपुलकी वाटेल आणि घन पदार्थ व माहितीचे तुकडे यातला आनंद घेत राहीन. माझी ती बाजू लपवण्याचा प्रयत्न करणं याला काही अर्थ नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे आपणा सर्वांना कराव्या लागतात अशा सार्वजनिक व अवैयक्तिक कृती आणि माझ्या मनात खोलवर रुजलेल्या भल्या बुऱ्या समजुती यांच्यात समेट घडवणं, हे काम मी करतोय; पण ते सोपं नाही. ते करताना वाक्यरचना व भाषा यासंबंधीच्या समस्या उभ्या राहतात आणि मग त्यातूनच सत्यतेविषयीची नवीन समस्या निर्माण होते. अशा प्रकारातून निर्माण झालेल्या समस्येचं एक उदाहरण देतो.... स्पेनमध्ये लोकयुद्ध झालं, त्यासंबंधी 'होमेज टू कॅटालोनिया' हे पुस्तक मी लिहिलं. अर्थातच उघडपणे ते राजकीय पुस्तक होतं.

पण त्यातही विशिष्ट अलिप्तपणा होता आणि त्याची रचनाही चांगली होती. मी जी साहित्यविषयक मूल्यं मानतो, त्यांना धक्का पोहोचणार नाही याची पुरेशी काळजी घेऊन, मी त्यात पूर्ण सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. इतर अनेक घटकांबरोबरच त्यात वर्तमानपत्रातील विधानं आणि संदर्भ असलेलं एक दीर्घ प्रकरण होतं. 'ट्रॉटस्कीवाद्यांनी फ्रेंचांच्या मदतीने कट आखला होता' अशा खोट्या आरोपांचा प्रतिवाद करणारं ते प्रकरण होतं. स्पष्टच सांगायचं तर, एक-दोन वर्षानंतर अशा प्रकरणातील सामान्य वाचकांचा रस संपलेला असतो आणि म्हणून अशी प्रकरणं पुस्तकांना घातक असतात.

ज्याला मी विशेष मानतो असा एक टीकाकार मला म्हणाला, 'इतकी माहितीची जंत्री तू त्या प्रकरणात कशाला कोंबलीस? त्यामुळे चांगलं होऊ शकणाऱ्या पुस्तकाला वृत्तांताचं स्वरूप आलंय. ' तो म्हणाला ते खरं होतं. पण मी त्याशिवाय ते पुस्तक लिहूच शकलो नसतो. अनेक निष्पाप माणसांना चुकीच्या पद्धतीने आरोपी केलं गेलं, हे इंग्लंडमधील फारच थोड्या लोकांना माहीत असलेलं गुपित मला कळलं होतं. त्याबद्दल संताप आला नसता, तर मी ते पुस्तक कधीच लिहिले नसतं. 

एका प्रकारे वा दुसऱ्या, ही समस्या पुन्हा उद्भवणारच आहे. भाषेची ही अडचण पटकन् न समजणारी आणि चर्चा करायची म्हटलं तर फार मोठा विषय आहे. मी इतकंच सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांत परिस्थितीचं चित्रण करणारं मी फार कमी लिहिलंय; आणि त्यामागील कारणांचा नेमका शोध घेणारं लेखन जास्त केलंय. माझ्या असं लक्षात आलंय की कोणत्याही प्रकारच्या लेखनशैलीत तुम्ही पारंगत झालात तर त्यातली पुढची प्रगती झपाट्याने होते. 'अॅनिमल फार्म' हे असं पहिलं पुस्तक होतं, जे लिहिताना आपण काय करत आहोत, याचं मला पूर्ण भान होतं; राजकीय हेतु आणि कलात्मक हेतू या दोहोंचा संयोग असणारी एकसंध कलाकृती आपण निर्माण करीत आहोत, याची मला पूर्णतः जाणीव होती. मागील सात वर्षात मी कादंबरी लिहिली नाही, पण लवकरच एक प्रामाणिक व न्याय्य कादंबरी लिहीन असं वाटतंय. अर्थात, पूर्णतः प्रामाणिकपणे लिहिण्यात यश येणार नाही. प्रत्येक पुस्तक त्या अर्थाने अपयशीच असतं. पण मला कोणत्या प्रकारचं पुस्तक लिहायचं आहे, याची स्पष्ट कल्पना मला आहे. 

मागील एक-दोन पानांकडे पाहिल्यावर मला असं दिसतंय की, माझी लेखनाची प्रेरणा पूर्णतः सार्वजनिक आहे, असं चित्र निर्माण झालंय, पण तीच छाप तुमच्या मनावर कायम रहावी असं मला वाटत नाही. सर्वच लेखक अहंकारी, स्वार्थी आणि आळशी असतात आणि त्यांच्या लेखनविषयक प्रेरणांच्या मुळाशी गूढ-अनाकलनीय असं काहीतरी असतं. पुस्तक लिहिण्याचा अनुभव भयानक थकवणारा आणि संघर्षमय असतो. एखाद्या दीर्घकालीन व वेदनादायक आजारासारखंच असतं ते! ज्याला रोखता येत नाही आणि समजावताही येत नाही असा राक्षस अंगात संचारल्याशिवाय असं काम करता येत नाही. आणि आपल्याला माहीत आहे की, राक्षस ही अशी प्रवृत्ती आहे,  जिच्याकडे लक्ष वेधल्यावर लहान मुलं किंचाळतात. आणि हेही खरं आहे की, एखादा लेखक सतत झगडत राहून स्वतःच्या व्यक्तित्वाशी संघर्ष करीत नाही, तोपर्यंत तो वाचनीय असं काही लिहू शकत नाही. माझ्यात कोणती प्रेरणा सर्वाधिक प्रबळ आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही; पण त्यातील कोणती प्रेरणा अनुकरण करण्यालायक आहे, हे सांगू शकतो. माझ्या समग्र लेखनाकडे मागे वळून पाहताना मला दिसतंय राजकीय हेतूचा अभाव असणारं माझे लेखन निर्जीव आहे आणि त्या लेखनातील अलंकारिक परिच्छेद, अर्थहीन वाक्यं, मोठी विशेषणं ही सारी फसवणूक होती! 

(अनुवाद : विनोद शिरसाठ)

Tags: कला भाषा स्पेन राजकारण प्रेरणा लेखक अ‍ॅनिमल फार्म विनोद शिरसाठ  जॉर्ज ऑर्वेल Art Language Spain Politics Instincts Writers 1984 Animal Farm Vinod Shirsath George Orwell weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके