डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘नाझी’ सत्तेवर आले तेव्हा जर्मन साहित्यक्षेत्रात काय झाले? संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली नसावी, पण माझा असा अंदाज आहे की, ज्यांनी हद्दपारी ओढवून घेतली किंवा ज्यांचा सरकारने अतोनात छळ केला अशा जर्मन लेखक- पत्रकारांपेक्षा जर्मन वैज्ञानिकांची संख्या फार कमी होती. पण याहून अधिक क्लेशदायक हे आहे की, अनेक जर्मन वैज्ञानिकांनी त्या (वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत मांडणाऱ्या) राक्षसी प्रवृत्तीकडून झालेले अपमान सहन केले. या संदर्भातील काही नावे व त्यांची विधाने प्रोफेसर ब्रॅडी यांच्या ‘द स्पिरिट ॲन्ड स्ट्रक्चर ऑफ जर्मन फॅसिझम’ या पुस्तकात सापडतील. थोड्याफार वेगळ्या स्वरूपात हेच चित्र सर्वत्र आहे.

गेल्या आठवड्यातील ‘ट्रिब्यून’मध्ये, जे. स्ट्युअर्ट कुक यांचे एक चित्तवेधक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी असे सुचवले आहे की, विज्ञानाच्या आधारावर श्रेणीबद्ध वर्गवारीचा धोका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जनसामान्यातील प्रत्येकाला विज्ञानाचे शिक्षण शक्य तितके दिले पाहिजे आणि त्याच वेळी वैज्ञानिकांना त्यांच्या कोषातून बाहेर आणून राजकारणात व प्रशासनात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे.

सर्वसाधारण विधान म्हणून आपल्यापैकी बहुतेक जण याच्याशी सहमत होतील. पण मला असे वाटते की, त्या विधानात स्ट्युअर्ट कुक विज्ञानाची व्याख्या करीत नाहीत; आणि असे ध्वनीत करतात की, विज्ञान म्हणजे असे वस्तुनिष्ठ शास्त्र, ज्याची प्रात्यक्षिकं प्रयोगशाळेतील साहित्याच्या साह्याने केली जाऊ शकतात. त्यातून ते असेही सूचित करतात की, प्रौढांच्या शिक्षणाचा कल वाङ्‌मयीन, आर्थिक व सामाजिक अभ्यासाला अधिक पसंती देऊन विज्ञानाचा अभ्यास टाळण्याकडे असतो. म्हणजे अर्थशास्त्र व समाजशास्त्र यांना ते विज्ञानाच्या शाखा म्हणून मानत नाहीत. वरवर पाहता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण विज्ञान हा शब्द नेहमी दोन अर्थांनी वापरला जातो आणि आपापल्या सोईचा अर्थ घेण्याच्या लबाड प्रवृत्तीमुळे विज्ञानाचे शिक्षण हा प्रश्न काहीसा झाकोळून गेला आहे.

विज्ञान या संकल्पनेचे सामान्यत: दोन अर्थ घेतले जातात. पहिला- वस्तुनिष्ठ विज्ञान, म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारखे विषय. आणि दुसरा- विचारांची अशी पद्धत, जिच्यामध्ये वस्तुस्थितीची निरीक्षणे तार्किक पद्धतीने पडताळून पाहून निष्कर्ष काढले जातात.

कोणत्याही वैज्ञानिकाला किंवा खरं तर कोणत्याही सुशिक्षित माणसाला ‘विज्ञान म्हणजे काय’ असा प्रश्न विचारला, तर पटकन येणारे उत्तर दुसऱ्या प्रकारचे असते. पण रोजच्या व्यवहारात बोलताना किंवा लिहिताना ‘विज्ञान’ हा शब्द लोकांकडून वापरला जातो, तेव्हा मात्र त्याचा अर्थ पहिल्या प्रकारचा असतो : विज्ञान म्हणजे असे काहीतरी जे प्रयोगशाळेत घडते. त्या शब्दांतून उभे राहणारे चित्र म्हणजे आलेख, परीक्षानळ्या, मोजपात्र, सूक्ष्मदर्शक यंत्र इत्यादी. एखादा जीवशास्त्रज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञ यांचे आणि फार तर मानसशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ यांचे वर्णन ‘विज्ञानाचा माणूस’ असे केले जाते. पण ही संज्ञा राजकीय मुत्सद्दी, कवी, पत्रकार आणि तत्त्ववेत्ते यांनाही लावण्याबाबत कोणी विचारही करू शकत नाही. आणि जेव्हा काही लोक ‘तरुणांना विज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे’ असे म्हणत असतात; तेव्हा त्यांच्या मनातला अर्थ ‘तरुणांना- किरणोत्सर्ग, अवकाश-तारे, शरीररचनाशास्त्र यांचे शिक्षण दिले पाहिजे’ असाच असतो. ‘तरुणांना  अधिक तर्कशुद्ध व वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करायला शिकविले पाहिजे’ असा अर्थ त्यांच्या मनात नसतो.

हा अर्थाचा गोंधळ काही वेळा जाणीवपूर्वक केला जातो, त्यात एक मोठा धोका आहे. ‘विज्ञानाचे शिक्षण अधिक दिले पाहिजे’ असे सूचित केले जाते, तेव्हा त्यात असा दावा केलेला असतो की, विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्यांचा सर्वच विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन (ज्यांनी असे शिक्षण घेतलेले नाही त्यांच्यापेक्षा) अधिक प्रगल्भ असतो. त्यात असेही गृहीत धरले जाते की, वैज्ञानिकांची राजकीय- सामाजिक समस्यांवरची मते, नैतिक-तात्त्विक प्रश्नांवरची मते आणि एवढेच काय कलेविषयीची मतेसुद्धा (ज्यांना त्या विषयांचे फारसे ज्ञान नाही, त्यांच्यापेक्षा) अधिक महत्त्वपूर्ण असतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, ‘हे जग वैज्ञानिकांच्या नियंत्रणाखाली असते तर अधिक चांगले बनले असते’, असा तो दावा असतो. पण आत्ताच आपण पाहिले, दैनंदिन व्यवहारात ‘वैज्ञानिक’ म्हणजे ‘वस्तुनिष्ठ विज्ञानाच्या एखाद्या शाखेचा विशेष तज्ज्ञ.’ मात्र मानले असे जाते की, रसायनशास्त्रज्ञ किंवा भौतिकशास्त्रज्ञ हा राजकीय बाबतीतही कवी किंवा वकिलापेक्षा अधिक बुद्धिमान असतो. या गृहितकावर विश्वास असलेले लाखो- करोडो लोक आपल्या सभोवताली आहेत. 

पण हे संपूर्ण सत्य आहे का? विशिष्ट ज्ञानशाखेत तज्ज्ञ असलेल्या, म्हणजे मर्यादित अर्थाने ‘वैज्ञानिक’ असलेल्या व्यक्तीचे दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील समस्यांविषयीचे मत इतर लोकांपेक्षा अधिक ग्राह्य मानायचे का? नाही! असे समजायचे काहीच कारण नाही. एक साधे उदाहरण घ्या, राष्ट्रवादाच्या बाजूने उभे राहण्याबाबतचे! ‘विज्ञान हे वैश्विक आहे’, असे सहजपणे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात विज्ञानाच्या क्षेत्रांत काम करणारे लोक आपापल्या शासनाच्या मागे फारशा (लेखक व कलावंतांइतक्या) शंका उपस्थित न करता उभे राहतात. जर्मनीतील वैज्ञानिकांच्या समूहाने एकत्रितपणे हिटलरला विरोध केला नाही. जर्मनीतील विज्ञानाच्या दीर्घकालीन वारशाचे हिटलरने अतोनात नुकसान केले, तरीही तिथे अनेक प्रतिभावंत माणसे अशी होती, जी सिंथेटिक ऑईल, जेट विमाने, रॉकेट प्रक्षेपणास्त्र आणि अणुबाँब बनविण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन हिटलरच्या आदेशानुसार करीत होती. त्यांच्याशिवाय जर्मनीची युद्धसामग्री उभारलीच गेली नसती.

दुसऱ्या बाजूला, ‘नाझी’ सत्तेवर आले तेव्हा जर्मन साहित्यक्षेत्रात काय झाले? संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली नसावी, पण माझा असा अंदाज आहे की, ज्यांनी हद्दपारी ओढवून घेतली किंवा ज्यांचा सरकारने अतोनात छळ केला अशा जर्मन लेखक-पत्रकारांपेक्षा जर्मन वैज्ञानिकांची संख्या फार कमी होती. पण याहून अधिक क्लेशदायक हे आहे की, अनेक जर्मन वैज्ञानिकांनी त्या (वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत मांडणाऱ्या) राक्षसी प्रवृत्तीकडून झालेले अपमान सहन केले. या संदर्भातील काही नावे व त्यांची विधाने प्रोफेसर ब्रॅडी यांच्या ‘द स्पिरिट ॲन्ड स्ट्रक्चर ऑफ जर्मन फॅसिझम’ या पुस्तकात सापडतील.

थोड्याफार वेगळ्या स्वरूपात हेच चित्र सर्वत्र आहे. इंग्लंडमधील आघाडीच्या वैज्ञानिकांमधील फार मोठ्या समूहाने भांडवलशाही समाजरचना स्वीकारली आहे. स्वातंत्र्याच्या काळातही त्यांना दिले गेलेले नाइटहूड, बॅरोनेटारीज आणि पिअरेजोस (सरदार, जहागिरदार, अंमलदार इ.) किताब पाहिले तर हे सहज लक्षात येईल. सर मॅक्स बिरबोहम यांच्यासारखा अपवाद वगळला, तर टेनिसनपासून आत्तापर्यंतच्या इंग्लिश लेखकांना (जे भरपूर वाचले जातात) असे किताब दिले गेले नाहीत. आणि ज्या इंग्लिश वैज्ञानिकांनी ते किताब स्वीकारले नाहीत, ते कधीतरी कम्युनिस्ट होते. याचा अर्थ इतर वैज्ञानिक आपापल्या क्षेत्रात चोख काम बजावत असतील, पण ते चिकित्सक होत नसत आणि काही बाबतीत तर अप्रामाणिकपणे वागत. म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की, वस्तुनिष्ठ विज्ञानाच्या एक किंवा अनेक शाखांमध्ये शिक्षण घेतलेली आणि उच्च दर्जाच्या क्षमता असलेली व्यक्ती मानवतावादी, संशयवादी व चिकित्सक दृष्टिकोन असणारी असेलच, असे नाही. पाचसहा महान राष्ट्रांचे भौतिकशास्त्रज्ञ अतिशय उतावीळपणे अणुबाँब निर्मितीसाठी गुप्तपणे संशोधन करीत होते, हे याचे निदर्शक आहे.

मग याचा अर्थ असा आहे का, की सामान्य जनता विज्ञानाचे शिक्षण अधिक घेतलेली नसावी? नाही! याचा अर्थ एवढाच आहे की, विज्ञानाचे शिक्षण मोठ्या समूहाला कमी उपयुक्त आणि अधिक नुकसानकारक ठरेल, जर ते शिक्षण केवळ भौतिक-रसायन किंवा जीवशास्त्र अशा विषयांचे असेल, आणि त्या समूहाला साहित्याचा व इतिहासाचा परिचयही नसेल. बहुतांश माणसांवर याचा संभाव्य परिणाम असा होईल की, त्यांच्या विचारांच्या कक्षा संकुचित होत जातील आणि स्वत:ला ज्ञात नसलेल्या विषयांबाबत त्यांना तिरस्कारच वाटेल. आणि मग त्यांच्या राजकीय समस्यांवरील प्रतिक्रियाही कदाचित, (ज्यांना इतिहासाची थोडीबहुत माहिती आहे, कलाभिरुची आहे अशा) निरक्षर सामान्य माणसांपेक्षा कमी समज असणाऱ्या असतील.

नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवने असाच असला पाहिजे. विचारांची अशी पद्धत जिच्यात केवळ माहितीची जंत्री नसेल आणि ती कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी वापरता येईल. हे सर्व याच शब्दांत मांडले तर विज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे अपराधीपणाची भावना असणारा माणूस हे सर्व मान्य करील. पण त्याला आणखी खोदून विचारले, तपशीलवार सांगायला लावले तर तो विज्ञानाचे शिक्षण म्हणजे वस्तुनिष्ठ विज्ञानाकडे अधिक लक्ष (म्हणजे माहितीची जंत्री) देणे असाच अर्थ घेईल.

विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तर जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन या कल्पनेला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र प्रचंड विरोध होतो. टोकाचा व्यावसायिक मत्सर हे त्याचे एक कारण असावे. विज्ञान ही केवळ विचारपद्धती किंवा दृष्टिकोन असेल तर ज्याची विचारप्रक्रिया पुरेशी विवेकी आहे, अशा कोणालाही एका मर्यादित अर्थाने ‘वैज्ञानिक’ म्हणायला हरकत नसावी. पण मग आज फार मोठी प्रतिष्ठा मिळत आहे असे मर्यादित अर्थाने वैज्ञानिक असलेले रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ यांचे आणि ते इतरांपेक्षा अधिक शहाणे असतात या दाव्याचे काय?

शंभर वर्षांपूर्वी चार्ल्स किंग्जले यांनी विज्ञानाचे वर्णन ‘प्रयोगशाळेत ओंगळवाणे वास निर्माण करणारा विषय!’ असे केले होते. याउलट, दोनेक वर्षांपूर्वी एक तरुण रसायन उद्योजक मला अत्यंत निरागसपणे सांगता होता की, ‘कवितेचा काय उपयोग होतो तेच मला कळत नाही’. म्हणजे मतमतांतरे या टोकापासून त्या टोकापर्यंतची आहेत. पण यापैकी कोणताही एक दृष्टिकोन दुसऱ्याहून अधिक चांगला आहे असे मला वाटत नाही. आजच्या काळात विज्ञानाची श्रेणी सर्वांत वरची मानली जाते आणि म्हणून जनसामान्यांना विज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे हा दावा आपण ऐकून घेतो आणि ते योग्यही आहे. पण त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनीही इतर विषयांचे थोडेफार शिक्षण घेतले तर त्यांना त्याचा फायदाच होईल असा प्रतिदावा करता येईल. मात्र तो दावा आपण ऐकून घेत नाही.

हा लेख लिहायला सुरुवात करण्याआधी मी एका अमेरिकन नियतकालिकात वाचले की, अनेक ब्रिटिश व अमेरिकन वैज्ञानिकांनी अणुबाँबवरील संशोधन करण्यास सुरुवातीपासून नकार दिला आहे. म्हणजे विक्षिप्तांच्या जगात अशी काही शहाणी माणसे आहेत तर! त्या लोकांची नावे प्रसिद्ध झालेली नसली तरी माझी अशी खात्री आहे की, त्या सर्वांना बऱ्यापैकी सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल आणि इतिहास, वाङ्‌मय किंवा कलेचा थोडाबहुत परिचय असेल. थोडक्यात ते असे लोक आहेत ज्यांची अभिरूची (हल्लीच्या परिभाषेत) शुद्ध वैज्ञानिक नाही!

(अनुवाद: विनोद शिरसाठ)

हिटलरची आत्महत्या, हिरोशिमा व नागासकी या शहरांवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब आणि दुसऱ्या महायुद्धाची अखेर या पार्श्वभूमीवर लंडनमधील ट्रिब्यून या नियकालिकाच्या ऑक्टोबर 1945 च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.

Tags: हिटलर जॉर्ज ऑरवेल विज्ञान म्हणजे काय? विनोद शिरसाठ vinod shirsath what is science Vidnyan Mhnje Kaay? George Orwell weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जॉर्ज ऑर्वेल

(जून २५इ.स. १९०३; मोतिहारी, बिहारब्रिटिश भारत - जानेवारी २१इ.स. १९५०लंडनयुनायटेड किंग्डम) हा इंग्लिश लेखक व पत्रकार होता.  मूळ नाव:  एरिक ब्लेअर. त्यांनी जॉर्ज ऑर्वेल या नावाने लेखन केले. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके