डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिकीकरण आणि देशीवाद (पूर्वार्ध)

सत्तरीच्या दशकात जगभर कमीजास्त प्रमाणात बदलांना सुरुवात झाली. ती जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांत झाली. मुख्य म्हणजे जगण्यासंबंधीच्या विविध सुप्रतिष्ठित धारणांवर घाला घालण्याची प्रक्रिया त्यांतून सुरू झाली. भौतिक व्यवहार बदलले. मानवी संबंधांचं स्वरूप बदलायला सुरुवात झाली. वस्तूंची, ऊर्जास्रोतांची अमाप नासाडी सुरू झाली. उत्पादन अवाढव्य प्रमाणात करायचं आणि त्याला तितकी मागणी कायम राहील, अशी परिस्थिती निर्माण करायची ही व्यापारी गरज निर्माण झाली. नफेखोरी हे जगण्यातलं प्रधान मूल्य म्हणून प्रतिष्ठित व्हायला सुरुवात झाली.

 

या व्याख्यानाच्या निमित्तानं संयोजकांनी मला कोल्हापूरला येण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. इथं येणं मला नेहमीच आवडतं. कोल्हापूर हे महाराष्ट्रातल्या हाताच्या बोटांवर मोजता येईल अशा काही शहरांपैकी एक आहे, की ज्यानं अजूनही आपला चेहरा शाबूत ठेवलेला आहे. याचा संबंध जागतिकीकरणाशी, मी ज्यासंबंधी बोलणार आहे त्याच्याशी आहे. जागतिकीकरणाच्या या अभूतपूर्व वावटळीत स्वतःचा चेहरा एखाद्या शहरानं, माणसानं वा समूहानं राखणं ही मोठी मुश्किल गोष्ट झालेली आहे. सगळ्या सजीव व निर्जीव तरीही उपयोगी भासणाऱ्या व्यवस्थांचं ‘कमोडिटी’मध्ये रूपांतर होणं, त्यांचा चेहरा वा वेगळेपण संपून त्यांची निर्विकार एकके (युनिटस) तयार होणं, ही जागतिकीकरणाची एक अपरिहार्य निष्पत्ती आहे. अशा युनिफॉर्म कमोडिटींच्या रचनेवर आपल्याला हव्या त्या गोष्टी लादणे, त्यांना व्यापारी हेतूंसाठी हवे तसे सोईस्कर वापरणे भांडवलशहांना सगळ्यांत सोईस्कर असते. म्हणून चेहरा नाहीसा करणे ही त्यांची गरज असते.

कोल्हापूरात आलं की अजूनही एक प्रकारची खानदानी अदब, एक प्रकारचं दणकट निरोगीपण आणि माणसांच्या स्वभावातलं सरळ थेटपण यांचा संस्कार होतो. वरवरचा अर्थ घेऊन कोणी याचा संबंध सरंजामी व्यवस्थेविषयी आपल्या मनात असलेल्या सुप्त आकर्षणाशी जोडेल. माझ्या मनात ते उरलेलं आहे असं मला वाटत नाही. राजर्षी शाहू छत्रपती यांना पारंपरिक अर्थानं सरंजामदार म्हणणं अशक्य आहे. त्यांनी घालून दिलेली सांस्कृतिक, सामाजिक रीत इथं अजूनही शिल्लक आहे; ती आदर वाटावा अशीच आहे.

अगदी पहिल्यांदा मी कोल्हापूरात आलो तेव्हा साहजिकच मला येथील रस्त्यांची फारशी माहिती नव्हती. उतरलो अन् सरळ एका रिक्षात बसलो. त्याला म्हटले, अमुकअमुक ठिकाणी जायचंय, तो म्हणाला. “उतरा खाली...” मी चकित झालो. रिक्षावाला प्रकृतीने दणकट होता आणि त्याचा आवाजही त्याच जातीचा. मी चाचरत विचारलं, “का बरं?” म्हणाला, “उतरा, खाली उतरा.” मी उतरलो. म्हणाला, “इथं जवळच आहे ते. चला, मी सोडतो.” असं म्हणून तो पायी मला त्या जवळच्या ठिकाणी सोडायला आला. याच्या अगदी उलट प्रकारचे कैक अनुभव पुण्या-मुंबईत माझ्या गाठीशी आहेत. कोल्हापूरचा पहिला अनुभव असा होता अन् उत्तरोत्तर या शहराविषयी माझं प्रेम वाढतच गेलं. राजन गवस यांच्यासारखे माझे सख्खे मित्र या भागातले आहेत. आणखीही मित्र आहेतच. अशा मित्रांमुळंही शहरं आपल्या मनात असतात. अर्थात मैत्रभावाचा भाग हा नंतरचा. असो.

जागतिकीकरणाचा सध्याच्या सुस्थापित अर्थ थोडा वेळ बाजूला ठेवून समजा आपण असं म्हटलं, की जागतिकीकरण म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या मानवी संस्कृतींनी एकमेकींशी संवाद करणं; त्यांनी एकमेकांना भेटणं, त्यांच्यात काही व्यवहार, व्यापार होणं, तर अशा जागतिकीकरणाला प्रदीर्घ परंपरा आहे. हिंदस्थानातल्या माणसांनी आग्नेय आशियातल्या, ईशान्येकडच्या देशात जाणं; लाओस, कंबोडिया, थायलंड किंवा खाली मलेशिया, इंडोनेशिया, किंवा तेथील लोकांनी इकडे येणं हे प्राचीन काळापासून आहे. सांस्कृतिकदृष्ट्या असं जोडलं जाणं पूर्वापार आहे. नुसत्या एका रामायणाचा किंवा महाभारताचा विचार केला तरी या भूभागात त्यांची, त्या महाकाव्यांचीकितीतरी वेगवेगळी रूपं व कथानकं आपल्याला दिसतात. अरबी व्यापाऱ्यांनी, भटक्या टोळ्यांनी कितीतरी प्रकारचं ज्ञान हिंदुस्थानातून युरोपात व जगाच्या अन्य भागात नेलं. डाक्क्याची मलमल रोमन सम्राटांच्या, तेथील अभिजनांच्या वापरात होती, हेही सर्वांना माहीत आहे. हिंदुस्थानसारख्या सुपीक प्रदेशाचा लोभ दीर्घकाळापासून अनेकांना वाटत आलेला आहे. अनेक दिशांनी, अनेक प्रकारचे मानवी वंश इथं आले व रहिवासले आहेत. मुघल लोकांनी अनेक कला इथं आणून रुजवल्या; उत्तुंग शिल्पं उभारली. वेगवेगळ्या मूल्यव्यवस्थांच्या टकराव-संघर्षातून सतत नवं घडत राहिलं.

अशा प्रकारचं आदानप्रदान विस्तृत भूप्रदेशात जगभर होऊन मानवी संस्कृती समृद्ध होत गेल्या आहेत. या आदानप्रदानात मी युद्धांचादेखील समावेश करीन. वेगवेगळे रीतिरिवाज, भाषा, संकल्पना असलेले समाज युद्धाच्या निमित्ताने समोरासमोर आल्यावर त्यातूनही पुष्कळ घडलेले दिसते. युद्धाच्या निमित्ताने देशभर आपले मराठी लोक गेले. त्यातून आपली भाषाही समृद्ध झाली. आजही कितीतरी अरबी, पारसी किंवा तुर्की मूळ असलेले शब्द आपल्या भाषेत आहेत. ते सारे मराठीच होऊन गेलेले आहेत. किंवा उर्दू सारखी भाषा ही अशा टकरावातून, रहिवासातून इथे जन्माला आली. मराठीचा जोमदार प्रभाव असलेली दख्खनी उर्दू ही आपल्याला माहीत आहे.

पण हे सारे संथ गतीने होत होते. जरुरीपुरते उत्पादन, जरुरीपुरता खर्च, अगदीच जास्त गरज भासली तर युद्धे करून काही बळकावणे व स्वतःला जागा करून घेणे असे या साऱ्याचे स्वरूप होते. अगदी पानिपतचे तिसरे युद्धही फार मोठे म्हणता यायचे नाही. मुख्य म्हणजे व्यापारी हितसंबंधांच्या सोयीसाठी युद्ध लढण्याची संकल्पना तोवर नव्हती.

युरोपात अठराव्या-एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, त्याआधी नैसर्गिक विज्ञानासंबंधीचे कुतूहल त्या प्रदेशात वाढीला लागले. विज्ञानात भराभर नवे शोध लागू लागले. साधारणतः एकोणिसाव्या शतकाला युरोपातला अभिजात भौतिकीचा (क्लासिकल फिजीक्स) कालखंड म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वैज्ञानिक विश्वामध्ये साधारणतः मनःस्थिती अशी झाली होती की, नवीन शोधायचं आता फारसं काही उरलेलं नाही. माहीत करून घ्यायचं ते सारं जवळपास माहीत झालेलं आहे. नवं काही दिसण्याची, सापडण्याची शक्यता उरलेली नाही. या भौतिकीत साधारणतः मेकॅनिक्स, पदार्थांचे गुणधर्म, औष्णिक ऊर्जाशास्त्र, थर्मोडायनॅमिक्स, विद्युत चुंबकीयशास्त्र इत्यादींचा समावेश होता. हे बव्हंशी स्थूल स्वरूपाचं विज्ञान होतं. याकाळात विज्ञानाचा तंत्रज्ञानात रूपांतर होण्याचा वेग अत्यंत कमी होता. युरोपांत पहिली औद्योगिक क्रांती झाल्यानंतर पुष्कळ वर्षे विज्ञान हे याच टप्प्यावर होतं.

औद्योगिक क्रांतीमुळं व्यापार, मानवी संबंध, समाजजीवन, संस्कृती, धर्म यांच्या स्वरूपात आणि संकल्पनांत क्रांतिकारी बदल झाले. या गोष्टी अर्थातच प्रामुख्याने युरोपांत झाल्या. यंत्रांच्या साहाय्याने वस्तूंचे उत्पादन अमाप प्रमाणात होऊ लागले. मोठ्या प्रमाणावर कामगारांची आवश्यकता निर्माण झाली. ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकांना कामावर घेतले गेले. त्यातून राजाचे जे निसर्गदत्त अधिकार वा ईश्वरदत्त अधिकार म्हणा, ते संपले. एक नवा, मोठा व वेगळा संघटित वर्ग तयार झाला. यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माल तयार होऊ लागला; तशी त्याला हुकमी गिर्‍हाईकांची, बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. याकाळात युरोपांतल्या बऱ्याच देशांच्या जगभर वसाहती होत्या. त्या वसाहतीतील पारंपरिक उद्योग मोडून काढून तिथं कृत्रिमरित्या गरजा निर्माण करून आपला माल खपवणं या देशांना शक्य झालं, वसाहतीच्या देशांत उपलब्ध होणारं स्वस्त मनुष्यबळ; खरं म्हणजे कवडीमोलानं मिळणारं मनुष्यबळ. इकडून तिकडे सहज हलवता आलं. भारत, मॉरिशस, वेस्टइंडिज बेटे किंवा ऑस्ट्रेलियाजवळ फिजी येथे अशाच गरजांपोटी पुष्कळ लोक नेण्यात आले. किंवा आफ्रिकेतून बोटींनी भरभरून काळी माणसे वेठबिगारी करण्यासाठी सध्याच्या अमेरिकेत नेण्यात आली. भारतात आपल्याकडं मांजरपाट नावाचा एक जाडाभरडा कपडा अगदी परवापर्यंत, सुमारे चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत, अगदी भरपूर मिळत असे. मांजरपाट हे मँचेस्टर क्लॉथचं देशी नामकरण. इथल्या हातमागावरचा उद्योग मोडकळीस आणून हे स्वस्त कापड इथं दीर्घकाळ वापरलं गेलं. डाक्क्याची महागडी मलमल आधीही जनसामान्य वापरत नव्हते. नंतर ती नाहीशीच झाली.

हे सारं बव्हंशी ग्रेट ब्रिटन आणि त्याच्या वसाहतींमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्येच झाली असं नव्हे; तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडेच झाली. सगळीकडे ती एकाच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या, तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनांच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या; पण हे दोन्ही देश सगळ्यांत आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगळ्या रस्त्यानं गुंतत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या, तरीही होत्या. जर्मनीत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेनं अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता; अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडं फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर जर्मनांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धांमुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपांतील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यांत कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ज्यांचा उल्लेख सर्वसामान्यपणे आपण अमेरिका असा करतो ती, आणि ज्यांना सगळ्यांत जास्त झळ बसली तो रशिया, ज्यात बाकी सोव्हिएत प्रजासत्ताके होती, अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

आधीच्या युरोपी वसाहतवादी सत्तांपेक्षा या दोन्ही खूप वेगळ्या प्रकारच्या सत्ता होत्या. त्यांच्या दार्शनिक प्रणाली परस्परविरोधी होत्या. एक मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी तर दुसरी समाजसत्तावादाचा घोष करणारी. पण प्रचंड मोठा भूप्रदेश हे त्यांच्यातलं साम्य होतं. पारंपरिक पद्धतीनं एखादं सैन्य या देशांच्या भूभागात घुसल्यास मागे सरकण्यासाठी त्यांच्याकडं भरपूर जागा होती. रशियानं आधी नेपोलियनच्या सैन्याशी व नंतर हिटलरच्या जर्मन सैन्याशी त्याचा वापर करूनच तोंड दिलं हे आपल्याला माहीत आहे. आधी भरपूर आत येऊ द्यायचं आणि नंतर येणार्‍या सैन्याला गारठवून मारायचं, तोवर तग धरायची, अन् निसर्गाला आपलं काम करू द्यायचं, हे तंत्र या दोन्ही युद्धात रशियानं केवळ मोठ्या भूप्रदेशाच्या बळावर वापरलं जातं. त्यात अर्थात रशियाचं नुकसानही खूप झालं. रशियन लोकांना खूप त्याग करावा लागला. लाखो रशियन मृत्यमुखी पडले. सलग मोठा भूप्रदेश, नैसर्गिक ऊर्जास्रोतांची विपुलता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस वाट्याला आलेले बुद्धिमान जर्मन शास्त्रज्ञ हा रशिया व अमेरिका यांच्यातला समान दुवा होता. हे शास्त्रज्ञ त्यांनी अक्षरशः वाटून घेतले होते. असं म्हणतात की, रशियानं युरी गागारिनला अंतराळयानात जेव्हा पाठवलं तेव्हा, म्हणजे माणसानं यानात बसून अंतराळात जाण्याचा तो पृथ्वीवरचा पहिलाच प्रसंग होता आणि ती फार अद्भुत गोष्ट होती तर त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या सल्लागारांना विचारलं की, हे झालं कसं? अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात रशियन आपल्या इतके पुढे कसे गेले? आपण इतके मागे कसे राहिलो? तेव्हा सल्लागार राष्ट्राध्यक्षांना म्हणाला, त्यांच्याकडं असणारे जर्मन शास्त्रज्ञ आपल्याकडच्या जर्मन शास्त्रज्ञांपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत. त्यामुळं हे घडलंय.

आता हा गमतीनं मांडला जाणारा संवाद प्रत्यक्षात घडला नसेलही. पण मुद्दा असा की, या प्रकारचं बुद्धिमान मनुष्यबळही या महासत्तांना दुसऱ्या महायुद्धाअखेरीस भरपूर मिळालं. 1991 नंतर सोविएत सत्ता कोलमडल्यावर रशियन शास्त्रज्ञांचीही अशीच वाताहत झाली आहे. त्यांतील कैक दिशा फुटेल तिकडे गेलेले आहेत. त्याचे परिणामही येणाऱ्या काळात घडणार आहेत. पण हा नंतरचा मुद्दा.

पृथ्वीवर अशा दोन महासत्ता उभ्या झाल्यावर त्याचे दूरगामी परिणाम झाले, दुनियेच्या सर्व भूभागांवर, तिथल्या साधनसंपत्तीवर आपलं नियंत्रण राहावं यासाठी या महासत्तांचे प्रयत्न सुरू झाले. पूर्व युरोप रशियाच्या आधिपत्याखाली तर पश्चिम युरोप अमेरिकेच्या कच्छपी, असं चित्र उभं राहिलं.

सलग मोठाले भूप्रदेश असलेले देश टिकू न देणं; भूराजनैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूभागांवर नियंत्रण ठेवणं; लष्करीदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं ताब्यात ठेवणं; शहाला प्रतिशह देणं; ऊर्जेची विपुलता असलेल्या भूभागांवर ताबा मिळवणं; शेजारी देशांना एकमेकांशी झुंजत ठेवणं अशा चाली दोन्ही महासत्ता खेळत राहिल्या. अरब देशांच्या समूहात याच भूमिकेतून वा दृष्टीतून ब्रिटन-अमेरिकेनं इस्रायल देश उभा केला. इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, व्हेनेझुएला, नायजेरिया, सुदान अशा कितीतरी ठिकाणी ऊर्जास्रोतांवर ताबा ठेवण्यासाठी हालचाली, शहप्रतिशह असं शीतयुद्धाचं वातावरण कायम राहिलं. इकडे कोरिया, व्हिएतनाम, किंवा ऑस्ट्रेलियाजवळचा इंडोनेशियाचा भाग अशी सारीकडं कधी ना कधी कायम युद्ध. लॅटिन अमेरिकेत युद्ध व यादवी, अमेरिकन बनाना कंपन्यांचा अमर्याद विस्तार, चिलीच्या साल्वादोर आयंदेचा धडधडीत खून, अशा घटना सतत होत राहिल्या. विस्ताराची अमानवी भूक फक्त भांडवलशहांच्या ठायी होती असं नाही. सोविएत महासत्ताही या खेळात शहाला प्रतिशह देण्यात कुठंही ढिलाई दाखवत नव्हती. साठीच्या दशकात क्युबाच्या निमित्ताने आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर जग आलं होतं.

या सगळ्याला पहिल्या औद्योगिक क्रांतीची आणि दोन महायुद्ध होऊन गेल्यानंतरची पार्श्वभूमी होती. याकाळात विज्ञानात शोध लागणं व त्याचं तंत्रज्ञानात रूपांतर होणं यांच्यामधला वेळ भरपूर होता. कधीकधी त्यासाठी तीसचाळीस वर्षेसुद्धा जात. निर्माण होणाऱ्या वस्तूंमध्ये टिकाऊपणा हे महत्त्वाचं मूल्य होतं. जुनी फावरलुबा कंपनीची घड्याळं तीसचाळीस वर्षे विनातक्रार चालत. वस्तू दणकट व मोठ्या असत. कंपन्या सामान्यतः राष्ट्रीय मर्यादा असलेल्या होत्या. त्यांच्या मालाचा विस्तार त्या त्या देशांच्या अंकित वसाहतीत फार तर होता. वसाहती नाहीशा होऊ लागल्या. तिसऱ्या जगाचा उदय झाला. तरीही परिस्थिती एकूण आटोक्यात होती.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मॅक्स प्लँक या तरुण जर्मन शास्त्रज्ञानं ‘क्वांटम हायपोथिसिस’ मांडलं. त्याआधीच्या विज्ञानात स्थल स्वरूपातल्या वस्तुंमधल्या क्रियाप्रतिक्रिया, त्यांचं गतिशास्त्र हे न्यूटन, लॅग्रांजे, केप्लर प्रभृतींच्या नियमांनी समजावून घेता येत असे. पण पदार्थाचा जो अतिसूक्ष्म भाग, म्हणजे अणू; त्यालाही स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यातही अनेक सूक्ष्म कण असतात; त्यांतील बरेच अल्पकाळ टिकणारे असतात आणि अशा सूक्ष्म पुंजांच्या अनेक गुणांच्या देवाणघेवाणीत अणूच्या आत बरंच काही घडत असतं. फ्लॅंकचा सिद्धांत या सूक्ष्म दुनियेतल्या व्यवहारांच्या गतिशास्त्रासंबंधी होता. या एका सिद्धांतामुळं विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काही दशकात नैसर्गिक विज्ञानात क्रांतिकारी बदल झाले. रुदरफोर्ड, आइन्स्टाईन, एस.एन.बोस, रामन्, हायजेनबर्ग, बोहूर, सॉमरफील्ड, थॉमसन, मॅक्स बॉर्न, एन्रिको फर्मी, हाइटलर, लंडन, फॅरडे अशा कितीतरी शास्त्रज्ञांनी प्लँकचा सिद्धांत अनेक दिशांनी विकसित करीत नेला. विसाव्या शतकात नैसर्गिक विज्ञानात जे जे काही घडलं त्यावर प्लँकच्या सिद्धांताची छाया आहे.

तरीही या वैज्ञानिक कामाचं तंत्रज्ञानात रूपांतर होण्याचा वेग नेहमीच कमी राहिला. दसऱ्या महायुद्धानंतर विज्ञानातील शोध आणि त्याचं तंत्रज्ञानात रूपांतर होणं यांतील काळाचं अंतर कमी व्हायला सुरुवात झाली आणि साधारणतः सत्तरीच्या दशकात हे काळाचं अंतर जाणवण्याइतपत कमी व्हायला सुरुवात झाली. ती खऱ्या अर्थानं आज दिसणाऱ्या जागतिकीकरणाची दृश्य सुरुवात म्हणता येईल. हे सारं आपल्याकडं पोहोचायला नव्वदीचं दशक उजाडलं आणि आपल्याकडं त्यासंबंधी चर्चा सुरू झाल्या.

सत्तरीच्या दशकात जगभर कमीजास्त प्रमाणात बदलांना सुरुवात झाली. ती जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांत झाली. मुख्य म्हणजे जगण्यासंबंधीच्या विविध सुप्रतिष्ठित धारणांवर घाला घालण्याची प्रक्रिया त्यांतून सुरू झाली. भौतिक व्यवहार बदलले. मानवी संबंधांचं स्वरूप बदलायला सुरुवात झाली. वस्तूंची, ऊर्जास्त्रोतांची अमाप नासाडी सरू झाली. उत्पादन अवाढव्य प्रमाणात करायचं आणि त्याला तितकी मागणी कायम राहील, अशी परिस्थिती निर्माण करायची ही व्यापारी गरज निर्माण झाली. नफेखोरी हे जगण्यातलं प्रधान मूल्य म्हणून प्रतिष्ठित व्हायला सुरुवात झाली. टिकाऊपणा ही संकल्पना अडगळीला जाऊ लागली. रेडिओत पूर्वी जर्मन बनावटीचे व्हॉल्व्हज् असत. रेडिओचा आकार मोठा आणि दणकट, आवाजाची गुणवत्ता उत्तम, घेतला की पिढीभर प्रश्न नसायचा. अगदीच एखादा व्हॉल्व्ह गेला तर तेवढा बदला. प्रश्न संपला. सत्तरीच्या दशकानंतर त्या प्रकारच्या व्हॉल्व्हज्ची जागा ट्रान्झिस्टर्सनी घेतली. मी म्हणतो त्या सूक्ष्म विज्ञानाचं तंत्रज्ञानात रूपांतर होण्याचं हे एक उदाहरण, सेमी कंडक्टर्स इंटिग्रेटेड सर्किट्स अशा गोष्टी आल्यानं या उद्योगात क्रांती झाली आणि हे फक्त एक उदाहरण. पृथ्वीच्या कक्षेबाहेर उपग्रह पाठवण्याचं तंत्रज्ञान विकसित करत असताना त्याला पूरक अशी अनेक तंत्रज्ञान विकसित करावी लागली आणि त्यांतल्या अनेकांचा पृथ्वीवरल्या जीवनावश्यक व चैनीच्या गोष्टींच्या निर्मितीवर प्रभाव पडू लागला. मूलभूत गरजा व चैनीच्या गरजा यांच्यातली रेषा धुसर होत जाणे ही नंतरची पायरीही फार वेगानं पार होऊ लागली.

या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीचं असाधारण प्रमाण व त्याची आवश्यकता. वस्तूंचं बारक्या प्रमाणावर उत्पादन न करता येण्यासारखी वस्तूंमधूनच निर्माण झालेली, उद्भवलेली वस्तुस्थिती आणि प्रचंड प्रमाणावर उत्पादन केलं की अगदी कचऱ्याच्या भावात म्हणता येईल या दरानं वस्तूंची होऊ शकणारी निर्मिती. यातून एक नवीच अद्भुत परिस्थिती निर्माण झाली. तिथे अनेकांगी परिणाम झाले. सध्याच्या जागतिकीकरणाचा पायाच घातला गेला.

प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं तर त्यासाठी भांडवली गुंतवणूकही मोठीच लागणार. कोणत्याही एका व्यक्तीला सहसा ती करणं जमण्याजोगं नसे. त्यातून भागभांडवल उभारणे म्हणजे अनेकांनी अशा कंपनीचे शेअर्स विकत घेणे ही बाब आली. त्यातून शेअरबाजार अन् सटोडियाचं जग. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं की खपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गिर्‍हाईक मिळवणं; तयार करणं ही गरज निर्माण झाली. यात गिर्‍हाईक नुसतं मिळवणं अपुरं पडू लागलं. कारण वस्तू एकदा घेतली की त्याची गरज संपणार. इकडं निर्मिती तर अवाढव्य वेगानं चालू. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर गिर्‍हाईक तयार करणं आणि त्याच्या मनामानसातलं टिकाऊपण हे मूल्य घालवून नावीन्याचा हव्यास हे मूल्य पेरणं. वस्तू काही काळ वापरा अन् फेका. थ्रो अवे! नवीन वस्तू पहिलीपेक्षा वेगळी असेल. सुधारित(!) असल्याची हमी निर्माते देतील. उत्तम वेळ दाखवणारी इलेक्ट्रॉनिक घड्याळं किलोच्या हिशेबानं वजनावर मिळतात. शहरातल्या मध्यमवर्गीयांच्या घरातला कचरा वाहून नेणाऱ्या गरिबांना त्याचे जितके पैसे, समजा महिन्याकाठी मिळतात, त्यात किलोभर घड्याळं सहज उपलब्ध आणि हे एक उदाहरणच फक्त. निर्मितीच्या सगळ्या क्षेत्रांत निर्मितीचा असा महापूर येतो. कोणतीही निर्मिती करताना ऊर्जा लागतेच, ती जितकी वापराल त्यापेक्षा जास्त वाया जाते. कसं ते नंतर सांगतो. तूर्तास ऊर्जेची नासाडी वाढते, एवढाच निर्देश करतो. बाकी पारंपरिक उत्पादनं; लोखंड, कोळसा, त्यांच्यावर आधारित उद्योग अशा सार्‍यांचं बृहद् आकारांच्या कंपन्यांत रूपांतर झालं. तिथंही शेअरबाजार आणि सटोडिया, त्यातही गिर्‍हाईकं निर्माण करणं. उदाहरणार्थ, शस्त्रास्त्रांचे कारखाने चालायचे असतील तर युद्धं झाली पाहिजेत. ती होत नसतील तर घडण्यासारखी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. प्रत्येक शस्त्राला तोड म्हणून आणखी मोठ्या ताकदीची शस्त्रं तयार करायची आणि हे सारं अव्याहतपणे चालू.

आणि हे फक्त अशा वस्तूंबाबत नाही. शेती हा मूलभूत उद्योग. शेतीउत्पादने, खते, दुग्धव्यवसाय अशा सार्‍यांवर या बृहद् कंपन्या वा तत्सम बड्यांचा सार्‍या दुनियेवर ताबा. गरीब देशांनी फक्त गिर्‍हाईक असावं. त्यांच्याकडच्या ऊर्जास्रोतावर बड्यांचा ताबा. मग अगदी कशातूनही; पाण्यातूनही अमाप पैसा. बाटलीबंद पाणी प्या. आरोग्याला हितकारक. अमुक कंपनीचं जास्त चांगलं.

प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या अमेरिकन कंपनी पुरवील, त्यांची विल्हेवाट गरीब देशांनी स्वतःच्या भूमीत लावावी. कंपन्या तुम्हाला प्रत्येकवेळी ताजी, नवी बाटली देणार. प्लॅस्टिकचं तुम्हांला काय करायचं ते करा. परवाच मी कोणत्यातरी नव्या पाण्याच्या कंपनीची जाहिरात पाहिली, त्यांची एक लिटरची बाटली 75 रुपयांना आहे. सर्वोत्तम! अर्थातच त्यांना गिर्‍हाईक मिळणार. अशा बाटल्यांमधून पाणी पिणं हा स्टेटस सिम्बॉलचा भाग. त्याला प्रमाण मानणारा उच्च मध्यमवर्ग, उच्च वर्ग जगभर तयार आहे. तशी मानसिकता पेरली गेलीय.

(क्रमशः)

(श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे दिलेले व्याख्यान)

या व्याख्यानाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: एन्रिको फर्मी मॅक्स बॉर्न थॉमसन सॉमरफील्ड बोहूर हायजेनबर्ग रामन् एस.एन.बोस आइन्स्टाईन रुदरफोर्ड ऑस्ट्रेलिया नायजेरिया कुवेत सौदी अरेबिया दुसरे महायुद्ध पहिले महायुद्ध डच जर्मनी हॉलंड फ्रान्स पोर्तुगीज इंग्रज वेस्टइंडिज मॉरिशस महाभारत रामायण कंबोडिया मलेशिया थायलंड राजर्षी शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर इंडोनेशिया आशिया युरोप ब्रिटन इस्राइल इराण इराक सोव्हिएत रशिया अमेरिका शस्त्रज्ञ जागतिकीकरण Max Born Thomson Sommer Field Heisenberg Raman S. N. Bose Einstein Rudin Fort Australia Neisseria Covet Saudi Arabia Second World War First World War Dutch German Holland France Portugal English West Indies Mauritius Mahabharata Ramayana Cambodia Malesia Thailand Rajarshi Shahu Chhatrapati Maharaja Kolhapur Indonesia Asia Europe Britain Israel Iran Iraq Soviet Russia America Scientist #Globalization weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके