डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नानासाहेब आणि एस. एम. यांचे श्री. गोपीनाथ तळवलकर बालपणापासूनचे मित्र व सहाध्यायी. नानासाहेबांबद्दलच्या किती तरी हृद्य आठवणी अजूनही त्यांच्या मनात दाटून येतात...
 

आम्ही चौथी पाचवीत होतो. नव्या वर्षाचे वर्ग सुरू झाले तेव्हा एक गौरवर्ण, हुशार चेहऱ्याचा मुलगा आमच्या वर्गात आला. माझा प्रियतम मित्र एसेम मला म्हणाला, 'अरे हा गोरे. सरकारी हायस्कूल बंद झाले तेव्हा काही मंडळी नूतन मराठी विद्यालयात गेली आणि हा आपल्या शाळेत आला.' ते बहुधा 1921 साल असावे. त्यानंतर आमची मैत्री जमली व अखेरपर्यंत कायम टिकली.

दक्षिणमुखी मारुतीसमोर गोरेचे घर होते. तिथेच लघाट्यांचा वाडा होता. मधल्या सुटीतल्या चहाफराळाची व्यवस्था वडिलांनी माझ्या बहिणीकडे म्हणजे गोदूताई लघाटे हिच्याकडे केली होती. त्यामुळे मधली सुटी झाली की नाना वाड्यांतून मी आणि गोरे जोडीने यायचे आणि तसेच परत जायचे- एकदा मात्र माझी वाट पाहून गोरे निघून गेला. मला उशीर झाला. या उशीराचे प्रायश्चित्त मला मिळाले. उपमुख्याध्यापक प्रा. माधवराव पटवर्धन (गुरु. माधव ज्युलियन) छडी घेऊन उभे होते. त्यांनी उशीर झाल्याबद्दल सपसपा दोन छड्या मला मारल्या!

काही वर्षापूर्वी नानावाड्यांत कसलीशी एक सभा होती. अध्यक्षस्थानी गोरे होता. मला त्याने बरोबर नेले. सभेचे काम आटोपल्यावर तो मला म्हणाला, 'चल, आपण आपले वर्ग पाहून घेऊ.' मग आम्ही मॅट्रिकपर्यंतचे सर्व वर्ग पाहिले, मनाने आम्ही विद्यार्थिदशेत गेलो. गोरे सांगत होता. 'इथे आपण असा दंगा केला... इथे आपण या शिक्षकांना छेडले.' माझ्याही काही आठवणी मी सांगितल्या.

गोरेच्या बळकट शरीरयष्टीवरून त्याने तांबड्या मातीत कुस्ती केली असेल असे पुष्कळांना वाटे. पण तसे काही नव्हते. खो खो मात्र तो फार उत्तम खेळत असे. तो खो खोमध्ये हुलकावण्या देऊ लागला की प्रतिपक्षी जेरीस येत. 'अरे, गोरे खेळतोय्', म्हणून अनेक गट तो प्रेक्षणीय खेळ पाहण्यास गर्दी करीत. प्रेक्षक तुडुंब असत. सध्या गावसकर ते तेंडुलकर इत्यादी क्रिकेटपटूंना जसा प्रतिसाद मिळतो तसा त्यावेळी गोरेला मिळत असे. तो घोड्यावरही उत्तम बसायचा. पोहोण्यातले त्याचे कौशल्यही वाखाणण्यासारखे होते. मी या सर्वच बाबतीत अनभिज्ञ आणि दुबळा. माझी पत्नी गेली तेव्हा समाचाराला आलेला शिरू लिमये म्हणाला, 'अरे, हा इतका अशक्त अन् सुकडा, की हा कधी जाईल अशी भीती आम्हाला वाटे. पण हा न जाता याव गेल्या.' तशा त्या दुःखद अवस्थेत या विनोदाने मला हसू आले. माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला गोरे म्हणजे 'हीरो' वाटावा हे साहजिक होते.

गोरेच्या जीवनाला संयमाचे एक वलय होते. जिन्नस चांगला झाला म्हणून त्यावर ताव मारायचा असे त्याने कधीच केले नाही. राजकारणी मनुष्य हा रूक्ष असतो असा समज आहे. पण गोऱ्याच्या बाबतीत ते खोटे होते. त्याला संगीताची जाण चांगली होती. तो उत्तम फिडल वाजवीत असे. नखचित्रे उत्तम रेखाटत असे.

साहित्याच्या बाबतीतले त्याचे योगदान तर प्रसिद्धच आहे. त्याच्या भाषाशैली वर काहीशी माट्यांची छाप होती. माट्यांचे 'पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ' हे पुस्तक त्याला फार आवडत असे. एकदा मला त्याने ज्युलियस सीझर वरील माट्यांचे पुस्तक मोठ्या ढंगदार पद्धतीने वाचून दाखविले. 'कारागृहाच्या भिंती', 'सीतेचे पोहे' या त्याच्या पुस्तकांबद्दल काही वेगळे सांगायलाच नको. मी आकाशवाणीवर असताना आमच्या 'बालोद्याना'त त्याचे 'बेडूकवाडी' हे लहान मुलांसाठी असलेले नाट्य ध्वनिमुद्रित केले. अर्थात याचे सर्व श्रेय सई परांजपे, 'हरबा' यांना. याला संगीत राम कदम यांनी दिले होते. त्यात वासुदेव पाळंदे यांनी 'आबा'ची भूमिका केली. मी गोऱ्याला या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ऐकविले. तो फार खूष झाला.

माझ्या नावावरून आणि स्त्रीपूजक वृत्तीवरून माझे मित्र एसेम-गोरे माझी फार चेष्टा करीत. एकदा मधु दंडवते यांना माझी ओळख करून देताना एसेम म्हणाला, 'हे मुलींचे नाना बरं का, मधू.' बाळने माझा सहस्रचंद्रदर्शनाचा सोहळा केला. एसेम-गोरे यांना त्याने निमंत्रण केले. दोघांनाही काही कार्यक्रमाला जायचे असल्याने ते येऊ शकणार नव्हते. आदले दिवशी गोरे आला आणि म्हणाला, 'गोपू, उद्या काही मी येऊ शकणार नाही. तुझ्या गवळणी येणार असतील!' आम्ही खूप हसलो.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांना गोरेने चहासाठी बोलावले होते. मलाही मुद्दाम बोलावले होते- त्यावेळी जयप्रकाशांना माझी ओळख करून देताना जो सह्रदयपणा गोरेने दाखविला तो मी कधीही विसरणार नाही. गोरेने केलेले ते वर्णन ऐकून त्या शांत, दांत महापुरुषाने मजकडे एक कृपाकटाक्ष टाकला. पुढे जयप्रकाश डॉ. दिनशा मेहतांच्या हेल्थहोममध्ये विश्रांतीसाठी आले, तेव्हाही तो मला घेऊन गेला होता. एकदा त्याचे बोलावणे आले. मी गेलो तो समोर सुंदर पोषाख केलेला आकर्षक मनुष्य बसला होता. गोरेने सांगितले 'हे कोयराला. नेपाळचे मोठे पुढारी' आहेत. मला वाटते आजच्या प्रख्यात अभिनेत्रीचे मनीषा कोयरालाचे ते जवळचे नातेवाईक. ते निरोप घेऊन गेल्यावर गोरे हसून म्हणाला, 'गोपू. तू सौंदर्यवादी ना? हे थोडेफार पंडित नेहरुंसारखे दिसतात म्हणून तुला मुद्दाम बोलावले.'

गोरे वरून कठोर, हिशेबी दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणात भावनांचा झरा वाहता होता, त्याला उच्च मूल्यांबद्दल ओढ होती हे खास. तो एकदा मला म्हणाला, 'तुम्ही कऱ्हाडे म्हणजे ब्राह्मणांतील कायस्थ आहात.' मी हसून म्हटले 'म्हणून तू कऱ्हाडे पत्नी केलीस वाटतं.' यातला विनोद सोडून दिल तर त्या काळी पोटजातीतल्या एक गतभर्तुकेशी विवाह करणे हे साहसच होते. हे प्रेमच करू जाणे- आपली एकुलती एक मुलगी शुभा ही नृत्य शिकून आली की तिचे पाय रगडताना त्याला पाहिले आहे. पण प्रेमातही त्याने कधी आपला संयम सोडला नाही.

येरवडा तुरुंगात गोरेला पोत्यात घालून मारहाण झाली. पण त्याचे भांडवल त्याने केले नाही. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधनही एसेम-गोरे यांनी घेतले नाही. हे साभिमान नमूद करावेसे वाटते. आपल्या पक्षाचे सरकार नाहीसे झाल्यावर गोरेने आपल्या लंडनमधील राजदूतपदाचाही राजीनामा दिला. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना गोरेने राज्यपाल व्हावे असा आग्रह ते करीत होते पण तो गोरेने नाकारला.

त्याची शेवटची भेट मी जोशी हॉस्पिटलमध्ये असताना झाली. बाळ मला घेऊन जायला आला होता. माझ्या ऋणानुबंधी लतिका फडणीस याही तिथे होत्या. गोरे मला म्हणाला, 'गोपीनाथ, तू माझ्याकडे येऊन 8-15 दिवस रहा. संकोच करू नकोस.' अर्थात आपला बालमित्र आल्याने मला बरे वाटले. तो गेल्यावर तिथे असलेला एक पत्रकार म्हणाला, 'नानासाहेबांचे तुमच्यावर फार प्रेम दिसते!' मी म्हटले, 'अहो, मी गावात असताना 8-10 दिवसांनी तो येऊन जायचा. कधी त्याच्या घरी जेवणाची वेळ आली तर मला आवडणारी पुरणपोळी त्याची मानसकन्या राधाबाई अगदी तलम करून घालायची...'

काही माणसांचे जीवन हे जवळ जवळ आपलेच आत्मचरित्र असते. त्यांतून 60-65 वर्षे बरोबर काढलेली- नानासाहेब गोरे म्हटले म्हणजे एक व्यासंगी, कर्तबगार, बुद्धिनिष्ठ, कठोर ‘आचार्या'ची मूर्ति डोळ्यांपुढे उभी राहते. एसेम आणि गोरे या दोन बालमित्रांचे वर्णन मी असे करीन. एसेमला बुद्धी खूप होती, पण भावनेकडे कल जास्त. गोरेला भावना खूप होती, पण बुद्धीकडे ओढा अधिक, एसेमचे ज्ञानही सौम्य होते; आणि गोरेची करुणाही उग्र होती. या 'माउली' 'आचार्यां'त निवड कशी करावी.?

गोरेच्या प्रथम पुण्यतिथीला या बालमित्राचे त्याच्या स्मृतीला नम्र अभिवादन.

Tags: जयप्रकाश नारायण. सई परांजपे ज्यूलियस सीझर प्रा.माधवराव पटवर्धन गोपीनाथ तळवलकर Jaiprakash Narayan Sai Paranjape Julius Caesar Prof. Madhavrao Patwardhan #Gopinath Talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके