‘आनंद’ या मुलांच्या मासिकाचे संपादक गोपीनाथ तळवलकर यांनी मन्वंतर नियतकालिकाच्या जानेवारी १९४७ च्या अंकात साने गुरुजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख आहे. गुरुजींनी आपली पुतणी ‘सुधा’ला लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. त्या सुधाताई साने-बोडा आता वयाच्या ८५ व्या वर्षीही गुरुजींचे विचार व कार्य यांनी तेवढ्याच भारावलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्यांच्या संग्रहातील हा दुर्मिळ लेख त्यांनी साधनाकडे पाठवला आहे. गुरुजींच्याविषयी आत्तापर्यंत खूप काही लिहिले गेले असले, तरी अद्यापही नवीन काहीतरी गवसतेच. या पार्श्वभूमीवर, ७० वर्षांपूर्वीचा तो लेख, गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या (११ जून) पार्श्वभूमीवर पुनर्मुद्रित करीत आहोत. -संपादक , साधना
संत आणि साहित्यिक या दोन भूमिका एकत्र आल्याची उज्ज्वल उदाहरणे महाराष्ट्रांत प्राचीन काळापासून दिसतात. त्यापरंपरेचे आपण श्रेष्ठ वारसदार आहांत. आपणांस अगणित प्रणाम असोत.
अंतरी निर्मळ । वाचेचा रसाळ...
माझे एक रसिक कविमित्र खानदेशांत गेले होते. तेथला एक प्रसंग त्यांनी मला सांगितला. ते म्हणाले, ‘‘गावाच्या बाहेर मी सहल करीत असता एक ठेंगणा, अबोल, साध्या पोशाखाचा मनुष्य कुठे तरी चालला होता. समोरून येणाऱ्या कामकरी स्त्रिया त्याला पाहताच सद्गदित झाल्या. लांबून त्याच्यावरून हात ओवाळून त्यांनी कानशिलांवर बोटे मोडली आणि त्याला आयुरारोग्य चिंतिले. ’’ हा गृहस्थ दुसरा तिसरा कोणी नसून आपले पूज्य साने गुरुजी होत !
एकदा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बाबू राजेंद्रप्रसाद खानदेशात दौऱ्याला आले होते. किसानांची जंगी सभा राष्ट्रपतींच्या स्वागतासाठीं भरली होती. गुरुजी सभेचे नियंत्रक होते. सभा संपल्यानंतर गुरुजींनी किसानांना सांगितले, ‘‘बाबूजींना दम्याचा विकार आहे. तुम्ही उठून गर्दी करू लागला तर धूळ उडेल. आणि ती त्यांच्या घशांत जाऊन त्यांचा विकार बळावेल. तेव्हा बाबूजी येथून गेल्यावर तुम्ही उठा. तोवर आपापल्या जागी स्वस्थ बसा. ’’ बाबूजी सभास्थान सोडून जाईपर्यंत एकही किसान उठला नाही ! ‘‘एका माणसाचा शब्द किसान इतक्या शिस्तीने पाळतात ही गोष्टी मोठी अपूर्व आहे.’’ असे उद्गार राजेंद्र प्रसाद यांनी काढले म्हणतात.
मित्र भाई नारायणराव गोरे यांनी नाशिक जेलमधील एक गोष्ट सांगितली. नारायणरावांबरोबर गुरुजीही होते. गावांतील काहीं मुलांना वार्ता लागली की, गुरुजी या जेलमेध्ये आहेत. ती मुले तेथे आली आणि गुरुजींचे दर्शन घेतल्याशिवाय आपण हालणार नाही अशा निर्धाराने ठाण मांडून बसली! अखेर जेलच्या अधिकाऱ्यांना त्यांचा बालहट्ट पुरवावा लागला! याच वेळी दोन लहान मुले मुंबईहून कुणाचीही सोबत न घेता नाशिकला गुरुजींच्या दर्शनासाठी आली होती. या आणि अशा बालकांच्या स्वप्नांमध्ये गुरुजी येतात, असे त्यांचे पालक सांगत.
मुलांसारखा निर्व्याज बहुजनसमाज आणि फुलांसारखी गोजिरवाणी मुले यांना वेड लावणारी कोणती जादू सानेगुरुजींत आहे ? धान्य काढून घेतलेल्या चिपाडाप्रमाणे ते निर्धन आहेत, डोळे दिपविण्यासारखे शरीरसौष्ठव त्यांचे नाही आणि अंगी विद्वत्ता भरपूर असली तरी तिचा वापर ते करीत नाहीत. पण त्यांच्याजवळ प्रेममय अंतःकरण आहे आणि याच बळावर लक्षावधी भाविक मने त्यांनी जिंकली आहेत. गुरुजींच्या सहवासांत आल्यानंतर मला शिवनेरीवरील एका विशाल जलाशयाचा भास होतो. स्वच्छ व निरामय पाणी. निर्मळ तर इतके की, त्यांत चवली टाकली आणि ती दोन-तीन पुरुष खोल तळाला गेली तरी स्पष्ट दिसते. गुरुजींचे मन असेच आहे. खोल आणि निर्मळ; आणि भोवती अभेद्य खडकाप्रमाणे वीरवृत्तीचे वेष्टनही आहे.
गुरुजींच्या व्यक्तित्वात तीन प्रभावशाली प्रवाहाचे संमीलन झाले आहे. या दृश्य जगाच्या पलीकडले सनातन अस्तित्व शोधावे, जीवात्म्याची परमात्म्याशी एकतानता करावी, ‘उगमीं विलयी अनंत उरलों,’ असे व्हावे अशी विलक्षण ओढ त्यांना आहे. आणि म्हणूनच ‘भारतीय संस्कृती’तल्या अमृततत्वावर त्यांची एवढी गाढ श्रद्धा आहे. गुरुजींच्या जीवनात दुसरा प्रवाह प्रतिभासाधकाचा आहे. जगांतील सौंदर्य न्याहाळावे व सामर्थ्याचा प्रत्यय घ्यावा, ‘‘नदी सागराला मिळते’’ त्याप्रमाणे विश्वात्मक सौंदर्यांत आपण कल्पनानौकेने जाऊन विहारावे असेही त्यांना वाटते. गुरुजींना तिसरी जाणीव तीव्रतेने होते ती अशी की, प्रत्यक्ष कृतीखेरीज जीवनाला पूर्णता नाही. ‘‘येथून तेथून सारा पेटू दे देश’’ अशी गर्जना ते करतात आणि या पेटलेल्या देशातूनच स्वातंत्र्याची सुवर्ण मर्ती शुद्धतर होऊन बाहेर पडेल, असा त्यांना विश्वास वाटतो. रामकृष्ण, रवींद्र व गांधीजी या तीन दिव्य पुरुषांच्या अवतारकार्याशी समरस होण्याचा आपण प्रयत्न केला असे त्यांनी एकदा म्हटले होते. गुरुजींच्या अंगाच्या तीन प्रवृत्ति या तीन महानुभावांत पूर्ण विकसित झालेल्या आपणास दिसतील.
साने गुरुजी मनाने हळवे आहेत असे आपण ऐकतो. काचेच्या तावदानावर हिमबिंदू पडलेले पाहून कीटस्ला रडें कोसळे असे सांगतात. गुरुजींचे मन असेच पराकाष्ठेचे कोमल आहे. पण स्वातंत्र्यसंग्रमाच्या झंझावातांत ते वज्राहून कठोर बनते. गुरुजी विद्वान आहेत, पण विद्वजाड नाहीत. प्रत्यक्ष संघटनेचे तंत्र पेलण्याची त्यांनी फिकीर केलेली नसली तरी संघटनेत चैतन्य ओतण्याची स्फूर्ती त्यांचेजवळ भरपूर आहे. ‘‘स्वप्न हेंच सत्य आहे’’ असे गुरुजी एकदा म्हणाले होते, ही गोष्ट खरी आहे; आणि अशा स्वप्नांत तल्लीन होऊन राहणे याचमुळें गुरुजींचे जीवन सुंदर बनले आहे. शास्त्र, तंत्र, तर्क यांच्या कसोटीला गुरुजींचे जीवन लाविता येणार नाहीं.
‘‘अत्यंत भक्तियुक्तानां नैव शास्त्रं न च क्रमः’’
अशा या प्रेममय मूर्तीचा जन्मदिवस भगवान् ख्रिस्ताच्या जयंत्युत्सवाचे आरंभी म्हणजे २४ डिसेंबरला येतो, हा एक आनंददायक व मंगल योगायोग आहे. गुरुजींनी ४६ वर्षांचा पल्ला गाठला आहे. या आयुष्यांत त्यांची विविध दर्शने आपणाला घडतात. कष्टपूर्ण दशेत विद्याभ्यास करणारे विद्यार्थी, अमळनेरच्या छात्रांना शिकविणारे आवडते शिक्षक, कारागृहात कैद्यांना संवादामृत देणारे गुरुजी, बेचाळीसच्या क्रांतियुद्धाचे कर्णधार, गावोगाव पर्यटन करून मायबहिणींकडून स्त्रीगीते उतरवून घेणारे रसज्ञ संशोधक आणि कवी, कथाकार, वक्ते इत्यादी अनेक रुपांत गुरुजींचे आपणास दर्शन घडते. आज ज्या कुमारांकरिता त्यांनी इतके हृद्य व विपुल वाङ्मय रचिले त्या कुमारांच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होत आहेत. कुमार साहित्य चळवळीला हा महालाभच होय.
पूजनीय गुरुजी! परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो. चित्तशुद्धी हे सर्व धर्मांचे आद्य सूत्र आहे आणि आपण आपल्या वाणीने व लेखणीने याच सूत्राचा प्रभाव पुनश्च एकदा विशद करून जगाला सांगितला आहे. संत आणि साहित्यिक या दोन भूमिका एकत्र आल्याची उज्ज्वल उदाहरणे महाराष्ट्रांत प्राचीन काळापासून दिसतात. त्या परंपरेचे आपण श्रेष्ठ वारसदार आहात. आपणास अगणित प्रणाम असोत.
Tags: साने गुरुजी संपादकीय गोपीनाथ तळवलकर gopinath talwalkar Sahityik Saint Pujya Sane Guruji Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या