डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पार्श्वभूमी : नक्षलवादी चळवळीची

इ.स. 1967 पासून भारताच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात नक्षलवाद हा शब्द प्रचलित झाला. अल्प काळातच नक्षलवादी आंदोलन भारतात अनेक प्रदेशात पसरले. माओवादी साम्यवाद्यांचा हा जहाल क्रांतिकारक गट अखिल भारतीय स्वरूपाचा नसला तरी त्याचे अस्तित्व, हालचाली, कारवाया, त्याचे एक राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर हे आंदोलन नगण्य तर नाहीच, पण राजकीय नि राष्ट्रीय क्षेत्रात एक नवे आव्हान म्हणून त्या लढ्याला निश्चितच महत्त्व प्राप्त झाले.

माओवादी क्रांतिकारकांच्या लढ्याची सुरुवात पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील ‘नक्षलबाडी’ या ग्रामीण भागात झाल्यामुळे एकूणच लढ्याला ‘नक्षलवादी आंदोलन’ असे नामाभिधान प्राप्त झाले. तेथून ही चळवळ भारताच्या अन्य प्रदेशात पसरली. भारतासारख्या विशाल देशाच्या एका कोपऱ्यात एका ग्रामीण भागात,  वरवर पाहता अनपेक्षित आणि राष्ट्रीय प्रवाहापासून अलिप्त असे हे ‘माओवाद्यांच्या नेतृत्वाखालील किसान आंदोलन’ जसे प्रक्षोभक होते,  तसेच भारतीय कम्युनिस्टांची व एकूणच लोकशाही मार्गाचे अनुसरण करणाऱ्या व मधूनमधून गरिबांच्या आर्थिक प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या पक्षांचीही झोप उडविणारे ठरले.

000

1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षात मोठी फूट पडली. त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (सी.पी.आय.एम.) असे दोन गट उदयाला आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मवाळ धोरण पक्षातीलच एका मोठ्या गटाला मान्य नव्हते. आंध्र प्रदेशामधील पक्ष अधिवेशनात त्याचा पुढे स्फोट झाला. पक्षनेतृत्वाने जहाल गटाचे म्हणणे फेटाळले. त्याचा परिणाम ज्योती बसू, रणदिवे वगैरेंनी पक्ष सोडला आणि ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष’ या नावाचा अधिक कडवा पक्ष काढला. या नव्या पक्षाने 1967 च्या निवडणुकीत भाग घेतला तेव्हा ‘‘क्रांतीचा मार्ग टाकून संसदीय मार्ग स्वीकारलात काय?” असा प्रश्न या पक्षातील तरुण विचारू लागले. ‘बांगला काँग्रेस’ या काँग्रेसमधील फुटीर गटाशी हातमिळवणी करून हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सत्तेवरदेखील आला. तेव्हा ‘‘आता कुठे गेली तुमची क्रांतीवरील निष्ठा?” असा रास्त प्रश्न विचारत चारू मुजुमदार, कानू संन्याल,  विनोद मिश्रा, महादेव मुखर्जी वगैरेंनी पक्ष सोडला आणि नव्या माओवादी (लेनिनवादी) पक्षाची घोषणा केली. या पक्षातून निर्माण झालेली चळवळ पुढे ‘नक्षल चळवळ’ म्हणून नावारूपाला आली.

०००

या नव्या क्रांतिकारी पक्षाचे केंद्र उत्तर बंगालमधील ‘नक्षलबाडी’ क्षेत्रात होते. त्यावरून पुढे या दहशतवादी गटाला ‘नक्षलवादी गट’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. नक्षलवाद या नावाला तसा काही तात्त्विक अर्थ नव्हता. परंतु नक्षलवाद्यांच्या या लढ्याला अन्याय,  जुलूम,  शोषणाविरुद्धचा सशस्त्र लढा असे रूप मिळाले. त्यातून जुलमी जमीनदार, निष्क्रिय राज्यकर्ते,  भ्रष्ट शासकीय अधिकारी व पोलीस अशा लोकांच्या हत्या या जहाल गटाकडून केल्या जाऊ लागल्या व दहशतीचे नवे दालन या चळवळीने प्रस्थापित केले.

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यामधील ‘नक्षलबाडी’ हे एक गाव आहे. नक्षल चळवळीचे अध्वर्यू चारू मुझुमदार यांचे हे गाव. या गावाच्या नजिक बडा मणिराम जोत नावाचे एक गाव आहे. या गावाहून काही तरुणांनी तांदूळ लुटून तो शेजारील नेपाळ देशात नेऊन विकला. ही नक्षल बंडाळीची सुरुवात होती. नागनजोत हे आणखी एक गाव या काळात गाजले. या गावचा जमीनदार नागराय चौधरी हा वृद्ध आणि केवळ नावापुरताच जमीनदार होता. परंतु जमीनदारांविरुद्ध हा लढा असल्याने यात पहिली आहुती या नागराय चौधरीची पडली. या गदारोळात नागरायची हत्या नक्षलबाडीत झाली अशी वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे बंडाळी करणाऱ्या या पक्षाच्या लोकांना ‘नक्षलवादी’ ही उपाधी कायमची चिकटली आणि त्यांच्या हिंसाचाराला ‘वाद’ असा तात्त्विक अर्थ त्यांनीच लावला.

०००

पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळ सलग तीन वर्षे टिकली. हजारोंचे बळी या हिंसाचारात पडले. त्यात जमीनदारांपासून कोलकात्यातील सामान्य वाहतूक नियंत्रक पोलिसांपर्यंत सर्वांचा समावेश होता. याच सुमारास पश्चिम बंगालमधील अनेक पक्षांचे संयुक्त सरकार कोसळले आणि सिद्धार्थ शंकर रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेवर आली. त्यांनी आल्या आल्या काही महिन्यांतच या नक्षल बंडाळीवर अक्षरश: वरवंटा फिरवला. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर झाला. चारू मुजुमदार पकडले गेले. कोलकात्यातील ‘लाल बझार’ तुरुंगात त्यांचा पुढे अंत झाला आणि चीनच्या ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्राने ‘Spring Thunder over India‘ ‘‘तथाकथित क्रांती विझून गेली” असे शेवटी वर्णन केले.

०००

नक्षलबाडीतील हा उठाव जरी फसला, तरी भूमिगत कार्यकर्त्यांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व कायम राखून क्रांती अद्याप संपली नसल्याची घोषणा केली. परिणामी त्यातून अनेक नक्षलवादी गट उदयास आले. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक जनतेला स्थानिक प्रश्नांवरून भडकावण्याचे कार्यक्रम सुरू झाले. भारत हा एक देश नसून यात अनेक देश आहेत, अशी ‘अनेक राष्ट्रवादाची’ नवी संकल्पना पुढे आणण्यात आली. आज भारताच्या विविध भागात नक्षलवाद्यांचे सत्तावीस गट कार्यरत आहेत. या सर्वांची हिंसाचारातून क्रांती घडवण्याच्या संकल्पनेवर निष्ठा आहे.

०००

1967 मध्ये नक्षलवादी जनतेच्या शस्त्राने लढत होते. धनुष्यबाण व कुऱ्हाड अशी ती हत्यारे होती, पण त्यानंतर परिस्थिती पालटली. अत्याधुनिक शस्त्रांनिशी नक्षलवादी सज्ज झाले. केरळ, आंध्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये त्यांचे सक्रिय कार्यकर्ते वाढले. शिवाय पंजाब, काश्मीर आणि आसाममधील अतिरेकी कारवायांनी हा देश सतत पोखरला जात असताना, त्यांना कधी नव्हे अशी परिस्थिती अनुकूल बनत गेली. 1967 मधील त्यांचा उठाव मोडण्यास सरकारला सैन्यास पाचारण करावे लागले आणि उठाव मोडण्यास तब्बल चार वर्षे लागली. आज देशभरात दहा हजारांच्या आसपास नक्षलवाद्यांची सशस्त्र फळी उभी आहे. आदिवासी, शेतमजूर, काही प्रमाणावर दलित यांची त्यांना सहानुभूती आहे. पोलिसही त्यांच्याविरुद्ध मनापासून कारवाई करीत नाहीत,  हे अनेक राज्यांतील परिस्थितीवरून स्पष्ट झालेले आहे. पाच-सहा टोपणनावे असलेल्या आणि स्वत:चा पत्ता नसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिसांनी पकडले तरी,  त्यांच्या जामिनाचीही तात्काळ व्यवस्था होते. पोलिसांच्या गाड्या जंगलात लांबवर जाऊ शकत नाहीत. स्थानिक जनतेचे पोलिसांना सहकार्य मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे.”

०००

बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील काही भागातून नक्षलवाद्यांनी चांगला जम बसविलेला आहे. शेतमजुरांची व आदिवासींची पिळवणूक, जमीनदारी पद्धत, आर्थिक शोषण, स्थानिक राजकारण, विकासातील असमतोल, सरकारी खात्यातील भ्रष्ट कारभार यामुळे या चळवळीला खतपाणी मिळत गेले आहे.

नक्षलवाद्यांना लपून राहण्यासाठी वेळोवेळी जंगलांचा आणि आदिवासींचा आधार घ्यावा लागतो. ‘गरिबांसाठी लढणारे’ अशी नक्षलवाद्यांनी प्रतिमा निर्माण केल्यामुळे स्थानिक लोकही त्यांना मदत करतात.

देशाच्या अनेक भागात नक्षलवादी कार्यकर्ते समांतर न्यायव्यवस्था उघडपणे चालवत आहेत. प्रस्थापित व्यवस्था व राज्यकर्त्यांविषयीच्या घृणेतून नक्षलवादी चळवळीने जोर धरला आहे. जमीनदारांच्या जमिनी वाटपात सरकारला आलेले अपयश, आदिवासी मजुरांचे होणारे शोषण, दुष्काळ व पूर या आपत्तींच्या वेळी सरकारकडून दाखवली जाणारी निष्क्रियता यामुळे लोकांना सरकारविषयी घृणा वाटणे व नक्षलवाद्यांबद्दल आत्मीयता निर्माण होणे स्वाभाविक आहे. यातूनच अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढला आहे.

०००

मधल्या काळात त्यांचे भरपूर साहित्य बाहेर आले. भांडवलदार, मक्तेदार नववसाहतवाद, प्रतिक्रांतिकारक, प्रतिक्रियावादी अशा निवडक शब्दांचा वापर करून केलेली वाक्यरचना हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. सामान्य जनांनाही नक्षलवाद्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातून स्वत:ला होणारा लाभ याच्याशीच प्रामुख्याने कर्तव्य असते. नक्षलवाद्यांची कार्यपद्धतीही याच एका महत्त्वाच्या केंद्रबिंदूभोवती गुंफली गेली आहे.

०००

नक्षलवाद्यांच्या सशस्त्र दलम्‌मध्ये 9 ते 11 तरुणांसोबत एक-दोन तरुणींचाही समावेश असतो. या सर्वांना विविध शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे जंगलातील वाटा-आडवाटा यांचीही माहिती दिली जाते. दोन-दोन दिवस अन्नावाचून जंगलामध्ये काढणे, दिवसाला चाळीस-पन्नास किलोमीटर चालून जाणे अशा अनेक गोष्टींचा प्रशिक्षणात अंतर्भाव असतो. स्वीकारलेल्या मार्गावरील ‘असीम श्रद्धा व निष्ठा’ यामुळे अविचल मनाने हे तरुण, तरुणी ही कामगिरी स्वीकारतात. दलम्‌मधील तरुणांची वैषयिक भूक भागवण्यासाठी प्रत्येक दलम्‌मध्ये तरुणींची योजना केलेली असते असे बोलले जाते, पण ते बरोबर नाही. तरुणींची योजना ही खास कामासाठी अतिशय चाणाक्षपणे केलेली असते. प्रत्येक दलम्‌मध्ये एक कमांडर, एक डेप्युटी कमांडर व एक पोलिटिकल प्रोपगंडीस्ट असतो. त्याच्या आज्ञेचे पालन विनातक्रार करणे हे दलम्‌च्या प्रत्येक सभासदाकडून अपेक्षित असते. दलम्‌ कमांडरला आपल्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळणे बंधनकारक असते. धोरणात्मक निर्णय दलम्‌मध्ये घेतले जात नाहीत. पीपल्स वॉर ग्रुपची किंवा अन्य गटांची केंद्रीय समिती हे निर्णय घेते. निर्णयांची अंमलबजावणी दलम्‌कडून अपेक्षित असते आणि ती तत्परतेने केली जाते.

०००

कमांडर, डेप्युटी कमांडर आणि 7 ते 9 सदस्य अशी साधारणत: 9 ते 11 नक्षलवादी सदस्यांची टोळी असते. टोळीत एक किंवा दोन महिला असतात. त्यांना राजकीय प्रचारक म्हटले जाते. टोळीतील सदस्यांची संख्या नेहमी विषम असते. त्यांना लोकशाही मान्य नसली तरी विविध प्रश्नांवर ते अखेर मतदान घेऊन निर्णय करतात. चार-पाच टोळ्या मिळून एक गट तयार होतो.

15 ते 20 गावांसाठी एक टोळी काम करते. 15 ते 20 दिवसांत प्रत्येक गावात सभा होते. सुरक्षिततेसाठी सभेच्यावेळी इतर एक-दोन टोळ्यादेखील त्या गावात येतात. महिला सदस्य आधी येऊन सभेचा प्रचार करतात. काही वेळा हस्तलिखित भित्तीपत्रके लावून सभेचा प्रचार केला जातो. सभेत गावातील सावकार, दुकानदार, पुढारी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सरकारी अधिकारी, प्रामुख्याने वन कर्मचारी आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध, शोषणाविरुद्ध जहाल भाषणे केली जातात.

गटातील महिला साधारणत: त्याच गटातील एखाद्या नक्षलवाद्याची पत्नी असते किंवा कोणाशीही तिचे नाते नसते. पण अद्याप तरी त्यांच्या संबंधांविषयी संशयाचे वातावरण नाही. गावातील महिलांविषयीदेखील विकृत दृष्टिकोन कुठेही नाही. त्यांच्या मुक्त संबंधांच्या चर्चा खऱ्या नसून ते स्वैराचारी नाहीत. उलट अधिक संवेदनक्षम आहेत. त्यामुळे या नाजूक प्रश्नात झालेली थोडीशी घसरण नक्षलवाद्यांविषयी अप्रीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

०००

आदिवासी नक्षलवाद्यांना ‘अण्णा’ म्हणजे भाऊ संबोधतात. आदिवासींना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, कारण एका बाजूला सावकार, व्यापाऱ्याबद्दल आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांबद्दल त्यांना जो राग आहे, संताप आहे,  तो व्यक्त करण्याचे त्यांचेजवळ धाडस नाही, संघटना नाही. तेच काम अण्णा करीत आहेत यात ते बरेच समाधानी आहेत.

एकीकडे ही जशी सहानुभूती आहे तशी दुसरीकडे भीतीही आहे. सभेला न येणाऱ्याला, विरोध करणाऱ्याला नक्षलवादी मारझोड करतात. सभेला गेले नाही तर नक्षलवाद्यांची भीती आणि गेले तर पोलीस चौकशीला येतात, माहिती विचारतात. माहिती दिली नाही तर पोलिसांचा मार, पुन्हा माहिती दिली तर नक्षलवाद्यांचा मार,  अशा भयानक दहशतचक्रात आदिवासी अडकलेले आहेत.

(भारतीय प्रशासकीय सेवेतून गोविंद गारे यांनी निवृत्त झाल्यानंतर ‘नक्षलवादी आणि आदिवासी’ (सुगावा प्रकाशन, पुणे) हे पुस्तक 2003 मध्ये लिहिले, त्यातील निवडक उतारे)

Tags: सिद्धार्थ शंकर रे महादेव मुखर्जी विनोद मिश्रा कानू संन्याल चारू मुजुमदार जोती बसू नक्षलबाडी माओवाद नक्षलवाद ‘नक्षलवादी आणि आदिवासी’ लेखक गोविंद गारे- 2003 सुगावा प्रकाशन Siddhartha Shankar Rey Mahadev Mukharji Vinod Mishra Kanu Sanyal Charu Muzumdar Jyoty Basu Naxalbadi Maoism Sugava Publication ’ Author- Govind Gare 2003 ‘Naxalism and tribalism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके