डिजिटल अर्काईव्ह

नानांनी त्या वेळी मला सांगितलं होतं, ‘‘तू प्रथम लोकमान्यांचे अग्रलेख, त्यांचं चरित्र, आगरकरांचे लेख व चरित्र आणि शि.म.परांजपे यांचं आधी वाचन कर.’’ ते म्हणाले, ‘‘लोकांची अशी समजूत आहे की टिळकांना शैली नव्हती, पण टिळकांची शैली मर्दानी होती, मस्क्युलीन स्टाइल होती. तिचं एक वेगळंच सौंदर्य आणि आकर्षण असतं.’’ आणि ते खरेच आहे! त्यानंतर मी टिळकांचे निबंध, चरित्र, आठवणी वाचल्या. तो ठसा कायमचा राहिला.
 

‘माझे वाचन’ या विषयात ‘माझे’ या शब्दामुळे अडचण निर्माण झाली आहे. कारण स्वत:बद्दल बोलणं निदान जाहीरपणे बोलणं मला काही आवडत नाही. पण ‘वाचन’ हा माझ्या आवडीचा विषय आहे, त्याबद्दल बोलायला मला आवडतं. त्यामुळे दाभोलकरांनी माझी पंचाईत करून ठेवली आहे. मला या अनुषंगाने माझ्याबद्दल काही तरी बोलावंच लागणार आहे. मी जी काही पुस्तकं वाचली आणि त्यातील काही लेखकांशी बोललो, त्यांतील काही फार मोठी माणसं होती. काही जिवंत आहेत आणि काही निवर्तली. तेव्हा त्या लोकांची नावं मी जर सांगितली तर मी काही बढाया मारतोय, असे तुम्ही समजू नका. त्यामुळे ज्याला ‘नेम ड्रॉपिंग’ म्हणतात, जे ओघाने येईल आणि जे काही खरं आहे, तेवढंच मी ओघाने सांगणार आहे. 

वाचनाचाच विचार केला तर प्रथमत: माझ्यावर कोणाचा प्रभाव असेल किंवा मला ज्यांनी प्रेरणा दिली, त्यात माझे चुलते गोपीनाथ तळवलकर प्रमुख होते. त्यांनीच मला नंतर निरनिराळी पुस्तकं सांगितली. ते ‘आनंद’चे संपादक होते. ‘आनंद’मध्ये एक पुरवणी असायची, त्यात ते त्या महिन्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेत असत. त्यामुळे फार लहानपणापासून मला राजकारणाबद्दल कुतूहल व आस्था निर्माण झाली. मी त्या वेळी डोंबिवलीत राहत होतो आणि तेव्हा डोंबिवली अगदीच लहान म्हणजे दहा-बारा हजार लोकवस्तीचं गाव होतं. तिथे जवळजवळ बंद पडलेलं वाचनालय किंवा ग्रंथालय होतं. मी आणि माझ्या काही मित्रांनी त्याचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. अर्थात ते मराठी वाचनालय होतं, त्यामुळे आम्ही मराठी पुस्तकं आणत होतो आणि जितकी चांगली निवड करता येईल तितकी करत होतो. त्यामध्ये निबंध, कादंबऱ्या, कविता, चरित्रं व विवेचनात्मक पुस्तकं होती. नंतरच्या काळात य. गो. जोशी यांच्या प्रकाशनाने ‘वाद-विवेचनमालेत’ सात-आठ पुस्तकं काढली. त्यात कम्युनिझम, सोशॅलिझम, जडवाद असे काही विषय होते. लक्ष्मणशास्त्री जोशी, पां. वा. गाडगीळ, ना. ग. गोरे यांनी त्या ग्रंथमालेत पुस्तकं लिहिली होती. ती मी अतिशय मनापासून व आवडीने वाचली. त्यामुळे साम्यवाद, ईश्वरवाद व निरीश्वरवाद अशा अनेक विषयांबद्दलचं कुतूहल वाढत गेलं. 

कॉलेजमध्ये जाण्याच्या पूर्वी माझा संबंध ह. रा. महाजनींशी आला. महाजनी हे ठाण्याला शाळेध्ये मास्तर होते. मी डोंबिवलीला राहत होतो, त्याच्या जवळच लिखिते नावाचे गृहस्थ राहत होते. लिखिते व महाजनी रॉयिस्ट. त्यामुळे महाजनी शनिवार-रविवार त्यांच्याकडे येत असत. त्यातून स्टडी-सर्कल (अभ्यास मंडळ) स्थापन करण्याची कल्पना निघाली. मी त्याचा सभासद होतो. महाजनी शिक्षक होते, त्यामुळे अनेक गोष्टी समजावून सांगत. शास्त्रशुद्ध कसे बोलावे, लिहावे याचे शिक्षण त्यांच्याकडून मिळत होते. त्यांना महाजनीशास्त्रीच म्हटले जायचे. रॉय त्या वेळी ‘इंडिपेन्डन्ट इंडिया’ या नावाचं साप्ताहिक काढत होते. ते मी निष्ठेने वाचत असे. त्यातले लेख गोष्टी व त्यातले काही शब्द कळताना अडचण यायची. महाजनी ते समजावून सांगायचे, त्यामुळे तो विषय चांगला तयार होऊ लागला. नाना (गोपीनाथ तळवलकर) हे गांधी आणि नेहरू यांचे परमभक्त होते. त्यांच्या प्रभावामुळे मी ‘रॉय एके रॉय’ असं केलं नाही. रॉय मी जरूर वाचत होतो आणि अत्यंत आवडीने वाचत होतो, पण इतरही वाचत होतो. ‘इंडिपेन्डन्ट इंडिया’ बरोबरच गांधींचं ‘हरिजन’ ही वाचत होतो; त्या वेळी आम्ही राजकीय विषय व इंग्रजी भाषा यासाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचत होतो. आता इंग्रजी बिघडवायचं असेल, तर ते वाचायला हरकत नाही. त्या वेळी टाइम्समध्ये अतिशय उत्तम राजकीय लेख यायचे. 

कॅन्डीड्स नावाचे गृहस्थ दर बुधवारी त्यात राजकीय लेख लिहायचे. आठवड्याचा राजकीय आढावा देणारे ते सदर होते. ‘टाइम्स’ ब्रिटिशांच्या मालकीचा होता, त्याचे संपादकही ब्रिटिश होते; तरीसुद्धा काँग्रेसचे पुढारी काय बोलतात, त्याचे वृत्त त्यामध्ये येत असे. असेंब्लीत जी काही चर्चा होत असे, ती तर संपूर्ण येत होती. ‘हाऊस ऑफ कॉन्स’मध्ये हिंदुस्थानबद्दल चर्चा होत असेल, तर त्याचे चांगले तीन-चार-पाच कॉलम येत होते. तेव्हा राजकीय शिक्षण मिळायला ही वर्तानपत्रं म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘बॉम्बे क्रॉनिकल’ आणि काही प्रमाणात ‘फ्री प्रेस जर्नल’ ही मुंबईत उपलब्ध होती. ती सर्व मी वाचत होतो, त्यातही ‘टाइम्स’ अधिक वाचत होतो. जगाची सर्व माहिती त्यात येत असे.  कॉलेजमध्ये गेल्यानंतर गोवर्धन पारिख हे माझे प्रोफेसर होते. ते अर्थशास्त्र शिकवीत. ते रॉयिस्ट होते आणि त्यांचा माझ्यावर लोभ होता. त्यांच्याशी चांगला संबंध आला, चर्चा करता आली. त्यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. पण तरीही मी रॉयवादी चळवळीत गेलो किंवा रॉयिस्ट होतो, असं काही नाही. तेव्हा माझं वयही फार नव्हतं. परंतु 1945-46 मध्ये रॉय यांनी आपला पक्षच विसर्जित करायचे ठरवले. तो का विसर्जित केला, याबद्दल त्यांनी लिखाणही केले आहे. रॉय यांनी एक छोटं पुस्तक लिहिलं होतं. ‘ए लायब्ररी ऑफ ए रिव्होल्युशनरी.’ त्यात त्यांनी 400-500 पुस्तकांची यादी दिली होती. 

आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा निरनिराळ्या पुस्तकांची नावे त्यात होती. ‘क्रांतिकारकांनीसुद्धा पुस्तके वाचली पाहिजेत’, असं सांगणारे मला वाटतं रॉय हे एकटेच असावेत. नाही तर सारखी धरणे धरायची, उपोषणं करायची किंवा गाड्या उखडून टाकायच्या म्हणजेच फक्त क्रांती होते, अशी अनेकांची समजूत होती आणि आहे. त्याऐवजी क्रांतिकारकांनीसुद्धा वाचलं पाहिजे. इतिहास वाचला पाहिजे, अर्थशास्त्र वाचलं पाहिजे. हे आग्रहाने सांगून कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत याची रॉय यांनी एक यादीच दिली होती. पुढच्या आयुष्यात ती सर्वच पुस्तके मी वाचली असे नाही, पण बरीच वाचली. आत्ताच माझ्या वाचनाबद्दल यांनी सांगितलं. मी तुम्हाला प्रथमच सांगतो, माझा ग्रंथसंग्र बऱ्यापैकी आहे. परंतु मी अनेकांचे ग्रंथसंग्रह बघितले आहेत. ते पाहिल्यावर मला माझ्या ग्रंथसंग्रहाची विशेष बढाई मारावी असे वाटत नाही. खूप मोठे आणि खूप चांगले असे अनेकांचे खासगी ग्रंथसंग्रह मी पाहिले आहेत. शिवाय माझ्यापेक्षा खूप वाचणारेही मी बघितले आहेत. मी माझ्याबद्दल बोलताना त्यांची आठवण ठेवून बोलतोय. ‘मीच एक खूप वाचलेला माणूस आहे’, असा माझा दावा नाही आणि तसं मला कधी वाटलंही नाही. तेव्हा त्या सर्वांची आठवण ठेवून मी बोलणार आहे. 

युद्धकाळात ‘रॉयिस्ट’ लोकांवर बरीच टीका होत होती. ती सर्व त्यांनी ऐकून घेतली आणि नंतर पक्ष विसर्जित केला. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांची फार पंचाईत झाली. त्यांनी त्यांचं सारं आयुष्य पक्षाला दिलं आणि आता पक्षच बंद झाल्यावर त्यांनी काय करायचं? त्यामुळे बरीचशी चलबिचल होती. ‘हा पक्ष विसर्जित का करू नये’, याविषयी ह. रा. महाजनी यांनी रॉय यांना एक पत्र ते जवळजवळ टिपणच होतं. पाठवलं. त्या वेळी मी पुण्यात होतो. एस. पी. कॉलेजजवळ ‘ग्रीन्स’ हॉटेल होतं. त्या बाजूला महाजनी भेटले. मी त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही आहात कुठं?’’ ते म्हणाले, ‘‘आपला पक्ष विसर्जित झाल्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. मी एक सविस्तर पत्र लिहिलंय, ते तुला वाचायला देतो.’’ घरी गेल्यावर मी ते वाचले, त्यामुळे मलाही जरा अस्वस्थ वाटले. वामनराव कुलकर्णी नावाचे रॉयिस्ट कार्यकर्ते होते कमालीचा कष्टाळू माणूस त्यांनी काही वर्षे अशीच काढली. पक्ष एकदम बंद झाल्यावर काय होतं, ते त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. एकदा प्रधानसरांशी बोलत असताना ते म्हणाले, ‘‘जयप्रकाश नारायण व अच्युतराव यांनी राजकारण संन्यास घ्यायचं ठरवलं, तेव्हा आम्हाला धक्का बसला आणि त्यामुळे आमच्या चळवळीचं नुकसान झालं. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो’’ तीच भाषा या दोघांची होती. 

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ जी आहे, ती आणि हे सारखंच आहे. हे उद्ध्वस्त धर्मशाळेचे दोन किंवा तीन नायक म्हणायला हरकत नाही. तेव्हा साहित्य व राजकारणाचा संबंध येतो, तो अशा प्रकारचा असतो. नंतर पुढचे जे वाचन झाले, तेव्हा मी डोंबिवलीत राहत होतो. तिथे मेहेंदळे नावाचे गृहस्थ होते. ते पोस्टात काम करायचे. त्यांनी ‘ज्योत्स्ना’, ‘प्रतिभा’, ‘रत्नाकर’ यांचे अंक चांगल्यापैकी बांधून ठेवले होते, ते मला वाचायला मिळाले. नानांनी त्या वेळी मला सांगितलं होतं, ‘‘तू प्रथम लोकमान्यांचे अग्रलेख, त्यांचं चरित्र, आगरकरांचे लेख व चरित्र आणि शि. म. परांजपे यांचं वाचन कर.’’ ते म्हणाले, ‘‘लोकांची अशी समजूत आहे की टिळकांना शैली नव्हती; पण टिळकांची शैली मर्दानी होती, मस्क्युलन स्टाईल होती. तिचं एक वेगळंच सौंदर्य आणि आकर्षण असतं.’’ आणि ते खरेच आहे! त्यानंतर मी टिळकांचे निबंध, चरित्र, आठवणी वाचल्या. तो ठसा कायमचा राहिला. श्री. के. क्षीरसागर म्हणून आमच्या नानांचे मित्र होते. त्यांनी लोकहितवादींवर एक लेख लिहिला होता. ते म्हणाले, ‘‘तू लोकहितवादीसुद्धा वाचला पाहिजेस!’’ तो मी वाचला. 1945-46 मध्ये लक्ष्मणशास्त्रींनी नागपूरच्या विद्यापीठात महात्मा फुले यांच्यावर दोन-तीन भाषणे दिली होती. 

आजकाल म. फुले यांच्यावर बोलणारे-लिहिणारे आणि आपणच त्यांचे खरे उत्तराधिकारी आहोत, असे मानणारे बरेच लोक आहेत. पण 1945-46 मध्ये लक्ष्मणशास्त्रींनी त्या भाषणांतून, ‘फुल्यांचे महत्त्व काय, त्यांचे विचार काय’ याबाबत अतिशय उत्तम विवेचन केले. त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ते मी वाचले होते. हा समाज कळायला त्या पुस्तकामुळे मदत झाली. मग मी म. फुल्यांची बहुतेक सर्व पुस्तके वाचली. पण त्याला शास्त्रीबुवांची भाषणं कारणीभूत होती. श्री.के.क्षीरसागर यांच्यामुळे डॉ.केतकरांचे लेख व त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. निरनिराळ्या प्रकारचे वाचन मला नंतरच्या काळात बरेच उपयुक्त ठरले. मधे एका भाषणात नानासाहेब गोरे म्हणाले, ‘आम्ही मार्क्स खूप वाचला, पण म.फुले वाचले नाहीत. त्यामुळे आमचं नुकसान झालं.’’ सुदैवाने मला फुले लवकर वाचायला मिळाले. नानासाहेबांनीही फुले वाचले होते. मी आधी, त्यांनी नंतर  असे काही नाही. पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात वाचले, त्यापेक्षा मी माझ्या कमी वयात वाचले, इतकेच. 

त्याच काळात जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले, ते मी प्रथम मराठीत वाचले. नानासाहेब गोरे यांनी त्याचे मराठी भाषांतर केले होते आणि त्यातल्या इंग्रजी कवितांचे भाषांतर नानांनी केले होते. मग नेहरूंची सगळीच पुस्तके वाचली. नेहरूंचे राजकारण व व्यक्ती म्हणून नेहरू समजून घ्यायचे असतील, तर ती पुस्तके उपयोगी आहेतच; पण ‘सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू’ अशी एक ग्रंथमाला प्रसिद्ध आहे, ती वाचली पाहिजे. त्यामध्ये 38 खंड निघाले आहेत. मी त्यांतले 37 खंड वाचले आहेत. त्यामध्ये नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राबद्दल लिहिले आहे. कशाबद्दल नाही असे नाहीच! वर्तानपत्रांतून, काही लेखांतून नेहरूंची जी काही प्रतिमा दिसते, तिच्यापेक्षा निराळी प्रतिमा या खंडांतून दिसते. ‘नेहरूंचा कल रशियाकडे होता, नेहरू रशियाधार्जिणे होते’, अशी टीका सतत होत आली आहे; पण हे ग्रंथ वाचले तर वेगळेच चित्र दिसेल. कम्युनिस्ट पार्टी, एकंदर कम्युनिझम, रशिया, चीन या सर्वांबद्दल नेहरूंची भूमिका आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळी होती. 

काही सावधगिरीची होती, काही त्या वेळच्या राजकारणाला अनुसरून आपल्या देशाचं अनहित होऊ नये या दृष्टिकोनातून घेतलेल्या भूमिका होत्या. ‘नेहरू, कम्युनिस्ट पक्ष, रशिया व चीन’ याबद्दल स्वतंत्रपणे कधी तरी लिहायचा माझा विचार आहे. कारण माझी स्वत:ची नेहरूंबद्दलची मतं त्या खंडांमुळे बदलली. तेव्हा मला जे काही वाटते ते लिहावे, असा विचार आहे, तो या खंडांमुळेच शक्य होणार आहे. त्यांतली अनेक पत्रं आपल्या लोकांनी लक्षात घ्यावीत अशी आहेत.  तसेच लोकमान्यांची पत्रंही आहेत. लोकमान्य टिळक ‘व्यक्ती’ म्हणून कसे आहेत, हे जाणून घ्यायला अनेक व्यक्तींच्या आठवणी, लेख, पत्रे फारच उपयुक्त आहेत. मागे तमारा डॉयश्चर म्हणजे आयझॅक डॉयश्चर यांची पत्नी यांनी ‘नॉट बाय पॉलिटिक्स अलोन’ असे एक पुस्तक लिहिले होते. बायबलमध्ये ‘मॅन डझ नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन’ असे वाक्य आहे. त्यावरून तिने ‘नॉट बाय पॉलिटिक्स अलोन’ असे पुस्तक लिहिले, ते लेनिनबद्दल आहे. लेनिन हा माणूस कसा होता, तो कसा घडला याबद्दल ते आहे. क्रांती होण्यापूर्वी लेनिन कामगार वस्तीत जाऊन बसायचा, त्यांच्या खानावळीत जायचा. त्यांना काय समजेल, कुठल्या भाषेत समजेल याचा विचार तो करीत असे. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, अशा प्रकारे कोणता माणूस आपल्याला दाखवता येईल? उत्तर मिळाले- बाळ गंगाधर टिळक. तमारा डॉयश्चर हिने जसं ‘लेनिन : एक व्यक्ती’ म्हणून लिहिले, तसे मी ‘बाळ गंगाधर टिळक’ ही व्यक्ती कशी होती, यावर लिहिले. मला लोक म्हणाले, तुम्ही ‘लोकमान्य म्हणत नाही?’ मी म्हणालो, ‘तुम्ही पुस्तक वाचा, मग कळेल!’ व्यक्तिदर्शन घडावं, हा त्या पुस्तकाचा हेतू आहे. 

पदवी घेतल्यानंतर मी वर्तानपत्रात नोकरीला लागलो. त्यावेळची वर्तामानपत्रं आजच्यासारखी नव्हती आणि आजच्यासारखे पगारही नव्हते. मी प्रथम ‘लोकसत्ता’मध्ये होतो. तेव्हा पुस्तके घेण्याची आणि वाचण्याची हौस होती, पण ते शक्य नव्हतं. त्या वेळी ‘लोकसत्ता’मध्ये पंढरीनाथ रेगे हे माझे सहकारी होते. त्यांनी अनेक बालकथा वगैरे लिहिल्या. ते एकदा म्हणाले, ‘तुम्हाला शरश्चंद्रांच्या कादंबऱ्या पाहिजेत का?’ मी म्हणालो, ‘हो! पण एवढे पैसे कोण देणार?’ ते म्हणाले, ‘मी तुम्हाला सर्व कादंबऱ्या उद्याच देतो, तुम्ही मला दरमहा दहा रुपये द्या!’ त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी शरश्चंद्रांच्या सर्व कादंबऱ्या आणून दिल्या आणि त्यानंतर मी त्यांना दरमहा दहा रुपये दिले. नंतरही त्यांनी मला अनेक पुस्तके दिली. त्यामुळे ‘बंगाली वाङ्मय म्हणजे काय?’ याची मला ओळख झाली. ज्यांना खरोखर बंगाली कळतं, त्यांच्या मताने, ‘ती भाषांतरं करताना मामा वरेरकरांनी अनेक चुका केल्या आहेत, काही भाग गाळून टाकला आहे.’ ते काहीही असलं तरी बंगाली वाङ्मय कळायला मामा वरेरकरांची ती भाषांतरे अतिशय उपयोगी पडली. 

भाषांतरावरून सांगायला हरकत नाही. मध्यंतरी ‘टाइम्स लिटररी सप्लीमेंट’मध्ये एक लेख आला होता. त्यात लिहिले होते... टॉलस्टॉय, चेकॉव्ह या रशियन लेखकांची भाषांतरे करणारी ‘कॉन्स्टन्स गार्नेट’ ही लेखिका काही शब्द अडले तर गाळायची किंवा सबंध परिच्छेद सोडून पुढे जायची. एका रशियन दांपत्याने ही पुस्तके पाहिली. हे इंग्रजीत येतंय, ते काही बरोबर नाही; त्यात रशियन गाभा येत नाही, असे त्यांचे मत झाले. मग त्यांनी डोस्टोव्हस्कीचे ‘ब्रदर्स कारमॉझॉव’चे भाषांतर करायचे ठरवले. ते दोघेही रशियन. त्यांना इंग्रजी चांगलं येत होतं. त्यांनी भाषांतर केलं, पण ते कोणी छापेच ना! शेवटी एका लहान प्रकाशकाने ते छापलं. त्याची दखल काही चांगल्या समीक्षकांनी घेतली. त्यावर त्यांनी लाखो डॉलर्स कमावले. आता ते फ्रान्समध्ये राहत आहेत आणि आणखी भाषांतरं करत आहेत. आपण म्हणतो तितकं भाषांतर सोपं नाही. फार कष्ट घ्यावे लागतात. पण त्या दांपत्यानेसुद्धा म्हटलंय, ‘आमच्या रशियन लोकांची गुणवत्ता काय, त्यांना काय म्हणायचंय, त्यांच्या कादंबऱ्या कशा आहेत. हे सर्व त्या गार्नेटमुळे रशियाबाहेरच्या लोकांना कळले, ते तिचे आपल्यावरचे ऋण आहे आणि ते मान्य केले पाहिजे.’ 

बंगाली कादंबऱ्या वाचून माझ्या मनावर असा परिणाम झाला की, ‘आपण फक्त मराठी-मराठी करता कामा नये.’ रशियन-फ्रेंच येत असेल तर फारच छान; पण नसेल येत आणि इंग्रजी येत असेल तर निरनिराळ्या भाषेतील कादंबऱ्या, वैचारिक पुस्तके यांची ओळख होऊ शकते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, ‘टाइम्स लिटररी सप्लीमेंट’ आणि ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ ही जी नियतकालिकं आहेत. एक साप्ताहिक आणि दुसरं पाक्षिक- ती निरनिराळ्या भाषांतील साहित्याची ओळख नियमितपणे करून देतात. त्यांचा एक विभाग असतो. नॉर्वे, हंगेरी, युगोस्लाव्हिया यांच्या वाङ्मयाच्या क्षेत्रात, वैचारिक क्षेत्रात काय चाललंय, ते त्यात येत असतं.  मी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाल्यानंतर काही दैनिकं, साप्ताहिकं घेत असे. त्यांत हिंदुस्थान टाइम्स, हिंदु, स्टेटस्मन अशी काही दैनिके घेत असे. ‘इकॉनॉमिस्ट’ तर मी जवळजवळ 50 वर्षांपासून वाचतोय 1952 पासून आत्तापर्यंत! सगळ्या जगात अर्थकारण, राजकारण काय चाललंय हे पाहायचं असेल; तर एक ‘इकॉनॉमिस्ट’ वाचला तरी पुरेसे आहे. त्यांची सर्व मते मान्य केली पाहिजेत, असे नाही! 

गेल्या आठवड्यातील अंकात एक विभाग ‘चीन’वर आहे. त्यांनी किती प्रगती केली, त्यांच्यापुढे कोणते प्रश्न आहेत याविषयी अतिशय उत्तम लेख त्यात आहेत. ती माहिती इथे ‘मराठी-मराठी’ करून मिळणार नाही! ‘मी मराठी’ हे ठीक आहे, पण मराठीत सगळे ज्ञान आहे असे समजण्याचे कारण नाही. सगळ्या भाषांतील जे काही ज्ञान आहे, ते मिळवण्याची वृत्ती हवी.  रॉयीस्ट हे प्रारंभी मार्क्सवादीच होते, परंतु 1945-46 मध्ये रॉय यांनी मार्क्सवादाची तपासणी सुरू केली आणि मानवतावादाचा पुरस्कार केला. त्यानंतर 1950 मध्ये मी आर्थर कोस्लर यांचे ‘योगी ॲन्ड कमिसार’ हे कम्युनिझम व रशिया यासंबंधीचे पुस्तक वाचले. त्या पाठोपाठ कोस्लर यांची आणखी काही पुस्तके वाचली. त्यात आर्वेल यांच्या पुस्तकांची भर पडली. यामुळे कम्युनिझम व रशियासंबंधीचा सर्व भ्र दूर झाला. कोस्लर यांचे दोन खंडांतील आत्मचरित्र प्रसिद्ध झाले तेव्हा, त्याची ओळख करून देणारा विस्तृत लेख मी ‘लोकसत्ते’त लिहिला. ते 1959 मध्ये मुंबईत आले होते. तेव्हा त्यांची मी भेट घेतली व आत्मचरित्राच्या खंडांवर सही घेतली. त्यांच्याबरोबर घारापुरीची लेणी बघण्याचा व नंतर त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. 

‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाल्यावर माझ्या ग्रंथखरेदीला वाव मिळाला. जुन्या पुस्तकांच्या खरेदीसाठी मुंबईच्या मेट्रो सिनेमाच्या परिसरातील ‘ओल्ड ॲन्ड न्यू बुक स्टॉल’ या दुकानाचा उपयोग होत असे. दिल्लीजवळ गुरगाव इथे जैन या नावाच्या गृहस्थांचे जुन्या पुस्तकांचे दुकान विशेष उपयोगी पडले. परदेशात लंडन, ग्लास्गो, ऑक्सफर्ड, केंब्रिज, न्यूयॉर्क, बॉस्टन व ह्युस्टन अशा ठिकाणी महत्त्वाची पुस्तके मिळाली. ग्लास्गो येथील पुस्तकाच्या दुकानाचे नाव ‘रूसो ॲन्ड व्हॉल्टेअर’ असे होते. नंतरच्या काळात मी जी काही पुस्तकं लिहिली, त्यांतली दोन पुस्तकं श्री. पु. भागवतांच्यामुळे आहेत. सरदार पटेलांच्यावर खंड निघत होते. दहा खंड निघाले. मी त्यावर लिहीत होतो. तेव्हा श्री. पु. म्हणाले, ‘तुम्ही सत्तांतरावर पुस्तक लिहा, त्यामुळे मुख्यत: घटनात्मक सुधारणा कशा होत गेल्या हे स्पष्ट होईल.’ घटना किंवा कायदा याच्यावर जास्त भर देऊन लिहिले. त्यानिमित्ताने काही राजकीय घडामोडींवरही लिहिले, पण मुख्य रोख घटनात्मक सुधारणांवर होता. 

मी ज्या वेळी बघितलं, ब्रिटिश सरकारने सर्व कागदपत्रे खुली करायला सुरुवात केली आहे आणि त्याचे एकंदर दहा खंड निघणार आहेत (आणि तीन-चार महिन्यांमागे एक खंड, त्या हिशोबाने सर्व खंड यायला आठ- दहा वर्षे लागतील) तेव्हा मी श्री. पुं.ना. म्हटलं, ‘हे सगळं लांबणीवर टाकलं पाहिजे. ही सर्व अस्सल कागदपत्रे बघितल्याशिवाय लिहिण्यात अर्थ नाही!’ ते खंड प्रसिद्ध होण्याच्या अगोदर मी केंब्रिजला गेलो होतो. आणि तिथे निकोलस मॅनसर्घ यांना भेटलो. त्यांची नंतर त्या खंडांच्या प्रमुख संपादकपदी नेणूक झाली. त्यांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये गेलो. तेथे ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तासभर बोललो. ते सर्व काय करताहेत, कसं करताहेत, हे त्यांनी मला दाखवलं व ऐकवलं. तेव्हा मी आठ-दहा वर्षे थांबलंच पाहिजे, असा विचार केला. त्याप्रमाणे मी थांबलो. पेंडेरल मून हे मॅनसर्घ यांचे दुय्यम म्हणून काम करत. ते आय.सी.एस. होते आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा नेहरूंनी त्यांना ‘प्लॅनिंग कमिशन’वर सल्लागार म्हणून नेलं. त्यामुळे त्यांना इथल्या लोकांची पूर्ण माहिती होती. 

आर. जे. मूर हे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक होते. त्यांनी बरीच पुस्तकं हिंदुस्थानबद्दल लिहिली आहेत. त्यातल्या एक-दोन पुस्तकांवर मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये परीक्षणही लिहिले होते. त्यामुळे केंब्रिजला गेल्यावर आमची चांगली ओळख झाली. केंब्रिजमध्ये व ऑक्सफर्डध्येसुद्धा त्या-त्या विभागाच्या प्राध्यापकांचे रात्री जेवण असते. तिथे जी चर्चा चालली होती, त्यात दोन-तीन तास चांगले गेले. सर्वांचाच विषय इतिहास-राजकारण असल्यामुळे सर्व जण त्यावरच बोलत होते. कोणी कुचाळक्या करत नव्हते किंवा एकमेकांचे पाय ओढत नव्हते. सत्तांतराच्या संबंधात केंब्रिजमध्ये भेटलेले महत्त्वाचे गृहस्थ म्हणजे लॉर्ड बटलर. रॅब बटलर हे त्यांचे नाव. त्यांचे चुलते हे उत्तर प्रदेशचे गव्हर्नर होते आणि पंडित मोतीलाल नेहरू यांचे ते मित्र होते. रॅब बटलर हे पुढे लॉर्ड बटलर झाले आणि केंब्रिज विद्यापीठाचे ते प्रमुख अधिकारी (मास्टर) होते. 

1935 मध्ये त्यांनी भारतास प्रांतिक स्वायत्तता देणारे विधेयक कॉन्स सभेत मांडले असल्यामुळे त्यांच्याशी बोलणे जरुरीचे होते. त्याप्रमाणे केंब्रिजमध्ये त्यांची गाठ घेतली. त्यावेळी 1935चे ते विधेयक मंजूर करून घेताना चर्चिल यांचा कसा व कोणत्या बाबतीत विरोध झाला याचा खुलासा त्यांनी केला. बटलर हे चर्चिल यांच्याच हुजूर पक्षाचे सदस्य होते, पण त्या पक्षात चर्चिल व त्यांचे पाठीराखे एका बाजूस व बटलर यांच्या मताचे दुसऱ्या बाजूस अशी विभागणी झाली होती. अखेरीस ते विधेयक संमत झाले.  दुसरे एक गृहस्थ होते एच. व्ही. हॉडसन. ते माझ्या चांगल्या ओळखीचे होते, ते ‘संडे टाइम्स’चे अकरा वर्षे संपादक होते. ते भारतात लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याबरोबर त्यांचे घटनात्मक सुधारणांविषयक सल्लागार म्हणून भारतात आले होते. त्यांनी ‘ग्रेट डिव्हाइड’ या नावाचे पुस्तक लिहिले. सत्तांतराच्या वेळी वाटाघाटी कशा झाल्या, कोणाच्या काय भूमिका होत्या, गांधी-नेहरू-जीना यांच्या भूमिका यांबाबत हॉडसन यांनी विवेचन केले आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन (त्रिमंत्री योजना)चा पुरस्कार माऊंटबॅटन करीत होते. मौलाना आझादांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आला आहे. ती योजना हिंदुस्थानचे 400-500 तुकडे करणारी होती. तिच्यामुळे केंद्र सरकार कमालीचे दुर्बळ झाले असते. हे गांधी-नेहरू- पटेल यांनी ओळखले आणि ती योजना उडवून लावली. ‘ती योजना आपल्याला मान्य आहे’, असे पत्र आझादांनी व्हाईसरॉयला लिहिले, ते कोणालाही न विचारता. हे सर्व कळल्यावर गांधींनी त्यांना जाब विचारला. 

आजकाल काही लोक म्हणायला लागलेत, ‘त्रिमंत्री योजना स्वीकारली असती, तर हिंदुस्थान एक राहिला असता.’ तो नावापुरता एक राहिला असता, पण त्याची अनेक छकलं केव्हाच उडाली असती आणि दुर्बळ असे केंद्र सरकार निर्माण झाले असते. त्या वेळी निदान नेहरू, पटेल वगैरे लोक होते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी पक्ष बदलणाऱ्या आजकालच्या नेत्यांनी तर देशाचे पूर्ण वाटोळे केले असते. केंद्र सरकार जे काही टिकून आहे ते गांधी, नेहरू, पटेलांमुळे. हे सर्व मला हॉडसन यांच्याशी चर्चा केल्यावर समजून आले. मी त्यांना सात-आठ वेळा भेटलो. शेवटी ते म्हणाले, ‘तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, ती योजना अत्यंत गुंतागुंतीची होती. ती अमलात आणणे कोणालाही शक्य नव्हते आणि अमलात आलीच असती तर देशाचे तुकडे झाले असते.’ त्यांचे ‘ग्रेट डिव्हाइड’ हे फारच उत्तम पुस्तक आहे.  त्यानंतर ते ‘कॉमनवेल्थ’ मासिकाचे संपादक होते आणि बरीच वर्षे त्यांचा इथे सारखा संबंध यायचा. ते इथे अनेक वेळा यायचे, मुख्यत: दिल्लीला. हॉडसन गावगप्पा करीत नव्हते. उत्तमपैकी गंभीर चर्चा तास-दोन तास त्यांच्याबरोबर करता येत होती. 

रिटन मार्टिन हे दिल्लीत ब्रिटिश डेप्युटी हायकमिशनर होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला होता. सत्तांतराच्या संबंधातील खंड प्रसिद्ध झाल्यावर ते तिसऱ्याच दिवशी मला मिळतील, अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्या काळात दर तीन महिन्यांनी मी दिल्लीला जात असे आणि आठ दिवस राहत असे. त्या वेळी मार्टिन यांच्याकडे दोनतीन तास चर्चा होत असे. त्या वेळी नवं काय आलंय, कोणाच्या काय चुका आहेत, हे मार्टिन सांगत असत. ते जरी सरकारी अधिकारी होते तरी ते सरकारवर टीका करीत असत. त्यांना चर्चिल यांची भारतासंबंधीची भूमिका मान्य नव्हती आणि गांधींचीही अमान्य होती. ‘गांधी फार टोकाची भूमिका घेत आणि वास्तव काय आहे ते विचारात घेत नसत. नेहरू-पटेल यांनी मात्र ओळखलं,’ असे त्यांचे मत होते.  मार्टिन हे मला अतिशय उपयोगी पडले. ‘सत्तांतर’ लिहिताना त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा मला चांगला उपयोग झाला. लॉर्ड बटलर हे जसे 1935च्या कायद्याचे प्रवर्तक, त्याचप्रमाणे भारतास स्वातंत्र्य देणारे विधेयक मांडणारे भारतमंत्री होते लॉर्ड लिस्टोवेल. मी त्यांना भेटलो, तेव्हा ते ‘हाऊस ऑफ लॉडर्स’चे अध्यक्ष होते. त्यांच्या कचेरीतील भेटीत ते म्हणाले की, गोलमेज परिषद झाली तेव्हाच भारतास वसाहतीचे स्वराज्य द्यायला हवे होते. पण पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनल्ड यांनी ते दिले नाही, ही चूक झाली. 

तेव्हा वसाहतींचे स्वराज्य दिले असते, तर भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले असते. यावर मी अशी शंका उपस्थित केली की, काँग्रेसने त्याआधी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव स्वीकारला होता, तेव्हा काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींनी वसाहतीच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव मान्य केला असता. लिस्टोवेल म्हणाले की, गांधींनी कदाचित तो प्रस्ताव झिडकारला असता, पण ब्रिटिश सरकारचे धोरण स्पष्ट झाले असते. दुसरे असे की, 1947 मध्ये सत्तांतर झाले खरे, पण प्रथम एक वर्ष दिले गेले ते वसाहतींचे स्वराज्यच होते. सोव्हिएत रशिया कोसळल्यानंतर श्री. पुं.चा मला फोन आला. ‘या विषयावर तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे’, असे ते म्हणाले. जेम्स बिलिंग्टन हे गेली काही वर्षे अमेरिकन काँग्रेसच्या या प्रचंड लायब्ररीचे मुख्य संचालक आहेत. (त्या लायब्ररीबद्दल असे म्हणता येईल की, त्यांच्या पुस्तकांच्या अलमाऱ्या रांगेत लावल्या तर मुंबईपासून बेळगावपर्यंत ती रांग लागेल. शिवाय कागदपत्रं, चित्रं हे आणखी वेगळं) त्यांनी रशियाच्या सांस्कृतिक इतिहासावर उत्तम पुस्तक लिहिलं होतं व ते सोव्हिएत साम्राज्य नष्ट होण्याच्या सुमारास प्रसिद्ध झाले. ते मी वाचलं. म्हटलं, लिहायचं तर सगळ्या बाजूंनी विचार करून आपण या साम्राज्यासंबंधी लिहिले पाहिजे. 

मुंबई महापालिकेचे एक मोठे वाचनालय होते, दादरला किर्तिकर मार्केटच्या समोर ती इमारत होती. ते वाचनालय मराठी ग्रंथसंग्रहालयाने घेतले. कारण महापालिकेला ते डोईजड झाले होते. त्यामध्ये इंग्रजी पुस्तके होती, मराठी कमी होती. होती ती साप्ताहिके-मासिके. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ते वाचनालय घेतल्यावर त्यातली इंग्रजी पुस्तके काढून टाकली. तेव्हा माझ्यासमोर काम केलेले व निवृत्त झालेले लेले म्हणाले, ‘ते इंग्रजी पुस्तकं काढून टाकणार आहेत, तुम्हाला पाहिजे तर घेऊन या!’ मी गेलो. ‘हिस्टोरिअन्स हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ या ग्रंथमालेचे 26 खंड विकत घेतले. त्यांची छपाई आणि बांधणी पहिल्या दर्जाची होती. प्रत्येक देशाबद्दलच्या अधिकारी इतिहासकारांनी लिहिलेले हे खंड होते. ते 26 खंड आणि आणखी चार-पाच पुस्तके मला केवळ 700 रुपयांत मिळाली.  लो. टिळकांची पत्रे पाहिली तर त्यात धोंडोपंत विद्वांस यांना एक पत्र आहे. त्यात टिळकांनी लिहिलंय, ‘‘हिस्टोरिअन्स हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’चा पाचवा खंड वाचून झाला. ते पाच खंड वाचून मला जो काही आनंद झाला, तो लिहिता येणं शक्य नाही.’’ या ग्रंथमालेतील रशिया व युरोपवरील खंडांचा मला फार उपयोग झाला. त्यानंतर रशियाविषयी अनेक पुस्तकं घेतली. 

माझी मुलगी अमेरिकेत होती, तिने काही पाठवली. त्यामुळे पुस्तकांची कमतरता भासली नाही. पण एक कमतरता जाणवली ती म्हणजे रशियन भाषा अवगत नसल्याची. ‘रशियन भाषा येत असती तर अधिक बरं झालं असतं’ असे वाटत होते. आता या वयातसुद्धा मला वाटते, टॉलस्टॉय वगैरे वाचायचे तर मुळातून वाचावेत. पण आता ते शक्य नाही. त्या वेळी मी पूर्व युरोप, जर्मनी, इंग्लंड अशा अनेक ठिकाणी गेलो. इंग्लंडमध्ये बी.बी.सी.च्या रशियन सर्व्हिस विभागात अनेक रशियन तज्ज्ञ आहेत. दोन-तीन महिला तर ‘रशियन’ वाटाव्यात इतक्या माहीतगार होत्या. मेल्व्हिन लास्की ‘एन्काऊंटर’चे संपादक होते. त्यांना भेटलो. प्रभाकर पाध्ये यांना ते चांगले ओळखत होते. पाध्यांबद्दल ते खूप चांगलं बोलले. त्यांनी मला ‘एन्काऊंटर’चा रशियाविषयीचा विशेषांक दिला.  लिओपार्ड लॉबेट्झ नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. ‘सर्व्हे’ या नावाचे त्रैासिक ते काढायचे. त्यात कम्युनिझम, रशिया, पूर्व युरोप इत्यादींविषयी चिकित्सक लेख येत. त्यांना भेटायला गेलो आणि मला धक्काच बसला. त्यांचे दोनही पाय कापले होते. ते व्हीलचेअरवरून आले. या अपंग विद्वानाचे डोके एकदम शाबूत होते. तास-दीड तास ते उत्साहाने बोलत होते. 

दुसऱ्या दिवशी ते वॉर्सा विद्यापीठात भाषण द्यायला जाणार होते. पाय गेलेत म्हणून ते डोक्याला हात लावून बसले नाहीत. इंग्लंडमध्ये आणखी एक जण भेटले ते ॲलन बुलक. त्यांनी ‘हिटलर : ए स्टडी इन टेरर’ असे एक पुस्तक लिहिले होते. त्याच्या अनेक आवृत्त्या इतर भाषांतूनही निघाल्या. ‘हिटलर ॲन्ड स्टॅलिन’ हा नवा व मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला. ते ऑक्सफर्डध्ये प्राध्यापक होते. नंतर त्यांनी स्वत:चं कॉलेज काढलं. बुलक यांनी बेव्हिन यांच्यासंबंधी दोन खंड लिहिले. इंग्लंडमधील मजूर पक्ष आणि राजकारण यांचा आढावा त्यात घेतला आहे. त्यांना लॉर्ड बुलक म्हणून ओळखलं जातं. त्यांना विचारलं, ‘तुम्हाला रशियन उत्तम येत असेल?’ ते म्हणाले, ‘छे- छे! मला रशियन बिलकुल येत नाही. तू घाबरू नकोस! ‘हिटलर ॲन्ड स्टालिन’ लिहिताना माझं अडलं नाही. रशियाबद्दल अनेक तज्ज्ञांनी इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.’ जर्मन मात्र त्यांना येत असे. ‘हार्वर्ड’मध्ये दोन प्रोफेसर भेटले. एक ॲडॅ उलाम. त्यांनी स्टॅलिन-लेनिन यांच्यावर दोन-तीन चांगली पुस्तकं लिहिली. दुसरे रिचर्ड पाइप्स. ते टोकाचं लिहिणारे गृहस्थ. त्यांना रशियाचं काहीच मान्य नाही. रशियन क्रांती थोड्या लोकांनी कट करून घडवून आणली, असे त्यांचे मत. मी म्हटलं, ‘असं कसं होईल? सर्व सैनिक याच लोकांच्या मागे उभे राहिले.’ 

तथापि माणूस विद्वान, त्यांची पुस्तकेही चांगली. नंतर प्रिन्स्टनमध्ये रॉबर्ट टकर भेटले. त्यांनी स्टॅलिन व लेनिनवर चांगली पुस्तकं लिहिली. ते रशियन भाषेचे तज्ज्ञ आहेत. त्यांची बायको रशियन आहे. ते मॉस्कोला अमेरिकन दूतावासात होते. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना चांगल्या माहीत होत्या. एकाच बाजूने मी वाचत नाही, दुसरी बाजूही मी वाचतो. माओबद्दल आणि चीनबद्दल लिहिणारे बरेच लोक होते व आहेत. अनेक जण त्यांची भरमसाट स्तुती करत. आपल्या र. के. खाडिलकरांनी पुस्तक लिहिलं, तिथे एका खेडेगावात किती डास मारले याची आकडेवारी त्यांनी दिली. खाडिलकरांना त्याचंच कौतुक. आपलेच लोक असे लिहीत असं नाही, इतर देशांतही असे लिहिले जात होते. पण बीजिंगच्या बेल्जियम दूतावासात एक अधिकारी होता. त्याने ‘सायमन लेज’ असं टोपणनाव घेतलं आणि ‘ब्रोकन इमेजेस’ या नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचे चिनी भाषेवर प्रभुत्व होते. तो गल्ली-बोळांतून फिरायचा, लोकांना भेटायचा. चीनची निरनिराळ्या भाषांतील पुस्तके-दैनिके-नियतकालिके वाचायचा. त्यांतले उतारेच्या उतारे त्या पुस्तकात आहेत. सांस्कृतिक क्रांतीच्या वेळचे हे सर्व चित्र. मॅकफाटकर हे आणखी एक लेखक. त्यांनी चीनच्या सांस्कृतिक क्रांतीवर तीन खंड लिहिले. एकेक विषय घेऊन अभ्यास करणारे लोक पाश्चिमात्य देशांत अनेक आहेत. अर्थात तिथे सुविधा आहेत, पण त्याचा उपयोग करणारेही आहेत.

एकाने लिहिले तेच खरे, असे न मानण्याची माझी वृत्ती पहिल्यापासून होती आणि त्यामुळे रशिया, चीन, इंग्लंड, अमेरिका या सर्वांच्याबद्दल वेगवेगळी मते ऐकण्याची व वाचण्याची वृत्ती निर्माण झाली आणि ती वाढत गेली. त्यामुळे इथे आल्यानंतर एकेका विषयाबद्दल जे बोलले जाते, ते ऐकल्यानंतर भीती वाटायला लागते. जागतिकीकरण हा असाच एक विषय. त्यावर कोणीही, काहीही बोलत असतात. या वेळच्या ‘इकॉनॉमिस्ट’मध्ये एक लेख आहे. त्यात आय.बी.एम.ची काय अवस्था आहे, याचे विवेचन आहे. हिंदुस्थानात मोठा तंत्रज्ञवर्ग तयार झाला असल्यामुळे आय.बी.एम.सारख्या मोठ्या संस्थेचे काय होईल याची चर्चा लेखात आहे. शेवटी त्यात लिहिले आहे की, संशोधन आणि नवी उपकरणे शोधून काढण्यात पाश्चात्त्य देश आणि अमेरिका 25 वर्षे पुढे आहेत. इतर देश फार मागे आहेत, असा निष्कर्ष काढून त्या लेखात लिहिले आहे की; हिंदी लोक टेलिफोनमध्ये जातील, कॉम्प्युटर चालवतील, पण त्यात काही मोठ्या सुधारणा नजीकच्या काळात करू शकणार नाहीत. ते पाश्चात्त्य जग करू शकते. अमेरिकेत काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. टीव्हीवर डॉक्स नावाचा गृहस्थ दररोज अमेरिकेत नोकऱ्या किती गेल्या आणि हिंदी व चिनी लोकांमुळे अमेरिकेवर कसं संकट येत आहे याचे चित्र रंगवतो. म्हणजे जागतिकीकरणाचा फटका अमेरिकेलाही बसला असून, तांत्रिक शोधांपुढे कोणाचे काही चालत नाही. आय.बी.एम.वरील लेखात आपल्यापुढे कोणते प्रश्न आहेत, येणार आहेत याची गंभीर चर्चा आहे. हे असे लेख मला वाचायला आवडतात. 

अमिताभ बच्चनच्या मुलाचं लग्न कधी आहे, ते वाचण्यापेक्षा हे असलं वाचणं चांगलं आणि यातच माझा वेळ जातो.  मागे मी सांगितलं होतं, आता परत एकदा सांगतो- अमेरिकेत सी-स्पॅन नावाची एक वाहिनी आहे. सी-स्पॅन-ए आणि सी-स्पॅन-बी. त्यातील स्पॅन-बी वर शनिवार-रविवार पूर्ण दिवस (24 तास) आणि सुट्टीच्या दिवशीही केवळ पुस्तकांवर चर्चा असते. लेखक भाषणे करतात. त्यांना प्रश्न लोक विचारले जातात. संपूर्ण अमेरिकेत जी भाषणे होतात, ती ऐकवली जातात. लेखक भाषण व इतर माहिती लिहून आणतात. त्यावर प्रश्न विचारले जातात, प्रश्न विचारणारेही पुस्तक वाचून आलेले असतात. देसाई नावाच्या एक बाई आहेत, त्या तीसेक वर्षे हार्वर्डध्ये प्रोफेसर आहेत. त्या रशियन भाषेच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी नवं पुस्तक लिहिलंय- ‘फ्रॉ एल्स्तिन टु पुटिन’. त्या तासभर आपल्या पुस्तकाच्या विषयासंबंधी बोलल्या. लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, काही पुस्तकांची दुकाने, विद्यापीठे, सांस्कृतिक संस्था यांध्ये असे कार्यक्रम सतत चालू असतात. त्यामुळे बौद्धिक वातावरण तयार होते, ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. तिथले पुस्तकांचे दुकान समजा सकाळी नऊ वाजता उघडते आणि रात्री दहा वाजता बंद होत असेल, तर तेवढा वेळ तुम्ही तिथे बसलात तरी कोणी काही विचारीत नाही. वाट्टेल तेवढी पुस्तके तिथे वाचायला मिळतात. तिथला माणूस आपण केव्हा उठतोय अशा नजरेनं बघत नाही. माझ्या मते, अमेरिकेचे खरे सामर्थ्य या बौद्धिक वातावरणात आहे. 

मायकेल फूट हे ब्रिटिश मजूर पक्षाचे नेते. ते जहाल विचारांचे होते व आहेत. त्यांची अनेक पुस्तके शैली व विवेचन या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. विल्यम हॅजलिट हा त्यांचा एक आवडता लेखक. फूट यांचा हॅजलिट याच्याबद्दलचा लेख वाचून मी खूष झालो व त्याची बरीच पुस्तके जमविली. ‘डेट्स ऑफ ऑनर’ हे मायकेल फूट यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पुस्तके वाचण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नसतो; पण जे वाचत नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.’ हा नियम लागू केल्यास अनवस्था प्रसंग ओढवेल, पण आपल्याकडेही वाचनप्रिय असे काही सत्ताधारी होते व आहेत. यात प्रमुख उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरूंचा केला पाहिजे. अनंत कामांतून त्यांनी विविध विषयांवरील ग्रंथ वाचले व स्वत: ग्रंथलेखन केले. इंदिरा गांधी या उत्तम वाचक होत्या, हे तितकेसे प्रसिद्ध नाही. पण ‘टु टुगेदर ॲन्ड टु अलोन’ हे नेहरू व इंदिरा गांधी यांच्या पत्रांचे पुस्तक वाचल्यास दोघांच्याही वाचनप्रियतेचा प्रत्यय येतो. राजगोपालाचारी यांचे ग्रंथवाचन अफाट होते. ते व नेहरू यांचे नंतर मतभेद झाले, पण अनेकदा आपल्याला आवडलेल्या पुस्तकाची शिफारस नेहरू त्यांना करत. 

नरसिंह राव केवळ इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचत नसत, त्यांना स्पॅनिश व इतर काही भाषा येत. त्या भाषांतरित ग्रंथांचे वाचन ते नित्य करीत. काही मराठी पुस्तकांचे (उदा. ह.ना.आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’) त्यांनी तेलुगूत भाषांतर केले. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा ग्रंथसंग्रह त्यांच्या चोखंदळपणाचा द्योतक आहे. चार वर्षांपूर्वी मी भारतात आलो होतो, तेव्हा दिल्लीत गेलो असताना त्यांच्याकडून दोन-चार पुस्तके वाचायला मिळाली.  डॉ.आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेमाला पारावार नव्हता, हे सर्वश्रुत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ग्रंथप्रेमाबद्दल मी पूर्वी लिहिले असल्यामुळे पुनरुक्ती करत नाही. बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री श्री.बुद्धदेव भट्टाचार्य हे चांगले वाचक व लेखक आहेत. त्यांनी काफ्काच्या काही कादंबऱ्यांचे बंगालीत भाषांतर केले असून, कविताही लिहिल्या आहेत. आणखी एका बंगाली राजकारण्याचा उल्लेख केला पाहिजे. अतुल्य घोष हे काँग्रेसमध्ये एक प्रस्थ होते. पुढे त्यांचे राजकारण फसले असेल, पण ते ग्रंथप्रेमी होते. ‘थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ म्हणून जो प्रकार ओळखला जातो, तशी पुस्तकेही त्यांच्या संग्रहात होती. 

राजकारणी व ग्रंथप्रेम या संबंधातील आणखी एक उदाहरण धक्कादायक वाटेल. ‘इंदिरा म्हणजे भारत व भारत म्हणजे इंदिरा’ अशी घोषणा करून टीकेचे लक्ष्य झालेल्या देवकांत बरुआ यांचे हे उदाहरण आहे. भारतातील जातींचा त्यांचा अभ्यास आश्चर्यकारक वाटेल असा होता. बरुआ यांचा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. त्यांच्या निवृत्तीच्या काळात त्यांच्याशी गप्पागोष्टी करत असताना हॅजलिट यांच्या पुस्तकांचा विषय निघाला. मी त्यांना म्हटले की- हॅजलिटची काही पुस्तके माझ्याकडे आहेत, पण त्याच्या फ्रेंच क्रांतीसंबंधीच्या पुस्तकाबद्दल बरेच ऐकले असले तरी ते मिळाले नाही. बरूआ एकदम उठले व त्यांनी हॅजलिटच्या त्या पुस्तकाचे चार खंड माझ्यापुढे ठेवले. पॅरिसमधील सोर्वर्त विद्यापीठात भाषण दिल्यानंतर बरूआ यांना ते खंड भेट म्हणून मिळाले होते. विशेष म्हणजे, हॅजलिटच्या पुस्तकाची ती पहिली आवृत्ती होती. त्यांनी ती मला दिली व त्याची झेरॉक्स प्रत काढून मी ते खंड त्यांना परत केले. 


असे हे ग्रंथभ्रमण व संचय. 
मागे मी ‘माझे अनौपचारिक साहित्य संमेलन’ असा एक लेख माझ्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहिला होता. त्यात असे म्हटले होते की, या संमेलनात विचारवंत, कवी, नाटककार, कादंबरीकार असे अनेक आहेत. चरित्रे व आत्मचरित्रे आहेत. या संमेलनाचा अध्यक्ष कोणी नाही. आपल्या साहित्य संमेलनासाठी सरकार व सहकार या क्षेत्रांतील अधिकारी पदस्थांकडून भरघोस देणग्या घ्यायच्या आणि त्यांनी व्यासपीठावर मात्र बसू नये असा आग्रह धरून त्यांना चार शब्द सुचवून ‘स्वतंत्र बाण्याचं’ प्रदर्शन करायचे, असा प्रकार माझ्या संमेलनात होण्याचे कारण नाही. अध्यक्षच नसल्यामुळे अध्यक्षीय निवडणूक लढवून विजयी झाल्यावर, निवडणूक प्रक्रियेपेक्षा ज्येष्ठांची वा लायक साहित्यिकाची बिनविरोध निवड व्हावी, असे म्हणण्याचा शहाजोगपणाही होत नाही. अशा या संमेलनात जितका काळ घालवता येईल तितका घालवावा, अशी माझी इच्छा आहे. 
(शब्दांकन : विनोद शिरसाठ) 

Tags: म. गांधी पं. नेहरू लेनिन पाश्चात्य-रशियन साहित्य लोकमान्य टिळक मानवेंद्र रॉय रॉयिस्ट वाचनाची सवय गोविंद तळवलकर थेट व्यासपीठावरून बौद्धिक Gandhi Pt. Nehru Lenin Western-Russian Literature Lokmanya Tilak Manvendra Roy Royist Reading Habits Govind Talwalkar Live from the platform Intellectual weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर ( 169 लेख )

1925 - 2017

लेखक, संपादक- लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके