डिजिटल अर्काईव्ह

अतिथी संपादकांचे मनोगत (सरदार पटेल विशेषांक)

‘साधने'च्या या सरदार पटेल विशेषांकाच्या अतिथी संपादकाची कामगिरी माझ्यावर सोपवल्याबद्दल दोन्ही संपादक - वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान यांचा मी आभारी आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या चरित्राचे आणि चारित्र्याचे सुयोग्य दर्शन नव्या पिढीस व्हावे हे खूप आवश्यक आहे अशा उदात्त भावनेने संपादकद्वयाने मला या पुण्यकार्यात सहभागी केले. ते कर्तव्य समजून आणि पूज्य साने गुरुजींच्या प्रेमळ व प्रेरक स्मृतीस वंदन करण्याच्या भावनेने ही जबाबदारी मी स्वीकारली.

काळाचा प्रवाह पुढेपुढे वाहात आहे, तसतशी सरदार पटेलांची पुण्यस्मृती वारंवार जागी होत आहे. आज तर त्यांची उणीव जास्तच भासत आहे. आधुनिक आणि स्वतंत्र भारताच्या शिल्पकारांत सरदारांना अग्रगण्य स्थान आहे. सरदार पटेल आणि त्यांच्यासारखे अनेक धुरंधर नेते नवभारताचा पाया घालून गेले. त्यांच्या अमर योगदानाबद्दल आपण साऱ्यांनी चिरकाल त्यांचे कृतज्ञ राहिले पाहिजे. सरदारांसारख्या दुर्मिळ धैर्यशाली भारतरत्नांविषयी तर आपणाला विशेष कृतज्ञता वाटणे साहजिक आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध होत असलेला साधनेचा सरदार पटेल विशेषांक हे याच कृतज्ञतेचे प्रत्यंतर आहे.

वल्लभभाई पटेलांचा जन्म गुजरातमध्ये झाला पण आपल्या कर्तृत्वाने ते साऱ्या भारताचे झाले आहेत. नव्या भारतीय राष्ट्राला सुदृढ आणि सामर्थ्यसंपन्न बनविण्यासाठी सरदारांनी अमूल्य योगदान दिले. याची तुलना जगातल्या दुसऱ्या कोणत्या राष्ट्राच्या कर्णधाराशी करता येईल?

आता हे खरे की आपल्यातीलच काही पश्चिमाभिमुख इतिहासकार आणि विद्वान, सरदारांना सन्मानाने 'भारताचे बिस्मार्क' अशी पदवी देतात. वास्तविक बिस्मार्कला 'प्रशियाचे सरदार पटेल' म्हटले पाहिजे.

एक गोष्ट राहून राहून मनात येते: परतंत्र भारतात स्वातंत्र्यसंग्रामाला दिशा व नेतृत्व देण्यासाठी स्वतंत्र आत्म्यांची रत्नमाला आपल्याला लाभली होती, पण आज मात्र स्वतंत्र भारतात विदेशाभिमुख आणि विदेशी वळणाची मनोदशा असलेल्या पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अखिल भारतीय कीर्तीचे आणि उज्ज्वल चारित्र्याचे नेते तर औषधाला मिळेनासे झाले आहेत. राज्यकर्ते काय आणि सामान्य जन काय, आपण सर्व अधिकाधिक ठेंगणे होत चाललो आहोत. स्वराज्य मिळण्यापूर्वी लोकमान्य टिळक साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचा आदर समग्र भारतात होत होता. पण आज मात्र त्यांची पुण्यतिथी महाराष्ट्रातच साजरी होते. ते जणु काही एकाच प्रदेशाचे नेते आहेत! हीच गोष्ट सरदारांची. त्यांच्या जन्मदिनी, 31 ऑक्टोबरला, फक्त गुजरातमध्ये सार्वजनिक सुटी असते.

साऱ्या देशाचे नेते आज कुठे, किती आणि कोण आहेत? ह्या किंवा त्या पदावर आरूढ झालेल्यांची यादी खूप लांबलचक आहे. पण संपूर्ण राष्ट्राच्या एकात्मतेला आणि कार्यशीलतेला दृढतर करणारे विशाल दृष्टीचे नेते कोठे आहेत? जनतेला योग्य मार्गाने नेणारा तो नेता; आणि जनतेकडून जो खेचला जातो तो केवळ सत्तेचा भोक्ता. सरदार वल्लभभाईंनी जनतेचे नेतृत्व केले आणि देशाचा बांधा सुदृढ केला. आपल्या देशबांधवांसमोर नीतिमान आणि निश्चयी नेतृत्वाचा त्यांनी अप्रतिम आदर्श उभा केला. त्यांच्याविषयी तऱ्हेतऱ्हेचे गैरसमज पसरलेले आहेत. "सरदार पटेल भांडवलदारांचे पाठीराखे होते", “त्यांनी राजे-महाराजांचे रक्षण केले", "उजव्या किंवा प्रतिगामी विचारधारेच्या पुरस्कर्त्यांचे ते कैवारी होते"... अशी त्यांच्यावर पुष्कळ टीका झाली. पण ही टीका करणारे लोक अज्ञानी म्हटले पाहिजेत किंवा अतिज्ञानी! सरदारांवर पूर्वग्रहदूषित टीका करून त्यांचे स्थान कमी लेखणाऱ्यांत त्यावेळचे काही साथी आणि अन्य नेतेही होते.

शुद्ध सत्य आणि प्रत्यक्ष घडलेल्या हकिगती काही कायम झाकून राहात नाहीत. कालप्रवाहाबरोबर सरदारांची प्रतिमा अधिकाधिक स्वच्छ आणि स्पष्ट होत चालली आहे, सुरेखपणे साकार होत चालली आहे. आमच्या समाजवादी मित्रांनी देखील सरदारांवर टीका करण्यात किंवा त्यांची विटंबना करण्यात काही बाकी ठेवले नव्हते; परंतु सध्या मात्र त्यांतील कित्येक साथी सरदारांच्या उत्तुंग प्रतिभेची मुक्तपणे प्रशंसा करीत आहेत. सरदारांचे जीवन स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक होते. ते आयुष्यभर ताठ उभे राहिले आणि बाणेदारपणाने वागले. ते स्पष्टवक्ते होते तसे मितभाषीही होते. सरदार केवळ कुशल राजकारणी नव्हते; ते द्रष्टे आणि धैर्यशाली असे राष्ट्रपुरुष होते. आपल्या दैनंदिन जीवनात ते साधे आणि नीटनेटके होते. त्यांच्या गरजा अगदी मोजक्या होत्या. धनसंचय करणे त्यांच्या स्वप्नात देखील आले नाही. सत्ता म्हणजे केवळ एक साधन आहे, नितांत आवश्यक हत्यार आहे असे ते मानीत. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपदही त्यांनी काही मागितले नव्हते. ते स्वाभाविकच त्यांना प्राप्त झाले होते. पंडित नेहरूंना त्यांनी आपले धाकटे भाऊ मानले होते आणि त्याचबरोबर राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून मनोमन स्वीकारलेही होते. सरदारश्रींनी साडेपाचशेहून अधिक संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण केले आणि तेही सामंजस्याने व योग्य क्षणी. ही कामगिरी अजोड म्हटली पाहिजे.

जगाच्या इतिहासात तिला तोड नाही. संस्थानिकांना आणि आपल्या राज्यतंत्रातील नोकरशाहीला सरदारांनी असामान्य समंजसपणाने आणि मोठ्या कुवतीने विश्वासात घेतले आणि या सर्वांनाच नवजात राष्ट्राच्या जडण-घडणीच्या कामाला जुंपले. सरदार पटेलांचे मनोबल दुर्दम्य होते आणि संकल्पशक्ती अलौकिक होती. आता त्यांच्या मृत्यूला चार दशके उलटल्यावरही "आज सरदार जिवंत असते तर... " अशी भावना असंख्य भारतीयांच्या हृदयांत उत्कटपणे उद्भवते यातच त्यांची अतुलनीय महती आहे. परंतु आजच्या आणि उद्याच्या भारतातील आपणा सर्वांनी सरदारांचे पुण्यस्मरण करीत असता अशी अगतिकता, असहायता व्यक्त करता कामा नये. असल्या दुबळ्या मनोवृत्तीचा सरदारांना तिटकारा होता. त्यांच्या महान् यशोगाथेचा आपण अपमान करता कामा नये. त्यांचे उदाहरण समोर ठेवून अविचल तपश्चर्येने आणि अदम्य इच्छाशक्तीने राष्ट्राच्या विकासाला आम्ही हातभार लावू अशी आपली वृत्ति-प्रवृत्ती असली पाहिजे, प्रार्थना असली पाहिजे.

महात्मा गांधी आणि सरदार पटेल या दोघांमधील सख्य आणि स्नेहभाव केवळ अद्भुत होता. तरीही सरदारांचे वैशिष्ट्य हे की राष्ट्रपित्याचा सामान्य अनुयायी हीच भूमिका घेऊन ते आयुष्यभर धडपडत आणि झुंजत राहिले. स्वातंत्र्य संग्रामातील एक शिस्तबद्ध, सच्चा आणि सदा-सिद्ध सैनिक या नात्यानेच ते वावरले आणि म्हणूनच ते राष्ट्राचे एक सेनापती आणि वीरनायक म्हणून नावाजले गेले. त्यांच्या दुःखद अकाल मृत्यूला चाळीस वर्षे उलटल्यावर त्यांचा भारतरत्न म्हणून गौरव करण्याची बुद्धी भारत सरकारला झाली. असा सन्मान त्यांना उशीरा का होईना, दिला गेला हेही एक परीने ठीकच म्हणायचे. पण त्याच्यामुळे सरदारांच्या अक्षय कीर्तीत अंशमात्रही भर पडलेली नाही. फार उशीरा झालेली ही सरकारीबुद्धी. ती ज्यांनी दाखविली आणि आदराचा देखावा केला त्या सत्ताधीशांबद्धल काय म्हणावे? त्यांची पश्चात् बुद्धी आणि अल्पमती त्यांनाच लखलाभ असो. सरदारश्रींच्या नातवाने हा सरकारी सन्मान सौजन्य म्हणून स्वीकारला असला तरी सरदारांच्या चरित्राची आणि चारित्र्याची कदर करणाऱ्या अशा आपण सर्वांनी, म्हणजेच त्यांच्या वारसांनी सरदारांचा आदर्श समोर ठेवून योग्य दिशेने, निर्धाराने वाटचाल केली पाहिजे. आपले लोकशाही प्रजासत्ताक समर्थ आणि परिपुष्ट व्हावे यासाठी शर्थ केली पाहिजे. आपल्या धडपडीनेच सरदारांच्या आत्म्याला समाधान मिळेल आणि अखिल भारतीय राष्ट्रीयत्वाची जपणूक करणारा आपला समाज अधिकाधिक स्वतंत्र, समतानिष्ठ आणि न्यायप्रिय होत जाईल असा माझा दृढ विश्वास आहे.

ऋणस्वीकार

‘साधने'च्या या सरदार पटेल विशेषांकाच्या अतिथी संपादकाची कामगिरी माझ्यावर सोपवल्याबद्दल दोन्ही संपादक - वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान यांचा मी आभारी आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या चरित्राचे आणि चारित्र्याचे सुयोग्य दर्शन नव्या पिढीस व्हावे हे खूप आवश्यक आहे अशा उदात्त भावनेने संपादकद्वयाने मला या पुण्यकार्यात सहभागी केले. ते कर्तव्य समजून आणि पूज्य साने गुरुजींच्या प्रेमळ व प्रेरक स्मृतीस वंदन करण्याच्या भावनेने ही जबाबदारी मी स्वीकारली.

ह्या निमित्ताने गुजरात- महाराष्ट्रामधील बंधुभाव अनायासे दृढतर होत आहे याचेही समाधान काही कमी नाही. गुरुजींची ‘आंतरभारती'ची संकल्पना व भावना साकार करण्याच्या हया धडपडीचे साधनेचा विशाल वाचकवृंद उत्स्फूर्तपणे स्वागत करील अशी आशा आहे.

संपादनाच्या, अनुवादाच्या, व्यवस्थापकीय अशा सर्व कार्यात मला सक्रिय व जिव्हाळ्याचा सहयोग देणारे प्रिय आप्त श्री. केशव गजानन मावळंकर ह्यांचा मी विशेष कृतज्ञ आहे. गुजराती लेखांच्या मराठी अनुवादाच्या कामात सर्वश्री जयंत जोशी, बलवंत दीक्षित, वासंती तोडकर यांनी मौल्यवान सहकार्य केले त्याबद्दल त्या सर्व मित्रांचेही हार्दिक आभार! गुजरातमधील ज्या ख्यातनाम लेखकांनी या विशेषांकासाठी खास लेख लिहिण्याची आमची विनंती स्वीकारून वेळेवर लेख पाठविले त्या सर्व सहृदयांचेही मनःपूर्वक आभार!

पु. ग. मा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी