डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपले विचार कितीही चांगले असले तरी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकूनच न घेणे, त्यावर विचार न करणे आणि तरीदेखील आपण उदारमतवादी आहोत असे म्हणणे यामध्ये एक अंतर्विरोध आहे. हे बदलायला हवे. समोरच्याचे विचार बदलायचे असतील तर त्याच्यावर जहरी टीका करणे हा मार्ग खूप वेळा अवलंबला जातो. पण अशी जहरी टीका करून किंवा समोरच्याला स्वतःविषयी कमीपणा वाटायला लावून माणूस बदलू शकत नाही. कारण यशस्वी नातेसंबंधात विन-विन पद्धत असते. म्हणजे दोघांचाही फायदा व्हायला हवा. पण आपल्याकडे नातेसंबंधात बहुतेक वेळा विन-लूझ किवा लूझ-लूझ पद्धत वापरली जाते. म्हणजेच, एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय, किंवा दोघांचाही पराजय. या पद्धतींमधून बदल घडून येत नाही, अपयश मात्र येते. ‘विन- विन’ हे व्यावसायिक यशाचे सूत्र नाही, त्याला विवेकाचा आधार आहे. 

नमस्कार, सर्वप्रथम मी एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि सुभाष वारेसर यांचे मन:पूर्वक अभिनंदन करू इच्छितो. कारण त्यांनी भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद हा थोडासा वेगळ्या वळणाने जाणारा आणि रूढ अर्थाने मांडणी झालेली नाही अशा स्वरूपाचा विषय निवडलेला आहे. भारतीय राज्यघटना आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षिता या मूल्यांच्या अनुषंगाने आतापर्यंत बरीच मांडणी झालेली आहे. त्याला एक पूर्वपीठिकाही आहे, तशी भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद या विषयाला नाही. आणि भारतीय राज्यघटनेतील मूल्ये व विवेकवाद या दोन्हींसाठी अत्यंत आव्हानात्मक अशा कालखंडात आपण सर्व जण राहत आहोत. अशा या पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद विषयावर आपण संवाद करणार आहोत.

सकस लोकशाहीसाठी राज्यघटनेतील मूल्ये नागरिकांच्या दैनंदिन आस्थेचा भाग होणे ही पूर्वअट आहे; पण राज्यघटनेतील मूल्यांची आपल्याला तीव्रतेने आठवण होण्याचे प्रसंग काही विपरीत घडत असेल, तरच येते. आणीबाणी हा या प्रकारचा कालखंड होता, आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्यानंतर निर्माण झालेले ताण हा दुसरा कालखंड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय राज्यघटनेतील अनेक मूल्यांविषयी वाद-संवाद झडत आहेत आणि संविधानविषयक जनजागृती करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नही केले जात आहेत. संविधानातील मूल्यांविषयी विशेष आग्रही असणाऱ्या संस्था-संघटनांचा एक परिवार असावा अशीदेखील मांडणी केली जात आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतचे सध्याचे वातावरण आपण पाहिले, तर समाजमनाने गमावलेला विवेक हे परत-परत दिसणारे एक सूत्र आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही मूल्ये जितक्या ठोसपणे राज्यघटनेत आली आहेत, तितक्या थेटपणाने विवेकवाद हे मूल्य आलेले नाही. त्या अनुषंगाने चर्चा सुरू व्हावी, हा भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद या मांडणीचा उद्देश आहे.

 या विषयाला एक दुखरी बाजूदेखील आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 50 महिने पूर्ण झाले आहेत, तरी अद्यापही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. गेल्या  चार वर्षांमध्ये कॉम्रेड पानसरे, प्रा.कलबुर्गी, गौरी लंकेश असे आणखी तीन खून झाले; त्यांचेही मारेकरी सापडलेले नाहीत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी उभी हयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना साप्ताहिक, सामाजिक कृतज्ञता निधी तसेच व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळी उभ्या करण्यात खर्ची घातली. त्यांच्या या सर्व कामाच्या गाभ्यातील सूत्र दोन शब्दांमध्ये सांगायचे असेल, तर ते ‘भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद’ हेच ते असेल असे मला वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सगळी उभारणी असो किंवा त्यांच्या कालखंडामध्ये साधना साप्ताहिकाचा झालेला प्रवास असो, हीच दोन सूत्रं मध्यवर्ती दिसतात आणि त्यांच्या लेखनामध्ये या सगळ्याचे संदर्भ विपुल प्रमाणात आढळतात. ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शेवटच्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण विवेकवाद हे आहे. पण भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद यांची एकत्रित मांडणी करण्यासाठी पुरेसा अवकाश त्यांना मिळाला नाही. आज भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि विवेकवाद या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्याचे दिसते आहे, म्हणून ही मांडणी पुढे नेण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्यदेखील आहे.

हा विषय समजून घेताना, एका बाजूला भारतीय राज्यघटनेचा संदर्भ आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला विवेकवादाचा संदर्भदेखील समजून घ्यावा लागेल. या दोन्हींमध्ये काही सांधेजोड, काही साम्यस्थळे आहेत का, याची तपासणी करावी लागेल. सध्याच्या सामाजिक समस्यांशी या दोन्हींचे काय नाते आहे आणि त्या समस्यांमधून बाहेर पडायला या दोन्हींचा आधार घेऊन काही दिशादर्शन मिळू शकते का, असे माझ्या मांडणीचे सूत्र असणार आहे.

अर्थात, मी काही रूढ अर्थाने भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक नाही आणि राज्यघटनेतील शब्दार्थ समजून घेण्याविषयी बोलावे इतका माझा अभ्यास नाही; पण राज्यघटनेच्या भावार्थाच्या अनुषंगाने मी बोलणार आहे.

‘राज्यघटनेची चौकट कशासाठी लागते?’ या मूलभूत प्रश्नापासून आपण सुरुवात करू. या प्रश्नाचे सोपे उत्तर असे आहे की, इथल्या सामाजिक जीवनाचे नियमन व्हावे यासाठी ही चौकट आपल्याला लागते. या चौकटीने सार्वजनिक जीवनाचे नियमन करावे आणि समाजजीवनावर प्रभाव टाकणाऱ्या वैयक्तिक जीवनाचेही नियमन करावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनात तुम्ही काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावेत याचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेची गरज नाही; परंतु जिथे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाची सांधेजोड होते, तिथे मात्र तिची गरज लागते. मग पुढचा प्रश्न असा येतो की, राज्यघटना यायच्या आधी असे नियमन कोण करत होते? पहिली होती धर्मव्यवस्था आणि दुसरी राज्यव्यवस्था. म्हणजे आपण भारतीय राज्यघटनेच्या उत्पत्तीचा विचार करायला लागतो तसतसे आपल्या लक्षात येते की, ज्यांनी या राज्यघटनेची निर्मिती केली त्यांना याचे स्पष्ट आकलन होते, की ही चौकट कशाचे नियमन करणार आहे आणि तिला कोणाच्या विरोधात उभे राहायचे आहे. एकाच वेळी धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या दोन्हींच्या विरोधात ही चौकट असणार आहे. सध्या आपल्या देशातील राजकारण जर तुम्ही बघितले तर आपल्याला एक तिसराही हितशत्रू दिसून येतो. हा वर्ग म्हणजे राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्यघटनेच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासणारे राज्यकर्ते. त्यांना हे शासन उलथवून टाकायचे नाही, ना त्यांना धर्मकारण आणायचे आहे; परंतु या दोन्ही गोष्टींचा त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी पाहिजे तेवढा व पाहिजे तसा वापर करून घ्यायचा आहे आणि आम्ही राज्यघटनेच्याच बाजूचे आहोत, असेदेखील म्हणायचे आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यघटनेला अभिप्रेत राज्य असावे, अशी त्यांची इच्छा नाही. हा संदर्भ विवेकवाद समजून घेण्याचा प्रयत्न करताना खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणताही माणूस आपल्या विवेकाला साक्षी ठेवून निर्णय आणि कृती करायला लागतो, तेव्हा त्याला सर्वप्रथम धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांच्या विरोधातच उभे राहावे लागते. म्हणजे भारतीय राज्यघटनेची मूल्ये आणि विवेकवाद यांचे हितशत्रू एकाच प्रकारचे आहेत, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.

राज्यघटनेची चौकट आणि विवेकवाद यांचा संबंध समजून घ्यायचा असेल, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा मसुदा घटना समितीसमोर मांडताना केलेल्या भाषणाचा संदर्भबिंदू अत्यंत महत्त्वाचा आहे. या भाषणाचा शेवट करताना बाबासाहेब म्हणतात, ‘नियमन करणारी कोणतीही चौकट तितकीच चांगली असते, जितकी तिची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती व समाज चांगले असतात. म्हणजे ती नियमन चौकट कितीही  चांगली असली, परंतु तिची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था व व्यक्ती चांगल्या नसल्या; तर त्या चौकटीला काही अर्थ राहत नाही. तसेच त्या अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती व संस्था जर चांगल्या असतील, तर मग नियमन करण्यासाठी एखादी चौकट आहे का नाही, या गोष्टीला फारसा अर्थ उरत नाही.’’ हे बोलताना बाबासाहेब नक्की कोणत्या मूल्याविषयी सांगत आहेत असा आपण विचार केला; तर सहजच लक्षात येते की, ते माणसाच्या सदसद्‌विवेकबुद्धीविषयी बोलत आहेत. विवेकाविषयी म्हणजेच चांगल्या-वाईटामध्ये फरक करण्याची माणसाची जी क्षमता आहे, त्याविषयी बोलत आहेत. व्यक्ती आणि समाजामध्ये विवेकक्षमता नसेल, तरी राज्यघटनेची चौकट कितीही चांगली असली तरी ती कशी प्रभावहीन होते, ते आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत आहोतच. या पार्श्वभूमीवर विवेकवाद हे राज्यघटनेतील गाभ्याचे मूल्य म्हणून समोर येऊ लागते. थोडे याही पुढे जाऊन एक विधान विचारपूर्वक करावेसे वाटते  ते असे की- भारतीय राज्यघटनेमधील प्रमुख मूल्ये- म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही सगळी- माणसाच्या विवेकाची उपपत्ती आहेत. या विधानाचा माझ्या मनातला अर्थ स्पष्ट करण्यासाठी आधी विवेकवादाची संकल्पना लक्षात घ्यायला हवी.

‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्यात्मक आशय’ अशी विवेकाची व्याख्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव समजून घेणे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही कारण असते आणि ते आपल्याला समजू शकते, असा विश्वास हा कार्यकारणभाव आपल्याला देतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ही विज्ञानाची कार्यपद्धती आहे आणि विज्ञानामुळे लागणारे सर्व शोध या कार्यपद्धतीच्या वापराने शक्य होतात. या कार्यपद्धतीमध्ये एखाद्या गोष्टीविषयी तर्क बांधणे, निरीक्षण करणे, अनुमान काढणे आणि ते परतपरत तपासणे या सूत्रांचा अंतर्भाव असतो. हाच कार्यकारणभाव नीतीच्या प्रांतात वापरणे किवा चांगले काय आणि वाईट काय यामधील फरक समजण्यासाठी वापरणे, म्हणजेच विवेकवाद- असे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे प्रतिपादन होते. याविषयी ते समजायला सोपे असे अणुऊर्जेचे उदाहरण कायम देत असत. अणुऊर्जेची निर्मिती हा पूर्णपणे विज्ञानाचा प्रांत आहे, याविषयी कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. पण अणुउर्जेचा वापर उर्जेची गरज भागवण्यासाठी करायचा की अणुबॉम्ब तयार करण्यासाठी?’ या प्रश्नाचे उत्तर देणे विज्ञानाचे काम नाही, ते धर्माचे अथवा नीतीशास्त्राचे काम आहे, असा आपल्याकडे सार्वत्रिक समज आहे. डॉ.दाभोलकरांच्या मते; विज्ञानाची कार्यपद्धती असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव, आपण नीतीच्या प्रश्नालादेखील लावू शकतो. असे जेव्हा आपण करतो, तेव्हा त्याला विवेक असे म्हणतात. अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्बसाठी करायचा की ऊर्जेची गरज भागवण्यासाठी, या प्रश्नाचे उत्तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून, म्हणजेच विवेकाचा वापर करून मिळवू शकतो त्यासाठी अणुबॉम्ब वापरल्यावर काय होईल याचा तर्क करणे, त्याच्या दुष्परिणामांचे निरीक्षण व त्यामधून आलेली प्रचिती यांचा विचार करून आपण अणुबॉम्ब करायचा की, अणुऊर्जेचा वापर ऊर्जेचे संकट दूर करण्यासाठी- हा (नैतिकतेच्या प्रांतात येणारा) निर्णय घेऊ शकतो. भले ही गोष्ट प्रयोग करून सिद्ध करता येऊ शकणार नाही, पण आपल्या सदसद्‌विवेकबुद्धीच्या कार्यकारणभावाचा वापर हा प्रश्न सोडवताना करू शकतो. असे करणे म्हणजेच विवेकवादी वर्तन. मानवसमूहाचे किंवा निसर्गातील जास्तीत जास्त घटकांचे हित या कसोटीचा परिघ मात्र याला आवश्यक आहे. विवेकवादाचे हे आकलन आणि बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितलेली वर नमूद केलेली कसोटी या दोन्ही एकच गोष्टी आहेत, हे आपण मान्य करत असू, तर राज्यघटनेच्या गाभ्यातील मूल्य म्हणून विवेकवादाकडे पाहायला हवे.

‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे विवेकवादाचीच उपपत्ती आहे’ असे विधान मी वरती केले आहे, ते जरा तपासून बघू. हे विधान आपण तर्काच्या कसोटीवरही तपासून पाहू शकतो. उदाहरणार्थ- ‘स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे?’ हा प्रश्न घेऊ- ‘ती माझी आंतरिक गरज आहे, माझा हक्क आहे’ असे याचे उत्तर येते. मग आपल्यासारखीच आशा- आकांक्षा असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला मी स्वतःचा गुलाम बनवून ठेवणे योग्य नाही, हा योग्यायोग्यतेचा निकष येथे लावावा लागतो. हा निकष आपल्या विवेकबुद्धीचा आहे. याच पद्धतीने समता, बंधुता, सामाजिक न्याय,  धर्मनिरपेक्षता या सगळ्यांच्या मुळाशी असलेले चांगल्या-वाईटामधील फरक करण्याचे भान म्हणजेच विवेकबुद्धी.

याचाच अर्थ- माणसे जेव्हा विवेकबुद्धी वापरायचे सोडतात किंवा टाळतात, तेव्हा राज्यघटनेत दिलेली सर्व मूल्ये धोक्यात येतात. राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या सगळ्यांचा अविवेकाने ग्रासलेले मन हा सर्वांत मोठा शत्रू आहे. या पातळीवर आपण विचार करू लागतो, तेव्हा भारतीय राज्यघटना व त्यामधील मूल्ये यांचा विचार माणसाच्या जैविकतेशी आणि उत्क्रांतीशीदेखील जोडून घेण्याची मोठी संधी आपल्याला उपलब्ध होते.

विवेकभावना ही अगदी प्राथमिक पातळीवर काही प्राण्यांमध्ये दिसू शकते, उन्नत पातळीवर मात्र ती फक्त माणसामध्येच दिसून येते. या सगळ्यांचे जैविक अधिष्ठान आपला मेंदू आहे. माणसाच्या विवेकबुद्धीची निर्मिती ही त्याच्या मेंदूमध्ये होते. माणसाच्या मेंदूमध्ये प्राण्यांचा मेंदू आहे, त्याला लिम्बिक कॉर्टेक्स म्हणतात. हा प्रामुख्याने भाव-भावनांचा मेंदू आहे. त्याच्यावर जो उन्नत मेंदू आहे, त्याला निओ कॉर्टेक्स म्हणतात. तो तुम्ही-मी माणूस असण्याची सगळ्यात मोठी खूण आहे. तो माणसाच्या विवेकाचे आपल्या शरीरातील जैविक अधिष्ठान आहे. त्याच्यामुळे चांगले-वाईट समजण्याची क्षमता माणसात येते. म्हणजे आपण जे सगळे बोलतोय, त्याला उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा आधार आहे. त्यामुळे मेंदूतील आणि उत्क्रांतीतील विवेक, विवेकवाद व राज्यघटनेतील विवेक ही एकमेकांत गुंफलेली मांडणी बनते. माणसाच्या मनातील प्राणिविश्वाला जवळ जाणाऱ्या भावना (उदा. स्वार्थ, असूया) आपल्या जीवनात विवेकाच्या वरचे स्थान घेतात, त्या वेळेला समाजाच्या भल्यासाठी ही राज्यघटनेची चौकट लागते. अशा वेळी ही चौकट माणसाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाचे नियमन करते.

या विवेकवादी मूल्याला जैविक आधार आहे आणि ऐतिहासिक-सामाजिक संदर्भदेखील आहेत. पाश्चिमात्य जगामध्ये झालेल्या धर्मसत्ता (त्यातही ख्रिश्चन धर्म) आणि राज्यसत्ता यांच्यामधील संघर्षामधून ते उभे राहिले आहे. स्वाभाविकच, विवेकवाद हे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न जिथे झाला, तिथे त्याचा पहिला शत्रू संघटित धर्मसत्ता राहिला. भारतीय परंपरेमध्ये तर विवेकवादाच्या भरपूर पाऊलखुणा आहेत. ज्या संत-सुधारकांचा वारसा आपण सातत्याने सांगतो, त्या (अगदी गौतम बुद्धांपासून, कबीर, तुकाराम, गाडगेबाबा, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत) सगळ्यांच्या कामामध्ये या पाऊलखुणा दिसतात. या सगळ्यांची मांडणी थेट विवेकवादाची नसेल, परंतु माणसाच्या चांगल्या-वाईटामध्ये फरक करण्याच्या क्षमतेला ते सतत आवाहन करत राहतात आणि मानवी जीवनातील नियमांची सर्वसमावेशक चौकट तयार करण्याचादेखील प्रयत्न करतात. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। मानलीये नाही बहुमता।’ म्हणणारे तुकाराम एका बाजूला विवेकवाद सांगत असतात. तर दुसऱ्या बाजूला लोकशाही व बहुमतशाहीमध्ये फरक करण्याचे भानदेखील देत असतात.

भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद यांच्यामधील सांधेजोड करणे एवढाच आपला उद्देश नाही, तर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत विवेकवादाला अनुरूप कृतिकार्यक्रम काय असू शकतो, याचादेखील आपण अंदाज घ्यायला हवा. असे अनेक कार्यक्रम असू शकतात पण विज्ञान आणि विवेकवादाच्या प्रांतात काम करणारे संघटन म्हणून आपण अंनिसचे उदाहरण घेऊ. माणसाच्या मनातील ही विवेकभावना कृतिशील आणि संघटित करणे याचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना खूप अप्रूप होते. त्यांनी अंनिसच्या सुरुवातीच्या कालखंडात एकदा मे.पुं.रेगे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘विवेकवादाचा कृतिकार्यक्रम काय असेल?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘हा विषय महत्त्वाचा असून यावर आपण एक चर्चासत्र घडवून आणू’ असे तत्त्वज्ञानाच्या या दोन्ही अभ्यासकांनी सुचवले होते. प्रत्यक्षात हे चर्चासत्र कधीच झाले नाही, पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ.नरेंद्र दाभोलकर उभी हयात करत राहिले. महाराष्ट्र अंनिस आणि साधनाचे काम करीत असताना, विवेकवाद व राज्यघटना हे दोन संदर्भबिंदू त्यांच्या कामामध्ये सातत्याने दिसून येतात. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तर अंधश्रद्धा निर्मूलन हा विवेकवादाचा एक महत्त्वाचा कृतिकार्यक्रमच आहे, असे अनेक वेळा ते म्हणाले आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनापासून स्वत:च्या कामाची सुरुवात केली असली, तरी सामाजिक न्याय, समता, बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूल्यांशी आपले काम सुसंगत असावे आणि त्या दिशांनी वाढणारेदेखील असावे अशी त्यांची तळमळ होती.  त्याचमुळे अंधश्रद्धांचे निर्मूलन हे जरी अंनिसचे प्राथमिक कार्य असले तरी जातिनिर्मूलन, आंतरजातीय विवाह लावणे, जातपंचायतीला विरोध, स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करणे, व्यसनाला विरोध, समाजात बंधुभाव वाढवा म्हणून केलेले प्रयत्न- हे सगळे प्रकार अंनिसच्या कामाचा नैसर्गिक विस्तार म्हणून समोर येतात.

भारतीय संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. हे कलम नुसते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार इथपर्यंतच मर्यादित नाही, तर ह्युमॅनिझम (मानवतावाद) आणि स्पिरिट ऑफ रिफॉर्म ही दोन्ही कर्तव्ये त्यामध्ये नमूद केलेली आहेत. राज्यघटनेतील या सूत्रांना धरूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची चतुःसूत्री तयार झाली आहे. पहिले सूत्र- शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, दुसरे सूत्र- वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार, तिसरे सूत्र- विधायक व कृतिशील धर्मचिकित्सा आणि चौथे सूत्र- सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या समविचारी संस्था-संघटनांशी जोडून घेणे. अंनिसची ही चारही सूत्रे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. याच्यामध्ये जसा एक विचार आहे, तशीच एक रणनीती आहे- धोरणदेखील आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर सुभाष वारेसरांनी साधनात जो लेख लिहिला होता, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की- ‘मर्यादित साधनांचा अमर्याद परिणाम साधण्यासाठी प्रयत्न’ हा डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील त्यांना भावलेला विशेष होता. हे लक्षात घेतले, तर अंधश्रद्धा निर्मूलन हा अंनिसचा मर्यादित परिघ आहे. आणि भले त्याची ताकद मर्यादित असली, तरी राज्यघटनेच्या चौकटीतील विवेकवादी समाज निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे व्यापक उद्दिष्ट येथील धर्मसत्तेला व चुकीच्या पद्धतीने राज्यसत्ता चालवणाऱ्यांना धोकादायक वाटले, तर त्यात नवल ते कोणते! हे आपण समजून घेतले, तर डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा याच कालखंडात का खून झाला, हे लक्षात येणे फार अवघड जात नाही. म्हणजे योग्य विचारांचे महत्त्व त्याच्या प्रचारकाला जेवढे माहीत नसते तेवढे त्याच्या विरोधकाला माहीत असते, या वाक्याचे ते ज्वलंत उदाहरण आहे.

अंनिसने गेल्या पंचवीस वर्षांत केलेली सर्व कामे आणि सर्व लढे याच भूमिकेचा विस्तार आहेत. त्या सगळ्यांचा आढावा घेण्याची ही जागा नाही, पण हा संदर्भ इथे नमूद करणे मला आवश्यक वाटते. केवळ एकाच गोष्टीचे मी इथे उदाहरण देणार आहे, ते म्हणजे अंनिसची ‘देव आणि धर्म’ याविषयीची भूमिका. भारतीय राज्यघटना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यातून पुढे येणारा विवेकवाद कृतिशील करण्याची आणि तो समाजमनाला स्वीकारार्ह वाटण्याची शक्यता यामधून निर्माण होते. म्हणून ती आपण समजून घेतली पाहिजे. जगभरातील विवेकवादी आणि अंनिस यामध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे- देव आणि धर्म यांच्यावर फुली मारल्याशिवाय विवेकवादी होता येत नाही, असे जगभरातील बहुतांश विवेकवादी लोकांचे म्हणणे आहे. मात्र, अंनिसचा विरोध देवाला किंवा धर्माला नाही, तर देव व धर्माच्या नावाखाली होणाऱ्या ‘शोषणाला’ आहे. म्हणजे तुम्हाला जर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करायचे असेल तर ‘तुम्ही देव-धर्म मानता का?’ असा प्रश्न कोणी विचारणार नाही; परंतु ‘तुम्ही तुमच्या देवाची आणि धर्माची चिकित्सा करायला तयार आहात का?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र द्यावे लागेल. म्हणजेच अंनिसची देव- धर्माविषयीची भूमिका ही संविधानाला अभिप्रेत असलेली तटस्थ भूमिका आहे. ती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतील आहे, असे सातत्याने अंनिस म्हणत आली आहे. याचा अर्थ- एका बाजूला राज्यघटनेने लोकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये धर्म निवडण्याचे, उपासनापद्धतीचे, पारलौकिक कल्याणाचे स्वातंत्र्य दिलेले आहे (या देवा- धर्माच्या चौकटीतील गोष्टी आहेत); परंतु यांच्यामुळे जर देशाचे, नागरिकांचे हित, आरोग्य, सार्वजनिक मालमत्ता व समाजाची नैतिकता यांचे प्रश्न निर्माण होणार असतील तर त्या स्वातंत्र्याचा अवकाश सीमित करण्याचा अधिकार संविधानाने राखून ठेवलेला आहे. या अधिकारांमुळे धर्माच्या नावावर होणाऱ्या उन्मादाला, त्याच्या राजकारणाला चाप लावण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे देव आणि धर्म याविषयीची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका यालाच धरून जाणारी आहे. पण अंनिस ही भूमिका केवळ मांडून थांबत नाही, तर शोषण करणाऱ्या बाबा-बुवांना पकडण्याबरोबरच त्यासाठी कायदा करण्याचा आग्रह धरते. असा कायदा, जो स्पष्टपणे म्हणेल की या समाजाचे शोषण करणाऱ्या रूढी, परंपरा इथल्या धर्माचा भाग नाहीत. उदा. नरबळी देणे, धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणे. म्हणजेच संघटित धर्मसत्तेला आणि तिचा वापर करणाऱ्या  राजकारणाला कायद्याच्या माध्यमातून अंनिस मुळामधून आव्हान देते. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत विवेकभावनेला कृतिशील करण्याचा हा प्रयत्न आहे. हे आव्हान सध्या छोटे का असेना, पण भविष्यात ते आपल्या मुळावर येऊ शकते, याची जाणीव असल्याशिवाय डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊच शकत नाही.

इतर सर्व कार्यक्रमांच्या बरोबरीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती दर वर्षी ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ साजरा करते, कारण विवेकवाद आणि संविधान हे अंनिसच्या कामाचे मोठे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारा कोणीही कार्यकर्ता असे विचारत नाही की, ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ आपण का साजरा करतो? त्यांना हे पक्के माहीत आहे की, आपण अंधश्रद्धांच्या विरोधात काम करतो, म्हणजे आपण संविधानाला अभिप्रेत काम करतो! यातले अद्वैत हे काम करणाऱ्याला आतून समजून येते. मग जातीच्या विरोधामध्ये काम करणे, आंतरजातीय विवाह लावणे किंवा जातपंचायतीच्या मनमानीच्या विरोधामध्ये काम करणे हेदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम बनते. कारण निरंकुश धर्मसत्तेसारखीच जातपंचायतही संविधानाला पूर्णपणे छेद देणारी यंत्रणा आहे. हे अपघात नाहीत, याच्यामध्ये एक धोरण आहे, एक विचार आहे आणि तो भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला विवेकाधिष्ठित समाजनिर्मितीचा विचार आहे.

हे झाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी. तिच्याच पुढाकाराने 2003 मध्ये ‘विवेकवाहिनी’ या नावाने एक संघटना सुरू झाली, महाविद्यालयीन मुलांसाठी. तिचे ब्रीदवाक्य आहे- ‘आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी’. 1976 मध्ये केलेल्या 42 व्या घटनादुरुस्तीमध्ये भारतीय नागरिकांची 11 कर्तव्ये देण्यात आलेली आहेत. याचे कारण केवळ हक्काची भाषा करून आपला समाज पुढे जाऊ शकत नाही, त्याला कर्तव्यांची पण जोड देणे आवश्यक आहे.

अर्थात, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जितके हक्काविषयी जागृत असतो, तितके कर्तव्याविषयी नाही. आपले लोकप्रतिनिधी चांगले नाहीत म्हणून आपण सातत्याने ओरड करतो, परंतु किती तरुण मुलांनी आपली नावे मतदारयादीत नोंदवलेली असतात? बहुतांश वेळा 50 ते 60 टक्के मुलांनी ती नोंदवलेली नसतात. ज्यांनी नोंदवलेली आहेत, त्यापैकी किती जणांनी मतदान केलेले असते? आपल्याकडे याचे समाधानकारक उत्तर नसते. जे निवडून आलेत, त्या प्रतिनिधींचे नावही अनेकांना माहीत नसते, मग त्यांना भेटून वाईट कामासाठी जाब विचारणे ही तर फारच लांबची गोष्ट! म्हणजे आपल्याला सगळे हक्क पाहिजेत. चांगले रस्ते पाहिजेत, कचराकुंडी पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, चांगले शिक्षण पाहिजे; पण त्यासाठी आवश्यक असलेले कर्तव्य बजावण्याची तयारी नसते. ते दुसरे कोणी तरी पार पाडेल, अशीच आपली धारणा असते. या समाजामध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून होतात; तेव्हा काही लोक म्हणतात, ‘कशाला तुम्ही ह्या फंदात पडताय? तुमचे व्यवस्थित चाललेय ना? आपले आपण बघावे नाही, तर न जाणो आणखी कोणाला मारतील!’ अशा वेळी या ‘कर्तव्या’बद्दल बोलणे खूप गरजेचे बनते. ही कर्तव्ये मूठभर लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बजावावीत आणि बाकी समाजाने त्यांच्याकडे ‘हीरो’ म्हणून बघण्यापलीकडे काहीच करू नये, हे चांगल्या समाजाचे चित्र नाही; आणि म्हणूनच हक्कांएवढेच कर्तव्यांविषयी बोलणे महत्त्वाचे आहे. आपल्याला कर्तव्ये बजावायची म्हणजे काय? कुठली कर्तव्ये आहेत आपली? भारतीय संविधान अनुसरणारे आपण कर्तव्यदक्ष नागरिक आहोत का? भारतीय संविधानात सांगितलेली काही कर्तव्ये अशी आहेत :

1. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज या राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे.

2. भारतीय संविधानाचा आदर करणे.

3. देशाच्या परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा आदर करणे.

4. समाजात बंधुभाव वाढवणे.

5. सार्वजनिक मालमत्तेचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे.

6. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे.

7. हिंसेच्या विरोधात उभे राहणे.

8. सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास घेणे.

यातील काही कर्तव्ये आपण पार पाडतोदेखील. काही गोष्टींविषयी मतभेद होऊ शकतात. उदा. ज्या परंपरांचा आदर करायचा, त्या कुठल्या- यावरून वाद  होऊ शकतो. परंतु विविधतेत एकता ही जी आपली संस्कृती आहे, ती जपण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. न्यायमूर्ती वर्मांच्या कमिटीने काही कर्तव्ये संविधानात आणखी वाढवावीत, असे सांगितले आहे. उदा. वेळेवर इन्कम टॅक्स भरणे, अन्याय सहन न करणे.

आम्ही विवेकवाहिनीची केलेली त्रिसूत्री अशी आहे- ‘विवेकी व्यक्तिमत्त्व, समाजाभिमुख कर्तृत्व आणि जागरूक नागरिकत्व’. आणि मला असे वाटते की, ‘विवेकी व्यक्तिमत्त्व’ हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

महात्मा गांधींचे एक चांगले वाक्य आहे- ‘सुधारणांची सगळ्यात जास्त गरज त्या सुधारकाला असते.’ हे वाक्य ‘विवेकी व्यक्तिमत्त्व’ या सूत्राविषयी बोलते. माणसात जसे चांगले-वाईट समजण्याची क्षमता आहे, तशीच स्वतःकडे तटस्थपणे बघण्याचीदेखील क्षमता आहे. ती पृथ्वीतलावरील फारच कमी प्राण्यांना मिळाली आहे आणि माणसाएवढी उन्नत तर कोणालाच नाही. म्हणजे आपण स्वतःकडे तटस्थपणे बघू शकतो, आपण काय वागतोय त्याचा लेखा-जोखा घेऊ शकतो, त्यातले चांगले-वाईट ठरवू शकतो, अधिक विवेकी माणूस बनू शकतो.

आता आपण बाबासाहेबांच्या त्या वाक्याकडे परत जाऊ या. ज्या समाजामध्ये चांगले-वाईटपणाचे भान सुटलेली माणसं जास्त असतील, त्या समाजामध्ये नियमनाची चौकट कितीही चांगली असली तरी काहीही करू शकणार नाही. त्यामुळे स्वतःमधील सकारात्मक घटक वृद्धिंगत करणे आणि नकारात्मक घटक (उदा. असूया, राग, द्वेष इ.) घालवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्त्व विवेकाधारित करणे- हा संविधानाची चौकट बळकट करण्याचा पहिला मार्ग आहे.

दुसरे सूत्र आहे, ‘समाजाभिमुख कर्तृत्व’. आपल्या प्रचलित समाजाचे मॉडेल अभ्यासले तर हे लक्षात येते की, आपल्या समाजातील बदल मूठभर लोकांच्या असीम त्यागावरती उभे राहिलेले आहेत; बहुतांश लोकांच्या थोड्या-थोड्या त्यागावर नाही! समाजाभिमुख कर्तृत्व हे संविधानाप्रति असलेल्या आपल्या कर्तव्याशी जोडले गेलेले आहे. बहुतेक वेळा आपण करत असलेले काम हे आपल्या वैयक्तिक आयुष्याला पुढे नेणारेच असते. पण ‘ते समाजालासुद्धा हितकारक आहे का’ हा विचार समाजाभिमुख कर्तृत्वात येतो. जे काम मला वैयक्तिक आयुष्यात पुढे नेईल आणि माझ्याबरोबर आजूबाजूच्या समाजाच्या विकासासाठीसुद्धा पोषक असेल, असेच काम मला करायचे आहे याउलट, जे काम माझा स्वार्थ जपणारे आहे, परंतु समाजाच्या विकासाला हानिकारक आहे, ते मी करणार नाही- हा विचार समाजाभिमुख कर्तृत्त्वाचे सूत्र सांगतो.

तिसरे सूत्र आहे, ‘जागरूक नागरिकत्व’. आपल्या सगळ्यांच्या जीवनधारा वेगवेगळ्या असतील, काही मतभेद असतील; परंतु त्यापलीकडे जाऊन आपण या देशाचे नागरिक आहोत, ही समज आपल्याला एकत्र आणणारी ठरू शकते. हे आपले नागरिकत्व आपण किती जागृत ठेवतो, किती पातळ्यांवर गतिमान करतो यावर आपली लोकशाही किती सक्षम-सुदृढ होणार, हे अवलंबून आहे. जयप्रकाश नारायणांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे, ‘स्वातंत्र्याची किंमत ही सततची जागरूकता आहे’. कारण कोणी तरी प्रकटपणे अथवा अप्रकटपणे तुमच्यावर सत्ता गाजवू इच्छिणार असते. म्हणून स्वतःचे स्वातंत्र्य गमवायचे नसेल, तर ही जागरूकता दाखवावीच लागते.

विवेकवादाच्या अंगाने समाजबदलाकडे पाहायचे, तर काही कार्यपद्धतींमध्ये बदल करावे लागतील. उदा.- परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या अनेक लोकांची ही कायमच अडचण राहिली आहे की, त्यांना दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकूनच घेता येत नाही. आपले विचार कितीही चांगले असले, तरी दुसऱ्याचे म्हणणे ऐकूनच न घेणे, त्यावर विचार न करणे आणि तरीदेखील आपण उदारमतवादी आहोत असे म्हणणे- यामध्ये एक अंतर्विरोध आहे. हे बदलायला हवे. समोरच्याचे विचार बदलायचे असतील- तर त्याच्यावर जहरी टीका करणे हा मार्ग खूप वेळा अवलंबला जातो. पण अशी टीका करून किंवा समोरच्याला स्वतःविषयी कमीपणा वाटायला लावून माणूस बदलू शकत नाही. कारण यशस्वी नातेसंबंधांत विन-विन पद्धत असते. म्हणजे दोघांचाही फायदा व्हायला हवा. पण आपल्याकडे नातेसंबंधांत बहुतेक वेळा विन-लूझ किवा लूझ-लूझ पद्धत वापरली जाते. म्हणजेच, एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय, किंवा दोघांचाही पराजय. या पद्धतींमधून बदल घडून येत नाही, अपयश मात्र येते. ‘विन-विन’ हे व्यावसायिक यशाचे सूत्र नाही, त्याला विवेकाचा आधार आहे. कारण यामध्ये दोघांचे मुद्दे विचारात घेऊन योग्य-अयोग्याचा विचार करून मार्ग ठरविलेला असतो, त्यातून समाज जास्त पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते.  

आता तुम्हाला वाटेल की, हे भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद म्हणता-म्हणता आपण कुठे येऊन पोचलो! पण यामध्ये एक अंतर्गत सूत्र आहे. समाज बदलासाठी प्रयत्न करताना आधी स्वतःमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. कारण स्वतःला अधिक उन्नत, अधिक प्रगल्भ केल्याशिवाय समाजबदलासाठी आपण चांगले योगदान देऊ शकत नाही.

सध्याच्या परिस्थितीमध्ये संविधान बांधिलकी हाच आपल्या सगळ्यांना जोडणारा दुवा होऊ शकतो, असे मला वाटते. त्यामुळे हे ज्यांना पटते असे जनाधार शोधणे, त्यांना आपल्याबरोबर जोडून घेणे, त्यांच्याबरोबर नवेन प्रश्न शोधणे, ते संविधानाच्या चौकटीत लढवणे आणि त्याच वेळी स्वतःचे भान न गमावणे- हे सतत करावे लागणार आहे. हे अधिक प्रभावीपणे करायला शिकलो, तर आपल्या आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही; दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या खुनानंतर तर नक्कीच. परंतु संविधानाप्रति असलेल्या ज्या कर्तव्यांविषयी आपण बोललो ती आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत, असे आपण मानत असू; तर या धोक्यासकट आपण ती पार पाडली पाहिजेत, असे मला वाटते.

शेवटचे दोन मुद्दे सांगून थांबणार आहे. मला असे वाटते की, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या परीने समाज बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध विचारसरणींमध्ये सांधेजोड करण्याचा अवकाश निर्माण करणारा विवेकवाद हा विचार ठरू शकतो. त्याचे पहिले उदाहरण म्हणजे मध्यबिंदूच्या उजवीकडचे (right to the center ) आणि डावीकडचे (left to the center) यांच्यामधील सांधेजोड करणे. सध्या समाजात मध्यबिंदूच्या उजवीकडचा एका मोठा वर्ग आहे की- जो वैयक्तिक आयुष्यात धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो, जातिव्यवस्थेच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो, कट्टरतेच्या राजकारणाच्या विरोधात आहे, परंतु तो समूह आर्थिक उदारीकरणाचा समर्थक आहे. म्हणजे सामाजिक दृष्टीने तो समूह डाव्या बाजूला आहे, पण उजव्या विचारसरणीने त्यांना आपल्याकडे ओढले आहे. त्यामुळे लेफ्ट टू द सेंटर लोकांचे बळ खूपच कमी झाले आहे. आपण जेव्हा समाजपरिवर्तनाचा विचार करू, तेव्हा अशा समाजरचनेचा विचार करायला हवा, ज्यामध्ये उद्यमशीलतेला प्राधान्य दिले जाईल. जे आहे त्याचेच समान वाटप न करता, नवे निर्माण करण्यासाठी योग्य वातावरण तयार केले जाईल. असे केले तर राईट टू द सेंटर आणि लेफ्ट टू द सेंटर लोकांची सांधेजोड करता येईल. मग त्यांच्या एकत्रित समूहाला तुम्ही मध्यरेषेच्या उजवीकडचे किवा डावीकडचे असे काहीही म्हणा किंवा राज्यघटनावादी-विवेकवादी म्हणा; त्याने फारसा फरक पडणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विवेकवादी चळवळी ही सांधेजोड करण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडू शकतात.. मी जेव्हा उलटा विचार करतो तेव्हा मला वाटते की, डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस हीच भूमिका निभावत होते. आपण जर थोडे थांबून मागे वळून पाहिले व विचार केला तर, माणसातील विवेकाला साद घालून व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणारे गांधी आणि आर्थिक चौकट वैज्ञानिक दृष्टीने तपासून ती अखिल मानवजातीच्या हितासाठी बदलू पाहणारा मार्क्स यांच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे त्यांच्यातील सामाईकता शोधताना विवेकवाद आणि राज्यघटनेतील सामाजिक न्याय याच दोन संदर्भबिंदूंपाशी येऊन पोचतो.

विनोबांचे एक वाक्य आहे- ‘धर्म व राजकारण जाईल, विज्ञान आणि अध्यात्म राहील’. विज्ञान राहील म्हणजे काय राहील, ते तर आपल्याला स्पष्ट दिसू शकते. म्हणजे समाजनियमनाची पूर्वीची धर्माची चौकट जाईल आणि विज्ञानावर आधारित चौकट येईल. राजकारण जाईल आणि अध्यात्म राहील असे विनोबा म्हणतात, त्या अध्यात्माचा अर्थ माझ्यामते चांगल्या-वाईटामध्ये फरक करण्याची शक्ती म्हणजेच विवेक- असा आहे, कार्ल मार्क्सचे वाक्य डॉ.नरेंद्र दाभोलकर नेहमी उद्‌धृत करायचे- ‘विचार जेव्हा जनसमुदायांची पकड घेतात तेव्हा ते भौतिक शक्ती बनतात.’ राज्यघटनेतील मूल्ये भौतिक शक्ती म्हणून समाजात आणायची असेल, तर विवेकवादी विचारांपेक्षा अधिक चांगला कोणता सहकारी आपल्याला मिळू शकेल?

Tags: हमीद दाभोलकर ‘विवेकवाहिनी’ विवेकबुद्धी डॉ बाबासाहेब आंबडेकर डॉ.नरेंद्र दाभोलकर भारतीय राज्यघटना राज्यघटना आणि विवेकवाद थेट सभागृहातून Hamid Dabholkar Rajyaghatana aani vivekvaad Thet Sabhagruhatun Vivekvahini Discretion Dr. Babasaheb Ambedkar Dr. Narendra Dabholkar Constitution of india weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दाभोलकर,  सातारा
hamid.dabholkar@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले हमीद दाभोलकर हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व साधना साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत.


Comments

 1. Jayashree Gaikwad- 26 Nov 2020

  NIce Article

  save

 1. Dr C D Mahajan- 26 Nov 2020

  अतिशय सुंदर आणि प्रभावी मांडणी

  save

 1. Haren Sankhe- 26 Nov 2020

  खूप सुंदर लेख. उत्कृष्ट मांडणी व विषय समजावून सांगण्याची हातोटी उत्तम असल्यास लेखातील क्लिष्टपणा नाहिसा होतो याचं ऊत्तम उदाहरण असा लेख.

  save

 1. Sanjeev Manohar Wadikar- 27 Nov 2020

  अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी असलेले वैचारिक प्रगल्भता देणारे लिखाण. हमीद - मनःपूर्वक धन्यवाद.

  save

 1. Dattaram Vikram Jadhav- 27 Nov 2020

  संविधानात सांगितलेली कर्तव्ये आणि विवेकवाद म्हणजे नक्की काय हे समजले. अभ्यासपूर्ण -सुंदर विष्लेषण.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके