डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

एव्हाना बकऱ्या किती तरी  दूर गेलेल्या असतात. बहुधा त्यांनी रान गाठलेले असते आणि अहमद त्या शाळेसमोर त्या मुलांशी केविलवाणी झुंज देत राहतो. ती दगडी शाळा निमूटपणे हा तमाशा पाहत असते; पाहत राहते.

कुणाच्या घरी लवकर उजाडते, कुणाच्या उशिरा; पण उजाडले नाही तोच अहमदला अंथरुणात जाग येऊन ठेपलेली असते. घरात खुराड्यात ठेवलेले कोंबडे आणि कोंबड्या, झाडांवरली पाखरे यांच्याबरोबरच त्याला जाग येते. 

पण तो जागा होतो, तेव्हा सारे घर अद्यापही स्वस्थपणे झोपी गेलेले असते. त्याचे बाबा आपल्या प्रचंड पलंगावर अस्ताव्यस्त पडून डाराडूर झोपी गेलेले असतात, सारखे घोरत असतात. आई अहमदच्या शेजारीच अंथरुणात मुटकुळ्यासारखी पडलेली असते. पण तो झोपेत आईपासून किती तरी दूर अंतरावर लोळत गेलेला असतो. त्यामुळे जागा होतो, तेव्हा त्याला भीती वाटते. इतकी भीती वाटते की, जागचे हलून तिच्याजवळ जायचाही त्याला धीर होत नाही. तो जागच्या जागीच कापत, भित्र्या आवाजात कोकरासारखा ओरडतो, ‘‘बुवा... ओ बुवा...’’

ती साद खुराड्यातल्या कोंबड्या ऐकतात आणि त्याला जणू धीर देण्याच्या उद्देशाने ‘कुक्‌ कुक्‌’ करून ओरडू लागतात. कोंबडे साद घालतात : ‘ककाकोऽऽऽ’ बाहेरची पाखरे पंख हवेत पसरीत आकाशात झेप घेऊ लागतात. विलक्षण जोरात किलबिल करू लागतात.

त्या आवाजाने त्याची आई जागी होते. मुलगा जागा झाला असल्याचे तिच्या लक्षात येते. पण तिला पुन्हा जोरात झोप येऊ लागलेली असते, म्हणून ती जागेवरूनच पेंगुळल्या सुरात म्हणते, ‘‘का रे आमद? अरे आमद? का?’’

‘‘मना पुऱ्यात घे... पुऱ्यात घे... जवल घे...’’

अहमद दबल्या आवाजात उत्तरतो. जणू थोडे अधिक  ओरडल्यास त्या काळोखातून कोणी तरी त्याच्या नरड्याचा घोट घेण्यास सिद्ध झालेले असते! आता मात्र त्याच्या आईला त्याचा संताप येतो. ती ओरडते, ‘‘का रे सैताना, का ओरडतांस...? म्होरं ये... हिकरं ये...’’

‘‘मी नाय येत... तू घे... तू घे... मना भीव वाटतेय्‌...’’ तो सारे बळ एकवटून कसे तरी म्हणतो.

‘‘मेलो कंबाखत!’’ ती किंचाळून उठते. जागची उठून धसमुसळेपणाने त्याला जवळ ओढते. आपले राकट, मायेचा स्पर्शही नसलेले हात त्याच्या अंगावर टाकते आणि म्हणते, ‘‘हां, आता नीज.’’

0

ती झोपी जाते, पण तो तसाच जागा राहतो. त्याची झोप केव्हाच संपलेली आहे. कोंबड्या करीत असलेल्या आवाजाकडे त्याचे लक्ष वेधलेले असते. या बाहेरच्या पाखरांच्या किलबिलाटाने त्याच्या मनाला फार सुखद संवेदना होऊ लागतात. आईचा, मायाविरहित का होईना, हात पडल्यामुळे त्याची भीती दवासारखी उडून जाऊ लागते. हाता-पायांचे कापरे तिच्या शरीराच्या धगीने ओसरून गेलेले असते.

तेवढ्यात त्याला प्रकाशाची चाहूला लागते. घरातला, त्या खोलीतला काळोख हळूहळू कसकसा वितळत जातो आहे, हे त्याला एकट्याला जाणवू लागते आणि त्याची भीती पार नाहीशी होते. तो अंगावरला आईचा हात झटकून टाकतो. ती झोपेतच त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण तो तिचा हात झटकून धडपडत उठून उभा राहतो आणि कोंबड्यांच्या खुराड्याकडे धावतो. कोंबड्या त्याला पाहताच आपले अवघडलेले पंख फडफडण्याचा प्रयत्न करू लागतात, पण ते त्यांना जमत नाही. जणू दया येऊन तो खुराडे उघडतो आणि त्यांना मोकळे करतो.

काक्‌ काक्‌... काक्‌ काक्‌ करीत कोंबड्या गर्दीने उठतात. एकमेकींना ढकलून बाहेर एकामागून एक उड्या मारीत येतात. जोरात पंख हलवतात आणि राख, विष्ठा हवेत उडवतात. त्या उडवलेल्या राखेचा व विष्ठेचा खरपूस-खमंग वास हुंगत अहमद तिथेच उभा राहतो. ती राखेची धूळ बसेपर्यंत त्याला तो वास येत राहतो. मग हवेत विरून जातो आणि तेव्हाच अहमद खुराड्यात हात घालतो. एक इवले सफेद अंडे त्याच्या हाताला लागते. सफेद, गोल-गोल अंडे. आतला बलक जणू त्याला एखाद्या पारदर्शक पदार्थासारखा दिसू लागतो. तो हातात अंडे घेऊन तिथेच उभा राहतो.

त्या अंड्यापायीच त्याला आई-बापाची आठवण येते. ते अंडे आपल्याला खायला मिळेल की नाही, याविषयी तो साशंक होतो. आपल्याला कसे मिळेल, या विवंचनेत गर्क होऊन जातो.

0

ते अंडे त्याच्या हातातच असते, तेवढ्यात आई दाणफुण करीत उठते आणि अंथरूण गुंडाळू लागते. बाबा झोपल्या-झोपल्याच केवढ्यांदा तरी आळस देतात. त्या आवाजाने जणू पलंग किंचाळू लागते. ती उठतात आणि मुलाची शोधाशोध सुरू करतात. मुलगा हातात अंडे घेऊन कोंबड्यांच्या खुराड्यापाशी उभा असलेला त्यांना सापडतो.

‘‘काय रे करतांस मेल्या? कंवर सोदतांस?’’ आई पुकारते. त्याच्या हातातल्या अंड्यावर तिची नजर जाते. ती ते त्याच्या हातातून हिसकावून घेते. म्हणते, ‘‘मेल्या, कंवट खायला संकवलास! अरे, परनी गुरनी के कामधान नाय. नुसतो उंडग अनी कंवट खा!’’

आळस देणारा बाप तेवढ्यात दाणदाण पाय आपटीत तिथे येतो आणि त्याला म्हणतो, ‘‘जा जा, जरा बकऱ्यांना काय तरी खायला टाकून ये!’’

त्याच्या गळ्यात हुंदका येऊन राहतो. पण आई- बापासमोर रडायचीदेखील सोय नाही, हे त्याला समजते. तो जड पावले टाकीत जवळच्या गोठ्याकडे जातो. दार उघडून गोठ्यात शिरतो.

त्याची चाहूल लागताच बकऱ्या बें-बें करीत उठतात. काही खायला मिळेल, या आशेने कान टवकारून त्याच्याकडे पाहू लागतात. पण तो आत शिरताच त्यांना खायला द्यायचे विसरून जातो. आतल्या बकऱ्या-मेंढ्यांच्या लेंड्यांचा वास हुंगण्यात तो मश्गुल होऊन जातो. हाही वास त्याला खूप आवडतो.

हा लेंड्यांचा वास खूप चांगला असल्याचे त्याने कुणाच्या तरी तोंडून ऐकले आहे. त्याच्या वासाने रोग होत नाहीत, असेही त्याच्या कानावर आलेले आहे. हे ऐकल्यापासून हा वास घेण्याची त्याला सवय लागली आहे. आपली प्रकृती धडधाकट राहिली पाहिजे, असे त्याला वाटते.

0

तो असा उभा आहे; आपल्याच नादात मग्न होऊन राहिला आहे, तोच मकतबची घंटा त्याच्या कानांवर आदळते. त्याचे लक्ष वासावरून उडते आणि त्या घंटेच्या नादाकडे वेधले जाते. त्या घंटेमागोमाग पोरांचा गलका त्याला ऐकू येऊ लागतो. मुल्लाजींचे ओरडणेही त्याच्या कानांवर आदळते. मग सारे शांत होते. एक प्रकारचा वेगळाच गोंगाट ऐकू येऊ लागतो. अनेक संमिश्र आवाजांनी निर्माण झालेला- असा जणू एकच एक आवाज त्याच्या कानात घोंघावू लागतो. मकतबमधली पोरं सबक घेऊ लागतात.

‘‘बिस्मिल्ला’’

‘‘बिस्मिल्ला...’

‘‘हिर्रहमाँ...’’

‘‘हिर्रहमाँ...’’

‘‘निर्रहिम’’

‘‘निर्रहिम...’’

तो आवाज ऐकून त्याचे मन भारले जाते.  बिस्मिल्लाची एके काळी तोंडपाठ झालेली ‘सबक’ त्याला आठवते. मकतबमध्ये असतानाचे दिवस त्याला आठवायला लागतात.

त्याला बिस्मिल्लाची सबक फार चांगली येत असते. फार चट्‌कन तो कुराण शिकला असता. तरतीब त्याच्या तोंडपाठ झाली असती. हदीस आणि दलील त्याने समजून घेतले असते. पण यापैकी काहीच झाले नाही; होऊच शकले नाही. कुळांनी त्यांची शेते बळकावली आणि खायचेच वांधे होऊ लागले. इतर खोतांनी आपली शेते कुळांकडून कोर्टात जाऊन हिसकावून घेतली, पण त्याच्या दुबळ्या आणि अर्धवट बापाला ते शक्य झालेच नाही.

अशा रीतीने त्यांची शेते गेली....आणि शेतांपाठोपाठ त्याच्या बापाची अक्कलही कामातून गेली. तो वेडसर बनला. वेडे चाळे करू लागला. वेडातच एक दिवस मकतबमध्ये आला आणि अहमदच्या पाठीत इतर पोरांच्या देखत धपाटा घालून म्हणाला, ‘‘सावकारांची पोरां शिकतात. आपल्यात तितकी ताकद हाये? बिसमिल्ला कसनि बोलतास? उठ, शेन कारया चल.’’ त्याने अहमदची बकोटी धरून त्याला त्या जागेवरून उठवले आणि थेट गोठ्यात आणले. शेण काढायची त्याला दीक्षा दिली! त्यानंतर पुन्हा मकतबमध्ये त्याने पाऊल टाकले नाही. त्याचा सकाळचा वेळ गोठ्यात शेण काढण्यात जाऊ लागला आणि बिस्मिल्लाची सबक तो कायमचीच विसरून गेला.

पण आता ती आठवण्याचा तो प्रयत्न करू लागतो, तोच बापाची कर्णकर्कश किंचाळी त्याच्या कानांवर आदळते.

‘‘काय रे, काय करतांस?’’ बाप घरातून खेकसतो.

‘‘बकऱ्यांना खायला घालतांय!’’

‘‘अजून?’’ आणि तो सरळ गोठ्यात येतो. अहमदच्या हालचालींकडे पाहून बापाने काय ओळखायचे ते ओळखले आणि त्याच्या पाठीत रपाटा हाणला.

‘‘साल्या! हतं येवन नुसतो उभो ऱ्हायलोस? नुसतो?’’ तो बडबड करू लागतो. सहन होईना, तरी अहमद निमूटपणे बापाचे रट्टे खातो आणि नंतर बकऱ्यांच्या पुढ्यात पाला टाकतो. बाप त्याला हिसकावीत घरी ओढीत नेतो. घरी भाकरी तयार होती.

अहमदने बसायला मालकूट टाकले आणि आईने थापलेली एकच एक भाकर थाळ्यांतून त्यावर आणून ठेवली. मग कांद्यातून केलेला अंड्याला पोला आणला. बापाच्या बाजूला तो भीत-भीत बसतो आणि आशेने, अपेक्षेने त्याच्या मुखाकडे पाहू लागतो.

बाप त्या भाकरीतली एक चतकोर मोडून त्याच्या हातावर ठेवतो. तितक्याच प्रमाणात पोल्याचा तुकडाही उचलून त्याच्या भाकरीवर ठेवतो. मग उरलेला सारा पोला आणि भाकरी तो अधाशासारखा खाऊ लागतो.

त्या इवल्याशा भाकरीकडे पाहून अहमदला भडभडून येते. त्या भाकरीवर दुपारपर्यंत वेळ निघू शकणे अशक्य असते. भुकेने अर्धमेला होऊन त्याला उन्हातान्हातून, रानावनातून वावरावे लागणार असते. पण अधिक भाकरीची अपेक्षा बाळगणे व्यर्थच असते. अधिक असायला हवी ना? पण अधिक भाकर खाणाऱ्या बापाचा मात्र त्याला संताप येतो.

0

बापाची भाकर संपते, तेव्हा आपण प्यायचे पाणी आणून ठेवले नाही, याची अहमदला जाणीव होते. तो घाबऱ्या-घाबऱ्या जागेवरून उठतो. पाण्याचे ग्लास मडक्यात बुचकळतो आणि बापाच्या शेजारी आणून ठेवतो. बाप त्यातले अर्धे पाणी पितो आणि ग्लास तसाच तिथे ठेवून देतो. अहमद ग्लास उचलतो आणि तोंडाला लावतो. ते उष्टे पाणी तो डोळे मिटून तसाच पितो!

उष्टे पाणी पिणे त्याला आवडत नसते. पण ते प्यायचे नाही, तर बापाला राग येईल, हे त्याला माहीत असते. बाप वारंवार त्याला म्हणतो, ‘‘उष्टां पानी पियत्त जावां! त्यांत रोजी असते!’’

मग आई त्याला हुकूम सोडते, ‘‘आता बकरी घेवन जा. हां, जाशील ना?’’

हे ‘जाशील ना?’ विचारणे विलक्षण औपचारिक असते, याची त्याला जाणीव असते. तो ‘नाही’ म्हणाला, तर ती थोडेच ऐकणार आहे? पण त्या आर्जवी शब्दांनी त्याच्या मनाला किंचित बरे वाटू लागते आणि तो विचारतो, ‘‘बुवा, आज मी बेगुन येंव? लककन्‌ जेयाला देशील?’’

‘‘हो-होऽ’’ आईही किंचित तंद्रीत येऊन मायेच्या सुरात सांगते. ‘‘लवकर ये माझ्या सोन्या. आज डाळ करणार हय. आनी धान!’’

 ‘‘वा! वा!’’ तो चीत्कारतो आणि उड्या मारीत गोठ्यात शिरतो. भराभर बकऱ्या सोडतो आणि त्यांना गोठ्याबाहेर काढतो.

एकमेकांना ढकलत बकऱ्या चौखूर उधळत रस्त्यावर येतात. खूपशी धूळ आपल्या खुरांनी मागे उडवू लागतात. तो त्या धुळीमागोमाग हातात काठी घेऊन चालू लागतो. सकाळचा गारवा अद्यापही हवेतून कमी झालेला नसतो. दवबिंदूंनी धूळही जड, ओली झालेली असते. रस्त्यावरच्या चाकोऱ्या धुळीच्या आच्छादनाखाली गडप झालेल्या असतात. बकऱ्यांच्या खुरांचे सुरेख नक्षीकाम त्यावर उमटू लागते. ते पाहत-पाहत अहमद मागून चालत राहतो.

ती वेळ मुलांची शाळेत जायची असते. थव्याथव्याने मुले त्याच रस्त्याने शाळेत जात असतात. शाळेवरूनच तो रस्ता पुढे माळरानाच्या दिशेने गेलेला असतो. त्या शाळेवरूनच अहमदला बकरी हाकीत जायचे असते. रोजच जावे लागते.

त्याला हेच तेवढे फार त्रासदायक वाटत असते. गावातली सारी मुले त्याच्याकडे तुच्छतेने पाहत असतात. त्याला लागट बोलतात, त्याची टर उडवतात आणि तो निमूटपणे खाली मान घालून तिथून निघून पुढे जातो. ती शाळा दिसेनाशी होते तेव्हा त्याला बरे वाटू लागते!

पण आज तरी पोरे त्याला रस्त्यातच भेटतात. त्यांना टाळता यावे म्हणून तो बकऱ्यांना ही-ही करून दौडवतो आणि आपणही मागून धावू लागतो. पण त्या मुलांच्या ते लक्षात येते. तीही त्याच्यापाठोपाठ धाव मारतात. त्याला येऊन गाठतात. ती येऊन भिडल्याचे पाहताच आता उगाच धावण्यात काहीच अर्थ नाही, असे वाटून तो आपली चाल मंदावतो. ती मुले आणि तो सारख्याच गतीने एकमेकांकडे पाहत चालत राहतात. तो भीतीने आणि ती तुच्छतेने!

बराच वेळ कोणी काहीच बोलत नाही. आपण शाळेत गेलो असतो... तर त्यांच्यासारखेच दप्तर काखोटीला मारून त्यांच्याबरोबरच राहिलो असतो, असे त्याला वाटते. आपली जमीन गेली आणि आपल्या बापाला वेड लागले; यामुळे आपल्याला ही दुर्दशा प्राप्त झाली, एवढे त्याला समजते. त्या मुलांच्या बाबतीत असे का झाले, हे त्याला कळू शकत नाही. त्यांच्यावर खुदाची मर्जी असली पाहिजे, असे त्याला वाटते. त्याला त्यांचा हेवा वाटतो आणि तिरस्कारही. फार विलक्षण तिरस्कार वाटू लागतो.

त्या मुलांनी आता आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केलेली असते. ती त्याच्यापुढे रस्त्याने चालू लागतात आणि त्याची वाट अडवू लागतात. चालता-चालता त्याचा पाय एकाला लागतो आणि तो मुलगा ठेचकाळतो, खाली कोसळतो. तेवढे निमित्त त्या मुलांना पुरेसे होते. त्याच्या भोवताली ती कोंडाळे करून उभी राहतात.

त्याच्या छातीत धडधडू लागते. आज आपण जीवानिशी बचावत नाही, असे त्याला वाटू लागते. त्यांच्या कोंडीतून सुटका करून घेण्याचा तो यत्न करू लागतो, पण ते त्याला जमत नाही. ‘‘काय रे साल्या, आमद? खत चाललोस?’’ ही पोरे गिल्ला करून ओरडतात. चढ्या आवाजात किंचाळतात.

‘‘रानात- रानात- मला जावं द्या निमूटपनी...’’ तो गयावया करून म्हणतो. पण कोणी त्याला जाऊ देत नाही. एक जण त्याच्या डोक्यावर टपली मारतो. दुसरा त्याच्या ढुंगणावर लाथ हाणतो. तिसरा त्याच्या हातातली काठी हिसकावून घेतो आणि तीच त्याच्यावर उगारतो.

ती उगारलेली काठी डोकीवर टांगलेल्या तलवारीसारखी त्याला भासते. कधी तुटेल, नेम नाही; कधी डोक्यावर फटका बसेल, सांगता येत नाही... आणि ती खाली येताना त्याला दिसते, तेव्हा तो चट्‌कन बाजूला होतो. काठीचा नेम चुकतो आणि ती रस्त्यावर आदळते. हाणणाऱ्याच्या हाताला झिणझिण्या येतात. त्याने घाव चुकवलेला पाहून सगळेच चिडतात. त्याच्याशी दंगामस्ती करू लागतात.

एव्हाना बकऱ्या किती तरी दूर गेलेल्या असतात. बहुधा त्यांनी रान गाठलेले असते आणि अहमद त्या शाळेसमोर त्या मुलांशी केविलवाणी झुंज देत राहतो. ती दगडी शाळा निमूटपणे हा तमाशा पाहत असते; पाहत राहते.

पण धक्काधक्की सुरू होते, तेव्हा त्याला काहीच दिसेनासे होते. शाळा अदृश्य होते, बकऱ्या नाहीशा होतात. पायाखालचा रस्ता विरून जातो. तोच तेवढा उरतो. त्याच्यासमोर बापाची मूर्ती प्रकट होते. कुणब्यांनी माळावरल्या गावात गुरे घातली असताना बापाने ती दगड मारून कुणब्यांसकट कशी पिटाळली, हे त्याला आठवू लागते.

मार खात असताना, तुडवला जात असताना, हळूहळू ओहोटणाऱ्या पाण्यासारखा त्याच्या मनातला बापाबद्दलचा तिरस्कार ओसरून जातो. त्याचे दगड मारणे, त्याची मर्दुमकी तेवढी त्याला आठवत राहते. तो चट्‌कन वाकतो आणि एक दगड उचलून हातात घेतो. स्वत:ला सोडवून घेत तो त्या पोरांच्या अंगावर भिरकावतो. एका मुलाच्या वर्मी तो दगड लागतो आणि भळाभळा रक्त येऊ लागते. तो मुलगा मट्‌कन खाली बसतो. त्याची दुर्दशा बघून बाकीची पोरे भयभीत होऊन तिथून पळ काढतात. तो जखमी मुलगा आणि अहमद तिथे उरतात. त्या मुलाला अहमदचे विलक्षण भय वाटते. तो तशाच अवस्थेत तिथून पळ काढतो. लांब उभ्या राहिलेल्या त्या पोरांमध्ये जाऊन मिसळतो.

अहमदला बळ चढते. तो आणखी दगड उचलतो आणि भराभर त्यांच्या दिशेने भिरकावू लागतो. ती मुले दिसेनाशी होताच भानावर येतो. आणि त्याला भीती वाटू लागते- त्या दगडी शाळेची, आतल्या त्या मुलांची आणि बापाचीदेखील. त्याला विलक्षण अवसानघात झाल्यासारखे वाटू लागते. तो धाव मारतो. रानाच्या दिशेने पळू लागतो. थोडे अधिक गेल्यावर त्याला सुटका झाल्यासारखे वाटते. त्याचे पाय लुळे पडू लागतात. तो धावायचा बंद होतो. मग त्याला वेगळीच विवंचना भेडसावू लागते. आता त्याला विलक्षण भूक लागलेली असते.

(साधना साप्ताहिकाच्या ११ जून १९५८ च्या ‘कुमार’ विशेषांकात ही गोष्ट प्रसिद्ध झाली. तेव्हा हमीद दलवाई यांचे वय होते २५ वर्षे, पुढे ते मुस्लिम समाजसुधारक म्हणून नावारूपाला आले.)

Tags: २०१६ बालकुमार दिवाळी अंक कथा muslim satyshodhak mandal dalwai hamid dalwai teenage story 2016 balkumar diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दलवाई


वैचारिक लेखक, कथाकार, संस्थापक-मुस्लिम सत्यशोधक समाज. 


Comments

  1. Ajay salunkhe- 10 Sep 2020

    How to download all बालकुमार दिवाळी अंक pdf ?

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात