डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘हमीद दलवार्इंचे साहित्य आणि समाजकार्य’ या विषयावर 13 व 14 डिसेंबर 2019 असे दोन दिवस कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. विद्यापीठाचा मराठी विभाग, साधना साप्ताहिक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ते आयोजित करण्यात आले होते. आठ सत्रांमध्ये झालेल्या या चर्चासत्रात हमीद दलवाई यांच्या वाङ्‌मयीन व सामाजिक कार्याबद्दल गंभीरपणे आणि सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा सूर ‘हमीद दलवाई हे कोणा एका धर्मीयांसाठी नव्हे, तर मानवी कल्याणासाठी सतत झटणारे कार्यकर्ते होते; त्यामुळे त्यांच्या विचारांची गरज जगातील धार्मिक, सामाजिक आणि स्त्रीप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सार्वकालिक आहे,’ असा होता. विविध मानवी प्रश्न धर्मांच्या स्थापनेपूर्वीपासून होते, धर्मस्थापनेनंतर काही प्रश्न निर्माण झाले, अशा अनेक प्रश्नांच्या गुंतावळीत मानवी जीवन खुंटले, त्यामुळे दलवार्इंचे विचार धर्माच्या पलीकडे जाऊन अभ्यासणे गरजेचे आहेत, हे या चर्चेचे सूत्र होते. 

हमीद दलवाई यांना अवघे पंचेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. या अल्पायुष्यात त्यांनी ‘इंधन’ ही महत्त्वाची कादंबरी आणि चाळीस कथा लिहिल्या. तसेच त्यांच्या गंभीर वैचारिक लेखनाचे तीन संग्रह प्रकाशित झाले असून, त्यांनी शेकडो भाषणे दिली आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे कार्य. त्यांनी मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठी मूलभूत चिंतन आयुष्यभर केले. आणि त्यासाठी प्रत्यक्ष कामही केले. हे चिंतन त्यांच्या सर्वच लेखनातून प्रतिबिंबित होते. 

हमीद दलवाई मळलेली वाट सोडून चालले, त्यामुळे त्या वाटेत खाचखळगे लागणे स्वाभाविक होते. त्यांनी स्वीकारलेली वाट नवी, म्हणूनच संघर्षाची होती. या वाटेवरील व्रत ‘प्रबोधन’ हे होते. त्यासाठीच ते संघर्षरत राहिले. त्यांच्या या कार्याची ओळख आणि त्यांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता अधोरेखित करणे, हा या चर्चासत्राच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. चर्चासत्राचे उद्‌घाटन ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी केले. यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आयोजकांची भूमिका अधोरेखित करणारे होते ‘‘हमीद दलवार्इंवरील हे चर्चासत्र शिवाजी विद्यापीठात व्हावे, हे मला मनस्वी वाटत होते. दलवार्इंचे कोल्हापूरशी अतिशय स्नेहाचे व विचारांचे नाते होते. त्यामुळे दलवार्इंचा कोल्हापुरातील वावर आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणारा असायचा. आज येथे हमीद दलवार्इंच्या कार्यावर चर्चासत्र होणे, हे शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरसाठी अनेकार्थाने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

यामागचे कारण म्हणजे, दलवाई हे विद्यापीठीय अभ्यासक्रमातून बाजूला पडलेले लेखक आहेत. दलवार्इंनी नेमके आणि मोजकेच लिहिले. शिवाजी विद्यापीठानेच त्यांची ‘इंधन’ कादंबरी अभ्यासक्रमात प्रथम समाविष्ट केली. कोणत्याही लेखकाने स्वत:ला खरवडून काढलं पाहिजे. दलवार्इंचे लेखन असे स्वत:ला खरवडून लिहिले गेले आहे. एक कार्यकर्ता म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे होतेच. परंतु लेखक म्हणूनही या माणसाकडे अव्दितीय सामर्थ्य असल्याचे मी भाऊ पाध्येंसारख्या महान लेखकांकडून ऐकले होते. याचा प्रत्यय पुढे त्यांच्या लेखनातून आम्हाला आला... 

कोल्हापूरचा सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यामध्ये राजर्षी शाहूंपासून अनेकांचे योगदान लाभले आहे. हमीद दलवार्इंचे मुस्लिम सत्यशोधक चळवळीतील काम विचारात घेत असताना मला नेहमीच एक प्रश्न पडतो. दलवार्इंचे आणि सूफींचे नाते नेमके काय असावे? सूफींचे येथील समाजरचनेतील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे दलवार्इंच्या सामाजिक कार्याचा विचार करत असताना सूफींच्या दलवार्इंशी असलेल्या नात्याचा शोध घेतला पाहिजे. अलीकडे काहींना अध्यात्य या शब्दाची ॲलर्जी वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत धर्माच्या अभ्यासाचा अवकाशच कोणी तरी पळवला. त्यामुळे काही गोष्टींचा पुनर्विचार आपण करणार आहोत की नाही? या समाजाला एकदम निधर्मी करणं, की पायरी पायरीनं त्याकडे घेऊन जाणं आवश्यक आहे, हे चळवळीतील कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. कोणी अध्यात्माचा उच्चार जरी केला तरी ते टीकेचे धनी होतात, त्यामुळे अनेक गुंते तयार झाले आहेत.’’ 

उद्‌घाटकांच्या मनोगतानंतर चर्चासत्राचे बीजभाषण विनय हर्डीकर यांनी केले. हमीद दलवार्इंच्या विचारांची कालातीत प्रस्तुतता अधोरेखित करताना ते म्हणाले, ‘‘हमीद दलवार्इंचे कार्य प्रथम महाराष्ट्रापुरते मर्यादित असले, तरी नंतर ते वाढत अखिल भारतीय झाले आहे. दलवार्इंचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक सेक्युलर भारताचा मॅनिफेस्टो आहे. हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टोपेक्षा छोटं पुस्तक आहे, परंतु ते त्या पुस्तकाइतकेच स्फोटक ताकद असलेले आहे. आपण भारतीयांनी ‘सेक्युलर’ या शब्दावर अत्याचार केला आहे. घोळघालू भारतीयांसाठी ‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असल्याचे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीवाल्यांनी स्वतंत्रपणे लिहिले आहे. यातून त्यांनी भारतीयांचे कौतुक करण्याऐवजी टोणा मारला आहे.

‘सेक्युलर’ या शब्दाचा खरा अर्थ ‘निधर्मी’ असा आहे.’’ हमीद दलवाई का आवश्यक आहेत हे सांगताना, ते नेमके केव्हा-केव्हा असायला हवे होते, याची एक यादीच हर्डीकर यांनी दिली. ते म्हणाले ‘‘भारतात वैदिक आणि बौद्ध एकमेकांची डोकी फोडायला उठले होते, तेव्हा दलवाई असायला हवे होते. ज्या वेळेला गीतेसारखे स्तोत्र लिहिले गेले- चातुर्वर्ण्यव्यवस्थेत तुमच्या वाट्याला जे आले आहे आणि त्याच्याप्रमाणेच जगायचे, असे सांगितले जात होते, तेव्हा दलवाई हवे होते. युरोपमध्ये ज्यू आणि ख्रिश्चनांमध्ये धर्मछळ झाला, तेव्हा दलवाई असायला हवे होते. देवाकडे जो वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहील त्यांना आम्ही रिपब्लिकच्या बाहेर ठेवू, असे जेव्हा प्लेटोने सांगितले, तेव्हा हमीद दलवाई असायला हवे होते. ख्रिश्चन लोक गरीब चिन्यांना औषध म्हणून अफू पाठवायचे, तेव्हा दलवाई हवे होते. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाऊन फार काही फरक पडेल असे वाटत नाही. तुम्ही जे सांगताहात ती बुद्धाची शिकवण नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सांगायला दलवाई हवे होते. प्रत्येक धर्म शोषणाचे साधन आहे, हे दलवार्इंचे म्हणणे कदाचित गांधी-आंबेडकरांना पटले असते.’’ 

पाऊण तासाच्या बीजभाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, ‘‘हमीद दलवाई हे विद्वान, मिश्किल व स्पष्टवक्ते होते. त्यांचे कार्य मुस्लिम समाजापुरते सीमित न राहता, ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचे होते. जगात जेथे- जेथे मानवी अस्तित्वासंबंधी धर्मामुळेच काही गंभीर प्रश्न निर्माण होतील, तेव्हा निधार्मिक विचारधारेने चिकित्सा करणाऱ्या दलवार्इंसारख्या माणसाची गरज भासत राहणार आहे. दलवार्इंचे विचार हे सेमिनारच्या चौकटीत बसवणे तितके सयुक्तिक वाटत नाही. सेमिनारच्या कक्षेबाहेर येऊन आपण त्यांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे. शिवाय त्यांना दीर्घायुष्य लाभले असते, तर मुस्लिम समाजाचे सत्यशोधन करणाऱ्या दलवार्इंनी विज्ञानाच्या आधाराने हिंदू समाजाचेही सत्यशोधन केले असते.’’ 

उद्‌घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र शाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. भारती पाटील होत्या. त्या आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाल्या, ‘‘दलवाई हा भारतातील एक महत्त्वाचा विचार आहे. आज लेखक-विचारवंतांचे आवाज दाबले जात आहेत. अशा काळात हे चर्चासत्र आयोजित करून मराठी विभागाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आपली प्रागतिक ओळख कायम ठेवली आहे. वास्तविक, दलवार्इंचा विचार अधिकाधिक शैक्षणिक विचारपीठांवरून चर्चिला जावा असा आहे. तो केवळ मराठीच नव्हे; तर समाजशास्त्र, राज्यशास्त्र विभागामार्फतही विद्यार्थ्यांसमोर येणे गरजेचे आहे. 

मी स्वत: स्त्री-पुरुष समानतेसाठी झगडणारी कार्यकर्ता आहे. त्यामुळे दलावार्इंच्या विचारांचे मोल मला आहे. दलवार्इंचा विचार हा मैलाचा दगड आहे, त्यामुळे तो अनेक अंगांनी समाजाला चिरकाल उपयुक्त व दिशादर्शक ठरणारा आहे.’’ या सत्राचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी केले. चर्चासत्रातील भूमिका साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी मांडली आणि रामचंद्र गुहा यांचा संदेश वाचून दाखवला. हमीद दलावाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा इला दलवाई उपस्थित राहू न शकल्याने, त्यांच्या मनोगताचे वाचन रुबिना दलवाई यांनी केले. आभारप्रदर्शन नंदकुमार मोरे यांनी केले. 

उद्‌घाटनाच्या सत्रानंतर हमीद दलवार्इंच्या मुलाखतीचे नाट्यरूप सादरीकरण झाले. हे सादरीकरण चर्चासत्रात लक्षवेधी ठरले. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या ‘मनोहर’ साप्ताहिकात 26 ऑगस्ट 1973 च्या अंकात हमीद दलवाई यांची मुलाखत प्रकाशित झाली होती. या काळात ‘मनोहर’ साप्ताहिकाचा खप पन्नास हजारांहून अधिक होता. मनोहर साप्ताहिकात लोकांकडून प्रश्न मागवून घेऊन ते निमंत्रित व्यक्तीला विचारले जात असत. जुलै 1973 मध्ये वाचकांना निवेदन करून त्यांच्याकडून हमीद दलवार्इंसाठी प्रश्न मागवून घेतले गेले होते. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या प्रश्नांची हमीद दलवार्इंनी अत्यंत मर्मग्राही व चिंतनशील उत्तरे दिली होती. तिरकस व खोचक अठ्ठावीस प्रश्नांच्या उत्तरांतून दलवार्इंच्या व्यापक, निर्भय व तर्कशुद्ध दृष्टिकोनाचे दर्शन घडते. हे प्रश्न आणि त्याला दलवार्इंनी दिलेली उत्तरे असे या प्रयोगाचे स्वरूप होते. दलवार्इंच्या भूमिकेत सुहास पाटील तर प्रश्नकर्त्या वाचकांच्या भूमिकेत हिनाकौसर खान, समीर शेख, गणेश दळवी व सौरभ बागडे हे चार तरुण होते. 

त्याच सत्रात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ : काल आणि आज’ या विषयाची मांडणी केली. ते म्हणाले, ‘‘हे चर्चासत्र एका अर्थाने सत्यशोधक मंडळासाठी विस्तारकार्यच आहे. हमीद दलवार्इंच्या आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याची काल, आज आणि उद्याच्या अनुषंगाने गरज अधोरेखित करणारी चर्चा घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम शिवाजी विद्यापीठाकडून केले जात आहे. हे विद्यापीठ इतर विद्यापीठांपेक्षा वेगळे आहे, कारण इतिहास विभागानेही आपल्या अभ्यासक्रमात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेची व कार्याची दखल घेतलेली आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ हे इस्लामच्या इतिहासातील एक अव्दितीय चळवळ असून, अशा स्वरूपाची कोणतीच चळवळ जगभरामध्ये नाही. 

हे मंडळ लवकरच पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दलवार्इंनी लावलेल्या पणतीची आम्ही मशाल करू शकलो नाही याची खंत वाटते, परंतु ही पणती आम्ही विझू न दिल्याचा आनंदही आहे. दलवार्इंच्या नेतृत्वात 1966 मध्ये केवळ सात मुस्लिम महिलांचा मोर्चा निघाला होता, तरीही तो स्फोटक ठरला होता. आज देशभरात महिलांच्या जवळपास सत्तर संघटना कार्यरत आहेत. या चळवळीने अनेकांचे जीवन बदलवले आहे. रिक्षावाल्याच्या मुलाला आयएएस अधिकारी बनवलेली ही संघटना आहे.’’ 

तिसऱ्या सत्रात ‘मुस्लिम समाजातील सुधारणा : काल आणि आज’ या विषयावर इक्बाल मुल्ला, अन्वर राजन आणि सय्यदभाई यांनी आपले विचार मांडले. मुस्लिम समाजात सुधारणेसाठी काम करणारे हे तिघेही कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या विचारांचे वारसदार. इंग्रजांच्या आगमनानंतर आलेल्या नव्या विचारातून, संस्कृतीतून जो आधुनिक विचार येथे रुजला; त्याचा भाग म्हणून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांकडे पाहताना येईल. मुस्लिम समाजामध्ये अशा विचारांची क्रांती दलवार्इंच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते, असा या चर्चेचा सूर होता. समीर शेख या तरुणाने घेतलेल्या मुलाखतीत सय्यदभाई म्हणाले, ‘‘जीवनात आलेल्या अनुभवामुळे मी धर्मचिकित्सेकडे वळलो. धर्मातील फोलपणा कळला आणि माझा धर्मावरील विेशासही उडाला. 

बहिणीचा तलाक हा माझ्या जीवनात आलेला सर्वांत दाहक अनुभव होता. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे शोधता येत नव्हती, त्यामुळे मी अस्वस्थ होत असे. त्या वेळी धर्मापेक्षा मानवी मूल्यांवर प्रेम करणारे तत्त्वज्ञान दलवार्इंमुळे कळाले. म्हणूनच आयुष्यात या माणसाची साथ कधीच सोडली नाही.’’ 

आजच्या पिढीतील कार्यकर्त्यांना सल्ला देताना ते म्हणाले, ‘‘तरुण मुले या चळवळीत येत असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. आज वय झालेल्या माणसांनी थोडे पाठीमागे सरकावे आणि मंडळातून नव्याने घडणाऱ्या कार्यकर्त्यांकडे कामाची जोखीम द्यावी. या चळवळीला मोठे भवितव्य आहे.’’ त्यानंतर दलवाई यांच्या ललित लेखनाबद्दलचे सत्र झाले. कादंबरीकार प्र्रवीण बांदेकर आणि मराठीतील एक महत्त्वाचे समीक्षक नितीन रिंढे यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी हे सत्र लक्षात राहणारे ठरले. या दोघांनींही अभ्यासपूर्ण भाषणे दिली. 

प्रवीण बांदेकर म्हणाले, ‘‘भारतीम मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून चालवलेल्या आपल्या प्रबोधनपर चळवळींना पूरक ठरणारे वैचारिक साहित्य लिहिणाऱ्यांमध्ये हमीद दलवाई यांचा समावेश करावा लागेल. अन्य कोकणी लेखकांपेक्षा त्यांचे असलेले वेगळेपण प्रामुख्याने त्यांच्या लेखनातून जाणवणाऱ्या बहुजनाभिमुख आणि वास्तववादी भूमिकेत आहे. हमीद दलवाई हे थेटपणे मुस्लिम सुधारणावादी चळवळींशी जोडले गेले होते. त्यांचे सर्जनशील कथात्म व वैचारिक लेखन परस्परांना आणि दलवाई यांच्या सामाजिक- राजकीय भूमिकेला पूरक ठरणारेच होते. 

दलवाई यांच्या कथात्म साहित्याबाबत विचार करताना माझ्यासारख्या लेखकाला त्यांच्याशी जोडून घेणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे, लेखकाची लेखनांतर्गत नैतिकता. लेखकाने एखाद्या सामाजिक प्रश्नांविषयी लिहिलं की, त्याची जबाबदारी संपते का? की, त्याने गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढण्याचीही तयारी ठेवली पाहिजे? मराठी साहित्याच्या संदर्भात तर, लेखक कसलीही बांधिलकी मानत नाहीत, कुठत्याही सामाजिक प्रश्नावर ठोस भूमिका घेत नाहीत, मराठी लेखकांकडे स्वतःचा असा राजकीय विचार नसतो, सामाजिक तत्त्वज्ञानाचा अभाव असतो, असे नेहमीच बोलले जाते. या पार्श्वभूीवर दलवार्इंसारख्या लेखन आणि जगणे यात जराही अंतर न मानणाऱ्या लेखकाचे लेखन निश्चितच वेगळे ठरणारे आहे. एकूणच, दलवार्इंच्या सगळ्याच कथात्म साहित्यामधून दिसणारे मानवी नातेसंबंधांचे चित्रण, भाव-भावनांचा गुंता, विविध वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन विलक्षण आहे.’’

नीतीन रिंढे यांनी ‘इंधन’वर सविस्तरपणे आपली मते मांडली. ही कादंबरी कशी वाचावी, याबद्दलचे चिंतन आपल्या मनोगतातून व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘एक राजकीय कादंबरी म्हणून इंधन महत्त्वाची आहे. बदलत्या समाजवास्तवाचे भान असलेली ही कादंबरी काळाच्याही पुढे होती. जगण्याचे गुंते विलक्षण पद्धतीने या कादंबरीतून मांडण्यात आले आहेत. स्त्रीवादी दृष्टिकोनातून सामाजिक परिस्थितीचे वाचन करणारी ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. सेवादलाचे संस्कार घेऊन राजकारणात शिरलेल्या नायकाच्या नजरेतून ही कादंबरी पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी भांडत काही महत्त्वाची विधाने करू पाहते.’’ 

या सत्राचे अध्यक्षीय मनोगत रझिया पटेल यांनी विस्ताराने केले. त्यात त्यांनी दलवार्इंच्या ललित लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. याच सत्रात हमीदभार्इंचे कोल्हापूरशी असलेले नाते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी उलघडून दाखवले. यदुनाथ थत्ते यांच्या सांगण्यावरून दलवार्इंना कोल्हापूरच्या मुस्लिम मोहल्ल्यांमधून फिरवण्याचे काम प्रारंभी त्यांनी केले होते. या कार्याचा इतिहास शिपूरकर यांनी आपल्या अल्प मनोगतातून कथन केला. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात ज्योती सुभाषनिर्मित ‘द अनसंग ह्यमॅनिस्ट’ हा हमीद दलवार्इंवरील माहितीपट दाखवण्यात आला. यानिमित्ताने ज्योती सुभाष यांचे मनोगत झाले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘हमीद दलवाई यांच्याबद्दल मला जे काम थोडेफार माहिती आहे, ते सांगण्यासाठी हा माहितीपट बनवला. हमीद दलवार्इंबद्दल सर्वच सांगू शकले नाही; परंतु दलवाई ज्यांना माहितीच नाहीत, अशांसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व समजण्यास हा माहितीपट उपयुक्त ठरेल. दलवार्इंना मी फारशी भेटलेली नसतानाही त्यांचे साहित्य वाचून त्यांच्याशी जोडली गेले. ते जादूई व्यक्तिमत्व होते.’’ 

चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘दलवार्इंच्या लेखनाचे अनुवाद’ या विषयाने चर्चेला प्रारंभ झाला. प्रारंभी लेखक सुनीलकुमार लवटे यांनी गौरी पटवर्धन यांचे लिखित पत्र वाचून दाखवले. त्यांनी ‘इंधन’च्या उर्दू अनुवादासाठी अजमल कमाल यांना मदत केली होती. जमीला जावद या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद ज्यांनी जवळपास पूर्ण केला आहे, त्या दीपाली अवकाळे म्हणाल्या, ‘‘नसिरुद्दीन शहांसारखे लोक केवळ मराठी भाषा येत नाही, म्हणून दलवार्इंच्या विचारांपासून वंचित राहतात, हीच गोष्ट मला अनुवादाकडे वळवणारी होती.’’ याच सत्रात ‘नव्या पिढीचे मनोगत’ व्यक्त करण्यासाठी अझरुद्दीन पटेल, हिनाकौसर खान व समीर शेख या तिघांना आमंत्रित केले होते. दलवार्इंचे साहित्य आजही काळाशी जोडणारे- रेलेव्हंट आहे; मुस्लिम समाजाइतकीच हिंदू समाजालाही दलवार्इंच्या विचारांची गरज असल्याचे मत या तरुणांनी व्यक्त केले. 

समीर म्हणाला, ‘‘दलवार्इंविषयी व्देष हा त्यांच्या विचारांपासून अनभिज्ञ असल्याने पसरत आहे. म्हणून त्यांचे विचार काय आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. दलवाई हे विवेकवादाची आणि सर्वधर्मसमभावाची लिटमस टेस्ट आहेत. लेखनात आणि कृतीत फरक नसणाऱ्या दलवार्इंना पुढे नेण्याचा अट्टहास आपण केला पाहिजे.’’ या सत्राचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे होते. त्यांनी दलवार्इंच्या साहित्याचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद होण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

चर्चासत्राच्या समारोपामध्ये डॉ. सदानंद मोरे आणि न्या. हेंत गोखले यांची भाषणे झाली. प्रारंभी विनोद शिरसाठ यांनी चर्चासत्र, दलवाई आणि साधनाने सुरू केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने भूमिका मांडली. ही भूमिका चर्चासत्र आयोजकांची एकत्रित म्हणावी अशी होती. हे चर्चासत्र पुढच्या कृतिकार्यक्रमाचा प्रारंभ आहे, असे सांगून नव्या कार्यासाठी अनेक संस्था व संघटनांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. सदानंद मोरे यांनी आपल्या मनोगतात हमीद दलवाई यांच्या विचारांची जागतिक स्तरावरील प्रस्तुतता सांगितली. ते म्हणाले, ‘‘दलवाई हे केवळ कोकणाचे किंवा महाराष्ट्राचे नाहीत, तर वैचारिक दृष्ट्या ते अखंड भारताचे होते. 1992 च्या बाबरी मशिदीच्या प्रकरणानंतर किंवा अलीकडे 2014 नंतरच्या संवेदनशील परिस्थितीत हमीद दलवाई असते, तर त्यांनी महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या संदर्भात आपल्या विचारांची मांडणी न करता, जागतिक भूमिकेतून आपले विचार मांडले असते. जागतिक पातळीवरील इस्लामच्या स्थितीचा विचार करून आपल्याला त्याबद्दल काही म्हणता येईल का, याचा विचार इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटने करावा. तसे म्हणण्याइतकी सामग्री दलवार्इंच्या विचारांमध्ये आपल्याला सापडते. धर्माच्या बाहेर जाऊन धर्माबद्दल बोलण्याची सोय इस्लाममध्ये नाही. अशा वेळी सुधारकांनी काय करावे, हा प्रश्न असतो. अशा वेळी दलवार्इंच्या कामाचे मोल लक्षात येते. 

‘मी मुसलमान आहे’ असे सांगून इस्लाम धर्माचे ग्रंथप्रामाण्य झुगारून इस्लामची चिकित्सा करणारे दलवाई एकमेव मुस्लिम होते. ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’ या पुस्तकातील लेखात नरहर कुरुंदकरांनी ‘दलवार्इंच्या कार्याची तुलना करायची झाली तर काही बाबतीत फुल्यांशी करता येऊ शकेल,’ असे म्हटले आहे. तेव्हा दलवार्इंचे एकाकीपण सोडवण्याचे काम इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटसह आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे.’

न्या. हेमंत गोखले म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांना समर्थन देण्याची शिवाजी विद्यापीठाची परंपरा आहे. हमीद दलवाई यांनी साहित्य आणि समाज या दोन्हींमध्ये कधी द्वंद्व निर्माण केले नाही. साहित्यातून विचार मांडत-मांडत ते समाजाकडे पोहोचले. अतिशय गरिबीतून पुढे आलेल्या दलवार्इंच्या लेखनातून कोकणातील मुसलमानांचे दारिद्र्य आले आहे. त्यांच्या साहित्यातून मुस्लिम राजकारण आणि गोरगरीब मुसलमानांची मनोवस्था प्रकट होताना आढळते. स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र अतिशय बारकाव्याने दलवार्इंनी आपल्या लेखनातून उभे केले आहे. आज चाळीस वर्षांनंतरही दलवार्इंच्या काही विचारांची निकड भासू लागली आहे. त्यांच्या काळात आजच्याइतका मुस्लिम समाज असुरक्षित नव्हता. लीचिंग, लव्ह जिहाद, सिटिझनशिप, एनआरसी या सगळ्या प्रकरणांमुळे आज समाजामध्ये दुभंगलेपण निर्माण झाले आहे. अशा वेळी पुरोगामी विचारधारा नेमकी कशी पुढे न्यायची, याचा विचार हिंदू व मुस्लिम पुरोगामी लोकांनी गांभीर्याने करणे गरजेचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर देशाला पुढे नेणारी दोन महाराष्ट्रीय माणसे म्हणजे हमीद दलवाई व डॉ. नरेंद्र दाभोलकर हे होत. परंतु, या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांना अपेक्षित परिवर्तन समाजात घडू लागले, हे फार आशादायक चित्र आहे.’’

दीड दिवस चाललेल्या या चर्चासत्रात दोन डझनापेक्षा अधिक वक्ते बोलले. प्रत्येक सत्राला शंभर ते दोनशे श्रोत्यांची उपस्थिती होती. त्यात प्राध्यापक, साहित्यिक, कार्यकर्ते व विद्यार्थी यांचा सहभाग प्रामुख्याने होता. निमंत्रित वक्त्यांपैकी फक्त चंद्रकांत पोकळे ऐनवेळी आजारी पडल्याने येऊ शकले नाहीत. सर्वच वक्त्यांना बोलण्यासाठी वेळ कमी मिळाला अशी उपस्थितांची सार्वत्रिक भावना होती. मात्र साहित्य व समाजकार्य या दोनही क्षेत्रांतील अनेक छोटी-मोठी दालने दिसली, अशी भावना उपस्थितांपैकी बहुतेकांची होती. महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी, सामाजिक संघटनांनी, सामाजिक संशोधन करणाऱ्या संस्थांनी व सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी दलवार्इंचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने उद्‌घाटनावेळी व समारोप सत्रातही केले गेले, त्याला सर्व मान्यवर वक्त्यांनी समर्थन दाखवले. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांनी याकामी पुढाकार घ्यावा अशा अपेक्षा व्यक्त झाल्या. 

Tags: शिवाजी विद्यापीठ हमीद दलवाई चर्चासत्र रझिया पटेल प्रविण बांदेकर चर्चासत्र हमीद दलवाई कोल्हापूर विनय हर्डीकर विनोद शिरसाठ राजन गवस सुहास पाटील गणेश दळवी समीर शेख दिपाली अवकाळे हीना कौसर खान suhas patil deepali awkale ganesh dalwai heena kausar khan sameer shaikh shivaji university hamid dalwai conference sahitya acadami sunilkumar lawate rajan gavas vinay hardikar vinod shirsath raziya patel pravin bandekar charchasatra hamid dalwai Kolhapur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदकुमार मोरे,  कोल्हापूर, महाराष्ट्र
nandkumarmore@gmail.com

मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात