डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

हिंदुत्ववाद्यांचे दुटप्पी धोरण

अखंड भारताच्या हिंदू सांस्कृतिक कल्पनेचे भूत जनसंघाच्या मानगुटीवर बसले आहे. अखंड भारत व्हायचा असेल, तर तो केवळ हिंदूंना एका राष्ट्रीय व्यासपीठावर आणून होणार नाही. हिंदू आणि मुसलमान या दोघांची मने एकराष्ट्रीय जीवनात नांदू शकतील, अशी तयारी केल्याखेरीज अखंड हिंदुस्थान होऊ शकला नसता आणि यापुढेही होऊ शकणार नाही. हे करायचे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रवाह मजबूत करावे लागतील आणि जनसंघाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची कास धरावी लागेल. परंतु हिंदू आणि मुसलमान सलोख्याने नांदायला तयार होतील, तेव्हा भारत अखंड असला काय आणि त्रिखंड असला काय- काही फरक पडणार नाही. कारण तेव्हा तिन्ही देशांच्या संबंधांचे स्वरूपही पार बदललेले असेल.

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभा हा एक जोरकस पक्ष मानला जात होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभा यांची तेव्हा स्पर्धा चालत असे. ही स्पर्धा प्रामुख्याने गोळवलकर आणि सावरकर यांच्या नेतृत्वाची असे. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू महासभावादी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून केला, खून करण्याच्या सल्लामसलतीत सावरकरदेखील असावेत, असे वाटते. (श्री. गोखले यांचे पुस्तक पाहा. ‘मी असे अनेक खून पचविले आहेत,’ असे विधान करून सावरकरांनी आपण खुनाच्या कटात असल्याचे सूचित केले आहे.) गांधीजींचा खून झाल्यावर हिंदुत्ववाद्यांविरुद्ध एक तीव्र प्रतिक्रिया उमटली. हिंदुत्ववादी पक्ष जवळजवळ बरखास्त झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. हिंदू महासभा हा पक्ष पुढे हळूहळू निकालात निघाला. आता अधून-मधून त्यांची राष्ट्रीय अधिवेशने भरतात आणि काही विनोदी ठराव करून ही मंडळी घरी परततात. ग्वाल्हेर येथे 1966 मध्ये झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात दोन नमुनेदार ठराव झाले. पहिल्या ठरावान्वये भारत-पाकिस्तानमध्ये लोकसंख्येची अदलाबदल करावी, असे ठरविण्यात आले. लागोपाठ जो दुसरा ठराव करण्यात आला, त्याअन्वये अखंड भारत स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्याची घोषणा झाली. या अधिवेशनाहून परत आलेल्या हिंदू महासभेच्या माझ्या एका मित्राला या ठरावातील विसंगती मी दाखविल्या, तेव्हा तो म्हणाला, ‘‘ही ग्रेट स्ट्रॅटेजी आहे. पहिल्यांदा टॅक्टिक्ससाठी लोकसंख्येची अदलाबदल करून मुसलमानांचे वेगळे राष्ट्र आहे, असे मान्य करायचे. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करून ते जिंकावयाचे  आणि मुसलमानांना खैबरच्या खिंडीत हाकलावयाचे. हिंदूंचे सामर्थ्यशाली सैन्य लाहोरकडे कूच करताच, हे लक्षावधी मुसलमान खैबरकडे पळून जातील, यात मला शंका नाही.’’

माझा मित्र अशिक्षित नाही, चांगले वाचन असलेला आणि पदवीधर आहे. (परंतु त्यालाही या जगातील एकूण शक्तींचा, प्रवाहांचा गंध नाही; एखाद्या उद्दिष्टामागील शक्याशक्यतेचा विचार त्याच्या डोक्यात येऊ शकत नाही. सारे कसे अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टीप्रमाणे घडत असते, अशी त्याची श्रद्धा आहे.) मुस्लिमद्वेषाने यांची दृष्टी किती झाकोळून गेली, याचे हे उदाहरण आहे. हिंदू महासभेच्या अनेक कार्यकर्त्यांशी माझा चांगला परिचय आहे. अनेकदा खासगी चर्चेत या विषयावर बोलणे निघते. मी त्यांना अनेकदा म्हणालो की, एवीतेवी हिंदू महासभेचे काही सामर्थ्य उरले नाही, पक्ष विस्कळीत झाला आहे, कार्यकर्ते उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही जी मंडळी पक्षात आहात, ते पक्षविसर्जनाचा निर्णय का घेत नाहीत? हिंदू महासभेचे राष्ट्रीय पुनरुज्जीवन होण्याचा संभव अतिशय कमी आहे. सावरकर कितपत सुधारणावादी होते, याबाबत मला प्रामाणिक शंका आहे. परंतु त्यांना अस्पृश्यता हटवायची होती, असे तुमचे म्हणणे आहे. पक्ष विसर्जित करून तुम्ही या कार्याला का वाहून घेत नाही? हे सर्व मित्र माझे हे खासगी संभाषण ऐकून, ‘तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आता काही तरी केलेच पाहिजे बुवा’, असे म्हणत असत. परंतु घरी गेले की, पुन्हा मुस्लिमद्वेषाचे दळण दळू लागत.

हिंदू महासभा हा पक्ष जसजसा निष्प्रभ बनत गेला, तसतसा जनसंघ हा पक्ष क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे. हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने अत्यंत आणीबाणीच्या काळात त्यांना जनसंघाने व्यासपीठ पुरवले. गांधीजींच्या खुनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते. पुढे 1950 मध्ये तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये जातीय दंगली झाल्या. या दंगलींसंबंधी नेहरूंच्या धोरणांशी मतभेद होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि जनसंघ हा पक्ष काढला. मुखर्जींची पार्श्वभूमी हिंदुत्ववादीच होती. ते यापूर्वी हिंदू महासभेचे प्रतिनिधी या नात्याने अखंड बंगालच्या फजलुल हक मंत्रिमंडळात होते. हिंदू महासभा पुनरुज्जीवित करण्याचा मार्ग न पत्करता नवा पक्ष बांधण्याचे काम त्यांनी अंगीकारले. याचे कारण गांधीजींच्या खुनाची दाट छाया हिंदू महासभेवर पडली होती. यामुळे सरळ कोऱ्या पाटीवर सुरुवात करणे त्यांना अधिक सोईस्कर वाटले असावे. मात्र या पक्षासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी रंगरूट आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरम्यान ससेहोलपट झाली होती आणि सांस्कृतिकतेच्या बुरख्याखाली सत्ता हातात घेण्याच्या त्यांच्या आकांक्षेच्या गांधीजींच्या खुनानंतर ठिकऱ्या उडाल्या होत्या. अशा परिस्थितीत राजकारणात प्रभावीपणे वावरण्याची एक संधी म्हणून जनसंघ अस्तित्वात आला, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. गांधीजींच्या खुनानंतर दबल्या गेलेल्या हिंदू आणि मुसलमान जातीयवादी प्रवृत्ती पुन्हा हळूहळू डोके वर काढू लागल्या. वर आलेल्या हिंदू जातीयवादी शक्ती सरळ जनसंघाच्या मागे उभ्या राहू लागल्या. पक्षाचे सामर्थ्य उभे करायला जनसंघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा संच आयताच मिळाला आणि त्यांनी झपाट्याने पक्षसंघटना उभारली. प्रत्येक आंदोलानात व प्रत्येक निवडणुकीत या पक्षाची शक्ती वाढत गेली आहे आणि त्यातूनच या पक्षापुढे काही पेचप्रसंग उभे राहिले आहेत.

अटलबिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, कुशाबा ठाकरे, वसंत गजेंद्रगडकर आदी सर्व जनसंघ नेते पूर्वीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. यामुळेच एक प्रकारचे दुटप्पी वर्तन जनसंघाच्या धोरणात दिसते. जनसंघाच्या घटनेप्रमाणे सर्व जाती-धर्मांच्या लोकांना पक्षात प्रवेश आहे; परंतु घटनात्मक दृष्ट्या धर्मनिरपेक्ष असलेले ध्येय-धेारण नेहमी हिंदूंच्या हिताचीच तेवढी काळजी घेणारे असते. प्रत्यक्षात हिंदुहिताची काळजी घेणारा पक्ष घटनात्मक दृष्ट्या मात्र धर्मनिरपेक्ष आहे! एखाद्या पक्षाची घटना कशी आहे, यावरूनच केवळ त्या पक्षाचे स्वरूप कसे आहे, हे ठरविणे कठीण आहे. त्या पक्षाचे ध्येय-धोरण पाहूनच ते ठरविले पाहिजे. जनसंघ हिंदूंच्या हिताचे रक्षण करतो, याबद्दल आक्षेप बाळगण्याचे कारण नाही. इतरांचे अहित न करता हिंदूंचे भले करण्याचा विचार अयोग्य आहे, असे मानण्याचे कारण नाही. परंतु अनेकदा असे दिसून येते की, हिंदुहिताचे जनसंघाचे धोरण मुसलमान वा ख्रिश्चन समाजाच्या विरुद्ध जाऊनही पोचलेले आहे. ख्रिश्चन मिशनरी चालवीत असलेल्या शाळांबद्दल सतत प्रचार, ख्रिश्चन करत असलेल्या धर्मांतराबद्दल आरडाओरडा ही याची उदाहरणे आहेत. यासंबंधी जनसंघीयांचे आक्षेप मजेशीर असतात. ख्रिश्चन चालवीत असलेल्या शाळांतून ख्रिश्चन धर्माचे संस्कार हेतुपुरस्सर घडविले जातात, अशी हिंदुत्ववाद्यांची नेहमीच तक्रार असते. परंतु हिंदू चालवीत असलेल्या शाळांतून नेमके काय घडत असते, याचा त्यांनी विचार केला तर बरे होईल. तेथेही देवाचे स्तोत्र सक्तीने गायिले जातेच. या शाळांतून अल्पसंख्याक जमातीची मुले असतातच. त्यांनाही ते सक्तीने म्हणविले जातेच. अशा वेळी बहुसंख्याकांचे धर्मसंस्कार आपण अल्पसंख्याकांवर लादीत आहोत, असे त्यांच्या मनात का येत नाही? ख्रिश्चन धर्मांतराबद्दल आरडाओरडा करणारे शुद्धीकरणाचा मात्र पाठपुरावा करणारे आहेत. आता शुद्धीकरणाच्या निमित्ताने इतरांना हिंदू धर्मात घेण्याचा दरवाजा मोकळा झाला आहे. परंतु एक तर कुणीच धर्मांतर करू नये, अशी भूमिका घेता येईल किंवा साक्षर आणि प्रौढ माणसाचे न्यायाधीशासमोर प्रतिज्ञापत्र देऊनच धर्मांतर केले जावे, असे म्हणता येईल. यामुळे अज्ञानाने व बनवाबनवीने धर्मांतर केले जाण्याचा संभव टाळता येईल किंवा सर्वांना धर्मांतराचे स्वातंत्र्य आहे, ही भूमिका घेता येईल. परंतु शुद्धीकरणाची टिमकी वाजवयाची, शुद्धीकरण झालेल्यांची वृत्तपत्रातून छायाचित्रे प्रसिद्ध करायची आणि ख्रिश्चनांनी धर्मांतर घडवून आणले तर आरडाओरडा करायचा, हा सरळ-सरळ दुटप्पीपणा झाला.

मुस्लिम प्रश्नाने तर जनसंघाला पहिल्यापासून पछाडलेले आहे. औरंगजेबाच्या सैन्याला जसे रात्रंदिवस संताजी आणि धनाजी हे मराठे सरदार आपल्यावरच तुटून पडत आहेत असा भास होत असे. त्याप्रमाणे मुसलमानही आपल्यावर तुटून पडत असल्याच्या भयाने जनसंघवाले पछाडलेले आहेत. एक तर फाळणीच्या कटू इतिहासाचा हा परिणाम आहे. कारण अखंड भारताच्या हिंदू सांस्कृतिक कल्पनेचे भूत जनसंघाच्या मानगुटीवर बसले आहे. अखंड भारत व्हायचा असेल, तर तो केवळ हिंदूंना एका राष्ट्रीय व्यासपीठावर आणून होणार नाही. हिंदू आणि मुसलमान या दोघांची मने एकराष्ट्रीय जीवनात नांदू शकतील, अशी तयारी केल्याखेरीज अखंड हिंदुस्थान होऊ शकला नसता आणि यापुढेही होऊ शकणार नाही. हे करायचे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रवाह मजबूत करावे लागतील आणि जनसंघाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची कास धरावी लागेल. परंतु हिंदू आणि मुसलमान सलोख्याने नांदायला तयार होतील, तेव्हा भारत अखंड असला काय आणि त्रिखंड असला काय- काही फरक पडणार नाही. कारण तेव्हा तिन्ही देशांच्या संबंधांचे स्वरूपही पार बदललेले असेल. मुक्त प्रवास, संयुक्त बाजारपेठा, विकासाच्या संयुक्त योजना- अशा प्रकारची पावले आपोआपच टाकली जातील आणि एका वेगळ्या बंधनाने ही तिन्ही राष्ट्रे जोडली जातील. हे साधायचे तर धर्मनिरपेक्षतावादाचीच कास धरावी लागेल.

आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद मानतो, असेच या प्रतिपादनाबाबत जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे उत्तर असते. परंतु त्यांचे वर्तन काय सांगते? पुण्याला 1973 मध्ये धर्मनिरपेक्षता या विषयावर एक परिसंवाद झाला. या परिसंवादाला मी एक वक्ता म्हणून उपस्थित होतो. जनसंघाचे मुंबईचे कार्यकर्ते श्री. गं. बा. कानिटकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याचे बौद्धिक संघटक प्रा. शास्त्री या दोघांनी धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेवर कडाडून हल्ला चढविला. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात नेहरूंची त्यांनी टिंगल करणे अपरिहार्यच होते. नेहरूद्वेषाने पछाडलेल्या पुण्यातील बहुसंख्याक ब्राह्मणवर्गातलेच श्रोते असल्यामुळे नेहरूंची टिंगल करणारी वाक्ये ऐकल्याबरोबर गुदगुल्या केल्याप्रमाणे ते हसले, यात आश्चर्य नाही. पुरीच्या शंकराचार्यांनी अनेकदा चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला. हरिजनांना मी बसू देणार नाही, असे म्हटले. या गृहस्थांचे विकृत तर्कट कोणत्या स्तराला जाते, हे ‘भारत ज्योती’ या मुंबईच्या इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत दिसते. ते म्हणतात, ‘‘हरिजनांवर आम्ही अन्याय केला, ही गोष्टच मुळी चुकीची आहे. उलट, आम्ही त्यांना सन्मानाने वागवले. खरा अन्याय ब्राह्मणांवर झालेला आहे. ज्ञान घेण्याची ब्राह्मणांवर सक्ती होती. पूजा करण्याचे बंधन ब्राह्मणांवरच होते. हरिजनांना ज्ञान घेण्याच्या बंधनातून आम्ही मोकळे केले. पूजा करण्याची सक्ती त्यांच्यावर राहिली नाही.’’

अशा ह्या गृहस्थांच्या गळ्यात गळा घालून जनसंघ गोहत्याबंदीची आंदोलने करीत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी वक्तव्ये केली, तेव्हा देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. परंतु जनसंघाच्या कोणत्याही नेत्याने याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. एक तर त्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला पाहिजे किंवा गोळवलकरांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे. जनसंघाचे नेते स्वस्थ बसले याची कारणे उलट आहेत. ते मनाने चातुर्वर्ण्यवादीच आहेत, परंतु देशातील जागृतीचा प्रवाह मात्र जातिभेद व चातुर्वर्ण्य मोडण्याकडे आहे. हिंदू समाजातील बहुसंख्याक मागासलेल्या खालच्या जाती उच्चवर्णीयांच्या गुलामगिरींचे ओझे किती दिवस वाहतील, असे जनसंघाला वाटते? खरे म्हणजे जागृतीच्या या प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिंमत नाही आणि चातुर्वर्ण्याच्या जुन्या श्रद्धा सोडवत नाहीत, असा हा चमत्कारिक मानसिक पेचप्रसंग जनसंघापुढे उभा आहे.

मुस्लिम प्रश्नांबाबतही हाच अनुभव येतो. मुस्लिम समाजाच्या कडव्या धर्मश्रद्धा, पाकिस्तानला जवळ मानण्याची प्रवृत्ती, विस्तारवादाची या समाजाची आकांक्षा याविषयी कोणी आक्षेप घेतला; तर त्याबद्दल मतभेद होण्याचे कारण नाही. परंतु हिंदू समाजाच्या हाडी-मांसी खिळलेल्या अस्पृश्यतेबद्दलदेखील असेच आक्षेप घेता येतील. हिंदूंच्या जातिनिष्ठा या टोळीवाल्यांच्या निष्ठांप्रमाणेच बनलेल्या आहेत. जातींच्या अनेक कुंपणांनी विभागल्या गेलेल्या हिंदू समाजाचा स्वभाव इतरांना दूर ठेवणारा असा बनला आहे. धर्म, त्याच्या श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारे धार्मिक राजकारण यातून कुठलेच समाज सुटलेले नाहीत. हिंदू धर्मही ह्याला अपवाद नाही. ही भूमिका जनसंघ कधीच घेऊ शकला नाही. त्याची एकूण भूमिका अशी आहे की- हिंदू धर्म हा जगातील श्रेष्ठ धर्म आहे, त्याने जगाला धार्मिक तत्त्वज्ञानाचा महान ठेवा दिलेला आहे. हिंदू धर्माइतका सहिष्णु धर्म जगात कुठेही आढळणार नाही, कारण आम्ही धर्मांतर करून घेत नाही. आता अस्पृश्यता वगैरे क्षुल्लक गोष्ट आमच्यात आहे. त्याचा गाजावाजा करण्याचे काय कारण आहे? कालांतराने हे दोष नष्ट होतीलच!

काळ हाच जर सर्व  रोगांवर इलाज असेल, तर मुस्लिम प्रश्नही काळावर सोपविलेला बरा. काळच मुसलमानांना धर्मनिरपेक्ष बनवील. ते आपोआपच परधर्मीयांशी प्रेमाने वागू लागतील. आपण आंदोलने करण्याची काय गरज आहे? इस्लाममध्येही काही चांगल्या गोष्टी आहेत, अशीही भूमिका घेता येईल. जमाते मुस्लिम हीच भूमिका घेते. अनेक सुशिक्षित मुसलमानांचे हेच म्हणणे असते. जनसंघाला अर्थात ही भूमिका अमान्य आहे. मुसलमानांना झोडपून का होईना- सुधारले पाहिजे, असे त्यांच्यापैकी एक वर्ग म्हणत असतो. तर मुसलमान कधी सुधारू शकणार नाही, काळही त्याला सुधारू शकणार नाही- असे म्हणणाराही एक वर्ग आहे. मात्र मुसलमानांना धाकात ठेवले पाहिजे, हे बहुधा सर्व मानतात असे दिसते.

म्हणूनच हिंदू-मुसलमान दंगा असो किंवा भारत-पाकिस्तान युद्ध असो- जनसंघाची वृत्तपत्रे, काही नेते आणि कार्यकर्ते कमालीची मुस्लिमविरोधी भूमिका घेताना दिसतात. प्रत्येक दंग्यात त्यांना मुसलमानांचा हात दिसतो. आगळीक मुसलमानांनी केलेली असते. समग्र हिंदू हे मुस्लिम हल्ल्याचे बळी असतात, असे ते मानतात. मुसलमान दंग्यात आगळीक करीत नाही, असे नाही; परंतु अनेकदा हिंदूंही आगळीक करतात. जनसंघाची ही भूमिका आणि मुस्लिम निष्पाप असतात, हे मुस्लिम जातीयवाद्यांचे सांगणे एकाच प्रकारच्या वृत्तीचे द्योतक आहे. अनेकदा दंग्यांत मुस्लिम लोकांच्या मालमत्तेचे जास्त नुकसान झाले आहे. अशा वेळी आपण सर्व भारतीयांसाठी काम करतो, असे म्हणणाऱ्या जनसंघाने मुसलमानांना काही मदत पुरविल्याचे दिसत नाही. अहमदाबादेत दंगा झाल्यानंतर बडोदा येथे रस्तोरस्ती जनसंघाने ‘हिंदूंनो, तुमच्या रक्षणासाठी जनसंघ’ अशा अर्थाचे फलक लावले होते. भिवंडी येथे दंगा झाल्यानंतर मुंबईला झालेल्या एका मोठ्या सभेत श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘हिंदू आता मार खाणार नाहीत’ अशी घोषणा केली. हिंदूंनी मार खावा असे सुज्ञ मुनष्य म्हणणार नाहीत. हिंदू मार खात असले तर त्यांच्या रक्षणासाठी धावून येण्यात गैरही काही नाही. पण इतरांनी मार खाल्ला तर चालेल, असा या विधानाचा अर्थ आहे. आणि तरीही जनसंघ घटनेने धर्मनिरपेक्ष आहे.

जवळजवळ प्रत्येक मुसलमान हा देशद्रोही असतो, असे सिद्ध करणाऱ्या जनसंघाच्या राजकीय परिपक्वतेबद्दल आता शंका आल्याखेरीज राहत नाही. भारत-पाकिस्तान युद्धात हे विशेष जाणवले. भारतीय मुसलमानांच्या रूपाने पाकिस्तानी हेर कसे देशभर थैमान घालीत आहेत, याच्या सुरस कथा जनसंघाच्या कार्यकर्त्यांकडून तेव्हा ऐकायला मिळत. दिल्लीला कुठल्या तरी एका तलावात मुसलमानांनी विष टाकले आहे, अशी एक कथा तेव्हा प्रसृत झाली होती. डॉ. झाकिर हुसेन हे 1965 च्या युद्धाच्या वेळी उपराष्ट्रपती होते. हवाई दलात असणाऱ्या त्यांच्या एका पुतण्याने भारताच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांना सीमेवर घेऊन जाणारे विमान पाकिस्तानकडे वळविले, तेव्हा एका सैन्याधिकाऱ्याने त्याला गोळी घालून ठार केले व विमान परत भारतीय हद्दीकडे वळविले, अशी सोेइस्कर अफवा 1965च्या युद्धात पसरविण्यात आली होती. डॉ. झाकिर हुसेन यांना कलंकित करणे, हा त्याच्यामागील उघड-उघड हेतू होता. आपण राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष मुसलमानांच्या विरुद्ध नाही, असे एकीकडे म्हणावयाचे आणि दुसरीकडे मात्र जे काही थोडेबहुत मुसलमान राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष असतील त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी खुनशी प्रयत्न करायचे, असे याबाबतीत त्यांचे धोरण दिसते. युद्धकाळात आणि दंगलीच्या काळात प्रत्येक मुसलमानाच्या घरात ट्रान्समीटर असतो, असाच ते प्रचार करीत असतात. महाराष्ट्रात बार्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मुसलमानांजवळ असंख्य ट्रान्समीटर असल्याचा शोध एका जनसंघीय कार्यकर्त्याने लावला होता. बार्शीत जेमतेम दहा ते बारा मुसलमान मॅट्रिकपर्यंत शिकलेले आहेत. एक-दोन पदवीधर आहेत. शास्त्रविषयाचा पदवीधर कोणीच नाही. तंत्रविज्ञान जाणणारा कोणी नाही. बहुतेक मुसलमान गरीब व अशिक्षित, मोलमजुरी करणारे आणि व्यवसायाने नालबंद, तांबोळी, टांगेवाले किंवा रिक्षावाले असे आहेत. अशी ही माणसे. ट्रान्समीटर कशाशी खातात, हे त्यांना माहीतही नसेल. ते  ट्रान्समीटरवरून त्या वेळी आयुबखानांना प्रत्यक्ष संपर्काने संदेश पाठवीत असत, असे आपण मानायचे आहे. अनेकदा दंगे होतात, तेव्हा पाकिस्तान नभोवाणी दंग्यांची बातमी प्रथम देते. यावरून ही ट्रान्समीटर-कथा रंगविण्यात आली आहे. ज्या अर्थी पाकिस्तान प्रथम बातमी देते, त्या अर्थी ती पाकिस्तानला कोणी तरी पुरवीत असले पाहिजे आणि ज्या अर्थी ही बातमी लगेच प्रसृत होते त्या अर्थी ती ट्रान्समीटरवर पाठवली गेली असली पाहिजे तसेच ज्या अर्थी ती ट्रान्समीटरवर जाते, त्या अर्थी ती मुसलमान पुरवीत असले पाहिजेत- हे दुष्ट तर्कट आहे. पाकिस्तान नभोवाणी बातमी अगोदर कशी देते, हे थोडे डोके चालविले तर सामान्य माणसाच्या लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांमार्फत ही बातमी पाकिस्तानला पुरविली जाते. वृत्तसंस्था प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी असतात. ते स्थानिक दंगलीच्या बातम्या आपल्या वृत्तसंस्थांकडे पाठवितात. या वृत्तसंस्था टेलप्रिंटरवरून त्या देशभर प्रसृत करतात. या वृत्तसंस्थांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य असते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था या बातम्या पाकिस्तानी वृत्तसंस्थांना देतात. शिवाय पाकिस्तानच्या हायकमिशनची कचेरी असतेच. या कचेरीत आपल्या वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर्स बसविलेले असतात. या टेलिप्रिंटरवर आलेली दंगलीची बातमी वकिलातीतील अधिकारी बिनतारी तारयंत्राने पाकिस्तानला पाठवीत असणार. अशा रीतीने ती पाकिस्तानात त्वरित जाऊ शकते. अशा बातम्या पाकिस्तानी नभोवाणीवर प्रसृत झाल्यानंतर भारतीय नभोवाणीवर येतात, याचे कारण उघड आहे. आपल्या देशातील दंगलींच्या बातम्या देणे किंवा त्याला महत्त्व देणे आपल्याला प्रशस्त वाटत नाही, म्हणून आपले सरकार दंगलींच्या बातम्या त्वरित देत नाही. त्यामुळे दंगली वाढण्याचा संभव असतो. याउलट पाकिस्तानचे असते. पाकिस्तानला भारताला बदनाम करावयाचे असते. अशाच प्रकारे पाकिस्तानसंबंधीच्या काही बातम्या आपली नभोवाणी आधी प्रसृत करते. म्हणजे पाकिस्तानातील हजारो नागरिक ट्रान्समीटरवरून भारताला संदेश पाठवीत असतात, असे समजावे लागेल.

पाकिस्तानचे काही हेर भारतात असतीलच. ते बेकायदारीत्या काही ट्रान्समीटर चालवीत असतीलही. आपल्या देशाचेही काही हेर पाकिस्तानात असण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील हेर एकमेकांच्या देशात हेरगिरी करीत असतीलही. परंतु देशातील प्रत्येक मुसलमान पाकिस्तानची हेरगिरी करीत असतो, अशी जनसंघाच्या दुय्यम कार्यकर्त्यांची भूमिका आहे. जनसंघाचे वरिष्ठ नेते मुस्लिम समाजाशी एकात्मता घडवून आणली पाहिजे, असे अधून-मधून ओरडताना दिसतात. प्रत्येक मुसलमानाला हेर समजून ते ही एकात्मता कशी घडवून आणणार आहेत? आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात हेरगिरी चालू असताना भारत सरकारचे हेरखाते काहीच करत नाही, हे कसे? इतके  असंख्य ट्रान्समीटर सरकार कशाकरिता चालू ठेवील? सरकारी हेरयंत्रणेला त्याचा सुगावाच लागत नाही, असे समजायचे काय? या माझ्या प्रश्नावर जनसंघाच्या कार्यकर्त्याने मोठे मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘हे सरकार मुस्लिमधार्जिण्या हिंदूंचे आहे. त्यामुळे ते त्यांची गय करत आहे.’’ याचा एक निष्कर्ष असा निघतो की- ‘जे हिंदू जनसंघात नाहीत, ते हिंदू देशद्रोही आहेत.’ येथे पाकिस्तानच्या चळवळीच्या काळात ‘मुसलमान हो तो मुस्लिम लीग में आवो।’ या जीनांनी दिलेल्या घोषणेची आठवण येते.

राष्ट्रपे्रमी हिंदू तेवढा जनसंघात असतो, असे म्हटल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फक्त जनसंघ आहे, ही भूमिका ओघानेच आली. आपण तेवढे राष्ट्रवादी आणि इतर तेवढे राष्ट्राचा द्रोह करणारे- या भूमिकेचा अहंकार जनसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यात दिसून येतो. यामुळे जनसंघाने सतत उग्र राष्ट्रवादी भूमिका घेतलेली आहे. परदेशाबरोबरचा सीमा तंटा असो किंवा कसलाही आंतरराष्ट्रीय तंटा असो; जनसंघ उग्र राष्ट्रवादी भूमिका घेत आलेला आहे. परराष्ट्रधोरणावरील जनसंघाची भूमिकादेखील अशीच उग्र राष्ट्रवादाच्या पायावर उभी असलेली आणि मुस्लिम द्वेषाच्या पार्श्वभूमीने भारलेली दिसते. एरवी इस्रायलचे अवास्तव स्तोम माजविण्याच्या प्रयत्न जनसंघाने केला नसता. वास्तविक जनसंघाने पॅलेस्टाईनच्या अरबांच्या इस्राईल नष्ट करण्याच्या आणि सबंध पॅलेस्टाईनला एकत्र आणण्याच्या भूमिकेला पाठिंबा द्यायला हवा होता. कारण इस्राईल व पाकिस्तान ही धर्मांच्या आधारे झालेली दोन राष्ट्रे आहेत. या दोन राष्ट्रांच्या निर्मितीतही पुष्कळ साम्य आहे. दोन्ही राष्ट्रांनी आपल्या देशातील अरबांना आणि हिंदूंना हाकलून दिले आहे. पाकिस्तानातून हाकलून दिलेल्या हिंदूंचा कैवार घेणाऱ्या जनसंघाने वास्तविक पॅलेस्टाईनच्या निर्वासितांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे होते. 1950 मध्ये पाकिस्तानातून निर्वासित होऊन आल्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘पाकिस्तानकडे प्रदेश मागावा’ अशी सूचना केली होती. याह्याखानांनी 1971 मध्ये अत्याचार सुरू केल्यानंतर तेव्हाच्या पूर्व बंगालमधून सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले. बांगलादेशाच्या मुक्तीसाठी आपण सरळ तिथे सैन्य धाडले आणि या निर्वासितांची परत रवानगी केली. (जनसंघाने या सर्व कृत्यांना पाठिंबा दिलेलाच आहे.) परंतु इस्राईल-अरब वादात मात्र जनसंघ इस्राईलची बाजू उचलून धरतो. जनसंघाच्या या विसंगतीचे कारण इतकेच आहे की, बिचारे पॅलेस्टाईनचे गरीब निर्वासित हे मुसलमान आहेत. हा अर्थात त्यांचा गुन्हा आहे आणि मुसलमानांच्या न्याय्य गाऱ्हाण्यांनादेखील विरोध करणे हे आपले परम कर्तव्य आहे, अशीच ही जनसंघाची भूमिका आहे.

ज्यूंबद्दल जनसंघाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फारसे प्रेम आहे, असे मानण्याचे कारण नाही. हिटलरने ज्यूंच्या केलेल्या अमानुष कत्तलींचे गोळवलकरांनी समर्थन केले, हे याआधी मी लिहिलेच आहे. परंतु तेव्हा हा झगडा आर्य (जर्मन) आणि सेमेटिक (ज्यू) असा होता. शिवाय जर्मनीच्या लोकसंख्येत ज्यू अल्पसंख्याक होते. आर्य वंशश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेल्या गोळवलकरांनी हिटलरच्या कृत्यांचे समर्थन करावे, यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. शिवाय ज्यू अल्पसंख्याक होते आणि अल्पसंख्याकांचे निर्दालन करण्यात गैर काहीच नाही, असे ते मानीत होते. परंतु हिंदूंतदेखील ब्राह्मण हेसुद्धा अल्पसंख्याक आहेत,  हे गोळवलकर सोइस्करपणे विसरलेले दिसतात. आणि सर्व हिंदू आर्य वंशाचे नाहीत. (हे इतिहासाचे साधे ज्ञानही त्यांनी आत्मसात केलेले नव्हते.) अल्पसंख्याक जमातींच्या निर्दालनाचे तंत्र कधी तरी हिंदू समाजातील उच्चवर्णीय अल्पसंख्याकांवर उलटेल, याचा जनसंघाने विसर पडू देता कामा नये. महाराष्ट्रात गांधीजींच्या खुनानंतर ब्राह्मणविरोधी दंग्याची लाट उसळली होती. त्या वेळी गांधीजींच्या अनुयायांनी मराठ्यांना आवरले, म्हणून ब्राह्मण वाचले. कत्तलीने प्रश्न सोडविण्याची ईर्ष्या बाळगणाऱ्यांनी स्वत:च्या कत्तली होतील तेव्हा तक्रारी करू नयेत आणि अल्पसंख्याकांविषयी अढी बाळगू नये. ज्यूंविषयी पुढे म्हणायचे तर, इस्राईल झाल्यानंतर आधीचे चित्र बदलले. आता संघर्ष ज्यू व मुसलमान असा सुरू झाला आणि जनसंघाची सहानुभूती इस्रायलकडे वळली. पॅलेस्टाइनी अरबांना ज्यूंनी हाकलून देण्यात गैर काही नाही, असे ते म्हणू लागले. जनसंघाच्या अल्पसंख्याकांविषयीच्या ध्येय-धोरणात हे चपखल बसते. जर्मनीत ज्यू अल्पसंख्याक होते, तेव्हा तिथून त्यांना हाकलून देणे योग्य होते आणि पॅलेस्टाईनमध्ये अरब अल्पसंख्याक आहेत, म्हणून त्यांना हाकलून लावण्यात गैर काही नाही. तत्त्व, न्याय इत्यादी गोष्टींचा यात मागमूसदेखील आढळत नाही, याचे आश्चर्य वाटावयास नको. कारण बहुसंख्याकांचे एकसंध राष्ट्र बनविणे या महान उद्दिष्टासाठी केलेली कोणतीही कृत्ये क्षम्य ठरतात, अशी ही भूमिका आहे. ‘एव्हरीथिंग इज नेशन’ असे हिटलर म्हणाला होता, त्याची ही सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. अर्थात याला पाकिस्तानचे हिंदू मात्र अपवाद आहेत. त्यांना हाकलून देण्यात पाकिस्तानने अन्याय केला आहे, असे जनसंघाचे मत आहे.

जनसंघाचे वरिष्ठ नेते अनेकदा ज्या भूमिका मांडतात, त्याच्या नेमके विरुद्ध वर्तन काही दुय्यम कार्यकर्ते करीत असतात. आंतरधर्मीय लग्ने झाली पाहिजेत, असे जनसंघाचे काही वरिष्ठ नेते खासगी बोलताना माझ्यापाशी म्हणाले. परंतु पुण्याला झालेल्या एका हिंदू-मुस्लिम आंतरधर्मीय विवाहाच्या वेळी विरोध व निदर्शने करण्यात जनसंघाच्या कार्यकत्यांनी व नेत्यांनी पुढाकार घेतला होता. या विसंगतीचे कारण तरी कोणते? जनसंघात आलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांचा संच जनसंघाच्या बदलत्या व्यापक विचार करण्याच्या धोरणाशी जुळते घ्यायवास तयार नाही? की, जनसंघाच्या दुटप्पीपणाचा हा एक भाग आहे? बाहेर भूमिका परिस्थितीनुसार सोइस्कर ती घ्यायची आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकीत व बौद्धिक वर्गातून आपल्या खऱ्या ध्येय-धोरणाचे सिद्धान्त मांडावयाचे, असे तर होत नाही ना? यातील कोणतेही कारण बरोबर असू शकेल. परंतु जोपर्यंत ही विसंगती अस्तित्वात आहे, तोपर्यंत मुसलमानांविषयींच्या जनसंघाच्या ध्येय-धोरणाबद्दल शंका राहणार आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दलवाई


वैचारिक लेखक, कथाकार, संस्थापक - मुस्लिम सत्यशोधक मंडळ. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके