डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

माझ्यात समतावादी विचार रुजण्यात विज्ञानाची मदत झाली. स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक फरक असला तरी दोन्ही प्रकारच्या जीवरचना आपल्या जीवसृष्टीसाठी आवश्यक असतात, तेव्हा कशाला उगीच बाऊ करायचा हेही शिकवलं. वयोमानानुसार निरनिराळ्या ऊर्मी असतात, आसपासच्या निरीक्षणांतून कुतूहलं असतात आणि ती त्या त्या वेळी शमवता आली तर त्यांचाही बाऊ करण्याची गरज नसते. याच संस्कारामुळे कदाचित आज मी माझ्या मुलाला वाढवताना त्याला तो ‘स्ट्राँग आहे’ असं म्हणताना तो पुरुषासारखा स्ट्राँग आहे असं म्हणत नाही. त्यानं त्याच्या जेवणाचं ताट उचललं नाही तर ‘मुली बघ कशा उचलतात,’ असं म्हणत नाही. त्याला काजळ लावून पहावंसं वाटलं, बहिणींचं पाहून गजरा डोक्यावर ठेवून पाहावासा वाटला, किचनमध्ये लुडबूड करावीशी वाटली- तर आम्ही कुणीही त्याला अडवत नाही.

विज्ञानशाखेत प्रवेश करताना या शाखेतच करिअर करण्याचं कुठलंही ध्येय समोर नव्हतं. निव्वळ दहावीत चांगले गुण मिळाले आहेत, या एका निकषावर अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. कुटुंबात मी मोठी असल्याने मोठ्यांकडून किंवा समवयस्कांकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यताही नव्हती. शेवटी सगळे म्हणतायत, या तत्त्वाला नमस्कार करून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी झाले.

अकरावीच्या अगदी सुरुवातीच्या महिन्यांतच माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्याची नवी दृष्टी मिळाली. झालं असं होतं की, बायोलॉजीमध्ये रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम शिकत होते. स्त्रियांच्या शरीरात एक्सएक्स क्रोमोझोम्स आणि पुरुषांच्या शरीरात एक्सवाय क्रोमोझोम्स असतात. एक्सएक्स क्रोमोझोम्सच्या संयोगानं मुलगी आणि एक्सवाय क्रोमोझोम्सच्या संयोगानं मुलगा होतो, अशी माहिती बायोलॉजीचे शिक्षक देत होते. त्या वयात आधी वाटलं की, दोघांकडेही सारखेच क्रोमोझोम्स असायला हवे होते. असे चित्रविचित्र प्रश्न पडण्याची मुभा इथूनच मिळायला लागली. हवे ते प्रश्न विचारण्याचं, उत्तर सापडत नसलं तरी प्रश्नांच्या मागं लागण्याचं धैर्य होतं. त्याच दिवसांत माझ्या नात्यातल्या माझ्याहून एखादं वर्ष मोठ्या बहिणीचं लग्न झालं. ती भेटायला म्हणून आमच्या घरी आली होती. तिला मी मुलगा-मुलगी जन्मामागचं विज्ञान सांगितलं. ती म्हणाली, ‘‘बरं झालं सांगून ठेवलंस! उद्या जर मुलगी झाली आणि नवऱ्याकडचे कुणी जर त्याचा दोष मला देऊ लागले तर त्यांना लगेच म्हणेन अहो, माझ्याकडे तर दोन्ही एक्सच आहेत. म्हणजे दोष द्यायचा असेल तर तुमच्याच मुलाला द्या!’’ हे ऐकून तेव्हा एकदम भारी वाटलं. पहिल्यांदा जाणवलं- अशी योग्य सापेक्ष माहिती... विज्ञान हे तर एक टूल आहे, एखाद्या संभाव्य अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ देणारं!

दरम्यान, शैक्षणिक स्तरावर मन लावून अभ्यास सुरू होता तरी पुढच्या आयुष्याची भिस्त ज्या शिक्षणावर होती, त्याबाबत थोडासा विस्कळीतपणाच होता. आपल्याला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक-प्राध्यापकही व्हायचं नाही, याबाबत पुरेशी स्पष्टता होती. पण आपल्याला काय करायचंय, याबाबत अजिबातच स्पष्टता नव्हती. त्यामुळे बारावीनंतर बी.एस्सी. करण्याचं ठरवलं. बी.एस्सी. करताना आपल्याला हवा तो मार्ग सापडेल- किमान शोधाशोध करायला तीन वर्षांचा अवधी तरी मिळेल, हा विचार होता. ‘गो विथ फ्लो’ असं काहीसं सुरू होतं. खरं तर बारावीनंतर असं वाटू लागलं की, आपण आटर्‌सला प्रवेश घ्यायला हवा होता. वाचन-लेखनात अधिक रस आहे अशी जाणीव तेव्हा होऊ लागली होती. त्या वेळी मी आबेदा इनामदार कॉलेजमध्ये शिकत होते. कॉलेजच्या लायब्ररीतून विज्ञानविषयक संदर्भ पुस्तकांबरोबरच हिंदी-मराठी कथा-कादंबऱ्यांची पुस्तकं घ्यायचे. त्या वेळेस खरं तर लायब्ररीयन अशा काही पाहायच्या की, मी परग्रहावरून अवतरले आहे! अर्थात भाषेविषयीची पुस्तकं घेणारे आटर्‌स शाखेचेच विद्यार्थी असतात, असा त्यांचा अनुभव तरी असणार किंवा तसा त्यांचा समज तरी असणार.

शेवटी, दुसरे वर्ष संपता-संपता आपण पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचं, हे निश्चित झालं. बी.एस्सी. झाले तोवर मला अधून-मधून वाटायचं की, आपण सायन्स स्ट्रीमची निवड करून चुकलो. आपल्याला यात करिअरही करायचं नाहीये तरी आपण काय वेडेपणा करतोय, असंही वाटायचं. पण जेव्हा पुणे विद्यापीठाच्या  संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात प्रवेश घेतला; तेव्हा जाणिव झाली की, कळत-नकळत आपल्यावर विज्ञानशाखेचे आणि एकूणच विज्ञानाचे बरेच संस्कार झालेले आहेत. ते असे संस्कार होते की, त्याचं ज्ञान कुठंही मार्गदर्शकच ठरणार होतं.

एखादी गोष्ट खोलात जाऊन आणि सर्व बाजूंनी पडताळणं, कठीण कारणमीमांसा करणं हा विज्ञानाचा विशेष आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष फिल्ड रिपोर्टिंग करताना अधिक उपयुक्त ठरली. बातमीसाठी चौकस असणं, कुतूहल बाळगणं या बाबी पत्रकारितेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. मात्र चौकसपणातून हाती येणाऱ्या माहितीचं पृथक्करण करणं, माहितीवर प्रोसेस होऊ देणं, हाती असलेल्या माहितीच्या दृष्टीने इतर कुठले घटक आवश्यक आहेत, त्याचा अभ्यास करणं- या बाबी विज्ञानाच्या संस्कारातून आल्या होत्या. बातमीदारीत नकारात्मक माहितीचा अधिक पुरस्कार केला जातो. एखादी माहिती जितकी निगेटिव्ह तितकी ती महत्त्वाची बातमी. या नकारात्मकतेत घडणारे छोटे-छोटे बदलही महत्त्वाचे असतात आणि ते टिपकागदासारखे टिपत जाण्याचा धडा विज्ञानाच्या अभ्यासातून आला होता. चांगले मोठे बदल एका दिवसात होत नसतात. त्याला वेळ लागतो आणि त्या बदलत्या प्रक्रियांचा वेग कितीही मंदावलेला असला तरी त्याची त्या-त्या वेळी नोंद करणं आवश्यक असतं. प्रत्येक बदलाकडे डोळसपणे आणि पूर्वग्रहाची मर्यादा आखून न घेता पाहणं, ही महत्त्वाची शिकवण विज्ञानाने मला दिली. आपण जे लिहीत आहोत, त्यातून कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना बळकटी मिळत नाहीये ना, चुकीची वा अपूर्ण माहिती तर देत नाहीये ना, याचं भान हळूहळू येत गेलं ते याच शिकवणुकीमुळे.

इतकंच नव्हे तर नैतिक-अनैतिक, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या सगळ्या व्यक्तिसापेक्ष आणि घटनासापेक्ष गोष्टी आहेत. अमुक परिस्थितीत तमुक रसायनं एकत्र आली की अमुक-तमुक रिॲक्शन्स होतात, ही बाब लक्षात आल्यानंतर कौटुंबिक पातळ्यांवरचा गोंधळ डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याची दृष्टी दिली. कोर्टबातमीदारीत तर त्याचा अधिकच फायदा झाला. माणसां-माणसांमधल्या आकळणाऱ्या व न आकळणाऱ्या अशा कित्येक ॲक्शन-रिॲक्शन्स तटस्थपणे पाहता आल्या.

सतत प्रयोगशील राहण्याची उर्मीदेखील विज्ञानामुळे वृद्धिंगत होत गेली. एखादा शोध लागल्यानंतर संशोधकांचं काम संपत नाही, उलट तिथून त्यातील अधिक बारीक कंगोरे शोधण्या-तपासण्याचं काम सुरू होतं. तसंच काहीसं- एखादा विषय केल्यानंतर तो संपत नाही; तर तिथून कदाचित त्या विषयाचे नवनवे कंगोरे आपल्याला शोधण्या-तपासण्याची गरज असते, हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार याचमुळे आतमध्ये मुरत गेला. प्रयोगशीलतेत सतत नावीन्याचा ध्यास ही बाबही अध्याहृत आहे. नवनवीन माध्यमांचे प्रयोग करण्याचं धाडस, त्या-त्या प्रयोगानुसार स्वत:ला मोल्ड करत नेण्याची ताकदही मिळत गेली. महत्त्वाचं म्हणजे- काळं आणि पांढरं असं जगात काहीच नसतं, प्रत्येक ग्रे एरिया आणि त्या-त्या ग्रे एरियाची आपली गुणवैशिष्ट्ये अगर दोष असतात. तेव्हा हे सत्य आपण स्वीकारायचं असतं, याचं भान विज्ञानाने दिलं. मुख्य म्हणजे आज जे सत्य आहे ते एखाद्या प्रयोगानंतर खोटं ठरू शकतं. किंवा त्या सत्यात अधिक भर पडल्यानं आधीचं कमी अस्सल राहू शकतं, त्यामुळे प्रयोगांती हाती येणारं आणि सतत हाती येत राहणाऱ्या ज्ञानासाठी आपण खुलं व सजग असायला हवं, याची जाणीव विज्ञानातूनच आली. निव्वळ विज्ञानापुरतंच नव्हे, तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही माणसांच्या बाबतीत पूर्वग्रह किंवा ग्रजेस धरून ठेवण्यापेक्षा त्यांच्यातील सूक्ष्म बदलांना, बदल करण्याच्या इच्छेला आणि ते आहेत तसं स्वीकारण्याला आपण तयार असायला हवं, हेही रुजत गेलं. त्याचबरोबर जगण्याच्या प्रवाहात एक तऱ्हेचा संयतपणा, एक तऱ्हेचा ठहराव अत्यंत आवश्यक असतो. एखाद्या गोष्टीचा माग काढताना, रहस्याची उकल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सोबतीला चिकाटी अत्यंत आवश्यक असते. त्यातूनच एक ठहराव येतो. जीवसृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक असणारा रिझल्ट मिळेपर्यंत थांबून राहण्याची गरज असते, अशा तऱ्हेचा संयतपणा विज्ञानामुळे उमजत गेला.

विज्ञानासाठी प्रत्येक जीवजंतू महत्त्वाचा असतो. त्या-त्या जीवजंतूंची लाईफसायकल आणि त्यांचं महत्त्व अबाधित असतं, हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आपल्या समाजाकडं पाहण्याची दृष्टी देऊन गेला. रंग, रूप, भाषा, जात, धर्म या पल्याड प्रत्येकच माणूस महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या जगण्याचं व जीवाचं मोल असतं आणि त्यात कुठल्याही तऱ्हेचा निराधार द्वेष बाळगण्याचं काहीच कारण नसतं, याचा अनुभव येत राहिला. जातव्यवस्था नाकारण्याचं धाडस विज्ञानाने दिलं, तसंच जातव्यवस्था आहे हे सत्य पाहण्याचा दृष्टिकोनही विज्ञानानेच दिला. विज्ञान भेदाभेद मानत नसेल, मात्र समाजव्यवस्था तशी असेल तर त्याकडे भेदाभेदाची नीती निराधार आहे म्हणत सोडून देता येणार नाही. त्यासाठी पुन्हा सातत्यानं प्रयोगशील राहून त्यात अभिसरण होत राहील का, हे पाहण्याचा विचार विज्ञानाने दिला.

विज्ञानाने अंधश्रद्धांना विरोध करण्याचं बळही दिलं. मी गर्भवती होते, तेव्हा त्या काळात एकदा चंद्रग्रहण होते. ग्रहणाचं काहीही पाळायचं नाही, असं मी ठरवलं होतं. जे विज्ञानविरोधी आहे ते आपण का फॉलो करायचं, असा साधा विचार होताच. आपला वैज्ञानिक विचार गर्भावस्थेतच बाळाला सांगण्याचा हा किती चांगला मार्ग आहे, असं मला वाटत होतं. यावर एक मैत्रीण म्हणाली, ‘‘तुला चूक वाटत असेलही; पण त्यासाठी बाळाचा जीव धोक्यात घालण्याची रिस्क का घ्यावी?’’ केवळ भीतीपोटी जे सत्य आपल्याला माहिती आहे, त्यापासून आपण परावृत्त का व्हायचं, हे मला कळलं नव्हतं. भीतीला भीक न घालण्याचं बळ या विज्ञानानेच दिलं.

माझ्यात समतावादी विचार रुजण्यात विज्ञानाची मदत झाली. स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक फरक असला तरी दोन्ही प्रकारच्या जीवरचना आपल्या जीवसृष्टीसाठी आवश्यक असतात, तेव्हा कशाला उगीच बाऊ करायचा हेही शिकवलं. वयोमानानुसार निरनिराळ्या ऊर्मी असतात, आसपासच्या निरीक्षणांतून कुतूहलं असतात आणि ती त्या त्या वेळी शमवता आली तर त्यांचाही बाऊ करण्याची गरज नसते. याच संस्कारामुळे कदाचित आज मी माझ्या मुलाला वाढवताना त्याला तो ‘स्ट्राँग आहे’ असं म्हणताना तो पुरुषासारखा स्ट्राँग आहे असं म्हणत नाही. त्यानं त्याच्या जेवणाचं ताट उचललं नाही तर ‘मुली बघ कशा उचलतात,’ असं म्हणत नाही. त्याला काजळ लावून पहावंसं वाटलं, बहिणींचं पाहून गजरा डोक्यावर ठेवून पाहावासा वाटला, किचनमध्ये लुडबूड करावीशी वाटली- तर आम्ही कुणीही त्याला अडवत नाही. नैसर्गिक भावनांचा निचरा होणं आवश्यकच असतं आणि ती तशी नाही झाली तरी कुठल्या मार्गानं बाहेर पडेल, याची आपल्याला कुणालाच खात्री देता येत नाही. नैसर्गिकता स्वीकारत एकमेकांचा आदर करण्याचं भान येत गेलं.

समजा- मी विज्ञान शाखेतून शिकले नसते, तरी इतकी खात्री आहे की, जग अनुभवताना स्वत:ला विज्ञानाची लिटमस टेस्ट नक्कीच लावली असती. विज्ञानाच्या दृष्टीने जे चूक, अन्यायकारक आणि शोषणास कारणीभूत ठरणारं आहे त्याबाबत मनात कुठलीच शंका न ठेवणं- ही लिटमस टेस्ट नक्कीच बाळगली असती. विज्ञानही त्याला आज जे माहिती नाही, गूढ आहे आणि उकल कधी होणार आहे याची त्याला माहिती नाही- अशाही स्थितीत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शास्त्रशुद्ध चिकित्सा करत राहण्यालाच महत्त्व देतं. त्यात कुठलीही हयगय करत नाही. तोच विचार अंगीकारला असता, त्याचं कारण घरातूनच त्या पद्धतीच्या चिकित्सेला पूर्ण थारा राहिला आहे. त्यामुळेच कौटुंबिक संस्कारांतून विकसित झालेला दृष्टिकोन विज्ञान शाखेत गेले नसते तरी जगण्यात रुजत चालला होता... पण कदाचित विज्ञान शाखेच्या संस्काराने ते रुजणं अधिक काँक्रीट केलं. 

(उशिरा हाती आल्यामुळे हा लेख मागील विशेषांकात जाऊ शकला नाही, म्हणून येथे प्रसिद्ध करीत आहोत. संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात