डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1965 च्या भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते पूर्व बंगालचे शोषण करीत आहेत, ही जाणीव पूर्व बंगालमध्ये वाढू लागली. पाकिस्तानच्या परकीय चलनापैकी 70 टक्के चलन हे पूर्व पाकिस्तान मिळवत असताना ती रक्कम पश्चिम पाकिस्तानात सैन्याच्या खर्चासाठी वापरली जात होती. त्यातूनच 23 मार्च 1966 रोजी शेख मुजिब यांच्या अवामी लीगच्या Six Point Programme जन्म झाला. पाकिस्तानने संघराज्याची व्यवस्था स्वीकारावी, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे दोनच विषय केंद्र सरकारकडे असावेत, बाकीचे सर्व विषय राज्यांकडे सोपवावेत, पूर्व पाकिस्तानसाठी परकीय चलन व उत्पन्नाचा वेगळा हिशेब ठेवला जावा, ही त्यातील मुख्य कलमे होती. या चळवळीमुळे शेख मुजिब यांच्यावर Agartala Conspiracy Case हा खोटा खटला भरण्यात आला. तेव्हापासून कमाल हुसेन, वकील आणि सहकारी म्हणून शेख मुजिब यांच्या अधिकच जवळ आले.  

बांगलादेशात मला भेटलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे डॉ.कमाल हुसेन आणि त्यांची पत्नी डॉ.हमिदा हुसेन. डॉ.हुसेन यांचे नाव 1971 च्या बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामापासूनच ऐकले होते. बंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांचे सहकारी, स्वतंत्र बांगलादेशचे पहिले कायदा मंत्री आणि त्यांच्या घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून. हमिदा हुसेन यांच्या कार्याची मात्र मला माहिती नव्हती.

डॉ.कमाल हुसेन हे ढाक्क्याच्या स्प्रिंग लॉ स्कूलमध्ये व्याख्यानासाठी बोलावणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष होते. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 मार्च 2020 रोजी Valedictory Function साठी ते यावेत, ही अपेक्षा होती. परंतु आता ते वयाने 82 च्या पुढे आहेत, सध्या Wheel Chair चा वापर करतात आणि प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते येतील किंवा काय, याची खात्री नव्हती. तरीही ते आले, आमच्याबरोबर त्यांनी जेवणही घेतले आणि नंतर  Valedictory Function मध्ये भाग घेतला. त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. त्यामुळेच तर त्यांची भेट झाली आणि हमिदा हुसेन तर चक्क योगायोगाने दुसऱ्या दिवशी भेटल्या!

बांगलादेशच्या मुक्तिलढ्याच्या वेळेस मी शरणार्थी शिबिरात काम केले होते, हे ऐकून कमाल हुसेन प्रभावित झाले. आमच्या बोलण्यात त्यांनी त्या वेळचा काळ उभा केला. ते म्हणाले, ‘‘आम्ही यशस्वी होऊ किंवा नाही याची खात्री नव्हती, पण आमचा लढा हा न्यायासाठी होता आणि तो आम्ही शेवटपर्यंत लढणार होतो, हे ठरवले होते.’’ मी माझ्या भाषणात म्हणालो, ‘‘डॉ. कमाल हुसेनना भेटणे, त्यांच्या बाजूला बसणे, त्यांचे भाषण ऐकणे- हा माझा एक मोठा सन्मानच होता.’’ कमाल हुसेन यांना प्रकृतीमुळे अधिक वेळ थांबणे शक्य नव्हते. Valedictory Function झाल्यानंतर ते परत गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही Research Initiative Bangladesh (R.I.B.) या संस्थेच्या (Executive Director) कार्यकारी संचालक प्रा. मेघना गुहा-ठाकूरता यांना भेटायला गेलो. त्यांना भेटून मी आणि माझ्याबरोबर आलेले माझे पुण्याचे मित्र अन्वर राजन थोडा वेळ बोलू लागताच, त्या म्हणाल्या की, आपण आणखी बोलू याच. पण आत्ता थोड्या वेळात कमाल हुसेन यांच्या पत्नी हमिदा हुसेन इथे येणार आहेत. आमच्या संस्थेच्या सल्लागारांपैकी त्या एक आहेत आणि त्यांची आत्ता मीटिंग आहे. मी म्हटले, हा फारच चांगला योगायोग आहे. थोड्याच वेळात हमिदाजी आल्या. सडपातळ, हसऱ्या आणि साधी सुती साडी नेसलेल्या. मेघनाजींनी आमची ओळख करून दिली. बहुतेक त्यांना आमची माहिती कमाल हुसेन यांच्याकडून मिळाली असावी, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटले. थोड्याच वेळात संस्थेचे अध्यक्ष श्री.अब्दुल बारी तिथे आले. त्यांच्याबरोबर हमिदाजी मीटिंगसाठी आतल्या खोलीत गेल्या. मीटिंग संपल्यानंतर त्या पुन्हा बाहेर आल्या आणि बराच वेळ आमच्याशी बोलत राहिल्या.

आदल्या दिवशी मी कमाल हुसेनना म्हटले होते की, त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या पाहिजेत. त्यावर ते म्हणाले, विचार करतो. हमिदाजींना मी हे सांगितल्यानंतर त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य-लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल त्यांनी आधीच लिहिले आहे. त्यांना ते आठवले नसेल. मी तुम्हाला ते पुस्तक पाठवून देईन.’’ आणि आम्ही ज्या उत्तरा क्लबमध्ये उतरलो होतो, तिथे संध्याकाळी त्यांनी ते पुस्तक पाठविलेदेखील; कमाल हुसेन यांची सही आणि शुभेच्छा संदेशासह! 2013 मध्ये ढाक्क्याच्या University Press Ltd.. ने प्रकाशित केलेले- Bangladesh Quest for Freedom and Justice यातील कमाल हुसेन यांचा या लढ्यातील सहभाग हा या पुस्तकाचा विशेष. थोडक्यात तो पुढीलप्रमाणे-

कमाल हुसेन यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये डॉक्टरेट मिळविली, बॅरिस्टर झाले आणि नंतर ढाक्क्याच्या हायकोर्टात वकिली करू लागले. या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात कमाल हुसेन यांनी बांगलादेशच्या लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली आहे. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात, पंचवीस वर्षांच्या कालखंडात बांगलादेशच्या जनतेला स्वातंत्र्य आणि न्यायासाठी दोनदा लढावे लागले. हिंदू जमीनदार आणि मुसलमान शेतकरी यांच्यातील संघर्षाला 1946 च्या दंगलीनंतर जातीय वळण लागले. बंगालच्या मुस्लिम लीगचे प्रमुख नेते हुसेन शहीद सुऱ्हावर्दी हे सुरुवातीला देशबंधू चित्तरंजन दास यांना मानणारे होते. कमाल हुसेन लिहितात, ‘देशबंधूंच्या 1925 मध्ये झालेल्या मृत्यूमुळे जातीय ऐक्याची अपरिमित हानी झाली.’ महम्मद तालुकदार यांनी संपादित केलेल्या हुसेन शहीद सुऱ्हावर्दींच्या आठवणी या पुस्तकातील एक परिच्छेद त्यांनी उद्‌धृत केला आहे-

‘देशबंधू हे केवळ श्रेष्ठ बंगालीच नव्हे, तर श्रेष्ठ भारतीय आणि गांधीजींच्या इतकेच मोठे, व्यापक दृष्टिकोन असणारे आणि Non-Communal नेते होते. मी त्यांना ओळखत होतो, हे माझे भाग्यच. ते जर अधिक जगले असते तर त्यांनी हिंदू-मुसलमानांमधील संघर्ष व वैमनस्याची कारणे नष्ट केली असती आणि भारताची फाळणी व पाकिस्तानची निर्मिती टाळली असती.’ अर्थात ते होणार नव्हते.

सहाकलमी कार्यक्रम या दुसऱ्याच प्रकरणात कमाल हुसेन लिहितात : पाकिस्तानच्या निर्मितीनंतर थोड्याच काळात पूर्व बंगालला दुय्यम दर्जाची वागणूक मिळायला लागली. फेब्रुवारी 1952 मध्ये उर्दू भाषेच्या सक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. 1960 च्या दशकात रेडिओ आणि टेलिव्हिजनवर रवींद्र संगीतावर बंदी आणण्यात आली. त्याविरुद्ध कलावंतांना लढावे लागले. तेव्हापासून बंगाली भाषा आणि अस्मितेसाठी लढा वाढू लागला होता. 1965 च्या भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते पूर्व बंगालचे शोषण करीत आहेत, ही जाणीव पूर्व बंगालमध्ये वाढू लागली. पाकिस्तानच्या परकीय चलनापैकी 70 टक्के चलन हे पूर्व पाकिस्तान मिळवत असताना (विशेषतः ज्यूट उत्पादनातून) ती रक्कम पश्चिम पाकिस्तानात सैन्याच्या खर्चासाठी वापरली जात होती. त्यातूनच 23 मार्च 1966 रोजी शेख मुजिब यांच्या अवामी लीगच्या Six Point Programme चा जन्म झाला. पाकिस्तानने संघराज्याची व्यवस्था स्वीकारावी, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे दोनच विषय केंद्र सरकारकडे असावेत, बाकीचे सर्व विषय राज्यांकडे सोपवावेत, पूर्व पाकिस्तानसाठी परकीय चलन व उत्पन्नाचा वेगळा हिशेब ठेवला जावा, ही त्यातील मुख्य कलमे होती. यातूनच वाढलेल्या चळवळीमुळे शेख मुजिब यांच्यावर Agartala Conspiracy Case हा खोटा खटला भरण्यात आला. तेव्हापासून कमाल हुसेन, वकील आणि सहकारी म्हणून शेख मुजिब यांच्या अधिकच जवळ आले.  

लोकांच्या प्रक्षोभामुळे तो खटला नंतर काढून टाकण्यात आला आणि फेब्रुवारी-मार्च 1969 मध्ये बंगबंधू यांना Round Table Conference साठी पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्रपती अयूबखान यांनी रावळपिंडीला बोलावले. बंगबंधूंबरोबरच्या प्रतिनिधींमध्ये कमाल हुसेन होते. त्या परिषदेच्या अखेरीस अयूबखानांनी Six Point Progamme ची तत्त्वे स्वीकारण्यास नकार दिला. परिषद असफल झाली. बंगबंधूंचे प्रतिनिधी मंडळ ढाक्क्याला परत आले.

कालांतराने अयूबखान यांची सत्ता पाकिस्तानचे सेनाप्रमुख मानेनासे झाले. दि.25 मार्च 1969 रोजी त्यांनी राजीनामा दिला आणि जनरल याह्याखान हे Martial Law Administrator झाले. मधल्या काळात पूर्व बंगालमध्ये स्वायत्ततेचे आंदोलन आणि त्याबरोबरच सरकारी दमन चालूच होते. अखेर डिसेंबर 1970 मध्ये पाकिस्तानच्या National Assembly ची निवडणूक झाली. पंजाब आणि सिंधमधल्या बहुसंख्य जागा झुल्फिकार अली भुट्टो यांच्या पक्षाला मिळाल्या. परंतु National Assembly मधील 313 जागांपैकी 169 जागा पूर्व बंगालसाठी होत्या. त्यातल्या 167 जागा जिंकून अवामी लीगने National Assembly मध्ये बहुमत मिळविले. तरीही शेख मुजिब यांना सरकार बनविण्यासाठी बोलावले गेले नाही आणि National Assembly सुद्धा बोलावण्यात आली नाही. पूर्व बंगालमध्ये असंतोष व आंदोलन वाढत गेले. याह्याखान आणि भुट्टो हे दोघेही शेख मुजिब यांच्याशी बोलणी करण्यासाठी ढाक्क्याला आले, परंतु ते नाटक होते. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दि.25 मार्च 1971 रोजी याह्याखान यांच्याकडून काही प्रस्ताव येईल, अशी अपेक्षा होती. आदल्या दिवशी रात्री 10:30 वाजेपर्यंत कमाल हुसेन हे शेख मुजिब यांच्या घरी थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा शेख मुजिब यांच्या घरी गेले. शेख मुजिब त्यांना म्हणाले,  ‘काहीही प्रस्ताव आलेला नाही. दडपशाही सुरू झाली आहे. तुम्ही इथून निघा. माझी काळजी करू नका. आपण आता स्वतंत्र आहोत. आपले स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे.’

दुसऱ्या दिवशी कमाल हुसेन यांना कळले की, बंगबंधूंना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले आहे. कमाल हुसेन काही दिवस गुप्त ठिकाणी राहिले. पाकिस्तानच्या सैन्याने 25 मार्चपासून सामान्य जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले. ढाक्क्याच्या रस्त्यांवर लष्कराने रणगाडे आणून निःशस्त्र जनतेवर गोळीबार सुरू केला. कमाल हुसेननाही 3 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आणि त्यांनाही पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले.  मधल्या काळात शेख मुजिब यांचे दुसरे सहकारी ताजुद्दीन अहमद यांनी भारतात येऊन बांगलादेशचे स्वतंत्र सरकार स्थापन केले. पाक सैन्याच्या अत्याचारामुळे एक कोटी लोक भारतात शरणार्थी म्हणून आले. भारत सरकारने अखेर बांगलादेशच्या मुक्ती फौजेबरोबर पूर्व बंगालमध्ये आपले सैन्य पाठवले. दि.16 डिसेंबर 1971 रोजी पाक सैन्याने शरणागती पत्करली. पाकिस्तानी सैन्याचे पूर्व बंगालमधील प्रमुख जनरल नियाझी आणि पाकिस्तानचे 90,000 सैनिक शरण आले. बांगलादेश स्वतंत्र झाला.

कमाल हुसेनना या घटनांची माहिती मिळू शकत नव्हती, कारण तुरुंगामध्ये त्यांना रेडिओ आणि वर्तमानपत्रे दिलेली नव्हती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. मात्र मधल्या काळात त्यांची आई, पत्नी, मुली आणि बहीण यांना पश्चिम पाकिस्तानात आणून त्यांची भेट होऊ दिली. डिसेंबरमध्ये जेलमध्ये अचानक blackout सुरू झाला. सायरन वाजू लागला. लढाई चालू झाली असावी, असा कमाल हुसेनना अंदाज आला. काही दिवसांनी सायरन अचानक बंद झाले. Blackout थांबला. त्यांना 16 डिसेंबरला चांगले जेवण दिले गेले. बहुतेक आपला विजय झाला असावा, असा त्यांना अंदाज आला.

नंतर त्यांना रावळपिंडीजवळच्या पोलीस ॲकॅडेमीजवळ एका बंगल्यात हलवले गेले. आश्चर्य म्हणजे, तिथे शेख मुजिब होते. अर्थातच एकमेकांना भेटून त्यांना आनंद झाला. मधल्या काळातल्या सगळ्या घडामोडी कळल्या. शेख मुजिब आधी मियावाली येथील तुरुंगात होते. जनरल नियाझी हे मियावालीचे होते. पाकिस्तानच्या 16 डिसेंबरच्या शरणागतीनंतर मियावलीच्या तुरुंगात तणाव निर्माण झाला. बंगबंधूंचा ताबा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात आले की, बंगबंधूंनी तिथे राहणे त्यांना धोकादायक आहे, म्हणून त्याने स्वतःच्या जबाबदारीवर बंगबधूंना रावळपिंडीच्या पोलीस ॲकॅडेमीजवळ हलवले. तिथे त्यांना भेटायला भुट्टो आले. म्हणाले, ‘मी आता पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष झालो आहे. तुमची आता सुटका होईल.’ त्यावर बंगबंधू हसून म्हणाले, ‘अहो, पण हे कसे झाले? National Assembly मध्ये तुमच्या दुप्पट जागा मला मिळाल्या होत्या.’ भुट्टो म्हणाले, ‘तुम्हाला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे असेल तर होऊ शकता.’ बंगबंधू म्हणाले, ‘मला ती इच्छा नाही. मला लवकरात लवकर बांगलादेशला जायचे आहे.’

बांगलादेशच्या मुक्तिलढ्यामध्ये भारत सहभागी असल्याने पाकिस्तानच्या विमानांना भारतावरून उडण्याची बंदी होती. त्यामुळे शेख मुजिब आणि कमाल हुसेन यांची सुटका झाल्यानंतर कमाल हुसेन यांच्या कुटुंबीयांसह त्यांना 8 जानेवारी 1972 रोजी प्रथम लंडनला नेण्यात आले. ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांनी तिथे भेटून बंगबंधूंचे अभिनंदन केले. नंतर दिल्ली येथे थोडा वेळ थांबून त्यांचे विमान 10 जानेवारी रोजी ढाक्क्याला आले. दिल्लीला त्यांच्या स्वागतासाठी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सर्व मंत्रिमंडळासह विमानतळावर उपस्थित होत्या. तिथेच एक मोठी सभा झाली. ढाक्क्यामध्ये बंगबंधूंचे प्रचंड मोठे स्वागत झाले. ज्या उद्दिष्टासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले होते, ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या भाषणातून व्यक्त होत होता. स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. बांगलादेशच्या लोकांनी 25 मार्चनंतर नऊ महिने भोगलेल्या यातना आणि दिलेला लढा यांचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगमाता या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या. निरपराध लोकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली.  काही दिवसांनी इंदिरा गांधीही ढाक्क्याला आल्या, लोकांनी त्यांचेही प्रचंड स्वागत केले. कमाल हुसेन बांगलादेशचे पहिले कायदामंत्री आणि त्यांच्या घटना परिषदेचे अध्यक्ष झाले. राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही आणि सर्वधर्म समभाव मानणारी राज्यघटना त्यांनी बांगलादेशला दिली.

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर शरणार्थींच्या पुनर्वसनाचे आणि राष्ट्राच्या उभारणीचे मोठे काम होते. तोडलेले रस्ते- पूल पुन्हा बांधणे, बांगलादेशची विस्कटलेली घडी बसविणे इत्यादी कामे सुरू झाली. परंतु, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात पाकिस्तानशी सहकार्य करणारे काही अधिकारी बांगलादेशच्या सैन्यात होते. त्यांना बंगबंधूंचे यश खुपत होते. त्यांनी 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजिब यांच्या घरावर हल्ला करून बंगबंधूंसह त्यांच्या घरातील सर्व माणसांची हत्या केली. बंगबंधूंचेच एक सहकारी खोंडकार मुश्ताक अहमद हे राष्ट्राध्यक्ष झाले. ताजुद्दीन अहमद यांनाही पकडून 3 नोव्हेंबर 1975 रोजी तुरुंगामध्ये ठार मारण्यात आले.

बंगबंधूंवरील या हल्ल्याच्या वेळेस कमाल हुसेन हे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री होते आणि सरकारी कामासाठीच युगोस्लाव्हियाला गेले होते. तिथे त्यांना हत्याकांडाची बातमी कळून धक्काच बसला. शेख मुजिब यांच्या मुली हसीना वाजेद (आत्ताच्या पंतप्रधान) आणि रेहाना त्या वेळेस जर्मनीत बॉन येथे होत्या, त्यामुळेच बचावल्या. कमाल हुसेन त्यांना जाऊन भेटले, त्यांना धीर दिला, आणि पुढे लंडनला गेले. या सगळ्या घटनांमुळे मनःस्ताप होऊन त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. त्यांच्या आजारीपणाच्या कारणास्तव त्यांनी आपली आई, पत्नी आणि दोन मुली यांना ढाक्क्याहून बोलावून घेतले. त्यांना बांगलादेश सोडण्याची परवानगी मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि तरीही त्यांच्या विमानाचे उड्डाण Military Clearance साठी तीन तास रोखून ठेवण्यात आले. सुदैवाने त्यांच्या कुटुंबीयांना लंडनला येऊ देण्यात आले. पुढे बऱ्याच काळाने ते सर्व जण बांगलादेशला परत आले. नंतर त्यांनी शेख हसीना यांना देशात आणि राजकारणात येण्यासाठी मदत केली. शेख हसीना 1996 ते 2001 या काळात आणि नंतर 2008 पासून पंतप्रधान आहेत. 

कमाल हुसेन यांच्या पुस्तकातील पुढची प्रकरणे बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंध, पाकिस्तानबरोबरचे संबंध, संयुक्त राष्ट्रात बांगलादेश या विषयांवरची आहेत. पुढे शेख हसीना यांच्या धोरणांबाबत मतभेद झाल्याने कमाल हुसेन हे अवामी लीग पासून दूर झाले आणि त्यांनी ‘गणफोरम’ ही संघटना स्थापन केली.

हमिदाजी नंतर म्हणाल्या, ‘‘तुम्हाला माहीत आहे का, मी सिंधी आहे आणि कमाल हुसेन यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे.’’ ते ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटले. पण नंतर त्यांची आणखी माहिती मिळाली, ती अधिकच नोंद घेण्यासारखी. सिंधमधील हैदराबाद येथे त्यांचा जन्म. त्यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांच्या आजीने फाळणीनंतर भारतातून आलेल्या निर्वासितांसाठी खूप काम केले. हमिदाजींना लहान वयातच अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेत आणि इंग्लडमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले, डॉक्टरेट मिळविली. लग्नानंतर त्या पूर्व पाकिस्तानमध्ये आल्या. अनेक विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. Company Weavers of Bengal हा East India Company च्या काळातील टेक्सटाईल उत्पादनावर आणि त्यातल्या श्रमिकांवर त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. बॅरिस्टर सलमा सोभान या ज्येष्ठ महिला कार्यकर्तीबरोबर त्यांनी ऐन ओ सालिश केंद्र ही महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी संस्था स्थापन केली. 1971 च्या मुक्तिलढ्यानंतर बलात्कार झालेल्या, एकाकी पडलेल्या महिलांसाठी त्यांनी काम केलेOf the Nation Born- The Bangladesh Papers  हा 1971 च्या लढ्यातल्या आणि एकूणच अत्याचारग्रस्त महिलांविषयीचा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे.

नंतर हमिदाजींनी एका विद्यापीठाला दिलेल्या एका मुलाखतीची माहिती मिळाली. त्यात हमिदाजींना बंगबंधूंच्या हत्येसंबंधी विचारले असता, त्यांनी म्हटले आहे : 15 ऑगस्ट 1975 रोजी मी माझ्या मुलींबरोबर घरीच होते. कमाल हुसेन युगोस्लाव्हियाला गेले होते. आमच्या घरापासून शेख मुजिब यांचे घर दूर नव्हते. अचानक फटाके वाजल्यासारखा आवाज आला. तो 15 ऑगस्टचा दिवस होता. मला वाटले, भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असेल. नंतर हत्याकांडाची खबर ऐकून आम्ही हादरलोच. सुरक्षिततेसाठी कसेबसे दुसरीकडे राहायला गेलो. नंतर काही दिवसांनी कमाल हुसेन लंडनला आजारी आहेत म्हणून आम्हाला तिथे जाण्याची परवानगी मिळाली. बऱ्याच काळानंतर स्थिरस्थावर झाल्यावर ढाक्क्याला परत आलो. 1971 चा स्वातंत्र्यलढा, शेख मुजिब आणि कमाल हुसेन यांची तेव्हा झालेली अटक, नंतर बांगलादेशमध्ये झालेले अत्याचार, 1975 मधील शेख मुजिब यांचे हत्याकांड व तेव्हाचे दिवस आम्हाला विसरणे अशक्य आहे.

आजही हमिदाजींचे सामाजिक कार्य आणि विशेषतः महिलांच्या प्रश्नांवरचे कार्य चालूच असते. अशाच कामासंबंधी त्या मेघना गुहा-ठाकूरता यांच्या R.I.B. संस्थेत आल्या होत्या, त्यामुळे आमची आणि त्यांची भेट झाली. आमच्या भेटीनंतर त्या निघाल्या, तेव्हा माझ्या पत्नीने- मीनाने- दिलेले केवड्याचे अत्तर मी त्यांना भेट दिले. तेव्हा निरोप घेताना त्या हसून म्हणाल्या, ‘‘या वेळेस अत्तर दिलेत, पुढच्या वेळेस अत्तर देणारीला घेऊन या.’’

Tags: युगोस्लाव्हिया भारत बांगलादेश हेमंत गोखले सोनार बांगला hamida hussain kamal hussain weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके