डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विनोबांना पूर्व पाकिस्तानात प्रवेश देण्यावरून पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांतून टीका करण्यात आली. तेव्हाचे पाकिस्तानातले परराष्ट्रमंत्री महम्मद अली यांनी विनोबांना दिलेल्या प्रवेशाचे समर्थन केले. आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश दिला आहे, असे त्यांनी म्हटले. केवळ भारतानेच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांनी या कृतीची प्रशंसा केली. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही या घटनेचे स्वागत केले. या यात्रेच्या काळात 11 सप्टेंबर रोजी विनोबांचा 68 वा वाढदिवस होता. त्या दिवशी विनोबा तिस्ता या गावी होते. पाकिस्तान सरकारच्या वतीने त्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मला ही माहिती मिळताच मी ती एअर कमोडर चौधरींना ई-मेलने कळविली. ती माहिती वाचून त्यांना अतिशय आनंद झाला.

बांगलादेशात तिथल्या ‘स्प्रिंग लॅा स्कूल’मध्ये मला भाषणासाठी बोलावले होते, त्या वेळी मला भेटलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे बांगलादेशचे निवृत्त ‘एअर कमोडर’ इशफाकइलाही चौधरी! लॉ स्कूलचा शेवटचा दिवस होता 14 मार्च 2020. त्या दिवशी सकाळी माझे माहितीच्या अधिकारावर भाषण होते, त्यानंतर जेवणाची सुट्टी होती आणि नंतर Valedictory Function.

स्प्रिंग लॉ स्कूल योजणाऱ्या संस्थांपैकी South Asian Institute of Advanced Legal and Human Rights Studies (S A I L S)  चे अध्यक्ष डॉ. कमाल हुसेन आणि University of Asia Pacific चे कुलगुरू डॉ.जामिलुर रेझा चौधरी हे जेवणाच्या वेळेस उपस्थित होते. त्यांच्याबरोबर आले होते त्यांच्या विद्यापीठाचे ट्रेझरर, निवृत्त ‘एअर कमोडर’ इशफाकइलाही चौधरी. उंच, हसरे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे.

जेवणानंतर Valedictory Function आधी काही मोकळा वेळ होता. आम्ही सगळे बोलत बसलो होतो. आमचे सगळ्यांचे फोटो घेतले गेले. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस मी शरणार्थी शिबिरात काम केले होते, हे ऐकल्यानंतर एअर कमोडर चौधरी आणि मी यांच्यात संवाद सुरू झाला. बांगलादेशच्या लढ्याच्या वेळेस त्यांचे पोस्टिंग पश्चिम पाकिस्तानात होते. त्यांना तिथे अटक करण्यात आली. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरच त्यांची सुटका झाली आणि ते बांगलादेशला परत आले. बांगलादेशच्या लढ्यात त्यांचे वडील आणि भाऊ मारले गेले होते.

एअर कमोडर चौधरींना इतिहासामध्ये चांगलाच रस होता. माझे आडनाव ‘गोखले’ हे ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे निर्माते महम्मदअली जीना हे गोखल्यांना गुरू मानत असत.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘आणि गांधीजीही. गांधीजीही गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरू मानत असत.’’ पुढे बोलता-बोलता ते म्हणाले, ‘‘बांगलादेशच्या मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी ढाक्क्याला प्रथमच येणार होत्या. त्याच्या आत भारतीय फौजा मागे घेतल्या जाव्यात, अशी विनंती शेख मुजिब यांनी केली आणि इंदिराजींनी ती मान्यही केली. विजयी सैन्य लगेच मागे घेण्याचे जगाच्या इतिहासातले हे एकमेव उदाहरण असावे.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘शेख मुजिब यांच्या हत्येनंतर सत्तेवर आलेले खोंडकार मुश्ताक अहमद हे शेख मुजिब यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री होते. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी ते होते. शेख मुजिब यांच्या सुटकेनंतर त्यांचे विमान जेव्हा ढाक्क्याला आले, तेव्हा शेख मुजिब विमानातून उतरण्याच्या आधीच हे खोंडकार मुश्ताक विमानाची शिडी चढून वर गेले आणि डोळ्यांतून अश्रू गाळून त्यांनी शेख मुजिबना मिठी मारली. आम्ही ते पाहतच राहिलो. त्याच खोंडकार मुश्ताक यांनी चार वर्षांनंतर शेख मुजिब यांचा विश्वासघात केला. शेख मुजिब यांच्या हत्येनंतर खोंडकार मुश्ताक हे पंतप्रधान झाले.’’

श्री.चौधरींनी पुढे जे सांगितले, ते फारच विशेष होते. गोखले हे आडनाव ऐकल्यामुळे त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला विनोबा भावे माहीत असतीलच?’’ मी म्हटले, ‘‘होय.’’ त्यांनी विचारले, ‘‘पण बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी ते पूर्व पाकिस्तानात आले होते, हे माहीत आहे?’’ मी आश्चर्यचकितच झालो आणि विचारले, ‘‘हे कसे आणि कधी झाले?’’

एअर कमोडर चौधरी म्हणाले, ‘‘त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. वडिलांचे पोस्टिंग 1962 च्या सुमारास पूर्व पाकिस्तानच्या उत्तर भागात कुरिग्राम येथे होते. त्या वेळेस श्री.चौधरी शाळेत शिकत होते. त्याच वेळेला विनोबा भावे त्यांच्या भूदान यात्रेच्या प्रवासात आसाममधील धुब्री येथून पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठी कुरिग्राम येथे आले. तिथेही त्यांनी भूदानासाठी सभा घेतल्या. त्या सभा प्रचंड मोठ्या होत्या. अनेक जमीनदारांनी विनोबांना जमिनी दान दिल्या आणि विनोबांनी त्या भूमिहीनांना वाटूनदेखील टाकल्या.’’ विनोबा आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर असूनही, त्यांनी भारतातील 1975 च्या आणीबाणीत घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्या मनात विनोबांबद्दल थोडी अढी होती. पण ही माहिती ऐकून मी थक्कच झालो. मी मनाशी म्हटले, ‘हे खरे असेल?’

भारतात परत आल्यावर माझा मित्र विकास देशपांडे याची पत्नी लीना हिच्याशी मी संपर्क साधला. तिचे वडील दिवंगत प्रा.दामोदर वेले हे अनेक वर्षे सर्वोदय आणि विनोबा यांच्याशी संबंधित होते. चारच दिवसांत तिने मला Whatsapp वरती काही पाने पाठवली आणि ती वाचून एअर कमोडर म्हणाले होते त्याची खात्री पटली. ती पाने होती श्री. विजय दिवाण यांच्या ‘आचार्य विनोबा भावे’ या 2013 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथातील भूदान यज्ञ प्रकरणाची, (क्र. 281 ते 284). माझी पत्नी मीना हिने नंतर ते पुस्तकच मला दिले. त्यातील आशय पुढीलप्रमाणे :

विनोबांनी 5 सप्टेंबर 1962 ला सोनेरहाटजवळ पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. तिथून ते कुरिग्राम येथे आले. स्थानिक अधिकारी आणि लोकांनी त्यांचे स्वागत केले. विनोबा पूर्व पाकिस्तानात 16 दिवस होते. त्यांनी लोकांना भूदानासाठी आवाहन केले. काही लोकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यावर विनोबांनी ‘जय जगत्‌’चा नारा दिला. विनोबांनी त्यांच्या भाषणात भूदानाच्या समर्थनार्थ कुराणातले काही दाखले दिले, ज्यामध्ये आपल्या उत्पन्नातला एक हिस्सा इतरांना द्यावा, असे म्हटले आहे. लोकांना ते फकीर वाटायचे आणि ते विनोबांचे आशीर्वाद मागत. श्री.अब्दुल खालिद मुन्शी यांनी त्यांच्या चार एकरांपैकी एक एकर जमीन भूदानात दिली. कुरिग्राम येथे विनोबांना 50 बिघे जमीन भूदानात मिळाली. पूर्व पाकिस्तानात त्यांना एकूण 110 एकर 37 बिघे जमीन भूदानात मिळाली. ती त्यांनी 69 भूमिहीनांमध्ये वाटून टाकली.

विनोबांना पूर्व पाकिस्तानात प्रवेश देण्यावरून पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांतून टीका करण्यात आली. तेव्हाचे पाकिस्तानातले परराष्ट्रमंत्री महम्मद अली यांनी विनोबांना दिलेल्या प्रवेशाचे समर्थन केले. आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश दिला आहे, असे त्यांनी म्हटले. केवळ भारतानेच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांनी या कृतीची प्रशंसा केली. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही या घटनेचे स्वागत केले. या यात्रेच्या काळात 11 सप्टेंबर रोजी विनोबांचा 68 वा वाढदिवस होता. त्या दिवशी विनोबा तिस्ता या गावी होते. पाकिस्तान सरकारच्या वतीने त्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मला ही माहिती मिळताच मी ती एअर कमोडर चौधरींना ई-मेलने कळविली. ती माहिती वाचून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मला ई-मेलने उत्तर पाठवले, ते असे-

‘आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. त्या वेळेस माझ्या वडिलांचे पोस्टिंग Special Branch Officer म्हणून कुरिग्राम येथे होते. कुरिग्राम येथील आमच्या शाळेच्या मैदानातच विनोबांची सभा झाली. सर्व पक्षांचे नेते आणि लोक त्या सभेला उपस्थित होते. विनोबांना जमिनीचे दान देणाऱ्यांमध्ये माझ्या मित्राचे वडील होते. ते मुस्लिम लीगचे खासदार होते. आपण म्हणता ते बरोबर आहे. लोकांना विनोबा हे संतच वाटले. मुसलमानांना ते पीर आणि हिंदूंना संन्यासी वाटले. तो सर्वच प्रसंग पाहण्यासारखा होता. माझे वडील आणि गणवेशधारी पोलीस यांना लोकांवरती नियंत्रण ठेवणे कठीण गेले, कारण प्रत्येकालाच विनोबांच्या पाया पडायचे होते. तेव्हाचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महम्मद अली होते, ज्यांना महम्मद अली बोग्रा म्हणून संबोधित असत. ते पूर्वी 1954-55 मध्ये काही काळ पाकिस्तानचे पंतप्रधानही होते. बांगलादेशमधील बोग्रा येथील ते नवाब होते आणि तिथल्या महालामध्ये त्यांचे दफन केले आहे.’

एअर कमोडर चौधरी एवढी माहिती देऊन थांबले नाहीत तर त्यांनी तीन फोटोही पाठविले. पहिला सोनार हाट बंदर येथील, जिथे विनोबांनी पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. पूर्वी तिथे एक झोपडी होती. आता आसाम आणि भूतानची वाहतूक सांभाळणारे गजबजलेले बंदर आहे. दुसरा फोटो कुरिग्राम येथील सध्याच्या शाळेचा. श्री. चौधरी यांनी त्यासंबंधी लिहिले- ‘आमच्या वेळेस तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरायची. वीज, टेलिफोन वगैरे काहीही नव्हते. पाण्यासाठी फक्त एक ट्यूबवेल होती. आत्ताच्या मुलांना हे कळणार नाही की, आम्ही कशा शाळेत जात होतो!’ तिसरा फोटो तिस्ता ब्रिज येथील आहे, जिथे विनोबांचा वाढदिवस साजरा झाला होता.

श्री. विजय दिवाण यांनी नमूद केल्याप्रमाणे श्री. चारू चौधरी यांनी विनोबांच्या ह्या यात्रेवर पुस्तक लिहिले आहे. गांधीजींना नौखालीला नेणारे चारू चौधरी ते हेच. नौखालीच्या गांधी आश्रमाचे श्री. नबकुमार राहा यांच्याशी मी त्या पुस्तकासाठी संपर्क साधला. ते सध्या ह्या पुस्तकाच्या शोधात आहेत.

Tags: भूमिहीन भूदान बांगलादेश डॉ.जामिलुर रेझा चौधरी स्प्रिंग लॉ स्कूल डॉ कमाल हुसैन महात्मा गांधी विनोबा भावे पूर्व पाकिस्तान सोनार बांगला weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके