डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारत आणि बांगलादेश यांना जोडणारे बाऊल लालन शहा फकीर

लालन फकीर यांची सुमारे दोन हजार कवने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवनांमध्ये सूफी आणि वैष्णव धर्माचा मिलाफ दिसून येतो. त्यांच्या गाण्यांमधल्या विचारांमुळे त्यांना पाखंडी समजले जायचे. लालन फकीर यांचा जन्म 1774 च्या सुमारास झाला आणि ते 116 वर्षे जगले, असे म्हणतात. रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू जोतींद्रनाथ यांनी लालन शहा यांचे काढलेले चित्र हे त्यांचे विश्वसनीय चित्र समजले जाते. लालन फकीर यांच्या गीतांचा बंगाली समाज, संस्कृती आणि विचारवंत यांच्यावर मोठा प्रभाव दिसून येतो. कवी काझी नझरूल इस्लाम आणि रवींद्रनाथ टागोर हेही त्यांच्या गीतांनी भारावून गेले होते. प्रसिद्ध अमेरिकन कवी आणि गायक बॉब डिलन हेही या संगीताकडे आकर्षित झाले. त्या संगीताचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्यात येऊन राहिले.
 

ढाक्क्याचे कायदाविषयक शिबिर संपल्यानंतर कुश्तियाच्या जवळचे रवींद्रनाथांचे घर बघायला आम्ही जाणार होतो. ते ऐकल्यानंतर शिबिरातले विद्यार्थी म्हणाले, ‘‘सर, मग तुम्ही तिथून जवळ असलेल्या चेउरिया येथील फकीर लालनशहा यांचा दर्गा बघायला का जात नाही?’’

लालन फकीर हे बाऊल संगीताचे प्रणेते असल्याचे मी ऐकले होते. मी तानसेन नसलो, तरीही कानसेन आहेच. मला बाऊल संगीताची थोडीफार माहिती होती. काही वर्षांपूर्वी पार्वती बाऊल या प्रसिद्ध गायिकेचा कार्यक्रम मी पाहिला/ ऐकला होता. बांगलादेशची प्रसिद्ध बाऊल गायिका फरीदा परवीन हिचीही काही गाणी ऐकली होती. बाऊल संगीताच्या प्रणेत्याचा दर्गा कुश्तियाजवळच असल्याचे कळल्याने मी म्हटले, तिथे जायलाच पाहिजे.

कुश्तियाजवळील रवींद्रनाथांचे घर बघितल्यानंतर मी आणि माझे मित्र अन्वर राजन चेउरिया येथे गेलो. आमच्याबरोबर प्रा. नानूमियाँ हे होतेच. तिथल्या रस्त्याच्या एका बाजूला फकीर लालनशहा यांचा दर्गा आहे आणि दुसऱ्या बाजूला तिथे येणाऱ्यांच्या सोईसाठी खूप मोठे कार पार्क आणि खाण्याच्या व इतर दुकानांसाठीही मोठी जागा ठेवलेली आहे. त्या जागेवरूनच लक्षात येत होते की, तिथे किती मोठ्या संख्येने लोक येत असावेत. आत गेल्या-गेल्या घुमटाच्या आकाराची इमारत होती, ज्यात फकीर लालन शहा यांची कबर आहे. त्या इमारती समोरच इकतारा (एकतारी) आणि डुग्गी ही बाऊल गायकांची वाद्ये धरलेल्या हाताचे शिल्प आहे. त्याच्यामागच्या इमारतीवर लालन शहा यांचे एखाद्या साधूसारखे दिसणारे चित्र रेखाटले आहे. एखाद्या दर्ग्याबाहेर वाद्यांचे शिल्प आणि फकिराचे/ संताचे चित्र असणे, ही खासच बाब म्हणायला पाहिजे. आणखी विशेष म्हणजे, त्या शिल्पाखाली त्या दर्ग्याचे नूतनीकरण तेव्हाच्या पंतप्रधान खालिदा झिया- ज्या सनातनी समजल्या जातात- यांनी केल्याचे लिहिलेले होते.

दर्ग्याच्या मागच्या बाजूला मोठा हॉल बांधलेला आहे. तिथे येऊन कोणीही बाऊल गाऊ शकतात. आम्ही तिथे गेलो, तेव्हा काही बाऊलमंडळी बसली होती. काही पुरुष आणि काही स्त्रिया. नानूमियाँमार्फत आम्ही त्यांच्याशी बोललो आणि विनंती केली, ‘‘एखादे गाणे गाणार का?’’ त्यांनी आनंदाने दोन गाणी गायली, एकतारी आणि डुग्गीच्या तालावर. पहिल्या गाण्याचा अर्थ असा-

‘आमची जात विचारता

आम्ही ना हिंदू, ना मुसलमान

आम्ही तर मानव जात...’

आणि दुसरे गाणे-

‘आम्ही आलो ह्या जगात

तुझ्याच हुकमाने

आणि परत येऊ

तू म्हणशील तेव्हा तुझ्याचकडे...’

लालन फकीर यांची कवने संत कबीरांच्या कवनांसारखी आहेत. या कवनांप्रमाणेच लालन शहा फकीर यांचे जीवनविषयक विचार आणि चरित्रकथाही संत कबीरांसारखीच आहे. लालन फकीर हे जन्माने हिंदू होते की मुसलमान, हे कोणालाच माहीत नाही. देवीच्या आजारामुळे लहानपणीच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. नदीच्या काठी त्यांना सोडून दिले असताना एका मुस्लिम विणकर पती-पत्नींना ते सापडले आणि त्यांनी लालन शहा यांचा सांभाळ केला. पुढे ते टागोरांच्या जमीनदारीच्या भागात राहू लागले आणि गाणी लिहू व गाऊ लागले. त्यांचे शिक्षण असे काही झाले नव्हते. गाताना ते फक्त इकतारा हे एकतारीचे वाद्य आणि डुग्गी हे तबल्यासारखे वाद्य वापरत असत. त्यांच्या गटाला लालन आखाडा आणि त्यांच्या पद्धतीने गाणाऱ्यांना बाऊल म्हणजे (ईश्वरभक्तीने) व्याकूळ असे म्हणण्यात येऊ लागले. एका हातात एकतारा व दुसऱ्या हातात डुग्गी आणि कधी पायात घुंगरू बांधून हे बाऊल नाचत-नाचत गाणी म्हणतात. लालन फकीर यांच्या कवनांमध्ये सर्व धर्मांचे आणि पंथांचे लोक गुण्यागोविंदाने आणि प्रेमाने राहत आहेत, अशा समाजाची कल्पना केलेली आहे. त्यांनी कुठल्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नव्हता. लालन फकीर यांची सुमारे दोन हजार कवने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवनांमध्ये सूफी आणि वैष्णव धर्माचा मिलाफ दिसून येतो. त्यांच्या गाण्यांमधल्या विचारांमुळे त्यांना पाखंडी समजले जायचे. लालन फकीर यांचा जन्म 1774 च्या सुमारास झाला आणि ते 116 वर्षे जगले, असे म्हणतात. रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू जोतींद्रनाथ यांनी लालन शहा यांचे काढलेले चित्र हे त्यांचे विश्वसनीय चित्र समजले जाते.

लालन फकीर यांच्या गीतांचा बंगाली समाज, संस्कृती आणि विचारवंत यांच्यावर मोठा प्रभाव दिसून येतो. कवी काझी नझरूल इस्लाम आणि रवींद्रनाथ टागोर हेही त्यांच्या गीतांनी भारावून गेले होते. प्रसिद्ध अमेरिकन कवी आणि गायक बॉब डिलन हेही या संगीताकडे आकर्षित झाले. त्या संगीताचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्यात येऊन राहिले. त्या संगीताचा वापर करून त्यांनी काही fusion म्युझिकही तयार केले. लालन फकीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पुण्यतिथीच्या सुमारास ऑक्टोबर महिन्यात तीन दिवसांचा मेळावा चेउरिया येथे आयोजित केला जातो. बांगलादेश व भारतातली बाऊलमंडळी आणि जगातले अनेक गायक व विचारवंत तिथे जमतात.

बाऊल गायक हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांत आहेत. हिंदूंच्या गायनात चैतन्य महाप्रभू आणि कृष्णभक्ती यांचाही प्रभाव दिसून येतो. बांगलादेशमधले विनय सरकार, शहा अब्दुल करीम, फरिदा परवीन हे गाजलेले बाऊल गायक आहेत. शहा अब्दुल करीम आणि फरिदा परवीन यांना बांगलादेश सरकारने त्यांचा ‘एकुशे पदक’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवले आहे. भारतामधले पूर्णदास, पवनदास, देवदास, सनातनदास आणि वासुदेवदास हे गाजलेले बाऊल गायक आहेत. पूर्णदास यांना संगीत-नाटक ॲकॅडमी ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. पवनदास ह्यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचे fusion केले आहे. बाऊल देवदास आणि त्यांची तीन मुले सध्या कोविडमुळे Online Baul Programme  करतात. सनातनदास ह्यांच्या शिष्या पार्वती बाऊल ह्यांनी त्यांचे पती रवी गोपालन ह्यांच्याबरोबर केरळमध्ये बाऊल शिक्षणाची संस्था स्थापन केली आहे. लालन फकीर ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या बाऊल संगीताचा बंगालच्या सीमा ओलांडून भारतात अन्यत्र आणि जगात सर्वत्र प्रसार झाला आहे. भारत सरकारने लालन फकीर यांच्या सन्मानार्थ खास टपाल तिकीट काढले आहे. युनेस्कोने आत्ता बाऊल संगीताला Cultural Heritage मध्ये स्थान दिले आहे.

संत कबीर आणि लालन फकीर ह्यांच्या जीवनात व कवनांत केवढे तरी साम्य आहे! सर्व माणसांमधील समन्वयाचा आणि स्नेहभावनेचा समान विचार आहे. फकीर लालन शहा हे तर भारत आणि बांगलादेश यांना जोडणारे सेतूच! त्यांच्या दर्ग्यामधून निघताना मात्र एका बाजूला आपण त्यांची कवने गातो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या तत्त्वांपासून दूर गेलेलो नाहीत ना, हा विचार मनाला सतावत होता.

Tags: रवींद्रनाथ टागोर फरीदा परवीन फकीर बाउल संगीत सोनार बांगला बांगलादेश भारत weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके