डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महानायिका सुचित्रा सेन ह्यांचे बांगलादेशातील घर

खोल्यांच्या भिंतींवर सुचित्रांच्या महत्त्वाच्या चित्रपटांतले आणि जीवनातलेही प्रसंग दाखवणारे काही फोटो लावलेले आहेत. परंतु, संग्रहालय म्हणावे अशा काही वस्तू मात्र त्या घरामध्ये नाहीत. त्या फोटोंपैकी काही महत्त्वाचे फोटो म्हणावेत तर ते पुढीलप्रमाणे : ‘7 नंबर कैदी’ या सुरुवातीच्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा फोटो, उत्तमकुमार बरोबरचा फोटो, देवदास या चित्रपटासाठी त्यांना आणि दिलीपकुमार ह्यांना बिमल रॉय हे दिग्दर्शन करीत असतानाचा फोटो, उत्तर फाल्गुनी चित्रपटातील पन्नाबाईचा फोटो आणि आंधी चित्रपटाचे पोस्टर. त्याशिवाय काही वैयक्तिक फोटोही आहेत- त्यांचे पती व मुलगी मुनमुन सेन यांच्या बरोबरचे फोटो आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना पुष्पचक्र वाहताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो आहे.

ढाक्क्याहून कुश्तियाला जाताना त्याच्याजवळच्या पबना शहरात दिवंगत अभिनेत्री सुचित्रा सेन ह्यांचे घर आहे आणि तिथे आता एक स्मृती संग्रहालय उभारल्याचे समजले. बिमल रॉय यांच्या ‘देवदास’मधील ‘पारो’, असित सेन यांच्या ‘उत्तर फाल्गुनी’, ‘ममता’मधली ‘पन्नाबाई’ आणि गुलजार यांच्या ‘आंधी’मधली ‘आरती-देवी’ या त्यांच्या अविस्मरणीय भूमिका पाहिल्या होत्या. आमच्याकडे वेळ कमी होता, पण महानायिकेचे ते घर आणि संग्रहालय पाहण्याचे टाळणे शक्यच नव्हते.  

सुचित्रा सेन यांचे मूळ नाव रमा दासगुप्ता. आजोळी 1931 मध्ये जन्म झाल्यानंतर भारताची फाळणी होईपर्यंत सुचित्रा, पबना येथील या घरात सोळा वर्षे राहिल्या होत्या. त्यांचे वडील पबना शहरात नोकरी करत आणि तिथल्या सरकारी शाळेतच सुचित्रांचे शालेय शिक्षण झाले. फाळणीच्या वातावरणात त्यांच्या कुटुंबाने ते घर सोडून कलकत्त्याला स्थलांतर केले. लवकरच देवनाथ सेन या उद्योगपतीशी विवाह होऊन त्या सुचित्रा सेन झाल्या.

त्यांचे पती आणि सासरे यांच्या उत्तेजनामुळे त्या बंगाली सिनेमाच्या क्षेत्रात आल्या. ‘शेष कोथाय’ आणि ‘7 नंबर कैदी’ हे 1953 चे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट. बिमल रॉय यांनी 1955 मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘देवदास’ या हिंदी चित्रपटात दिलीपकुमारबरोबरची त्यांची पारोची भूमिका अविस्मरणीय ठरली. नंतर उत्तम कुमारबरोबर त्यांनी जवळ-जवळ 25-30 बंगाली चित्रपटांत काम केले. कुठल्याही भूमिकेशी तादात्म्य पावणे आणि emotive facial expressions ही त्यांच्या अभिनयाची विशेषता होती, ज्यामुळे त्यांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले आणि त्या बंगाली चित्रपटांच्या ‘महानायिका’ झाल्या.

‘सात पाके बांधा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना 1963 मध्ये Moscow International Film Festival  मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. परदेशी चित्रपट महोत्सवामध्ये असा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती. त्याच वर्षीच्या ‘उत्तर फाल्गुनी’ ह्या चित्रपटात, परिस्थितीमुळे नर्तिकेचा धंदा करावा लागणारी पण आपल्या मुलीला सन्मानाने वाढवणारी ‘पन्नाबाई’ आणि नंतर तिची मोठी झालेली मुलगी अशा दुहेरी भूमिका त्यांनी सहजरीत्या केल्या. तोच चित्रपट हिंदीमध्ये ‘ममता’ ह्या नावाने गाजला. भारत सरकारने 1972 मध्ये ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. बंगाली चित्रपटांमध्ये त्यांचे अनन्यसाधारण असे स्थान निर्माण झाले. पश्चिम बंगाल सरकारनेही त्यांना ‘बंगभूषण’ या किताबाने गौरविले. गुलजार यांनी 1975 मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘आंधी’ या चित्रपटात आरती देवी या इंदिरा गांधींसारख्या दिसणाऱ्या राजकारणी स्त्रीची भूमिका त्यांनी गाजवली. त्या चित्रपटांतून 1979 मध्ये अचानक निवृत्त झाल्या, जनसामान्यांपासून दूर गेल्या ते जानेवारी 2014 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत. शेवटच्या काळात त्या रामकृष्ण मिशनमध्ये सेवा करीत असत, पण जनसंपर्क पूर्णपणे टाळत होत्या.

पबना येथील गोपालपूर भागातील सुचित्रा सेन यांच्या घराकडे जाताना त्यांच्या चित्रपट व्यवसायातील आणि जीवनातील या महत्त्वाच्या घडामोडी आठवत होत्या. त्यांच्या कुटुंबाने हे घर सोडल्यानंतर ते बंद अवस्थेमध्येच होते. नंतर ‘जमाते इस्लामी’च्या पाठिंब्याने ‘इमाम गझ्झाली ट्रस्ट’ या संस्थेने त्या घराचा काही वर्षे जबरदस्तीने ताबा घेतला आणि तिथे एक शाळा/मदरसा सुरू केली. ते करताना त्या घरात काही तोडमोडही केली गेली. घराच्या जवळपास बेकायदा दुकाने उभी राहिली. सुचित्रा सेन या भारताइतक्याच बांगलादेशमध्येही लोकप्रिय होत्या. त्यांच्या घराची स्मृती अशा रीतीने नष्ट होणे हे पबना आणि बांगलादेशमधील कलाप्रेमी लोकांना आवडले नाही. तिथल्या सुबुद्ध व्यक्तींनी त्या जबरदस्तीविरुद्ध आवाज उठविला. ‘सुचित्रा सेन चलच्चित्र संसद’ या संस्थेचे संयोजक जाकीर हुसेन यांचा त्यात पुढाकार होता. त्यांनी सरकारी यंत्रणा हलवली. या प्रश्नावर जमाते इस्लामी विरुद्ध उभे राहणे ही सोपी गोष्ट नव्हती. ती केस आधी हायकोर्ट आणि नंतर बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढवली गेली. अखेर त्या घरावरील सर्व अतिक्रमण दूर करून तिथे सुचित्रा सेन यांच्या स्मृतींचे म्युझियम निर्माण करण्याचा आदेश देण्यात आला. जुलै 2014 मध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना त्या घराचा ताबा मिळाला. त्या इमारतीची पुन्हा डागडुजी करून तिथे ‘सुचित्रा सेन स्मृती संग्रहालयाची’ स्थापना करण्यात आली. एप्रिल 2017 मध्ये एक यथोचित समारंभ करून ते संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात आले.    

हे तसे छोटेखानी बैठे घर आहे. गोपालपूरच्या हेमसागर लेनमध्ये ते आतल्या बाजूला असल्याने बाहेरच्या मोठ्या रस्त्यावरून ते दिसत नाही. घराच्या दारावर संग्रहालयाची पाटी आहे. आत गेल्या-गेल्या आपल्याला सुचित्रा सेन यांचा एक फोटो व नंतर त्यांचा पुतळा दिसतो. घराच्या इमारतीपुढे छोटेसे अंगण आहे घराच्या मागच्या बाजूलाही मोकळी जागा आहे. आत गेल्यावर छोट्या-छोट्या चार-एक खोल्या, एक Drawing Room आणि जेवणघर आहे. घराच्या एका खोलीत चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा सुचित्रा सेन यांचा एक चित्रपट तिथे दाखवला जात होता. त्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता त्या इमारतीची दुरुस्ती करून तिथे Film Archive Center बनवावे, अशी योजना बांगलादेश सरकारच्या विचाराधीन आहे असे कळते.

खोल्यांच्या भिंतींवर सुचित्रांच्या महत्त्वाच्या चित्रपटांतले आणि जीवनातलेही प्रसंग दाखवणारे काही फोटो लावलेले आहेत. परंतु, संग्रहालय म्हणावे अशा काही वस्तू मात्र त्या घरामध्ये नाहीत. त्या फोटोंपैकी काही महत्त्वाचे फोटो म्हणावेत तर ते पुढीलप्रमाणे : ‘7 नंबर कैदी’ या सुरुवातीच्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा फोटो, उत्तमकुमार बरोबरचा फोटो, देवदास या चित्रपटासाठी त्यांना आणि दिलीपकुमार ह्यांना बिमल रॉय हे दिग्दर्शन करीत असतानाचा फोटो, उत्तर फाल्गुनी चित्रपटातील पन्नाबाईचा फोटो आणि आंधी चित्रपटाचे पोस्टर. त्याशिवाय काही वैयक्तिक फोटोही आहेत- त्यांचे पती व मुलगी मुनमुन सेन यांच्या बरोबरचे फोटो आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना पुष्पचक्र वाहताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो.

सुचित्रा सेन यांच्या घरावरील अतिक्रमण दूर करून जेव्हा ती वास्तू एप्रिल 2017 मध्ये स्मृती संग्रहालय म्हणून घोषित झाली, तेव्हा लोकांनी काढलेल्या शोभा यात्रेचा फोटो हा विशेष म्हटला पाहिजे. त्या फोटोत सरकारी अधिकारी आणि सर्वसामान्य स्त्री-पुरुषही सहभागी झालेले दिसत आहेत. एका महानायिकेविषयीच्या प्रेमाने आणि आदराने तिच्या स्मृतीसाठी लढा देऊन सर्वसामान्य लोकांनी जातीयवादी शक्तींवर मिळविलेल्या यशाची ती अभिमानास्पद विजय यात्राच होती!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके