डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बांगलादेश आणि सर्वधर्मसमभाव : एक संमिश्र चित्र

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण केलेली बांगलादेशची राज्यघटना पूर्णपणे सर्वधर्मसमभाव मानणारी होती. शेख मुजीब यांच्या राजवटीत जमाते इस्लामीसारख्या मूलतत्त्ववादी संघटना नियंत्रणाखाली होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजीब यांचा खून झाल्यानंतर आलेल्या राजवटींमध्ये मात्र पुन्हा धर्मवादी तत्त्वांना उठाव मिळाला. झियाऊर रेहमान यांनी त्यांच्या राजवटीत, घटनेच्या घोषवाक्याआधी बिस्मिल्ला उऱ रेहमान उर रहीम ही कुराणातली आयत आणली.

बांगलादेशातील सर्वधर्मसमभावाचा विचार करताना वरील सर्व बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेख हसीना यांचे सरकार अतिरेकी धर्मवादी प्रवृत्तींना नियंत्रित करण्यासाठी पावले जरूर उचलत आहेत; परंतु अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे तरच अल्पसंख्याकांना, आदिवासींना आणि बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींना सुरक्षितता लाभेल.
 

मी बांगलादेशला जाण्याचे ठरवल्यावर माझ्या परिचयातल्या एका बंगाली लेखिकेशी थोडे बोलणे झाले. भारताच्या फाळणीवेळेस त्यांचे आई-वडील पूर्व बंगालमधून भारतात स्थलांतरित झाले होते. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर एका साहित्यिक कार्यक्रमात तिथे जाण्याचा त्यांना एकदाच योग आला होता आणि तोही एक-दोन दिवसांसाठी. त्या स्वतः सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या आहेत. बांगलादेशच्या सर्वधर्मसमभावाबद्दल त्यांच्या मनात काही शंका होत्या. भारतामध्येही अलीकडे झालेल्या काही घटनांमुळे त्या व्यथित झाल्या होत्या. मला म्हणाल्या, जरूर जाऊन या. परत आल्यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला आवडेल.

बांगलादेशमध्ये अधूनमधून घडणाऱ्या काही घटनांमुळे त्यांच्यासारख्या सुजाण व्यक्तीला चिंता वाटणे सहाजिकच होते, बांगलादेशला जाऊन आल्यावर माझीही ह्या प्रश्नांवरची निरीक्षणे संमिश्र होती.

मला ज्या Spring Law School  मध्ये व्याख्यानासाठी बोलावले होते त्यात दुसऱ्या दिवशी, तरुण वकील इम्रान सिद्दीकी यांचे ‘धर्मस्वातंत्र्य आणि कायदा’ ह्या विषयावर अप्रतिम व्याख्यान झाले. त्यात त्यांनी, मुल्ला-मौलवींचे फतवे आणि त्यांच्या मर्यादा हा विषय मांडला. हे मौलवी फतवे काढून नागरिकांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करतात आणि लोकांना शिक्षा फर्मावतात. प्रतिगामी लोक या फतव्यांचा फायदा घेतात आणि समाजात वाद व हिंसा घडवतात. त्यात अनेक वेळा धार्मिक अल्पसंख्यांकांचे नुकसान होते. या मौलवींना कायद्याविरुद्ध जाऊन आदेश देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिबिराला आलेल्या विद्यार्थिनींनीसुद्धा त्या विषयावरच्या चर्चेत मोकळेपणाने भाग घेतला आणि अशा फतव्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा घटनांमुळे समाजात अशांती वाढते, हे फतवे आपल्या घटनेतील सर्वधर्मसमभावाच्या विरुद्ध आहेत आणि हे असे फतवे कठोरपणे रोखले पाहिजेत असेही काही विद्यार्थ्यांनी मांडले. एकंदर नवीन पिढी सर्वधर्मसमभाव मानणारी दिसत होती.

ढाक्क्यामध्ये असताना तिथले प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिर म्हणजे दुर्गादेवीचे मंदिर पाहायला गेलो. तिथे काही दिवसांनी एका साध्वीचे प्रवचन होणार होते. देवळाबाहेर त्यासंबंधी कापडी फलक लावलेला होता. अनेक भाविक मंदिरात येत जात होते. तिथल्या मुख्य पुजाऱ्याशी बोललो. ढाक म्हणजे आवाज. तिथल्या ढोलावरचा आवाज जिथपर्यंत जात असे तेवढीच ढाक्क्याची मूळ हद्द होती. त्यावरून त्या भागाला- शहराला ढाका हे नाव पडले असे त्यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये कधी कधी मंदिरांवर हल्ले होतात का असे विचारल्यावर ते म्हणाले, असे प्रसंग घडल्याचे मीही वाचतो परंतु आमच्या इथे असे झालेले नाही. मंदिराचे आवार बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मंदिराबाहेर आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्तही होता. त्यातले काही अधिकारी आणि हवालदार हिंदूही असल्याचे त्यांच्या छातीवर असलेल्या नावाच्या पट्टीवरून दिसून येत होते.

मंदिरामध्ये एक कुटुंब पूजा करण्यासाठी आले होते, त्या गृहस्थांशी बोललो. ते मोठे सरकारी अधिकारी होते. त्यांना त्यांच्या नोकरीत हिंदू म्हणून भेदाभेद सहन करावा लागला का, असे विचारले असता असा अनुभव त्यांना आलेला नाही असे ते म्हणाले. मी विचारले असता, सरकारमध्ये 7-8 टक्के अधिकारी आणि कर्मचारी हिंदू असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ढाक्का शहरात फिरण्यासाठी तिथल्या सुप्रीम कोर्टाने एक गाडी दिली होती. गाडीचा ड्रायव्हर हिंदू होता. त्यालाही हे प्रश्न विचारले असता तो म्हणाला, ‘मलाही हिंदू म्हणून कधी भेदभावाची वागणूक मिळाली नाही. तो सुमारे 20 वर्षे कोर्टाच्या नोकरीत होता. सुप्रीम कोर्टातही 6-7 टक्के अधिकारी व कर्मचारी हिंदू असल्याचे त्याने सांगितले.’

बांगलादेश सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सय्यद महमूद हुसेन आम्हाला भेटणार होते; परंतु ते स्वतःच आजारी झाल्याने भेटू शकले नाहीत. न्यायमूर्ती अशरफ उल कमाल यांनी आमचे स्वागत केले. दोन्ही देशांतील न्यायव्यवस्थेबद्दल आमचे बोलणे झाले. बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाचे दोन विभाग आहेत. एक High Court Division आणि दुसरी Appellate Division. तिथे High Court Division वरचे अपील ऐकले जाते. Appellate Division मध्ये सात न्यायमूर्ती आणि High Court Division मध्ये 85 च्या आसपास न्यायमूर्ती आणि सात-आठ अतिरिक्त न्यायमूर्ती आहेत. त्यात सहा महिला न्यायमूर्ती आहेत. सहा-सात न्यायमूर्ती हिंदूही आहेत आणि एक महिला न्यायमूर्ती देखील!

ढाक्क्यामध्ये सर्व धर्मांची पूजास्थाने आहेत. ढाकेश्वरीखेरीज कालीमातेचेही एक मंदिर आणि त्याचे मोठे आवार आहे. नानकशाही गुरुद्वारा आहे. अहमदिया पंथाचीही एक मशीद आहे. बौद्धधर्मीयांचेही मंदिर आहे. माझे मित्र अन्वर राजन यांच्या ओळखीतल्या एका शिया पंथीय आगाखानी गृहस्थांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या घराशेजारीच खोजा मंडळींचा मोठा जमातखानादेखील आहे. ढाकेश्वरीच्या पुजाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये तीस हजारांहून अधिक ठिकाणी नवरात्रात पूजामंडप उभारले गेले होते. 

हे सगळे असले तरीही बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना चिंता आणि असुरक्षितता वाटावी, अशा घटनाही घडतच असतात. इतिहास पहिला तर 1905 च्या बंगालच्या फाळणीच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी बंगालच्या जनतेने आंदोलन करून हाणून पाडली होती. त्यावेळेस मुस्लिम पुरुषांनी हिंदू स्त्रियांना राख्या बांधल्या होत्या. रवींद्रनाथ टागोरांनीही त्या लढ्यात भाग घेतला होता. लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल (लाल-बाल-पाल) यांनी ह्या लढ्याला अखिल भारतीय स्वरूप दिले होते. त्याच बंगालमध्ये 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर मोठे स्थलांतर झाले. फाळणीच्या वेळेस पूर्व बंगालमध्ये 30 टक्के लोकसंख्या हिंदूंची होती. पाकिस्तानच्या राजवटीत जमाते इस्लामीच्या कारवायांमुळे ही लोकसंख्या 18 टक्क्यांवर आली. 1992 मध्ये भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर बांगलादेशात देवळांवर हल्ले झाले आणि मोठ्या संख्येने हिंदू परागंदा झाले. आत्ता हिंदूंची लोकसंख्या 9 टक्के आणि बौद्ध व ख्रिस्ती धरून अल्पसंख्याकांची लोकसंख्या 10-11 टक्के आहे. ढाक्यामधल्या सामाजिक कार्यकर्त्या शिरीन हक्‌ यांना भेटायला गेलो होतो. पुण्यातल्या मासूम संघटनेच्या मनीषा गुप्ते यांच्या त्या ओळखीच्या होत्या, त्या म्हणाल्या शेख हसीनांचे सरकार आल्यापासून अल्पसंख्याकांना पहिल्यापेक्षा खूपच सुरक्षा आहे, पण कित्येकांचा Plan B देखील असतो, म्हणजे दंगा झाल्यास भारतात निघून जायचे.

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण केलेली बांगलादेशची राज्यघटना पूर्णपणे सर्वधर्मसमभाव मानणारी होती. शेख मुजीब यांच्या राजवटीत जमाते इस्लामीसारख्या मूलतत्त्ववादी संघटना नियंत्रणाखाली होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजीब यांचा खून झाल्यानंतर आलेल्या राजवटींमध्ये मात्र पुन्हा धर्मवादी तत्त्वांना उठाव मिळाला. झियाऊर रेहमान यांनी त्यांच्या राजवटीत, घटनेच्या घोषवाक्याआधी बिस्मिल्ला उऱ रेहमान उर रहीम ही कुराणातली आयत आणली. जनरल हुसेन महम्मद इर्शाद यांनी तर त्यांच्या राजवटीत 1988 मध्ये आठव्या घटनादुरुस्तीने इस्लाम हा State Religion म्हणून जाहीर केला. 

शेख हसीना या 1996 ते 2001 आणि 2009 पासून पंतप्रधान आहेत. त्यांनी 2011 मध्ये 15 व्या घटनादुरुस्तीने घटनेचे मूळ स्वरूप पुष्कळसे पुन्हा प्रस्थापित केले. आधीच्या घटनादुरुस्तीमध्ये, धर्मासंबंधीच्या काही कलमांमध्ये बदल झालेला नव्हता. उदाहरणार्थ कलम 29 आणि 41 तशीच ठेवली होती. कलम 29(2) हे भारतीय घटनेच्या कलम 16(2) सारखे आहे. त्या कलमाप्रमाणे कुठल्याही नागरिकाबाबत, धर्म, वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर सरकारी नोकरीमध्ये भेदभाव करता येणार नाही. कलम 41(1)(अ), कलम 41(ब), कलम 41(2) ही कलमे भारतीय घटनेच्या कलम 25(अ), 26(अ आणि ब) आणि 28(3) यांसारखी आहेत. या कलमांनुसार प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचे, आपल्या धार्मिक संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच शैक्षणिक संस्थेत जाणाऱ्या कोणाही व्यक्तीला दुसऱ्या धर्माची धार्मिक प्रार्थना करण्याची सक्ती करता येत नाही.

15 व्या घटनादुरुस्तीने घटनेच्या घोषवाक्यात पुन्हा सर्वधर्मसमभाव ही संकल्पना आणली. घटनेमध्ये कलम 2(अ) हे नवीन कलम घातले, त्यानुसार इस्लाम हा State Religion असला तरीही हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर धर्मियांना त्यांचा धर्म पाळण्याचे समान हक्क असतील असे जाहीर करण्यात आले.

कलम 8(1) अन्वये, राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही या तत्त्वांच्या बरोबरीने सर्वधर्मसमभाव हे तत्त्व, सरकारी धोरणाचा मुख्य गाभा असल्याचे जाहीर करण्यात आले. कलम 12 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की, सर्वधर्मसमभाव पुढील पद्धतीने अंमलात आणला जाईल.

अ) सर्वप्रकारची जातीयता नष्ट करणे.

ब) सरकारतर्फे कुठल्याही धर्माला राजकीय स्थान न देणे. 

क) धर्माचा राजकीय उद्देशासाठी उपयोग न करणे.

ड) कुठल्याही धर्माच्या व्यक्तीबाबत भेदभाव न करणे.

या झालेल्या बदलांमुळे State Religion ही संकल्पना सोडली, तर बांगलादेशच्या घटनेची सर्वधर्मसमभावाची सर्व कलमे भारतीय घटनेप्रमाणेच आहेत. धर्मस्वातंत्र्य आणि कायदा या विषयावरील व्याख्यानानंतर जेव्हा चर्चा झाली तेव्हा हे सर्व मुद्दे मांडण्यात आले. त्यानंतर Spring Law School च्या शिबिराला आलेल्या एका प्राध्यापिकेला एका विद्यार्थ्याने विचारले, एवढे सर्व बदल केले ही चांगलीच गोष्ट झाली, पण मग State Religion ही संकल्पना का राखली? त्यावर त्या म्हणाल्या, अरेबियन कथांप्रमाणे जीनी एकदा बाटलीमधून बाहेर काढली की पुन्हा आत टाकता येत नाही!

अवामी लीगचे सरकार, कट्टरपंथीय संघटनांविरुद्ध शक्य ती कायदेशीर कारवाई करत आहे. शेख मुजीब यांची हत्या करणारे काहीजण मध्यंतरी पकडले गेले आणि त्यांना फाशी झाली. तरीही अतिरेकी आणि धर्मवादी संघटनांच्या कारवाया चालूच असतात. 20 जुलै 2016 रोजी Holyrtisan Bakery वर हल्ला करून 20 परदेशी नागरिक मारले गेले होते. त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले. त्यानंतर कट्टर पंथीयांविरुद्ध लोकांना जागृत करणाऱ्या एका पुरोगामी इमामाच्या प्रार्थनास्थळावर ईदच्या दिवशी हल्ला झाला. 2013 ते 2016 या काळात अनेक सर्वधर्मसमभाववादी, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींवर हल्ले झाले होते. धार्मिक अतिरेक्यांवर टीका करणारे आणि 'Virus of Faith' या पुस्तकाचे लेखक 42 वर्षीय अविजीत रॉय यांची फेब्रुवारी 2015 मध्ये ढाक्का युनिव्हर्सिटीबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली. त्यात त्यांची पत्नी रफिदा अहमद यासुद्धा जखमी झाल्या. त्यानंतर थोड्याच दिवसांनी नोव्हेंबर 2015 मध्ये अविजीत रॉयचे प्रकाशक (जागृती प्रकाशन), फैसल अरेफिन दिपॉन यांची अन्सार अल इस्लाम या गटाने हत्या केली. त्या हत्येतल्या आठ जणांना काही महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली आणि नुकतीच अविजीत रॉयला ठार मारणाऱ्या 5 जणांना फाशीची शिक्षा झाली.

गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात फेसबुकवर कोणी तरी इस्लामबद्दल अनादर व्यक्त करणारे लिखाण केले. जणू काही हिंदूच त्यासाठी जबाबदार आहेत, असे पसरवून ब्राह्मण बारिया आणि हबीबगंज या जिल्ह्यांतील काही गावांमध्ये मंदिरे तोडली गेली आणि शंभरेक घरांवर हल्ले झाले. बांगलादेश सरकारने लगेच Rapid Action Battalion आणून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली, परंतु अशा प्रकरणानंतर अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे हे साहजिक आहे.

चक्मा या आदिवासींची परिस्थिती तितकीच वाईट आहे. चितगाव हिलट्रॅक या जिल्ह्यामध्ये त्यांची बहुसंख्य वस्ती आहे. ते प्रामुख्याने बौद्धधर्मीय आहेत. भारताच्या फाळणीच्या वेळेस त्यांची लोकसंख्या त्या जिल्ह्यामध्ये 95 टक्क्यांहून अधिक होती. तो जिल्हा भारताच्या मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना लागून आहे; परंतु फाळणीच्या वेळेस त्रिपुरा आणि मिझोराम या भागांमधून तिथे जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून तो जिल्हा सर सिरिल रॅडक्लिफ्‌ (भारत-पाकिस्तानमधील सीमा ठरवणारे प्रमुख) यांनी पूर्व पाकिस्तानला दिला. पुढे 1964 मध्ये त्या जिल्ह्यात कर्णफुली नदीवर बांधलेल्या कापताई धरणामुळे चक्मा लोक मोठ्या संख्येने विस्थापित झाले. त्यात पुन्हा वसाहती करणारे बांगलादेशी आणि आत्ता म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांमुळे त्यांचे जीवन अधिकच असुरक्षित आणि कठीण झाले आहे. आता ते त्या जिल्ह्यात पूर्णपणे अल्पसंख्य झाले आहेत. परिणामी त्यांच्यामधला एक गट हिंसेकडे वळाला आहे, बांगलादेश सरकारचे त्यांच्यासंबंधीचे धोरणही दडपशाहीचे आहे.

त्रिपुरा आणि मिझोराममधल्या लोकांचा चकमा, ब्रू आणि इतर आदिवासी निर्वासितांना स्वीकारण्यास विरोध आहे. कारण पूर्व पाकिस्तानातून आलेल्या हिंदू बंगाल्यांमुळे त्रिपुरातले मूळचे लोकच आधी तिथे अल्पसंख्य झाले आहेत. त्यामुळे बहुसंख्य चकमांना अरुणाचल प्रदेशामध्ये हलवण्यात आले आहे. बांगलादेश सरकारने त्यांच्यासंबंधी उचललेली पावले कुठल्याही रीतीने हितकारक म्हणता येणार नाहीत; आणि भारतात निर्वासित होऊन आलेल्या चकमांनाही अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

बांगलादेशातील सर्वधर्मसमभावाचा विचार करताना वरील सर्व बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेख हसीना यांचे सरकार अतिरेकी धर्मवादी प्रवृत्तींना नियंत्रित करण्यासाठी पावले जरूर उचलत आहेत; परंतु अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे तरच अल्पसंख्याकांना, आदिवासींना आणि बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींना सुरक्षितता लाभेल. भारतातही परिस्थिती वेगळी आहे का? भारतीयांनीही त्याचा विचार केला पाहिजे. माझ्या परिचयातल्या त्या बंगाली लेखिकेला हीच निरीक्षणे मला सांगायची आहेत.

Tags: धर्मस्वातंत्र्य ख्रिश्चन बौद्ध हिंदू मुस्लिम शेख हसीना सय्यद महमूद हुसेन ढाका हेमंत गोखले बांगला देश सोनार बांगला सर्वधर्मसमभाव weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके