डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अँडी फ्लाँवर आणि हेन्री ओलांगा

सप्टेंबर 2019 मध्ये मुगाबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. आता झिम्बाब्वेत सत्ताबदल झालेला असला तरी, तो देश अजूनही भीषण परिस्थितीतच आहे. त्यामुळे हेन्री व अँडी यांना आपल्या देशात पुन्हा जाता येईल का, स्थायिक होता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी देता येणार नाही.  

आफ्रिका खंडात क्रिकेट खेळणारे तीन देश आहेत- झिम्बाब्वे, केनिया आणि दक्षिण आफ्रिका. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही चांगला खेळत आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांत झिम्बाब्वे आणि केनियाच्या क्रिकेटचा फार वेगाने ऱ्हास झाला. झिम्बाब्वेचा संघ एके काळी- विशेषतः 1990 च्या दशकात- खूपच चांगले क्रिकेट खेळत असे. भारत, श्रीलंका व पाकिस्तान या संघांना ‘टफ फाइट’ देणारा, अशी झिम्बाब्वेच्या संघाची ओळख होती. त्या संघातील अँडी फ्लॉवर, एलिस्टर कॅम्पबेल, हीथ स्ट्रीक यांच्यासारखे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जात असत. झिम्बाब्वेच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी खेळाडू   

असलेला अँडी फ्लॉवर हा उत्तम यष्टिरक्षक आणि त्याहीपेक्षा उत्तम फलंदाज होता. जसे ऑस्ट्रेलियाच्या संघात मार्क वॉ व स्टीव्ह वॉ हे भाऊ होते, तसेच झिम्बाब्वेच्या संघाकडून अँडी व ग्रांट फ्लॉवर हे दोघे भाऊ खेळत असत. झिम्बाब्वेवर ब्रिटिश वसाहतवाद्यांची सत्ता असल्याने या देशाच्या क्रिकेट संघात 1995 पर्यंत सर्व खेळाडू गौरवर्णीयच असत. त्यामुळेच 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेला 19 वर्षीय हेन्री ओलोंगा हा संघात समाविष्ट झालेला पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता. सर्वांत तरुण वयात झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या ओलोंगाची ओळख त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेसाठी होत असे. याच हेन्री ओलोंगाची 1998 मध्ये शारजात आपल्या सचिन तेंडुलकरने केलेली धुलाई अनेकांना आठवत असेल.

हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर हे दोघे खेळाडू झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचे आधारस्तंभ होते. त्या देशातील 99.5 टक्के कृष्णवर्णीय जनतेसाठी ओलोंगा तर अक्षरशः हीरो होता. अशा या हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवरने 2003 मध्ये आफ्रिका खंडात झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत एक राजकीय कृती केली होती. या कृतीमुळे या दोन्ही खेळाडूंना बहरलेल्या क्रिकेट कारकिर्दीवर पाणी सोडून जीव वाचवण्यासाठी देशत्याग करावा लागला. या खेळाडूंनी असे नेमके काय केले? या खेळाडूंच्या कृतीचे महत्त्व काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी झिम्बाब्वेची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊ या.

आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला वसलेल्या व दीड कोटी लोकसंख्येच्या या देशावर ब्रिटिश वसाहतवादी सत्ता शंभर वर्षे होती. आफ्रिका खंडाचा ‘हिरा’ मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेतील सुपीक जमीन व उत्तम हवामानामुळे हजारो गौरवर्णीय लोक तिथे कायमचे स्थायिक झाले होते. या गौरवर्णीयांनी कृष्णवर्णीय जनतेला गुलामीत ठेवून स्वतःचे एक समृद्ध जीवन उभे केले होते. त्यामुळे झिम्बाब्वेमध्ये एका बाजूला संपन्न व श्रीमंत गौरवर्णीय तर दुसऱ्या बाजूला गरीब, अशिक्षित कृष्णवर्णीय अशी (वर्ण आणि वर्ग यानुसार) स्पष्ट विभागणी झाली होती. असा हा देश 1980 मध्ये वसाहतवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला. पण त्यापुढील 37 वर्षे रॉबर्ट मुगाबे नावाच्या एका निर्दयी, क्रूर आणि हुकूमशाही सत्ताधीशाने झिम्बाब्वेवर सत्ता गाजवली.

मुगाबे यांनी पक्षातला आणि देशातला सर्व विरोध संपवला. त्यांच्या काळात देशाची सर्व क्षेत्रांत अधोगती झाली. त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी व समर्थकांना ‘मोबिलाईझ’ करण्यासाठी 1990 च्या दशकाच्या अखेरीस गौरवर्णीय जनतेकडे लक्ष वळवले. आर्थिक दृष्ट्या समृद्ध, शिक्षणात-व्यवसायात पुढारलेले, मात्र संख्येने अल्पसंख्य असलेले समूह हे कोणत्याही देशातील राजकीय नेत्यांचे नेहमीच आवडते व हमखास परिणाम मिळवून देणारे लक्ष्य असते. झिम्बाब्वेतील गौरवर्णीय समूहाबाबत असेच झाले. या समूहाला धडा शिकवला पाहिजे आणि त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या पाहिजेत, या दिशेने मुगाबे यांनी पावले टाकली. झिम्बाब्वेतील एकूण जमिनींपैकी चाळीस टक्के जमीन आणि अतिशय सुपीक जमिनीपैकी दोन-तृतीयांश जमीन गौरवर्णीय समूहाच्या ताब्यात होती.

तेव्हा संख्येने सहाच हजार असलेले गौरवर्णीय शेतकरी अतिशय प्रगत शेती करत असत. त्यामुळे देशातील चार लाखांहून अधिक लोकांना शेतीतून रोजगार मिळत असे आणि देशाच्या एकूण निर्यातीत कृषिक्षेत्राचा वाटा एक-तृतीयांशपेक्षा अधिक होता. गौरवर्णीय समूहाने केलेल्या अत्याचारांचा इतिहास आठवण्याचे व त्यांच्याकडून जमीन हिरावून घेण्याचे क्षुद्र राजकारण मुगाबेंनी 1990 च्या दशकात सुरू केले. या जमिनीचे देशातील कृष्णवर्णीय समूहांमध्ये पुनर्वाटप केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र त्यांच्या राजकारणामुळे ना त्या देशातील कृष्णवर्णीय समूहाची परिस्थिती सुधारली, ना जमिनीचे कृष्णवर्णीय समूहाकडे पुनर्वाटप झाले. उलट, झिम्बाब्वेतील व्यावसायिक रीतीने केली जाणारी शेती उद्‌ध्वस्त झाली, कृषिक्षेत्राची व ग्रामीण अर्थव्यवस्थेची पूर्ण वाताहत झाली आणि गौरवर्णीय समूह मोठ्या संख्येने देश सोडून गेला.

परिणामी एके काळी अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या या समृद्ध देशावर उपासमारीची वेळ आली. तसेच शेतावर काम करणाऱ्या कृष्णवर्णीय कामगारांवर हल्ले करून मुगाबे यांच्या सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी त्यांनाही देशोधडीला लावले. सन 2000 ते 2002 या काळात त्या देशात शिल्लक असलेल्या लोकशाहीचा गळा घोटणे, आपल्याच देशातील जनतेवर हिंसाचार करणे व गौरवर्णीय विरुद्ध कृष्णवर्णीय असे विद्वेषी राजकारण करणे यांचा कळस झाला होता. या पार्श्वभूमीवर 2003 च्या क्रिकेट विश्वचषकातील काही सामने झिम्बाब्वे आयोजित करणार होता. त्यामुळे साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष झिम्बाब्वेकडे लागलेले होते.

या स्पर्धेच्या थोडेच आधी ‘नायजेल हफ’ नावाच्या  अँडी फ्लॉवरच्या मित्राने- जो झिम्बाब्वेसाठी स्क्वाश खेळत असे- त्याला स्वतःच्या शेतावर नेले होते. एके काळी अतिशय संपन्न असलेले ते शेत मुगाबे यांच्या धोरणामुळे पार उद्‌ध्वस्त झालेले पाहून फ्लॉवरला धक्काच बसला. नायजेल हफ इतक्यावरच थांबला नाही. त्याने अँडी फ्लॉवरला सांगितले, ‘झिम्बाब्वेत सर्वत्र असेच चाललेले आहे. त्यामुळे या विश्वचषकाच्या निमित्ताने झिम्बाब्वेत नेमके काय चालले आहे, हे साऱ्या जगाला सांगणे ही एक खेळाडू व एक आयकॉन या नात्याने तुझी नैतिक जबाबदारीच आहे.’

नायजेल हफच्या शेताला दिलेली भेट आणि त्याच्याबरोबरचा संवाद यामुळे संवेदनशील फ्लॉवरचा आपल्या देशाकडे आणि विश्वचषकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आपण आता काही तरी कृती केली पाहिजे, याच निश्चयाने तो घरी परतला. अँडी फ्लॉवर हा सुरुवातीपासूनच एक विचारी खेळाडू म्हणून ओळखला जात असे. झिम्बाब्वेच्या समाजजीवनात क्रिकेटचे काय स्थान आहे याची त्याला चांगलीच जाणीव होती. कारण त्याने करिअरच्या शिखरावर असताना, 1997-98 च्या सुमारास आपला क्रिकेट क्लब बदलला होता. म्हणजे नावाजलेला क्लब सोडून तो मुख्यतः कृष्णवर्णीय खेळाडू असलेल्या एका दुय्यम दर्जाच्या क्लबकडे गेला होता.

फ्लॉवर तिथे गेल्यामुळे त्याला झिम्बाब्वेतील उगवत्या कृष्णवर्णीय खेळाडूंना मार्गदर्शन करणे शक्य झाले होते. त्याचे क्रिकेटवर आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे स्वतःच्या देशावर किती प्रेम होते, याचा हा पुरावा आहे. असा हा फ्लॉवर नायजेल हफच्या त्या शेतावर जाऊन आला आणि अस्वस्थ झाला. आपल्या सरकारच्या धोरणांचा निषेध करायचा, त्यासाठी आपल्या संघातील सहकाऱ्यांना सोबत घ्यायचे, असे त्याने ठरवले. मात्र अशी राजकीय कृती करण्यासाठी संघातील किती खेळाडू आपल्यासोबत येतील, याविषयी तो साशंक होता. तसेच संघातील काही खेळाडू सरकारच्या बाजूने आहेत, हेही त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने 26 वर्षीय हेन्री ओलोंगाला सहभागी करून घ्यायचे ठरवले. ओलोंगाची तीक्ष्ण बुद्धी आणि तीव्र नैतिक जाणिवा त्याला माहीत होत्या. त्यामुळे आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे ओलोंगाला नेमके कळू शकेल, असेही अँडी फ्लॉवरला वाटले. त्याचा विश्वास अनाठायी नव्हता.

फ्लॉवरचा प्रस्ताव ऐकताच ओलोंगा त्यात सहभागी व्हायला तयार झाला. जर फक्त अँडी फ्लॉवरने राजकीय कृती केली असती, तर एका गौरवर्णीय खेळाडूचा त्रागा अशा तुच्छतेच्या भावनेने त्याकडे पाहिले गेले असते. मात्र एक कृष्णवर्णीय आणि एक गौरवर्णीय अशा दोन खेळाडूंनी झिम्बाब्वेच्या सरकारविरोधी राजकीय कृती करणे, याला खूपच वेगळा अर्थ मिळणार होता. मुगाबे यांच्याविरोधात एक कृष्णवर्णीय खेळाडूही जाहीरपणे उभा राहणे यामुळे त्या राजकीय कृतीचे महत्त्व व परिणाम निश्चितच वाढणार होते. म्हणजे झिम्बाब्वे हा देश गौरवर्णीय समूहासाठी केवळ कृषिक्षेत्रातील व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी असुरक्षित नसून, साऱ्या देशातील जनतेलाच मुगाबे यांनी वेठीस धरले आहे. हा संदेश या कृतीतून फार प्रभावीपणे देता आला होता.

प्रत्यक्ष कृती :

झिम्बाब्वेतील विरोधी पक्षात कार्यरत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील डेव्हिड कोलटार्ट यांना भेटून या दोघांनी आपली कल्पना सांगितली. आता प्रत्यक्ष कृती करायची, असे ठरल्यावर नेमकी काय कृती करावी आणि त्याची परिणामकारकता अधिकाधिक कशी वाढवता येईल याविषयी चर्चा सुरू झाली. त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता- संपूर्ण विश्वचषक स्पर्धेवरच बहिष्कार टाकायचा आणि मुगाबेंच्या राजवटीला विरोध व्यक्त करायचा. मात्र या पर्यायातून दोन्ही खेळाडूंच्या प्रामाणिकपणाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. तसेच या कृतीमुळे विरोधही फारसा परिणामकारक ठरला नसता. दुसरा पर्याय होता- विश्वचषकाचे सामने खेळताना दंडावर काळी पट्टी बांधायची आणि एका पत्रकाद्वारे ‘आम्ही असे का करत आहोत,’ हे जाहीर करायचे. ओलोंगा आणि फ्लॉवर यांनी कोलटार्ट यांच्या सल्ल्याने दुसरा पर्याय निवडला.

आपल्या या कृतीमुळे आपल्याला झिम्बाब्वे क्रिकेट संघाकडून पुन्हा खेळता येणार नाही, आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द कायमची संपुष्टात येईल आणि कदाचित आपला प्रिय देशही कायमचा सोडावा लागेल याची दोघांनाही पूर्ण जाणीव होती. दहा वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या फ्लॉवरचे वय 34 वर्षे असल्याने त्याच्यासाठी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणे तुलनेने सोपे होते. मात्र 26 वर्षीय ओलोंगासमोर आणखी आठ-दहा वर्षांची क्रिकेट कारकीर्द होती. तसेच क्रिकेट खेळताना हे दोघेही खोऱ्याने पैसा कमावत होते, त्यावरही पाणी सोडावे लागणार होते. मात्र आपल्या देशासाठी व वैचारिक भूमिकेसाठी त्या दोघांनीही हा सगळा त्याग करायचे ठरवले होते.

झिम्बाब्वेचा पहिला सामना होता 10 फेब्रुवारी 2003 रोजी. हरारे या झिम्बाब्वेच्या राजधानीच्या शहरात खेळवला जाणारा हा सामना फारच ऐतिहासिक ठरला. क्रिकेटच्या मैदानापासून अध्यक्ष मुगाबे यांचे घर अक्षरशः हाकेच्या अंतरावर होते. एका हुकूमशहाच्या घरापासून इतक्या जवळ, आपले सर्वस्व पणाला लावून सारे जग दखल घेईल अशी राजकीय कृती करण्यासाठी किती धैर्य लागते याची कल्पनाच केलेली बरी. (या कृतीचे परिणाम कुटुंबीयांनाही भोगावे लागणार असल्याने आपण नेमके काय करणार आहोत, हे त्यांनी फक्त जवळच्या नातलगांना सांगितले होते.) सामन्याच्या दिवशी सकाळी या दोघांच्याही सह्या असलेले साडेचारशे शब्दांचे, अतिशय प्रभावीपणे लिहिलेले पत्रक त्यांनी पत्रकारांना दिले. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की,

‘आम्ही जरी क्रिकेटपटू असलो तरी आम्हालाही सदसद्‌विवेकबुद्धी आणि भावना आहेत. झिम्बाब्वेतील लाखो नागरिकांना रोज काय भोगावे लागत आहे आणि दारिद्य्र, उपासमार व एड्‌स यामुळे हजारो नागरिक कसे मृत्युमुखी पडत आहेत याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. अशा वेळी शांत बसणे म्हणजे देशात जे होते आहे त्याचा स्वीकार करणे किंवा स्वतःच्या सदसद्‌विवेकबुद्धीशी प्रतारणा करण्यासारखे आहे. आम्ही हे दोन्हीही करू शकत नाही. म्हणूनच देशात होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि लोकशाहीचा विनाश याचा निषेध करण्यासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना आम्ही दंडावर काळी पट्टी बांधणार आहोत.’

अतिशय पॉवरफुल असे ते ‘स्टेटमेंट’ होते.  जेव्हा सामन्याच्या बाविसाव्या षटकात अँडी फ्लॉवर फलंदाजीसाठी दंडावर काळी पट्टी बांधून उतरला, तेव्हा हेन्री ओलोंगाही ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून उभा असलेला दिसला. फ्लॉवर आणि ओलोंगा यांच्या पत्रकामुळे पत्रकारांच्या हे लक्षात आले होते की, नेमके काय चालले आहे. जगभरातील लाखो प्रेक्षक टीव्हीवर सामना ‘लाइव्ह’ बघत असताना केलेल्या या साध्याच परंतु परिणामकारक कृतीमुळे या दोघांना काय म्हणायचे आहे, हे सगळ्या जगात पोहोचले. दुसऱ्या दिवशी जगभरात त्यांच्या या कृतीची दखल घेतली गेली. त्यांच्यावर प्रशंसेचा वर्षावही झाला. मात्र त्यांच्याच देशातून त्यांच्यावर टीकेचा भडिमारही झाला. मुगाबे यांच्या समर्थकांकडून हे दोघे खेळाडू ‘देशद्रोही’ असून ‘ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत’ अशी जहरी टीका केली गेली. थेट जीवे मारण्याच्याही धमक्या देण्यात आल्या.

मुगाबे राजवटीचा इतिहास पाहता, या खेळाडूंना आता सरकार जिवंत सोडणार नाही, असेही भाकीत वर्तवले जात होते. मात्र हे खेळाडू आपल्या कृतीमुळे जगभरात प्रसिद्ध झालेले असल्याने सरकारला त्यांच्याबाबत लगेचच काही करता आले नाही. पण हेन्री ओलोंगाला पुढील सामन्यांमधून संघातून वगळले गेले. मात्र फ्लॉवरबाबत तसे करता आले नाही; कारण ‘फ्लॉवरला संघातून वगळल्यास आम्ही संपावर जाऊ’, अशी धमकी इतर खेळाडूंनी दिली. या दोघांनी एकदा निषेधाची कृती करून झाल्यावर त्यांनी पुन्हा असे करू नये,’ असा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिला. त्यामुळे पुढच्या सामन्यात फ्लॉवर आणि ओलोंगाने दंडावर काळी पट्टी न बांधता डोक्यावर घाम पुसण्यासाठी बांधले जाणारे काळ्या रंगाचे स्वेटबँड्‌स वापरले. तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ प्रेक्षकांपैकी अनेकांनी उत्स्फूर्तपणे डोक्यावर काळी पट्टी बांधली होती.

स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने दक्षिण आफ्रिकेत होणार होते. बरी कामगिरी, पाऊस व थोडे नशीब यांच्या आधारे झिम्बाब्वेचा संघ त्या टप्प्यासाठी पात्र ठरला होता. त्यामुळेच हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर यांना देशातून बाहेर पडता आले, अन्यथा तेही शक्य झाले नसते. सामने संपल्यावर दक्षिण आफ्रिकेतून हे दोघे थेट इंग्लंडलाच रवाना झाले. त्यांना इंग्लंडमध्ये निर्वासित म्हणून आसरा मिळाला.

अँडी फ्लॉवरने सर्व पूर्वतयारी केलेली असल्याने त्याच्याकडे इंग्लंडमधील क्लब क्रिकेटचे कॉन्ट्रॅक्ट होते. (त्याच्या पुढील वर्षी 2004 मध्ये अँडीचा भाऊ ग्रँट यानेही देश सोडला व तोही इंग्लंडमध्येच गेला. पुढे जाऊन अँडी फ्लॉवर 2009 ते 2014 या पाच वर्षांसाठी इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झाला.)

मात्र ओलोंगाचे तसे नव्हते. सरकारविरोधी राजकीय कृती केलेली असली, तरीही आपण आपल्या देशात परत जाऊ शकू, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने फारसे काही नियोजन केले नव्हते. मात्र त्याच्या कृतीमुळे तो ज्या क्लबकडून क्रिकेट खेळत असे, त्या क्लबने त्याचे सदस्यत्व रद्द केले. त्याच्या प्रेयसीनेही त्याच्याशी असलेले नाते पूर्णतः तोडून टाकले. तसेच जिवाला धोका असल्याने त्याला आपल्या देशातही परत जाता आले नाही. त्यामुळे फ्लॉवरप्रमाणेच तोही अखेर इंग्लंडमध्ये गेला. मग गायनाचे कार्यक्रम आणि जाहीर भाषणे देऊन उपजीविका करण्याचा मार्ग त्याने निवडला.

या दोघांनाही त्यांच्या ‘धाडसी आणि तत्त्वनिष्ठ’ भूमिकेसाठी इंग्लंडच्या ‘एमसीसी’ या क्रिकेट क्लबचे, अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे आजीव सदस्यत्व दिले गेले आहे. सध्या फ्लॉवर इंग्लंडमध्ये तर ओलोंगा ऑस्ट्रेलियात राहतात. एका ऑस्ट्रेलियन स्त्रीशी 2004 मध्ये ओलोंगाने लग्न केले. मात्र दोघेही गेल्या सोळा वर्षांत आपल्या देशात परत गेलेले नाहीत. झिम्बाब्वे या देशाचा आणि त्यांच्या क्रिकेटचा प्रवास 2003 नंतर आणखी वेगाने अधोगतीच्या दिशेने झाला. देशाची आर्थिक स्थिती इतकी खालावली की, नोटबंदीचे अतिशय टोकाचे पाऊल त्या देशाला उचलावे लागले. तसेच क्रिकेटच्या गैरव्यवस्थापनामुळे त्या देशातील क्रिकेटचासुद्धा झपाट्याने ऱ्हास झाला. मग झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा कसोटीचा दर्जाही काढून टाकला गेला आणि इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या विश्वचषक एकदिवशीय स्पर्धेसाठी संघ पात्रही ठरला नाही आणि आता तर आयसीसीने या देशाला क्रिकेटमधूनच निलंबित केले आहे.

मुगाबे यांनी 2017 च्या डिसेंबरमध्ये 37 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नाइलाजाने सत्तात्याग केला. सप्टेंबर 2019 मध्ये त्यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. आता झिम्बाब्वेत सत्ताबदल झालेला असला तरी, तो देश अजूनही भीषण परिस्थितीतच आहे. त्यामुळे हेन्री व अँडी यांना आपल्या देशात पुन्हा जाता येईल का, स्थायिक होता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी देता येणार नाही. मात्र असे निर्भय व नैतिकतेची जाण असलेले देशप्रेमी खेळाडू जोपर्यंत त्या देशात तयार होत आहेत, तोपर्यंत त्या देशाविषयी असलेली आशा सोडून चालणार नाही.

Tags: संकल्प गुर्जर andy flower henry olonga sankalp gurjar अँडी फ्लाँवर हेन्री ओलांगा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके