डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वीटभट्‌ट्यांचं आणि ऊसतोडीच्या थळातलं जग

गावात कोणतीच प्रतिष्ठा नसलेली ही माणसं- हरलेली माणसं- गावं सोडतात. सोडणाऱ्या गावातही त्यांचा निरोप समारंभ होत नाही, आणि ज्या गावात जातात तिथेही त्यांचं कुणी स्वागत करत नाही.  

ऐन उन्हाळ्यात जळगावच्या चाळीसगावच्या खेड्यापाड्यांत फिरतोय. ‘‘गाव हेच ना?’’ ‘‘हो, हेच.’’ शालाबाह्य मुलांचा अभ्यास करताना ऊसतोड कामगारांची मुले स्थलांतरित झाल्यावर त्यांच्यासाठी शासन 6 महिन्यांचे हंगामी वसतिगृह योजना चालवते. यात मुलांना शाळेने किंवा स्वयंसेवी संस्थेने सांभाळायचे, जेवण द्यायचे व सरकार अनुदान देणार- अशी ही योजना. ‘‘नक्की हेच का, की या नावाची दोन गावे आहेत? पंचायत समितीत ते पदाधिकारी आहेत, त्यांचेच गाव ना?’’ ‘‘अरे हो बाबा हेच ते गाव. पण काम काय आहे?’’ ‘‘अहो, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी या गावात वसतिगृह सुरू केले आहे, ते बघायला आलोय.’’ ‘‘वसतिगृह? कसले वसतिगृह? इथं असलं काही नाही. आज पहिल्यांदाच ऐकतोय.’’ ‘‘अहो, मग आम्हाला यादी दिली, त्यात कसं काय नाव?’’ ‘‘थांबा, आमच्या गावच्या गुरुजींना विचारू.’’ गुरूजींना फोन केला. गुरुजी म्हणाले, ‘‘हो, वसतिगृह सुरू आहे. मुलांची संख्या 100.’’ बिनधास्त सांगितलं. त्यांना वाटले, आम्ही कुठून तरी बाहेरून बोलतो आहोत. ‘आम्ही शाळेत उभे आहोत. वसतिगृहाची जागा सांगा’ म्हटल्यावर घाबरले. फक्त रडायचेच बाकी होते. म्हणाले, ‘‘मला नका अडचणीत आणू. त्यांनी दडपण आणलं. पंचायत समिती पदाधिकाऱ्याच्या संस्थेच्या नावावरच वसतिगृह आहे.’’ प्रत्यक्षात वसतिगृह नाही. मुले नाहीत. 7 लाख रुपये अनुदान मिळू शकते इथपर्यंत कागदपत्रं रंगवलीत. कोणत्याच अधिकाऱ्याची भेट नाही. गावकऱ्यांना एकत्र केलं आणि हा गैरप्रकार समजून सांगितला. त्यांच्या विरोधकांनी शिव्या घातल्या, पण पुढे काहीच झाले नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. ते गयावया करत ‘यावर काही लिहू नका’ म्हणाले. त्यांच्याकडेही फक्त चार्ज. महाराष्ट्रात अशी शेकडो वसतिगृहे सुरू होतात. सर्व ठिकाणी कोण फिरणार? ऊसतोड्यांसाठी योजना कागदावर आणि त्यांची मुले त्यांच्यासोबत ऊस तोडायला त्यांच्याबरोबर- भविष्यात कोयता होण्यासाठी....  

वीटभट्टी... दृश्य- नेहमीचेच. संध्याकाळ. पुरुष मांडीपर्यंत चिखलात उभे. एकीकडून पाण्याच्या नळीने पाणी सोडलेले, दुसरीकडे बायको... पाटी भरून लाकडाचा भुसा टाकते आहे. नंतर कोळशाचा चुरा टाकते आहे... घरात कणीक मळताना होणारी महिलेची दमछाक आपण बघतो. मांडीएवढ्या चिखलात तो उभा आहे... आता हातातल्या खोऱ्याने चिखल ओढून घ्यायला सुरुवात केली आहे... संध्याकाळ होऊ लागल्याने थंडीही वाढू लागलीय... थंडीचा कडाका जाणवतोय. अशा थंड पाण्याच्या चिखलात तो उभा आहे... रांगणारं पोरगं उभं राहतंय... ते धुळीनं माखलंय... सर्दीनं नाक गळतंय... बायकोला अशाही कामाच्या गडबडीत त्याला उचल म्हणून सांगतोय... खोरं ओढून-ओढून आता इतक्या थंडीतही त्याच्या कपाळावर घाम जमा झालाय. दमछाक स्पष्ट दिसतेय. दमछाक होईल नाही तर काय होईल... एका माणसाची काम करण्याची काही मर्यादा असते की नाही?

तसा तो सकाळी म्हणजे अगदी पहाटे तीन वाजताच उठलाय... एवढ्या कडाक्याच्या थंडीत दमलेला तो, उठवत नसतानाही कसाबसा उठलाय. बायकोही उठलीय... दोघेही पहाटे चार वाजता इतक्या अंधारात कामाला जुंपलेत... विटा पाडायला लागलेत. चिखल आदल्या दिवशीच मळलेला. तो विटा पाडून देतोय... बायको त्या उचलून आता समोर लांब जाऊन लावतेय... इतक्या थंडीत गार पडलेल्या चिखलात हात घालायचं जीवावर येतंय... अंधारात सरावानं काम झपाझपा होतंय... सकाळी सूर्योदयापर्यंत बरंच काम ओढलंय... विटा पाडायला पायावर उपडं बसून कंबर, पाठ आता दुखू लागलीय... तरीही तसेच काम ओढतोच आहे.  

बाईला पोरं उठल्यावर त्यांचं आवरायचंय... स्वयंपाकाचं बघायचंय... ती तशीच काम करतेच आहे. तिला प्रत्येक वीट उचलताना वाकावे लागतेय आणि ठेवायला एकदा वाकावे लागतेय... 1000 विटा उचलताना तिला 2000 वेळा वाकावे लागतेय. आता उन्हं वाढू लागलीत. पहाटेपासून काम करत असल्याने थकवाही जाणवू लागलाय, पण समोरचा चिखलाचा ढीग काही कमी व्हयना... थोडा वेळ विश्रांती घेतो, पण बाईला कसली विश्रांती? पोरं आता उठलीत... चहा- जेवणाची तयारी करतेय... पुन्हा विटेला जुंपलेत... आता 11 वाजत आलेत...

1000 विटा कशाबशा झाल्यात. आणखी 100 विटा करायच्यात मालकासाठी. त्या करताना दोघांनाही संताप आलाय... पण काय करणार... पद्धतच अशी पडलीय. 1000 विटांमध्ये तूटफूट म्हणून मालकाने 100 विटा हक्काने घ्यायच्या. म्हणजे 1100 विटा दिल्या, तरच 1000 विटा मोजल्या जाणार... तूटफूट म्हणजे वाळल्यानंतर वाहतूक होताना विटा फुटतात म्हणून... खरे तर एकदा विटा बनवून दिल्यावर त्या विटा मालकाच्या मालकीच्या होतात; पण तरीही तूटफूट कामगारांच्याच बोकांडी! ही फसवणूक वर्षानुवर्षे चालू आहे. पण तरीही तूटफूटच्या नावाखाली एक मजूर महिन्याला 30000 विटा पाडतो आणि 6 महिन्यांत 1 लाख 80000 विटा करणार म्हणजे 18000 विटा मालकाला फुकट द्यायच्या. 18000 विटांची बाजारभावाने किंमत 72000 रुपये होते. हे कष्ट मालक चोरणार... हा सगळा हिशोब त्या अडाणी मजुरांना कळणे शक्यही नव्हते. आपली फसवणूक होते, एवढंच त्या बिचाऱ्यांना कळत होते... पण हा हिशोब कोण उलगडणार?

हिवाळ्यात तरी खूप विटा पडतात, उन्हाळ्यात तर घामाने तितक्याही विटा पडत नाहीत. दुपारी जेवण झालं... तो झोपी गेला. पहाटेपासूनचे जागरण आणि कष्ट... गाढ झोप लागली. तास-दीड तासातच बायकोनं उठवलं... पुन्हा दुसऱ्या दिवशीचा चिखल मळायचा होता. माती ओढायची... पुन्हा तेच. अंधार पडेपर्यंत तो तेच करत होता. जेवण, झोप... पुन्हा पहाटे तीन वाजता उठण्यासाठी... चरकातल्या बैलासारखं जगणं झालं होतं... कशाचं पोरांचं शिक्षण आणि कशाचं काय! पोराचं शिक्षण वीटभट्टीवर सती जात होतं...

कुठेही वीटभट्टी दिसली की मी थांबतोच... मजुरांची चौकशी करतो... आजपर्यंत आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक भट्टीवरच्या प्रत्येक मजुराशी बोललोय... बाहेरगावी गेलो तरी इतरत्रही बोलता आलो... गावं बदलली तरी काही गोष्टी बदलत नाहीत... एक तर मला एकही कामगार रिकामा बसून माझ्याशी बोललेला दिसला नाही. तो एक तर चिखल मळताना बोलतो किंवा विटा पाडताना... क्रिकेटपटू ज्या चिकाटीने प्रत्येक बॉलवर धाव काढतोच, तसे एकही मिनिट वाया न घालवता वीटभट्टी मजूर विटा पाडणे किंवा आनुषंगिक काम करतच असतो... पुन्हा त्यांच्या पार्श्वभूमीतही फार फरक आढळत नाही. सगळे एक तर आदिवासी जमाती किंवा शेतमजूर पार्श्वभूमीचे असतात... जमीन बहुधा नसतेच. असली, तरी अत्यल्प व कोरडवाहू असते. त्यामुळे दिवाळीनंतर गाव सोडावेच लागते. गावाकडेही फार काही नसते... स्वतःचे घरही अपवादानेच आढळते. ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतही सर्व जण सामावलेले नसतात. हे मुळात गावात फारसे राहत नसल्याने यांना कोण विचारणार...? सरपंचांवर दबाव टाकण्याइतके यांच्याकडे असतेच काय...? पुन्हा इतर खर्चाचे फटकेही खूप बसलेले असतात.

मी 300 कामगारांचे सर्वेक्षण केले; तेव्हा आढळले की, या कामगारांची येण्याची इच्छा नसते... पण कुटुंबातील लग्नकार्य झाले की, त्याचा 70 हजार ते 2 लाखांपर्यंत खर्च झालेला असतो. पुन्हा आजारपण असेच संकट असते. रोग काही गरीब-श्रीमंत भेदभाव करत नाही. ही माणसं आजारपणासाठी लाख रुपयांपर्यंत खर्च करताना बघितलीत... असा मोठा फटका बसला की, कर्ज काढावेच लागते आणि उचल घ्यावी लागते... कर्ज फेडायला वीटभट्टीत रक्त जाळावे लागते... गावात कोणतीच प्रतिष्ठा नसलेली ही माणसं- हरलेली माणसं गावं सोडतात. सोडणाऱ्या गावातही निरोप समारंभ होत नाही, की ज्या गावात जातात तिथेही कुणी स्वागत करत नाही.

ही माणसं ऊस तोडायला का जात नसतील...? तेव्हा उत्तर मिळालं की, या कामातले स्वातंत्र्य त्यांना महत्त्वाचे वाटते. ऊसतोडीत एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. गटात काम करावे लागते... इथे म्हणजे, आपण राजे.  पत्नी व तोच. हे स्वातंत्र्य यांना मोलाचे वाटते.

***********

मुलांच्या शिक्षणाचा अभ्यास करताना यांचा आर्थिक-सामाजिक अभ्यास केला, तेव्हा हे सारे लक्षात आले. मुलं गावाकडे ठेवावीत, तर गावाकडे कुणी नसते. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेली वसतिगृह योजना यांच्यासाठीही आहे, पण ती कुणी यांच्यासाठी राबवत नाही... पुन्हा इथं वीटभट्टी ही गावापासून लांब असल्याने शाळाही गावात असते. लहान मुलांना कसे पाठवायचे, हा प्रश्न असतो. जरी प्रशासनाने तिथे शिक्षक पाठवायचा म्हटलं, तरीही एका भट्टीवर पाच कामगार म्हणजे 5 ते 7 मुले... पुन्हा ती वेगवेगळ्या वर्गांतली. कसं शिकवायचं...? यावर दोन-तीन जवळच्या भट्‌ट्या एकत्र करणे शक्य आहे, पण ही इच्छाशक्ती कोण दाखवणार? तूर्तास विटा वाहायला मुले हवीच आहेत. भुसा, कोळसा वाहायला मुले हवीच आहेत. मग कशाला शाळेची बात...?

बाई, नाव सांगा लक्ष्मी. वय सांगा- असेल काही तरी. बाई, नीट सांगा... वीटभट्टीचा मालक म्हणतो, लिहा सर- 40. वीटभट्टी मजुरांचा अभ्यास करताना मी प्रत्येक मजुराची माहिती गोळा करतोय. बाई, लग्न झालंय का? झालंय. माहेरचं गाव कुठलं? बाई गप्प. बाई, लवकर सांगा. मला पुढच्या भट्टीवर जायचयं. बाई गप्पच. अहो बाई, माहेर म्हणजे तुमच्या वडिलांचे गाव सांगा. बाई गप्पच. मी वैतागतो. मालक तिला तोच प्रश्न सोपा करून सांगतो. ‘‘आता कोणतं गाव सांगू? अहो, मला गावच नाही...’’ सगळे हसतात. ‘‘म्हंजी तू काय आकाशातून पडली का?’’  आता ती रडवेली झालेली. ‘‘खरंच मला गाव नाही. माझा जन्मच वीटभट्टीवर झाला. तेव्हा बाप आधीपण वेगवेगळ्या भट्‌ट्याच फिरत होता. माझ्या जन्मानंतरही आम्ही भट्‌ट्या बदलत राहिलो...’’ ‘‘अगं, पण भट्टी संपल्यावर पावसाळ्यात कोणत्या तरी गावात जात असाल की.’’ ‘‘नाही ना. आम्ही विटा विकायला, ट्रक्टर भरायला तिथंच रहायचो... जसे आतासुद्धा वर्षभर राहतो.’’ पुढे ती म्हणाली, ‘‘माझा जन्म भट्टीवर. माझं गाव भट्टी आणि सासर भट्टी. माहेरसुद्धा वीटभट्टी. माझं लग्नही भट्टीवर झाले आणि आतासुद्धा भट्टीवरच राहाते... मग कोणतं गाव सांगू?’’ सारेच जण थरारले... काय बोलावे, तेच कळेना.

गांधींना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘‘आय हॅव नो मदरलँड...’’ ती वेदना वेगळ्या अर्थाने मी समोर बघत होतो. गाव म्हणजे आपली ओळख असते. गाव म्हणजे भावविश्वातली हळुवार जागा असते. गाव म्हणजे आठवणी असतात. आपला भूतकाळ असतो... सवंगडी असतात... दुःखात एक सांत्वन असते. ...यातलं काही काही तिच्या नशिबी नव्हतं... एक सरळसोट, कोरडंठाक आयुष्य तिच्या वाट्याला आलं होतं... तिच्या माहेरीही विटाच होत्या आणि सासरीही विटाच होत्या. मुलं शाळेत का घातली नाहीत, हे विचारायची हिंमतच झाली नाही.

***************

कोणत्याही प्रशिक्षणात शालाबाह्य मुलांचा विषय निघाला की शिक्षक हमखास म्हणतात, ‘‘सर आमच्या इतके मागे लागतात, पण पालकांना काही तरी शिक्षा असली पाहिजे. पालकांचे घरकुल काढून घ्या. त्यांचे रेशनकार्ड रद्द करा. दारिद्य्ररेषेचे कार्ड रद्द करा...’’ मला पालकांवर काही तरी व्यक्तिशः धाक असला पाहिजे, ही भूमिका मान्यच आहे. हेच डोक्यात ठेवून एकदा एका वीटभट्टीवर गेलो. दोन मुलं खेळत होती. ‘‘पोरांनो, शाळेत जाता का...?’’ ‘‘नाही जात.’’ ‘‘तुमचे वडील कुठयंत?’’ ‘‘ते तिकडं चिखुल मळत्येत...’’ तणतणत त्या बापाकडं गेलो. कडेला इतर कामगारांची गर्दी झाली... मी म्हणालो, ‘‘मुलं शाळेत पाठवत नाही; कडक कारवाई होईल.’’ चाचरत म्हणाला, ‘‘म्हणजे तुम्ही काय कराल?’’ मी म्हणालो, ‘‘काय कराल म्हणजे, तुझे घरकुल काढून घेऊ.’’ तो म्हणाला, ‘‘खुशाल काढून घ्या.’’ ‘‘तुझे रेशनकार्ड काढून घेऊ?’’ तो म्हणाला, ‘‘खुशाल काढून घ्या.’’ ‘‘तुझे दारिद्य्ररेषेचे कार्ड काढून घेऊ.’’ तो म्हणाला, ‘‘खुशाल काढून घ्या.’’ माझा संताप वाक्यागणिक वाढत गेला... मी मालकाला म्हटलं, ‘‘हा भलताच उर्मट दिसतोय!’’ तो कामगार म्हणाला, ‘‘साहेब, तुम्ही म्हणताय हे काढून घेईन, ते काढून घेईन... पण यातले आपल्याकडे काहीच नाही, तर तुम्ही काय काढून घ्याल?’’ माझा चेहरा पाहण्यासारखा झाला. आपल्या सूचना, उपाय किती मध्यमवर्गीय असतात; प्रश्न कधी कधी त्याहीपलीकडचे असतात. अशा पालकांना आपण काय शिक्षा करणार आहोत...?

 ***************

 हे ऊसतोड कामगार... बघा पहाटेच निघालेत... बैलगाडीच्या किणकिणटापलीकडं रस्त्यावर कसलाच आवाज नाहीये... सारी घरं चिडीचूप... सन्नाटा... बैलगाडीत बाईच्या मांडीवर तिचं लहानगं पेंगुळलंय... त्याची झोपही धड पूर्ण झाली नाहीये... आणि थंडीत झोपही येत नाहीये. अंगात स्वेटर नाही की कानटोपी नाही. खोपटात थंडीत निजून राहावंसं वाटतंय... पण बापाच्या धाकानं गुपचूप उठून बैलगाडीत पहाटेच्या कडाक्यात गुमान चढलंय... निर्मनुष्य रस्त्यावरून गावातून जाताना पहाटे कडेच्या बंद घरांतून सुखात झोपलेल्या मुलांची तुलना ती आई नकळत आपल्या लेकरांशी करतेय... तिकडे स्वेटर, कानटोपी अन्‌ दुलईत झोपलेलं लेकरू आणि इथं बैलगाडीत ठेचकाळत, थंडीत कुडकुडणारं तिचं लेकरू... ही तुलना करून दुःखी  व्हायलाही तिला वेळ नाही... रात्रभर थंडी होती की नाही, हे तिला अतीव श्रमानं झोप लागल्यावर समजलं पण नाही... पहाटे थंडी वाढल्यावर रडत कुशीत शिरणारं लेकरू फक्त तिला जागं करतंय... पहाटे तीन वाजता थंडीनं अशरशः उच्छाद मांडल्यावर तिला उठावं लागलंय. पट्‌कन चहा करायला गॅसही नाही... काटक्या-कुटक्या कशातरी गोळा करून तिनं चहा केलांय... अंघोळीची चैन भागवायला इतकी लाकडं हाताशी नाहीत... तितका वेळ नाही आणि इतक्या थंडीत ते धाडसही नाही. तशातच आता स्वयंपाक उरकायचाय... लाईट नाही. तशा अंधारात विझणारी चूल सावरत कसा तरी स्वयंपाक करायचाय... पीठ भिजवायला पाण्यात हात घालवत नाहीये... पण करणार काय...?

भाजी चिरताना बोटं वाकडी होताहेत... कशी तरी स्वयंपाक नावाची वस्तू तयार झालीय... एवढी सगळी कामं एका तासात उरकायचीत... नवरा गाडी सज्ज करतोय. बैलंही कुरकूर करताहेत... थंडीत तेही गारठून गेलेत... मालकाच्या चाबकाची भीती फक्त त्यांना उठवतेय... इकडं लेकरं उठायला मागत नाहीत... कुरकुरताहेत... तिकडं शेजारच्या बैलगाड्या निघाल्यात... त्यामुळं तगमग वाढलीय... लेकराला उठवावंसंही वाटत नाही आणि नवरा चिडलाय... एखादा धपाटा टाकून तसंच लेकरू गाडीत टाकावं लागलंय... तिथं फडात पोहोचल्यावर या थंडीचा विचारही करायला वेळ नाही... लेकरं तशीच गाडीत टाकून आता ऊसतोड सुरू झालीय... लेकरांना मिळणारी आईची उबही आता नाही... थंडीनं हात वाकडे होताहेत... तसाच कोयता सुरू झालाय... आधार म्हणून वाळलेलं पाचट पेटवून दिलंय... उसाच्या फडात तर पाणी जवळ असल्यानं थंडी जास्तच झोंबते आहे... उसाचं टोकदार पातं अंगाला कापतंय... थंडीत त्या वेदना अधिकच बोचतात. तिकडं थंडी वाढल्यानं लेकरू बैलगाडीत रडायला लागलंय... त्याच्या अंगावर पांघरूण टाकून पुन्हा फडात. पुन्हा लेकराकडं... अशी तगमग... कशा तरी गाड्या भरल्यात आणि कारखान्यावर पोहोचतायत.. साखर कारखान्याची चिमणी वर धूर ओकत असते. खाली घरांची लांब रांगच रांग... एखाद्या कॉलनीसारखी ही ऊसतोड कामगारांची वस्ती...

नुकतेच कामावरून परत आलेत. आजचे काम पूर्ण केल्याचे समाधान चेहऱ्यावर आहे. तरीपण अजून गाडीचा नंबर लागयचाय. तिकडे गाडी नंबरला लावून आलाय... अंघोळीचे तापलेले पाणी आणून तिथेच दगडावर अंघोळ करतोय... बाईने थळात पुरुषाइतकं काम केलं तरीसुद्धा तिची  घरच्या कामातून सुटका नाही... ती पुन्हा स्वयंपाकाला जुंपलीय. लहान पोरं तिने पाण्याला पिटाळलीत. पोरं शाळेत गेली का, हा प्रश्नही तिच्या लक्षात आला नाही. तशीच भाकरी करायला चूल पेटवलीय... तेवढ्यात झोळीतलं पोरगं उठलं. त्याला झोके देत चूल पेटवत पीठ मळायला घेतलंय... नवरा आता काममुक्त आहे. तो अजून दिवाळीचं अभ्यंगस्नान करण्याच्या थाटात निवांत अंघोळ करतोय... पोरं पाणी घेऊन आल्यावर एकाला झोका द्यायला बसवून मुलीला पुन्हा पाण्याला पाठवलंय... पहाटेपासून तिची ही तगमग चाललीय. स्वयंपाक कसा तरी झालाय. पोरं आणि नवरा जेवायला घालून ती आता बसलीय जेवायला. सगळं लक्ष आता धुण्याकडं लागलंय... त्यातच अजून अंघोळ राहिलीय... पुरुष-माणसांची ये- जा वाढलीय तरी तशीच अंगाला साडी गुंडाळून झोपडीमागच्या दगडावर अंघोळ करत्येय... कोण बघतंय, कोण नाही- ही लाज बाळगायलाही तिला वेळ नाही... नवरा केव्हाच बैलगाडीच्या रांगेकडे गेलाय. पोरं खेळायला...

तिने तसेच धुणं घेतलंय... संध्याकाळ होत आल्यानं थंडी वाढलीय... कारखान्याच्या लिमिटेड नळांवर हीऽऽ गर्दी उसळलेली... त्यामुळे रात्री अंधारातही धुणं धुवायचं... अंधार पडल्यावर थंडीत धुणं धुवायला आलीय. गर्दीत पाणी उडून थंडीत ओलीचिंब झालीय... अंधारात आली. नवऱ्याला हाक मारत्येय, पण तो दारू ढोसून आलाय. काही तरी बरळतोय. पोरं झोपलीत. दारूडा नवरा... त्याला शिव्या घालते, पण ऐकायला तो शुद्धीत नाही. धुणं वाळत टाकून अंग टाकते... पुन्हा पहाटे तीन वाजता कामावर जाण्यासाठी... कसं विचारू तिला- पोरं शाळेत का पाठवत नाही? ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची चर्चा या जीवनक्रमात करावी लागेल.

 ***************

पोरं खेळात रंगलीत... ऊसतोड्यांच्या बंद खोप्यांसमोरच्या रिकाम्या मैदानात खेळ रंगलाय... एऽ पोरांनोऽऽ इकडं या... मला सांगा- ती तिकडे शाळा दिसते का...? हो, दिसते. मग तुम्ही शाळेत का रे जात नाही?

1. माझा बा मला रात्रीचाच फडात नेतो...

2. आमचं लहान बाळ आहे ना, म्हणूनच मला सोबत आणलंय त्याले सांभाळायला.

 3. मी व्हय... माझ्या आईला काम व्हत नाही म्हणून मी पण जातो ऊस तोडायला. मी बी तोडू लागतो.

 4. मला किनई वाढे विकायला बसवित्याते. मला वाढे बी बांधावे लागत्येत.

5. मी खोपीवरचं असत्यो. पण आय म्हणत्ये- धान्य चोरी जातं म्हणून कुठं जायचं नाही... मग मी खोपीसमोरच खेळतो.

मी शांतपणे उठतो... माझ्या हातातल्या पिशवीतल्या ‘मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्याची’ प्रत एकदा डोळे भरून बघतो आणि ‘पोरांनो उद्या या बरं का शाळेत नक्की?’ असलं एक निरर्थक वाक्य बोलून पुढे निघतो. पोरं गारीगार विकायला आलेल्या माणसासारखी माझ्याकडे बघत असतात... मी वळल्यावर जोराने हसतात आणि त्यांचा खेळ पुन्हा सुरू होतो.

**********

ऊसतोड कामगारांच्या फडातली संध्याकाळ तशी मोठी रम्य असते. एका-एका गावची माणसं एकत्रच राहतात... तेव्हा बायका स्वयंपाक करत एकमेकींशी बोलत असतात, तर पुरुषही एका ठिकाणी जमलेले असतात... अधिक प्रगत मंडळी पत्ते खेळत मनोरंजन करत असतात... आपण गेलो तर बोलतात. मी प्रत्येक कुटुंबाची माहिती विचारतो. मुलं किती... इथं किती, गावाकडे किती... शाळेत जातात का? शाळा का सोडली? शेती किती? उत्पन्न किती? कर्ज किती? लग्नावर खर्च किती? हे सारे सारे प्रश्न विचारत राहतो. बरेच जण माहिती देताना त्रासिक चेहरा करतात.

पूर्वी लोक उत्साहानं माहिती द्यायचे... त्यांना वाटायचे की- माहिती दिल्यावर काही योजना मिळेल. पण अलीकडच्या काळात भ्रमनिरास इतका तीव्र आहे की, महिती देऊन काही घडेल असे त्यांना वाटतच नाही... पुन्हा ते माहिती देताना नॉर्मल बोलूच शकत नाहीत. दबलेली वेदना बाहेर येते. आपण विचारावे- घरात सरकारी नोकरी किती जणांना? त्यावर ते पैसे दिल्याशिवाय मिळतात का नोकऱ्या, असं विचारतात. आपण विचारावं- शेतीत उत्पन किती? त्यांचा पडीक शेती, बाजारभाव यावरचा संताप व्यक्त होतो...  अनेक वर्षे त्यांच्याशी बोलल्यावर एक पॅटर्न लक्षात येतो... बहुतेक सर्वच जण जिरायतदार आहेत. अल्पभूधारक आहेत. पावसावरची शेती करतात... पाऊस जितका कमी पडेल तितकी संख्या वाढते... बैल शक्यतो सीझनला विकत घेतात आणि सीझन संपल्यावर विकून टाकतात... दोन भाऊ असतील, तर एक जोडी गावाकडे थांबते आणि दुसरी ऊस तोडायला...

अनेक जण कर्जामुळे ऊस तोडायला येतात... लग्न व आजारपण हे कर्जाचे मुख्य कारण असते... आजारपणात महिलांच्या आजारांची संख्या जास्त असते. लग्नासाठी कर्ज होण्याचे प्रमाण एक लाखाच्या पुढेच सरकते. म्हणजे महाग होत जाणारी लग्नं हासुद्धा एक शोषण करणारा मुद्दा आहे. ही माणसं साधारणपणे सहा महिने काम करतात. दिसताना जरी 70 ते 80 हजारांची रक्कम शेवटी नेतात असे दिसले; तरीसुद्धा त्याचे प्रतिमहिना प्रतिमाणशी उत्पन्न जर काढले, तर ते फारसे निघत नाही. पुन्हा हे उत्पन्न जर 8 तासांच्या हिशोबाने काढले तर 16 तासांचा हिशोब करावा लागेल. असे बघितले तर फारसे पैसे हातात पडत नाहीत. तरीही ही माणसं ऊस का तोडतात याचा शोध घेतला; तेव्हा असे आढळले की, जरी फार उत्पन्न मिळत नसले तरी ही एकत्रित मिळणारी रक्कम उपयोगाची वाटते. पुन्हा सहा महिने रोज काम मिळते. पुन्हा वाढे विकून इकडचा खर्चही वरच्यावर निघतो व 6 महिने गावात इतर रोजगार नसतो... त्यामुळे ही माणसं हे अमानुष वाटणारे कामसुद्धा आवडीने करत राहतात...

***************

बाबा, तुमची मुलं कुठं आहेत...?

कुठं म्हणजे- इथंच ऊसतोडीला सोबत आणलीत की...

पण त्यांच्या शाळेचं काय...?

काय म्हणजे, इकडे आलो म्हणजे मग शाळेला कशी काय जातील...?

पण मुलं गावाकडे का ठेवली नाहीत...?

कशी ठेवणार? आई-बाप आहेत गावाकडं, पण म्हातारे आहेत. पुन्हा गावाकडं पोरं ठेवणं म्हणजे जुळ्याचं दुखणं असतं... माझा भाऊ बी गेलाय ऊस तोडायला... त्याची बी पोरं आहेत की... तेव्हा आई- बाप कुणाचीच पोरं ठेवून घेत नाहीत. ती म्हणत्यात तुमची पोरं तुमच्याजवळ...

पण मग गावात सरकारनं सुरू केलेली हंगामी वसतिगृहं नाहीत का?

नाही ना! जबाबदारी नको म्हणून शाळेनं गावात  स्थलांतरच दाखवलं नाही... मागच्या वर्षी गावपुढाऱ्यांनी या वसतिगृहांवर हात मारला होता. आणि वसतिगृहात जेवण नीट नसते, ना काही धड सोय असते... पुन्हा पोरी ठेवाया नको वाटतं... काळ मोठा वंगाळ आलाय. पोरी आपल्याजवळच हव्यात.

पण मग इथं कारखान्याजवळच शाळा असते. मग तिथं तरी शाळेत का पाठवत नाही...? तुमचं बरोबर हाय. पण तुम्हीच सांगा- आम्ही जातो पहाटे तीन वाजता आणि शाळा भरते सकाळी 11 वाजता... आठ तास पोराची जबाबदारी कोण घेणार...? सकाळी लेकरं उठल्यावर ते कसं स्वतःच आवरतील? तुम्हीच सांगा ना... तुम्ही तरी आठ वर्षाचं पोरगं एकटं सोडून जाल का...? तुमचं हे सरकार याचा इचार करणार की नाही...?

तुमचं म्हणणं पटतंय मला... पण शिक्षणाचं महत्त्व... तो मध्येच मला तोडत म्हणतो, पण-बिण काही नाही... सकाळी पोरानं काडेपेटी ओढली... खोपी पेटली... जबाबदार कोण...? पुन्हा समद्या रस्त्याला उसाच्या ट्रक चालू... कसं रस्ता ओलांडावा त्या बारीक पोरांनी...

बरोबर आहे. पण मग शिकवायचीच नाही का मुलं...?

शिकवू की... पण पाळणाघर सुरू करा कारखान्यावर. आम्ही तोडीला जाताना रात्री त्यांच्या ताब्यात पोरं दिऊन जाऊ आणि त्यांनी सकाळी आवरून पोरांना शाळेत पोहोचवायचं... काय...?

इतका बारीक विचार धोरणात आपण करतो का? असे प्रश्न असतात, हे तरी कधी निर्णय घेणाऱ्यांच्या गावी तरी असते का...?

च्यायला, तुमच्या त्या सरकारला काही कळतंय का?

का, काय झालं?

आता तुम्ही म्हणता- पोरं शाळेत पाठवा; पण मग त्या साखरशाळा आमच्या फडात चालायच्या, त्या कशाला झक्‌ मारायला बंद केल्या? बाबा भलताच तापला होता.

अहो, आता शिक्षणाचा कायदा आला. सर्व मुलं एकाच शाळेत शिकली पाहिजेत. सर्वांना एकच प्रशिक्षित शिक्षक हवा ना, म्हणून हे धोरण घेतलं. मी पुस्तकी उत्तर फेकतो. पण उपयोग काय झाला...?

लहान लेकरं ट्रकच्या गर्दीतून जातील व्हय... अहो, ती तुमची साखरशाळा आमच्या खोप्यांसमोर भरायची. आमची पोरं आपली शाळा म्हणून आनंदानं जायची.

पण कारखान्याच्या परिसरात असलेलीच शाळा... तिथं जायला तुमच्या मुलांना हरकत काय?

हरकत मुलांना नाय... हरकत आमचीच हाय... आम्ही गावाकडून धान्य आणतो, त्या धान्याची चोरी होते. खोपीतच तुमची साखरशाळा असायची. आमची पोरं शाळेत बी जायची आणि शाळेतून आमची खोपी बी दिसायची. त्यामुळे धान्यावर लक्ष राहायचे... पुन्हा आमच्या गाई-म्हशी असत्यात. त्यांना दुपारच्या वक्ताला पाणी पाजायचं असतं... पोरं साखरशाळेतून पळत यायची आणि पाणी पाजून पुन्हा शाळेत जाऊन बसायची. आता तुमची शाळा लांब कोसावर असत्येय... कसं काय जमायचं? धान्य चोरी जातंय आणि गुरंबी तहानलेली राहत्यात. पुन्हा एवढी लहान लेकरं ट्रक-ट्रॅक्टरच्या गर्दीतून पाठवायचं खरंच जीवावर येतं... तुम्ही तरी तुमचं लेकरू धाडाल का, सांगा बरं...?

मी निरुत्तर. समान शिक्षणाच्या नावाखाली आम्ही साखरशाळा बंद केल्या. गावाकडे त्यांचा वैताग नको म्हणून शिक्षक हंगामी वसतिगृह सुरूच करत नाहीत... केली, तरी सोई चांगल्या नाहीत. कारखान्यावर यावं, तर या अडचणी... रात्री तीन वाजता जाणारे पालक... या समस्येच्या विळख्यात ऊसतोडी कामगारांच्या मुलांचं शिक्षण अडकलंय... शिक्षणाची आबाळ होऊन पुन्हा हीच पोरं भविष्यातले ‘कोयते’ बनताहेत... पण लक्षात कोण घेतो...!

***************

साखरशाळा बंद झाल्या. मग बदल असा झाला की, आता जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना नेऊन बसवायचं... रोज इतकी मुलं- काम सांभाळून शिक्षक कसे करणार? आमच्या तालुक्यात अगस्ती सहकार कारखान्याने एक शक्कल लढवली... एक पगारी कर्मचारीच नियुक्त केला... तो रोज मुले गोळा करतो... हा मार्ग आम्ही आमच्या तालुक्यापर्यंत शोधला... पण इतरत्र काय घडलंय, ते बघण्यासाठी मध्यंतरी महाराष्ट्रभर फिरलो; तेव्हा धक्काच बसला...  सांगली जिल्ह्यातल्या प्रसिद्ध कारखान्यावर गेलो... कारखान्याने सुंदर साखरशाळा बांधलेली. त्या शाळेत सर्व साहित्य. पुन्हा शाळा अगदी कामगार राहतात त्याच्या मध्यावर. आम्ही पोहोचलो, तेव्हा 11 वाजलेले. शिक्षण विभागाने या शाळेसाठी दोन शिक्षक नेमलेले... दोन्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक बसलेले, पण एकही मुलगा आत नाही... एक जण पेपर वाचत बसलेले... सहज विचारलं- मुलं कुठं आहेत... ते म्हणाले, ‘अजून नाही आले...’

एकही मूल नसताना त्यांना मुले गोळा करावीशी वाटत नव्हती. मुलांची ते वाट बघत होते. मुले आली, तरच ते शिकवणार होते... आम्ही विचारल्यावर शाळेच्या खिडकीतून ते मुलांना हाका मारायला लागले... ज्या कामासाठी त्यांना इथे पाठवले, त्यात रोज या मुलांना बोलवावे हे अपेक्षित होते... आणि शाळेभोवतीच फार तर गोलाकार 200 झोपड्या... मुलं बाहेरच खेळत होती... सहकारातल्या त्या ताकदवान कारखान्याचे संचालक, अधिकारीही याचा आढावा घेत नव्हते की, शिक्षण विभागाचेही अधिकारी बघायला येत नव्हते. सर्व मुलांची हजेरी मांडली की प्रश्न संपणार होता. अहवालात मुले शिकलेली दिसणार होती.

***************

सांगलीहून तसेच निघालो, साताऱ्यात. सातारा जिल्ह्यातल्या प्रसिद्ध साखर कारखान्यावर गेलो. कारखान्याने सर्व शिक्षण अभियानाच्या निधीतून छानशी शाळा बांधून घेतली... आम्ही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तिकडे निघालो. पंचायत समितीने दोन पूर्णवेळ शिक्षक आम्हाला या शाळेसाठी 6 महिने दिले आहेत, असे ते अभिमानाने सांगत होते. पोहोचलो, तर शाळा बंद. सारेच जण गडबडले. मुले बाहेर खेळत होती... शिक्षक मीटिंगला गेले म्हणून सुटी दिली, असे मुले सांगत होती... माझ्यासमोर कारखान्याच्या लोकांनी फोन लावला. गटशिक्षणाधिकारी ‘चौकशी करतो’ म्हणाले...  मीटिंगला दोन्ही शिक्षक लागतात का? यावर पुन्हा ‘चौकशी करतो’ म्हणाले. कसली मीटिंग होती, हे त्यांनाच माहीत नव्हते. दोघांपैकी एकच शिक्षक आज आल्याची मुलांनी माहिती दिली, म्हणजे आलटूनपालटून दिवस हा पॅटर्न सुरू झाला होता तर...!

***************

दोन्ही घटना प्रातिनिधिक आहेत. साखरशाळा बंद झाल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांकडे हा विषय आला... पण ही स्थिती आहे... कारखाने आणि शिक्षण विभाग या दोघांचाही हा प्राधान्यक्रम नाही... कारखान्यांना विश्वासात घेतले तर जसे आम्ही केले तसे इतर कारखाने कर्मचारी नेमणे अशा गोष्टी करतीलसुद्धा. आमच्या कारखान्याने तर हायस्कूलला एस.टी.ने जाणाऱ्या मुलांना एस.टी.चा पास काढून दिलाय... महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडले... प्रश्न पाठपुराव्याचा व इच्छाशक्तीचा आहे... शिक्षण विभागात ही इच्छा कशी जागवायची?

***************

पश्चिम महाराष्ट्रातही इतके निराशाजनक चित्र बघताना उमेद उंचावली ती वाळवा साखर कारखान्यावर... साखरशाळा ही संकल्पना ज्यांनी सर्वप्रथम रुजवली, त्या नागनाथअण्णांच्या कारखान्याला म्हणजे वाळवा सहकारी कारखाना येथे भेट दिली. नागनाथअण्णांनी 1983 मध्ये कारखान्याच्या कामगारांसोबत मुले बघितली, तेव्हा त्यांना हा प्रश्न लक्षात आला. त्यांनी एक शिक्षक नेमला. या मुलांना सकाळी दूध, दुपारी जेवण, संध्याकाळी फळे दिली जात. वर्षाला पुस्तके, पाटी दिली जाई. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, चौथी ते पाचवी असे तीन गट करून प्रत्येक गटाला एक शिक्षक नेमला.

1990 नंतर साखरसंघाने दखल घेतली. दुपारी नाश्ता, जेवण, दर वर्षी कपडे दिले जातात. हायस्कूलचा एक शिक्षक दिला जातो. दर वर्षी 110 ते 115 मुले असतात. मात्र या कारखान्याने पालकांवरही अंकुश ठेवला आहे. ज्या दिवशी पालक मुलांना सोबत नेतील, त्या दिवसाची त्यांची तोड बंद धरली जाते. इतकी आग्रही व कठोर भूमिका कारखान्याने घेतली. पुन्हा पालकांच्या अडचणीही कारखान्याने समजावून घेतल्या. ज्या पालकाची ऐपत नसेल, त्यांनी ऊसतोड संपल्यावर जाताना मुलांना वसतिगृहात सोडून जावे, अशी पालकांसाठी योजना आहे. प्रत्येक विंगला वॉचमन नेमले आहेत. 10 बाय 10 च्या 480 खोल्या बांधल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत महाराष्ट्रात ऊसतोड कामगार थंडी, गारपीट झेलत राहतो, पण अण्णांच्या कारखान्याचा कामगार हा खोलीत असतो. पुन्हा त्या खोलीत लाईटची सोय आहे. टॉयलेटची सोय आहे. या मानवी दृष्टिकोनामुळे 20 वर्षे तीच कुटुंबे कारखान्यावर तोडीला येत आहेत.

कुटुंबात अडचण असेल, तर दोन रुपयांत जेवण असते. मिरजेच्या दवाखान्यात कामगार ॲडमिट असेल, तर मिरजेला इथून कारखान्याचा डबा जातो. बैल मेला, तर दुसरा बैल देतो. दोन वेळा मुलांचे चेकअप करतो. सर्दी, ताप आढळल्यास त्यावर औषध दिले जाते. अंगणवाडीत खेळणी देत होतो. खाऊही देत होतो. हुशार-कच्च्या मुलांच्या जोड्या लावायचो. इंग्रजीची स्वतंत्र शिक्षिका दिली. अण्णांनी मुलांना समोर बसवून दूध पाजले. बाळंतपण झाले, तर सरकारी कर्मचारीवर्गाला रजा असते; पण या कष्टकरी वर्गाला रजा नसते. वाळवा कारखान्याने या वंचितांच्या महिलांना सरासरी दोन महिन्याचे वेतन दिले. क्लिनिंगच्या दिवशी कामगारांचा रोजगार बुडतो. त्यांना अर्धा दिवसाचे वेतन देतो. दिवाळीला फराळ देतो. संक्रातीला तीन किलो साखर, शिकेकाई दिली जाते. जाताना कामगार किमान एक लाख रुपये घेऊन जातात. हे सारे अरेबियन नाईट्‌च्या सुरस कथेइतके आजच्या काळात रम्य व कपोलकल्पित वाटेल, पण सत्य आहे. महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे.

शिरोळच्या श्री दत्त सहकारी कारखान्याला भेट दिली. तिथे 25 कि.मी.च्या परिसरात 500 कुटुंबे राहतात. ज्या ठिकाणी कामगार राहतात, त्या ठिकाणी फिरत्या गावात शाळा टिकत नाहीत. त्यामुळे कारखान्याने कारखानास्थळावर साखरशाळा सुरू केली आहे. मुलांचे आई-वडील सहकार्य करत नाहीत. एकूण मुलांमध्ये 30 मुले, 40 मुली आहेत. विशेष म्हणजे शिक्षण कायद्याने या मुलांच्या वाढीव संख्येसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची तरतूद केली असली, तरीही कारखाना स्वतःच शिक्षकांची नेमणूक करतो. त्यांचा पगार कारखाना देतो. शिक्षकांना साधारणतः 3500 ते 4500 पगार आहे. साखरशाळेची चार वर्गांची चांगली इमारत बांधली आहे.  एकूण 90 विद्यार्थी आहेत. त्यांत 60 विद्यार्थी हजर असतात. मुले शाळेत असताना घरचे काम करायला जातात, पाणी भरायला जातात. मुले गोळा करायला 5 वर्षांपासून वॉचमनची मदत घेतात. निराशाजनक स्थितीतही माझी उमेद उंचावली...

***************

ऊसतोड कामगारांची गावं बघायची खूप उत्सुकता होती... हे कामगार गावात नसताना ही गावं कशी असतील... हे बघायला बीड जिल्ह्यातच पोहोचलो... सोबत होते शांतिवन प्रकल्पाचे दीपक नागरगोजे. त्यांनी मला जिल्ह्यात फिरवलं. ऊसतोड कामगारांची मुलं गावातच ठेवायची, तर अनेक गावांत वसतिगृहं सुरूच होत नाहीत... सुरू झाली तरी नीट चालत नाहीत. गावातील राजकारणाची बळी ठरतात... मुलं ऊसतोडीला सोबत न्यावीत, तर तिकडे वर वर्णन केलेल्या समस्या... मला तर निराशेनं ग्रासलं...

या वर्तुळातच विचार करताना वर्तुळाबाहेरचं उत्तर दिसलं आणि दीपक नागरगोजे व त्यांच्या 13 मित्रांनी जो प्रकल्प केलाय तो बघितला... आणि उत्तरच सापडलं. दीपक नागरगोजे आणि त्यांच्या 13 मित्रांनी 13 कायम-स्वरूपी वसतिगृहे उभारली आहेत. ही वसतिगृहे 2001 पासून सुरू केली. या प्रकल्पाला शांतिवन प्रकल्प नाव दिले आहे. ही संकल्पनाच नवी असल्याने वाडीवस्तीवर जाऊन ऊसतोड कामगारांचे प्रबोधन केले. त्यातून जून 2001 मध्ये 100 विद्यार्थी दाखल झाले. मुलांच्या वसतिगृहाबरोबरच शाळेचीही गरज होती. त्यामुळे तिथेच शाळा सुरू करण्यात आली. हे मॉडेल म्हणून यशस्वी ठरल्यावर नागरगोजेंनी मित्रांना प्रोत्साहन देऊन बीड जिल्ह्यात असे 14 प्रकल्प सुरू केले. या सर्व प्रकल्पांतून मिळून 2347 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गेल्या 10 वर्षांत या प्रकल्पातून शिकलेले विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी शिक्षणशास्त्रात पदवीधर झाले. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या ऊसतोडी कामगारांसोबतच इतर अनाथ मुले सांभाळायलाही सुरुवात झाली आहे. त्यांत ऊसतोड कामगारांची मुले जून महिन्यात प्रवेश देऊन सांभाळली जातात. त्यामुळे दिवाळीनंतर मुले पालकांबरोबर जात नाहीत. जवळपास 3000 मुलांचे स्थलांतर दीपक व त्याच्या सहकाऱ्यांनी थांबवून दाखविले आहे. दीपक नागरगोजे यांची सूचना अशी की- हंगामी वसतिगृहांवर कोट्यवधी रुपये उधळण्यापेक्षा जिथून स्थलांतर होते, त्या तालुक्यात पक्क्या इमारती उभारून ही मुले ठेवावीत. ही सूचना अत्यंत व्यवहार्य आहे. याचे कारण- जर आपण प्रत्येक जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांवर झालेला खर्च काढला; तर त्या रकमेत किती इमारती होतील? हे लक्षात येईल. मग आपण या तात्पुरत्या वसतिगृहांवर पैसे का उधळत आहोत.

या इमारती वर्षभर उपयोगाच्या आहेत. पालक ऑक्टोबर महिन्यात जातात, तर मे महिन्यात येतात. म्हणजे फक्त 4 महिनेच त्याचा वापर होणार नाही. या काळात त्यातील कर्मचाऱ्यांना संभाव्य स्थलांतराचे सर्वेक्षण करायला लावणे शक्य आहे. पुन्हा या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी खूप कमी असतील. ज्या गावातून जास्त विद्यार्थी असतील, तेथील शिक्षकांची प्रतिनियुक्ती तेथे केली जातील. त्यामुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात मुले जिथे असतील, तेव्हा शिक्षकही त्या गावातच असतील. ज्या गावातील जास्त मुले असतील तिथे ऑक्टोबर महिन्यात शिक्षक तिथे पाठवून हंगामी वसतिगृह, शाळाही चालेल. या सूचनेचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. पुन्हा दीपक नागरगोजे जसे करतात तसे करायला हवे. मुले जूनपासूनच या वसतिगृहात दाखल करायला हवीत. म्हणजे मुलांना सवय होईल व ती पालकांसोबत जाण्याचा हट्ट धरणार नाहीत. एक प्रकारे आश्रमशाळांच्या धर्तीवरच ही वसतिगृहे सुरू करण्याची गरज आहे. पूर्ण वर्षभर या मुलांवर होणारा खर्च हा हंगामी वसतिगृहांपेक्षा खूप कमी असेल. पुन्हा हा खर्च एकाच वेळी करावा लागणार आहे.

राज्यातील जास्तीत जास्त 50 तालुक्यांत हे करावे लागेल. त्यातही सोय म्हणून त्या तालुक्यातील ज्या गावात बाजार भरतो, त्या गावात ही वसतिगृहे सुरू करण्यात येतील. मुलांचे शिक्षण होईल आणि अर्थात जी मुले पालकांसोबत जातील, त्यांच्याही शिक्षणाची सोय करावी लागेल. केवळ कल्पना न मांडता दीपक व त्याच्या मित्रांनी जे केलंय, त्याचं सार्वत्रिकीकरण करणे, हेच उत्तर वाटते.

Tags: ऊसतोड वीटभट्टी हेरंब कुलकर्णी साधना दिवाळी अंक ustod vitbhatti heramb kulkarni diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

सामाजिक कार्यकर्ते. वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन.


Comments

 1. Mukund babanrao patil- 26 Mar 2021

  अभयासपूर्ण आणि वास्तव लिखाण। वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर ,साखरशाळा सकारात्मक आणि नकारात्मक बाजू छान मांडली सर।

  save

 1. Rupali Gojwadkar- 26 Mar 2021

  अतिशय ह्दयस्पर्शी व जळजळीत वास्तव रेखाटले. दीपक नागरगोजे सरांसारख्या शिक्षकांचा आदर्श घेऊन आपल्या परीने शिक्षकाने एका तरी विद्यार्थ्याचे शिक्षण चालू ठेवावे. रूपाली गोजवडकर नांदेड

  save

 1. Suhas Joshi- 26 Mar 2021

  सर फारच भीषण आणि अमानुष वास्तव आपण या लेखातून मांडलय..मन वाचून अस्वस्थ होतं..आणि सरकारी यंत्रणा किती निर्दयी आहे याची चीड येते.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके