डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लेखक म्हणून आपल्या डोळ्यांपुढे अभ्यासिका, टेबललॅम्प वगैरे कल्पना असते. परदेशात तर लेखक लेखनिक वगैरे ठेवतात; पण इतकी प्रचंड संख्येने पुस्तके लिहूनही गुरुजींना टेबल-खुर्ची नसे. त्यांनी मांडी मोडून लेखन केले. अमळनेरला येत तेव्हा विद्यार्थी ज्या खोल्यांत राहत, त्यातील एका खोलीला जोडून 5 गुणिले 3 फूट आकाराची एक मोरीसारखी जागा होती; तिथे खाली बसून ते लिहीत व त्या छोट्या जागेला ‘स्फूर्तिमंदिर’ म्हणत. तुरुंगाला ‘कृष्णमंदिर’ म्हणत.

गांधींना मृत्यूनंतर आइन्स्टाईनने जी श्रद्धांजली वाहिली, ती अशी- ‘गांधी नावाचा हाडामासांचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला, यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.’ मला स्वत:ला साने गुरुजींविषयी जे काही वाचतो आहे, ऐकतो आहे त्यावरून असा माणूस खरेच असेल की त्याचे उगाचंच उदात्तीकरण केले गेले आहे, असा दुष्ट प्रश्न पडतो. म्हणून गुरुजी सांगितले जातात तसे खरे होते का, त्यांच्या कथा वाढवून सांगितल्या गेल्या आहेत का, असा संशयी तपास बराच करून पाहिला. पण या माणसाच्या अनेक कहाण्या उलट-पालट तपासल्या, तेव्हा ‘सांगितले जाते त्यापेक्षा हा माणूस जास्तच साधा आणि प्रेमळ असला पाहिजे,’ असेच पुरावे मिळतात. 

संपूर्ण वागण्या-बोलण्यात प्रचंड तळमळ, प्रामाणिकपणा आणि स्वत:ला अगदी कस्पटासमान लेखण्याची वृत्ती, अतिशय विनम्रता व करुणा ही त्यांचे व्यवच्छेदक लक्षणे वाटतात. त्यांचे वर्णन करणारा एक जण सांगतो की, ‘बोलण्यात जिव्हाळा किती आणि तळमळ किती! साध्या तुटक शब्दांतूनही ऐकणाऱ्याच्या समोर जणू ते आपले काळीज उलगडून दाखवत. प्रत्येक शब्दामागे भावनांनी ओसंडून त्यांचे अंत:कारण उभे असण्याचा येणारा अनुभव किती गोड! किती हृदय हेलावणारा!! मुलांच्या पाठीवरून ते प्रेमाने हात फिरवीत. त्यांचे प्रेम त्यांच्या डोळ्यांतून पाझरत असे.’ 

साने गुरुजी ही एक अपूर्व शुभंकारी व मंगलकारी सत्शक्ती होती, असेच गुरुजींचे वर्णन अनेकांनी केले आहे. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची चुंबकीय आकर्षक शक्ती होती. संपत्तीचे अजिबात आकर्षण नसणे आणि टोकाचा साधेपणा हा विश्वास बसू नये इतका विलक्षण होता. 

डॉक्टर वि.भि.कोलते यांनी गुरुजींना नागपूरला साहित्यविषयक व्याख्यानाचे निमंत्रण दिले. तिसऱ्या वर्गाने प्रवास करून ते नागपूरला आले. त्यांना येताना 100 रुपये दिले होते. त्यातील 27 प्रवासावर खर्च झाले, आता 73 परत घ्या- हा आग्रह ते करू लागले. त्यांची समजूत घालता-घालता कोलते वैतागून गेले. शेवटी राहिलेले पैसे साधनासाठी खर्च करण्याची परवानगी मागितली. पहिल्या वर्गाने त्यांनी कधीच प्रवास केला नाही. इतक्या गर्दीत गैरसोई झेलत तिसऱ्याच वर्गाने ते प्रवास करीत. 

गुरुजी खऱ्या अर्थाने फकीर किंवा अनिकेत होते. अखेरपर्यंत त्यांना स्वत:चे घर नव्हते. पोस्टाचा एक नक्की असा पत्ताही नव्हता. कपडेही कमी असत. ते मळले की स्वत:च प्रवासात धूत आणि वाळवून पुढे जात. पायांत चपलाही अनेकदा नसत. कधी आजारी पडले, तर तपासणीही करायला विरोध करीत. लेखक म्हणून आपल्या डोळ्यांपुढे अभ्यासिका, टेबललॅम्प वगैरे कल्पना असते. परदेशात तर लेखक लेखनिक वगैरे ठेवतात; पण इतकी प्रचंड संख्येने पुस्तके लिहूनही गुरुजींना टेबल-खुर्ची नसे. त्यांनी मांडी मोडून लेखन केले. अमळनेरला येत तेव्हा विद्यार्थी ज्या खोल्यांत राहत, त्यातील एका खोलीला जोडून 5 गुणिले 3 फूट आकाराची एक मोरीसारखी जागा होती; तिथे खाली बसून ते लिहीत व त्या छोट्या जागेला ‘स्फूर्तिमंदिर’ म्हणत. तुरुंगाला ‘कृष्णमंदिर’ म्हणत. कितीही अडचण आली, तरी ते कुणाकडेच पैसे मागत नसत. 

ट्रेनिंग महाविद्यालयात शिकायला असताना शेजारच्या खोलीत दोन मुले राहत असत. त्यांना जेवणाचा डबा येई. खाऊन झाले म्हणजे ते तो डबा खोलीसमोर मोलकरणीसाठी घासायला ठेवून जात. कधी त्यात भाकरी-भाजी उरलेली असे. गुरुजी ती आपल्या खोलीत नेऊन खात. औंधला तर गुरुजी व एक मित्र असे एका डब्यात दोघे जेवत. गिरणीत खाली सांडलेले पीठ गोळा करून गुरुजी त्याच्या भाकरी करीत. 

दिवाळीचा सण लहान मुलांना किती आनंदाचा असतो, पण गुरुजींना औंधहून कोकणात जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते दिवाळीला जाऊ शकले नाहीत. सगळी मुले घरी गेली आणि ते राहिले. पुढे मोठे झाल्यावरही त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे अनेकदा ते उपाशी राहिले. ते कुणालाच स्वत:च्या अडचणी सांगत नसत. ते म्हणायचे- आपली दु:खे लोकांना कशाला सांगायची? ती सांगून जगातील दु:खात कशासाठी भर घालायची? जगात आपला कोणावरही हक्क नाही, असे समजून ते राहिले. 

अत्यंत साधे, शालीन, संकोची गुरुजी... त्यांना अभिमान, गर्व कधीच शिवला नाही. सर्वदा नम्रतेने, शालीनतेने व भिडस्ततेने वागत. सेवाभाव हा त्यांचा स्थायिभाव होता. रस्ते झाडून काढणे, शौचालय साफ करणे, आजारी पेशंटची शुश्रूषा करणे ही कामे गुरुजींनी आयुष्यभर केली. माझ्यात अनंत दुर्गुण आहेत, पण 2 ते 4 सहजधर्म आहेत. मला पैशाचा मोह नाही. खाण्या-पिण्याची, नटण्या-मुरडण्याची लालसा नाही. या सर्वांच्या मुळाशी गेले, तर माझ्या जीवनात व्यापक सहानुभूती आहे. ही व्यापक सहानुभूती म्हणजे माझा प्राण आहे. भूमिगत असताना ते जिथे उतरत तिथे स्वयंपाक करीत. एकदा भांडी घासायची पैज लागली. ज्याच्याशी पैज लागली, तो पहाटे तीन वाजता उठला; तर गुरुजींनी पहाटे तीनपूर्वी भांडी घासली होती, इतके त्यांच्यात ते मुरले होते. 

बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची आठवण लिहिली आहे. लीला सदनाच्या आवारातील हौदावर एक मध्यम वयाचे गृहस्थ मी धुणे धुताना पाहिले. धुण्याच्या कपड्यांचा हा एवढा मोठा ढिगारा बघितल्यावर माझ्या छातीत धस्सच झालं. नंतर कळलं की, खानदेशातील विद्यार्थ्यांचे कपडे धुणारे ते गृहस्थ म्हणजे खुद्द साने गुरुजी होते. अमळनेरला शाळेच्या बागेचे काम करणारा माळी विषमज्वराने आजारी पडला. तेव्हा गुरुजींनी सलग 42 दिवस त्याची सेवा केली. 

गुरुजींचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य जर कोणते असेल, तर त्यांच्यातील स्त्रीप्रधान स्वभाव. त्यांचा स्वभाव तसा होता. एकदा एका लहान मुलाला त्यांनी पायावर झोपवून दूध पाजले व म्हणाले, ‘मला आई होता येते का, हे बघतो.’ एकदा गुरुजींची सर्व जण चेष्टा करत असताना गुरुजींना लग्न करण्यासाठी पेपरात जाहिरात देण्याचे ठरले. गुरुजी ती चेष्टा स्वीकारत म्हणाले, ‘‘जरूर, मी लग्न करतो; पण जाहिरातीत असे छापा- पतीने लुगडे धुतले असता जिला चालेल अशी वधू पाहिजे, अशी जाहिरात देईन.’’ मुले हसू लागली. तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘अरे, हसता काय? आपल्या मातांनी, बहिणींनी, पत्नीने घरी हमालासारखे राबावे, तुमचे कपडे धुवावेत आणि पुरुषाने स्त्रीचे लुगडे धुण्याची कल्पनाही समाजाला सहन होऊ नये?’’ 

वहिनी जेवायला बसली की, सगळे उठून जात; पण गुरुजी तिचेच काय, पण कोणत्याही महिलेचे जेवण होईपर्यंत सोबत बसत. सभोवती उष्टी पडलेली, खरकटी पडलेली स्वयंपाकाची भांडी आहेत, चुलीवर दूध तापते आहे- अशा निर्जीव वस्तूसोबत ती काय जेवणार? दुसऱ्याच्या हृदयाची कल्पना करून घेण्याची एक सवय नकळत त्यांना लागली होती. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय बरे असेल... त्याच्या हृदयात कोणत्या भावना असतील, याचा विचार त्यांच्या मनात सारखा येत असे. 

सरस्वती चव्हाण यांनी एक आठवण लिहिली आहे... भूमिगत असताना गुरुजी आमच्या घरी राहिले होते. पाच ते सहा दिवस. सगळा स्वयंपाक ते स्वत: करीत. गुरुजींची आज्ञा नाकारण्याची आमची हिंमत नव्हती. ते म्हणायचे की, तुम्ही बायका सदैव स्वयंपाकघरातच असता. माझ्यामुळे तरी तुम्हाला सुट्टी/विश्रांती मिळेल व त्याने माझे समाधान होईल. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात प्राचीन भारतीय परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण होते. 

Tags: साने गुरुजी हेरंब कुलकर्णी heramb kulkarni sane guruji शिक्षकांसाठी साने गुरुजी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

सामाजिक कार्यकर्ते. वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके