डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

चांभारांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत त्यांना चामडे विकत घेऊन सवर्णांच्या मुलांचे चोचले पुरविणे शक्य नव्हते. होळीच्या आधीच चार-पाच दिवस त्यांनी तसे गावातल्या प्रमुख मंडळींना सांगितले होते. पण सवर्णांना हा अपमान वाटला.

आळवे हे पन्हाळा तालुक्यातलं एक गाव. गावातली वस्ती दोन अडीचशे उंबऱ्यांची. चार-पाच चांभाराची घरं. होळी हा सर्व गावकऱ्यांचा सण. पिकं हातात आलेली गोडधोडाचं जेवून आनंदानं बेभान व्हायचा हा दिवस. मनातलं कडू किटाळ वाईट वकटं सगळं पार जाळून टाकायचं होळीत. पण यंदाची ही होळी आळव्यातल्या या चार पाच चांभार कुटुंबियांना चांगलीच आठवण ठेवून जाईल.

बलुतेदारीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर गावातले चांभार सवर्ण गावकऱ्यांच्या मुलांना स्वस्त मिळणारे शेळ्यामेंढयांचे कातडे विकत घेऊन टिमक्या, चिडबुडे, डफ बनवून देत. हे सगळं त्या बलुत्याच्या मोबदल्यात.

आता दिवस पालटलेत. पण आळव्यातल्या सवर्णांना कोण हे समजावून सांगणार? चामड्याच्या किंमती भडकल्या आहेत. चांभारांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत त्यांना चामडे विकत घेऊन सवर्णांच्या मुलांचे चोचले पुरविणे शक्य नव्हते. होळीच्या आधीच चार-पाच दिवस त्यांनी तसे गावातल्या प्रमुख मंडळींना सांगितले होते. पण सवर्णांना हा अपमान वाटला. नुसता वाटून थांबला नाही तर झोंबला. 

दि. 25 ला रात्री गावातल्या सरपंच, उपसरपंच, मास्तर अशा मातबर मंडळींनी त्याच्या घरांतली वीज बंद पाडून घरावर दगडफेक केली. तोंडानं अर्वाच्च शिव्या, धमक्या यांचाही मारा चालूच होता.

एवढयावरच मंडळी थांबली नाहीत. त्यांनी गावात गावकामगारामार्फत दवंडी पिटून या चार-पाच कुटुंबांना, कोणाच्याही शेतीवाडीवर, दुकानात, गिरणीत, पाण्याच्या ठिकाणी, घरी, नातलगांकडे जाण्यास बंदी केली. अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक कोंडमारा करून बहिष्कार टाकल्याने आपली दडपशाही चालू राहील, अशी या मंडळींची खात्री असल्याशिवाय हे उद्योग चालू रहाणे अशक्य आहे. कुटुंबातील स्त्रिया नदीचे पाणी आणण्यास गेल्या असता गावातल्या सवर्ण लोकांनी दमदाटी करून पाणी घेऊ दिले नाही. हातांत काठ्या असलेल्या त्यांच्या जमावापुढे या स्त्रिया काहीही करू शकल्या नाहीत.

सवर्णांकडून होणाऱ्या दडपशाहीला आळा घातला जावा अशा अर्थाचे निवेदन या लोकांतर्फे कोल्हापूरच्या डी एस. पीं. ना देण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी रवाना होतील आणि संबंधित अधिकारी अधिक तपास करत रहातील.

पण कदाचित पाणी बंद करता आले तरी ऊन पाऊस वारा या चांभारांना मिळणाऱ्या गोष्टींवर बहिष्काराने नियंत्रण टाकता येत नसल्याने चडफडत असलेल्या अशा सवर्ण वृत्तीचे काय?

Tags: सवर्ण चांभार दलित अत्याचार बहिष्कार high class chambhar dalit injustice ban weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके