डिजिटल अर्काईव्ह

देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल करणारे वेगवेगळ्या पंतप्रधानांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले? त्याची प्रक्रिया काय होती? त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा प्रभाव होता? त्या त्या पंतप्रधानांच्या मतांचा व विचारसरणीचा भाग किती होता? यामागे मूळ व तात्कालिक प्रेरणा कोणती होती? या सर्व गोष्टींवर लेखिका अतिशय सबळ पुराव्यानिशी प्रकाश टाकतात. नीरजा चौधरी या पुरस्कारप्राप्त पत्रकार, स्तंभलेखक व निष्णात राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्या 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाच्या राजकीय विभागाच्या संपादक होत्या. सदर पुस्तकात त्यांनी देशाच्या इतिहासाची दिशा बदलणाऱ्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियांवर सखोल भाष्य केलेले आहे.

इंदिरा गांधी-राजनारायण नरसिंह राव वाजपेयी- राजीव गांधी - बाळासाहेब व भाऊराव देवरस-सोनिया गांधी- व्ही.पी. सिंग इत्यादी टोकाचे राजकीय विरोधक जेव्हा एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसतात, तेव्हा मन चक्रावून जाते. ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या निवडणुकीविरुद्ध खटला भरून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करवले व त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले; त्याच राजनारायण यांनी आपल्याच पक्षातील विरोधकांचा काटा काढण्यासाठी इंदिरा गांधींना आपल्या मदतीचा हात पुढे केला आणि इंदिरा गांधींनी त्यांच्या मदतीने जनता पक्षात फूट पाडण्याचा डाव साधला. पंतप्रधान पदावरून पायउतार झालेले नरसिंह राव विरोधी पक्षांतर्फे झालेल्या पंतप्रधान वाजपेयींना अणुबॉम्ब तयार आहे, याची माहिती देऊन त्याचा स्फोट करण्यासाठी वाजपेयींचा पाठपुरावा करताना दिसतात. तर, आपल्याच पक्षातील अडवाणींना पाठिंबा देणाऱ्या कल्याण सिंग यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळणार नाही, याची तजवीज करण्यासाठी वाजपेयी नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना त्यांना साकडे घालताना दिसतात. आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब देवरस इंदिरा गांधींना सहकार्य करण्याची भाषा करतात व त्यासाठी केवळ पत्र देऊन थांबत नाहीत; तर आपले बंधू भाऊराव देवरस यांच्यातर्फे इंदिरा गांधी व राजीव गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. राजीव गांधी अनेकदा भाऊराव देवरस यांना वाकून नमस्कार करताना दिसतात. एवढेच नाही, तर राजीव गांधी भाऊराव देवरस यांना आलिशान मोटार भेट देताना दिसतात. ज्या गांधी- नेहरू कुटुंबांचा संघ परिवार हिंदुत्वाचा विरोधक म्हणून द्वेष करताना दिसतो व त्याच कारणासाठी राहुल गांधींना पाण्यात पाहताना त्याच गांधी-नेहरू परिवारातील इंदिरा गांधी, बांगलादेशच्या निर्मितीच्या लढ्यावेळी दाखवलेल्या कणखर नेतृत्वाचे श्रेय हिंदू तत्त्वज्ञानाला देताना दिसतात. एवढेच नव्हे तर, आपल्या प्रसंगाच्या आणि अडचणीच्या वेळी अनेक देवदेवतांचा धावा करताना महंत-महाराजांचा आशीर्वाद घेताना दिसतात. त्याच परिवारातील राजीव गांधी भाऊराव देवरसांच्या सल्ल्यानुसार आयोध्यातील रामलल्लाच्या दर्शनासाठी दरवाजा उघडण्याची व्यवस्था करताना दिसतात. तसेच, त्या वेळच्या संबंधित मंत्र्यांचा विरोध डावलून टीव्हीवर रामायण मालिका दाखविण्याची संमती देतात. ज्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरणावरून राजीव गांधी यांना निवडणुकीत बहुमत मिळू दिले नाही, त्या व्ही.पी. सिंग यांचा सल्ला सोनिया गांधी आपण पंतप्रधानपद स्वीकारावे की नाही, यासाठी घेताना दिसतात. एवढेच नाही, तर तसा सल्ला सोनिया गांधी वाजपेयींकडेही विश्वासाने मागताना दिसतात. असे एका मागोमाग एक धक्के लेखिका नीरजा चौधरी आपल्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड्स' (How Prime minister Decides) या पुस्तकात सहजपणे देतात. शेरलॉक होम्स किंवा आपल्याकडील बाबूराव अर्नाळकर आदी रहस्यकथा- लेखकांना मागे टाकेल अशी अनेक रहस्यांमागोमाग रहस्ये नीरजा चौधरी आपल्या पुढे उलगडत असतात. अणुबॉम्ब स्फोटात किंवा त्यासंबंधीच्या धोरणाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या वेळचे पंतप्रधान, संबंधित प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ त्यासंबंधी किती गुप्तता पाळतात हेही पाहण्यासारखे आहे. कधी अशी सल्लामसलत देशाच्या राजधानीबाहेर आपल्या देशात जाऊन, एवढेच नाही तर अन्य देशांत जाऊनही करताना दिसतात.

देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल करणारे वेगवेगळ्या पंतप्रधानांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले? त्याची प्रक्रिया काय होती? त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा प्रभाव होता? त्या त्या पंतप्रधानांच्या मतांचा व विचारसरणीचा भाग किती होता ? यामागे मूळ व तात्कालिक प्रेरणा कोणती होती? या सर्व गोष्टींवर लेखिका अतिशय सबळ पुराव्यानिशी प्रकाश टाकतात. नीरजा चौधरी या पुरस्कारप्राप्त पत्रकार, स्तंभलेखक व निष्णात राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्या 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाच्या राजकीय विभागाच्या संपादक होत्या. सदर पुस्तकात त्यांनी देशाच्या इतिहासाची दिशा बदलणाऱ्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियांवर सखोल भाष्य केलेले आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कोणती रणनीती वापरतात ? सर्वोच्च न्यायालयाचा शहाबानो खटल्याचा निकाल दुरुस्ती करण्याच्या नादात निधर्मी राजीव गांधी कोणती घोडचूक करतात? तत्त्वतः आरक्षणास विरोध असणारे व्ही.पी. सिंग आपली सत्ता कायम राखण्यासाठी देशाच्या राजकीय सत्तेचा पट बदलणाऱ्या मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कशा स्वरूपात घेतात? पी.व्ही. नरसिंहरावांच्या अनेक सूत्रांनी सांगूनही निर्णय न घेता स्थितप्रज्ञ राहण्यामुळे बाबरी मशीदचे पतन कसे होते आणि परिणामतः त्यामुळे संपूर्ण राजकारण कसे बदलते ? मोरारजी देसाई पंतप्रधान असताना अणुस्फोट न करण्याच्या त्यांच्या धोरणाला पाठिंबा देणारे त्या वेळच्या राजकीय समितीतील सदस्य व शांतताप्रिय असलेले वाजपेयी अणुस्फोट कसा घडवतात? सर्वांत 'कमकुवत पंतप्रधान' म्हणून संभावना करण्यात आलेले मनमोहन सिंग पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधांना डावलून अणु करारासारखा ऐतिहासिक निर्णय कसा घेतात आणि भारत व अमेरिका यांच्यातील राजकीय मैत्रीची प्रक्रिया कशी सुरू करतात ? या सर्व घटनांचे जवळपास परिपूर्ण दर्शन घडते. त्या त्या वेळेची, त्या त्या पंतप्रधानांची मानसिकता, अपरिहार्यता आणि या सर्व निर्णयप्रक्रियेमध्ये प्रभाव टाकणारे असंख्य घटक यांसंबंधीचे बारीकसारीक तपशील आपल्या समोर उलगडतात. त्यासाठी पंतप्रधान, राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, धोरणकर्ते आणि मध्यस्थी- अशा शेकडो व्यक्तींच्या मुलाखती नीरजा चौधरी घेताना दिसतात. अशा निर्णयप्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काही लॉबी कशा कार्यरत असतात हे पाहण्यासारखे आहे. जेव्हा अशी निर्णयप्रक्रिया दुसऱ्या देशाशी संबंधित असते तेव्हा दोन्ही देशांतील मध्यस्थ कशी सूत्रे हलवतात हे पाहणेही मनोज्ञ आहे.

बाबरी मशीद आणि अयोध्येचे राम मंदिर या संबंधातील हिंदू-मुस्लिमांचा वाद सामोपचाराने मिटणे शक्य असूनही तो का मिटत नाही? अशा तडजोडींसाठी अनेकांनी केलेले प्रयत्न वाया कसे जातात? अशी तडजोड दृष्टिपथात आलेली असताना त्या त्या काळच्या संबंधित राजकीय व्यक्तींनी, पंतप्रधानांनी व संबंधित संघटनेतील नेत्यांनी यासंबंधीचे श्रेय केवळ आपल्याला मिळणार नाही, म्हणून अशा तडजोडींपासून कसे दूर होतात? एवढेच नव्हे, तर त्या त्या वेळेच्या संबंधित न्यायालयाने निर्णय प्रक्रियेसाठी केलेली दिरंगाई किंवा काही वेळा घेतलेले विवादास्पद निर्णय हे सारे पाहणे अतिशय क्लेशकारक आहे. वर उल्लेख केलेले अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय अथवा न-निर्णय या सर्वांमागे सत्ता मिळवणे अथवा कायम राखणे, ही एकच प्रेरणा दिसते आणि सर्व राजकारण्यांचे पाय मातीचेच असतात किंवा काही वेळा तर ते चिखलाचेच असावेत असे जाणवते.

या सर्व सत्तेच्या सारीपाटात काही वेळा दुर्मीळ असे माणुसकीचे दर्शनही घडताना दिसते. वाजपेयींची भावी पंतप्रधान म्हणून परदेशी पाहुण्यांना ओळख करून देणारे नेहरू किंवा तेच वाजपेयी शिवराज पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधी निवडणूक प्रचारात शिवराज पाटील यांच्या चांगल्या कामाचीही वाखाणणी करताना दिसतात. वाजपेयींना किडनीचा आजार आहे हे समजताच त्यांच्यावर अधिक चांगले उपचार व्हावेत म्हणून अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश करणारे राजीव गांधी, त्याची कृतज्ञतापूर्वक वाच्यता त्यांच्या श्रद्धांजलीसभेत करणारे वाजपेयी. राजकारण्यांची अशीही काही विलोभनीय रूपे दिसतात. राष्ट्रापुढील गंभीर प्रसंगांना तोंड देताना सत्ताधारी विरोधकांची कशी मदत घेतात आणि विरोधकही त्यांना कशी मदत करतात हेही पाहण्यासारखे आहे. बांगलादेश निर्मितीच्या वेळी त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या अमेरिकाभेटीत तेथील राज्यकर्त्यांचा विरोधी सूर पाहून भारतात आल्या आल्या वाजपेयींना बोलावून त्यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून युनोमध्ये भाषण करण्यासाठी पाठवतात आणि भारताच्या त्या वेळचे निर्णयाचे समर्थन करणाऱ्या वाजपेयींना पाहून त्या वेळचे अमेरिकी राज्यकर्ते अचंबित होतात. ज्या अणुस्फोटाचा स्फोट काही विशिष्ट कारणामुळे आपल्या कारकिर्दीत करता आला नाही, ते नरसिंह राव ठरावीक कालावधीच्या आत स्फोट करणे कसे जरुरीचे आहे ते वाजपेयींना समजावून सांगतात आणि वाजपेयी त्याचा स्फोट घडवितात. दुर्दैवाने, ती राजकारणाची पातळी आणि तो राजकारणाचा दर्जा आज पाहावयास मिळत नाही.

सदरचे पुस्तक वाचताना जणू काही अनेक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोरच घडत आहेत किंवा व्हिडिओद्वारे आपण त्याचा चलचित्रपट पाहत आहोत, असा भास होतो. नीरजा चौधरी यांनी त्या त्या वेळेच्या ऋतुमानाप्रमाणे त्या त्या ठिकाणच्या, त्या त्या दिवसाचे, हवामानाचे स्वरूपवर्णन केले आहे. इतकेच नव्हे, तर त्या त्या स्थळाचे - मग ते पंतप्रधानांचे कार्यालय अथवा घर असो किंवा अन्य ठिकाण असो; अशा तन्हेने वर्णन करतात की, लेखिका तिथे प्रत्यक्ष हजर होत्या. असंख्य मुलाखतींद्वारे सर्वच बाबतींतील बारीकसारीक तपशील मिळवून ते अतिशय रंकतेने मांडल्यामुळे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. मुलाखत किंवा संबंधित माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींपैकी बहुतेक व्यक्ती या त्या त्या निर्णयाच्या प्रक्रियेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित होत्या. त्यामुळे सर्व लेखनाला वस्तुनिष्ठ स्वरूप प्राप्त झाले आहे.

बऱ्याच दिवसांनी राजकारणावर एक अप्रतिम पुस्तक वाचावयास मिळाले आहे याचा आनंद अवर्णनीय आहे. देशाचा इतिहास आमूलाग्र बदलणारे राजकीय निर्णय कशा तऱ्हेने घेतले जातात हे प्रत्येक नागरिकास राजकीय साक्षरतेच्या दृष्टीने माहीत असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने हे पुस्तक वाचावे असे वाटते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी