डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जयंत पवार : अन्यायाला उत्तर देणारा भाष्यकार

जयंत पवार यांच्या नाटकाचा एक वेगळा प्रवाह होता. त्याला प्रांत, भाषा, सीमारेषा असा कोणताही अडसर नसायचा, कारण मुंबईसारख्या महानगरातील लोकांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन लिहिल्या गेलेल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर वास्तववादी नाटकांचा ठळक ठसा उमटवला. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाने अनेक पुरस्कार मिळवले. 1978 मध्ये त्यांनी नाट्यलेखनाला सुरुवात केली. नाटक आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘दरवेशी’, ‘मेला तो देशपांडे’, ‘कार्य सिद्धीस नेण्यात श्री (अ)समर्थ आहे’, ‘दुजा शोक वाहे’, ‘लियर’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे,’ ‘विठाबाईचा कावळा’, ‘जळिताचा हंगाम’ इत्यादी तेवीस एकांकिकांचे लेखन त्यांनी केले होते. 2015 मध्ये ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘मोरी नींद नसानी होय’ हा 'लोकवाङ्‌मयगृह'ने प्रकाशित केलेला अखेरचा कथासंग्रह ठरला आहे.            

एकाच माणसात जेव्हा अनेक ओळखी, अनेक कला लपलेल्या असतात तेव्हा त्याच्या जगण्याचा कालावधी कमी होतो आणि जगायचे खूप मोठे राहून गेले, असे वाटू  लागते. बरोबर! मी बोलते आहे ‘जयंत पवार’ या संवेदनशील, नाटककार, नाट्यसमीक्षक, पत्रकार, कथाकार यांच्याविषयी. जीवनाच्या रंगमंचावर अनेक भूमिका उत्तमरीत्या वठवत असताना एक्झिट लवकर झाली,  ही रुखरुख आपल्या सर्व चाहत्यांच्या  मनात आहे.

तसं पाहता आठ-नऊ वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत राहून जगणं सोपं नव्हतंच. अर्थात लिखाण मात्र थांबले नव्हते, ते श्वासासारखे चालूच होते. त्यांचा स्वभाव असा होता की आपला मुद्दा, आपले म्हणणे यांवर ते ठाम असायचे. पण ठरावीक काळापर्यंतच वाद घालणे. नंतर मात्र ‘बरं’! हा पूर्णविराम देऊन वाद घालणे थांबवायचे. माझ्या मनात एक विचार आला, कॅन्सरशी तर ते आठ-नऊ वर्ष झुंजत होते. पण कॅन्सर काही ऐकेना, मग जयंतराव आपल्या अल्पाक्षरी शैलीत ‘बरं’! असे म्हटले असतील.  म्हणूनच कॅन्सर जिंकला आणि मृत्यूचा प्रवास सुरू झाला.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद घेत, त्यावर भाष्य करत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा त्यांच्या आतला संवेदनशील माणूस शांत बसू शकला नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी लढा दिला. आपल्या साहित्यातून, नाटकातून अन्यायाला उत्तर देणारा एक भाष्यकार हरपला, ती उणीव आता कधीच भरून निघणार नाही.

चारचौघांसारखं आयुष्य जगणं, तेही साचेबंद पद्धतीने, असे जयंतरावांना कधी जमलेच नाही. लालबाग-परळच्या भागात आणि वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. तिथलेच काही त्यांच्याबरोबर खेळणारे, त्यांच्याबरोबरच मोठे झालेले कलाकार झाले. दूरदर्शनवर दिसू लागले, चमकू लागले, त्यांनी पैसे कमावले. गाड्या, बंगले घेतले; पण आता मला तरी वाटते की, ते मोठे होणे असते? की जयंतरावांसारखे ‘अधांतर’ लिहून जगणे, रंगमंचावर उतरवून वास्तव दाखवणे, म्हणजेच मोठे होणे असते! ‘अधांतर’मध्ये रंगमंचावर रक्त सांडले, उडाले मात्र प्रेक्षकांच्या अंगावर- असे झाले खरे! त्यावर काही टीकाकारांनी, पत्रकारांनी ‘भडक’ म्हणून टीका केली. परंतु वास्तव मांडण्याची रंगमंचीय ताकद त्या संवेदनशील मित्राकडे होती. म्हणून आपण ‘अधांतर’ बघितल्यावर ‘ते नाटक अंगावर येते,’ असे म्हणतो. कारण ते ‘जग’ आपल्या माहितीतले असले, तरी इतक्या जवळून आपण ते पाहिलेले नसते. ते प्रत्यक्ष पाहून आपली अशी अवस्था होणारच.

जगताना आलेल्या अडचणींना तोंड देत आपला साहित्यप्रवास चालू ठेवणे म्हणजे एखादा तपस्वी आपली साधना वर्षानुवर्षं करतो तसेच म्हणावे लागेल. ज्ञानी जनांशी आपल्या साहित्याची चर्चा न करता, आपले जगलेले आपल्या लिखाणात रुजवायचे. स्वतःच स्वतःचा गुरू बनून आत्मचिंतनातून ते साहित्य तावून-सुलाखून निघायचे आणि खऱ्या अर्थाने एक संवेदनशील लेखक आपल्या समोर यायचा. कधी साहित्य अकादमी पुरस्कार विजेता, (2012 - फिनिक्सच्या राखेतून उठला मोर), तर कधी कोकण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून (2014 - महाड येथे झालेले कोकण मराठी साहित्य संमेलन), तर कधी 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणारा.                            

वास्तव जेव्हा लिखाणातून प्रकट होते, तेव्हा त्याला सजण्यासाठी दुसऱ्या कोणत्या अलंकाराची गरज नसते. तो जे जे लिहित जातो ते ते साहित्य होत जाते आणि लिहिणारा त्याची स्वतःची खास ओळख आपल्या मनावर उमटवत जातो. गिरणगावचे महानगरात होणारे रूपांतर आणि मुंबईचा बदलत जाणारा चेहरामोहरा जयंत पवारांनी खूप जवळून पाहिला. गिरण्या बंद पडल्यामुळे विस्थापित झालेल्या कामगारांची बेरोजगारी, गरिबी त्यांच्या इतकी जवळून कोणीच पाहिली नसेल. म्हणून त्यांच्या लिखाणातून अगतिक, असहाय होत गेलेल्या या सर्वसामान्यांचे जगणे त्यांच्या नाटकातून प्रभावीपणे उतरले. ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’,  ‘माझं घर’, ‘अधांतर’ या त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर खास आपला स्वतंत्र ठसा उमटवला. ‘अधांतर’ने एक नाही - दोन नाही तब्बल चौदा लेखन पुरस्कार मिळवले. यांपैकी ठळक असे- ‘राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार’, ‘महाराष्ट्र फाउंडेशन ललित साहित्य गौरव’, ‘नाट्यदर्पण’. याशिवाय या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषांत अनुवाद झाले आणि पुढे या नाटकावर आधारित ‘लालबाग-परळ’ नावाचा चित्रपटही आला.

जयंत पवार यांच्या नाटकाचा एक वेगळा प्रवाह होता. त्याला प्रांत, भाषा, सीमारेषा असा कोणताही अडसर नसायचा, कारण मुंबईसारख्या महानगरातील लोकांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन लिहिल्या गेलेल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर वास्तववादी नाटकांचा ठळक ठसा उमटवला. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाने अनेक पुरस्कार मिळवले.

1978 मध्ये त्यांनी नाट्यलेखनाला सुरुवात केली. नाटक आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘दरवेशी’, ‘मेला तो देशपांडे’, ‘कार्य सिद्धीस नेण्यात श्री (अ)समर्थ आहे’, ‘दुजा  शोक वाहे’, ‘लियर’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे,’ ‘विठाबाईचा कावळा’, ‘जळिताचा हंगाम’  इत्यादी तेवीस एकांकिकांचे लेखन त्यांनी केले होते. 2015 मध्ये ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘मोरी नींद नसानी होय’ हा लोकवाङ्‌मय गृहने प्रकाशित केलेला अखेरचा कथासंग्रह ठरला आहे.              

‘साहित्य अकादमी पुरस्कार’ स्वीकारताना केलेल्या भाषणात, जयंत पवार म्हणतात, ‘‘लेखक हा चिरडल्या गेलेल्या जगातल्या चिरफाळलेल्या माणसाचा प्रतिनिधी आणि अशा वंचिताचाच वंशज असतो.’’ आणि खरं पाहता जयंत पवार हे अशा वंचितांचे खऱ्या अर्थाने वंशज होते. त्यांनी महानगरातल्या तळात जगणाऱ्यांचं जग संवेदनशीलतेने आणि बारकाईने साहित्यातून म्हणजेच कथांतून-नाटकांतून समाजासमोर मांडले आहे.

‘प्रयोग मालाड’ नाट्यसंस्थेने ऑक्टोबर 2018 मध्ये ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जयंत पवार यांच्या चौदा एकांकिकांमध्ये आपापसांत सामना झाला. ही स्पर्धा बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये पार पडली. नाट्यरसिकांना त्यांच्या सलग चौदा एकांकिकांची मेजवानीच मिळाली.

आविष्कार-स्वातंत्र्यासाठी जे जे लढले आणि ‘दमनशाही’च्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला, ज्यांना ज्यांना या हुकूमशाही व्यवस्थेला बळी जावे लागले; मग तो साहित्याच्या क्षेत्रातला असो, वा नाट्यक्षेत्रातला किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रातला असो- जयंत पवार सदैव अशा कलावंतांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या बाबतीत बोलत, लिहीत राहिले असे अजून एखादे उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. अर्थात हे सर्व जमण्याचे कारण, जयंत पवारांची मुळे गिरणगावात घट्ट रुतून बसल्यामुळे त्यांना ते शक्य झाले.

जयंत पवार यांची नाटकं, कथा यांमधून वास्तव- पण फँटसीचं विलक्षण मिश्रण दिसतं. त्याचबरोबर ते जुनी मिथकं मोडत नवीन मिथकं उभी करतात. लाक्षागृहासारख्या मिथकाला तर त्यांनी पार उलटे-सुलटे करून टाकले. ख्यातनाम कन्नड कलावती बी.जयश्री हिने ‘चित्रपट’ नावाचं एक लोकनाट्य सादर केलं होतं. रावणाच्या चित्राशी ते संबंधित होतं. शूर्पणखा नाक, कान कापले याची तक्रार घेऊन रावणाकडे जाते. राम-रावणाचे युद्ध होते. रावण मारला जातो. शूर्पणखा सीतेच्या दासीचे रूप घेते. रावणाचे चित्र काढते. सीता त्या रावणाचे बंद डोळे उघडते, रावण जिवंत होतो. सीता रामाच्या भयाने रावणाला निघून जायला सांगते. रावण म्हणतो, ‘‘मारणाऱ्यापेक्षा सजीव करणारा मोठा’’. राम येतो. राम आणि रावणाचे युद्ध होते, राम हरतो. रावण सीतेला म्हणतो, ‘‘तू माझी हो! सीता त्याला म्हणते, तू माझ्या उदरी जन्म घे. माझा मुलगा हो म्हणजे मी प्रेमाने तुला आलिंगन देईन, माझे दूध तुला पाजीन.’’ अशा एका विलक्षण वेगळ्या लोककथेचा अन्वयार्थ लावताना त्यातील रामचरित्र तसे शूर्पणखा, सीता या व्यक्तिरेखांचे सुंदर विवरण तर जयंत पवारांनी केलेच; याशिवाय संपूर्ण नाटकाचा अन्वयार्थ उलगडून दाखवला आहे, तो अफलातून आहे. या नाटकावर इतरही परीक्षणं, समीक्षणं आली. पण इतक्या सुलभ पद्धतीने उकल कोणीच करू शकले नाही. त्याचे कारण ते एक पत्रकारही होते. त्यामुळे वृत्तपत्रीय समीक्षा उत्तम झाली. पुढे दाखला देताना वृत्तपत्रीय समीक्षेचे उत्तम उदाहरण म्हणून अभ्यासले जाईल.

जयंत पवारांची नाट्यसमीक्षा वाचण्यासाठी महाराष्ट्रातला प्रेक्षक आतुर असायचा. कारण खूप सूक्ष्म आणि नेमकेपणाने समीक्षा करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नाट्यकलाकार त्यांच्याकडे एक महत्त्वाचे नाट्यसमीक्षक म्हणून बघतात. अर्थातच याचसाठी नाट्य कलाकारांना आणि नाट्य दिग्दर्शकांना त्यांनी केलेली टीकासुद्धा महत्त्वाची आणि हवीहवीशी वाटायची.

नाटककार, नाट्यसमीक्षक जयंत पवारांचा पत्रकारितेचा प्रवास 1986 पासून सुरू झाला. ‘चंदेरी’, ‘नवशक्ती’, ‘आपलं महानगर’, ‘सांज लोकसत्ता’, ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ वर्तमानपत्रांमधून त्यांनी पत्रकारिता केली.

नाटककार असलेले जयंत पवार कथाकार कसे झाले त्यामागे एक कथा आहे. वर्ष होते 1988. निखिल वागळेंनी जयंत पवारांना कथा लिहिण्याचा आग्रह केला. ‘अक्षर’ दिवाळी अंकासाठी कथा लिहिली आणि नंतर ‘अक्षर’साठी 1989 आणि 1991 मध्ये कथा लिहिली. नंतर तब्बल दहा वर्षांनी परत भरतकुमार राऊत यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स वार्षिक’साठी कथा लिहायला लावली. मग अजून दोन कथा दिवाळी अंकासाठीच लिहिल्या. जयंत पवार म्हणतात, ‘‘हे दोन संपादक माझ्या बोकांडी बसले नसते तर मी कथेच्या वाटेला गेलो असतो की नाही, गेलो असतो तर कधी? याविषयी सांगणं कठीण आहे.’’

फिनिक्स मिल या मुंबईतील गिरणगावातल्या एका मोठ्या गिरणीच्या तीन मोठ्या स्थित्यंतरांविषयी जयंत पवार म्हणाले, ‘‘मला लेख लिहायचा होता आणि हे बाबाला माहीत होते, बाबाने मला शीर्षक दिले. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर!’’ बाबा म्हणजे कथाकार सतीश तांबे. अर्थात प्रत्यक्षात लेख झालाच नाही, तर झाली कथा! असे अनेक मित्र जयंत पवार यांना भेटले. त्यांत ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर, ज्यांनी कथासंग्रहासाठी धोशा लावला म्हणून ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. जयंत पवारांच्या लेखक असण्याची पाठराखण त्यांची पत्नी ‘संध्या नरे’ या करायच्या, कारण जयंत पवार म्हणतात, ‘‘माझ्या बिनमहत्त्वाकांक्षी स्वभावाला उभारी देऊन ऊर्जा पुरवीत राहणं आणि माझ्या आळसाचा आदर करून मला लिहितं करणं अशी प्रत्यक्ष लेखनाहूनही अधिक महत्त्वाची कामं संध्या करत आली आहे.’’

‘संध्याताईं’ना आणि ‘सई’ला आताच्या या दुःखाला तोंड देण्याची ताकद मिळो हीच प्रार्थना!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके