डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

किम कुटुंब या श्रीमंत घरात प्रवेश करतं, ते अशा क्लृप्त्या लढवून. असं वाटतं, श्रीमंत पार्कना लुबाडून हे आता ऐश करणार. पॅरासाईट म्हणजे दिग्दर्शक यांच्याच विषयी बोलतोय असं वरवर वाटत राहतं. आणि मग अचानक घडणाऱ्या घटनांनी या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. गरिबांचं शोषण करून आपला खजिना भरणारे श्रीमंतही पॅरासाईटच असतात की. आणि गरीब म्हणजे तरी केवळ एकच स्तर कुठे असतो? या गरिबांना आपल्याहीपेक्षा खालच्या पातळीवर जगणारे गरीब भेटले तर त्यांच्याकडे ते सहानुभूतीने किंवा कणव येऊन पाहतातच असं नाही. किंबहुना, अशा वेळी अनेकदा ते शोषकाच्याच भूमिकेत जातात. वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या परिस्थितींमध्ये माणसांमधला पॅरासाईट डोकं वर काढतच असतो. आपला मतलब साधण्यासाठी.

भारताचा 50 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफी- इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ इंडिया) नेहमीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला गोव्यात पार पडला. महोत्सवामधल्या दखल घ्यावी असं वाटणाऱ्या सिनेमांविषयीच्या लेखमालेतला हा पहिला लेख.

एका भारावून टाकणाऱ्या सिनेमाविषयी

सिनेमा पाहताना, पुढे काय होणार या विचाराने छातीत होणारी धडधड तुम्ही अनुभवलीये? आधी शेवट पाहून किंवा माहीत करून घ्यावा का, म्हणजे मग या उत्कंठेचा त्रास तरी नाही होणार असा विचार तुमच्या मनात आलाय का? हा केवळ सिनेमा आहे, वास्तव नाही हे माहीत असूनही आपल्या पोटात खड्डा पडलाय ही जाणीव कधी झालीये? दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक बॉन्ग जून हो यांचा प्रत्येक सिनेमा असा अनुभव आपल्याला देतो. यंदाच्या इफीमधला त्यांचा ताजाकोरा ‘पॅरासाईट’ हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. पॅरासाईट. परोपजीवी वनस्पती किंवा प्राणी. आपल्या बोलीभाषेत सांगायचं तर बांडगूळ. दुसऱ्याच्या जीवावर स्वत:चं पोट भरणारं. कुणाला तरी लुबाडून आपलं आयुष्य जगणारं.

सिनेमाच्या नावावरूनच तो कोणत्या जातकुळीचा असेल, याची कल्पना येते. त्यातून या दिग्दर्शकाचे आधीचे सिनेमे पाहिलेले असतील तर समोर जे दिसतंय तेवढंच त्याला सांगायचं नाहीये, त्या पलीकडे तो खूप काही बोलू पाहतोय, हेही माहीत असतं. आपल्या भावनांना कुरवाळत गोष्ट सांगणारा हा दिग्दर्शक नाही हे आपण स्वीकारलेलं असतं. एक वेगळा, गडद सिनेमा आपण पाहणार आहोत याची मानसिक तयारीही झालेली असते. आणि तरीही सिनेमा संपल्यानंतर आपण अक्षरश: हादरून गेलेलो असतो, स्तब्ध झालेलो असतो. आपण आत्ता जे बघितलं ते काय होतं या विचाराने भारावूनही गेलेलो असतो.

‘पॅरासाईट’ ही किम कुटुंबाची गोष्ट आहे. की- वू हा तरुण मुलगा, की- जुंग ही तरुण मुलगी, की- ताएक हा बाप आणि चुंग- सूक ही आई. एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये त्यांचं घर आहे. घराला असलेल्या एकमेव खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्याकडे पहायचं तर मान वर करावी लागते. सिनेमाच्या सुरुवातीलाच की- वू आपला फोन घेऊन खोलीभर फिरत दुसऱ्या घरांमधलं किंवा आणखी कुठलं मोफत वायफाय शोधताना आपल्याला दिसतो, बाहेर मच्छर मारण्यासाठी धूरवाला आलेला असताना खिडक्या उघडून आपलं घरही फुकटात किटकमुक्त करून घेऊ असं म्हणणारा बाप दिसतो आणि या कुटुंबाचा आर्थिक स्तर कोणता आहे हे लक्षात येतं. एक दिवस की- वूचा मित्र त्याला अत्यंत श्रीमंत अशा पार्क कुटुंबातल्या दा- हे या शाळेत जाणाऱ्या मुलीसाठी इंग्लिशची शिकवणी घेण्याचं काम देतो आणि की- वूच्या हाती जणू घबाड लागतं.

पार्क दांपत्याच्या दा- सॉन्ग या दहा-बारा वर्षांच्या मुलाला चित्रकला शिकवण्यासाठी तो आपल्या बहिणीची वर्णी लावतो. अर्थात, ती आपली बहीण आहे हे न सांगता. थोड्याच दिवसात पार्क कुटुंबाचा ड्रायव्हर म्हणून बाप येतो आणि मग हाऊसकिपर म्हणून आई. पार्क कुटुंबाचा भव्य-प्रशस्त बंगला, त्यांचं आयुष्य, त्यांचं जग हे बेसमेंटमध्ये राहणाऱ्या कोणालाही हेवा वाटावा असंच म्हणायला हवं. सुरुवातीला अनेकानेक क्लृप्त्या करून आपल्या घरातल्यांना पार्क कुटुंबात प्रवेश मिळवून देण्याचे प्रयत्न पाहताना मजा वाटते. उदाहरणार्थ, की- जुंगला चित्रकलेची शिक्षक म्हणून नोकरीला ठेवल्यानंतर श्रीमती पार्क आपल्या ड्रायव्हरला तिला घरी सोडायला सांगतात. आपण कुठे राहतो हे ड्रायव्हरला कळू नये म्हणून की- जुंग त्याला एका स्टेशनवर आपण उतरू असं सांगते, आपल्या प्रियकराला तिथे भेटायचंय असं स्पष्टीकरणही देते. मात्र, गाडीत मागच्या सीटवर बसलेली असताना तिला एक कल्पना सुचते. गाडीतून उतरण्यापूर्वी आपली अंडरवेअर ती सीटच्या खाली टाकते. श्रीयुत पार्क ऑफिसमधून घरी येताना त्यांना ती दिसते आणि ते ती आपल्या बायकोला दाखवायला घरी आणतात. आपला ड्रायव्हर आपल्या गाडीचा उपयोग अशा कामांसाठी करतोय असं वाटून नवरा-बायको चिडतात. त्यातच नवरा म्हणतो, ‘‘त्यातून तो हे सगळं मागच्या सीटवर करतोय. मी बसतो तिथे. जे काही करायचं ते किमान ड्रायव्हरच्या सीटवर तरी करायचं ना!’’

किम कुटुंब या श्रीमंत घरात प्रवेश करतं, ते अशा क्लृप्त्या लढवून. असं वाटतं, श्रीमंत पार्कना लुबाडून हे आता ऐश करणार. पॅरासाईट म्हणजे दिग्दर्शक यांच्याच  विषयी बोलतोय असं वरवर वाटत राहतं. आणि मग अचानक घडणाऱ्या घटनांनी या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. गरिबांचं शोषण करून आपला खजिना भरणारे श्रीमंतही पॅरासाईटच असतात की. आणि गरीब म्हणजे तरी केवळ एकच स्तर कुठे असतो? या गरिबांना आपल्याहीपेक्षा खालच्या पातळीवर जगणारे गरीब भेटले तर त्यांच्याकडे ते सहानुभूतीने किंवा कणव येऊन पाहतातच असं नाही. किंबहुना, अशा वेळी अनेकदा ते शोषकाच्याच भूमिकेत जातात. वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या परिस्थितींमध्ये माणसांमधला पॅरासाईट डोकं वर काढतच असतो. आपला मतलब साधण्यासाठी. बॉन्ग जून हो यांच्या या कथेला म्हणूनच अनेक पदर आहेत. ही एक साधीसरळ गोष्ट नाहीच. सिनेमाच्या फ्रेम्समधून, त्यांच्या रंगसंगतीमधून आपण समाजातल्या विविध स्तरांमध्ये असलेला कॉन्ट्रास्ट पाहू लागतो. पार्कांच्या घरात किचनच्या खाली एक भली मोठी स्टोअर रूम आहे. तिथून वर येणाऱ्या जिन्याचा वापरही दिग्दर्शकाने उत्तम केलाय. आणि किम राहतात ते बेसमेंटमधलं घर तर त्यांच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आभाळही नीट दिसत नाही अशा घरात माणसं भविष्याची स्वप्नं तरी कशी आणि कोणती बघणार? घराला जेमतेम असलेल्या खिडकीतून दिसतो, तो केवळ बाहेरच्या रस्त्याच्या कडेला लघवी करणारा दारुडा.

बॉन्ग जून हो यांचा हा सातवा सिनेमा. आपल्या सिनेमांविषयी बोलताना एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘माझ्या सिनेमांमध्ये सर्वसाधारणपणे तीन गोष्टी असतात. भीती, अस्वस्थता आणि ‘केकेके’ विनोद.’’ केकेके (kekeke)चा इंग्लिश किंवा मराठी अनुवाद म्हणजे ‘हाहाहा’. त्यांच्या मते, अस्वस्थतेमधूनही विनोद निर्माण होत असतो. आपण हसतो तेव्हा आपण कुठल्यातरी भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण डिस्टोपियन (जिथे सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत अशा काल्पनिक जागेला डिस्टोपिया म्हणतात) जगात जगतोय असं त्यांना वाटतं आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या सिनेमांमधून पडतं. आजची स्थिती अत्यंत वाईट आहे ही ‘पॅरासाईट’मधली खरी भीती नाही, तर या स्थितीमध्ये सुधारणा होणं सोडाच, ती अधिकाधिक खालावत जाणार आहे, ही आहे. आज मी 50 वर्षांचा आहे आणि माझा मुलगा 23. तो माझ्याएवढा होईल तेव्हा कसं असेल हे जग? मला माहीत नाही, मी फारसा आशावादीही नाही त्याबाबत. पण तरीही आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. रोज या विचाराने रडत तर बसू नाही ना शकत?’

‘पॅरासाईट’ला 2019 च्या कान चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्त्कृष्ट सिनेमाचं पाम अ दोअर पारितोषिक मिळालं. कानमध्ये हा पुरस्कार मिळवणारा दक्षिण कोरिआतला ‘पॅरासाईट’ हा पहिला सिनेमा ठरला. त्यामुळे कानहून परतल्यानंतर मायदेशी त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत झालं. बॉन्गना अशी काही अपेक्षा नव्हती. चित्रपट महोत्सवांविषयी लोकांना फारसं देणंघेणं नसतं, पण बहुदा पहिला नंबर आला म्हणून ते खुश झाले असावेत, असं  त्यांनी बोलूनही दाखवलं. दक्षिण कोरिआत ‘पॅरासाईट’ तूफान चाललाय. इतकंच नव्हे, तर अमेरिकेमध्ये हा सिनेमा थिएटर्समध्ये लागलाय आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे स्वाभाविकच, ऑस्करच्या स्पर्धेत ‘पॅरासाईट’ला परदेशी सिनेमांच्या विभागात नामांकन दिलं जाणार की मुख्य विभागात, याविषयीच्या चर्चेनेही जोर धरलाय. खास करून गेल्या वर्षी ‘रोमा’ या आल्फोन्सो क्युरॉन यांच्या सिनेमाला मुख्य विभागात ऑस्कर मिळाल्यानंतर आणि आजवर एकाही कोरियन सिनेमाला ऑस्करचं नामांकनही मिळालेलं नाही या पार्श्वभूमीवर तर अधिकच. पण बॉन्गना त्याच्याशी फारसं देणंघेणं नाही. ‘‘ऑस्कर म्हणजे काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नव्हे. हे अतिशय स्थानिक पुरस्कार आहेत,’’ ते म्हणतात.

मात्र, ‘पॅरासाईट’ने जगभरातल्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांबरोबरच, सर्वसामान्य प्रेक्षकांचीही पसंती मिळवली आहे यात शंकाच नाही. बॉन्ग यांच्या या आधीच्या सिनेमांकडे त्यामुळे लोक आपोआपच आकर्षित होऊ लागले आहेत. नेटफ्लिक्सवर त्यांचे ‘द होस्ट’, ‘स्नोपिअर्सर’ आणि ‘ओक्जा’ हे तीन सिनेमे उपलब्ध आहेत. त्या आधीच्या त्यांच्या ‘बार्किंग डॉग्स नेव्हर बाईट’ (2000), ‘मेमरीज ऑफ मर्डर’ (2003) आणि ‘द होस्ट’नंतरचा ‘मदर’ (2009) या सिनेमांनी महोत्सवांमधून हजेरी लावलेली आहे. यातला प्रत्येक सिनेमा या दिग्दर्शकाच्या वेगळेपणाची साक्ष देतो. आपल्या डुकराला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीची गोष्ट सांगताना ‘ओक्जा’मधून तो कॉर्पोरेट जगावर एक नजर टाकू पाहतो. ‘बार्किंग डॉग्स नेव्हर बाईट’मध्ये एका खालच्या स्तरावर काम करणाऱ्या आणि शेजाऱ्याच्या भुंकणाऱ्या कुत्र्यावर वैतागून त्याचं अपहरण करणाऱ्या लेक्चररचं दु:ख दाखवतो. ‘स्नोपिअर्सर’ तर थेट ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातल्या द्वंद्वाचं चित्रण करतो. पण तेही अत्यंत वेगळ्या चौकटीत. काही कारणाने जग नष्ट झालंय. जी काही थोडी-थोडकी माणसं उरली आहेत, ती एका ट्रेनमध्ये आहेत. या ट्रेनचे दोन भाग आहेत- गरिबांचा आणि श्रीमंतांचा. ही ट्रेन थांबता कामा नये, तिचं इंजिन सतत धडधडत राहायला हवं. ती थांबली की आतली माणसंही बाहेरच्या बर्फामध्ये गाडल्या गेलेल्या जगाचा एक भाग होणार आहेत. अशा परिस्थितीत ‘नाही रे’ भागातून बंड होतं. या सिनेमातही क्रौर्य आहे, रक्तपात आहे. आणि हो, बॉन्ग यांच्या प्रत्येक सिनेमाप्रमाणे छातीतली धडधड आणि पोटातला खड्डाही आहे.

‘‘माझा सिनेमा क्रूर आणि दु:खी आहे, पण तो खरा आहे आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक आहे,’’ बॉन्ग म्हणतात. ‘‘हा समाज बदलण्यासाठी अनेक माणसं झगडताना आपण पाहतो. मी कायम त्यांच्या बाजूचा आहे, पण मला वाटतं की सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद ही प्रेक्षकांना काहीतरी नागडं आणि कोणतंही आवरण नसलेलं सत्य जाणवू देणं. मी काही डॉक्युमेंटरी किंवा प्रचार करत नसतो. जग कसं बदलायला हवं किंवा काहीतरी वाईट आहे म्हणून तुम्ही कसं वागायला हवं हे मला सांगायचं नसतं. त्याऐवजी भोवतालचं भयंकर वास्तव आणि त्याच्या स्फोटक वजनाने दबलं गेलेलं आयुष्य दाखवायला मला आवडतं. हेच सिनेमाचं खरं सौंदर्य आहे.’’

बॉन्ग यांच्या आजवरच्या कारकिर्दीतला हा मास्टरपीस, इफीतला सर्वोत्तम सिनेमा होता, हे नि:संशय!

Tags: मदर मेमरीज ऑफ मर्डर बार्किंग डॉग्स नेव्हर बाईट ओक्जा स्नोपिअर्सर द होस्ट नेटफ्लिक्स ऑस्कर पाम अ दोअर सर्वोत्त्कृष्ट सिनेमा कान चित्रपट महोत्सव पॅरासाईट बॉन्ग जून हो दक्षिण कोरिया सिनेमा गोवा नोव्हेंबर इफी- इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ५० भारत मीना कर्णिक पॅरासाईट : क्रूर आणि प्रामाणिक इफ्फी २०१९ mother memories of murder Barking dongs never bite snowpiercer The Host Netflix Palme d'Or Cannes Film Festival Bong Joon Ho South Korea cinema Goa novmber International Festival of India Meena Karnik Parasite 2019 #IFFI weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके