डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

परावलंबित्व मान्य नसलेली मम्मा

वसईत माझ्याकडे राहणे, हा एक पर्याय होता. पण कुणाकडेही जाऊन राहणे  म्हणजे परावलंबित्व. त्यामुळे हा पर्याय तिला सपशेल नामंजूर होता. त्यात वसईत आम्ही दोघी बहिणी राहत असलो, तरी तिला वसईला स्वत:चं घर मानणं जड होतं. शेवटी अंधेरीतच पर्यायी घर निवडलं. पण आपलं राहतं घर सोडणं तिच्यासाठी क्लेशकारक होतं. गेल्या 50 वर्षांच्या आठवणी त्या घराशी जुळल्या होत्या. लग्न, फार कमी काळासाठी बाबांचा मिळालेला सहवास व आयुष्यात आलेले अनेक भले-बुरे प्रसंग या सगळ्यात त्या टीचभर चाळीवजा घराने तिला खूप साथ दिली. त्या घरात सुरुवातीला तिच्या नणंद, दिरांसमवेत ती राहिली.

कालच्या शोकसभेत हमीद (दाभोलकर) सांगत होता, ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्काराच्या वेळी आपल्या भाषणात भाभी म्हणाल्या, ‘‘मी सेंच्युरी पूर्ण करणार आहे. आणि मी विचारात पडलो की, या वयात भाभींना जर एवढी उमेद आहे, तर आम्ही नाउमेद न होता काम करत राहिलं पाहिजे...’’

केवळ हमीदच नव्हे तर अन्वरभाई, सय्यदभाई, रझिया या प्रत्येकानेच मम्माने 100 वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्या शोकसभेत सांगितले. हे ती अनेकदा माझ्याकडे, माझ्यासमोर इतरांशी बोलायची. दोनेक वर्षांपूर्वी असं म्हणताना ती खूप आश्वासक वाटे. मात्र महिन्यापूर्वी तिच्या धाकट्या भावाला- अफजल मामूला पंधराएक वर्षांनी मी व मम्मा दुबईत भेटायला गेलो, तेव्हा तिच्याशी गप्पा मारता-मारता तो भावुक होऊन म्हणाला, ‘‘आपा, अब जल्दी मिलते रहेंगे. क्या पता अब हम रहे ना रहे...!’’ या भेटीत ती तशी अबोल होती. त्याचं ऐकत होती. हल्ली तोंडातल्या कवळीमुळे शब्द स्पष्ट उच्चारले जात नसत. मामूशी बोलताना तिचा प्रतिसाद कष्टाने, अस्पष्टपणे, सावकाश व्यक्त होताना जाणवत होता. त्याच्या तशा बोलण्यानंतर ती गंभीरपणे म्हणाली, ‘‘तू ऐसा क्यूं कहता है? मै तो सौ साल जीनेवाली हूं। अरे, अपनी नानी सौ साल से जादा जी। माँजी, बाबाजान सभीको लंबी उमर रही। तू क्यूं ऐसा सोच रहा है?’’

हा तिचा निश्चय, आशावाद, इच्छाशक्ती- जे काही म्हणा-त्याचं मला कायम कुतूहल वाटलंय. माझ्या पन्नाशीत आताशा मला प्रत्येक दिवस ‘बोनस’ वाटतो. आत्तापर्यंत मरणाचा पुसटसाही विचार मनात येत नसे, आता येतो. अर्थपूर्ण आयुष्य घालवण्याच्या काही कल्पना मनात येतात. त्यासाठी कमी दिवस आहेत असंही वाटतंय; पण म्हणून 100 वर्षे जगावं किंवा हातात काही वर्षं असावीत, असं काही वाटत नाही. आयुष्य ज्या पद्धतीनं व्यतीत केलं, त्याबाबत खंतही वाटत नाही. ‘खूप जगायला मिळावं’ असं म्हणणारे वयस्कर लोक माझ्या अवतीभोवती नाहीत. पण मम्माला जीवन जगण्याची इतकी इच्छा का बरं असावी? ती असमाधानी होती का? काही करायचं राहून गेलंय, असं तिला वाटत होतं का? की मनुष्यप्राणी 100 वर्षे जगतो, आपल्या पूर्वजांनी ती 100 वर्षे पाहिली आहेत; त्यामुळे आपणही पाहणारच- असं काही या म्हणण्यामागचं लॉजिक होतं? का ती मरणाला घाबरली होती? बाबांचं मरण तिनं खूप जवळून पाहिलं होतं. तिने बोलून दाखवलेली खंत एकच- आपल्यानंतर हमीद दलवार्इंचं काम कोण करणार? संस्था चालेल का?

मम्मा हे केवळ वारंवार म्हणत नसे, तर स्वत:च्या आरोग्याविषयी तितकीच जागरूक होती. डायबेटिस होता, परंतु डॉक्टरने प्रमाणात सर्व काही खाण्याची परवानगी दिल्याचा आनंद तिला अधिक होता. दर दोन तासांनी खाई. डायबेटिस आटोक्यात असे. यामुळे ही आणखी जगणार, अशी आम्हा कुटुंबीयांची खात्री होती.

गेली दोन वर्षे माझ्या कामाचा व्याप वाढला होता. नोकरी सोडून ‘क्वेस्ट’ ही सामाजिक-शैक्षणिक संस्था जॉईन करायचे ठरवले होते. त्याची पूर्वतयारी सुरू होती. याच काळात मम्माचे अंधेरीचे घर रिडेव्हलपमेंटसाठी गेले आणि तिला पर्यायी जागा शोधणे भाग पडले. वसईत माझ्याकडे राहणे, हा एक पर्याय होता. पण कुणाकडेही जाऊन राहणे म्हणजे परावलंबित्व. त्यामुळे हा पर्याय तिला सपशेल नामंजूर होता. त्यात वसईत आम्ही दोघी बहिणी राहत असलो, तरी वसईला स्वत:चं घर मानणं तिला जड होतं. शेवटी अंधेरीतच पर्यायी घर निवडलं. पण आपलं राहतं घर सोडणं तिच्यासाठी क्लेशकारक होतं. गेल्या 50 वर्षांच्या आठवणी त्या घराशी जुळल्या होत्या. लग्न, फार कमी काळासाठी बाबांचा मिळालेला सहवास व आयुष्यात आलेले अनेक भले-बुरे प्रसंग- या सगळ्यात त्या टीचभर चाळीवजा घराने तिला खूप साथ दिली. त्या घरात सुरुवातीला तिच्या नणंद, दिरांसमवेत ती राहिली. त्यावेळी 5000 रुपयांचे ते घर विकत घेण्यासाठी तिने कर्ज काढलं होतं. त्या घरातून निघण्यापूर्वी आम्ही त्या घरात तिचं ‘फोटो शूट’ केलं. त्या वसाहतीतील जवळजवळ सर्व बिऱ्हाडं तिथून हलेपर्यंत, सर्व इमारती पाडायला सुरुवात करेपर्यंत ती तिथं होती. नवं घर तिच्यासाठी बरंच प्रशस्त होतं. हे घर मोठं असल्याचा इतरांकडे आनंदाने उल्लेख करी. पण हळूहळू तिला एकाकी वाटू लागले.

त्याच काळात एकदा पायाची बोटं फ्रॅक्चर झाली, त्यात दोन-तीन महिने गेले. त्यानंतर ॲपेंडिक्स झाला. पुण्यात हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. मग तिला माणसांची गरज भासू लागली. बाबांच्या आजारपणात हॉस्पिटल, तेथील वातावरण व त्यात बाबांचा मृत्यू खूप जवळून अनुभवला असल्याने ती कोणालाही हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे टाळायची. तिला स्वत:ला भरती व्हावे लागल्यावर मात्र तिने धसका घेतला. अंधेरीला तिने एकटे राहणे धोक्याचे होते. तिलाही हे कळत होते. शेवटी एकदा तिच्या नातीने (रुबिनाची मुलगी- राणी) तिला निक्षून सांगितले, ‘‘तू वसईत राहिलीस तरच आम्हाला तुझ्याकडे लक्ष देता येईल.’’ मग नाईलाजाने ती वसईत राहायला तयार झाली. पण स्वतंत्र फ्लॅट हवा, अशी अट होतीच. मम्माला स्वत:ची स्पेस प्रिय. अनेक वर्षे एकटी राहत असल्याने खूप वेळा माणसं तिला नको असत. राणीने तिच्यासाठी फ्लॅट बघितला, ती येण्यापूर्वी त्यात योग्य त्या सोई केल्या आणि मम्मा वसईत राहायला आली. हेही घर पाहून खूष झाली. राणी जेवण आणत असे, नंतर तीही अधूनमधून जेवण तयार करे. संध्याकाळी हॉलमधील खिडकीजवळ बसे. मी शनिवार-रविवार तिच्या आवडीचे मासे करून नेत असे. ती आनंदी दिसू लागली होती. अधूनमधून पुण्यात, गावी (मिरजोळी) जाऊन येत होती. स्वत:चे बँकेचे व्यवहार स्वत: करत होती. सर्वत्र एकटी ट्रेनने फिरे. एकटी जाऊ नको, जायचंच असेल तर उबेर टॅक्सीने जा म्हटलं की म्हणे, ‘‘काय गरज आहे? मी जाऊ शकते, लोकही खूप मदत करतात.’’ हल्ली फार काळ उभी राहू शकत नव्हती. पाठ भरून येई. ओट्यापाशी स्वयंपाकासाठी उभे राहावे लागले की, तिची चिडचिड होई.

यातच तिच्या नातवाने- रुबिनाचा मुलगा ‘अद्वैत’ने बोरिवलीस राहायला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा वसईतला फ्लॅट तळमजल्यावरचा. त्याच्या वसाहतीतील लोक मम्माला ओळखणारी. समोरची गुजराती भाभी अद्वैतकडे दिवसातून अनेक वेळा चक्कर मारी. ती मम्माला ओळखत होती. तिने मम्माला जेवण करून देण्याचे कबूल केले. अशात राणीलाही मुंबईत नोकरी लागली. मम्मा त्या घरात शिफ्ट झाल्यास ती जाता-येता डोकावू शकणार होती. त्यामुळे मम्माने त्या घरात शिफ्ट व्हावे, असा आग्रह आम्ही केला. घाईत काही सोई करून घेण्याआधी गेल्यामुळे गेल्या गेल्या पाण्याची टाकी भरून वाहिली आणि पहिल्याच दिवशी सकाळी बेडरूममध्ये पाणी भरले. आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाणी काढले. मम्मा फार ओशाळली. त्यानंतर उंदरांचाही उपद्रव झाला. मग मात्र ‘आपण या घरात उगीच आलो’ या भावनेने तिला पक्के घेरले. सुरुवातीला एखादी समस्या आली म्हणजे कायमच तशा समस्यांना तोंड द्यावे लागते असे नाही. इथे लोक येता-जाता हाक मारतात, गुजराती भाभी दहा वेळा चौकशी करते. माणसं हवी ती मिळालीत, हे महत्त्वाचं- असं मी कितीही समजावलं तरी ‘या घरात, वसईत आता मला राहावंसं वाटत नाही’ असं ती म्हणू लागली. अलीकडचे काही दिवस तिच्याकडे निघाले की, माझ्या पोटात गोळा येई. हॉलमध्ये खुर्चीत एकटी भकासपणे गप्प-उदास   बसलेली मम्मा... मी भेटल्यावर काही तरी नाराजी व्यक्त करणार. जाताना मी स्वत:च्या मनाची तयारी करे. स्वत:ला बजावून सांगे- शांतपणे ऐकून घ्यायचं, तिला निघण्यापूर्वी हसवायचं. यात कधी कधी मी यशस्वी होई. आताशा गुजराती भाभी देत असलेलं जेवण हा नाराजीचा विषय होता. बोंबलाची चटणी, भाकरी, मेथीची भाजी, मटण, चायनीज या तिच्या आवडी. उसळी, ढोकळा खाणं तिला काही जमेना. वारंवार सांगूनही गुजराती भाभी जेवणात बदल करेना. मी हे पदार्थ नेले तरी ती थोडंसं खाई. खूप जेवण पाहूनच तिला नकोसं वाटे. हल्ली जास्त गप्प झाली होती.

अशात तिच्या भावाने पंधरा वर्षांनंतर तिला भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. तो कराची व कॅनडाचा नागरिक आहे. त्याला भारतात येणे शक्य नाही, म्हणून दुबई निवडले. मम्मा भावाला भेटून खूप आनंदली. पोटभर गप्पा मारल्या. तो तिला खूप वर्षांनी पाहत होता. बारीक झालेली, जाणवेल अशी खांद्यात वाकलेली. आपली आपा अशी पाहून व्याकूळ झाला. ‘मेरी आपा बूढी हुई रे’ असं वारंवार म्हणत होता. आता खूप वर्षे घालवायची नाहीत; पुढील वर्षी कराचीत किंवा दुबईत डिसेंबर-जानेवारीत भेटायचे, असं ठरवून दोघं आपापल्या देशात परतले. येताना मी तिला म्हटलं, ‘‘आता रोज संध्याकाळी बाहेर दोन-चार फेऱ्या मार. इथे जशी चाललीस तशी तिथेही थोडीफार हालचाल केलीस की, बरं वाटेल. तुला घरात कंटाळा आला की, आपण तू म्हणशील तिथे फिरून येऊ म्हणजे तुला बरं वाटेल.’’ तिनेही लगेच मान्य केलं. त्यानंतर चार दिवसांत मी दिल्लीला जाणार होते. तीही पुण्यात, मग चिपळूणला नजमाकडे राहून परतणार होती. ती पुण्याला गेली आणि मी दिल्लीत अनेक वर्षांनी समीनाला (हुसेन व शमा दलवाई यांची मुलगी) भेटले. गप्पा मारता-मारता मी तिला म्हटलं, ‘‘आता माझ्या कामाव्यतिरिक्त दोन प्रायॉरिटीज आहेत. मम्माला वेळ देणं आणि माझ्या मुलाला मानवला देणं. आता वेळ दिला नाही, तर मला ते खूप खाईल!’’ दिल्लीहून परत यायची तयारी करीत होते, तर बातमी आली, मम्मा गेली.

मम्माला 15 वर्षांनी तिच्या भावाला भेटायला दुबईत घेऊन गेले आणि तिच्या अलीकडच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणात तिला साथ दिली, हीच काय ती माझा ‘गिल्ट’ कमी करणारी समाधानाची बाब!

Tags: मेहरुन्निसा दलवाई हमीद दाभोलकर हमीद दलवाई रुबिना दलवाई ईला कांबळी ila dalwai hamid dalwai Rubina dalwai Hamid Dabholkar Ela Kambali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके