Diwali_4 नवप्रयोगशील संगीतकार : रवींद्र गरुड
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

नवप्रयोगशील संगीतकार : रवींद्र गरुड

रवींद्र गरुड हे नाशिक शहरात स्थायिक झाल्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, शांताबाई दाणी या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसोबत होते. लोकशाहीर वामनदादा कर्डकांसोबतही ते 35 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत होते. वामनदादा म्हणत, ‘‘रवीच्या संगीताशिवाय माझं गाणं जिवंत वाटत नाही आणि लोकांच्या मनात सळसळत पोहोचत नाही.’’ वामनदादा आणि रवींद्र गरुड हे दीर्घ काळ एकत्र राहिलेले कलंदर कलावंत, कार्यकर्ता आणि मित्र होते.

संगीतकार रवींद्र गरुड आज आपल्यात नाहीत. दि. 24 सप्टेंबर, 2014 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते 69 वर्षांचे होते. आंबेडकरोत्तर कालखंडात गतिमान असलेल्या आंबेडकरी जलशांच्या पथकातील ते उत्कृष्ट वादक, संगीतकार आणि कार्यकर्ते होते.

रवींद्र गरुड हे मूळचे निंबोळा, ता. सटाणा, जि. नाशिक येथील. त्यांचा जन्म रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) चा. त्यांचे वडील रामचंद्र तानाजी गरुड हे मूळ गाव सोडून रावळगाव येथील साखर कारखान्यात नोकरीकरता स्थायिक झाले. रवींद्र हे सहा भावंडांपैकी पाचवे. त्यांचे मोठे बंधू वामनदादा गरुड हे जलसाकार होते. मनमाडला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सभेत जलसा सुरू होता. वामनदादा हे ढोलकीवादक होते. ढोलकी वाजवत असताना ते लोकांना दिसत नव्हते. बाबासाहेबांच्या हे लक्षात आले. त्यांनी वामनदादांना टेबलवर उभे केले. त्यांची कला पाहून बाबासाहेब खूष झाले. याच ज्येष्ठ बंधू वामनदादांकडून रवींद्र गरुड यांना जलसा व ढोलकीचे पहिले धडे मिळाले. पुढे वामनरावांनी स्वतःचे लोकनाट्य कलापथक स्थापन केले आणि रवींद्र गरुड वयाच्या बाराव्या वर्षापासून जलसा पथकात ढोलकीवादन करू लागले. त्यांचे शिक्षणही जेमतेम चौथीपर्यंतच झाले. पुढे विवाहानंतर ते रावळगाव साखर कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करू लागले.

नोकरी आणि संगीत असे द्वंद्व सुरू झाले. पुढे ही नोकरी सोडून ते मुंबईच्या सिनेसृष्टीत दाखल झाले. ते आर.के.स्टुडिओत 1967 च्या सुमारास स्पॉटबॉय म्हणून काम करू लागले. त्यांचे मूळ नाव ‘‘रेवजी- असे होते. एकदा दारासिंग त्यांना म्हणाले, ‘रेवजी क्या नाम है? लडकीका नाम लगता है. आजसे तुम्हारा नाम रवींद्रकुमार होगा.’’ आणि पुढे हेच नाव त्यांनी धारण केले. मुंबई-ठाण्याच्या वास्तव्यात ते आनंदनगर झोपडपट्टीत राहत. तिथे त्यांची लाल बावटा कलापथकाशी संबंध आले आणि शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, शाहीर गवाणकर यांच्याशी जवळीक निर्माण झाली. या दिग्गजांना वादनाची साथही ते करू लागले.

त्यापूर्वी 1964 मध्ये गाजलेल्या भूमिहीनांच्या आंदोलनात ते सहभागी झाले. दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या क्रांतिकारी आंदोलनाची वैचारिक भूमिका लोकसंगीताच्या माध्यमातून जनतेत घेऊन जाताना अनेक लहान-थोर कलावंत सहभागी झाले. त्यात रवींद्र गरुड यांची ढोलकी आणि हलगी लोकांची गर्दी वाढविण्यास कारणीभूत ठरली. हिंदी चित्रपटसृष्टीत थेट प्रवेश मिळणे हे त्यांच्यासारख्या खालच्या जातीतील आणि अल्पशिक्षित कलावंताला अधिक दुरापास्त होते.

या काळात हिंदी सिनेमात मोजकेच ढोलकीवादक होते. रवींद्र गरुड यांनी आपल्या ढोलकी आणि हलगी वादनावर हिंदी सिनेमातील मनोरंजक वापरापेक्षा जलशासारख्या अवकाशात अधिक सर्जनशीलतेने मेहनत घेतली. त्यांच्या मोठ्या बंधूंनी त्यांना पुन्हा आंबेडकरी जलशात नेले. आंबेडकरी जलशांचा नाशिक जिल्ह्यातील इतिहास तसा अभूतपूर्व आहे. भीमराव कर्डक (कसबे सुकेणे), देवधर डांगळे (करंजगाव), गोविंद मोरे, संभाजी गवारे, वामनदादा गरुड (निंबोळे), वामनदादा कर्डक (देशवंडी) या कलावंतांनी आंबेडकरी जलसा समृद्ध केला. याच समृद्ध वारशातले पंडितराव विधाते आणि रवींद्र गरुड हे दोन मोठे ढोलकीपटू नाशिकने महाराष्ट्राला दिले.

मराठी संस्कृतीच्या चर्चा मारणाऱ्यांना हे माहीत नाही की- लोकसंगीतात मराठी बाजाचे ठेके, ताल, लय एका अर्थाने ढोलकीपटूंच्या परंपरेने विकसित केले. हिंदी सिनेमात उत्तरेकडील हिंदी, पंजाबी ठेके-ताल यांचे प्राबल्य राहिले आहे. मुंबईत हिंदी सिनेमाचे केंद्र असूनही हिंदी चित्रपटसंगीतावर मराठी ठेक्यांचा प्रभाव कमी राहिला. हिंदी चित्रपटगीतांत तुकड्यांनी त्यांचा वापर झाला. 70-80 च्या दशकात हिंदी-मराठी चित्रपट संगीतातील वाद्यवृंदात रवींद्र गरुडही ढोलकीवादन करीत. अनेक मराठी नामांकित संगीतदिग्दर्शकांसोबत त्यांनी वादनाची साथ केली. अर्थात, अशा वादकांचा ना कोठे नामोल्लेख होतो, ना त्यांना गौरव प्राप्त होतो. गीतकार, संगीतकार आणि त्यांच्या तालाबरहुकूम चालणाऱ्या पार्श्वगायकांनाच काय ते नाव मिळते.

जातिव्यवस्थेमुळे दलित कलावंतांच्या वाट्याला उपेक्षा येते. जाती-आधारित कला-संगीतक्षेत्राला अभिजन कलेपेक्षा निम्न दर्जा दिला जातो. ढोलकी हे एका अर्थाने दलित कलावंतांचे वाद्य म्हणून त्याचा दर्जाही निम्न आणि तबल्याला अधिक प्रतिष्ठा. असे किती तरी विषमतापूरक, शोषणमूलक भेद कला संगीतक्षेत्रात आकाराला आलेले दिसतात. रसिकतेला, मुक्त कला आणि कलावंत - विकसनाला जातिव्यवस्था विधायक अवकाश देत नाही.

शास्त्रीय संगीत शिकण्याची व त्यात प्रयोग करण्याची संधीच दलित जातीय व आर्थिक स्तरात तळाशी असलेल्या  समाजघटकांतील कलावंताला प्राप्त होऊ देत नाही. उलट, जातिपरंपरेने त्यांच्यात प्रचलित असलेल्या लोकसंगीताला निम्नस्तरीय अभिरुचीचे ठरविले जाते. शास्त्रीय अभिजन वर्गाचे ब्राह्मणी अभिव्यक्ती व्यक्त करणारे संगीत मात्र उच्च मानले जाते.

रवींद्र गरुड यांच्यासारख्या श्रेष्ठ ढोलकीपटूला जात, गरिबी आणि अल्प शिक्षण हे अडथळे होते. एका अर्थाने ते स्वशिक्षित संगीतकार होते. शास्त्रीय संगीतापेक्षा त्यांची ओढ लोकसंगीताकडेच राहिली. सातत्याने तीस-चाळीस वर्षे नवनवीन ठेके, ताल, लय, सुरावटींनी लोकसंगीत समृद्ध करण्यासाठी त्यांनी होणाऱ्या उपेक्षेला बेदखल करीत कष्टसाध्य प्रवास केला. रवींद्र गरुड यांचे वादननैपुण्य एक- दोन वाद्यांपुरतेच नव्हते. ते ढोलकी, तबला, ढोलक, मृदंग, घुमट, डफ, डमरू, रणहलगी, ताशा, ढोल, टिमकी, संबळ अशी किती तरी भारतीय चर्मवाद्ये वाजवीत. याशिवाय पाश्चात्त्य ड्रम, झांजा, कोंगो इत्यादी वाद्यांमध्येही त्यांनी प्रावीण्य कमावले होते.

उत्तर महाराष्ट्रात संबळ नावाचे वाद्य लोकसंगीतात प्रचलित आहे. कुस्ती, बोहडा, लग्न, गावजत्रा आदी प्रसंगी संबळ वाजविली जाते. रवींद्र गरुडांनी लहान वयातच संबळवादनात नैपुण्य मिळविले होते. खानदेशातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत रवींद्र गरुडांची संबळ ऐकायला गावागावांतून लोक जमा होत. ते डावखुरे असल्याने उजव्या हाताने वादन करणाऱ्या वादकाप्रमाणेच आणि डावखुऱ्या पद्धतीने अभिनवशैलीने अनेकविध ढंगांत संबळ वाजवीत. चाटी ही ‘मादी समेळ’ बोलाची, तर डग्गा हा ‘नर समेळ’ बोलाचा. तथापि, या दोहोंतील परस्परसंमिश्रणात ते अनेक प्रयोग करून कर्णमधुर ताल बांधीत. असेच प्रयोग ते अन्य वाद्यांबाबतही करीत.

नाशिकच्या एका शाहिरी कार्यक्रमात लोकशाहीर निवृत्ती पवार यांनी महाराष्ट्रभर विलक्षण लोकप्रिय झालेले ‘काठी न्‌ घोंगडं घेऊ द्या की रं...’ हे गाणं त्यांच्या पहाडी आवाजात गायले. साथीला रवींद्र गरुड होते. गरुडांनी पूर्वीच्या ध्वनिमुद्रित गाण्यापेक्षा वेगळे ठेके वाजविले. ढोलकी, ढोलक, डफ, हलगी, संबळ, टिमकी अशा वाद्यांचा मेळ उभा केला. त्यामुळे रसिकांच्या प्रतिसादाने नाशिकचे कालिदास कलामंदिर दणाणून गेले. शाहीर निवृत्ती पवार प्रभावित झाले आणि म्हणाले, ‘‘हे गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा तुम्ही कोठे होतात? आता हे गाणं तुमच्या संगीतसंयोजनात पुन्हा रेकॉर्ड करावं, असं वाटतंय!’’ असे नवोन्मेषशाली प्रयोग करण्याचा रवींद्र गरुड यांचा हातखंडाच होता.

रवींद्र गरुड हे नाशिक शहरात स्थायिक झाल्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, शांताबाई दाणी या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसोबत होते. लोकशाहीर वामनदादा कर्डकांसोबतही ते 35 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत होते. वामनदादा म्हणत, ‘‘रवीच्या संगीताशिवाय माझं गाणं जिवंत वाटत नाही आणि लोकांच्या मनात सळसळत पोहोचत नाही.’’

 वामनदादा आणि रवींद्र गरुड हे दीर्घ काळ एकत्र राहिलेले कलंदर कलावंत, कार्यकर्ता आणि मित्र होते. वामनदादांच्या मृत्यूनंतर त्यांनी ढोलकीला स्पर्श करणे सोडून दिले. नाशिक विधानसभा मतदारसंघात वामनदादा कर्डक हे रिपाइंचे उमेदवार म्हणून 1985 मध्ये निवडणूक लढवत होते. त्यांच्या प्रचाराची धुरा रवींद्र गरुडांनीच सांभाळली. वामनदादा पराभूत झाले, पण त्यांची प्रचारमोहीम कर्कश राजकीय भाषणबाजीऐवजी श्रवणीय सांगीतिक मोहीम झाली. वस्त्यावस्त्यांत त्यांच्या प्रचार अभियानाला गर्दी होत असे.

सन 1970-80 च्या दशकात आंबेडकरी चळवळ गतिमान होती. या काळात भारतीय बौद्ध अकादमीची स्थापना झाली. वामनदादा या अकादमीचे मोठे मेळावे आयोजित करीत. या मेळाव्यांच्या संयोजनात रवींद्रजींचा मोठा वाटा असे. कलावंतांचा शोध घेऊन त्याचे संघटन करणे, त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या हेतूने ते काम करीत. या उपेक्षित, गरीब कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका राहिली. गरिबीमुळे रोजगाराच्या अभावात नैराश्य आलेले शेकडो कलावंत व्यसनाधीन झाले. आंबेडकरी व डावी चळवळ पृथक्‌पणे आवर्तात सापडल्यानंतर हे कलावंत पथभ्रष्ट झाले. वैचारिक दिशाहीनता, असंघटितपणा, कौटुंबिक ओढाताण व बेकारीमुळे अनेकांचे अकाली मृत्यू होऊन शोकान्त झाला. या भीषण वास्तवाची त्यांनी समाजाला सतत जाणीव करून दिली.

गेल्या 10-15 वर्षांत बाजारचलीत कलेचा, संगीताचा विस्तार वेगाने वाढत गेला. डाव्या, आंबेडकरी शक्तींचेही दुर्बलीकरण मोठ्या प्रमाणात झाले. जलसे, तमाशे, लोकनाट्य मेळे, समाजपरिवर्तक सांस्कृतिक उपक्रम संपुष्टात आले आहेत. अशा काळात त्यांचा मृत्यू झाला. समाजपरिवर्तक चळवळींना कलात्मक माध्यमातून बळ देणाऱ्या, जनप्रबोधन व मनोरंजनाची सांगड घालून नाट्यसंगीत कलेची निष्ठेने जोपासना करणाऱ्या संगीतकाराची त्याच्या हयातीत आणि नंतरही उपेक्षाच झाली.

अशा कलावंत कार्यकर्त्याच्या जीवनकार्य संचिताचा इतिहास लोकनाट्य-संगीतकलेच्या इतिहासाबरोबरच  डाव्या आंबेडकरी चळवळीच्या सांस्कृतिक अभियानाच्या इतिहासाची साक्ष देतो. पुढील नवउभारणीसाठी असा इतिहास प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत असतो. आंबेडकरी चळवळीने वेगवेगळे सांस्कृतिक पर्याय उभे करण्याचा अथक प्रयत्न केला. पारंपरिक लोककलासंगीतातील जाती-स्त्रीशोषण दमनाचे आशय-रूपबंध नाकारले गेले. लोककला-लोकसंगीतात समाजपरिवर्तक आंबेडकरी विचारधारेचा आशय रचला जाऊ लागला. आंबेडकरी जलसाकारांनी गीताच्या रचनेबरोबरच त्यातील गेयता, चाली, लय अधिक समृद्ध करण्यासाठी योगदान दिले. या गीतांच्या चाली, त्यातील वेगवेगळ्या वाद्यांचे ताल-ठेके- लयी यांची प्रगीतिसांगितीक सृष्टी रचण्याचे व विकसित करण्याचे काम यातील कलावंत, वादक, संगीतकारांनी केले. रवींद्र गरुडांनी अशा सांगीतिक प्रतिसृष्टीच्या उभारणीसाठी आजीवन योगदान दिले.

महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक एक महान ढोलकीपटू म्हणून राहिला. या ढोलकीची ओळख लोकसंगीतातील लावणीसंगीतापुरती एकवटलेली होती. तथापि, लावणीसंगीताचा, संगीतबारी व ‘उभ्या लावणी बाजा’च्या विकासाचा विचार त्यातील गीत-नृत्याबरोबरच ढोलकीच्या ठेक्यांना मध्यवर्ती मानूनच केला जाऊ शकतो. रवींद्रजी म्हणत, ‘‘महाराष्ट्रातील लावणीसंगीत प्रामुख्याने महार, मांग या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींतील स्त्री-पुरुष कलावंतांनी जन्माला घातले असून त्याचा विकासही त्यांनीच केला आहे.’’

सन 1970-80 च्या दशकातील लोकप्रिय मराठी चित्रपट हे प्रामुख्याने लावणीनृत्य व ढोलकीचे देहभान हरपविणारे श्रवणीय ठेके यांच्याशिवाय लोकमानसावर ठसा पाडू शकत नव्हते. काही मराठी चित्रपटांतही अनेक नामांकित संगीतदिग्दर्शकांच्या नेतृत्वात रवींद्रजींनी ढोलकी- ढोलकवादन केले. अनेक मराठी चित्रपटगीतांच्या संगीतातील ढोलकीचे पीस त्यांचेच होते. या वादकांच्या संचात ते सामील होते. वादकांच्या संचात अनेक वाद्ये वाजविणारे अनेक लोक असत. त्यांतील काही अत्यंत प्रावीण्य मिळविलेले असत. गीतांच्या संगीतरचनेनुसार त्यातील हार्मोनियम, बासरी, व्हायोलिन याबरोबरच ढोलकी, तबला आदी वादनाचे महत्त्वपूर्ण पीस अत्यंत नैपुण्यप्राप्त वादकच वाजवीत असत.

जुन्या जमान्यातील संगीतरचना आणि त्यांचे रेकॉर्डिंग यांचे तंत्रही जास्त प्रगत नसल्याने त्यातील कलावंतांच्या प्रतिभेला आणि परिश्रमाला कसलीही सीमा नसे. आज संगणकाच्या म्युझिक रेंजमुळे गायक-वादक-संगीतकार यांचे परिश्रम नाममात्र राहिले आहेत. लोकसंगीतातील ढोलकीवादन नैपुण्यामागे रवींद्रजींनी केलेले समर्पित परिश्रम होते. दादू इंदुरीकरांच्या तमाशापासून ते शाहीर प्रतापसिंह परदेशींच्या लोकनाट्य पथकापर्यंत अनेकविध रंगमंचांवर रवींद्रजींची ढोलकी निनादली. विठाबार्इंसारख्या महान नर्तकीने त्यांच्या ढोलकीवर बेभान ताल धरला होता आणि ढोलकीवादक व सुंदर लावणीनर्तकी यांच्यातील मनोरम कलात्मक जुगलबंदीही महाराष्ट्राने पाहिली आहे.

आंबेडकरी जलशांमध्ये जलसाकार जसे प्रयोगशील नवनवीन आशय, सांगीतिक आकृतिबंध शोधणारे होते; तसेच जुन्या भजनी वळणाचे ठेके, तमाशांमधून सरावाने तयार झालेले अनेक ढोलकीचे ठेकेही या जलशांत प्रचलित राहिले होते. रवींद्रजींनी या ठेक्यांमध्ये परिवर्तन आणले. गाण्याचा भाव व अर्थवत्तेनुसार ढोलकी व इतर वाद्यांच्या संयोजनातील ताल, ठेके, लय यांची रचना सर्जकतेने समृद्ध केली. मराठी लोकसंगीतात अंगाई-गीत, लग्नगीत, ओवी, अभंग, पाळणा, पोवाडा, फटका, भारूड, लावणी, गणगवळण, कोळीगीत, भलरी, भेदीक, लळित, वहीगायन, सवाल-जवाब या पारंपरिक प्रकारांबरोबरच सुगम भावगीत, गजल, कव्वाली या सर्व मराठी सांगीतिक संस्कृतीला अनुरूप अनेकविध ठेक्यांतून, ताल-लयींतून त्यांचे वादन नैपुण्य स्पष्ट होते.

गाणे, ठेके, धून आदी गायक, संगीतकाराच्या कलेतून प्रकट होण्यापूर्वी ते गुंतागुंतीच्या सामाजिक-वैयक्तिक निर्मितिप्रक्रियेत आकारात असते. आपल्या अनुभवविश्वाच्या सातत्यशील मनन-चिंतनातून सांगीतिक निर्मिती जन्म घेत असते. ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. कोणत्याही प्रकारचे तथाकथित संगीतशिक्षण न घेणाऱ्या संगीतकाराला त्याच्या सामाजिक-वैयक्तिक अनुभवविश्वातूनच सर्जन करावे लागते. कोणतेही लिखित नोटेशन नाही, सरावासाठी आधारभूत रेकॉर्डिंग नाही- अशा अभावात रवींद्रजींनी संगीताचा रियाज करीत नैपुण्य कमावले.

ब्राह्मणी अभिजनीय संगीतपरंपराही संगीताच्या जीवन-संदर्भापासून, जीवनापासून वेगळे करणारी स्वान्तसुखाय कला मानते. त्यात त्यांना निर्गुण-निराकार ब्रह्मानुभूती संगीतातून प्राप्त होते. लोकसंगीत व आंबेडकरी चळवळीतून घडलेल्या संगीतकारात अशी जाणीव नसते. ते संगीताचे जीवनोपयोगी, जीवनहित आणि समाजपरिवर्तक लौकिक स्वरूप व आशय अधिक महत्त्वाचे मानतात. रवींद्रजींचे ढोलकीपटू म्हणून घडणे, विकसित होणे ही एक  संघर्षशाली, वेदनामयी सामाजिक वैयक्तिक प्रक्रिया आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

आंबेडकरी जलशाला 1960 च्या दशकात उतरती कळा लागली. मोजक्या जलशांबरोबर वादक म्हणून रवींद्र गरुड भ्रमंती करीत राहिले. 1970-80 च्या दशकात जलसे संपुष्टात आल्यानंतर कव्वाल पाटर्या, गायनपाटर्यांचा काळ सुरू झाला. वामनदादा कर्डक यांच्याबरोबर अनेक गायकांच्या गायनपाटर्या लोकप्रिय ठरल्या. प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, लक्ष्मण केदार, श्रावण यशवंते, गोविंद म्हशीलकर, रंजना शिंदे, शांता भोसले तसेच देवराज गरुड यांच्या गायनपाटर्यांत रवींद्र गरुड यांनी संगीतसंयोजन केले. उर्दू कव्वाल रंगनाथ जाधव, अजीज नाजा, उर्दू गायिका शकिला अख्तर, गुजराती गायिका मीनाक्षी दरबार यांच्या कव्वालीला ढोलक, ढोलकी, तबला यांचा वाद्यमेळ दिला.

या काळात कष्टकरी वर्गाच्या वस्त्यांत, झोपडपट्‌ट्यांमध्ये या कव्वाल पाटर्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगत. बॅन्जो, ढोलक-ढोलकी यांचे संगीत सर्वत्र सुपरिचित ठरले होते. आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा या दिवशी दलित वस्त्यांमध्ये गायनपार्टी, कव्वाल पार्टी यांचे कार्यक्रम होत. आंबेडकर जयंतीच्या पंधरवड्यात , डॉ.आंबेडकर निर्वाणदिन व बौद्धपौर्णिमेचा सप्ताह या कालावधीत या स्वरुपाचे सांस्कृतिक कार्यक्रम 1970 ते 1990 पर्यंतच्या कालखंडात गतिशील राहिले. या काळात टीव्ही घराघरात आलेला नव्हता.

रवींद्र गरुडांचे ज्येष्ठ बंधू देवराज गरुड यांच्या शास्त्रीय सुगमगायनाचा विशेष उल्लेख करावा लागेल. ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या काळात त्यांनी गीत-भीमायण व गीत-बुद्धायणाचे अभिनव प्रयोग सुरू केले आणि ते लोकप्रियही ठरले. त्यातील अनेक चाली रवींद्र गरुडांनी बांधल्या होत्या. याबद्दल देवराज म्हणत, ‘‘शास्त्रीय संगीताचे औपचारिक धडे न घेतलेल्या रवीने अनेक चाली शास्त्रीय पद्धतीने कशा बांधल्या याचे कोडे मला उलगडलेले नाही.’’

या दोघा भावांनी 1975 ते 1990 या काळात गीत-भीमायण आणि गीत-बुद्धायणाचे किमान अडीच हजार कार्यक्रम केले. कला-संगीतातील अभिरुची ही सामाजिक स्तरानुसार बदलते, वेगळी ठरते. जातिबंधनांमुळे नवबौद्ध कलावंतांनी समृद्ध केलेली भीमगीते, बुद्धगीते सवर्ण जातीयांना आपलीशी वाटत नाहीत. जातिशोषण व स्त्रीशोषणाने पिडलेल्या निम्नस्तरात ब्राह्मणी पांढरपेशी गाणी कशी अपील होतील? अभिजन नागरी वर्गाला अरुण दाते भावतात तर दलित-बहुजन ग्रामीण जातवर्गात वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, दादा कोंडके यांसारखे कलावंत आवडीने ऐकले जातात.

दलित, मुस्लिम, ओबीसी जातीचे अनेक कलावंत एकत्रितपणे निर्वाहासाठी ब्रासबॅण्ड पथक चालवीत. रवींद्रजीही या पथकांत काम करीत. याशिवाय नामवंत शल्यचिकित्सक डॉ.गोंदकर यांच्या दवाखान्यातही ते वार्डबॉय म्हणून काम करीत. त्यांनी लोकनाट्य कलापथकांच्या ओपन थिएटर चळवळीला 1977 मध्ये सुरुवात केली. त्यांनी शंकर आणि मधुकर जाधव यांच्या सोबत ‘साधना मेळा’ सुरू केला होता. त्यानंतर 1977 मध्ये वैशाली कला केंद्राची स्थापना केली. या कला-केंद्रामार्फत 1977 ते 1985 पर्यंत त्यांनी 1200 हून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

शाहीर पवार, गंगाधर निकम यांच्यासमवेत त्यांनी त्रिमूर्ती लोकनाट्य मंडळाची स्थापना केली. याद्वारे राजकीय व्यंगनाट्ये त्यांनी सादर केली. आणीबाणीच्या परिस्थितीवर ‘बाई नवऱ्याच्या शोधात’, ‘स्वतःचं नाटक, घराला अटक’ अशी लोकनाट्ये त्यांनी सादर केली. या काळात शहरी तरुणांमध्ये अमिताभ बच्चनच्या मारधाडपटांची चलती होती, तर ग्रामीण भागात दादा कोंडकेंच्या सिनेमांची. आणि इकडे ओपन थिएटरमध्ये जिवंत लोकनाट्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत होता. जुन्या तमाशाच्या वगनाट्याचा फॉर्म बदलवून नव्या पद्धतीने सामाजिक विनोदी नाटकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे.

लोकमाध्यमांची जाण असलेल्या या कलावंताने आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन यांसारख्या ठिकाणीही आपले कार्यक्रम सादर केले. उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, जयवंत कुलकर्णी, राम कदम यांच्यासमवेतही कार्यक्रम केले. उपजीविका चालविण्यासाठी कंपाऊंडरची नोकरी ते करीत. त्यातही त्यांनी मोठे कौशल्य मिळविले. वैद्यकीय क्षेत्रात कोणतीही पदवी नसताना लोक त्यांना डॉक्टर, तर संगीतक्षेत्रात मास्तर म्हणत. वैद्यकीय क्षेत्रात गरीब रुग्णांची सेवाही ते करीत. प्रसंगी त्यांची फीसुद्धा भरत. एक्स-रे टेक्निशियन म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचा संघर्षशील इतिहासाचे पर्व निमाले आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Tags: रविंद्र गरुड लोकसंगीत कलाकार लोककला इनायत परदेशी नवप्रयोगशील संगीतकार : रवींद्र गरुड स्मरण Ravindra Garud Folk music Artist Folk art Inayat Pardeshi Navprayogsheel Sangeetkar: Ravindra Garud Smaran weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात