उरुळी कांचनसारख्या संपन्न गावात ही परिस्थिती. जिथं महात्मा गांधींचा आश्रम आहे. मणिभाई देसाईसारखी शक्ती आहे! दुसऱ्या दिवशी उपसरपंच ज्ञानेश्वर कांचन भेटतात. त्यांना लोक माऊली म्हणतात. त्यांना मांगगारुडी वस्तीची अडचण सांगितल्यावर 'विहीर, लाईटची व्यवस्था लवकर होईल हे मी पाहतो.' असं सांगतात. आता पाहू या मांगगारुडी वस्तीवर केव्हा पाणी मिळतं? केव्हा दिवे लागतात?
स्वातंत्र्यदिन.
नेहमीप्रमाणे साजरा.
मुलांच्या निर्जीव घोषणा..
बँडवरची मिरवणूक. सगळे शिस्तीत, शानदार!
स्वातंत्र्यदिनी उरुळी कांचनला गेलो. पुण्यापासून 18 मैलांवरचा गाव. गांधीजींच्या निसर्गोपचार आश्रमामुळे नावाजलेला आहे. कांचन आडनावाचे बरीच. तशा अर्थाने कांचनाचे गाव.
त्या दिवशी संध्याकाळी मांगगारुडी वस्तीवर गेलो. सत्तर एक खोपट टेकड्याला लगटून उभी.
लोक जमेतोवर अंधार झाला. बायकाही आल्या होत्या. सर्व उरळीत दिवे चकाकताना दिसतात. इथे वस्तीवर दिवे नाहीत. त्याबद्दल विचारून पूर्ण व्हायच्या आत उत्तर येतं 'दिवेच काय, पाणी बी नाही' पावसाळ्यामुळं ओढ्याला पाणी भरपूर. त्यावर भागवतात मंडळी पण मग?
'खटपट का नाही करत पाण्यासाठी?'
'सर्व काही केलं, मोर्चा काढला ग्रामपंचायतीवर. इथल्या पाटलानं त्याची विहीर बंद केली. जमीन सोडून जावं आम्ही लोकांनी म्हणून'
'तुम्ही दारूचा धंदा का करता?'
'अशा परिस्थितीत दुसरं काय करायचं सांगा. आम्हाला कळतं, हा धंदा वाईट नामुष्कीचा, नुकसानीचा पण जगायचं कसं? आमची खोपटं, पोरं पहा. आम्हाला झोपडी बांधून एखादी म्हैस नाहीतर गाय घेऊन दिली तर आम्ही आमचे उभे राहू.'
'मजुरी किती मिळते?' 'बायांना अडीच बाप्याला चार.' 'इतकी कमी कशी?' 'कायदा? इथं इथला कायदा असतो.'
थातुरमातुर समजावून आम्ही परत. गावात तपास. 'प्रकरण वर पाठवलय्' 'विहिरीचं काम हुईल हो सुरू' 'छ्य: शेतमजुरांचं रजिस्टर नाही ठेवीत.' असली उत्तरे मिळतात. दलित-शेतमजुरांकरता सरकारच्या योजना समजून देण्याकरता सभा बोलावली.
सभेला कुणीच आलं नाही.
देशाचं दुर्देव!
उरुळी कांचनसारख्या संपन्न गावात ही परिस्थिती. जिथं महात्मा गांधींचा आश्रम आहे. मणिभाई देसाईसारखी शक्ती आहे! दुसऱ्या दिवशी उपसरपंच ज्ञानेश्वर कांचन भेटतात. त्यांना लोक माऊली म्हणतात. त्यांना मांगगारुडी वस्तीची अडचण सांगितल्यावर 'विहीर, लाईटची व्यवस्था लवकर होईल हे मी पाहतो.' असं सांगतात. आता पाहू या मांगगारुडी वस्तीवर केव्हा पाणी मिळतं? केव्हा दिवे लागतात?
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या