डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुण्यातील कलावंतांचे स्फूर्तिदायक क्रांति-प्रदर्शन

देशभक्ती, राष्ट्रीयता व जातीधर्मातीतता जागवणारे हे प्रेरणादायी प्रदर्शन 9 ते 14 ऑगस्ट असे 6 दिवस बालगंधर्व कलादालनात भरणार आहे. शाळाशाळांनी व इतरत्रच्या स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी हे प्रदर्शन आपापल्या गावी नेण्याचे ठरवल्यास आनंदच वाटेल.

क्रांतिकालात जिवंत असणे हे भाग्याचे लक्षण होय. क्रांतिस्पर्शाने ज्यांची जीवने उजळली असे लोक त्याहून अधिक भाग्याचे होत. आणि क्रांतीच्या भडकत्या ज्वालांनी ज्यांच्या अंतरंगातील आग भडकली आणि जे क्रांतीयुद्धात सामील झाले त्यांना तर परमभाग्य लाभले, असेच म्हटले पाहिजे. असे भाग्य लाभलेले स्त्रीपुरुष-विद्यार्थी-विद्यार्थिनी, कामगार, शिक्षक-प्राध्यापक, चित्रकार तसेच विविध क्षेत्रांत काम करणारे लोक साऱ्या देशाप्रमाणे पुणे शहरातही आहेत आणि त्या क्रांतिकालाची दैदीप्यमान स्मृति त्यांच्या मनात अजूनही तरळते आहे.

9 ऑगस्ट 1942 या अभिमंत्रित दिवसाच्या स्मृतिदिनी ‘चले जाव’ स्वातंत्र्ययुद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षास 9 ऑगस्ट 1991 रोजी प्रारंभ होत आहे. या लढाईत सामील झालेल्यांनी विविध कार्यक्रम आखलेले आहेत. पण या स्वातंत्र्ययुद्धाची आठवण पुण्यातील चित्रकारांनी ठेवली आणि त्या संग्रामाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन संघटित केले ही गोष्ट पुणे शहराला निश्चितच ललामभूत आहे.

पुण्यातील चित्रकारांनी आपल्या राष्ट्रीयतेवरील निष्ठेचे आणि देशभक्तीच्या बाण्याचे भान नेहमीच ठेवलेले आहे. 1962 साली प्रगतिशील चित्रकार संघाने ‘आपला हिमालय : आपली कर्तव्ये’ हे देशाभिमान जागृत करणारे प्रदर्शन भरवून चिनी आक्रमणाविरुद्ध जाज्वल्य भावना जागृत केल्या.

पुढे 1965 साली भारत-पाक युद्धाच्या वेळीही ‘गाऊ त्यांना आरती’ हे प्रदर्शन भरवले. 20 दिवसांच्या युद्धकाळातील घटना, रांगोळी व चित्रे या माध्यमांतून साकारली. मुस्लिमद्वेष न भडकवता, पाकसत्तेविरुद्ध जनभावना जागृत करणे ही नाजूक व अवघड कामगिरी या कलावंतांनी पार पाडली. बांगलादेश युद्धाचे सुमारास 16 ऑगस्ट 1971 मध्येही त्यांनी प्रदर्शन भरवले. पुढे काही चित्रकारांनी 1975 च्या 30 जानेवारीला आणीबाणीच्या काळात ‘सत्याग्रही गांधीजी’ हे प्रदर्शन मोठ्या साहसाने भरवले. विख्यात चित्रकार श्री. ज. द. गोंधळेकर यांची दोन चित्रे या प्रदर्शनात होती.

‘चले जाव’ संग्रामाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन संघटित करून चित्रकारांनी हीच परंपरा राखली आहे. प्रदर्शनातील प्रसंगचित्रे, व्यंगचित्रे, आलेख, भित्तिचित्रे हे सारेच त्या काळात सामान्य माणसांनी कसे असामान्य कर्तृत्व गाजवले याचा प्रत्यय देणारे आहे.

प्रदर्शनाचे निमंत्रणपत्रच मुळी पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्याशिवाय उघडता येणार नाही. ही प्रतिभा चित्रकार ल. म. कडू यांची आहे. प्रदर्शनासाठी त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीची ती एक खून आहे. ‘पहिले पाऊल’ आणि काही चित्रे, तसेच कैक छायाचित्रे, योजक शीर्षके, चित्राखाली मजकूर, अशी खूप राबणूक त्यांनी केली आहे. क्रांतिकारकांच्या चित्रांबरोबरच क्रांतिस्थळांचीही छायाचित्रे त्यांनी टिपली आहेत. स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन, शेतकी, इंजिनिअरींग कॉलेज ही विद्यार्थ्यांची शक्ती दाखवणारी स्थळे, तसेच फडफडणारा तिरंगा असलेला येरवड्याचा फीमेल जेल, आगाखान पॅलेस या क्रांतिस्थळांचाही यात समावेश आहे.

चित्रकार ग. ना. जाधव क्रांतिकाळात क्रांतीचे केंद्र असलेल्या किर्लोस्करवाडीस होते. सातारा जिल्ह्यातील अनेक रोमांचकारी घटनांचे ते साक्षीदार आहेत. त्यांच्या अंतरंगात रूतलेल्या घटनांपैकी दोन घटनांची रंगचित्रे प्रदर्शनात आहेत. जी. डी. लाडांच्या विवाहप्रसंगी हजर असलेले भूमिगत नेते, तुफानसेनेचा पहारा हे चित्र प्रत्यक्षच पहावयास हवे. नागनाथ नायकवडींच्या आई घोड्यावर बसून भूमिगतांना भाकऱ्या व क्रांतिसंदेश कसा पोचवीत ते चित्रही प्रभावी आहे. गोवा सत्याग्रहावरील चित्रातील लोहियांचा आवेश व साहस थरारक आहे.

चित्रकार भैय्यासाहेब ओंकार 1942 मध्ये 8/9 वर्षांचे असावेत. शिवाजीनगर गावठाणात राहात. त्यांच्या बालमनावर पुण्यातील पहिला हुतात्मा सेवा दल सैनिक नारायण दाभाडे याचे वीरमरण ठसलेले आहे. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी राधाबाई आपटे व आपटेगुरुजी यांचाही प्रभाव त्यांच्यावर होता व आहे. त्यांनी 8 ऑगस्ट ठरावावर भाषण करणारे गांधीजी व सहकाऱ्यांना नकाशावर क्रांतियोजना समजावून देणारे सुभाषबाबू रेखाटले आहेत.

चित्रकार चंद्रशेखर जोशी यांनी सत्तास्थळांवर, ताबा मिळवण्यासाठी निघालेल्या मोर्चाचे व हुतात्मा बनलेल्या एका तरुणीचे चित्रण केले आहे. चित्रकार रांदेरिया यांनी युयुत्सु पठाण स्त्रीपुरुष रंगवले आहेत. घाबरलेल्या ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी रंगवणारे चित्र दत्ता महाबळेश्वरकर यांनी काढले आहे. शिवाय अज्ञान क्रांतिवीरांची व्यक्तिचित्रेही आवर्जून काढली आहेत. वसंत सहस्रबुद्धे, प्रताप मुळीक, राजश्री देशपांडे, मालती आपटे, मुकुंद केळकर, वगैरे अनेक चित्रकारांनी अमूल्य वेळ खर्चून व झीज सोसून चित्रे दिली आहेत.

अभिनव कला विद्यालय, पाषाण व पुणे येथील मुरलीधर नांगरे व दिनकर थोपटे आणि त्यांचे सहकारी यांची चित्रे प्रदर्शनाचा रंग वाढवणारी आहेत.

या प्रदर्शनाचा संकल्प 23 जानेवारी 1991 या सुभाष जयंतीच्या दिवशी बैठक घेऊन चित्रकारांनी जाहीर केला. नंतरच्या बैठकीत ‘चले जाव’ चळवळीतील ठळक प्रसंगांची सूची श्रीपाद केळकर यांनी चित्रकारांच्या हाती दिली. आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे विषय निवडून सर्वांनी चित्रे तयार केली.

देशभक्ती, राष्ट्रीयता व जातीधर्मातीतता जागवणारे हे प्रेरणादायी प्रदर्शन 9 ते 14 ऑगस्ट असे 6 दिवस बालगंधर्व कलादालनात भरणार आहे. शाळाशाळांनी व इतरत्रच्या स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी हे प्रदर्शन आपापल्या गावी नेण्याचे ठरवल्यास आनंदच वाटेल.

या संबंधीचा पत्रव्यवहार द्वारा ‘साधना’ करावा.

Tags: दत्ता महाबळेश्वरकर मुकुंद केळकर मालती आपटे राजश्री देशपांडे प्रताप मुळीक वसंत सहस्रबुद्धे ग. ना. जाधव भैय्यासाहेब ओंकार श्रीपदा केळकर चंद्रशेखर जोशी चित्रकला स्वातंत्र्यप्रेमी विद्यार्थी भित्तिचित्रे आलेख व्यंगचित्रे प्रसंगचित्रे चले जाव चळवळ महाविद्यालये शाळा क्रांतियुद्ध इंदुमति केळकर Datta Mahabaleshwarkar Mukund Kelkar Malati Apte Rajshri Deshpande Pratap Mulik Vasant Sahasrabuddhe c. No. Jadhav Bhaiyasaheb Omkar Shripada Kelkar Chandrasekhar Joshi Painting Freedom Lovers Students Graffiti Graphs Cartoons Events Leave Movement Colleges Schools Revolutionary War Indumati Kelkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके