डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मागे वळून पाहताना... पुढे जाण्यासाठी

मुलाखतीच्या प्रारंभी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले व संगीतबद्ध केलेले, वेध पुणे या संस्थेने सादर केलेले गीत...

मकसद्‌ हेतूविण प्रयास, दिशेविण प्रवास

(O2) ओटूविना तोकूडा, प्रत्येक श्वास ।।धृ।।

कृतीविण मती, भावाविण कृती

स्नेहाविना कोरडा, प्रत्येक ध्यास ।।१।।

बळाविण यत्न, धीराविण बळ

मिठाविना अधुरा, प्रत्येक घास ।।२।।

जळी मग्न मीन, ‘मी न’ म्हणे मन

अवघा रंग एकरूप, कर्म होई खास ।।३।।

नामा, तुका, जनी, हुंकारती मनी

जगण्याच्या सार्थकाची, लागली गे आंस ।।४।।

विवेक सावंत : मित्रहो, आपणा सगळ्यांचं स्वागत. आज पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला खूप महत्त्वाचा दिवस आहे, असं मला मनापासून वाटतंय. त्याला कारणही तसंच आहे- १९९१नंतर जी पिढी जन्माला आली, ती पिढी आत्ताच्या एकंदर वातावरणात सैरभैर होत असताना तिच्या मनात नक्की कुठले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांविषयी हे तीन मान्यवर नक्की काय बरं विचार करताहेत, हे आज कळू शकणार आहे... किंबहुना, तरुणांच्या प्रश्नांची उत्तरं या तिघांशी संवाद साधत-साधतच आपण शोधू पाहणार आहोत... त्यामुळेच हा एक अप्रतिम प्रसंग आहे, असं मी म्हणतोय.

आज आपल्याशी संवाद साधणारे हे तिघेही केवळ रुग्णांचेच नव्हे, तर अख्ख्या समाजाचेच डॉक्टर आहेत.  समाजासाठी समर्पित आहेत. या तिघांनीही त्यांच्या त्यांच्या काळात प्रस्थापित समाजमान्यतांना आव्हान देऊन परिवर्तनाचे मार्ग पुढच्या पिढ्यांसाठी मोकळे करून दिले. या तिघांचंही वैशिष्ट्य असं की, हे तिघंही एक-एकटे नसून त्यांच्या सोबतीला त्यांच्या संस्था आहेत आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या टीम्सदेखील आहेत.

या तिघांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचं अपील आदिवासींपासून ते ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत आणि वंचितांपासून अगदी अमेरिकेत पोहोचलेल्या भारतीयांपर्यंतही आहे. इतकं व्यापक अपील फार कमी व्यक्तींना असतं. तर ऐकू या त्यांच्याचकडून- पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना...

सर्व युवांच्या वतीने पहिला प्रश्न मी तिघांनाही विचारू इच्छितो... आजच्या तरुणांपुढे करिअर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःची आवड, पॅशन यांवर आधारित आणि चांगलं ग्लॅमर आहे, चांगलं पॅकेज आहे, चांगला स्कोप आहे; अशा करिअर निवडीच्या अनेक विचारधारा आज त्यांच्यापुढे उपलब्ध आहेत. पण तुम्ही तुमचं करिअर निवडताना त्या काळी काय विचार केला होता? कोणते निकष तुम्ही वापरले होते?...

डॉ. अभय बंग : नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना एक सांगू इच्छितो की, विवेक सावंत तुम्हाला फसवताहेत. ते मघापासून ‘तीन मान्यवर’ असा उल्लेख करताहेत... पण खरं म्हणजे आम्ही चार मित्र आहोत. त्यामुळे यापुढे आपण मान्यवर वगैरे बाजूला ठेवू. त्याऐवजी, ज्यांनी तीस वर्षं एकत्र काही सामाजिक काम केलंय, अशा चार मित्रांच्या या गप्पाच  आहेत, असं मी म्हणेन.

आता माझं उत्तर... खरं सांगायचं तर, मी ज्या वेळी माझ्या जगण्याविषयी काही ठरवत होतो, त्या काळात ‘करिअर’ हा शब्दच आजच्यासारखा प्रचलित नव्हता. त्यामुळे करिअर काय, त्याचे निकष काय- असे प्रश्न माझ्या तरी डोळ्यांपुढे नव्हते. अर्थात, ‘करिअर काय?’ हा प्रश्न नसला, तरीही ‘या जीवनाचं काय करू?’ हा प्रश्न मात्र त्या वेळी डोळ्यापुढे नक्कीच होता. विशेष म्हणजे, या प्रश्नाला सामोरं जाण्याचे महत्त्वाचे प्रसंगही माझ्या आयुष्यात दोनदा येऊन गेले.

तेरा वर्षांचा असताना मी आणि माझा मोठा भाऊ अशोक- आम्ही दोघं एके दिवशी वर्धा जिल्ह्यातल्या भर उन्हाळ्यात सायकलने जात होतो. सायकल चालवता- चालवता आम्ही थांबलो आणि माहीत नाही का, पण आम्ही दोघांनीही एकमेकांशी अवचित एक संवाद साधला. अशोक मला म्हणाला- ‘अभय, आपण दोघंही आता मोठे झालो आहोत. त्यामुळे आपण आपल्या जीवनात यापुढे काय करायचं, हे आता ठरवून टाकू...’ मीही अशोकला दुजोरा देत लगेच म्हणालो- ‘हो, चालेल. ठरवून टाकू! आपण आता बऱ्यापैकी मोठे झालोच आहोत...’

मला आठवतं, आम्ही जिथे उभे होतो ते पिपरी नावाचं एक खेडं होतं. जमीन बऱ्यापैकी ओसाड होती. रखरखीत उन्हाळा होता. गावातली माणसं उपाशी. ते १९६३चं वर्षं होतं. भारतात तेव्हा अन्नाचं मोठं दुर्भिक्ष्य होतं... हे सारं असं समोर पाहत असताना, आम्ही दोघांनी चट्‌कन विचार केला- खेड्यातली माणसं उपाशी आहेत, शेती सुधारली पाहिजे आणि खेड्यातली माणसं आजारी आहेत, तर आरोग्यही सुधारलं पाहिजे! अशोक म्हणाला, ‘मी शेती सुधरवतो.’ म्हणून मग मी बाय डिफॉल्ट म्हणालो, ‘बरं, मग मी आरोग्य सुधारतो...’

मी त्यावेळी हे काय म्हणत होतो, याचं गांभीर्य मला तेव्हा पूर्णपणे कळत होतं, असं मला आज अजिबात वाटत नाही. अन्यथा, भारतातल्या सर्व खेड्यांचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी एखाद्या १३वर्षांच्या पोरानं घ्यावी म्हणजे काय!... पण त्यावेळी, म्हटलं तर काहीशा अज्ञानातच मी ती जबाबदारी घेतली आणि गेली ५३वर्षं तेच करतोय. असाच काहीसा प्रश्न आणि निर्णय घेण्याचा आणखी एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला तो १९८४मध्ये. तेव्हा मी अमेरिकेतून भारतात नुकताच परतलो होतो. तेव्हा माझं आणि राणीचं उच्च वैद्यकीय शिक्षणही पूर्ण झालेलं होतं. काम करण्यासाठी म्हणून अनेक नामवंत संस्थांची आम्हाला दोघांनाही निमंत्रणेसुद्धा होती. अशा वेळी निर्णय घ्यायला आम्ही पुन्हा एकदा तीच, मागच्या वेळी वापरली तशीच कसोटी वापरली! ‘महाराष्ट्रात सर्वाधिक गरज कुठे आहे?’ हा प्रश्न डोळ्यांपुढे ठेवत आम्ही शोध घेत होतो आणि आम्हाला मिळालेलं उत्तर होतं- गडचिरोली...

ठरलं तर मग! तेव्हा नव्यानेच झालेला, महाराष्ट्रातला सर्वांत दूर, सर्वांत मागासलेला, सगळ्यांत गरीब असणारा गडचिरोली जिल्हा आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीसाठी निश्चित केला. असं बघा मित्रांनो- जिथे सुविधा आहे तिथे जाऊ नये, कारण तिथे अगोदरच खूप गर्दी असते. याउलट, जिथे समस्या आहेत तिथे जावं, कारण तिथे तुमची कुणाशीही स्पर्धा नसते!

मला वाटतं, आपण मला विचारलेल्या प्रश्नाकडे ‘करिअर निवडीचा’ प्रश्न म्हणून पाहण्याऐवजी ‘कर्तव्य निवडीचा’ प्रश्न म्हणून पाहायला हवं, असं मी आवर्जून म्हणेन. तसं केलं, तर हा प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटूनच जातो. आपली गरज सर्वांत जास्त कुठे आहे, तिथे जावं... जीवन सुखी होऊन जातं...

डॉ. अनिल अवचट : नमस्कार मित्रांनो. आत्ताच आपण माझ्या अतिशय जवळच्या मित्राकडून अभय कडून खूप छान शब्दांत करिअर, कर्तव्य आणि आपलं समाजाप्रती असलेलं देणं याविषयी ऐकलं. माझी वाटचाल मात्र माझ्या तरुणपणी यापेक्षा काहीशी वेगळ्या वाटेने झाली. इंग्रजीत जिला ‘मेथड ऑफ डिडक्शन’ म्हणतात ना (वजाबाकी करत करत), तशाच काहीशा प्रकाराने मी स्वतःची जीवनवाट आखत पुढे जात राहिलोय.

आपलं मन जिथे रमत नाही ते सोडून द्यायचं, असं करत मी प्रवास केला. मेडिकलला गेलो तेव्हा तिसऱ्या वर्षाला असतानाच मला जाणवलं की, हे माझं क्षेत्रच नाही म्हणून. आपण डॉक्टरकी करायची नाही, हे तेव्हाच मी मनाशी पक्कं केलं होतं.

त्याच दरम्यान सुनंदा माझ्या आयुष्यात आली होती. माझं मन त्या वेळी चित्रांत रमायचं. मी कॉलेजात माझी अनेक चित्रप्रदर्शनं भरवत असे. मग सुनंदा मला पाठिंबा देत एके दिवशी म्हणाली- ‘तुझं नाही ना मन रमत एमबीबीएसमध्ये, मग राहू देत. तुला जे आवडतं, ते कर. माझ्या नोकरीत आपण आपलं भागवू...’ पण हो, सुनंदाने  स्वतः पुढाकार घेऊन माझा अभ्यास मात्र करवून घेतला आणि तिच्या मदतीनेच माझं एमबीबीएस पूर्ण झालं, हेही खरं.

पुढे मग मी सामाजिक कार्यातही उतरलो. बिहारच्या दुष्काळात काम केलं. कोयनेच्या दुष्काळात काम केलं. पण त्यातूनही माझं मन बाहेर पडलं. पुढे मी विद्यार्थी आंदोलनांतसुद्धा सक्रिय झालो. तेही काही कारणांनी सोडलं. मघाशी मी मेथड ऑफ डिडक्शन म्हटलं ना, ते हेच. नेती-नेती-नेती असं म्हणत झालेला हा माझा प्रवास...

त्यानंतर पुढे माझी वाट लेखनाच्या वळणावर येऊन ठेपली, अन्‌ इथे मात्र मी काहीसा विसावलो... मी लिहायला लागलो. लिहिणं मला मनापासून आवडत होतं. ‘आपल्याला हे जमतंय’, असं माझ्या लक्षात आलं त्यावेळी! मग मी साप्ताहिकं, दिवाळी अंक, नियतकालिकं यातून लिहीतच सुटलो.

या सगळ्यात एक मोठी गंमत म्हणजे- आपण काही अचिव्ह करावं, स्वतःला प्रूव्ह करावं, असं वाटण्याची वृत्ती माझ्यात पूर्वीही कधीच नव्हती आणि आजही नाही. कसलीही महत्त्वाकांक्षाच नसणं, हा माझ्यातला एक ‘मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट’च आहे म्हणा ना! आपण काही व्हावं, असं मला कधी वाटलंच नाही मुळी. मी प्लॅनिंग करून काही केलंय, असं कधीच होत नाही. माझ्या जीवनात गोष्टी आपापल्या घडत जातात, म्हणजे समोर येतात आणि मी त्या स्वीकारतो. मनात आलं की चाललो तिकडे...! कधी कुठला विषय आवडतो, तर कधी कुठला. मग माझं लेखनही त्या दिशेने धाव घेऊ लागतं. प्रसंगी त्या लेखनासाठी त्यातल्या जाणकार गुरूंना भेटायचं, तो विषय त्यांच्याकडून सविस्तर जाणून घ्यायचा... म्हणजे मी कुठून कुठे वाहत जाईल, ते सांगता येत नाही...

माझ्यातला दुसरा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणजे, मला कधी कुणाचा रागच येत नाही. कोणाची स्पर्धा वाटत नाही. आता मला सांगा मित्रांनो, हा असा माझ्यासारखा एक जण मोठ्या आनंदाने जगतोच आहे ना! कुणालाही त्रास न देता जगण्यातला हा आनंद आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी : माझ्याविषयी म्हणाल, तर बाबा (अनिल) आणि दादा (अभय) या दोघांकडून काही तरी चांगलं घेत, शिकत माझा प्रवास करत असतो. निदान अलीकडच्या काळात तरी. म्हणजे बाबाकडून मी त्याची मुशाफिरी घेतो, तर दादाकडून त्याचं लॉजिकल थिंकिंग!... आता माझ्या करिअरविषयी बोलतो. माझ्या बाबतीत त्या वेळी ठरवून असं काही माझं मेडिकलला जाणं झालं नाही. किंबहुना, त्या निर्णयात माझा काहीही संबंध नव्हता. माझा मोठा भाऊ त्या वेळी इंजिनिअर झालेला, मी हुशार होतो आणि मला गणित आवडायचं नाही; या एवढ्या तीनच निकषांच्या आधारे माझं मेडिकलला ॲडमिशन घेणं पक्कं झालं होतं! बाकी त्यात माझं काहीही ध्येय वगैरे होतं, असं नाही.

...अर्थात, एमबीबीएस संपत आलं असताना पुढे सायकिॲट्रीमध्ये आपण एमडी करायचं, हा निर्णय मात्र माझा स्वतःचा होता. तो कदाचित माझ्या जीवनातला पहिलाच निर्णय असेल की, जो संपूर्णपणे माझाच मी घेतला होता. मी हा निर्णय का घेतला असावा, हे मला कदाचित त्या वेळी कळलं होतंच, असं नाही. पण आज मागे वळून पाहताना मात्र त्यामागची काही कारणं नक्कीच दिसून येतात. पहिलं म्हणजे, मला पेडियाट्रिक्स शिकवणारे मर्चंट सर! हे मर्चंट सर वर्गपाठाचा भाग म्हणून वेगवेगळ्या केसेस अभ्यासायला मला द्यायचे. या सगळ्या केसेस लोकांशी संबंधित अशा होत्या. एकदा त्यांनी मला या सगळ्या केसेसविषयी विचारलं. त्यानंतर पुढे ते म्हणाले- मी या सगळ्या केसेस तुलाच का बरं दिल्या असतील, ठाऊक आहे?... मला ते अर्थातच माहिती नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलेलं उत्तर होतं- कारण, लोक तुझ्याशी खूप छान बोलतात. ’ Because, people open up very easily in front of you ’- हे मर्चंट सरांचं वाक्य होतं.  

मला वाटतं, हाच तो क्षण होता- जेव्हा आपण पुढे अशाच क्षेत्रात काम करायचं, जिथे माणसं आहेत; हे मी निश्चित केलं!...आणि सायकिॲट्री हे त्यासाठी अतिशय योग्य क्षेत्र होतं. या शाखेत मला माणसांशी संवाद साधता येणं शक्य होणार होतं. मी ते निवडलं.

दुसरं म्हणजे, त्याच काळात मी नाट्य- चळवळीशीसुद्धा बऱ्यापैकी जोडला गेलेलो होतो. नाटकं, साहित्य लिहू लागलो होतो. त्याच्याशीदेखील मनोविकारशास्त्र आपण जोडून घेऊ शकू, असं मला वाटत होतं.

तिसरं आणखी एक कारण म्हणजे, माझा मामा... त्याला एक गंभीर मनोविकार होता आणि तो त्या वेळी अनेक रुग्णालयांत त्यावर उपचारही घेत असे. पुढे अचानक कधी तरी तो आमच्या आयुष्यातून निघूनच गेला. हाही भाग कुठे तरी माझ्या अंतर्मनात नेहमीच टिकून होता, कदाचित म्हणूनच मी पुढे सायकिॲट्रीच्या अभ्यासाकडे वळलो. विशेष म्हणजे, त्या काळी मी आईचा विरोध पत्करून ही शाखा निवडली होती.

माझं मन वळवावं म्हणून आईने आमच्या फॅमिली डॉक्टरांनासुद्धा मला समजवायला सांगितलं होतं. त्यांनीही मला ‘सायकिॲट्री इज हाफ सायन्स’ असं सांगत, या शाखेला ‘अर्धवट लोकांचं अर्धवट विज्ञान’ म्हणत कमी लेखलं होतं. अर्थातच मी त्यांचं ऐकलं नाही. पुढे गेल्यावर मलाही त्यांचं म्हणणं पटलं, पण अर्ध्याच अर्थाने. त्यांचं वाक्य अर्धवट खरं होतं. मला उमगलेलं पूर्ण वाक्य असं आहे- ‘सायकिॲट्री इज इंडीड अ हाफ सायन्स... द अदर हाफ बिइंग ह्युमॅनिटीज!’

मी घेतलेला तिसरा एक आणखी महत्त्वाचा निर्णय म्हणजे, एकाच ठिकाणी थांबून न राहण्याचा. त्या वेळी एका डिपार्टमेंट ऑफ सायकिॲट्रीमध्ये मला खूप चांगली संधी होती. एक पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून मी तिथे रुजू होऊ शकलो असतो. मी तिथेच रुजू व्हावं, अशी माझे मेंटॉर असणारे डॉ.शहा यांची मनापासून इच्छा होती. त्यांना त्यात माझं उज्ज्वल भविष्य दिसत होतं. पण मी त्यांचं ऐकलं नाही. त्या वेळी मी ऐकलं ते माझे दुसरे एक शिक्षक डॉ.डुंगाजी यांचं. डुंगाजी मला म्हणाले होते- ‘आनंद, तू या सिस्टीमचा भाग बनू नकोस. इथून बाहेर पड आणि  तुझ्या कल्पनांवर आधारित तुझं असं काही तरी तयार कर! इथे राहिलास, तर तू सडशील...’ मी ते ऐकलं आणि तिथून वेळीच बाहेर पडलो. माझ्या कल्पना माझ्या शक्तीवर पडताळून पाहायला आता अवकाश मोकळं होतं...

विवेक सावंत : कर्तव्यपूर्ती, आतला आवाज जिथे समस्या आहेत तिथे आपण स्वतःहून जाणं... असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे या तिघांच्या बाबतीत आहेत असं या पहिल्याच पण प्रदीर्घ अशा उत्तरानंतर आपणा सर्वांना जाणवलं असेल. यांच्यातल्या कुणात दडलेली आहे एक मुशाफिरी, कुणात रुजलेली आहे स्पर्धारहित समाजकार्याची उर्मी, तर कुणात अजून काही.

मला आनंद नाडकर्णींना या ठिकाणी एक प्रश्न विचारायचाय. हा प्रश्न आहे तो डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ या उपक्रमाविषयी... डॉ. नाडकर्णी, तुम्ही अवघ्या महाराष्ट्राचे करिअर गुरू आहात. मला सांगा, आजवर शेकडो युवकांना जोडून घेतलेल्या ‘निर्माण’कडे तुम्ही करिअरच्या दृष्टीने कसं पाहता?

डॉ.आनंद नाडकर्णी : मी ‘निर्माण’कडे फक्त करिअरच्या दृष्टीने पाहतच नाही, मी त्याच्याकडे कर्तव्याच्याच दृष्टीने पाहतो! असं पाहा, अभयदादाने त्याच्या तरुणपणी करिअर निवडताना कर्तव्य हेच आपलं करिअर म्हणून जसं निवडलं होतं ना, त्याचंच एक जनरलायझेशन म्हणून मी ‘निर्माण’कडे पाहतो. त्यामुळे तो एका वैयक्तिक प्रवासाचा भाग असतानाच सामाजिक प्रवासही तेवढाच आहे.

आज अनेकदा अनेकांकडून तरुण मुलांच्या वेगवेगळ्या व्यसनांविषयी, त्यांच्या अतिरेकी मोबाईल वापराविषयी ‘काय हे! आजकालच्या मुलांचं खरं नाही!’ या प्रकारातल्या तक्रारी आपण सगळेच ऐकत असतो. पण दुसरीकडे पाहिलं तर अशी किती तरी याच पिढीतली तरुण मुलं आपल्याला ‘निर्माण’मध्ये दिसतील, जी म्हणतायत की आम्हाला या सगळ्याच्या पलीकडे जायचंय!... मग या तरुणांच्या आवाजासाठी व्यासपीठ नको का?... ज्या संकुचित जीवनशैलीत ती जगतायत, तिला पर्यायच निर्माण न करता ‘तुम्ही ती जीवनशैली सोडा’ असं आम्ही या मुलांना कसं सांगायचं? हे पर्याय निर्माण करू पाहणारं व्यासपीठ म्हणून मी ‘निर्माण’कडे पाहतो.

‘निर्माण’चा प्रवास स्वयंकेंद्रिततेकडून समाजकेंद्रिततेकडे आहे, ‘अहं’कडून ‘स्वयं’कडे आहे. (इथे शब्द चुकला आहे ही आशयाची चूक जाणवते अहं आणि स्वयं हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. त्यामुळे 'स्वयं'च्या ऐवजी 'वयम' असायला हवं.) महत्त्वाचं म्हणजे, या ‘अहं’चा खरा आकार ओळखला गेला, तरच अहंकार मुळातून जाईल... अर्थात, या ‘अहं’च्या आकारात दडलेला ‘ओमकार’ गवसला पाहिजे. कारण, या ओमकारातच समष्टी दडलीय... म्हणून, माझ्या मते, निर्माण ही स्वतःला पारखून बघत समष्टीकडे वळून काही करण्याची उर्मी देणारी एक सामाजिक प्रयोगशाळाच आहे. ‘स्व’चा विस्तार कसा करायचा, स्व आणि समष्टी यांच्यात समतोल कसा साधायचा, हे निर्माण शिकवतं. म्हणजे व्यक्तिभानाकडून समाजभानाकडे नेणारा ‘सर्च’मधून निघालेला हा एक आगळावेगळा असा प्रयोग आहे.

विवेक सावंत : बाबा, मघाशी तुम्ही बोलत असताना मला विंदांची एक कविता आठवली. बहुतेक तुम्हालाच समोर ठेवून (अन्‌ काळाच्या काहीसं मागे जात) विंदांनी ती लिहिली असावी... ‘चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे’ ही ती कविता!... म्हणजे पाहा ना- एकीकडे तुम्ही डॉक्टर, समाजाचे डॉक्टर, संशोधक, पत्रकार, लेखक, साहित्यिक, कवी (दोहेसुद्धा लिहिलेत!), गायक, वादक, संगीतज्ञ, चित्रकार, काष्ठशिल्पी, ओरिगामीमधले माहिर, निसर्गोपासक, सौंदर्योपासक... किती किती म्हणून छटा सांगू तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या!

तर बाबा, हा तुमचा जो काही अजब डीएनए आहे ना, त्याचं युवांना खूप अप्रूप आहे. तुम्ही एवढी सारी भ्रमंती करता, तुमच्या डोळ्यांत कुतूहल असतं आणि खरं तर आमच्याही डोळ्यांत अशा वेळी कुतूहल असतंच... पण आमच्यात अन्‌ तुमच्यात फरक असा की- आमचं कुतूहल जागृत होतं, आम्हाला प्रश्न पडतात आणि आम्ही तिथेच थांबून जातो. तुम्ही मात्र त्या कुतूहलाचं जिज्ञासेत रूपांतर करता आणि त्या विषयाचा ध्यास घेता. अगदी लहानांपासूनही शिकायचा प्रयत्न करता. बरं, ते सारं इतक्या सुंदर पद्धतीने मांडता की, लोक ते वाचून प्रभावित होतात!... म्हणून तुम्हाला विचारायचंय- तुम्ही आज जर महाविद्यालयीन तरुण असता, तर तुम्ही ‘निर्माण’मध्ये गेला असता का? तुमचं उत्तर जर हो असेल, तर का गेला असता, हेही सांगा...

डॉ.अनिल अवचट : विवेक, माझ्यासाठी तू विंदांची कविता म्हणणं हे म्हणजे आधीच वेडा असणाऱ्या माझ्यासारख्या कुणाला अधिक बळ देण्यासारखंच नाही काय! आणि दुसरीकडे माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या छटा म्हणून तू जी काही सगळी नावं घेतली ना, ती म्हणजे माझं आरोपपत्रच तू जणू वाचून दाखवत असल्यासारखं मला वाटत होतं. पण असो, गंमत अलाहिदा...

आता तुझा प्रश्न. त्यावरचं माझं उत्तर आहे, हो! मी निदान एखाद वेळेस तरी ‘निर्माण’मध्ये गेलोच असतो. बघायला म्हणून, कुतूहल म्हणून नक्कीच गेलो असतो मी तिथे...

पण खरं सांगू का, तू आत्ता जे काही माझ्या बाबतीत उल्लेखलंस ना, ते सारं काही घडू शकलं ते केवळ मला सुनंदा भेटल्यामुळेच! तिनेच मला हवं तसं आणि हवं ते करण्याची मुभा दिली. मला स्वतःला शोधायला तिने मुभा दिली. म्हणाली- ‘तुला काय करायचंय ते कर, मी घर सांभाळते.’ मी कमावताच असलो पाहिजे, असा आग्रह आणि जबाबदारी तिने माझ्यावर लादली नाही. आणि ती मिळवती होती तरीही माझ्यावर दडपणही ठेवलं नाही तिने. कदाचित त्यामुळेच मी एवढी सारी मुशाफिरी करू शकलो.

एकदा का साधं राहण्याची सवय लागली ना, की आपण मुक्त होतो. गरजा वाढवून ठेवल्या की, अडकलोच म्हणून समजा! म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे असा सोस नको, आणि त्यावरून निर्माण होणारे खटके नकोत. या सगळ्याविना सुद्धा छान राहता येतंच की. मित्रांनो, लक्षात ठेवा- आनंदाचा आणि पैशांचा काहीही संबंध नाही. एवढंच काय, पैसा माणसाला कधीही तृप्त करतच नाही. माणसाला सदैव अतृप्त ठेवणं, हेच तर त्याचं लॉजिक आहे. हाच त्याचा अंगभूत गुण आहे.

सुनंदा म्हणायची, आमच्या अनिलने जर आत्मचरित्र लिहिलं ना, तर त्याचं नाव आपण ‘पलायन’ ठेवू! हा इकडून पळाला, तिकडूनही पळाला; म्हणून पलायन. पण खरं सांगू का, हे पलायन गरजेचंच होतं. मन नव्हतं ना रमत. मग इथून-तिथून बाहेर पडणं भागच होतं.

आपल्या प्रत्येकाला निसर्गाने काही ना काही सर्जनशील अंग दिलंय. पण आपण ते वाया घालवतो. शाळा आपली पहिली शत्रू, पालक दुसरे शत्रू! तो बर्नार्ड शॉ नाही का म्हणायचा- मला खूप शिकायचं होतं, पण शाळा आडवी आली. हे असंच होऊन बसलंय आपलंही. हे सगळे लोक मुलाला जे करायचंय, ते करू देत नाहीत आणि त्याला जे नको तेच नेमकं करायला लावतात.

आपल्यातल्या उर्मी दाबून आपण खरंच काय बरं बनू शकू?... आजच्या या सिस्टीमला सगळे रोबोट तयार  करायचे आहेत- ऐकणारे आज्ञाधारक रोबोट! आपण मात्र त्याला ठामपणे नकार दिला पाहिजे.

अमुक या शाखेचा अभ्यास केल्यावर पैसे खूप मिळणार आहेत, पण ती आवडीची नाहीये. आणि जी आवडीची आहे, तिथे फार पैसे नाहीयेत. मग आता करायचं काय? काय निवड करणार?... पण मग आपल्याला तो टू की फोर बीएचके फ्लॅट तर पाहिजेच आहे, ते अमकं काही तरी पाहिजेच आहे, असं म्हणत आपण आपली आवड डावलून पैशांच्या बाजूने कधी वळून जातो, जाणवतही नाही. आणि मग जन्मभर आपण मनाविरुद्ध काम करत राहतो.

मित्रहो, अशा जॉबमधून कुणालाच कधीच जॉब सॅटिसफॅक्शन मिळत नसतं, हे लक्षात घ्या. एकही रेघोटी कागदावर न मारता फक्त प्रदर्शनात चित्र पाहणारे आणि एकही तान स्वतः न घेता नुसत्या मैफलींत गाणी ऐकणारे असे केवळ ‘बघे’ होऊन जगण्यात अर्थ तो काय! आपण स्वतःही कधी तरी या कलांच्या वाटेनं जाऊन पाहायला नको?... आपल्या जगण्यातही ते चित्र, ते गाणं गुणगुणणं आणू या ना!

म्हणजे निसर्गाने आपणा प्रत्येकाला दिलेल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये विनासायास आपलं सर्जन शोधत आणि आपला प्रवास घडवत बसण्यात, त्यात गुंतून जाण्यातच खरं जगणं आहे, खरा आनंद आहे हो.

विवेक सावंत : डॉ.बंग यांना हा पुढचा प्रश्न आहे. बालमृत्यूचा दर लक्षणीयरीत्या घटवायचं अतिशय महत्त्वपूर्ण काम डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांनी केलंय. या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेतली गेली. लॅनसेटसारख्या जर्नलमध्येही हे काम प्रसिद्ध झालंय. जगातल्या अनेक देशांची धोरणं त्याच्यामुळे बदलली... म्हणून त्यांना विचारायचंय- एवढं प्रचंड काम एकीकडे सुरू असतानाच त्यांना युवावर्गासाठी ‘निर्माण’सारखा उपक्रम का बरं राबवावासा वाटला? युवांचा हा ‘सिद्धार्थ ते बुद्ध प्रवास’ त्यांना एवढा प्रकर्षाने महत्त्वाचा का वाटला?

डॉ.अभय बंग : खरं तर जगात प्रश्न इतके जास्त आहेत की, त्या तुलनेत माझी गती फारच कमी आहे. एखादा प्रश्न मला समाजात दिसला की, तो माझ्या मनाला भिडतो. तो दोन-तीनदा दिसला की, मी तो आकडेवारीनिशी पडताळून पाहतो. मग एकदा का तो प्रश्न, त्याचं स्वरूप आणि सामाजिक दृष्ट्या असणारं त्याचं महत्त्व कळलं... आणि तो सोडवण्याचं भूत डोक्याला लागलं की, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचायला मला सहसा पाच वर्षं लागतात. त्या अर्थाने म्हणायचं तर मी गोगलगाय आहे... किंवा असं  म्हणू या की, समाजातले प्रश्नच मुळी परीक्षेतल्या प्रश्नांसारखे चटकन सुटणारे नसतात, तर ते असेच वर्षानुवर्षांचा वेळ घेऊनच सुटणारे असतात.

हाच आधार घ्यायचा झाला तर, मी आणि राणी असं आम्ही दोघांनी मिळूनही काम करायचं म्हटलं तरी पन्नास वर्षांच्या आमच्या सामाजिक आयुष्यात आम्ही असे किती प्रश्न सोडवू शकू?... तर, कदाचित दहा प्रश्नांना आम्ही हात लावू शकू; सोडवू असंही म्हणणार नाही मी. समाजात अनंत प्रश्न आहेत आणि त्यांची व्याप्तीही मोठी आहे.

‘निर्माण’ सुरू करण्यामागचं पहिलं कारण यातच दडलंय. भारतीय समाजातले प्रश्न फार जास्त आहेत आणि आपण फारच कमी आहोत, तेव्हा आपल्याला असे प्रश्न सोडवायला आणखी अनेक सहकाऱ्यांची गरज भासणार आहे, हे ‘निर्माण’मागचं पहिलं कारण होतं.

गड्यांनो, लक्षात घ्या- सामाजिक कामांच्या शाखा कधीही नसतात! दुकानांच्या शाखा असतात. सामाजिक कामाच्या कसल्या आल्यायत शाखा?... दिव्याने दिवा लागतो, पण लागलेला दिवा स्वतंत्र असतो. ती काही पहिल्या दिव्याची शाखा नसते. म्हणूनच, ‘स्वयंप्रेरणेने, स्वयंप्रज्ञेने प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करणारे नवे शोधक निर्माण करावेत’, या हेतूने ‘निर्माण’ची निर्मिती झाली.

दुसरं अजून एक. तुम्ही याच प्रश्नात ‘सिद्धार्थ ते बुद्ध’ हा प्रवास महत्त्वाचा वाटण्याचं कारण विचारलंय, त्याविषयी बोलायला मला आवडेल. खूप चांगली प्रतिमा वापरली तुम्ही या प्रश्नात. मला विचारायचंय- सिद्धार्थ हा राजकुमार जर त्याच्या राजमहालातच राहिला असता, तर त्याचं काय झालं असतं? आज आपल्याला त्याचं नाव तरी लक्षात राहिलं असतं?... नाहीच! तो सिद्धार्थ त्याचा ‘कम्फर्ट झोन’ सोडून, स्वतःचं घर सोडून, स्वतःचा शोध घेत निघाला; तेव्हाच त्याला काही गवसलं.

(डॉ.अनिल अवचट : मित्रांनो, सिद्धार्थ घर सोडून त्याच्या स्वतःच्या कम्फर्ट झोनकडे निघाला होता, हे लक्षात घ्या...)

डॉ.अभय बंग : हा माझ्या आणि बाबाच्या प्रकृतीतला फरक आहे बरं का मित्रांनो. मी कम्फर्टकडून त्रासाकडे जातो आणि बाबा त्रासाकडून कम्फर्टकडे... असो. गमतीचा भाग अलाहिदा!

पण सिद्धार्थ बनून राहण्यात काही गंमत नाही गड्या! आयुष्यभर जरी तुम्ही राजकुमार बनून राहिलात ना, तरी ना त्याचं काही भविष्य आहे, ना त्याचा काही इतिहास निर्माण होऊ शकतो. दुर्दैवाने आजच्या तरुणांचं नेमकं तेच होतंय. १९९०नंतर तर असं दिसतं की, आपलं अर्निंग कसं वाढेल, हेच काय ते तरुण पिढीचं जणू जीवनाचं एकमेव ध्येय बनून राहिलंय. पण या मानसिकतेत या तरुणांचा दोष नसून, त्यांना सतत धावायला लावणाऱ्या ‘रेसकोर्स’चा हा दोष आहे! सगळा समाजच अलीकडे रेसकोर्स होऊन गेलाय.

त्या मुल्ला नसिरुद्दीनच्या गोष्टीतल्या गाढवासारखं होऊन बसलंय सगळं. पुढे एक पाऊलही टाकायला अडून बसलेल्या त्या गाढवापुढे नसिरुद्दीनने दोरीला अडकवलेलं एक गाजर धरलं आणि गाढवही लगेच ते गाजर मिळेल, या लालचेपोटी चालू लागलं. गाढव पुढे सरकतंय आणि सोबत गाजरसुद्धा! त्याला ते कधीच खायला मिळत नाहीये... आजच्या तरुणांपुढेसुद्धा असंच तर आर्थिक प्रेरणांचं गाजर धरून त्यांना दाखवलं जातंय. जीवन यापेक्षा किती तरी जास्त सुंदर आहे. नुसतं अर्थप्राप्तीसाठी जगणं, यात काही अर्थ नाही.

खरं तर आपल्यापैकी प्रत्येकच जण ‘मी’ नावाच्या एका तुरुंगात नेहमीच बंदिस्त असतो. कदाचित बालपणी हा तुरुंग तेवढा मजबूत नसतोही, पण जसजसे आपण मोठं व्हायला लागतो ना- तसतसे स्पर्धा, तुलना या सगळ्यातून या ‘मी’ तुरुंगाच्या विटा एकेक करत रचल्या जाऊ लागतात... आणि जशी ती अनारकली चिणली गेली होती ना; अगदी तसंच आपलं सुंदर जीवन, सर्जन आणि आपण स्वतःच या ‘मी’ तुरुंगात चिणले जाऊ लागतो!

या ‘मी’च्या तुरुंगातून युवांना मुक्त केलं पाहिजे. ती एक जाहिरात आपण पाहिली असेल- ते मूल धावत येऊन आईला सांगतं, ‘आई-आई, मला नव्वद टक्के मार्क्स मिळालेत.’ आई म्हणते, ‘लेकिन राजू को कितने मिले?...’ म्हणजे काय की, याला नव्वद टक्के मिळाले, याचं कौतुकच नाही!... दुसऱ्याच्या तुलनेत तुम्हाला काही जास्त मिळालं असेल, तर तुमचं कौतुक आम्ही करू, अन्यथा नाही. म्हणजेच असं की, तुमचा मित्र हा तुमचा स्पर्धक आहे, तुमचा शत्रू आहे आणि म्हणजेच तुम्ही या जगात एकटेच आहात- हेच तर या अशा गोष्टींतून आपण या मुलांवर बिंबवत असतो.

म्हणजे प्रत्येक माणसाला जीवनात एकटं करून टाकणारी आणि त्याला इतरांशी शत्रुत्व करायला भाग पडणारी, अशी आजची समाजरचना आहे. यावर उपाय समाजाशी संबंध प्रस्थापित करणं, हा आहे. मगाशी आनंद म्हणाला, त्याप्रमाणे ‘मी ते आम्ही’ या दिशेनं जाणं अशा वेळी महत्त्वाचं ठरतं.

मला काय आवडतं, मी कशात चांगला आहे, या प्रश्नांची उत्तरं क्लासरूममध्ये बसून कधीच नाही मिळणार! समाजात जाऊनच ती उत्तरं शोधायला लागतील.

ते म्हणतात ना- सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. तसंच आहे हे. प्रकाशाचा किरण जसा अदृश्य असतो, तसाच माझा ‘मी’ सुद्धा अदृश्यच असतो. मी कसा आहे, काय आहे, हे अनेकदा आपल्याला कळत नसतं. पण जसा तो प्रकाशाचा किरण एखाद्या अडथळ्यावर येऊन पडतो आणि मग प्रकाशित होतो; अगदी तसंच मी जेव्हा एखादं आव्हान घेतो, जबाबदारी घेतो तेव्हा माझ्यातला ‘मी’ दिसतो, कळतो!

मित्रांनो, त्या स्क्रीनसमोर बसून तुम्हाला स्वतःचं आत्मभान नाही येणारेय. आरशापुढे बसून अन्‌ त्यात पाहत राहूनही नाही कळणार. यूपीएससी-एमपीएससीच्या परीक्षामधूनही नाही कळणार!... ते कळेल जेव्हा तुम्ही जीवनाला समोरासमोर जाऊन भिडाल तेव्हाच. जीवनाला जवळून बघाल, तेव्हाच. जीवनासोबत घेतलेल्या टकरांमधून, टक्क्या-टोणप्यांमधूनच तुम्हाला खरा ‘मी’ काय चीज आहे, ते कळेल.

मला वाटतं, हीच काही कारणं होती ज्यामुळे आम्हाला ‘निर्माण’ सुरू करावंसं वाटलं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी ते आपलंसं केलं, ही मोठ्या आनंदाचीच बाब आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना ‘मी’च्या तुरुंगातून बाहेर पडण्याची आणि ‘मी’पासून ‘आम्ही’कडे प्रवास करण्याची मनोमन इच्छा आहे, हेच तर यातून दिसतंय.

विवेक सावंत : तुम्ही आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलंय डॉक्टर- विशेषतः गांधीविचारांचा मागोवा घेत-घेत जे काम तुम्ही करत आला आहात, ते पाहता; तुमचं सार्थ वर्णन करताना मी तुम्हाला एकविसाव्या शतकातले ‘आरोग्य गांधी’ असंच म्हणेन!... आणि त्याचसोबत मला अशी खात्रीसुद्धा आहे की, पुढच्या दहाएक वर्षांनी आपण भेटू; तेव्हा मला तुमच्याकडे बघून असं नक्की म्हणता येईल की, तुम्ही एकविसाव्या शतकातले ‘निर्माण गांधी’देखील आहात.

विनोबांनी आपल्याला एक मोठा उद्‌बोधक दृष्टांत खूप आधीच देऊन ठेवलाय- ते म्हणतात की, होडी हे आपलं जीवन आणि पाणी म्हणजे पैसा आहे. होडी चालवायला पैसा लागणारच. पण हेच पाणी जर होडीत शिरलं तर काय बरं होईल?... मला वाटतं, याच दृष्टांताला समोर ठेवत माझा पुढचा प्रश्न आहे.

डॉक्टर, खरं तर जॉन हॉपकिन्समध्ये पहिले आलेले तुम्ही अमेरिकेत असतानाच अनेक उत्तम करिअर संधी आणि पैसे असे तुमच्या पुढे अक्षरशः सज्ज असताना ते सगळं सोडून थेट गडचिरोलीला यायचं, हे कसं काय ठरवू शकलात तुम्ही? त्यावेळी तर तुमचं नुकतंच लग्नही झालेलं. मग अशा वयात हा एवढा मोठा निर्णय घेताना काही आर्थिक असुरक्षितता नाही का जाणवली?

आजच्या युवांच्या दृष्टीने मी हा प्रश्न विचारतोय, कारण या प्रकारचे निर्णय आणि अशी परिस्थिती त्यांच्या दृष्टीने अनेकदा तीव्र अशी कन्सर्न म्हणून पुढे येत असतात. आज आसपासचं सगळंच जेव्हा पैशांतच मोजलं जातंय- किंबहुना पैशांतच रिड्युस होतंय, अशा काळात तुम्ही घेतलेला निर्णय पाहिला म्हणजे तुम्हाला काही असुरक्षितता जाणवली नसेल का, असा प्रश्न पडतो. तुम्ही या सगळ्याचा सामना कसा केलात त्यावेळी?

डॉ.अभय बंग : असुरक्षितता त्या गोष्टीची वाटावी, जिची कमतरता आहे. असं बघा- तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर चालत आहात. तिथल्या वाळूत एके ठिकाणी तुम्हाला एक हिरा सापडतो. मला सांगा, ती वाळू मौल्यवान की तो हिरा?... आणि समजा, कुणी तिथली मूठभर वाळू घेतली आणि त्या हजारभर वाळूच्या कणांच्या मोबदल्यात तुमच्याकडून तो हिरा मागितला, तर कराल का सौदा? नाही ना! कारण, तसं करणं मूर्खपणाचं ठरेल... मित्रांनो, आजचं मार्केट नेमकं असाच सौदा तुमच्या पुढ्यात ऑफर करतंय. ते म्हणतंय की, हे दोन-पाच दहावीस हजार घे आणि तुझ्याकडे असणारं ते एक आयुष्य मात्र मला दे!... पण तसं ते देऊन टाकण्यात अर्थ तो काय? आपल्याला आयुष्य एकच मिळालंय. ते असं त्या मातीमोल वाळूच्या कणांसाठी कसं बरं देऊन टाकायचं? तसं करणं म्हणजे मूर्खपणाच नाही तर काय?

मार्केट आपल्यापुढे आणत असलेल्या कोणत्याही संधींपेक्षा आपलं आयुष्य अधिक मोलाचं आहे, हे त्याच वेळी माझ्या आणि राणीच्या डोक्यात लख्खं अन्‌ स्पष्ट होतं. त्यामुळे आम्ही खंबीर होतो आणि म्हणूनच आर्थिक असुरक्षितता आम्हाला नाहीच वाटली कधी. पण हो, ‘आपल्या जीवनाचा उपयोग आपण चांगल्या कामासाठीच करत आहोत ना’ अशी थोडीशी असुरक्षितता आम्हांला वाटली होती.

आता मला सांगा, आपल्याला पैशांची गरज का जाणवते? कारण, आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात. गरजा आपण वाढवून घेतो आणि या वाढवलेल्या गरजा पूर्ण करण्याच्या सक्तीमुळे आपल्यावर पैशाची गुलामी लादली जाते. एका अर्थाने आपण आपलं स्वातंत्र्य विकतोच, नाही तर काय! त्यामुळेच की काय, पण आपल्या गरजा कमी करणं, आपला लोभ कमी करणं हेच आर्थिक सुरक्षितता मिळवण्याचं सर्वश्रेष्ठ साधन आहे, असं मी समजतो.

माझ्या सुदैवाने मी लहानपणी गांधींच्या आश्रमात वाढलो आणि आपल्या गरजा कमी ठेवा, हेच गांधींचं तत्त्वज्ञान होतं. मी ते स्वतःही शक्यतो पाळत आलोय. तुम्हाला सांगतो, मी माझ्या संपूर्ण मेडिकल शिक्षणात माझ्या खोलीत पंखा असूनही एकही वेळा तो पंखा सुरू केला नाही! नागपूरच्या त्या उन्हाळ्यात भट्टीत भाजून निघालो, तरी नाही. यामागचं कारण काय होतं, माहितेय?... मी विचार केला होता की- मी जर पंख्याच्या बळावर तो तीव्र उन्हाळा काढला, तर उद्या माझ्या वैद्यकीय सेवेसाठी खेड्यांत न जायला मला एक सुंदर निमित्त सापडेल. ‘अहो, खेड्यात पंखा नाही, वीज नाही, एसी नाही... मग कसं बरं जाणार मी खेड्यांमध्ये?’ अशी कारणं मला सहज मिळाली असती. मग खेड्यांचं आरोग्य सुधारायचं काम करण्याच्या माझ्या त्या निर्णयाचं काय झालं असतं? म्हणून मग मी ठरवलं, पंखा ही माझी गरज नसली पाहिजे.

माझ्या संबंध आयुष्यात माझ्या बायकोसाठी मी एक ग्रॅमही सोनं विकत घेतल्याचं मला आठवत नाही. सुदैवाने बायकोही अशी मिळाली की, जिला सोन्याचा अजिबात मोह नाही. उलट, तिला तिच्या वडिलांनी लग्नात दिलेले दागिनेही तिने घेतले नाहीत. शिवाय, आई-वडील गेल्यानंतर जेव्हा ते दागिने तिच्याकडे आले, तेव्हा तिने एके दिवशी आपल्या माहेरी- चंद्रपूरला जाऊन तिथल्या जाहीर सभेत आपलं ते शंभर तोळे सोनं गावालाच देऊन टाकलं. किती सहज तिने त्यावरचा आपला हक्क सोडूनही दिला... मित्रहो, लक्षात ठेवा- स्वतःच्या गरजा कमी केल्या, तर  आपल्या आयुष्याचं काय करायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपलं राहतं. अन्‌ त्या गरजा वाढवल्या, तर आयुष्यच एके दिवशी विक्रीला काढावं लागतं!

डॉ. आनंद नाडकर्णी : आत्ता जे अभयदादा बोलला, त्याचा संदर्भ मी आजच्या युवांशी जरा जोडून बोलणार आहे. म्हणजे हे असं जगणं आजच्या युवांसाठी तुलनेने कठीण का आहे, याविषयी मला बोलायचंय...

कसंय ना, जेव्हा साधेपणा हे मूल्य समाजात आसपास सर्वत्र दिसत असतं, त्यावेळी त्या मूल्यासारखं वागणं तुलनेने सोपं असतं. अभयच्या बाबतीत असंच झालं... मात्र, साधेपणा हे मूल्यच नाही, असं वातावरण आपल्या आजूबाजूला असतं; तेव्हा साधेपणाचा स्वीकार करायला जास्त धैर्य लागतं! अशीच परिस्थिती आज असेल तर... आपण जेव्हा जेव्हा साधेपणाचा पुरस्कार करू, तेव्हा तेव्हा आपल्याला आजच्या भौतिक ध्येयांच्या तोडीस तोड अशी काही त्याच पातळीवरची सशक्त भावनिक ध्येयं पर्याय म्हणून तयार करणं गरजेचं ठरणार आहे; जेणेकरून ही पर्यायी ध्येयं भौतिक ध्येयांना बाजूला सारण्यात मदतीची ठरतील. जर का अशी पर्यायी अन्‌ सशक्त भावनिक ध्येयं आपण तयार करण्यात कमी पडलो, तर भौतिक ध्येयप्राप्तीसाठी आपलं स्वातंत्र्य विकतच राहू!

थोडक्यात, आपल्याला आपल्या जीवनशैलीवर पैसा हा स्वार व्हायला नको असे वाटत असेल; तर मी जेही काही करत आहे, त्यातून माझ्या भावनिक गरजा- माझ्या विकासात्मक गरजा संपन्न होतील, अशी परिस्थिती निर्माण करायलाच हवी. कारण, या गरजा पूर्ण होतील, तेव्हा त्यातलं समाधान इतकं मोठं असेल की, त्यापुढे मला पैशाची किंमत कमीच वाटली पाहिजे... आणि ठरवलं तर हे आपल्याला नक्कीच करता येऊ शकतं.

उदाहरणार्थ, आपल्याकडे दोन नोटा आहेत. एक नोट खिशात आणि एक नोट मनात. अशा वेळी आपल्याला लक्षात येईल की, खिशातल्या नोटेची किंमत सतत बदलत राहू शकते. मात्र, मनातल्या नोटेची किंमत सदैव स्थिर (किंबहुना, ठरवलं तर अमर्यादितही!) राहू शकते. आता निर्णय आणि निवड आपापली आहे. ठरवायचं आपल्यालाच आहे- की, खिशातल्या नोटेच्या अवमूल्यनावर किंवा मूल्यवर्धनावर आपण आपलं मूल्य ठरवायचं, की मग आपल्या मनातल्या नोटेवरच्या त्या ‘इन्फिनिटी’ नावाच्या चलनाबरोबरची बांधिलकी घट्ट पकडून जपायची?

डॉ. अनिल अवचट : आपल्या आवडीचं काम जर आपण करत असू ना आणि त्यातच दंग असू ना, तर आपण कोणते कपडे घालतोय अन्‌ कसे दिसतोय, याकडे आपलं फारसं लक्ष जात नसतं. आणि मला सांगा, काय फरक पडतो स्वतःच्या दिसण्याकडे विशेष लक्ष नाही दिलं तर!... उलट मी तर म्हणेन, कशाची शुद्ध नसणं ही एक चांगली मानवी अवस्थाच आहे. निसर्गाच्या केवळ अनुभवत राहाव्या अशा त्या अतीव देखण्या सान्निध्यात सारं देहभान हरपण्याचा अनुभव घेत राहण्यात जो आनंद आहे, तो आपण घेतो का- हे अधिक महत्त्वाचं. मग अगदी घरातली ती हातोडी आणि पटाशीदेखील घरातल्या कुण्या माणसासारखी आपल्याशी जणू संवाद साधू लागतात. हे असं सारं जवळ असलं तर बाकीचं काही लागतच नाही. मग कशाला लागतायत त्या नवनव्या गाड्या, अन्‌ त्यांची ती वेगवेगळी मॉडेल्स!

आज आपण प्रतिष्ठेचे वेगवेगळे सिम्बॉल्स करून टाकले आहेत आणि त्यांच्या आहारी जात चाललो आहोत. हे थांबायला हवं. आपलं जीवन आपल्या चॉईसने जगलं पाहिजे. आपापल्या आवडींत दंग होऊन जगलं पाहिजे. मी स्वतःही तसंच जगत आलोय आजवर. असं जगतानाच समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो, ही वृत्तीही अंगी बाणू लागते. जगण्यातल्या उत्स्फूर्ततेतून हे घडत असतं, प्लॅनिंग करून हे घडेल असं नाही.

डॉ. अभय बंग : मला या ठिकाणी अनिलबद्दल थोडं बोलायचंय. अनिलचं सहज-साधं व्यक्तिमत्त्व आपण पाहतच आहोत. अनिल जे सहजपणे करतो, त्यातून त्याच्या हातून समाजसेवा घडते- मग ते त्याचं लेखन असो, त्याची व्याख्यानं असोत किंवा त्याचं वेगवेगळ्या चळवळींत असणं. पण त्याला एक कारण आहे. ते म्हणजे, अनिलच्या अंगची प्युरिटी! अनिल खूप शुद्ध माणूस आहे. बाहेरच्या समाजाची, संस्कारांची आणि एक प्रकारच्या कंडिशनिंगची जी पुटं आहेत, ती अनिलवर कधीही चढली नाहीत. त्यामुळे निसर्गतः त्याला जे भावतं, ते तो सहजपणे करतो आणि त्याच्यातून समाजसेवा घडूनही जाते. हा मार्ग त्याच्यासाठी योग्यही आहे.

पण दुर्दैवाने बहुतेक माणसं ही अनिलइतकी शुद्ध आणि नैसर्गिक नसतात. त्यांच्यावरती समाजाची खूप सारी दडपणं, मानसिक पुटं, मानसिक गंड अशा अनेक गोष्टी चढलेल्या असतात. त्यामुळे ‘मला जे वाटतं तेच मी करतो’ या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं ठरवलं तर बरीच माणसं समस्यात्मक अवस्थेतच जगतील. ज्यांना मनाला जे भावतं ते करावं असं वाटतं त्यांनी आधी अनिलसारखं निरागस आणि शुद्ध बनावं; त्यानंतर त्यांनी काहीही केलं तरी त्यातून सकारात्मकच घडेल, नैसर्गिक घडेल. पण ज्यांना समाजानेच पूर्णतः अनैसर्गिक करून टाकलंय, त्यांनी स्वत:ला वाटेल ते करायचं ठरवलं, तर त्यांच्या हातून अनैसर्गिकच घडेल. म्हणून, आपल्या मनाने काही करायचं असेल, तर त्याआधी अनैसर्गिकतेपासून स्वतःची सुटका करून घ्यावी लागेल. म्हणजे नैसर्गिक बनावं लागेल.

आणि एकदा का आपण नैसर्गिक बनलो, तर मग आपल्याच लक्षात येईल की, माझी नैसर्गिक आकांक्षा ही ‘मी’च्या गर्तेत राहण्याची नाहीये; ती इतरांसोबत जोडलं जाण्याची आहे! नाहीतर इतरांचं दुःख बघून वाईट का बरं वाटलं असतं?... इथिओपियातल्या दुष्काळा-बद्दलचं इतिहासात कोरलं गेलेलं एक छायाचित्र मला इथे आठवतंय. इथिओपियातल्या दुष्काळात एक अतिशय  हडकुळं कुपोषित मूल जमिनीवर निपचित पडून आहे. आणि थोड्याच अंतरावर एक गिधाड ते मूल कधी मरेल, याची वाट पाहत टपून बसलंय... असं ते छायाचित्रं होतं मित्रांनो, या फोटोला त्या वर्षी जगातला सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून पुरस्कार मिळाला. पण शोकांतिका अशी की, त्या फोटोग्राफरने त्यानंतर सहाच महिन्यांत आत्महत्या केली. कारण काय, तर तो त्या मुलाला नाही वाचवू शकला! त्याने फोटो तर घेतला, पण ते गिधाड अजूनही तिथेच होतं. तो त्याला तिथून हटवू शकला नव्हता. माणूस हा असा आतून इतरांशी जोडलेला आहे. म्हणूनच, समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांशी स्वतःतल्या आंतरिक ऊर्मी जोडून घेण्यासाठी स्वतःचं बऱ्याचशा प्रमाणात डीकंडिशनिंग करून घेणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्यायला हवं.

डॉ. आनंद नाडकर्णी : या दोघांच्या बोलण्यातून मला किंवा आपल्याला काय मिळू शकतं, ते मला या ठिकाणी सांगायला आवडेल. म्हणजे असं पाहा- बाबासारख्या व्यक्तीकडून मी काय काय बरं घ्यावं?... तर मी त्याची एम्पथी घ्यावी, त्याची आस्था घ्यावी- जी तो पटाशी आणि हातोडीशी बोलताना उराशी ठेवून असतो- ती आस्था मीही घ्यावी. मी त्याच्याकडून त्याची समरसता घ्यावी. त्या समरसतेमध्येसुद्धा ‘मी’चा लय होतच असतो.

आणि अभयदादाकडून आपण काय घ्यावं?... आपण त्याच्याकडून रचनात्मक काम घडवून आणण्याची प्रवृत्ती घ्यावी. अभयदादा जे काही करतो, त्या सर्व करण्याकडे तो आकृती म्हणजे फिगर या अर्थाने बघत नसतो; तर तो त्याकडे रचना म्हणजे डिझाईन या दृष्टीनेच पाहत असतो! त्या अर्थाने मला वाटतं, आपण त्याच्याकडे डिझायनर म्हणूनच पाहायला हवं. लक्षात घ्या- आकृत्या काढणारे खूप असतात, डिझाईन करणारे खूप कमी असतात. विचारांचं डिझाईन, प्रयोगाचं डिझाईन, कृतीचं डिझाईन हे कसं करायचं... आणि त्यात समतोल, लय आणि सलगता कशी जपायची, हे त्याच्याकडून नक्की शिकायला हवं...

मघापासून आपण जर बाबा आणि अभय यांचं म्हणणं बारकाईने ऐकलं असेल, तर आपल्या लक्षात येईल ते असं की- हे दोघंही आपल्याला ‘मी’चा लय कसा करायचा, हेच समजावून सांगतायत. फक्त त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, एवढंच. एक पद्धत आहे ती स्वतःच्या आतून स्वतःचा शोध घेण्याची, अन्‌ दुसरी आहे ती बाहेर पडत स्वतःला समाजाशी जोडून घेण्याची. अंतर्मुख अन्‌ बहिर्मुख अशा... पण गंमत म्हणजे, या दोन्हींतून ‘मी’चा लय होतोच! एक सांख्ययोग आणि दुसरा कर्मयोग, असं ते आहे. शेवटी हे दोघंही त्या एकाच विचाराच्या दोन बाजू आहेत.

विवेक सावंत : मित्रहो, डॉ. नाडकर्णी हे जणू बुद्धाचा विचार अक्षरशः कोळून प्यायल्यासारखेच बोलतायत. म्हणजे मध्यम मार्ग आणि संतुलन. विशेष आहे हे... असो. आनंद, तसं पाहिलं तर सगळेच युवा एकदम सामाजिक कार्यात जातातच असं नाही. काही जण व्यावसायिक वाटचालदेखील करत असतात. आणि अनेकदा आपलं व्यावसायिक काम व्यापक करत गेलो, तर ते समाजकार्यात परिवर्तित होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला असं विचारीन की, या दोन्ही वाटचालींमध्ये आपल्याला यश-अपयश, आनंद-दुःख, आशा- निराशा त्याच-बरोबर मानसन्मान व उपेक्षा, स्तुती व टीका, संधी व संकटं, पाठिंबा आणि विरोध अशा अनेक गोष्टी अटळ असतात. तर तुम्ही यांकडे कसं पाहता? कारण अलीकडे आपण पाहतो की, अशा परिस्थितींत खूप क्रिएटिव्ह युवादेखील चटकन नाउमेद होताना दिसतात...

डॉ.आनंद नाडकर्णी : मुळात, मला असं वाटतं की- चटकन नाउमेद होणारा माणूस हा खरोखरीच सर्जनशील, म्हणजे क्रिएटिव्ह असतो का, इथपासून विचार करण्याला सुरुवात करावी लागेल. कारण क्रिएटिव्ह माणूस असला, तर तो रेझिलिएंट असायलाच हवा. विदाऊट रेझिलियन्स देअर इज नो क्रिएटिव्हिटी! त्यामुळे मी जर स्वतःला क्रिएटिव्ह समजत असेल; तर मला जगण्यासाठीची आणि टिकण्यासाठीची आवश्यक धडपड करत राहणं अटळ आहे.

आपली सगळी चर्चा सुरू आहे, ती बदल या गोष्टीला पुढ्यात ठेवून. पण बदल हीच गोष्ट अटळ असेल, अनिवार्य असेल; तर निदान तिच्याकडे कसं पाहावं, हे स्वातंत्र्य तर आपल्याकडे आहेच ना! मगाचपासून आपल्या बोलण्यात स्वतःला मुक्त करा, असा संदर्भ येतोय, तो आहे तरी काय?... तर मी माझ्याकडे असलेलं विचार करण्याचं स्वातंत्र्य वारंवार पडताळून पाहिलं पाहिजे, हे त्यात अनुस्यूत आहे.  

अनुभवापेक्षादेखील त्या अनुभवाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, यावर अनेकदा निर्माण होणाऱ्या भावना अवलंबून असतात. म्हणजे येणारे अनुभव कसे असतील, हे आपल्या हातात नसलं; तरी त्या अनुभवांकडे कसं पाहायचं, हे तर नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून आपला दृष्टिकोन कसा आहे, हेही महत्त्वाचं ठरतं. शेवटी अनुभव हे येणारच... पण त्यांच्या विचारांत आपण स्वतःची वाट लावायची की त्यातून वाट काढायची, हे ठरवणं महत्त्वाचं.

विवेक सावंत : आपल्याला माहितेय की, डॉ.बंग यांनी खूप आव्हानात्मक अशा परिस्थितीत काम केलं- मग तो दारूबंदीचा प्रश्न असो किंवा त्यांनी तंबाखूविरुद्ध उभारलेलं आंदोलन असो, अगदी धान्यातून दारू करण्याच्या पद्धतीविषयी उभारलेलं आंदोलन असो... असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. म्हणून मला त्यांना विचारायचंय की, एखादा पराकोटीचा कसोटीचा क्षण तुमच्या जीवनात कधी आला का? आला असेल तर तुम्ही त्याला कसा प्रतिसाद दिलात? त्यावेळी तुम्हाला एकटं वाटलं का? अशा वेळी तुम्हाला कुणी साथ दिली का?... महत्त्वाचं म्हणजे, त्या कसोटीचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर काही अनिष्ट परिणाम झालेत का, हे जरा संदर्भासह सांगा.

डॉ.अभय बंग : विवेक, तुम्ही विचारत आहात अशा प्रसंगांची ठरवलं तर एक मोठ्ठी यादीच इथे देता येईल. कारण माझ्यापुरतं सांगायचं तर, मी एक अतिशय बुद्दू माणूस आहे. म्हणजे असं की- मी प्रत्येकच गोष्ट करायला घेतली की, आधी चुका करतो आणि मग त्या चुकांमधून शिकतो. त्यामुळे आजवरच्या माझ्या प्रवासात बहुतेक वेळा जे काही आव्हानाचे अन्‌ कसोटीचे प्रसंग निर्माण झालेयत, ते बहुधा माझ्याच हातून घडलेल्या चुकांमुळे! पण मी त्यातून उपाय कसे शोधत गेलो, ते कदाचित इथे सांगणं महत्त्वाचं ठरू शकेल.

मेडिकल शिक्षण घेताना मी एमबीबीएसमध्ये नागपूर विद्यापीठात त्या वेळी पहिला आलो होतो. पुढचं शिक्षण घ्यायला त्या वेळची राष्ट्रीय पातळीवरची सर्वोत्तम इन्स्टिट्यूट असणाऱ्या ‘पीजीआय चंडीगड’ इथे जावं, अशी माझी मनोमन इच्छा होती. मी तिथे गेलोदेखील (ते वर्षं होतं १९७४) मी पीजीआयला गेलो तर खरं, पण तिथे शिकत असताना माझ्या लक्षात आलं ते असं की- तिथे शिक्षण घेतलेल्यांपैकी तब्बल ९८ टक्के एमडी हे सहा महिन्यांच्या आत स्थलांतरित होऊन अमेरिकेला जातायत! हा माझ्यासाठी धक्काच होता.

देशपातळीवर नावाजली गेलेली एक राष्ट्रीय शिक्षणसंस्था म्हणजे प्रत्यक्षात अमेरिकेला डॉक्टर पुरवण्याचा एक कारखानाच झाला आहे, असं लक्षात आलं होतं. मग मला कळेचना- संस्था भारतातली, पैसा भारत सरकारचा, पेशंट भारतातले आणि त्यातून निर्माण होणारे डॉक्टर मात्र पुरवले जातायत ते अमेरिकेला!... बरं, या सगळ्यात माझं तेराव्या वर्षी बघितलेलं स्वप्न कधी अन्‌ कसं पूर्ण करू शकणार होतो मी? मीही जर त्या इतरांसारखाच अमेरिकेची वाट धरून निघून जायचं ठरवलं, तर भारतातल्या खेड्यांच्या आरोग्याचा प्रश्न मी सोडवणार तरी कसा होतो? त्यामुळे आपण या संस्थेत तरी राहावं की नाही, हाच प्रश्न माझ्यापुढे उभा राहायला सुरुवात झाली होती.

माझ्या मनात प्रचंड आंदोलनं सुरू असण्याचा तो काळ होता. एकीकडे आपल्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट अशा तांत्रिक गोष्टींची ओढ आणि त्यात काही प्राप्त करण्याचं स्वप्न मला खुणावत होतं, स्वस्थ बसू देत नव्हतं... तर, दुसरीकडे होतं समाजासाठी काही तरी करू पाहण्याचं स्वप्न! एक उत्तम शिक्षणसंस्था व उत्तम भविष्य आणि एक समाजस्वप्न अशा दोहोंतून निवड करणं हे अवघड काम माझ्या पुढ्यात येऊन ठेपलं होतं. त्या वेळी मी तिथे एकटा होतो. फार वाईट अवस्था होती माझी तेव्हा. काय करावं, ते मला कळत नव्हतं. स्वप्नांशी सौदा करायचा, की एवढी चांगली मिळालेली संधी सोडायची...? प्रश्नच प्रश्न!

या सगळ्यावर वरकडी म्हणून की काय, आणखी एक दुर्दैवाची गोष्ट घडली. दुर्दैव ते असं की, पीजीआयमध्ये सिलेक्शनसाठी त्या वेळी जी एक राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली होती, तिच्यात मी देशात पहिला आलो. एरवी एखाद्यासाठी याहून चांगली बातमी ती काय बरं असेल? मला मात्र ते माझं दुर्दैवच भासलं; कारण आता तर मी पीजीआयमध्येच थांबायला हवं, असा एक सामाजिक दबावही माझ्यावर निर्माण होणार होता.

माझा त्रास वाढतच होता. अखेरीस मी मनाशी पक्कं केलंच- आपण तेराव्या वर्षी आपल्या स्वप्नांचा जो करार नियतीशी केला होता, त्यानुसारच पुढची वाटचाल करायची! मला या गोष्टीशी कसल्याही अटीवर कॉम्प्रोमाईज करायचंच नव्हतं. मी त्यानंतर पीजीआय सोडली आणि उत्तर प्रदेशातल्या एका आदिवासी भागात आरोग्याचं काम करायला निघून गेलो.

अशी द्वंद्वं आपल्यापुढे सतत येतच राहतात. अशा वेळी निवड करणं महत्त्वाचं ठरतं. अर्थात, पीजीआयच्या बाबतीत मुळात तिथे जाण्याची चूक मी स्वतःहूनच केली होती आणि त्यातून मला खूप शिकायलाही मिळालं. असो.

अशीच आणखी एक चूक म्हणावी अशी गोष्ट मी आयुष्यात वारंवार केली आणि अजूनही ती करण्याचा मोह अनेकदा होत असतो... आणि ही चूक म्हणजे, सरकारसोबत काम करणं. मी आणि राणीने गडचिरोलीला काम करण्याचा निश्चय केला आणि तिकडे गेलो; तेव्हा महाराष्ट्राचे हेल्थ सेक्रेटरी आम्हाला म्हणाले की, ‘या भागात दुसरं कुणीच जायला तयार होत नाहीये. तुम्ही दोघंही तिकडे जातच आहात, तर आमचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुधारून द्या.’ मी त्या सेक्रेटरींचं ऐकलं आणि गळ्यात एक भानगडच लावून घेतली. आम्ही सरकारी नोकर नव्हतो; पगारही घेत नव्हतो, पण सरकारसाठी वेळ देत होतो. मात्र या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या भानगडीपायी अशीही वेळ अनुभवायला लागली की, माझ्या आणि राणीच्या विरोधात विधानसभेत एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा प्रश्न विचारण्यात आले. अभय आणि राणी बंग हे अमेरिकेच्या सीआयएचे एजंट आहेत... ते खासगी प्रॅक्टिस करून आदिवासींना लुबाडत आहेत... असे बेछूट आरोपही आमच्यावर झालेत.

 ...हे असं त्रांगडं सरकारसोबत अनेकदा पाहायला मिळतं. आम्ही सरकारी रुग्णालय सुधारायचा प्रयत्न केला; तर लक्षात आलं की, ही संपूर्ण व्यवस्थाच वरून खालपर्यंत अशीच आहे- तिला प्रेरणा तरी नाही किंवा ती भ्रष्ट तरी आहे. काही जण प्रेरणा नाही म्हणून, तर काही भ्रष्ट आहेत म्हणून काम करीत नाहीत, जे थोडे काही उरतात, त्यांच्या भरवशावर ही व्यवस्था सुरू असते. पण व्यवस्थेचा भाग बनण्याची चूक केली की, मग त्याचे असे शिंतोडे हे उडतातच!

पुढे दारूबंदीसाठी आम्ही उभे राहिलो. दारूबंदी व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारविरुद्ध आमचं आंदोलन तब्बल सहा वर्षं चाललं. आंदोलन सुरू असूनही शासन दारू बंद करेचना. गडचिरोलीच्या जंगलात आम्ही एकटे होतो. सरकार आम्हाला साथ देत नव्हतं. दारूवाल्यांच्या जिल्हा संघटनेने त्यावेळी जाहीरपणे गडचिरोलीच्या चौकात भाषण करत आम्हा दोघांचे मुडदे पाडण्याची धमकीही  दिली होती. गडचिरोलीत समजा मुडदे पाडले, तरी तसाही कोणाला पत्ता लागणार होता?... मी कामासाठी बाहेर जायचो आणि घरी राणी अन्‌ आमची दोन लहान मुलं असायची. मी घरी परतायचो त्या वेळी आपली बायको- मुलं जिवंत दिसतीलच, याची खात्री वाटत नसायची...

सरकारशी संबंध आला की- असं हताशा, चीड, संताप याच गोष्टी पुढ्यात येतात, हा माझा अनुभव आहे!... हे असे अनुभव घेत-घेत आताशा मी एका ठोकताळ्यापर्यंत येऊन पोचलोय. तो असा की- एकीकडे तुम्हाला व्यापक बदलासाठी सरकारसोबत संघर्ष सतत सुरूच ठेवावा लागतो, पण सोबतच शासनाव्यतिरिक्त अन्‌ शासनमुक्त अशाही काही उपाययंत्रणा सोबतीला तयार करत राहायला हवं. हो, हे करायलाच लागतं. त्यामुळेच, जेव्हा आमच्या लक्षात आलं की, शासन गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीसंदर्भात अजूनही पुरेसं गंभीर नाही; तेव्हा आम्ही आमच्याच पातळीवर गडचिरोलीपुरता दारूमुक्तीचा प्रयोग राबवला. राज्य शासनाची वाट बघणार नाही, असं म्हणत आम्ही दारूबंदीच्याऐवजी दारूमुक्तीची हाक लोकांना दिली होती. आमचं गाव आम्हीच दारूमुक्त करू, असं घोषित  करण्याचं पाऊल आम्ही उचललं. शेवटी, दारूमुक्ती ही माझ्या हातात आहे, माझ्या गावाच्या हातात आहे; त्यासाठी मला महाराष्ट्र शासनावर अवलंबून राहायची गरज नाही.

महाराष्ट्र शासन काय किंवा कोणतंही शासन काय- ते जर खेड्यात योग्य आरोग्यसेवा देत नसेल तर, मग अशा वेळी खेड्यातल्याच बाईला चांगल्या आरोग्याचं प्रशिक्षण देत सक्षम का करू नये? त्यातून आपोआप घरोघरी जागृती नाही का होऊ शकणार? आरोग्याचे प्रश्न नाही का सुटू शकणार?... असा विचार आम्ही केला. मग यातून पुढे आलं ते आरोग्य स्वराज्य. ग्रामीण महिलांना आरोग्याचं प्रशिक्षण देऊन लहान मुलांचा न्यूमोनिया, नवजात बालमृत्यू हे सारं त्यामुळे नियंत्रणात येऊ शकलं.

विवेक सावंत : अशा कसोटीच्या प्रसंगी कम्युनिटी राहते तुमच्या पाठीशी उभी? असते का लोकांची साथ?

डॉ.अभय बंग : अर्थातच हो! ज्या वेळी आमच्या दोघांच्या खुनाची धमकी देण्यात आली, त्या वेळी गावागावातले आदिवासी आणि आदिवासी नेते एकत्र झाले. तसे गोंड आदिवासी हिंसक नसतात. पण या वेळी त्यांनी एकत्र येत त्या दारूवाल्यांना स्पष्ट सुनावलं की सहसा आम्ही हिंसक नाही. पण या दोघांना जर तुम्ही हात लावलात, तर तुमचं एकाचंही घर या शहरात राहणार नाही... ही होती कम्युनिटीची साथ!

विवेक सावंत : बाबा, तुमचा ‘मी कोण आहे?’ हा प्रवास अगदी आजही सुरूच आहे, हे आम्ही सगळेच एव्हाना जाणतो. पण एके दिवशी तुम्हाला ‘मी कोणाचा आहे?’ याचा शोधही अपघातानेच का असेना, पण लागला. आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल, तो शोध तुम्हाला कसा लागला? आणि त्या वेळी तुम्हाला ‘युरेका युरेका’ असं काही झाल्यासारखं वाटलं होतं का?

डॉ.अनिल अवचट : विवेक, तू जसा प्रश्न विचारलायस ना, अगदी तसाच्या तसा मी तो घेत नाहीये... पण तरी त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. हे ‘युरेका’ घडलं बिहारमध्ये... ते युरेका ‘हसी’चं नव्हंत, तर त्यात प्रचंड कारुण्य भरलेलं होतं.

बिहारच्या दुष्काळात आम्ही त्या वेळी हजारभर लोकांचं एक अन्नछत्र चालवत असू. तिथे अन्नासाठी खूप लांबून लोक यायचे. आम्ही ते अन्नछत्र एका मठात चालवायचो. एके दिवशी सकाळी आम्ही जेव्हा मठाचं दार उघडलं, तेव्हा बाहेर पायरीवर एक बाई पडलेली दिसली. बेशुद्ध होती बहुधा. विरलेली ती पांढरी मळकट साडी. समोर चार-सहा लोक उभे होते. ते म्हणाले, मर गई हैं शायद... हो, ती मेलीच होती. इथे अन्न मिळतं हे तिला बहुधा कुठून तरी कळलं असावं, म्हणून ती आली होती. तिने दारही वाजवलं असावं, पण आम्हाला ते कळलं नाही आणि ती गेलीच हो... मेली!... एक घास जरी मिळाला असता, तरी तो जीव वाचला असता... एक घास फक्त! आपण तर किती सारं अन्न टाकून देतो, किती नासाडी करतो!

...हे सगळं माझ्या अक्षरशः अंगावर आलं. आपलं जगणं आणि त्या बाईचं मरणं डोळ्यांपुढेच येत होतं... आणि त्याच क्षणी मी त्यांचा झालो. मी कुणाचा? तर, मी गरिबांचा हे उत्तर मला तेव्हा मिळालं.

त्या झुमरीतलय्यामध्ये सगळ्या अभ्रकाच्या खाणी आहेत. या अभ्रकाचे कण-कण हवेत सतत उडत असतात. ते कण तिथे काम करणाऱ्यांच्या नाका-तोंडात जाऊन छाती भरली की, त्यांना क्षय होतो आणि मग अगदी पंचवीस-तीस वर्षांची माणसंही मरतात हो, अशी डोळ्यापुढे! त्या गावात या वयापेक्षा जास्त माणूसच कुणी नाही, कारण त्यापेक्षा जास्त कुणी जगतच नाही. अशात, आम्ही तर तिथे जाताना टीबीची औषधंही नेली नव्हती. आणि समजा औषधं असतीदेखील, तरी पोटात अन्न नसताना कुठली ट्रीटमेंट लागू पडणार आहे?... शक्यच नव्हतं ते. तिथल्या लोकांना कुपोषणाचा, गरिबीचा, दारिद्य्राचा आजार जडला होता. मी हे सारं पाहिलं आणि माझी सारी आजवर पाहिलेली अन्‌ रंगवलेली जीवनस्वप्नं जणू तत्क्षणी विरूनच गेली. एक विलक्षण उद्विग्नता आली मला ते सारं चित्र पाहून. तिथून माझं आयुष्य बदललंच.

याआधीच्या आयुष्यात असणारी माझी सारी स्वप्नं ही आई-वडिलांनी तयार करून दिलेली होती. बंगल्याचं स्वप्न, मोटारीचं स्वप्न, मोठ्या हॉस्पिटलचं स्वप्न, देखण्या बायकोचं स्वप्न... पण बिहारमधल्या त्या मृत्यूने आणि लोकांच्या तिथल्या जगण्याने या स्वप्नांना कधीच विरघळवून टाकलं. त्यांतली फोलता, निरर्थकता माझ्या लक्षात आली होती. मला सांगा- आपण कितीही जरी मोठे झालो आणि ती माणसं अशी राहिली, तर आपल्या मोठं होत जाण्याला काय अर्थ आहे?...

मला आठवतं, मीही सुरुवातीला एका सुंदर मुलीच्या  प्रेमात पडलो होतो. पण खरं सांगतो, जेव्हा ती मला प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटली; तेव्हा मी अक्षरशः अर्ध्या तासात तिच्यापासून पळालोच. नुसता तिच्यापासून नाही, तर त्यानंतर मी सौंदर्यापासूनच पळालो! तुम्हाला सांगतो,

त्या सौंदर्यात काहीही नव्हतं हो... फक्त दिसायला सुंदर, पण आत काहीही नाही. माणूस म्हणून आपल्याकडे अंतःस्थ सौंदर्यही असायला हवं की नको?... पण त्या सुंदर मुलीच्या बाबतीत खरं सांगायचं तर रंगरंगोटी केलेला चेहरा आणि अंदर कुछ नहीं, अशीच परिस्थिती होती. तो चेहरा म्हणजे जणू तिचं विश्वच होतं. मला त्यातलीही निरर्थकता जाणवली. मला आठवतं, मी त्याच्यावर एक दोहासुद्धा रचला होता-

‘त्वचा बाहरी को कितना सजाते,

वो कपडे, वो गहने, वो इत्तर फुवारे...

अंदर छुपायें मन गंदगी को,

ले हाथ झाडू, कर सांफ सुतरे।’

या प्रकरणानंतर मी सुंदर मुलीच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर मला सुनंदा भेटली. ती काही सुंदरबिंदर नव्हती. चारचौघींसारखीच दिसणारी होती. पण मी तिच्या गुणांवर लुब्ध झालो होतो. गुणांवर लुब्ध होणं, हे आधीच्या सुंदर मुलीने मला शिकवलं होतं. सुनंदा स्वावलंबी होती, नीटनेटकेपणाची तिला आवड होती, इतरांचा ती सतत विचार करत असायची. मला जाणवलं होतं, हीच मुलगी आपल्याला आयुष्यभराची साथ देऊ शकेल ते...

विवेक सावंत : ...आनंद, तुम्ही सुनंदाताईंचं वर्णन खूप छान केलंय. त्यांच्या कोपिंगच्या ज्या काही महत्त्वाच्या क्षमता होत्या, त्याविषयी सांगा ना जरा... म्हणजे बाबांनाही त्यांच्याकडून जो सपोर्ट मिळाला होता, त्याविषयीही आम्हाला जरा अधिक कळू शकेल. शिवाय, सुनंदाताई तुमच्या ‘रोल मॉडेल’सुद्धा होत्या...

डॉ.आनंद नाडकर्णी : हो, सांगतो. संधी मिळालीच आहे, तर मग मी जरा राणीवहिनीबद्दलही बोलतो आणि सुनंदाबद्दलही बोलतो. म्हणजे मग, त्या दोघींच्याही स्ट्रेंथ्स या दोघांना (बाबा आणि अभय) कशा पूरक ठरत गेल्या, याबद्दल आपल्याला बोलता येईल.

सुनंदाविषयी सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, ती फारच वास्तवाशी जोडून असलेली स्त्री होती. तिला समज होती की- ज्याला साखळी घालताच येत नाही, त्याला सोडून द्यावं!... थोडक्यात, ‘मुक्त तो रात्रंदिनी, त्यासी कारागृहाच्या भिंतींत कोंडुनी’ होणार तरी काय आहे, हे तिला पुरतं ठाऊक होतं. तिने बाबाचं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य जाणलं होतं. त्यामुळे शहाणपणा जो म्हणतात, तो आपण   सुनंदाकडून शिकावा; असंच मी म्हणेन.

खरं सांगू का?... हे असं स्वातंत्र्य बाबाला सुनंदाने दिल्यामुळेच तो सतत बंधनात राहिला! खरं तर, हा नात्यांमधला मास्टरस्ट्रोक आहे आणि तो आपण सगळ्यांनीच शिकायला हवा (माझी बायकोही तो अनेकदा उपयोगात आणत असते.) नाती कशी असावीत आणि जपावीत, हे मी सुनंदाकडून खूप शिकलो. यासोबतच, इतरही अनेक गोष्टी तिच्याकडून मला कळत-नकळत शिकायला मिळाल्या. विशेषत: तिला जेव्हा आपल्याला कॅन्सर झाल्याचं कळलं, त्यानंतर तिने ज्याप्रकारे या आजाराबरोबर कोप केलं- त्याला अतिशय संयमाने ॲक्सेप्ट केलं- ते सारंच आपणही आत्मसात करावं असंच होतं. कॅन्सरसारख्या आजाराचा उपयोग करून सुनंदाने स्वतःला अधिक चांगलं माणूस केलं.

सुनंदाला मी कॅन्सर होण्याच्या आधीही बघितली होती आणि नंतरही... तिच्यात रुग्णांची आई होण्याची क्षमता खूप आधीपासूनच होती, हे अनेकांना ठाऊक होतं. पण, कॅन्सरनंतर तिच्यातलं हे मातृत्व ज्या विलक्षण पद्धतीने विस्तारलं, ते म्हणजे तिने स्वतःवर केलेलं काम होतं. तिच्याकडून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे.

याच संदर्भात मला बाबाबद्दलही बोलायचंय. नात्यांमध्ये आरोग्याच्या अन्‌ वेगवेगळ्या परिस्थितीच्या काही टप्प्यांवरती जेव्हा तुमच्या सहचराला तुमची गरज लागते, तेव्हा जे करायला हवं ते बाबाने सुनंदाच्या बाबतीत पूर्ण डिव्होशनने केलं... हे मी स्वतः पाहिलंय. एकीकडे तो कितीही बालसुलभ पद्धतीने आणि निरागसपणे आपल्यापुढे येत असेल, तरीही ज्या वेळी बाबा हा सुनंदाचा ‘केअर गिव्हर’ या भूमिकेत होता, तेव्हा ज्या पद्धतीने तो तिची काळजी घ्यायचा; त्यातून मी त्यांच्या सहजीवनाबद्दलही खूप काही शिकलो.

आता मी राणीवहिनी आणि अभयदादाबद्दल बोलणारेय. या दोघांकडूनही आणि त्यांच्या नात्यामधूनही मी खूप काही शिकलोय. खरं तर, या दोघांचीही प्रकृती म्हणजे अतिशय भिन्न-भिन्न. दोघांच्या टेम्परामेन्ट भिन्न आहेत... अनेकदा तर या दोघांच्याही प्रायॉरिटीजसुद्धा परस्परांपेक्षा भिन्न-भिन्न असतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्यातले मतभेद हे दोघं अगदी कडाडून एकमेकांपुढे ठेवतात देखील!... पण एवढं असूनही ते एकमेकांबद्दलचा आदर जराही गमावत नाहीत. हे या जोडप्याकडून मला शिकता आलं. या दोघांत सुसंवाद तर आहेच; पण जेव्हा त्यांच्यात मतभेद असतात, तेव्हाही एकाच ध्येयावर काम करताना त्या मतभेदांचाही उपयोग तुम्ही आपल्या नात्यासाठी कॉम्प्लिमेंटरी कसा करून घेणार, हे यांच्याकडून आवर्जून शिकावं! यांचं ‘सर्च’मधलं कामही मी पाहत आलोय. अभयदादाचं काम असतं वैचारिक. तो मुळामध्ये एक संशोधक आहे. तर, वहिनी ही मुळात डॉक्टर आहे. पण, या दोघांनी एकमेकांना पूरक ठरत आपल्या सहजीवनाचं शब्दशः संयुगच तयार केल्याचं दिसून येईल.

म्हणूनच, सहजीवनामधून संयुग कसं तयार करावं, यासाठीची अभय-राणी व अनिल-सुनंदा ही दोन जोडपी म्हणजे माझी रोल मॉडेल्सच आहेत. आणि त्यामुळेच की काय- पण सुनंदा आज जरी नसली, तरी ते सहजीवन आजही आहेच...

(डॉ.अनिल अवचट : आनंद, ते संयुग नसून ‘ॲलॉय’ आहे...)

विवेक सावंत : अभय, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आजच्या दिवशी एकूणच समतोलाची थीमच पुढे नेण्याचं आनंदने ठरवल्याचं दिसतंय. त्याच थीमला धरून मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचंय की, विधायक कार्य आणि संघर्ष या दोहोंतला समतोल तुम्ही कसा राखता?

 डॉ.अभय बंग : मी म्हणेन की, विधायक कार्य आणि संघर्ष या दोन्हींतला विरोधाभास हाच मुळी भ्रामक आहे. दिवस आणि रात्र असे दोन्ही मिळूनच एक दिन होत असतो. पण फक्त दिवसानेच दिन होतो किंवा रात्रीनेच दिन होतो, असं म्हणणं ही अर्धदृष्टीच ठरेल. याच पुण्याने शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी टिळक आणि आगरकर असा संघर्ष पाहिला आहे. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, हा तो संघर्ष. वस्तुतः, या दोघांत तसं विभाजन नव्हतंच मुळी. गांधींनी येऊन त्या दोन्हींना एकत्र करून टाकलं, कारण विरोध नव्हताच मुळी; विरोधाचा केवळ भास होता!

याच अनुषंगाने या प्रश्नाकडे आपण पाहायला हवं. न्यायासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करतो. पण विधायक कार्य म्हणजे, त्या प्रश्नावर काही उपाय शोधून तो प्रत्यक्षात जीवनात आणि समाजात आचरणात आणणं होय.

गंमत म्हणजे- विधायक कार्याने समाज बदलावा, की संघर्षाच्या आधारावर समाज बदलावा- अशा चर्चा  भारतात वर्षानुवर्षं सुरू राहिलेल्या आहेत. मी या दोन्ही बाजूंचा अनुभव जवळून घेतलाय. जयप्रकाश नारायणांच्या युवा आंदोलनात मी होतो. दारूबंदी चळवळ केली. शेतकरी आंदोलनात भागही घेतला. त्यातून मला संघर्षाचा अनुभव आलाय. आणि दुसरीकडे, आरोग्य सुधारण्यासाठी अनेक रचनात्मक छोटे-छोटे उपायही आम्ही शोधत असतो. पण मला कधीही या दोन्हींत काहीही विरोधाभास दिसून आलेला नाही.

...आता एक रूपक घेऊन मी या दोहोंमधला संबंध समजावून सांगतो. बघा- मी खादी घालतो. खादी घालण्याच्या त्या एका कृतीतून मी काय काय साध्य करतो, हे पाहायचंय?... तर, पहिली गोष्ट म्हणजे, खादीमुळे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळतो. कारण, खादी हे कापसाचं वस्त्र आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून मी आंदोलनही करू शकतो; पण सोबतच जर मी कॉटनचे कपडे घातले, तर शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळेल... मी खादी घालतो, कारण त्यामुळे विणकर, कातकरी यांच्या हाताला काम मिळतं! मजुरांना मजुरी मिळते. मी त्या मजुरांचं आंदोलनही करू शकतो आणि तसं केलंही पाहिजे, पण मी खादी घालूनदेखील त्यांना रोजी मिळवून देतो... मी खादी घालतो, कारण खादी पर्यावरण- फ्रेंडली आहे. रिन्यूएबल आहे. ऑरगॅनिक आहे, अर्थात, एकीकडे मी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंदोलनही करू शकतो आणि दुसरीकडे मी अंगावर खादीचं वस्त्र घालूनदेखील पर्यावरण वाचवत असतो... थोडक्यात, आपल्या लक्षात आलं असेल की- या खादीमध्ये अशा अनेक संघर्षांची रचनात्मक बाजू आहे आणि त्यामुळेच मला कधीही ‘हे की ते’ असा प्रश्न पडत नाही.

माझी अशी व्यक्तिशः मांडणी आहे की, एकट्या माणसालादेखील राजनैतिक कृती करता येते आणि परिवर्तन घडवता येतं. आणि आत्ता मी सांगितलं तसं, या खादीसारख्या छोट्या-छोट्या उपायांमधून आपण परिवर्तनच तर घडवत असतो. हा राजकीय बदलच आहे.

बालमृत्यूच्या प्रश्नावर आम्ही महाराष्ट्र शासनाविरुद्ध संघर्षही केला; पण त्याच वेळी गडचिरोलीच्या गावांमधून हे बालमृत्यू कसे कमी करता येतील, यावर आम्ही प्रयत्नपूर्वक उपायही शोधला. त्यातून बालमृत्यू कमी करण्याचं एकूण कामच उभं राहिलं. शासनाशी केलेल्या संघर्षातून शासनावर काही प्रमाणात का असेना, पण जनमताचा दबाव निर्माण झाला. त्यातून तो मुद्दा त्यांना गांभीर्याने घ्यावा लागला. आणि जो उपाय आम्ही गडचिरोलीत विकसित केला, तो केवळ महाराष्ट्र शासनानेच नव्हे, तर भारत सरकारनेदेखील राष्ट्रीय कार्यक्रम म्हणूनच सहा लाख खेड्यांत लागू केला! त्यामुळे रचनात्मक काम आणि संघर्ष यांच्यात विरोधाभास न बघता त्यांना एकत्र कसं करता येईल, हे आपण पाहायला हवं. हे दोन्ही एकत्र करत काम करता येतं. मला त्याची किल्ली गांधींमध्ये सापडते. ती जादू त्या माणसात होतीच, म्हणूनच त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं- बी द चेंज युअरसेल्फ, दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड- हे ते वाक्य!... आपल्या जीवनातच जर ते परिवर्तन आणण्यास सुरुवात केली, तर ते रचनात्मक कामही आहेच आणि दुसरीकडे त्या प्रचंड मोठ्या व्यवस्थेशी असणारा तो एक संघर्षसुद्धा आहेच. हे एक अद्वितीय असं अद्वैत गांधींना साधलं होतं, त्याचाच छोटासा तुकडा उचलून स्वतः अंगीकारू पाहतो- बस्स, एवढंच.

डॉ. अनिल अवचट : आनंद, सामाजिक काम करता-करता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा मेळ तुम्ही कसा घालता? आजच्या युवांना पडलेला हा एक फार मोठा प्रश्न आहे...

डॉ.आनंद नाडकर्णी : सांगतो. असं बघा- अलीकडच्या काळात आपण जितके व्यक्तिवादी होत चाललो आहोत ते पाहता, आपल्यात वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसावीच, असं होऊ शकत नाही. किंबहुना, बहुसंख्य लोकांना त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणारच, ही परिस्थिती अन्‌ वास्तव आपण आधी लक्षात घ्यायला हवं. ज्यांची ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा खूप आधीच विलीन पावली आहे, असे फारच थोडे असतात. त्यामुळे आपल्याला या प्रश्नात उपस्थित केलेल्या परिस्थितीची जरा वेगळी मांडणी करावी लागेल.

...प्रश्न हा नाहीचेय की, कुणाला वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असावी की असू नये; खरा महत्त्वाचा प्रश्न असाय की या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कोणतं वळण द्यावं? मग आपल्या लक्षात येऊ लागतं की, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला विस्ताराचं वळण देता येणं शक्य आहे. असं केलं तर तिचं रूपांतर सामूहिक महत्त्वाकांक्षेमध्ये होणं शक्य आहे. पण यानंतरही सामूहिक महत्त्वाकांक्षा कुठल्या उद्दिष्टासाठी आहे, हेही महत्त्वाचं ठरतं. अन्यथा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला सामूहिक महत्त्वाकांक्षा करण्याचा मार्गही एका मर्यादेनंतर अपूराच ठरतो. मग काय हवं?... तर ते उद्दिष्ट असं असायला हवं की, ज्याच्यामध्ये मी अधिक चांगला माणूस होण्याची शक्यता आहे आणि माझ्या सोबतीला असणाऱ्या समूहाच्या जीवनामध्येदेखील काही ना काही बदल होण्याची शक्यता आहे, असं जर मी केलं, तर मी माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला हळूहळू विस्तारत नेऊ शकतो. दुसरं म्हणजे, जसं मी मघाशीच बोललो तसं- आपले मटेरियल गोल्स आणि आपले इमोशनल गोल्स यांची सांगड घालणं.

तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपला फोकस कोणत्या वेळी आणि काय असावा, हे आपलं आपल्याला समजायला हवं! उदाहरणार्थ : आपली ध्येयं- उद्दिष्टं पुढे नेण्याची एखाद्याला महत्त्वाकांक्षा असेल, तर ती का बरं असू नये?... असायला हवी. काही हरकत नाही. पण हो, त्याची उतरंड काय असावी, तेही आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजे असं- माझा जो विषय आहे, तो सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर मी ज्या भागात काम करतोय ते उद्दिष्ट आहे, पण तेही माझ्यापेक्षा मोठंच आहे. त्या उद्दिष्टाकडे जाणारा प्रवास सगळ्यांनी मिळून करायचाय, तो गटही माझ्यापेक्षा मोठाच आहे... आणि ह्या सगळ्याचा मी एक भाग आहे, सगळ्यात छोटा... मला वाटतं, हे अशा प्रकारे जर आपण आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेकडे पाहिलं; तर ती खूप अर्थाने विलीन होत जाईल, शुद्ध होत जाईल.

मुळात आपली महत्त्वाकांक्षा काय असावी, कशी असावी अन्‌ तिचा विस्तार कसा असावा, हेही आपल्याला कळायला हवं. नाही तर, आज मी ४० पेशंट्‌स तपासून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि उद्या ऐंशी पेशंट्‌स बघून समजा त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले, तर ती महत्त्वाकांक्षा मानावी का?... नाहीच! त्यामुळेच, खरी महत्त्वाकांक्षा काय, हे समजणंसुद्धा गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्यानुसार आपल्याला आपली अख्खी जीवनशैली बदलता आली पाहिजे.

मला आठवतं, मी माझी डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरू केली, त्या वेळी लोक मला म्हणाले- अरेव्वा! आता तू जाम पैसे कमावणार!... पण मी स्वतःला बजावून ठेवलं होतं की, मी माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बाहेर पडतोय; पैसे कमावण्यासाठी नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीला मी माझं स्वतःपुरतं असं एक ठरवून घेतलं- ते म्हणजे, मी माझी खासगी प्रॅक्टिस टप्प्याटप्प्याने कमी करेन. आणि मी त्यानुसार माझं पुढच्या तीस वर्षांचं टाइमटेबल तयार करून टाकलं होतं! आणि त्याचनुसार मी पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यावर माझी खासगी व्यावसायिक प्रॅक्टिस पूर्णपणे बंदच केली आणि आता मी पूर्णतः संस्थेशी निगडित कामं करत राहिलो आहे... थोडक्यात, मला म्हणायचंय ते असं की- हळूहळू जरी आपण आपली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा एखाद्या निश्चित व्यापक ध्येयाकडे नेली, तरी ती विलीनता निश्चित एका टप्प्यावर आपल्याला अचिव्ह करता येते. एकदा ही विलीनता आली की, आपल्यातही मग लीनता आपोआप येतेच...

विवेक सावंत : अभय, तुमच्या संपूर्ण सामाजिक कार्याला संशोधनाचा आणि नव्या ज्ञानाच्या निर्मितीचा असा एक भक्कम पाया नेहमीच लाभत गेलाय. आज ज्याला ‘नॉलेज सोसायटी’ म्हणतात आणि नव्या कर्मशील ज्ञानाच्या निर्मितीतूनच खरे सामाजिक प्रश्न सुटतात असं जे म्हटलं जातं, ते तुम्ही तीस वर्षांपूर्वी कसं हेरलं? सामाजिक प्रश्न हे मटेरियल इनपुट किंवा एनर्जी इनपुट किंवा  फायनान्शियल कॅपिटल इनपुट किंवा मग लेबर इनपुट यांच्याऐवजी नॉलेज इनपुटने सोडवणं आवश्यक आहे- ही आदर्श बैठक तुम्ही तरुणांना कशी मिळवून दिलीत? महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाला हात घालत तुम्ही ‘मदर अँड चाइल्ड’ ऐवजी ‘वुमन अँड चाइल्ड’ अशी संकल्पना पुढे आणली आणि जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ती स्वीकारली... आपल्या संशोधनातून असे जागतिक पातळीवरील अनेक परिणाम घडवून आणणारी ही सगळी वाटचाल कशी होती तुमची?

डॉ.अभय बंग : मी जेव्हा तरुण होतो, तेव्हा साधारणतः दोन प्रकारची सामाजिक कामं प्रचलित होती आणि कदाचित आजही तीच दोन प्रकारची सामाजिक कामं प्रचलित आहेत. एक आहे- भावुक प्रतिसाद आणि दुसरं आहे- भडक प्रतिसाद!... त्यामुळे आजही एखादा सामाजिक प्रश्न पुढ्यात दिसला की, काही जण लगेच अतिशय भावुक होऊन सेवा करायला लागतात. उत्तम! दोन गरजूंना ती सेवा मिळते, पण पुढे? आणि दुसरीकडे काय दिसतं? दुसरीकडे दिसतं असं की, काही जण अतिशय भडकपणे कसली तरी स्लोगन्स, आंदोलनं, मोर्चे काढतात. खरं तर, ह्या अशा दोन्ही ॲप्रोचेसची समाजाला गरज आहे आणि ती नाकारण्याचं काही कारणही नाही. पण जेव्हा मी या दोन्ही पद्धती माझ्या सुरुवातीच्या काही वर्षांत वापरून पाहिल्या, तेव्हा मला या दोन्हींच्या काही तीव्र मर्यादा लक्षात आल्या. अति-भावुक होऊन किंवा अतिभडकून-सुद्धा फार काही प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात येत गेलं!

सेवेमुळे काही जणांना काही वेळेपुरता उपयोग नक्कीच होतो, पण त्याच्यामुळे एखादी समस्या कायमची सुटलीय असं मात्र होत नाही. तो तात्पुरता उपचारच ठरतो. तर, दुसरीकडे निव्वळ संघर्ष करत राहिला, तरीही प्रश्न मुळापासून कधीही सुटत नाहीत. दुसऱ्याला निव्वळ शत्रू कल्पून त्याच्याशी कसं लढायचं आणि विजय कसा मिळवायचा, हाच विचार तेवढा आपण करत बसतो. समस्या आहे तशीच राहते...

आता काय करायचं, हा प्रश्न तर समोर होताच. या मर्यादांवर मात करेल, असा मार्ग शोधणं आवश्यकही होतंच. त्याच वेळी योगायोगानेच एक प्रसंग घडला, ज्यातून मला माझा मार्ग सापडला. झालं असं- १९७९ मध्ये राज्यातल्या मजुरांची किमान मजुरी चार रुपये एवढी ठरवण्यात आली होती. त्याच काळात मी मजुरांचं संघटन करत होतो आणि त्यांची मजुरी वाढवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण मजुरी काही केल्या वाढत नव्हती, कारण ती सरकारची निश्चित केलेली सीमाच होती. मग मी समोर दुसरा काही पर्याय न दिसल्याने ही चार रुपयांची सीमा मुळात ठरवली तरी कोणत्या आधारावर, हे शोधायला सुरवात केली. पुढे कळलं की, ही सीमा ठरवली होती ती सरकारने नेमलेल्या पागे समितीने... आता प्रश्न होता या समितीचा अहवाल मिळवण्याचा. झेरॉक्स आलेले नव्हते, माहिती अधिकारात हवी ती सरकारी माहितीही मिळवता येण्याची सोय नव्हती; अशा त्या काळी मी मंत्रालयात जाऊन तिथल्या एका कारकुनाशी दोस्ती केली आणि मोठ्या खटाटोपानंतर पागे समितीचे मिनट्‌स मिळवले.

समितीच्या नोंदी वाचून मला धक्काच बसला. मला असं आढळलं की, या नोंदींमध्ये त्यांनी अनेक वैज्ञानिक चुका करून ठेवल्या आहेत. एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मला ते चट्‌कन लक्षात आलं होतं. आहारात काय काय गोष्टी असायला हव्यात, किती प्रमाणात असायला हव्यात अशा अनेक गोष्टींवर या समितीने काढलेले निष्कर्ष आणि त्यासाठी उपयोगात आणलेले आधार हे दोन्हीही चुकले होते! मग मी माझ्या विज्ञान अभ्यासाच्या आधारे एक नवा निष्कर्ष काढला. त्यानुसार किमान बारा रुपये तरी मजुरी असायलाच हवी, असं मी मांडलं. ...पुढे हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संघटनांनी उचलून धरलं. माझा वैज्ञानिक अभ्यास हे त्यांच्या हातातलं शस्त्र बनलं. पुढच्या दीड वर्षात महाराष्ट्र सरकारने (त्या वेळी साठ लाख मजुरांची) मजुरी चारवरून बारा रुपये केली.

हे मजुरीचं प्रकरण माझ्यापुरतं त्या वेळी म्हटलं तर संपलं होतं. पण, मी विचार करायला लागलो- गेली दोन वर्षं या मजुरांचं संघटन मी बांधत होतो. त्यांच्यावर वेळोवेळी वैद्यकीय उपचार करत होतो. त्यातून काहींचं थोड्याफार प्रमाणात कदाचित भलंही झालं असेल, पण त्यातून फार काही प्रश्न सुटत नव्हता... आणि हे समितीच्या नोंदींतील चुका शोधण्याचं आणि त्यातून परिवर्तन घडवण्याचं काम अक्षरशः तीन महिन्यांच्या अवधीत झालं होतं. कशाची होती ही ताकद? ही ताकद माझी नव्हती, ही ताकद होती विज्ञानाची!

स्त्रियांना किती प्रमाणात स्त्री-रोग आहे, याविषयी गडचिरोलीच्या ज्या दोन गावांत आम्ही संशोधन केलं; ते केवळ दोन गावांचं असलं, तरीही ते थेट ‘लॅन्सेट’ला प्रकाशित करावंसं वाटलं. जागतिक आरोग्य संघटनेला तिच्या धोरणांचा पुनर्विचार करायला या संशोधनाने भाग पाडलं. हे सगळं घडलं, त्यासाठी आम्हाला मोर्चे नाही काढावे लागले, ना आम्ही कुठलं आंदोलन उभारलं. गरज पडली तर तेही करावं लागतं, हे मी मान्य करतोच; पण त्याचा परिणाम हा स्थानिक असतो. विज्ञानाचा परिणाम मात्र वैश्विक असतो...

हे म्हणजे त्या आर्किमिडीजच्या गोष्टीसारखं आहे. आर्किमिडीज त्याच्या राजाला म्हणाला, ‘तुम्ही मला पुरेशा लांबीची तरफ द्या, पृथ्वीच्या बाहेर उभं राहायची जागा द्या, मी अख्खी पृथ्वी माझ्या हातांनी उचलून दाखवतो...’ लोक आर्किमिडीजला हसले. त्याचं हे विधान त्यांना निरर्थक वाटलं. पण आर्किमिडीजच्या पाठीशी विज्ञान होतं. त्याच्या म्हणण्याला वैज्ञानिक सूत्रांचा आधार होता. तो तरफेच्या तत्त्वाच्या आधारे (लिव्हर प्रिन्सिपल) बोलत होता.

मला वाटतं, आम्ही गडचिरोलीत हीच आर्किमिडीजची लिव्हर वापरली. आर्किमिडीजचे हात कमजोर आहेत. त्याच्यात फार काही बळ नाहीये; पण त्याला मिळालेली ताकद जी आहे, ती त्या विज्ञानाच्या लिव्हरची आहे!

गडचिरोलीतल्या कोपऱ्यात असलेल्या त्या दोन-पाच गावांत बसून आम्ही जे-जे काही संशोधन करतो, ते याच तरफेच्या, लिव्हरच्या जोरावर. आज त्यामुळेच जागतिक धोरणं तब्बल तीन वेळा बदलली गेली आहेत, हे या विज्ञान साधनेचं फलितच आहे.

लक्षात घ्या, हे विज्ञानयुग आहे. समाज बदलवण्यासाठी आज सर्वांत ताकदीचा मार्ग जर कुठला असेल, तर तो विज्ञान हाच आहे. गरज आहे, ती हे विज्ञान लोकांशी जोडलं जाण्याची. अन्यथा, ज्याचा कुणाला उपयोगच नाही, असं संशोधनदेखील करता येतंच की. पण त्यातून लोककल्याण कितपत घडतंय, हा प्रश्नच असतो. त्यामुळे विज्ञान कशासाठी वापरायचं, हेही ठरवायला हवं. एखाद्या अशक्त माणसाच्या हातीही हे विज्ञान एवढं बळ देतं की, त्याच्याने खूप मोठी शक्ती उभी करता येऊ शकते. म्हणून मी असं म्हणेन की, मला एकीकडे गांधी भेटला आणि दुसरीकडे गडचिरोलीतले लोक भेटले. या दोन बिंदूंच्या मधे आमचं विज्ञानाचं आणि सेवेचं काम चालत आलंय...

विवेक सावंत : अभय, तुम्ही स्वतः गांधी आणि विनोबांच्या वास्तव्याने प्रभावित झालेल्या आश्रमात लहानाचे मोठे झालात. तुमच्या कुटुंबातसुद्धा आदर्शवादी वातावरण होतं. गांधी विचारांशी बांधिलकी होती. आजच्या पिढीकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं? आजच्या युवांनी आदर्शवादी असावं का? एखाद्या विचारसरणीशी त्यांची बांधिलकी असावी का?... कारण, आज असं म्हटलं जातं की, विचारसरणीविरहित विचार करावा. याविषयी सांगा ना...

डॉ.अभय बंग : मला असं वाटतं की, आदर्शाचा वाद करता येत नाही. त्यामुळे आदर्शवादी तर कुणीही होऊच नये. मुळात प्रश्न असा आहे की, जीवनात आदर्श का आहेत?... खरं तर, आपण आज जिथे आहोत, त्याच्या पुढच्या आणि अधिक चांगल्या टप्प्यावर जाण्याच्या दिशेने सतत प्रयत्नशील असण्याची, नवी क्षितिजं धुंडाळायची एक आंतरिक ओढ माणसात असतेच असते. त्यामुळे इथे ‘वाद’ या शब्दाची काही आवश्यकता दिसत नाही. पण हो- आदर्शाची, सतत उन्नत होत जाण्याची ओढ मात्र नक्कीच असू शकते आणि ती असायलासुद्धा हवी. त्यामुळे, आदर्शवादी व्हावं असं मी म्हणणार नाही; मात्र आदर्शाच्या आड येणारे अडथळे दूर सारत आदर्शोन्मुख व्हावं, असं मी नक्कीच म्हणेन.  

विचारसरणीबाबत मी म्हणेन की, तरुणांनी कोणत्याही विचारसरणीशी स्वतःला बांधून घेऊ नये! बांधून घेणं म्हणजे वैचारिक झापडं लावून घेणं आहे. ही झापडं लावून घेण्याऐवजी सत्य काय आहे, ते शोधावं मुक्तपणे... सत्य कदाचित काहींना आवडणार नाही, ते कदाचित आपल्या रूढ मान्यतांपेक्षा वेगळं असेल; पण तरीही विचारसरणीऐवजी सत्याचा, वास्तवाचा ध्यास घ्यावा.

अर्थात, विचारसरणीशी स्वतःला बांधून घेण्याचे दिवस संपले असल्याचं मला मान्य असलं, तरीही कोणताही विचारच असू नये, हे मात्र मला मान्य नाही. विचार वेगळा आणि विचारसरणी वेगळी. आपला स्वत:चा असा विचार हवाच. विचारसरणी मात्र तुम्हाला विचारच करू देत नाही. ती म्हणते- मी तुझ्यासाठी सगळा विचार करून ठेवला रे... तू आता फक्त या गुरूचं ऐक, या नेत्याचं ऐक, या ‘प्रेषितां’चं ऐक!... अशी विचारसरणी नको. त्याऐवजी स्वतःचा समतोल, अभ्यासू विचार हवा. मूल्यं हवीत. त्याच्या सोबतीला सदसद्‌विवेकबुद्धीची साथ हवी.

विवेक सावंत : मित्रांनो, गांधीजींनी वर्णन केलेला ‘सत्याग्रही सायंटिस्ट’ हा नक्की कसा दिसतो, तो आपल्या पुढ्यात बसल्याचं तुमच्या लक्षात आलं असेलच एव्हाना. अभय, आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही राजकारणात का नाही गेलात?...

डॉ.अभय बंग : याची उत्तरं दोन आहेत. एक- मी राजकारणातच आहे! अर्थात, हे मी उगीच शब्दांचा खेळ करण्यासाठी म्हणत नाहीये. हे खरंय की, मी रूढार्थाने पक्षीय राजकारणात नाही, निवडणुकीच्या राजकारणात नाही, मी सत्तेच्या राजकारणात देखील नाही... पण सत्तापरिवर्तनाचं राजकारण मात्र मी नक्कीच केलंय! मी जयप्रकाशजींच्या आंदोलनात आणीबाणीविरुद्ध आंदोलन केलं होतं. सत्ता अधिक योग्य व्हावी, यासाठी मी कधी आंदोलन केलंय, तर कधी त्याला समर्थनदेखील दिलंय. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मी समर्थन दिलं होतं.

शेवटी सत्ता कशासाठी हवी? तर, समाजात परिवर्तन घडवण्यासाठी. परिवर्तन करण्यासाठी जर त्याच्यापेक्षा अधिक शुद्ध आणि गतिमान मार्ग असतील, तर मी सत्तेच्या मार्गाचा लांब पल्ल्याचा द्राविडी प्राणायाम कशाला करू?... त्यामुळे मी त्या अर्थाने सत्तेच्या राजकारणात गेलो नाही.

रूढ राजनीतीच्या मार्गाने लोकांच्या हाती सत्ता येत नाही. लोकांच्या हाती सत्ता कशी जाईल, ही माझी सततची आंतरिक तळमळ राहिली आहे. नेत्यांना आणि पक्षांना मतं दिल्याने लोकांच्या हाती अजिबात सत्ता जात नाही! त्यामुळे लोकांच्या हाती सत्ता जायची असेल तर काय केलं पाहिजे, याचा मी शोध घेत असतो. गांधीजींच्या शब्दांत- मी स्वराज्याचा शोध घेतो. आता माझी शक्ती मर्यादित असल्यामुळे, मी स्वराज्याचा शोध घेण्याचा मार्ग मुख्यतः आरोग्यापुरता केंद्रित केला आहे. आरोग्याच्या बाबतीत माणसाला, समाजाला, कुटुंबांना, गावांना सक्षम कसं करता येईल, हा शोध आम्ही सारे गडचिरोलीमध्ये घेत आलो आहोत. आम्ही त्या शोधाला ‘आरोग्य-स्वराज्य’ असं म्हणतो.

हे एका माणसाचं राजकारण आहे. मोठमोठे मोर्चे काढण्याची गरज न पडता देखील मी परिवर्तन कसं करू शकतो? मग, बी द चेंज युअरसेल्फ... परिवर्तन सुरू झालं. सत्तापरिवर्तन तिथेच सुरू झालं. तुम्ही पेप्सी पिण्याचं नाकारलं की, तुम्ही एक सत्तापरिवर्तन सुरू केलंच म्हणून समजा! हे ‘नाही’ म्हणणं, हेच आहे माझं राजकारण...

विवेक सावंत : बंधू-भगिनींनो, आपल्या भारताच्या मातीतच निर्माण झालेले तीन वेगवेगळ्या प्रकारचे वारसे एकमेकांच्या आणि आपल्याही भेटीला आल्याचा प्रत्यय या कार्यक्रमामध्ये आला असेल. यांत गौतम बुद्धाचा वारसा आला, गांधींचा वारसा आला आणि कबीराचादेखील आला. हा मोठा विलक्षण संयोगच आज आपण इथे अनुभवला.

‘तुकोबांच्या भेटी शेक्सपिअर आला’ अशी विंदांची एक कविता आहे. या कवितेत दोघं एकमेकांच्या साहित्याचं गप्पांतून रसग्रहण करत जातात. शेवटी निरोप घेताना ते जे एकमेकांना म्हणतात, ते विंदांनी ज्या शब्दांत लिहिलंय ते शब्द असे आहेत- ‘कवतिका आकाशा आवरेना।’... आज पुण्याच्या अवकाशातसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली, असं मला वाटतं. आणि हे जे कवतिक आज आवरता आवरेना झालंय, त्यावर अजून कळस चढवण्यासाठी मी बाबांना विनंती करतो की, त्यांनी रचलेले काही दोहे सादर करावेत. आपणा सर्वांचे आणि या ठिकाणी आलेल्या आपल्या या तीन मित्रांचेही (आता मान्यवर म्हणणार नाही!) मनःपूर्वक आभार.

डॉ. अनिल अवचट : कबीराच्या प्रेमात जेव्हा मी बुडलो होतो, तेव्हा कबीरासारखंच मी लिहायला लागलो. त्याच्यातून हे दोहे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कबीराची छाप आहे. कबीराची जी खडीबोली आहे, त्याची छाप आहे. किंबहुना, हे दोहे खडीबोलीतच आहेत. दोह्यांना सुरुवात करतो-

ऐसा कर कुछ बंदे जिससे
दुख किसीका कम हो जाये
चाहे बने ना महल तुम्हारे
आँसू किसिके पोंछे जाये।

 २

नाग गुप्तधन राखत बैठा
लाभ ना उसको कोय
अमीर बैठे धन सम्हालत
राखत जीवन खोय।

हरेक मन में बैठा काजी
रखत नजर हमरे वर्तनपर
फँसा सकत कानून अदालत
नहीं फँसे वह काजी अंदर।

दुख जानता औरोंका जो
कर दे बंदे उसे सलाम
दुख जानकर हाथ बढाता
सर झुकाकर करो सलाम।
अपना दुख बाजूमें रखकर
मदत करें उसे लाख प्रणाम
जीवनभर यह करता आया
वही साधू बन जाओ गुलाम।

सपना तो ऐसा होवे
अपना सब भूल हि जावे
औरोंकी सोच भलाई
अपना तो मिलहि जावे।

अहंकार तो मालिक सबका
उससे निकली अवगुण गंगा ईर्ष्या,
स्पर्धा, द्वेष ना बदला गुस्सा
कर देता हैं अंधा।
अहंकार को रख काबू में
उभर आयेगी सद्‌गुण गंगा
खिल जावेगी फूलन कलिया
 मन हो जाये तृप्त सुरीला।

क्या कमाया पुछे गर तू
नहीं कमाई धन की पुंजी
 घर बनाया प्यार से भरा
इज्जत यही दौलत है हमरी।

उपर छप्पर नीचे बिस्तर
हात पाँव चलते है अक्सर
कुदरत का अहसान हि समझे
चलता है दिमाग बेहतर।   

Tags: अनिल अवचट डॉ. आनंद नाडकर्णी डॉ. अभय बंग विवेक सावंत पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना कबीर सत्याग्रही सायंटिस्ट सदसद्‌विवेकबुद्धी वैश्विक परिणाम विज्ञान पागे समिती नॉलेज सोसायटी दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड बी द चेंज युअरसेल्फ जयप्रकाश नारायण संघर्ष विधायक कार्य ॲलॉय सुनंदा अनिल राणी अभय सर्च आरोग्य स्वराज्य गडचिरोली दृष्टिकोन बदल रेझिलिएंट कर्मयोग सांख्ययोग डिझाईन आस्था एम्पथी डीकंडिशनिंग इथिओपिया भावनिक ध्येय भौतिक ध्येय गांधी तत्त्वज्ञान गांधी सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट मी ते आम्ही मुल्ला नसिरुद्दीन सिद्धार्थ ते बुद्ध प्रवास लॅनसेट बालमृत्यू जॉब सॅटिसफॅक्शन सर्जन सामाजिक प्रयोगशाळा वयम अहं समाजकेंद्रित स्वयंकेंद्रित निर्माण द अदर हाफ बिइंग ह्युमॅनिटीज सायकिॲट्री इज इंडीड अ हाफ सायन्स सायकिॲट्री पेडियाट्रिक्स लॉजिकल थिंकिंग सामाजिक कार्य मेथड ऑफ डिडक्शन कर्तव्य Emotional Aim Rezilent Response Extrravaganza Showy response Sankhyayog Karmayog Material Aim spooy sentimental response conscience Satygrahi Scientist Page Mission Page Samiti Be the chane you want to change in the worls Deconditioning Empthy Be the Change your self Alloy Self is Like a ray of light Gadchiroli Knowledge Society Global emapact Kabir Science Mulla nasurddin A Journey From Sidhharth to Buddha Samajik Prayogshala Lancet Child death Child Mortality Humanity I to We Surgeon Social Designe Jaypraksh nArayan Sunanda Anil Raani Aarogy Swarajy Search Change Attitude Ethiopia Job satisfaction Ego Nirman Logical thinking Vivek Savant Psychyiatric Self is like a rey of light Gandhi Philosophy Gandhi Dr. Aanand Nadkarni Social Activity Social Work MBBS Abhay Bang Dr Peadiatrics Method of Deduction Dedicated to Community Vayam Pudhe Janyasathi Mage valun Pahatana editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विवेक सावंत,  पुणे
md@mkcl.org

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके