‘कस्तुरी’ हा हिंदी सिनेमा 8 डिसेंबरला महाराष्ट्रात आणि भारतातल्या अन्य काही शहरांत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मध्यवर्ती असणाऱ्या दोन व्यक्तीरेखा गोपी (समर्थ सोनवणे) आणि आदिम (श्रवण उपळकर) यांच्याबरोबर गप्पा माराव्यात हा या मुलाखतीचा उद्देश. कारण या दोघांच्याच भोवती हा सिनेमा फिरतो आहे. दोघेही सध्या बारावीनंतर पहिल्या-दुसऱ्या वर्षाला आहेत. पाच वर्षांपूर्वी दोघांनी या सिनेमामध्ये भूमिका केली त्यावेळी श्रवण होता आठवीला आणि समर्थ होता नववीला. आता पाच वर्षांनंतर त्या कालखंडाकडे ते मागे वळून बघत आहेत. आणि अर्थातच आजचं त्यांचं मानस कसं आहे हेही त्यांना विचारले आहे.
प्रश्न : मला तुम्हा दोघांबद्दलही पहिलं कुतूहल हे आहे की, पाच वर्षांपूर्वी आठवी-नववीत असताना ‘कस्तुरी’सारखा एका नव्या दिग्दर्शकाचा सिनेमा आणि त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखा तुम्हा दोघांना करायला मिळाल्या. श्रवणने त्यापूर्वी एका सिनेमामध्ये काम केलेलं होतं. समर्थने मात्र त्यापूर्वी सिनेमामध्ये काम केलेलं नव्हतं. कस्तुरीच्या दिग्दर्शकांनी मला असं सांगितलं की, पहिल्यांदा आम्ही श्रवणची निवड केली. तर श्रवण, तू आधी अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘म्होरक्या’ नावाच्या सिनेमात काम केलेलं होतंस. त्यात तुझी व्यक्तिरेखा नेमकी काय होती? आणि आता या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांची आणि तुझी ओळख कशी झाली? आणि त्यांनी कस्तुरी सिनेमातली ‘आदिम’ची व्यक्तिरेखा तुझ्यामध्ये कशी पाहिली?
श्रवण : ‘म्होरक्या’मध्येसुद्धा माझं ऑडिशन घेण्यासाठी विनोद कांबळे सरच होते. ते त्या चित्रपटात दिग्दर्शकाचे सहायक होते. म्होरक्यात माझं गोट्या नावाचं कॅरेक्टर आहे. ते ढोलवादकाचं छोटंसं कॅरेक्टर आहे. पण ‘म्होरक्या’च्या सेटवरसुद्धा विनोद सर म्हणायचे की, आपल्याला करायचं आहे तुझ्यावर काही तरी. बार्शी गावामध्ये आमचं पुस्तकांचं दुकान आहे. 2018 च्या अखेर ‘कस्तुरी’च्या ऑडिशनच्या दोन-तीन दिवस आधी ते दुकानावर आले होते. (माझ्या काकांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते दुकानात येत असतात.) तेव्हा विनोद सर आणि शिवाजी सरांनी मला एका कॅफेमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की, ‘आपल्याला एक हिंदी फिल्म करायची आहे. तुझं असं असं कॅरेक्टर असेल, त्यासाठी तुला वजन कमी करावं लागेल. तू ऑडिशनला ये.’
त्या दिवशी रविवार होता.. ऑडिशनला भरपूर मुलं होती. मला वाटलं, आता माझं सिलेक्शन होईल की नाही. ती माझ्याच वयाची, माझ्याच शाळेतली मुलं होती. ऑडिशनला महेश सर होते. मी डान्स करतो हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी मला डान्स करायला लावला आणि पुढे पाठवलं. मला तिथे असा सीन सांगण्यात आला की, ‘तुझा एक मित्र आहे. त्याच्याकडे एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू आहे. ते मेलेलं आहे. तुझा मित्र त्याला घेऊन दोन दिवस रडतो आहे. आणि त्या कुत्र्याचा दुर्गंध तुझ्या मित्राला लागला आहे.’ तिथे आकाश सर आले. ते म्हणाले, ‘‘मी तुझा मित्र आहे असं समज.’’ कॅमेरा रोल झाला. मी ॲक्टिंग केली. सर परत आले आणि म्हणाले, ‘‘असं नाही. तो तुझा जिगरी मित्र आहे! बालपणापासून तुम्ही एकत्र राहिला आहात, एका ताटात तुम्ही खाल्लं आहे. त्याच्याशिवाय तुझं आणि तुझ्याशिवाय त्याचं काही काम होत नाही.’’ मग मी पुन्हा ॲक्टिंग केली. सर म्हणाले, आता तुझी लूक टेस्ट होईल. मग आम्ही तुला फोन करू.’’
दोन-तीन दिवसांनी आम्ही लोकेशनवर गेलो, माझी लूक टेस्ट झाली. सुरेश कुंभार सर होते. माझा एक साधा फोटो काढून भिंतीवर चिकटवण्यात आला. नंतर मला कॉस्च्युम घालण्यात आले. टोपी, सुरमा, मोठमोठे शर्ट आणि मग त्यासह एक फोटो काढून तोही लावण्यात आला. त्यानंतर सर मला म्हणाले, ‘‘तुझ्या सोबत तीन-चार ऑप्शन्स ठेवले आहेत.’’ तेव्हा ‘तू सिलेक्ट झालास’ असं त्यांनी मला सांगितलं नाही. आधी मला घरीच वजन कमी करायला सांगितलं होतं, पण ते जमेना. मग विनोद सरांनी मला आणि गोपीला त्यांच्या हॉलवर बोलवून घेतलं. तिथे आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. हळूहळू मला त्या कॅरेक्टरमध्ये घुसवण्यात आलं. ते एकदमच सगळं सांगून मोकळे झाले नाहीत. सरांची स्ट्रॅटेजी होती. पहिल्यांदा ‘तो मुलगा मुस्लीम आहे’ एवढंच सांगितलं, मग नंतर आदिम हे त्याचं नाव सांगण्यात आलं, त्यानंतर ‘आदिम सलीम कुरेशी’ असं पूर्ण नाव सांगण्यात आलं, मग माझा व्यवसाय काय आहे ते सांगितलं. असं एक एक उलगडत गेलं. त्यामुळे मला त्या फ्लोमध्ये जाण्यात मजा येत होती. खाटीक आहे म्हणजे खात्यापित्या घरचा असं मला वाटत होतं. पण तसं नव्हतं. सर मला म्हणाले, ‘‘तू सिनेमामध्ये झोपडपट्टीतला, खालच्या स्तरातला आहेस. आणि त्या वयाचा तू वाटायला पाहिजेस.’’ त्यामुळे पुढील चार महिने माझे केस कापलेले नव्हते. रोज अंघोळ केलेली नव्हती.
मुख्य मुद्दा आला तो भाषेचा. सरांना हिंदी-मराठी मिक्स गावंढळ भाषा हवी होती. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्या भाषेमधल्या दोन-तीन फिल्म्स मला दाखवल्या. सरांशी आम्ही चर्चा करताना फक्त हिंदीत बोलायचो, एक-दोन शब्द तेवढे मराठीत. आदिम हा खाटिक आहे असं मला सांगितलं, त्यानंतर एक दिवस मला प्रॅक्टिससाठी कापूस देण्यात आला. तो मी तोडायचो. मला ओंडका घासायला लावायचे. तोपर्यंत मला वाटत होतं की, मी साधा नेहमीचा खाटीक आहे. पण जेव्हा मला सांगण्यात आलं की, मी मोठ्या जनावरांचा खाटीक आहे तेव्हा मला काय वाटलं ते मी विसरू शकत नाही.
प्रश्न : तुला स्वत:मध्ये आदिमची म्हणजे एक नवीन व्यक्तिरेखा बिंबवायची होती. तर त्या दोघांमध्ये (श्रवण व आदिम) काय फरक होता? तुझं तोपर्यंतचं दैनंदिन जीवन, शाळा कशी चाललेली होती?
श्रवण : तेव्हा मी आठवीत होतो. सकाळी सात ते बारा शाळा असायची. मग ट्युशन. त्यानंतर मी दुकान सांभाळायचो. सरांनी कदाचित त्यामुळेच माझ्यात काहीतरी बघितलं असेल. कारण सिनेमातला आदिमसुद्धा व्यावसायिक आहे. आणि माझा स्वभाव जरा आदिमबरोबर जुळतो. मी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतो. ‘म्होरक्या’पासूनच मी सरांच्या डोक्यात होतो, म्हणून ते माझ्याकडे आले होते. म्होरक्यामध्ये माझा मोठा रोल नाही. पण सर माझ्या डान्सच्या शोला यायचे. त्यामुळे एकंदरीत माझ्यात जे कलागुण आहेत ते त्यांनी बघितलेले होते.
प्रश्न : समर्थची आणि तुझी ओळख आधीपासून होती?
श्रवण : आम्ही दोघे एकाच शाळेत होतो.
प्रश्न : समर्थ, तुझी निवड प्रक्रिया कशी झाली? अमुक सिनेमा आहे आणि त्यात तुझी अमुक भूमिका आहे असं तुला सांगितलं गेलं होतं का? की फक्त सिनेमात काम करायचं आहे, एवढंच सांगितलं होतं?
समर्थ : विनोद सर आणि शिवाजी सर बार्शी आणि परिसरातील सगळ्या शाळांमध्ये ऑडिशन घेत होते. तसे ते आमच्या शाळेतही आले होते. साधारण 14 वर्षांच्या वयोगटातल्या मुलांना यायला सांगितलं होतं. माझ्या वर्गात येऊन त्यांनी अख्ख्या वर्गाला सांगितलं की, एका सिनेमासाठी आम्ही ऑडिशन घेत आहोत, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी यावे. ऑडिशनचं लोकेशन माझ्या घरापासून एका मिनिटाच्या अंतरावर होतं. विनोद सरांचा चेहरा मला कुठेतरी बघितल्यासारखा वाटला. त्यामुळे, यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो असं वाटलं. ऑडिशनच्या दिवशी रविवार होता. मी नववीत होतो. ट्युशनमध्ये माझा पेपर होता, पण माझा अभ्यास झाला नव्हता. म्हणून मी घरच्यांना म्हटलं की, मी पेपरला जात नाही, ऑडिशनला जातो. तेव्हा वडील माझ्यावर खूप चिडले होते. कारण त्याच वर्षी मी शाळेच्या क्रिकेट टीममध्येही जॉईन झालो होतो. मग पेपरला गेलो, पण जाण्याआधी मी दोन मिनिटांत ऑडिशनचा फॉर्मही भरून टाकला. आणि तिथे सांगितलं की, ‘पेपर झाला की मी ऑडिशन द्यायला येतो.’ पण ट्युशनमध्ये सरांनी झटका दिला. पेपर झाल्यानंतर त्यावर एक तास चर्चा ठेवली होती. शेवटी चारला ट्युशन संपल्यानंतर मी पंधराच मिनिटांत घरात पोहोचलो. दारातच सायकल, बॅग टाकली आणि पळत ऑडिशनला गेलो. तोपर्यंत त्यांनी पॅकअप केलं होतं. सकाळी आठ-नऊपासून ऑडिशन सुरू झालं होतं. तिथे रुपेश भैय्या होता, ज्याला मी सकाळी सांगून गेलो होतो. त्याला मी विनंती केली. मग त्याने माझा फॉर्म हुडकला. तो घेऊन मी पहिल्या राऊंडला गेलो. तिथे आकाश सर आणि गणेश सर ऑडिशन घेणार होते. मला अभिनयाचं काहीच बॅकग्राऊंड नाही. नाटक, शॉर्ट फिल्म असं काहीच मी केलेलं नाही. पण नववीमध्ये मला गाणं म्हणण्याची आवड होती. पहिल्या राऊंडमध्ये मला त्यांनी गाणंच म्हणायला सांगितलं आणि त्या गाण्यावर मला त्यांनी दुसऱ्या राऊंडसाठी निवडलं. मग तिथे आकाश सर आणि गणेश सरांबरोबर विनोद सर आणि महेश सर होते. पहिली पाच-दहा मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मला विनोद सर म्हणाले की, ‘मगाशी म्हटलेलंच गाणं तू (वेगवेगळ्या भावनेने) रागात म्हण, मग हसत हसत म्हण, वगैरे.’ साधारण दहा मिनिटं हे चाललं. त्यानंतर मला त्यांनी काही टास्क दिले. उदा. ‘हा पेन आम्हाला विकून दाखव. तुझ्यावर चोरीचा आळ घातला तर तू कसा वागशील, वगैरे.’ जवळपास पाऊण तास ऑडिशन चाललं. त्यामुळे मला वाटत होतं की, आता माझं सिलेक्शन होईलच. पण निघताना सरांनी मला धक्का दिला. म्हणाले, ‘‘तुला आम्ही फोन करून सांगतो. अजून कन्फर्म नाही.’’ मग मी बाहेर आलो आणि घरी गेलो. माझी सायकल व्यवस्थित लावलेली होती, बॅग नीट ठेवलेली होती. आत गेल्यावर आई चिडली. मी तिला सांगितलं की, मी ऑडिशनला गेलो होतो.
2018 मध्ये बार्शीत ऑडिशन होणं ही खूप मोठी गोष्ट होती. मी ऑडिशनला गेलो होतो यावर घरच्यांचा विश्वासच बसत नव्हता. मग मी सांगितलं की, माझं सिलेक्शन झालं तर आजीच्या फोनवर फोन येईल. याप्रमाणे दोन-तीन दिवसांनंतर फोन आला. आणि मला लूक टेस्टसाठी जैन मंदिराकडे बोलावलं. तिथे माझी लूक टेस्ट झाली, कॉस्च्युम टेस्ट झाली. श्रवण आणि माझं फोटोशूट झालं. अशी सुरुवात झाली.
श्रवण आणि मी पुढील चार-पाच महिने सोबत होतो. त्या काळात आमची वर्कशॉप्स झाली. वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन प्रॅक्टिस घेतली गेली. आकाश सर आमचे ॲक्टर को-ऑर्डिनेटर होते. त्यांनी मला अभिनयाबद्दल एक गोष्ट सांगितली होती. ‘ॲक्टर फक्त दोनच गोष्टी करतो - इमॅजिनेशन आणि ऑब्झर्वेशन.’
प्रश्न : या सिनेमाच्या आधी तुला अभिनयाचा अनुभव नव्हता असं तू सांगितलंस. पण याचा अर्थ तुझ्या आतमध्ये इमॅजिनेशन आणि ऑब्झर्वेशन ही दोन स्किल्स होतीच. दिग्दर्शक मघाशी मला म्हणाले की, ‘आम्ही जवळपास पाचशे मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या. आणि कुणीच मिळत नाही असं वाटून निराश झालो होतो. पॅकअप करून निघालो होतो. तेवढ्यात एक मुलगा पळत पळत आला. त्याने खूप विनवणी केली. त्याची ऑडिशन घेतल्यानंतर मात्र तोच आम्हाला इंटरेस्टिंग वाटला. मग त्याला आम्ही निवडलं.’ तो मुलगा म्हणजे तू! तर ऑडिशनमध्ये काही तरी करून दाखव असं म्हटल्यानंतर तू वेगवेगळ्या प्रकारे गाणं म्हणून दाखवलंस. ते गाणं कोणतं होतं?
समर्थ : ते इम्रान हाश्मीवर चित्रित झालेलं ‘या आली’ नावाचं गाणं होतं.
प्रश्न : तू आधी कधीच नाटक सिनेमात काम केलेलं नव्हतंस. पण मग अशा ऑडिशनला जावं आणि सिनेमात काम करावं अशी उत्कट इच्छा तुला कशी काय झाली? साधारण आठवी-नववीच्या वयात अशी काहीतरी इच्छा असतेच. पण मग ही इतरांसारखीच जनरल इच्छा होती की ‘डीप रुटेड’ होती?
समर्थ : खरं तर आपण सगळेच ॲक्टर असतो. लहानपणी शाळेत जायला नको म्हणून आपण पोट दुखायची ॲक्टिंग करतो. पण ॲक्टर म्हणून सगळ्यांनाच एक्स्प्रेस होता येत नाही. त्यासाठी काही घटना असतात. ऑडिशन ही तशीच घटना होती. मला जाणवलं की, मी आधीपासून ॲक्टर होतो. जर पाऊण तास एखादी व्यक्ती माझी ऑडिशन घेत असेल तर माझ्यामध्ये काहीतरी आहे असं मला वाटलं. तेव्हा मी असं ठरवलं की, यांनी जरी माझं सिलेक्शन नाही केलं तरी मी कुठे ना कुठे ऑडिशन देईनच.
प्रश्न : तुमचं दोघांची निवड झाल्यानंतर चार-पाच महिने तुम्ही सोबत काम करत होता. म्हणजे पूर्वतयारी त्यांनी करून घेतली. तुला कोणत्या क्षणी त्यांनी सांगितलं की, तुला गोपीचा रोल करायचा आहे. तो असा असा आहे आणि त्यासाठी तुला ही तयारी करायची आहे. आणि मग तू तयारी कशी केलीस?
समर्थ : श्रवणने सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला डायरेक्टली कॅरेक्टर एक्सपोज नाही केलं. ते हळूहळू उलगडत गेलं. त्यामुळे आमच्यासाठी तो सस्पेन्स राहिला. म्हणजे आधी सांगितलं की, गोपीला कस्तुरी पाहिजे आहे. मग पुढचा असा प्रश्न असायचा की, कस्तुरी कोण देणार आहे? त्याच्या पुढच्या दिवशी प्रश्न असायचा की, याच्यासाठी पैसे कुठून जुळवायचे? या चार-पाच महिन्यांच्या वर्कशॉपमध्ये (फिल्म शूट व्हायच्या एक ते दीड महिना आधी) आम्हाला सांगितलं होतं की, तुझं हे कॅरेक्टर आहे. स्क्रिप्ट नरेशन झालं. ऑन लोकेशनवर जाऊन आम्ही प्रॅक्टिस केली. मॉक शूट केलं. अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला एक-दीड महिना आधी कळल्या.
पहिल्या तीन महिन्यांमध्ये माझं 65 किलो वजन होतं. त्यानंतर मला सांगण्यात आलं की, तू लीड रोल करतो आहेस. गोपी हे तुझं कॅरेक्टर आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये मी त्यासाठी 15 किलो वजन कमी केलं. त्यासाठी श्रवण मला मदत करत होता. आकाश सर, विनोद सर यांच्यासोबत आम्ही रोज पहाटे पळायला जायचो. संध्याकाळीही व्यायाम करायचो. कारण गोपी गरीब घरचा असल्यामुळे त्याचे गाल आत असतील असं मला सांगितलं होतं. त्यासाठी सर मला सतत चुर्इंगम खायला द्यायचे. तीन चार महिने आम्ही चुर्इंगम खात होतो. 21-22 नोव्हेंबर 2018 ला ‘कस्तुरी’चं शूट सुरू झालं. त्याच्या 15 दिवस आधी दिवाळी होती. सगळेजण घरी गेले होते. मीही. घरी गेल्यावर आजीने माझा लूक बघितला. वजन कमी झालं आहे, गाल आत गेले आहेत. आजीला मी हे मुद्दाम केलं आहे असं सांगताही येईना. त्यामुळे आजीने मला इतकं खाऊ घातलं की, पुन्हा गाल बाहेर आले. दोन-तीन दिवसांनी मी पुन्हा विनोद सरांकडे गेलो होतो. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. तरी आमच्याकडे पुढचे 15-20 दिवस होते. मग दुप्पट उत्साहाने आम्ही वजन पुन्हा कमी करायला लागलो. एका पाठोपाठ दोन चुर्इंगम खायला लागलो.
प्रश्न : दिग्दर्शकांनी तुमच्याकडून एवढं घोटून घेतलं हा एक भाग झालाच. पण तुम्हीही मेहनत घेतली, याचा अर्थ तुमची सिनेमात काम करण्याची तेवढी तीव्र इच्छा, पॅशन होती. त्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. तर शूटच्या दीड महिना आधी तुम्हाला काय रोल आहे, कोणतं कॅरेक्टर आहे ते कळलं. तुम्ही दोघं त्यात जिगरी मित्र आहात असं दाखवलं आहे. आणि प्रामुख्याने तुमच्या दोघांच्याच भोवती तो सिनेमा फिरतो आहे. त्यादृष्टीने तुम्हा दोघांना काही वेगळी तयारी करायला सांगितली होती का? कारण, श्रवण आणि समर्थ हे सिनेमात नव्हते, सिनेमात होते आदिम आणि गोपी.
श्रवण : समर्थ माझ्या शाळेमध्ये होता. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये दिसायचा. त्यामुळे मी त्याला चेहऱ्याने ओळखत होतो. पण बाकी आम्हाला एकमेकांविषयी काही माहीत नव्हतं. नावसुद्धा. लूक टेस्टला तो आला तेव्हा, मी त्याला ओळखलं. आणि वर्कशॉपमध्ये आम्हाला सरांनी सांगून ठेवलं होतं. तू उठलास की त्याला फोन करायचा. एकट्याने बाहेर जायचं नाही. काही खाल्लं तर त्यालापण आणून द्यायचं. पाणीसुद्धा. नाश्ता करायला गेलो की त्याला विचारायचं. अंघोळसुद्धा आम्ही एका बाथरूममध्ये करायचो. यातून कम्युनिकेशन वाढत गेलं. मला सुरमा सुरुवातीला लावता येत नव्हता. मग तो मला सुरमा लावायचा, त्याला मी अत्तर लावायचो. एकमेकांशी हिंदी-मराठीतून बोलायचो. सर आम्हाला दोघांनाच राऊंड मारायला पाठवायचे. मग बोलता बोलता चेष्टामस्करी करणं, गळ्यात हात घालणं असं व्हायचं. सर समोर असताना आम्हाला दडपण यायचं, पण बाहेर गेल्यानंतर आम्ही एकमेकांना शिव्या देणं, राग व्यक्त करणं असं सुद्धा करायचो. स्क्रिप्ट वाचतानासुद्धा तो मला म्हणायचा की, जरा थोडा वेळ तू माझे डायलॉग घे. आम्हाला अधून मधून कॅरेक्टर चेंज करावंसं वाटायचं. कधी हा माझी टोपी घालून बघायचा. हे सगळं त्या चार महिन्यांत सरांनी आमच्या नकळत आमच्याकडून करून घेतलं होतं. सर आम्हाला एका खोलीत ठेवून मध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्ड करायला लावायचे आणि सांगायचे की, काहीही बोला. एका ताटात जेवायला लावायचे. पाणीसुद्धा उष्टं प्यायला लावायचे. सुरुवातीला वाटायचं की, ओळख असली तरी उष्टं पाणी कसं प्यायचं? पण सर मुद्दाम दोन ऐवजी एकच ग्लास ठेवायचे. एकच ताट असायचं. मुद्दाम थोडं उशिरा जेवायला द्यायचे. या सगळ्यातून आमच्याही नकळत आम्ही गोपी आणि आदिम या दोन घनिष्ठ मित्रांच्या कॅरेक्टरमध्ये उतरत होतो.
प्रश्न : तुम्ही दोघे एकमेकांच्या शाळेत होता, एकमेकांना ओळखत होता. पण त्या अर्थाने एकमेकांचे मित्र नव्हता. त्यामुळे ही सगळी तुम्हाला मित्र बनवण्याची प्रक्रिया होती. याबद्दल मला समर्थच्या बाजूनेही ऐकायला आवडेल..
समर्थ : तसा मी श्रवणला ओळखत होतो. कारण बार्शीमध्ये भरवस्तीत त्यांचं पुस्तकांचं मोठं दुकान आहे. लहानपणी वह्या-पुस्तकं आणण्यासाठी वडिलांबरोबर यांच्या दुकानावर जायचो. तेव्हा तो तिथे दिसायचा, पण बोलणं काही नव्हतं. ऑडिशनला तो मला दिसला नव्हता. लूक टेस्टच्या वेळी आमची भेट झाली आणि त्याचं मला नाव कळलं. पुढची सगळी प्रक्रिया त्याने सांगितलीच आहे. त्याचं शूट नसलं तरी माझ्या शूटच्या वेळेला तो सेटवर यायचा. जेवायच्या वेळीसुद्धा ताट घेऊन यायचा. आम्ही तेव्हा एकमेकांशी हिंदीतच बोलायचो. कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी मला तो खूप मदत करायचा. तो मला कॅरेक्टरच्या (गोपी या) नावानेच हाक मारायचा. रात्री आम्ही सगळे एकाच रूममध्ये राहत होतो. रोजचे शूट झाल्यानंतर आम्ही एकमेकांशी त्यावर चर्चा करायचो. ते चार-पाच महिने संपल्यानंतर मला याची खूप आठवण यायची. त्या काळात आम्ही खूप जवळचे झालो.
प्रश्न : याचा अर्थ त्यांनी तुमच्याकडून खूपच चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली. आता आपण तुमच्या दोघांच्याही कॅरेक्टरकडे वळू. दोघांनाही सारखाच प्रश्न विचारतो आहे. समर्थ, मेहतर समाजातील एक आठवीचा मुलगा (जो सफाईचं आणि पोस्टमॉर्टेमचंही काम करतो, त्याचे आई-वडीलही तेच काम करतात.) असं गोपीचं पूर्ण कॅरेक्टर तुला सांगण्यात आलं, तेव्हा ते निभावण्यासाठी आणखी काय तयारी करावी लागली? आणि श्रवण, तुला जेव्हा सांगितलं गेलं की, आदिम सलीम कुरेशी हे एका मुस्लीम मुलाचं कॅरेक्टर तुला निभवायचं आहे, तेव्हा काय तयारी केलीस?
समर्थ : सिनेमातलं गोपीचं कॅरेक्टर थोडंसं मेडिकलची बॅकग्राऊंड असणारं आहे. आणि मीही प्रत्यक्षात त्याच वातावरणात वाढलो होतो. माझी आई बार्शीमध्ये जगदाळे हॉस्पिटलमध्ये नर्स आहे आणि वडील लातूरला एमआयडीसी कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन आहेत. आई हॉस्पिटलमधून घरी यायची, रात्री झोपताना गालांवरून हात फिरवायची तेव्हा तिच्या हातांना ग्लोव्हज्चा वास यायचा. ‘कस्तुरी’मध्ये गोपीची आईसुद्धा काम करते आणि तो पण काम करतो. त्या वासामुळे मला गोपीचं कॅरेक्टर समजायला मदत झाली. शूट सुरू व्हायच्या एक-दोन दिवस आधी मी आणि विनोद सरांनी बार्शीतल्या खऱ्या पोस्टमॉर्टेम रूमला भेट दिली होती. तिथे सनी चव्हाण नावाचे सर होते. त्यांनी आम्हाला पोस्टमॉर्टेम रूम दाखवली. तिथे दोन तास आधी पोस्टमॉर्टेम झालेलं होतं. डेडबॉडीचे कपडे पडलेले होते, रक्त सांडलेलं होतं. लाल झालेले कापसाचे बोळे होते आणि बाजूला बरेच डबे होते ज्यांच्यामध्ये बॉडीतले काही ऑर्गन्स कापून लिक्विडमध्ये ठेवलेले होते. त्या रूममधला वास, तिथलं प्रेशर, तिथली वाईब हे सगळं मला अजूनही आठवतं. अर्धा तास आम्ही आतमध्ये सगळं बघितलं. बॉडी अशी फाडतात, इथे डेड बॉडी असते, हा ऑर्गन इथे असतो, कापसाचे बोळे इथे टाकायचे असतात, डोकं फोडायचं असेल तर छिन्नी किती प्रेशरने मारावी, स्कीन फाडायची असेल तर कशी फाडली जाते वगैरे सगळं सनी सरांनी मला तपशीलवार सांगितलं. माझ्यातल्या समर्थला या सगळ्या गोष्टींची काहीच जाणीव नव्हती, पण गोपी लहानपणापासून त्याच्या घरच्यांसोबत हे सगळं करत आला आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टेम रूममध्ये गेल्यावर मी हादरूनच गेलो. मी फक्त काही वेळ आतमध्ये गेलो तर माझी ही अवस्था आणि 14 वर्षांचा गोपी ही सगळी कामं करतो! मला कसंतरीच झालं. मी सनी सरांबरोबर चर्चा करतानाचे व्हिडिओज् विनोद सरांनी घेतले होते. आम्ही रूमवर आलो तेव्हा मला काय होत होतं ते माझं मलाच समजत नव्हतं. मळमळत होतं, जेवण जात नव्हतं. मी इतका रडत होतो की, माझं डोकं जड झालं होतं. पण त्याचवेळी श्रवण माझ्या इतका जवळचा झाला होता की, तो माझं डोकं दाबत होता. जेव्हा जेव्हा स्टेजवर मी समर्थ असायचो त्या वेळेला मी गोपीच्या कॅरेक्टरमध्ये जावं म्हणून विनोद सर मला ते व्हिडिओज् दाखवायचे.
आणखी एका गोष्टीचा मला फायदा झाला. सिनेमामध्ये गोपी डावरा दाखवलेला आहे. आमच्या त्या चार-पाच महिन्यांच्या वर्कशॉपमध्ये मी डाव्या हाताने जेवायचो, डाव्या हाताने लिहायचो, सगळीच कामं डाव्या हाताने करायचो. शूट संपलं तरी मी डाव्या हाताने लिहायची प्रॅक्टिस चालूच ठेवली. त्यामुळे पुढे दहावीच्या परीक्षेत पेपर लिहिताना मी उजवा हात दुखायला लागला की डाव्या हाताने लिहायचो. एरवी मला पेपर लिहायला तीन तास लागायचे, मी त्या काळात अडीच तासांत पेपर सोडवलेले आहेत.
प्रश्न : प्रत्यक्ष सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही किती नैसर्गिकपणे, सहजतेने काम केलेलं आहे हे लक्षात येतंच. पण तुम्ही काम करत होता तेव्हा पूर्ण सिनेमाचं स्क्रिप्ट तुम्ही वाचलं नसावं. अख्खा सिनेमा तुम्ही कधी पाहिला? आणि त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? पूर्ण तयार झालेला सिनेमा तुम्हाला केव्हा दाखवण्यात आला आणि आपण जे काही काम केलं आहे ते कसं निभावलं आहे आणि त्याच्या सभोवताली काय काय आहे, हे नेमकं कोणत्या टप्प्यावर कळलं?
समर्थ : ते टप्प्याटप्प्याने कळतच गेलं होतं. फिल्म शूट झाली, आम्हाला डबिंगला पुण्यात बोलवलं होतं. डबिंग स्टुडिओमध्ये जायचो तेव्हा एखाददुसरा सीन दिसायचा. पण अख्खी फिल्म बघितली नव्हती. ही फिल्म मुंबईला मामी फेस्टिवलसाठी निवडली गेली होती. तेव्हा मुंबईमध्ये फिल्म बघायला म्हणून आम्ही बार्शीहून रात्री निघालो. पण त्या फेस्टिवलमध्ये 18 वर्षांखालील मुलांना प्रवेश नव्हता. फिल्म संपली आणि एंड क्रेडिट्स सुरू झाल्या, तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं की, ‘आता तुम्ही आत जा.’
प्रश्न : तर तेव्हा तुम्हा दोघांना स्वत:चीच फिल्म बघू दिली गेली नाही...
समर्थ : हो पुढे न्यूयॉर्क फेस्टिवलमध्ये फिल्म लागली आणि एका वेबसाईटवर उपलब्ध झाली. तेव्हा मी ती घरच्यांसोबत बघितली, मित्रांना दाखवली. सगळ्यांना ती आवडली, सगळे खूप कौतुक करत होते.
प्रश्न : पण तू स्वतःला पडद्यावर पहिल्यांदाच पाहिलंस. संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर त्याबद्दलचं तुझं आकलन काय होतं? तुझ्या भावना काय होत्या?
समर्थ : मी फिल्म्स लहानपणापासून बघत आलो होतो, पण त्यात मी काम करेन असं कधी वाटलं नव्हतं. आणि कधीतरी अशी वेळ येईल की, मी ज्यात काम केलं आहे ती फिल्म माझ्या घरचे बघतील असंही कधी वाटलं नव्हतं. आमच्याकडून अभिनयही सटल पद्धतीने करून घेतला गेला. फिल्ममध्ये काही हसण्यासारखे प्रसंग आहेत तिथे माझ्या घरच्यांना हसू आलं. रडण्यासारखे प्रसंग आहेत तिथे माझी आई रडत होती. मी स्वतःला पडद्यावर बघितलं, माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत तो अनुभव घेतला. हा आनंद खूपच छान होता.
प्रश्न : श्रवण, तू आधी एक फिल्म केलेली होतीस. पण या फिल्ममध्ये तुझा अधिक मोठा रोल आहे. आणि तुझं कॅरेक्टरही पूर्णतः वेगळं होतं. सगळा सिनेमा पाहिल्यानंतर तुझ्या मनातल्या भावना काय होत्या?
श्रवण : माझ्या घरच्यांनी अजून सिनेमा बघितलेलाच नाही. मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा त्यात मी दिसेपर्यंत मला खूप उत्कंठा होती. मी लॅपटॉपवर बघत होतो. एकदाचा मी फिल्ममध्ये दिसलो आणि मला आनंद झाला. मामी फेस्टिवलमध्ये आम्ही शेवटी आत गेलो. तेव्हा तिथले आवाज आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून असा फील येत होता की, आपण मोठ्या पडद्यावर किती भारी दिसतोय. फिल्म पाहिलेले लोक मला म्हणत होते की, तुमचं काम भारी झालं आहे. तेव्हा मला वाटत होतं की, हे सगळं समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून जी चार महिन्यांची मेहनत घेतली आहे, ती सार्थकी लागली आहे.
आपला सिनेमा आल्यानंतर भारी वाटतंच. मग मी मित्रांना सांगितलं. त्यांनाही तो बघायचा होता. आताही ते मला म्हणतात की, ‘अजून तुझा सिनेमा येतोच आहे. आम्ही अजूनही ट्रेलरच बघतो आहोत.’ आठ डिसेंबरला सिनेमा नक्की येणार आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की, ‘तू दर वेळी असंच म्हणतोस.’ पण अनोळखी लोक फेस्टिव्हलमध्ये सिनेमा पाहून म्हणतात, ‘तुझं काम चांगलं झालं आहे,’ तेव्हा खूप भारी वाटतं.
प्रश्न : तुझं कौतुक आहेच. पारंपरिक मुस्लिम समाजाचं म्हणून एक सांस्कृतिक वातावरण असतं- बोलणं, वेषभूषा, भाषा, टोन- ते तू चांगलंच पकडलं आहेस. हा सिनेमा पाहताना माझ्या मनात हाच विचार आला की, हा मुलगा मूळचाच मुस्लीम आहे का? ते कॅरेक्टर तू कसं पकडलंस? तुझ्या सभोवताली मुस्लीम मित्र होते का? की तू काही वेगळी तयारी केलीस?
श्रवण : माझे बरेच मुस्लीम मित्र आहेत. माझ्या काकांचेही बरेच मुस्लीम मित्र आहेत. त्यांच्या घरी जाणं-येणं असतं. आम्ही जिथे शूट केलं तिथे मुस्लीम वस्ती होती. समर्थचं शूट चालू असायचं तेव्हा मी गल्लीबोळात आदिमचा कॉस्च्युम घालून फिरायचो. कारण आम्ही तिथलेच आहोत असं दाखवायचं होतं. मग तिथली मुलं मला विचारायची, ‘‘तुझं नाव काय आहे? खरं खरं सांग.’’ मग मी त्यांना सांगायचो की, ‘माझं खरं नाव हेच आहे, मी मुस्लीमच आहे.’ कारण आम्हाला सांगितलं होतं की, ‘एकदा तुम्ही कॅरेक्टर सोडलं की सोडलं.’ तीन-चार आठवडे असं फिरल्यामुळे तिथेही माझे मुस्लीम मित्र झाले. एकदा एक किस्सा झाला. सहाची नमाज चालू होती. तेव्हा एक-दोन मुलं तिथे आली. मला म्हणाली, ‘‘आज जुम्मा का दिन है, चल तू नमाज पढने.’’ मी ‘नाही’ म्हटल्यावर ते मला हाताला धरून न्यायला लागले. माझीसुद्धा इच्छा होती, आत जाऊन बघायची. पण नमाज पढताना काही चुकलं तर, म्हणून मी गेलो नाही. मी दुसरीकडे जाऊन लपलो. मुलं मला शोधत राहिली.
आता तिथे आदिमच्या नाही तर श्रवणच्या वेशात मी जातो तेव्हा त्या वस्तीतली मुलं माझ्या समोरून जातात, पण मला ओळखतही नाहीत. त्यातल्या एकाला मी म्हटलं, ‘‘तू मला ओळखलंस का?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ मी त्याला सांगितलं, ‘‘मी आदिम. आपण शूटच्या वेळी भेटलो होतो.’’ तो चकित झाला. म्हणाला, ‘‘मग तू असा कसा?’’ मग मी त्याला सांगितलं, ‘‘अरे, मी हिंदूच आहे. आदिम हे माझं कॅरेक्टर होतं.’’
प्रश्न : वाह! श्रवण, तू आता बार्शीमध्ये शिकतो आहेस, बीएच्या पहिल्या वर्षाला आहेस. समर्थ तू पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या एका कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन दुसऱ्या वर्षाला आहेस. सिनेमा झाला. तो आता प्रदर्शित होतो आहे. त्यानंतर तुमच्याकडे बरंचसं लक्ष वेधले जाईल. तर तुमचं पुढचं काय प्लॅनिंग आहे? तुम्ही काय करणार आहात?
समर्थ : फिल्म आठवडाभरामध्ये रिलीज होते आहे, याचं थोडंसं प्रेशर आहे. आठवडाभरानंतर समर्थ कदाचित लोकांना थोडा जास्त माहीत होईल. अर्थात लोक फिल्मला कसा प्रतिसाद देतात यावर ते अवलंबून आहे. मला आशा वाटते की, लोकांना माझ्यातले समर्थ आणि गोपी दोघेही आवडतील. आता मला माझ्यातली कस्तुरी सापडली आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन यामध्ये मला रस आहे, ते मी करू शकतो. कॉलेज प्रोजेक्टमध्ये मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या. स्वतःच्या एक दोन शॉर्ट फिल्म्स लिहून तयार आहेत.
श्रवण : माझी परिस्थिती अशी आहे की, मला कस्तुरी सापडली आहे, पण गोपीचं सिनेमातलं जे स्ट्रगल आहे ते खऱ्या आयुष्यात माझं आहे. दुकानामुळे घरचे लोक बाहेर सोडत नाहीत. मलाही ॲक्टिंग शिकायची आहे. पण सध्या घरचे ‘नाही’ म्हणतात. तरीही अधून मधून मी काही ॲक्टिव्हिटीज् करत असतो.
प्रश्न : शंभर मिनिटांचा हा सिनेमा आहे. त्याचं कथानक म्हटलं तर अतिशय साधं, सोपं, सरळ आहे. ते खरं तर आपल्या सर्वांच्या खूपच जवळचं आहे. कुठलंही गाव, परिसर, मोहल्ला पाहा- अशा प्रकारचं सामाजिक वातावरण, अशा प्रकारची कॅरेक्टर्स दिसतात. या सिनेमातून सफाई कामगार आणि त्यांच्या सभोवतालचं जे विश्व आहे ते खूप वेगळ्या, वास्तववादी पद्धतीने लोकांच्या समोर जाईल. हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. त्यासाठी तुम्हाला दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.
(शब्दांकन : सुहास पाटील)
संवादक : विनोद शिरसाठ
(या मुलाखतीचा 55 मिनिटांचा व्हिडिओ kartavyasadhana.in वर येथे क्लिक करून पाहता येईल.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या