डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘प्रकाशमार्गा:’च्या अनुवादकांशी संवाद

पहिली पोळी लाटताना तुम्ही आणि चार/पाच पोळ्या लाटून झाल्यावर तुम्ही, हा जो फरक असतो, तसं झालंय माझं! पोळी करताना ती नीट होईल की नाही? कच्ची राहील? करपून जाईल? असं वाटत राहतं. तसंच अनुवाद करताना मला वाटत राहतं- संस्कृतसारख्या भाषेत आपण अनुवाद करतो आहोत. ती अभिजात भाषा आहे. खूप अभ्यासाची भाषा आहे. ज्यात शास्त्र आहे. अशा भाषेत आपण नेतो आहोत तर काही चूक होणार नाही ना? याची काळजी आणि भीती एक-दोन पानांपुरती  ‘श्यामची आई’ अनुवादाचे काम करताना वाटत होती. जेव्हा श्यामच्या आईचा अनुवाद पुढे गेला, तेव्हा एक-दोन विद्वानांना दाखवला. ती मंडळी म्हणाली, ‘‘ज्या ताकदीने साने गुरुजींनी वात्सल्य त्यात ओतले, त्याच ताकदीने संस्कृतची माया तुम्ही ओतता आहात.’’ म्हणून माझी उमेद वाढली. हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले. 

प्रश्न - संस्कृत ही भाषा मुळात कठीण आणि त्यात तुम्ही मराठीतील ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाचे संस्कृतमध्ये भाषांतर कसे काय केले?
- मुळात संस्कृत हा विषय माझ्या आवडीचा होता. शालेय स्तरावर संस्कृत घेतले आणि मी संस्कृतकडे वळले किंवा संस्कृतची गोडी लावली ती आईवडिलांनी. आई संस्कृत शिक्षिका, त्यामुळे तिला नेहमी वाटायचे की मुलांनी संस्कृतमध्ये काहीतरी करावे. झाले तसेच. आम्ही चौघंही भावंडं संस्कृतात शिकलो. पुढे गेलो, शालेय स्तरावर मी संस्कृत घेतले तर शंभरपैकी शंभर मार्क मिळाले. मग मी थांबलेच नाही. आवड निर्माण झाली. पुढे मी बी.ए.ला संस्कृत घेतले आणि विद्यापीठात पहिली आले. एकाच वेळेला मी दोन विद्यापीठांत पहिली आले. पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. नंतर एम.ए. संस्कृत केले. मग बी.एड. केले एस.एन.डी.टी.मध्ये, तिथे विद्यापीठात तिसरी आले. एम.एड. केले. पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण झाले शिक्षणशास्त्रात! नेट उत्तीर्ण झाले संस्कृतात! तेही पहिल्याच प्रयत्नात. एम.पी.एस.सी. राज्यात पहिली आले! संस्कृत विषयात उच्च शिक्षणात प्राध्यापक या पदासाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्यामध्ये संस्कृत विषय ठेवला होता. सरळ सेवेला माझी निवड झाली. 2002 मध्ये विभागप्रमुख होते. 2015 पासून प्रशासनात आले. महाराष्ट्र शासनाची ‘पहिली महिला भाषा संचालक’ म्हणून काम पाहिले. आता माझ्याकडे महाराष्ट्र राज्याच्या ‘बाल हक्क संरक्षण’ आयोगाची जबाबदारी आहे. हा माझा संस्कृतचा पूर्व इतिहास असल्याने आणि मुळात मला संस्कृत विषयाची गोडी असल्याने संस्कृतमध्ये भाषांतर करू शकले. यापूर्वी माझी भाषांतराची तीन पुस्तके आलेली आहेत. ‘श्यामस्य माता:’ अर्थात साने गुरुजींची श्यामची आई. तसंच विवेकानंदांची दोन पुस्तकं.

प्रश्न - ‘प्रकाशवाटा’ संस्कृतमध्ये भाषांतरित करावे असे तुमच्या मनात कसे काय आले?
- मी हेमलकसाला प्रकाशदादा आणि मंदावहिनींना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा मनात आले त्यांचे हे काम जगाच्या स्तरावर आले पाहिजे. कारण शेकडो विद्यापीठांत संस्कृत संभाषण, संस्कृत अध्ययन, अध्यापन, संशोधन चालू आहे. मी त्यांना म्हणाले की, माझी अशी इच्छा आहे ‘प्रकाशवाटा’ या ग्रंथाचा अनुवाद मी संस्कृतात करावा. ऐकून प्रकाशदादा म्हणाले, ‘‘मला काही अडचण नाही. पण संस्कृतमध्ये कोण वाचणार?’’ त्यांना मी सांगितलं की, भारतात जरी संख्या कमी असली तरी जगभरात मात्र याची दखल घेतली जाईल. माझा विश्वास होता! समकालीन एखादी व्यक्ती जगासमोर यावी असे मला वाटत होते. कारण संस्कृतात काय असते- खूप जुने साहित्य आहे. आता नवीन काही लिहिले जात नाही. हे जे काही आक्षेप असतात ते खोडून काढण्यासाठी, भाषण देण्यापेक्षा कृती करणे मला जास्त योग्य वाटले. कितीही भाषणात सांगितले की संस्कृत भाषा चांगली आहे. बोलता येते. तरी त्याला काही अर्थ नाही. ते जर का मी माझ्या कोणत्या कृतीतून करून दाखवले तर ते जास्त योग्य होईल. म्हणून उत्तम उत्तम कलाकृती संस्कृतात आणायच्या असे मी ठरवले आहे. खूप कमी कालावधीत ‘प्रकाशवाटा’चा संस्कृतात अनुवाद झाला. ‘प्रकाशमार्गा:’ या नावाने 2017 सालीच तो प्रकाशित झाला. आणि आता अगदी तीनच वर्षांत साहित्य अकादमीने या पुस्तकाची दखल घेतली!

प्रश्न - अनुवाद करणे सोपे नसते, याचा मी अनुभव घेतला म्हणून विचारते की एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करताना काय अडचणी येतात?
- ‘प्रकाशवाटा’मध्ये वनवासी आणि आदिवासी जनांचे सगळे जीवन आहे. प्रकाशदादांचे काम करतानाचे अनुभव मांडताना त्यातील काही शब्द साहजिकच त्यांनी आदिवासी बोलीभाषेत कोट केले. ते शब्द, काही संकल्पना ज्या मराठीतसुद्धा नाहीत. मग त्या संस्कृतात कशा आणायच्या? अशा वेळी शांत बसून, थोडासा विचार केला, की ते शब्दही नव्याने तयार होत गेले. संकल्पनाही मांडता आल्या. काही वेळा थोड्या विवरणात्मक स्वरूपात मांडणी केली. पण कुठे अडले नाही. एका ध्येयाने जे काम सुरू झाले ते  थांबले नाही.  त्यांचा जो जीवनपट माझ्या डोळ्यांसमोर शब्दरूपाने उभा राहिला तो मी लिहीत गेले. एवढी ताकद प्रकाशदादांच्या जीवनचरित्रात होती. एका माणसाने आपले सर्व तारुण्य समाजसेवेला द्यायचे आणि त्याच्या बरोबरीने पत्नीने हे कार्य करायचे, म्हणजे काही साधे काम नाही. म्हातारपणात ठीक आहे. संसाराला दहा-वीस वर्षं झाली, मग समाजसेवा केली, असे झाले नाही. तर लग्नाच्या आधीच त्यांनी ठरवले- मला हेमलकसात राहायचे आहे.  त्यांना साथ दिली मंदावहिनींनी! हे व्रत खूप मोठे आहे. मी त्यांचे चरित्र संस्कृतात आणत असताना मला खूप आनंद झाला, की हे काम करणाऱ्या प्रकाशदादा आणि मंदावहिनी यांचे संपूर्ण आयुष्य मी खूप जवळून पाहते आहे. हे काम दैवी माणसांचे आहे! त्यामुळे मला तो अनुभव येत होता. दोन महिन्यांत 255 पानं अनुवादित झाली! पण प्रत्येक दिवशी मी भारावून जात होते, मला स्वतःला समाधान मिळत असे. जशी आई आपल्या मुलाला जन्म दिल्यावर आनंदित होते, त्याचे पापे घेते, तशी मी एक-एक पान झाले की चुंबून घ्यायचे, आज किती छान झाले लिहून. मी प्रकाशदादांनाही कळवत होते.

इतकी पाने झाली, तितकी पाने झाली आणि हे चरित्र पुढे पुढे जात होते. कल्पनाही नव्हती की ‘साहित्य अकादमी’सारखा पुरस्कार मिळेल. आपल्यापेक्षा विद्वान या जगात पुष्कळ आहेत. आपण केलेले काम खरंच त्या दर्जाचे झाले का? मला माहीत आहे की माझं काम चालूच असते. तशी पंचवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनुवादाची चार पुस्तकं, 21 पुस्तकं माझं मूळ लेखन आहे. मला सांगताना खूप आनंद होतो की, हिंदी, मराठी, संस्कृत या तीन भाषांतून मी लिहीत आहे. ललित, वैचारिक, नाट्यलेखन, मराठी- तर सगळेच प्रकार मी हाताळले आहे. मेनका प्रकाशनाकडून ‘प्रकाशवाटा’चा अनुवाद प्रकाशित झाला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत हा सोहळा झाला. साहित्य अकादमीकडून यावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा लक्षात आले, आपल्यावरती आता खूप जबाबदारी आली आहे.

प्रश्न - तुम्हांला भाषांतर करताना संस्कृत शब्द अडल्यावर तुम्ही कोणाचे साहाय्य घ्यायच्या?
- खरं सांगू का? फार काही असे अडले नाही. फक्त एक-दोन वेळा हा शब्द मी इथे वापरला आहे, हा योग्य वाटेल ना? असं म्हणून मी ल.का. मोहरीर यांच्याशी  चर्चा केली. ते म्हणाले की खूप अवघड पुस्तक तुम्ही निवडले अनुवादासाठी, अर्थात त्याचा त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले, ‘‘कमाल आहे आणि तुम्ही जे शब्द निवडले आहेत ते अतिशय योग्य, म्हणजेच चपखल बसत आहेत.’’ अशाच प्रकारे आमच्या दोन-तीन वेळा चर्चा झाल्या. आता मोहरीरसर आपल्यात नाहीत. साहित्य अकादमीची बातमी ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला असता. ते प्रत्यक्ष माझे गुरू नसले, तरी मी त्यांना गुरुस्थानी मानते.

प्रश्न - मुळात तुम्ही अनुवादाकडे कसं काय वळलात? तुमचे पहिले अनुवादित पुस्तक कोणते?
- 2011 मध्ये पहिले पुस्तक अनुवादित केले. त्याचे नाव ‘श्यामस्य माता:’ सुरुवातच आईने केली! ते करत असताना मी ‘श्याम’ होऊन जायचे! ती एक एक रात्र माझे सवंगडी माझ्याभोवती बसून गोष्ट ऐकायचे. मी मनापासून गोष्ट सांगायचे, डोळे भरून वाहायचे, असे अनुवाद होईपर्यंत होतच राहिले. मराठीतली अशी छान छान पुस्तकं वाचली की, त्या पुस्तकाला जर जगभर पोहोचवायची इच्छा झाली की चक्क मी ते पुस्तक संस्कृतात आणते. संस्कृत भाषा समृद्ध आहे. फक्त आपण किती अभ्यास करतो त्यावर पुढचेही अवलंबून असते. म्हणून मी बोलण्यापेक्षा कृती केली आणि मराठीतली काही पुस्तकं संस्कृतात अनुवादित केली.

प्रश्न - पहिला अनुवाद आणि आताचा अनुवाद यांत काही फरक आहे का?
- पहिली पोळी लाटताना तुम्ही आणि चार/पाच पोळ्या लाटून झाल्यावर तुम्ही, हा जो फरक असतो, तसं झालंय माझं! पोळी करताना ती नीट होईल की नाही? कच्ची राहील? करपून जाईल? असं वाटत राहतं. तसंच अनुवाद करताना मला वाटत राहतं- संस्कृतसारख्या भाषेत आपण अनुवाद करतो आहोत. ती अभिजात भाषा आहे. खूप अभ्यासाची भाषा आहे. ज्यात शास्त्र आहे. अशा भाषेत आपण नेतो आहोत तर काही चूक होणार नाही ना? याची काळजी आणि भीती एक-दोन पानांपुरती  ‘श्यामची आई’ अनुवादाचे काम करताना वाटत होती. जेव्हा श्यामच्या आईचा अनुवाद पुढे गेला, तेव्हा एक-दोन विद्वानांना दाखवला. ती मंडळी म्हणाली, ‘‘ज्या ताकदीने साने गुरुजींनी वात्सल्य त्यात ओतले, त्याच ताकदीने संस्कृतची माया तुम्ही ओतता आहात.’’ म्हणून माझी उमेद वाढली. हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले. त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा झाली. पुढे मात्र मला एक ध्यास लागला, चांगल्या साहित्यकृती संस्कृतमध्ये आणायचा! मी माझ्या मायमराठीचे आणि जी जननी आहे सर्व भाषांची त्या संस्कृतचे संबंध दृढ करू इच्छिते.

प्रश्न - अनुवादाच्या एकूणच प्रवासात ठळक लक्षात राहिलेली घटना किंवा अनुभव आम्हांला सांगाल? 
- प्रकाशदादा यांच्या आयुष्यातला एक प्रसंग होता. अस्वलाच्या आक्रमणाचा. अस्वलाने एका आदिवासी माणसावर आक्रमण केले. ती व्यक्ती ज्या विश्वासाने, ज्या अवस्थेत दादांसमोर आली, ती घटना. मला तर रात्रभर अस्वलच दिसत होते. त्याने त्या आदिवासी व्यक्तीवर कसा हल्ला केला असेल? आणि त्या रक्तबंबाळ व्यक्तीला प्रकाशदादांनी कसे बरे केले असेल? अंगावर शहारे आणणारा  प्रसंग होता तो! धीर सोडून चालणार नव्हते. प्रकाशदादांनी त्या व्यक्तीला बरे केले. मग मला कौतुक वाटू लागले प्रकाशदादांच्या ज्ञानाचे, समर्पणाचे आणि त्या व्यक्तीने प्रकाशदादावर दाखवलेल्या विश्वासाचे! कौतुक वाटू लागले त्या अस्वलाचे. ती रात्र मी हेमलकसाच्या अरण्यातच  काढली असे समजा ना!

प्रकाशदादांचे खरंच कौतुक वाटते. आपल्या वडिलांनी केलेले काम पुढे न्यायचे, अगदी आनंदाने. स्वतःच्या सुखाची होळी करत. आता शासन मदत करते आहे, असे जरी चित्र असले तरी, यापूर्वीची पन्नास वर्षं त्यांनी कशी घालवली असतील? त्याचे मूल्य कशातच करता येणार नाही.  कशातच मोजता येणार नाही. अनुवाद करताना मीच समृद्ध होत गेले. दोन महिने त्याच वातावरणात होते. ती भूमिका मी जगत होते. परकाया प्रवेशाच्या रूपाने दुसऱ्या शरीरात जाऊन आत्म्याला स्पर्श करतो आहोत की काय, असे ती साहित्यकृती अनुवादित करताना वाटत होते. अनुवाद म्हणजे एखाद्या आत्म्याने फक्त स्वतःचा आकार बदलून मराठीतून संस्कृतमध्ये प्रवेश करणे. आज मराठी भाषेचे शरीर आहे, तर उद्या संस्कृत भाषेचे शरीर धारण करणे आणि तेही न मरता! अनुवाद हा खूप आनंद देऊन जातो. जशी एखादी मुलगी माहेरपणाला यावी आणि आईने तिचे कोडकौतुक करावे किंवा आई प्रौढ अवस्थेत असताना आपल्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या आईने हवापालटासाठी मुलीकडे यावे आणि तिचे सारे प्रेमाने मुलीने करावे तसेच अनुवादाचे आहे. माहेरपणाला आलेल्या त्या आईला, त्या लेकीला हाताला अलगद धरून या भाषेतून त्या भाषेत सोडल्यासारखे वाटते. सरस्वतीने जो आशीर्वाद मला दिलाय तोच सार्थ करते आहे. मला  खूप लिहायचे आहे. जन्मभर!

प्रश्न - तुम्ही लेखिका, अनुवादिका आहात. तुमचे काम सतत चालू असल्याने त्यावर घरातील मंडळींची काय प्रतिक्रिया असते?
- घरातील मंडळींच्या कुठल्याही वेळा चुकत नाहीत. त्यांना जो वेळ द्यायचा आहे तो देते. दिवसभराचा कार्यालयीन वेळ असतो. मग जे लिखाण करते, ते माझ्या व्यक्तिगत झोपेच्या वेळेत करते. कारण मी दोन मुलांची आई आहे. त्यांचे सगळे करणे, सणवार साजरे करायला मला खूप आवडते आणि हौसही आहे. भारतीय संस्कृती जगते, शिकवते. त्यासाठी सणावाराला नऊवारी नेसणे, नथ घालणे असा पारंपरिक पोशाख करून सण साजरे करते. सवाष्ण-ब्राह्मण स्वयंपाक करणे, जेवायला सांगणे मला खूप आवडते. मी एकच ठरवले की, आपला दिवसभरातला व्यक्तिगत वेळ कोणता? तर तो फक्त रात्रीचा! म्हणजे माझी सगळी लेकरं झोपली, ते आपापली विश्रांती घेतात ती वेळ माझी, मी लिखाणात घालवते. सहा तासांची झोप असली आणि मी लिहीत असले की तीन तास झोपले तरी मला पुरेशी असते. मला त्रास जाणवत नाही. कविता तर माझ्या रोजच्या प्रवासातच लिहून होतात. पण अनुवाद, ललित, दीर्घ लेखन याला  बैठक आवश्यक असते. त्या वेळेला मी फक्त रात्री बसते. पण मला खरंच समाधान मिळते. मला कधीही असे जाणवले नाही की झोप अपुरी राहिली, अशक्तपणा जाणवला नाही, की कधी चिडचीड झाली नाही. मला अंत:प्रेरणा मिळते. कधी पहाटेच जाग येते, कधी रात्री झोप लागत नाही असं करत करत माझं लिहून होऊन जातं. ही ईश्वरी योजना आहे की काय असं वाटतं. कारण नंतर मी पाहते तर जाणवतं की अरे, आपण एवढे जागून लिहिले. मला विश्वासच बसत नाही. कधी कधी तर पूर्ण रात्रभर मी लिहीत राहते. दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर शनिवारची रात्र तर बऱ्याच वेळा जागली जाते. 

प्रश्न - नवीन अनुवाद करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? 
- दोन भाषांवर ज्यांचे प्रभुत्व आहे, अभ्यास आहे, त्यांनी अनुवादचा नक्की प्रयत्न करावा. चांगले शब्दकोश हाताळावेत, दोन्ही भाषांमधले वाचन वाढवावे. त्या साहित्यकृतीचा जो आत्मा आहे त्याला धक्का न लावता जपून अनुवाद करावा. कारण भाषांतर आणि अनुवाद यांत फरक आहे. भाषांतरात एका शब्दाला दुसरा शब्द दिला जातो. भाषांतर हा सांगाडा आहे तर अनुवाद हा आत्मा आहे. साहित्यकृतीचा आत्मा तसाच ठेवला गेला पाहिजे. दोन भाषांच्या संस्कृती कधी कधी वेगवेगळ्या असतात. एका भाषेच्या संकल्पना दुसऱ्या भाषेत नसतात, कधी कधी काही शब्दच नवीन असतात. अशा वेळेला थोडा शांत विचार करायचा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, विद्वानांशी चर्चा करायला हरकत नाही. आपण हे बरोबर करतो आहोत का? ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, रस आहे त्यांनी ते केलेच पाहिजे. अनुवादात उतरले पाहिजे, लिखाण केले पाहिजे. माणूस साहित्याच्या रूपाने जिवंत राहतो, आपण या जगात नसलो तरी आपल्या मागे आपले काम राहते. म्हणून साहित्याच्या रूपात जगावे, चिरंतन व्हावे!

प्रश्न - साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर काय वाटले?
- पुरस्कार मिळाल्याचा आनंद मला खूप झाला आणि ज्या माझ्या आईवडिलांनी मला घडवले त्यांना तर खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला की साहित्य अकादमीसारखा हा पुरस्कार 44 व्या वर्षी आपल्या मुलीला मिळतो आहे. मलाही याचे खूप समाधान वाटते आहे की, ते अनुभवू शकतात तो आनंद मी त्यांना देते आहे. ते जख्ख म्हातारे झाले असते तर ते आनंद घेऊ शकले नसते. आता मात्र ते खूप आनंदी झाले आहेत. त्याचा मला खूप खूप आनंद होतो आहे. जगात असे दोनच जण असतात ‘आई वडील’ आणि ‘गुरू’ की ज्यांना आपली मुलं-आपले शिष्य आपल्यापेक्षा मोठे झालेले पाहायला आवडतात. मी माझे आई-वडील आणि गुरूंसाठी कृतज्ञता या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त करते. माझी आई माझा पहिला संस्कृतचा गुरू, म्हणजे आईवडील हे माझे पहिले गुरू, ज्यांना मी गुरू मानायचे ज्यांचा आदर्श मी घेतला. ल.का. मोहरीर (ते या जगात आता नाहीत), लिंबेकर माझे शाळेतले गुरुजी त्यांच्याप्रतिही कृतज्ञ भाव प्रकट करते.

मुलाखतकार : 
ऋता मनोज ठाकूर, अहमदनगर

(गेल्या आठवड्यात साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ‘प्रकाशवाटा’ या मराठी पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी मंजुषा कुलकर्णी यांना तर ‘मध्यरात्रीनंतरचा तास’ या मूळ तमिळ पण इंग्रजीतून मराठी अनुवादासाठी सोनाली नवांगुळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मंजुषा यांची मुलाखत या अंकात घेतली आहे, सोनाली नवांगुळ यांची मुलाखत पुढील अंकात प्रसिद्ध होईल! 
- संपादक)

 

Tags: प्रकाश आमटे प्रकाशवाटा प्रकाशमार्गा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके