डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रशासनात जाणे हे स्वतःच्या जाणिवांना न्याय देणारे वाटले !

पोलिस म्हणून आम्ही काम करत असतो, त्या वेळी दोन प्रकारच्या व्यक्ती आमच्याकडे येत असतात, यातील एक व्यक्ती असते तक्रारदार. ती प्रामुख्याने पीडित असते आणि दुसरी व्यक्ती असते ती गुन्हेगार. गुन्हेगारांकडे पाहून आमचा दृष्टिकोन नकारात्मक झालेला असतो, असे मानले जाते. पण तक्रारदार हाच खरा गरजवंत असतो आणि त्याच्याकडे पाहून आमच्यातील संवेदनशीलताही कायम जिवंत राहते. एका दृष्टीने कायम पोलिस आणि गुन्हेगार या नात्याच्या नजरेतूनच पोलिसांकडे पाहिले जात असले, तरीही एखाद्या पोलिसाने संवेदनशीलपणे किंवा धाडसाने केलेल्या कृतीचेही समाजाकडून भरभरून कौतुक होत असते. मात्र, हा संवाद अधिकाधिक वाढायला हवा.

प्रश्न - मॅडम, आपल्याला पोलिस सेवेत येऊन साधारण दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आपला एक कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक झालेला आहे. तुमच्या बालकुमार वयातील जडणघडणीविषयी सांगा. 

- माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचा. तसं आमच्या कुटुंबाचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील साकेगाव. परंतु आजोबांच्या पोस्टातील नोकरीच्या निमित्ताने आमचे कुटुंब शेवगावला स्थायिक झाले. माझे एक काका डॉक्टर, दुसरे काका सरकारी नोकरीत. तर वडिलांनी आयटीआय केले. पण त्यांचे मन नोकरीत रमले नाही. गावाकडची शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय त्यांनी सुरू केला. काही वर्षे स्वतःच्या ट्रॅक्टरवर चालक आणि सोबत अंगमेहनतीचे कामही केले. दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले, लग्नाच्या वेळेस माझ्या आईचे शिक्षण अकरावीपर्यंत झालेले होते. लग्नानंतर तिने डी.एड. पूर्ण केले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली. आई शिक्षिका झाल्यामुळे आमच्या घरात मुलींसाठी शिक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. त्यामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. आम्हां भावंडांना तर त्याचा पुरेपूर फायदा झाला. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही वक्तृत्व, श्लोक पाठांतर, चित्रकला या स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो. एखाद्या स्पर्धेतील बक्षीस आम्हांला शाबासकी मिळवून देत होते आणि त्यातून आणखी नव्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळत गेले. माध्यमिक शाळेमध्ये गेल्यानंतर स्पर्धांमधील सहभाग वाढत गेला आणि त्यातून सभाधीटपणा वाढत गेला. आपण करत असलेले काम सर्वोत्तम पद्धतीने झाले पाहिजे, अशी उमेद मनामध्ये अप्रत्यक्षपणे रुजत गेली. स्पर्धांमध्ये भाग घेत असताना, अन्य स्पर्धक समोर येत होते, त्यांच्यातील गुणांची झलक पाहायला मिळत होती. त्यातून आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत, त्या गोष्टी साध्य करण्यासाठी काय करायला हवे, याची जाणीव सुस्पष्ट होत गेली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी रुची वाढत गेली. शाळा, अभ्यास, अभ्यासक्रम यासोबत आजूबाजूच्या जगात खूप काही आहे या जाणीवेने नवनव्या विषयांचे कुतूहल भागवण्यासाठीचा शोध सुरू झाला.

विविध कलागुणांकडे वळत असताना शालेय अभ्यासावर परिणाम फारसा झाला नाही, त्यामुळे

आईवडिलांनीही आम्हांला कायमच इतर क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करण्याला प्रोत्साहन दिले. चौकटीबाहेरच्या अनेक गोष्टींना कुटुंबाने प्राधान्य दिल्यामुळे मी जे काही करत गेले त्यात एक वेगळा आनंद आणि अतिशय सकारात्मक वातावरण होते. अभ्यास कधी अभ्यास वाटला नाही, कारण एखाद्या गोष्टीमध्ये आपण कमी पडत असू, तर त्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा आणि त्यामधील कौशल्य आपण मिळवायचे, हा माझा ध्यास असायचा.

माझी जडणघडण एका सामान्य कुटुंबातल्या कुठल्याही मुलामुलींसारखी झालेली आहे. फरक फक्त एवढाच असेल की, आई शिक्षिका असल्याने अभ्यासाविषयी ती अधिक सजग आणि आग्रही होती. त्यामुळे अभ्यासातील गोडी आणि प्रगती टिकून राहिली. वडील व्यवसायात असल्याने त्यांचा भर हा व्यवहारज्ञानावर अधिक होता. त्यामुळे व्यवहारातील जग आणि पुस्तकातील जग यांची सांगड कायम घडत राहिली. स्पर्धांनी हुन्नर वाढवली.

प्रश्न - तुमच्या जडणघडणीत वाचनाचा मोठा वाटा राहिला आहे. शालेय जीवनात साधारणपणे मुलं कथा-कादंबऱ्या वाचतात. तुमचे वाचन कोणत्या स्वरूपाचे होते?

- माझ्या जडणघडणीत वाचन ही सर्वांत महत्त्वाची बाब राहिली आहे. आईच्या पुस्तकांच्या संग्रहामुळे मला वाचनाची गोडी लागली. आईला पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड होती. कारण आई डी.एड.नंतरही नोकरी करत करत तिचे शिक्षण चालूच होते. मराठी साहित्यात तिने पुढे जाऊन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यामुळे घरात सतत विविध साहित्यविषयक पुस्तकांचा संग्रह होत गेला. आजूबाजूच्या कोणत्या ग्रंथालयामध्ये जुनी पुस्तके विकणार असतील किंवा पुस्तके उपलब्ध होणार असतील, तर आई तिथे जायची. त्यातून चांगली पुस्तके निवडायची आणि ती सोबत आणायची. तिने आणलेली नवनवीन पुस्तके लवकर वाचून आम्ही संपवायचो.

सुरुवातीला स्वाभाविकपणे कथा-कादंबऱ्यांतून वाचनाची आवड विस्तारत गेली. वाचनात आलेल्या एखाद्या संदर्भाविषयी अधिक माहिती घेण्याचा शोध सुरू व्हायचा आणि त्यातून आणखी वाचन होत जायचे. कथा-कादंबऱ्यांमध्ये इतिहासप्रधान कादंबऱ्यांचे वाचन जास्त झाले. एकाच वेळी साहित्य आणि इतिहास या दोन्ही अंगांनी माझे वाचन फुलत गेले. छत्रपतींच्या जीवनावरील कादंबऱ्यांनी तर माझे बालपण आणि शालेय जीवन प्रफल्लित केले आहे. त्यामुळे मी माझ्या वाचनाला कधीही अवांतर वाचन समजले नाही. वडिलांचा चांगला नागरिक घडवण्याचा दृष्टिकोन आणि आईचा चांगल्या अभ्यासाचा आग्रह माझ्या वाचनवेडाने जणू काही एकाच वेळी विकसित होत गेला.

‘मातृकथा’ ही 12 भागांच्या पुस्तकांची मालिका यादरम्यानच हातामध्ये पडली. त्यामध्ये पुराणकाळापासून उल्लेख झालेल्या दमयंती, शकुंतला, सीता, मंदोदरी, शूर्पणखा, उर्मिला यांच्या कथा होत्या. रामायण व महाभारताविषयी आपल्याकडे मतमतांतरे आहेत. काही जणांच्या मते हा इतिहास आहे, तर काही जणांच्या मते या काल्पनिक गोष्टी आहेत. मात्र, एक साहित्य म्हणून मी या गोष्टींकडे पाहत होते. आपल्याला माहीत असलेल्या या कथांमध्ये स्त्रीपात्रांविषयी त्रोटक उल्लेख असतात. रामायणामध्ये मंदोदरीचा उल्लेख अगदीच धावता येऊन जातो. मात्र, ‘मातृकथा’च्या कथांमध्ये या महिला पात्रांच्या दृष्टिकोनातून या कथांकडे पाहायला मिळत होते. यामध्ये त्यांचे भावविश्व कळतानाच, एक नवा दृष्टिकोन समजून घेता आला.

वाचन आपल्याला सर्व बाजूंनी समृद्ध करत असते, आपले भावविश्व रुंदावत असते. त्यासोबत तुमच्या विचारात नवीन दृष्टिकोनांची भर टाकत असते. माझ्या बाबतीतही असेच झाले. वाचनाने माझी भाषा सुधारत गेली. भाषेचा म्हणून एक वेगळा संस्कार असतो. सामान्यतः आपल्याला सर्वच शब्दांचे नेमके अर्थ कळत नाहीत; परंतु वाचन-विषयातील वैविध्यामुळे एरवी न लागलेल्या शब्दांचे अर्थ समजून जातात. कधी काळी अर्थ न लागलेला शब्द नवीन वाचनातून नेमका अर्थबोध देऊन जातो, तेव्हा मात्र वेगळीच मजा येते. वाचनविश्वातील वैविध्याने मला समृद्ध तर केले आहेच, परंतु त्याचबरोबर माझी उत्साही जगण्याची भूक जिवंत ठेवली आहे. वाचनाने रुटीन जगण्यातही अचूक शब्दांची निवड किती महत्त्वाची असते, याचा मला अनेक वेळा आनंद दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून, नेमकं बोलणं, परिणामकारक बोलणं व बोलताना आपल्या विचारांमध्ये सुसूत्रता असली पाहिजे, असा अप्रत्यक्ष संस्कार होत गेला. आजही एखाद्या ठिकाणी ऐन वेळी भाषण करावे लागले किंवा कामात एखादा संदर्भ द्यायला लागला तर नेमकेपणाने मुद्दे देता येतात. जडणघडणीच्या टप्यावर केलेल्या वाचनामुळे हे सहज शक्य होते.          

प्रश्न - एकूणच तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण व्यापक वाचनवेडाने घडलेली आहे असे दिसते, मात्र आता तुमच्या शालेय जीवनातील, महाविद्यालयीन काळातील निर्णायक टप्पे काय सांगाल?

- माझ्या करिअरच्या वाटेत फक्त मार्क्स मिळवण्याला मी फारसं महत्त्व कधीच दिलं नाही. मात्र, अगदी अभ्यासाच्या निमित्तानेही जे वाचलं ते जीवनाशी रिलेट करत गेले. त्या काळात माझ्या आजूबाजूला खूप अभ्यास, खूप मार्क्स म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ही दोनच क्षेत्राला प्राधान्य दिले जायचे. मला मात्र नेहमीच इतर करतायत त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं असं मनापासून वाटायचं. शाळेत असताना भारतीय हवाई दलाचे वैमानिक निर्मलजित सिंग यांच्या 1971च्या युद्धातील बलिदानावर आधारित एक धडा होता. या धड्यामुळे मी वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. त्यातच ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या प्रभावाने मला देशाप्रति आपलेपणाची भावना दृढ केलेली होती. त्यामुळे वैमानिक होणे हे मला अधिक जवळचं वाटून गेलं. ते स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरू होता. आजूबाजूची मुलं डॉक्टर, इंजिनिअर होण्याची स्वप्न पाहत होती. त्या वेळी आमच्या परिसरातील वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिलेली मी एकमेव असेन. खूप अभ्यास करून दहावीत तालुक्यात पहिली, जिल्ह्यात दुसरी तर पुणे विभागाच्या बोर्डात गुणवत्ता यादीत आले. त्यानंतर अकरावीला सायन्स घेतले. दरम्यानच्या काळात मला चश्मा लागला. त्याच काळात कोणीतरी मला सांगितले की, चश्मा लागलेल्या व्यक्तीला पायलट होता येत नाही. हे कळाल्यावर ही माहिती पूर्णतः खरी आहे, असे समजून मला पायलट होण्याचे स्वप्न सोडून द्यावे लागले. कारण आजूबाजूला याविषयी नेमकी व योग्य माहिती देणारे कोणीही नव्हते.

एक स्वप्न सोडल्यानंतर प्रचलित करिअर सोडून वेगळं काय करायचं, असा प्रश्न माझ्यासमोर होता. त्या वेळी बायोटेकचा पर्याय समोर आला. भारताचं भविष्य हे आयटी आणि बीटीभोवती आहे असं बोललं जायचं. बायोटेक हे जर देशाचं भवितव्य असेल तर बायोटेक हाच आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे असे मानून मी बायोटेकला जाण्याचा निर्णय घेतला. बायोटेकविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला.

बायोटेक्नॉलॉजी हे विस्तारणारे क्षेत्र आहे असे मानले जात होते. बारामतीला शिकत असताना भावी शास्त्रज्ञ आणि संशोधनासाठी युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च’ या बेंगळुरूतील संस्थेतून देशातील दहा विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड झाली. विद्यार्थ्यांना योग्य वयामध्ये संशोधनाची संधी द्यायची, त्यातून त्यांचा कल समजू शकेल आणि त्यांना संशोधनाच्या क्षेत्रातील योग्य संधी उपलब्ध करून देता येईल, असा या उपक्रमाचा हेतू होता. एकीकडे माझी पदवी पूर्ण होत आली होती, राष्ट्रीय स्तरावर मोठी संधीही मिळाली होती. या प्रकल्पाच्या निमित्ताने दरवर्षी मी दोन महिने बेंगळुरूला जायचे. तिथे मला अनेक नावाजलेल्या शास्त्रज्ञांचे काम पाहता आले. संशोधनातल्या अनेक गोष्टी शिकता आल्या. मात्र, तिथे संशोधन करीत असलेल्या संशोधकाची काम करण्याची कार्यपद्धती आणि त्यांची लाइफस्टाइल या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्त्वाला सुसंगत नव्हत्या. त्यातच शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना, तुम्हाला जास्तीतजास्त वेळ यंत्रांबरोबर काढावा लागणार होता. माझा मूळ पिंड हा वेगवेगळ्या माणसांशी संवादी राहण्यावर भर देणारा असल्याने मला या क्षेत्राविषयी ओढ माझ्याच मनात प्रश्न निर्माण करायला लागली. त्यामुळेच बेंगळुरूहून परत येत असतानाच आपण पदवी पूर्ण केली, तरीही शास्त्रज्ञ व्हायचे नाही, हा निर्धार केला होता.

बायोटेकची पदवी पूर्ण केल्यानंतर, मी लॉ करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील ‘आयएलएस’मधील पहिले वर्ष हे नियमित अभ्यास करुन पूर्ण केले. त्या वेळी माझ्या आईला मी न्यायाधीश होण्याचे स्वप्न दाखवले. पहिल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील सुट्टीत एका नामांकित वकिलाकडे शिकाऊ उमेदवार म्हणून काही काळ काम केले. लॉच्या दुसऱ्या वर्षातील काही काळ उलटल्यावर आमच्या वर्गातील काही विद्यार्थी मागच्या बाकांवर बसून नियमितपणे ‘द हिंदू’ हे वृत्तपत्र वाचत असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांनी अनेक वेळा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता, तरीही त्यांचे वाचन सुरूच असायचे. ग्रंथालयांमध्येही हीच परिस्थिती असायची. त्यामुळे ही मुले ओरडा खाऊनही ‘द हिंदू’च का वाचत आहेत, असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. त्याविषयी चौकशी केली असता, ते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, असे कळले. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्यातून काय होता येते, हे समजून घेतले. कारण तोपर्यंत मी स्पर्धा परीक्षेविषयी पूर्ण अनभिज्ञ होते. यूपीएससी, एमपीएससी, आयएएस, आयपीएस हे क्षेत्र समजून घेताना याविषयीचे कुतूहल वाढत गेले. निर्णय प्रक्रियेचा भाग बनणे मला अधिक जवळचे वाटायला लागले. मात्र, आता या टप्प्यावर करिअर बदलणे आणि घरच्यांशी समजूत घालणे हे काम जिकिरीचे होते. प्राथमिक शिक्षिका असलेल्या माझ्या आईला माझी काळजी वाटायला लागली. मात्र मी दृढ निश्चय करून स्पर्धा परीक्षा या करिअरविषयी अधिक जबाबदारीने विचार करायला लागले होते. आईवडिलांनी घरामध्ये वाढवताना कामाच्या बाबतीत पुरुषांचे काम वेगळे आणि महिलांचे काम वेगळे असा भेद केला नव्हता. पण माझी आजी मात्र जुन्या विचारांची असल्याने मी स्वयंपाक वगैरे करावा अशा तिच्या अपेक्षा होत्या. यामागे लग्नानंतर माझे कसे होणार, अशी तिच्या मनात काळजी असायची. मात्र, तिच्या बोलण्याचा परिणाम माझ्यावर उलटा झाला, उलट माझी जिद्द वाढतच गेली. मला नेहमी वाटत होते, की मी भविष्यामध्ये अशा जबाबदारीच्या पदावर आपण गेले पाहिजे, जेथे महिला म्हणून माझ्यावर बंधने असता कामा नयेत. माझ्याबद्दलचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार हे माझ्या हातात असतील असे क्षेत्र मला निवडायचे होते. त्या अर्थाने मला प्रशासनात जाणे अधिक जवळचे आणि स्वत:च्या जाणिवांना न्याय देणारे वाटले. त्यामुळे अनेक अंगांनी विचार केल्यावर मी अंतिम निर्णय घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळले.

प्रश्न - स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा टप्पा हा खूप लोकांसाठी सर्वांत खडतर असतो. आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळातील वेगळ्या आठवणींविषयी काय सांगाल?

- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. सर्व अभ्यासक्रम पाहून झाल्यावर मला लक्षात आले की, लहानपणापासून आपण जे वाचन केले, ज्या आवडी जोपासल्या त्या सर्व यूपीएससीसाठी अनुकूल आहेत. विशेषतः यूपीएससी परीक्षेसाठी दोन वैकल्पिक विषय निवडणे त्या वेळेस गरजेचे होते. त्यासाठी मी मराठी भाषा आणि इतिहास हे दोन विषय निवडले होते. मूलभूत काही गोष्टी शिकण्यासाठी मी क्लासचा शोध घेत असताना, मराठी भाषा शिकवणाऱ्या प्रवीण चव्हाण सरांना भेटले. वैकल्पिक विषयांविषयी त्यांच्याशी चर्चा झाली आणि मी इतिहास व मराठी भाषा हे दोन विषय घ्यायचा विचार करत आहे हे सांगितले. सरांनी ‘‘तू सध्या काय करते,’’ असे विचारले. मी लॉ करत असल्याचे सांगितले. त्यावर, बायोटेक्नॉलॉजी, एलएलबी असे शिक्षण असताना, आता मराठी साहित्य कसा विषय होईल, असा स्वाभाविक प्रश्न त्यांच्यामनामध्ये आला. ‘‘मराठी साहित्य माझ्या आवडीचा विषय आहे,’’ असे त्यांना सांगितले. ‘‘आवड असू शकते, पण परीक्षेत कसे लिहिणार,’’ असे विचारत त्यांनी पेन-कागद समोर ठेवला. दहा मिनिटांचा वेळ दिला आणि ‘लेखक का लिहितो’ यावर लिही, अशी सूचना केली. माझ्यासाठी हा प्रसंगच अनपेक्षित होता. काही सेकंदांचाच विचार करून मी लिहिती झाले आणि त्या उत्तराच्या पहिल्या ओळीमध्ये सातवी-आठवीत शिकलेली केशव मेश्रामांची कविता उतरली. ‘ऋणाईत मी या शब्दांचा, सर्वस्वाने ओलिस जातो, प्रारब्धांच्या प्रकाशधारात ऋणाईत गीत गातो..’ ही एका लेखकाची भावना आहे. शब्दांच्या प्रति त्यांची ऋण व्यक्त करण्याची ही भावना आहे. या ओळींनी मी त्या उत्तराची सुरुवात केली आणि त्यातून लेखकाच्या आयुष्यामध्ये शब्दांचे किती महत्त्व आहे, व्यक्त होण्याचे किती महत्त्व आहे, अशी पुढील मांडणी केली. सरांनी ते वाचले, आणि ‘एक्स्लंट’ असा शेरा मारला. ते म्हणाले, ‘‘उद्यापासून अभ्यास सुरू कर आणि तुझ्या प्रत्येक उत्तरावर मला असा ‘एक्स्लटंट’ असा शेरा मारावा असं वाटलं पाहिजे, असा अभ्यास कर.’’

माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुणे आणि मुंबई या दोन शहरांत झाला. यूपीएससीची तयारी करण्यासाठी मुंबईतील सियाकने घेतलेल्या परीक्षेत मी दहावी आले. त्यामुळे आत्मविश्वास एकदम वाढला. यूपीएससी हे मी माझं मनापासून आवडणारं स्वप्नं बनलं. मी 2011 ची पूर्वपरीक्षा दिली. निकाल आला. मुख्य परीक्षा दिली. ‘निकाल आला. परीक्षा दिली आणि निकाल आला,’ हे दोन शब्दांत मी जरी सांगत असले, तरी आज लिहिताना अभ्यासाची प्रक्रिया मला आठवते. अगदी तंद्री लागल्यासारखा अभ्यास केला. हा सगळा अभ्यासाचा आनंद! त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.

पेपर समोर येतो तेव्हा प्रश्न वाचल्याबरोबर तुमच्या मनात उत्तराची जुळवणी सुरू होते. या उत्तराची सुरुवात अशी करणार, हे ठरतं. उत्तर लिहिल्यावर तुम्ही तुमच्यावरच आनंदी होता आणि त्या आनंदात दुसरा प्रश्न सोडवायला घेता. माझा लिखाणाचा वेग कमी. मुख्य परीक्षेत तर अगदी 60 मार्कांपासून ते 150 मार्कांपर्यंत लिहायचं राहिलेलं आहे. यूपीएससी करताना मी एमपीएससीची परीक्षा दिली. ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ परीक्षा दिली. शिवाय, सेंट्रल पोलिस कोर्सची परीक्षा दिली.

यूपीएससीच्या मुलाखतीला गेले. थोडंसं बर्डन होतं, ते म्हणजे भाषेचं. अर्ज करताना मुलाखतीसाठी मराठी भाषेचा पर्याय निवडलेला होता. मुलाखत सुरू झाली. पहिला प्रश्न ‘न आवडता विषय कोणता?’ माझं उत्तर ‘अर्थशास्त्र.’ मग त्याच्या कारणावर पुढचे सात प्रश्न अर्थशास्त्राच्या बारकाव्यांवर आले. ‘माहीत नाही सर; पण मी माहीत करून घेईन,’ असं या सर्व प्रश्नांवर माझं उत्तर होतं. त्याच्या पुढचा प्रश्न राजकारण करिअर होऊ शकतं का?, मी ‘हो’, असं उत्तर दिलं. मग ‘कसं’, तर मी तसं लॉजिक सांगितलं. मग पुढं माझ्या एकूण पार्श्वभूमीवर मुलाखत पुढं सरकली. मराठीतील काही विषयांच्या संदर्भात भाषांतर करणारी व्यक्ती खूप चुका करत होती, असं लक्षात येताच मी इंग्रजीत बोलू का, अशी विनंती मी पॅनलला केली, त्यांनी होकार दिला. मी पुढं इंग्रजीत बोलू शकले. मुलाखतीचा अंतिम टप्पा पार पडला. मी मुलाखतीत प्रामाणिकपणे उत्तरे द्यायचा प्रयत्न केला. ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत होती ती आत्मविश्वासाने दिली, जी उत्तरे माहीत नाहीत, तिथे खोटे न बोलता किंवा गडबडून न जाता ‘माहीत नाही’ असे मुलाखतीत सांगितले. त्याचा मला फायदा झाला आणि मुलाखतीत अतिशय चांगले गुण मिळाले. शेवटी 4 मे 2012 रोजी यूपीएससीचा निकाल लागला आणि 198 वी रँक आली. मला आयपीएस ही सर्व्हिस मिळाली आणि महाराष्ट्र केडरही मिळाले. अंतिमतः मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रात म्हणजे सामाजिक निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा भारतीय प्रशासनात काम करायची संधी उपलब्ध झाली. 

प्रश्न - तुम्ही करिअरच्या वाटा बदलून यशस्वी झालात. या सर्व वाटेवर तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे होते, याविषयी काय सांगाल?

- मी सतत नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करत होते आणि ती क्षेत्रे आईवडिलांसाठी नवीन होती. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी काळजी वाटणे स्वाभाविक होते. पण त्याच वेळी एक गोष्ट महत्त्वाची आणि कायम होती, ती म्हणजे माझा पाया पक्का होता. यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये मला अपयश आले, म्हणून मी क्षेत्र बदलत नव्हते. तर, त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करूनही, माझे मन रमत नसल्याने मी क्षेत्र बदलत होते. वडिलांनीही त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय केले. प्रत्येक व्यवसाय कसोशीने केला आणि त्यानंतर नवे क्षेत्र त्यांना खुणावू लागल्याने त्यांनी नव्या व्यवसायात प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणेच मी नव्या क्षेत्रामध्ये स्वतःला शोधत होते. कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्यातील क्षमतांचा कस लागेल, त्यातून आनंद-समाधान मिळेल, याचा हा शोध होता. त्यामुळे मी माझ्या मतांवर ठाम असले, तरीही माझ्या आईवडिलांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष करत मला पाठिंबा दिला, ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे.

बायोटेकसारखे अनभिज्ञ असणारे क्षेत्र, वकिलीसारख्या विशिष्ट नजरेतून पाहिला जाणारा पेशा आणि अनिश्चिततेची झालर असणाऱ्या स्पर्धा परीक्षा या तिन्ही ठिकाणी स्वतःला अजमावून पाहण्यासाठी संधी देताना त्यांनी माझ्यावर विश्वासच टाकला. त्यांची काळजी, त्यांच्या जागेवर योग्य होती, त्यांच्यावर असणारा सामाजिक दबावही त्यांनी योग्य पद्धतीने हाताळला, त्यामुळेच मला या माझ्या हव्या त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

आईवडिलांविषयी सांगायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रूढ अर्थाने ते खूप शिकलेले नसले तरी व्यावहारिक शिकवण देण्यावर त्यांचा भर होता. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवा किंवा डोळे झाकून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवा, असे त्यांनी, विशेषतः माझ्या वडिलांनी आम्हांला कधीच केले नाही. एकदा गावामध्ये जेसीबी मशीन आले होते आणि हे मशीन कसे काम करते, हे दाखवण्यासाठी ते आम्हांला घेऊन गेले होते. घरामध्येही त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही. मी, माझी लहान बहीण आणि भाऊ, अशी आम्ही भावंडे. मुलगा झाल्यानंतरही त्यांनी आम्हांला वेगळी वागणूक दिल्याचे आठवत नाही. माझी ओळख करून देतानाही, ते नेहमी ‘हे आमचे कन्यारत्न’ अशीच ओळख करून देत. आणखी एक गोष्ट म्हणजे आमच्या आईवडिलांनी कायम विज्ञानवादी विचारांना प्रोत्साहन दिले. आपल्या समाजात, विशेषतः ग्रामीण भागामध्ये मासिक पाळी या गोष्टीचे खूप अवडंबर माजवले जाते. आजही ग्रामीण भागामध्ये मासिक पाळीच्या वेळी मुलींना वेगळे बसवण्याची पद्धत आहे. पण ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यात अपवित्र असे काही नाही, असे माझ्या वडिलांनी मला निक्षून सांगितले. पाठांतरापेक्षा कृतीला प्राधान्य देणे, कोणीतरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवण्यापेक्षा रीतीभातींवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागील गोष्टी समजून घेण्याचा सल्ला ते देत असत. त्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित करायला शिकलो. अनेक वेळा आम्ही वडिलांकडे प्रश्न उपस्थित करत होतो. त्यावर ते त्यांच्याकडे असणारी उत्तरे आम्हांला देत होते आणि ज्या प्रश्नांची उत्तरे नव्हती, त्यासाठी त्यांनी आम्हांला कधीच आग्रह धरला नाही.

प्रश्न - पोलिस अधिकारी म्हणून अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तुम्ही जालना, जळगाव, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, त्या त्या ठिकाणी तुम्हांला आलेल्या निवडक घटना, घडामोडी आणि अनुभवाविषयी सांगाल?

- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा प्रशिक्षणाचा (प्रोबेशन) कालावधी जळगावमध्ये झाला, तर पहिली स्वतंत्र नियुक्ती जालना जिल्ह्यामध्ये मिळाली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीआयडी) काम करण्याची संधी मिळाली. हे तिन्ही अनुभव प्रत्यक्ष व्यवस्थेची माहिती देणारे आणि कामाचा अनुभव देणारे होते. तर, त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून संधी मिळाली. या सर्व काळामध्ये आपण प्रशिक्षणात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कशा उपयोगी पडतात, हे समजत गेले. त्याचबरोबर आपल्या जडणघडणीतील अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष कामामध्ये उपयोग होऊ शकतो, याची शिदोरीही मिळाली.

पुण्यामध्ये वाहतूक उपायुक्त असताना मी एक प्रयोग केला. यामध्ये दोन मोटारसायकलवर आमचे दोन पोलिस सर्वाधिक वर्दळीच्या वेळांमध्ये कात्रज ते शिवाजीनगर असा दहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी पाठवले. यातील एक मोटारसायकल सर्व नियम पाळत होती, तर एक मोटारसायकल सर्व नियम पायदळी तुडवत प्रवास करत होती. हा प्रवास संपल्यानंतर आम्ही वेळा पाहिल्या, तर नियम तोडणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये नियम पाळणारी व्यक्ती केवळ चार मिनिटे उशिरा शिवाजीनगरला पोहोचली. त्यामुळे आम्ही पुणेकरांना प्रश्न केला, की केवळ चार मिनिटांसाठी तुम्ही जीव पणाला लावणार का?’ आमच्या या प्रयोगाला चांगले यश मिळाले. पुणेकरांनी या प्रयोगाचे खूप कौतुक केले. त्याचबरोबर देशभरातील माध्यमांनी या कल्पक गोष्टीला खूप उचलून धरले व या प्रयोगाची दखल घेतली. दहा किलोमीटरला चार मिनिटे, तर आम्ही एक-दोन किलोमीटर प्रवास करताना, हा उशीर काही सेकंदांमध्ये असू शकतो. त्यामुळे आम्ही नियम पाळणेच योग्य आहे. हे लोकांच्या मनात ठसले. त्याचाच परिपाक म्हणून  आमच्या हेल्मेटसक्तीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. या काळामध्ये अपघातातील मृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले. अधिकारी म्हणून एखादा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यास समाज प्रतिसाद देतो, त्याचा अंतिम फायदा हा समाजाला होतो. असा अनुभव काम करताना येऊ लागला की, काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो.

साताऱ्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करतानाही अनेक नवीन प्रयोग मला करता आले. माझ्या नवनव्या  प्रयोगाची ऊर्जा ही माझे पोलिस दल आहे. साताऱ्यातील पोलिस दलासाठी सर्वप्रथम मी तेथील कॅन्टीन आधुनिक बनवले. याआधी त्या कॅन्टीनमध्ये न मिळणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तू आमच्या कल्याणकारी धोरणाप्रमाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. पोलिस कॅन्टीनमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू अत्यल्प किमतीत उपलब्ध झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक आणि घरातील लग्नासारख्या कार्यासाठी राखून ठेवलेल्या पैशाच्या बजेटमध्ये लाखो रुपयांची बचत झाली. ‘‘मुलीच्या लग्नासाठी आम्हांला आमच्या तटपुंज्या बचतीत तीन वस्तू घेता येणे शक्य होते; पण पोलिस कॅन्टीनमुळे आम्हांला मुलीच्या लग्नात सात-आठ गोष्टी घेत्या आल्या,’’ असे जेव्हा एखादा कर्मचारी येऊन मला सांगायचा तेव्हा खूप वेगळे समाधान लाभायचे.

सातारा जिल्हा हा ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून परिचित आहे. साताऱ्यातील बऱ्याच गावांत घरटी एक माणूस सैन्यदलात आहे. पालिस अधीक्षक म्हणून काम करताना रोज अनेक पीडित लोक तक्रार घेऊन यायचे. भेटायला येणाऱ्या लोकांत सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे प्रमाण खूप जास्त आहे असे लक्षात आले. सैनिक सीमेवर लढत असताना त्यांच्या कुटुंबाना इकडे तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला अशा प्रकारे फेऱ्या माराव्या लागत आहेत, हे पाहून खूप वाईट वाटले. सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या तक्रारी वेगाने मार्गी लावण्यासाठी महिन्यातील एक शनिवार हा फक्त सैनिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी राखीव ठेवायचा निर्णय घेतला. पहिल्या शनिवारी 750 अर्जदार आले, दुसऱ्या शनिवारी 450, तिसऱ्या शनिवारी 150 आणि नंतर अपवादानेच सैनिकांचे अर्ज पोलिस कार्यालयात आले. खरं तर बरेच अर्ज हे शासनाच्या इतर विभागांशी संबधित होते, ते त्या त्या विभागांकडे सोपवण्यात आले. त्यांनीही ते प्रश्न वेगाने निकालात काढण्यात मदत केली. सैनिकांना तातडीने न्याय देणारा हा प्रयोग धोरण म्हणून राज्य सरकारने स्वीकारला याचा आनंद वेगळाच आहे.  

कोविड-19च्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली आणि देशामध्ये लॉकडाउन सुरू झाला. त्या वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र, नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी असली, तरीही ही लढाई पोलिस विरुद्ध सामान्य माणूस नाही, ही गोष्ट आम्ही आमच्या दलातील कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले. तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करत असताना, अनेक प्रश्न समोर दिसत होते. अनेकांचे रोजगार गेले होते, अनेकांसमोर रोजच्या जगण्याचे आव्हान होते. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठीही मदत करत गेलो. विशेषतः भटक्या विमुक्तांच्या वस्त्या गावापासून दूर होत्या आणि त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्यांची उपासमार होणार नाही, याची जबाबदारी पोलिस दलाने घेतली.

दुसऱ्या बाजूला, कोविड-19च्या संसर्गाची भीती सर्वांच्या मनामध्ये होती. जिल्ह्यातील सर्व तीन हजार पोलिसांच्या दररोज ऑक्सिजन व तापमान तपासणीला सुरुवात केली. यामध्ये काही शंका आली, तर तत्काळ रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येत होता. त्यानंतर आम्ही तपासणी नाक्यांवरील पोलिसांच्या चाचण्यांना सुरुवात केली. त्यामध्ये बरेच जण पॉझिटिव्ह आले. ती गोष्ट लक्षात घेऊन सर्व पोलिसांच्या चाचण्या केल्या, तर आठ ते दहा दिवसांमध्ये 200 पोलिस पॉझिटिव्ह आले. या परिस्थितीमध्ये एवढ्या पोलिसांना कोठे ठेवायचे हा प्रश्न होता. म्हणून सातारा मुख्यालय, कराड आणि फलटण येथे पोलिस सीसी सेंटर सुरू केले. या ठिकाणी या पोलिसांवर एकत्रित उपचार करण्यात येत होते. घरामध्ये नसलो, तरीही ऑफिसच्या ठिकाणी आहोत आणि योग्य ती काळजी घेण्यात येत आहे, हा विश्वास पोलिसांमध्ये निर्माण झाला. त्यातून परस्परांना विश्वास देण्याचे काम हे बाधित पोलिस करू लागले आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्याचा हा राज्यातील एकमेव प्रयोग होता

प्रश्न - साताऱ्यामधून सोलापूर जिल्ह्यामध्ये अधीक्षक म्हणून काम करत असताना तुम्हांला एक वर्ष आता होत आहे. सोलापूरमधील तुमच्या कामाबद्दल आणि अनुभवाबद्दल काय सांगाल?

- सातारा आणि सोलापूर हे दोन्ही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. साताऱ्यात मी पोलिस अधीक्षक म्हणून पावणेदोन वर्षे काम केले. सोलापुरात एक वर्ष होत आहे. परंतु या दोन्ही जिल्ह्यांतील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी खूप वेगळी असल्याने येथील समस्यांचे स्वरूपही खूप वेगळे आहे. सोलापूर हा सीमावर्ती जिल्हा असल्याने बहुभाषक आहे. इथल्या प्रत्येक तालुक्याचे स्वरूप एकमेकांपेक्षा पूर्ण भिन्न आहे. या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पोलिस स्टेशनला भेटी दिल्यानंतर लक्षात आले की, इथे मुख्यत: पोलिस खात्याच्या दृष्टीने दोन प्रश्न सर्वांत जास्त कळीचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अवैधरीत्या होणारे वाळूचे उत्खनन आणि त्या संबंधित गुन्हेगारी. दुसरा अधिक गंभीर प्रश्न म्हणजे हातभट्टीच्या दारूचा अवैध व्यवसाय. या जिल्ह्यातील जवळपास सर्व अवैध प्रश्नांचे मूळ हे या दोन समस्यांशी संबंधित आहे.     

या जिल्ह्यामध्ये हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात तयार होते, अगदी मराठवाड्यामध्येही या दारूची चोरटी वाहतूक होते. दारू पिणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरामध्ये आहे, तर या अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. या हातभट्ट्यांवर अनेक वेळा छापे टाकले जातात, कारवाई होते. पण ही समस्या सुटलेली नाही. हातभट्टीची दारू हे एक विषारी द्रव्य आहे आणि त्याचे त्या व्यक्तीवर, कुटुंबावर आणि समाजावर खूप वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही विचार सुरू केला. यामध्ये अनेक स्तरांवर प्रयत्न करणे गरजेचे होते. यामध्ये सुरुवात छाप्यांमधूनच होणार होती. हातभट्ट्यांवर सातत्याने छापे टाकायचे, त्यामुळे हातभट्टी निर्मितीचा व्यवसाय त्या व्यक्तीला परवडणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याची योजना आखण्यात आली. त्यानंतर या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तीचे समुपदेशन करायचे आणि तिची समजूत काढल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करायचे, असा दोन स्तरांवरील कार्यक्रम सुरू केला. तर चौथ्या टप्प्यामध्ये दारू पिणाऱ्यांमध्ये जागृती सुरू केली. हातभट्टीच्या निर्मितीमधील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांना मदतही केली. त्यामुळे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांनी हातभट्टीचा व्यवसाय सोडून, चांगल्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले आहे. यामध्ये किराणा दुकान, चहाची टपरी, वडापाव, सुतारकाम, गॅरेज, शेळीपालन असे व्यवसाय या व्यक्तींनी सुरू केले आहेत. यांच्यातील एकाने पेढे तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यक्ती स्वतःला बदलत असताना, समाजानेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांना सुधारण्याची संधी दिली. यामध्ये अनेक बचत गट, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीकडे न पाहता, त्यांना समाजामध्ये सामावून घेतले. समाजाने केलेले हे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. पोलिस अधिकारी म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या चौकटीत आमचा सर्व फोर्स नियमित काम करतो. पण जेव्हा आमच्या समोरच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन आम्ही असे पुनर्वसनाचे मूलभूत आणि व्यापक परिवर्तनाचे प्रयोग आम्ही हाती घेतो तेव्हा त्याला समाजाने दिलेली साथ सर्वांत जास्त मोलाची असते.

प्रश्न - पोलिस म्हटले की काहीतरी विशिष्ट प्रतिमा समोर येते. कायदा, सुव्यवस्था किंवा गुन्हेगारी. तुमचा पोलिस अधिकारी म्हणून झालेला प्रवास फारच रंजक आहे. रुटीन कामाच्या पलीकडे जाऊन तुम्ही अनेक यशस्वी प्रयोग केले. अशा वेगळ्या प्रयोगांमुळे नावलौकिक मिळवला असल्याने तुमचा समाजाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे? काय सांगाल?

- गेल्या नऊ वर्षांत मला एकूण समाजाबद्दल आलेले अनुभव खूपच सकारात्मक आहेत. पोलिसांविषयी आपल्याकडे अनेक समज आणि गैरसमज आहेत. पोलिस म्हणून आम्ही काम करत असतो, त्या वेळी दोन प्रकारच्या व्यक्ती आमच्याकडे येत असतात, यातील एक व्यक्ती असते तक्रारदार. ती प्रामुख्याने पीडित असते आणि दुसरी व्यक्ती असते ती गुन्हेगार. गुन्हेगारांकडे पाहून आमचा दृष्टिकोन नकारात्मक झालेला असतो, असे मानले जाते. पण तक्रारदार हाच खरा गरजवंत असतो आणि त्याच्याकडे पाहून आमच्यातील संवेदनशीलताही कायम जिवंत राहते. एका दृष्टीने कायम पोलिस आणि गुन्हेगार या नात्याच्या नजरेतूनच पोलिसांकडे पाहिले जात असले, तरीही एखाद्या पोलिसाने संवेदनशीलपणे किंवा धाडसाने केलेल्या कृतीचेही समाजाकडून भरभरून कौतुक होत असते. मात्र, हा संवाद अधिकाधिक वाढायला हवा. त्यासाठी समाजामध्ये शांतता असताना, पोलिसांनीही समाजातील चांगल्या आणि सकारात्मक व्यक्तींना जोडून घ्यायला हवे. येरवडा आणि नाशिकच्या कारागृहामध्ये केलेले प्रयोग याचीच उदाहरणे आहेत. महात्मा गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ वाचल्यानंतर गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन झाल्याचे आपण पाहिले आहे. आपण आता त्यापुढे जाऊन विचार करायला हवा. मुळात कोणताही गुन्हेगार हा एखाद्या छोट्याशा गुन्ह्यांमधूनच गुन्हेगारी विश्वामध्ये अडकलेला असतो. त्याला त्या वेळीच जोडण्याची संवेदनशीलता समाजाने त्या वेळी दाखवायला हवी असते.

आपला समाज कायमच अनेक आव्हानांना तोंड देत आलेला आहे, मागासलेपण आहे. म्हणून समाजातील शहाणपण असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारी वाढते आणि अशा व्यक्तींनी अधिक पुढाकार घेऊन सकारात्मकतेची बीजे पेरायला हवीत. व्यासपीठांवरील भाषणांपेक्षाही एखादी कृती समाजाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देऊन जात असते. सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना, मी एका पोलिस स्टेशनच्या उद्‌घाटनासाठी गेले होते. त्या वेळी या इमारतीच्या कामासाठी एका ठाणे अंमलदाराने पाठपुरावा केल्याचे पोलिस निरीक्षकांनी मला सांगितले. त्या वेळी अगदी सहजपणे मी त्या इमारतीचे उद्‌घाटन त्या ठाणे अंमलदाराच्या हस्ते केले आणि त्याविषयी संपूर्ण पोलिस दलामध्येच आनंद व्यक्त करण्यात आला.

महिला अधिकारी म्हणून काम करत असताना महिलांची सुरक्षा याविषयी सातत्याने चर्चा होते. त्याविषयी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. मुलींच्या सुरक्षेवर तिचे शारीरिक सबलीकरण हा एकच पर्याय नाही; तर यासाठी समाजातील पुरुषांमध्येही शहाणपण येणे गरजेचे आहे. याची सुरुवात समाजाच्या तळातून आणि आपल्या घरांमधूनच व्हायला हवी.

मुलाखत व शब्दांकन : मधुबन पिंगळे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

तेजस्वी सातपुते
tejaswi199@gmail.com

आयपीएस अधिकारी


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके