डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रादेशिक विविधतेमुळे लोकांचे दृष्टिकोन आणि भूमिका वेगवेगळी असणे साहजिक होते. आणि तसे ते होतेसुद्धा. पण आम्ही सर्व जण एकमेकांपासून शिकत गेलो. देश, प्रदेश, भाषा, संस्कृती, धर्म आणि इतर अनेक गोष्टींविषयी आमचे प्रत्येकाचेच गैरसमज होते; परंतु हळूहळू ते दूर होत गेले. इथे हे नोंदवणे आवश्यक आहे की, सीमारेषांवर परिस्थिती काहीही असली तरी आमच्या वर्गातले वातावरण कायमच खेळीमेळीचे राहिले. विविधतेमुळे लोकांचे दृष्टिकोन आणि भूमिका वेगवेगळी असणे साहजिक होते.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर मला बाहेरच्या जगाचा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळे मी नवी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. खरे तर तेव्हा अनेक पर्याय माझ्यासमोर होते; पण जिथे केवळ भारतातीलच नव्हे तर साऱ्या दक्षिण आशियातील विद्यार्थी असतील, अशा जागी प्रवेश मिळाला तर मला हवाच होता. त्यामुळे जुलै २०१२ मध्ये मी सार्क युनिव्हर्सिटीमध्ये LLM च्या कोर्सला प्रवेश घेतला. तो कोर्स पूर्ण होताच मी जुलै २०१४ मध्ये तिथेच पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझे युनिव्हर्सिटीतले हे तिसरे वर्ष आहे. इथला आतापर्यंतचा एकूण प्रवास मला समृद्ध करणारा आणि समाधानकारक ठरला आहे. 

आज सार्क युनिव्हर्सिटीतील माझ्या अनुभवांविषयी लिहिताना मनात असंख्य आठवणी गर्दी करीत आहेत. नेमकी कशापासून सुरुवात करावी, हेच कळत नाहीये. त्यामुळे सेफ-साईड म्हणून मी सुरुवातीपासूनच सांगायला सुरुवात करते. माझ्या अलिगढ विद्यापीठातील लॉच्या शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशी सार्क युनिव्हर्सिटीच्या प्रवेशपरीक्षेचे निकाल जाहीर झाले. अर्थातच माझी निवड झाल्याचा मला खूप आनंद झाला होता. भारतीयांसाठी LLM च्या (आणि इतर सर्व कोर्सेसमध्येसुद्धा) केवळ १५ जागा होत्या. पदवीची परीक्षा संपण्याआधीच त्या १५ मध्ये आपली निवड होणं, हा मोठा रिलीफ होता. आपल्या घरापासून इतक्या जवळ (माझे घर दिल्लीपासून ७० किमी अंतरावर बुलंद शहरामध्ये आहे.) असणाऱ्या एका नव्या आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीत शिकायला जाणे, ही ऐतिहासिक अलिगढ विद्यापीठातून पदवी मिळविलेल्या माझ्यासाठी एक चांगली संधी होती आणि जोखीमही! मात्र लॉ विभागाच्या डीन सरांनी स्वतः घेतलेल्या पहिल्याच लेक्चरने माझ्या मनातील सर्व शंका-कुशंका उडून गेल्या.
  
त्यांच्या बोलण्याने मी भारावून गेले होते. त्यांनी आम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला आणि सार्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यामागचे कारण सांगायला लावले. तिथे मला पूर्ण वर्गाची ओळख झाली. आमच्या वर्गात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इरिट्रिया (पूर्व आफ्रिकेतील एक देश) मधून आलेले विद्यार्थी होते. (इरिट्रियाचा तो विद्यार्थी हा आतापर्यंतचा सार्क युनिव्हर्सिटीतला दक्षिण आशियाच्या बाहेरचा एकमेव विद्यार्थी होय.) त्याचप्रमाणे आमच्या वर्गात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांचे प्रतिनिधित्वही चांगले होते. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ इथले विद्यार्थी आमच्याबरोबर होते. पहिल्या दिवशीच मला याची जाणीव झाली की, इथून पुढचा काळ फार ‘इंटरेस्टिंग’ असणार आहे. 

प्रादेशिक विविधतेमुळे लोकांचे दृष्टिकोन आणि भूमिका वेगवेगळी असणे साहजिक होते. आणि तसे ते होतेसुद्धा. पण आम्ही सर्व जण एकमेकांपासून शिकत गेलो. देश, प्रदेश, भाषा, संस्कृती, धर्म आणि इतर अनेक गोष्टींविषयी आमचे प्रत्येकाचेच गैरसमज होते; परंतु हळूहळू ते दूर होत गेले. इथे हे नोंदवणे आवश्यक आहे की, सीमारेषांवर परिस्थिती काहीही असली तरी, आमच्या वर्गातले वातावरण कायमच खेळीमेळीचे राहिले. याचा अर्थ असा मात्र नाही की, आमचे वाद-विवाद झाले नाहीत. उलट वर्गात आम्ही प्रत्येकच विषयावर अगदी तावातावाने चर्चा केल्या. पण त्याचे प्रतिबिंब आमच्या व्यक्तिगत मैत्रीवर पडले नाही. जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्लीत होस्टेल मिळायला संघर्ष करावा लागतो. पण मला त्याचा अनुभव आला नाही, कारण सार्क युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीबाहेरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला रूम मिळते. 

इथले होस्टेलमधले आयुष्य बरेच कम्फर्टेबल आहे. तुमच्या सर्व गरजांची नीट काळजी घेतली जाते. आम्हाला रूम आणखी दोन विद्यार्थिनींबरोबर शेअर करावी लागते. होस्टेलमध्ये (कॉमन) वॉशिंग मशीनपासून ते कॉमनरूम आणि रीडिंग रूमपर्यंत सर्व आधुनिक सोई-सुविधा आहेत. मेसमधले जेवण चांगले असते आणि त्याला पूरक म्हणून ‘कँटीन’ची सोय आहे. LLM च्या काळात माझी एक रूममेट भारतीय आणि दुसरी पाकिस्तानमधून आलेली होती. आता मात्र दोघीही भारतीयच आहेत. इथे येण्याने माझ्यासमोर अनेक संधींची दारे उघडली. इथले इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. युनिव्हर्सिटी नवी असली तरी याचा अर्थ असा नाही की, इथे चांगल्या शिक्षकांची कमतरता आहे. उलट इथे जुने-जाणते शिक्षक आणि तरुण-उत्साही विद्यार्थी यांचे चांगले कॉम्बिनेशन आहे. 

चाणक्यपुरीतील डिप्लोमॅटिक विभागातील लोकेशनमुळे आम्हाला संपूर्ण दक्षिण  आशियातील आणि बाहेरच्यासुद्धा अभ्यासकांना भेटण्याची संधी मिळते. डॉ.आदिल नज्म हे पाकिस्तानी तज्ज्ञ, न्यायाधीश हेल्मुट टर्क, आइसलँडचे गृहमंत्री, पाकिस्तानी उच्च शिक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ.मुख्तार अहमद, श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ गणनाथ ओबेसेकरा यांची सत्रे ऐकणे ही आयुष्यातील एक पर्वणीच होती. 

सार्क युनिव्हर्सिटीतील एक इंटरेस्टिंग इव्हेंट म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसांचे एकत्रित सेलिब्रेशन. १४ ऑगस्टच्या संध्याकाळी ते सुरू होते. रात्री नऊ ते बारा पाकिस्तानी, तर बारानंतर भारतीय विद्यार्थी वेगवेगळे कार्यक्रम सादर करतात. या सोहळ्यात सहभागी व्हायला मिळणे हा सगळ्यात रोमांचकारी अनुभव होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी समान आहेत, पण कुठे तरी दोन्ही बाजूंच्या मनात शत्रुत्वाची भावना रुतून बसलेली आहे. त्यामुळे एकमेकांचे स्वातंत्र्यदिन एकत्रितपणे साजरे करणे ही एकमेकांच्या स्वीकाराची पहिली पायरी असू शकते. दोन्ही देशांत शांतता नांदावी यासाठी एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे आवश्यक आहे. 

युनिव्हर्सिटीतील दुसरा एक कार्यक्रम मला खूप आवडतो, तो म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’. २१ फेब्रुवारीला जगभर भाषिक आणि सांस्कृतिक विविधते- विषयी जाणीव वाढावी, यासाठी (१९९९ पासून) तो साजरा केला जातो. युनेस्कोने याबाबत पुढाकार घेतला. २००८ हे वर्ष युनोच्या आमसभेने ‘जागतिक भाषा वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. २१ फेब्रुवारीचे महत्त्व असे की, याच दिवशी १९५२ मध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला (तेव्हाच्या एकसंध) पाकिस्तानातील राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केले होते. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्यात असंख्य विद्यार्थी मारले गेले. या दिवसाच्या सेलिब्रेशनमुळे मला याची जाणीव झाली की, भाषा हा दक्षिण आशियाला जोडण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरू शकतो. 

उत्तर भारतीय आणि पाकिस्तानी लोक हिंदी बोलतात, भारतातील प.बंगाल आणि बांगलादेशातील लोक बंगाली ही एकच भाषा वापरतात, भारतातील तामिळनाडू आणि श्रीलंकन लोक तमिळ भाषा बोलतात. आपल्या भारतातच भाषा आणि खाद्यसंस्कृतीमध्ये खूप विविधता आहे. या विविधतेला आपण जपतो आणि तिचा अभिमान बाळगतो. दक्षिण आशियाई आपल्यामध्ये इतक्या गोष्टी सारख्या आहेत की, आपण सीमारेषांनी विभाजित झालो असलो तरी  एकमेकांशी जोडले जावे यासाठी खूप प्रबळ कारणे अस्तित्वात आहेत. असे जोडले जाण्याने प्रगती आणि समृद्धीच्या वाटेने दक्षिण आशिया पुढे जाईल. 

या सेलिब्रेशनमुळे मला ‘परक्या’शी जोडून घेता आले, जे अगदी ‘आपल्या’सारखेच होते. पण मी जर परक्यांना सार्क युनिव्हर्सिटीमध्ये भेटले नसते तर ही जाणीव मला कधीही झाली नसती. म्हणजे जेव्हा देशाची ओळख तिथल्या माणसांमुळे होते, (नकाशांमुळे नाही) तेव्हाच हे शक्य होते. त्यामुळेच मला असे वाटते की, लोकशाहीवादी दक्षिण आशिया उभा करण्यासाठी ही युनिव्हर्सिटी मोलाची भूमिका बजावेल. 

इथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, दक्षिण आशिया हा विरोधाभासांनी भरलेला प्रदेश आहे. एकीकडे भूतान ‘राष्ट्रीय आनंदाची’ भाषा बोलतो तर दुसरीकडे अंतर्गत संघर्षात अफगाणिस्तान होरपळून निघतो. दक्षिण आशियातच जगातल्या सर्वाधिक गरिबांची वस्ती आहे. इथे जातिभेद, स्त्रियांवरील अत्याचार, आर्थिक व सामाजिक मागासलेपणा यांचे प्रमाण बरेच मोठे आहे. तसेच अपंग आणि transgender समूहही इथे अस्तित्वात आहेत. माझ्या सार्क युनिव्हर्सिटीतल्या अनुभवावरून मला असे वाटते की, या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सकारात्मक संवादाची गरज आहे. युनिव्हर्सिटी ती स्पेस देते. शेवटी मला इतकेच सांगायचे आहे की, पुरोगामी (progressive) दक्षिण आशियाचे स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा आपण सर्व समावेशकतेची कल्पना प्रत्यक्षात आणू शकू.

इरमने सार्क युनिव्हर्सिटीमधून LLM (२०१२-१४) केले असून, सध्या ती सार्क युनिव्हर्सिटीमध्येच पीएच.डी.च्या पहिल्या वर्षाला आहे.
 

Tags: लोकशाहीवादी दक्षिण आशिया भारत इरम खान India Iram Khan saarc university democratic south asia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

इरम खान,  भारत
khaniram.lawyer@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके