अर्थात, ‘घाशीराम’मध्ये मी संगीताचा केलेला वापर, अभिनयाची वेगळी शैली आणि अंधार-उजेडाचा खेळ व परिणामकारक समूहदृश्य अशा प्रयोगांमुळे रामदासला माझ्याबद्दल खात्री वाटू लागली होती. ‘सामना’ची पटकथा माझ्यासमोर येण्यापूर्वी दौंडमधल्या प्रॅक्टीसमधून मला समाजातल्या एका क्रॉस सेक्शनचा भाग बनता आलं होतं. तत्पूर्वी, ससूनमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतानासुद्धा दारिद्र्य जवळून पाहिलं होतं; त्यात दौंडच्या अनुभवानं भर टाकली होती. चळवळी-आंदोलनं मी दुरून पण गांभीर्याने पाहत होतो, निरीक्षण करत होतो. तरीही, या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्याला चित्रपट करता येईल, असं मला वाटत नव्हतं; पण चित्रपट करण्याचा मोह मात्र होता.

जब्बार सर, 2013 मध्ये भारतीय सिनेमाचे शताब्दी वर्ष साजरे झाले, तेव्हा साधनाने ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर विशेषांक काढला आणि अलीकडेच त्याचे पुस्तकही आले आहे. खरे तर त्या अंकात तुमचा एक लेख आम्हाला हवा होता; पण त्या अंकाच्या नियोजनाच्या काळात तुम्ही परदेशी गेला होतात, म्हणून राहून गेले. असो. तर, त्या पुस्तकात मी ‘सामना’वर लिहिले आहे. आता ‘सामना’च्या निमित्ताने तुमची मुलाखत घेण्यामागे तीन कारणे आहेत. पहिले कारण उघडच हे आहे की, मला सर्वाधिक प्रभावित करून गेलेला सिनेमा म्हणून ‘सामना’विषयी जाणून घेण्यात विशेष रस आहे. दुसरे कारण- सामना प्रदर्शित झाला 1974 मध्ये, म्हणजे त्याला आता 40 वर्षे झाली आहेत. तिसरे कारण- तो तुमचा पहिला सिनेमा आहे, अगदी अलीकडे तुम्ही यशवंतरावांवर सिनेमा केलात, म्हणजे या क्षेत्रात तुमची चार दशके झालीत. चौथे कारण- लोकसभा निवडणुका झाल्यात, केंद्रात सत्तांतर झालेय; राज्यातील निवडणुका पुढील आठवड्यात आहेत, त्या पार्श्वभूीवर हा दिवाळी अंक येतोय. त्यामुळे ‘सामना’च्या मागची व पुढची भूमिका जरा विस्ताराने जाणून घ्यावीशी वाटते.
प्रश्न : तर, पहिल्यांदा हे सांगा की- 1974 च्या दरम्यान ‘सामना’सारखा अतिशय आगळा-वेगळा सिनेमा करण्याचे बीज कसे पडले? तुच्याकडे तो कसा आला?
- कुठल्याही चित्रपटाचं दिग्दर्शन सहजासहजी घडत नाही. त्यामागे काळाचं, अनुभवांचं, निरीक्षणांचं आणि अनेकानेक प्रकारच्या समजुतींचं संचित असतं. त्यामुळे सामनाची पटकथा माझ्याकडे येण्यापूर्वीचं माझं आयुष्य या निमित्ताने तुम्हाला सांगितलं पाहिजे. ‘सामना’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा; परंतु कलेच्या क्षेत्रातील माझा जन्म त्याआधीचा. म्हणजे, मला वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साठच्या दशकात माझं शाळेतील शिक्षण पूर्ण झालं. शाळेत असताना मला नाटकात काम करण्याची संधी तर मिळालीच; पण नाटक-दिग्दर्शनाचीदेखील संधी मिळाली होती. त्या जोडीला मला सोलापुरात श्रीराम पुजारीसरांच्या घरी राहण्याची संधी मिळाली. (पुजारी... हे त्या काळात नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठं प्रस्थ) त्यांच्या घरी राहून साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील मोठ्या लोकांना फार जवळून पाहता आलं. (त्या कलावंतांना चहा देण्यापासून अंघोळीचे पाणी देण्यापर्यंत.) परिणामी कलेच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या तोंडून असंख्य गोष्टींतील बारकावे माझ्या कानांवर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळेच शाळेत असताना बसवलेलं ‘चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूकनाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये मी केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली.
त्यानंतर पुण्यात आल्यावर बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये इतरही नाटकं बसवताना आगळेवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळाली. उदा. तेंडुलकरांची ‘बळी’ ही एकांकिका किंवा ‘श्रीमंत’ हे नाटक. दरम्यानच्या काळात अजून काही तरी वेगळं केलं पाहिजे, असं मनापासून वाटायला लागलं. त्यातून शोध सुरू झाला आणि त्याच वेळी विजय तेंडुलकर माझ्या आयुष्यात आले. त्यांनी लिहिलेली काही नाटकं वाचली, काही बसवली, तर काहींमध्ये प्रत्यक्ष काम केलं. ‘अशी पाखरे येती’ हे अतिशय तरल नाटक त्यांनी मला राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिलं होतं. ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. ‘घाशीराम’नं आम्हाला अनेक अर्थांनी अधिक जवळ आणलं. आता ‘सामना’च्या स्क्रिप्टकडे जाण्यापूर्वी, रंगभूमीमधल्या माणसांची चित्रपटाबद्दलची समजूत सांगितली पाहिजे. रंगभूमीमधल्या माणसांना नेहमीच असं वाटत आलंय की, रंगमंचावर आपण फारच मर्यादित अवकाशात राहतो. नाटक हे पूर्णत: नाटककाराचं असतं. त्यात दिग्दर्शक केवळ इंटरप्रिट करत असतो. त्यामुळे कुठलाही दिग्दर्शक ‘नाटक हे माझं माध्यम आहे,’ असं म्हणूच शकत नाही. आणि असं कुणी म्हणत असेल तर ते चूक आहे. ‘घाशीराम’सारखं रंगभूमीच्या अवकाशाला आव्हान देणारं, आगळ्यावेगळ्या धाटणीचं व सर्वार्थाने गाजलेलं (अत्यंत गंभीर स्वरूपाचं) महत्त्वपूर्ण नाटक दिग्दर्शित केल्यानंतरही मी हे ठामपणे सांगतो की, ‘घाशीराम कोतवाल’ हे केवळ आणि केवळ तेंडुलकरांचंच!
पण चित्रपटाच्या बाबतीत असं नसतं. चित्रपट हा नेहमीच दिग्दर्शकाच्या डोळ्यांतून पुढे येत असतो. खरं तर, माझा रंगमंचावरून ‘सामना’पर्यंतचा प्रवास तेंडुलकरांच्या सोबतीनेच झाला. मला गंभीरपणे काही तरी करावंसं वाटलं तेव्हापासून मी तेंडुलकरांच्या हाताला धरूनच तयार झालो. ‘सामना’ ही त्यांची महत्त्वपूर्ण पटकथा माझ्याकडे येण्यापूर्वी त्यांनाही माझा अंदाज आलेला असावा. दरम्यानच्या काळात माझं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी व माझ्या पत्नीने प्रॅक्टीससाठी पुण्याजवळील दौंड हे गाव निवडलं होतं. मी बालरोगतज्ज्ञ आणि माझी पत्नी स्त्री-रोग तज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून किमान रेल्वेतील लोक तरी सुरवातीला आपल्याकडे येतील, हा हेतू दौंड हे गाव निवडण्यामागे होता. आमचा प्रॅक्टिसमध्ये जम बसलेला होता. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ‘घाशीराम’ नाटकाच्या तालमीसाठी मी पुण्यात जवळपास साडेतीन महिने रोज यायचोच. असं सगळं सुरू असताना एके दिवशी रामदास फुटाणे माझ्याकडे आला. त्याने माझ्यासमोर ‘सामना’ची पटकथा ठेवली आणि म्हणाला, ‘‘आपल्याला ही फिल्म करायचीय.’’ मी म्हणालो, ‘‘मी फिल्म करू शकतो, हे तुला कसं काय वाटलं? मला अजून फिल्मची भाषा व तंत्रही कळत नाही.’’ रामदास म्हणाला, ‘‘त्याबाबत तेंडुलकरांशी चर्चा झालीय. त्यातच मी तुमचं ‘घाशीराम’ पाहिलंय. मला ते आवडलंय.’’ रामदास हा चित्रकलेचा शिक्षक आणि कवी तो चित्रपटाच्या क्षेत्रातील माझ्यासारख्या अतिशय नवख्या माणसासमोर असा प्रस्ताव ठेवतोय, म्हणजे पाहा तो नवीन आणि मी नवीन.
अर्थात, ‘घाशीराम’मध्ये मी संगीताचा केलेला वापर, अभिनयाची वेगळी शैली आणि अंधार-उजेडाचा खेळ व परिणामकारक समूहदृश्य अशा प्रयोगांमुळे रामदासला माझ्याबद्दल खात्री वाटू लागली होती. ‘सामना’ची पटकथा माझ्यासमोर येण्यापूर्वी दौंडमधल्या प्रॅक्टीसमधून मला समाजातल्या एका क्रॉस सेक्शनचा भाग बनता आलं होतं. तत्पूर्वी, ससूनमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतानासुद्धा दारिद्र्य जवळून पाहिलं होतं; त्यात दौंडच्या अनुभवानं भर टाकली होती. चळवळी-आंदोलनं मी दुरून पण गांभीर्याने पाहत होतो, निरीक्षण करत होतो. तरीही, या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्याला चित्रपट करता येईल, असं मला वाटत नव्हतं; पण चित्रपट करण्याचा मोह मात्र होता. म्हणून मग मी रामदासला म्हटलं, ‘‘तुम्ही माझ्याकडे सामनाची पटकथा घेऊन आलात, परंतु तुम्ही तेंडुलकरांशी याबाबत बोललात का?’’ तर रामदास म्हणाला, ‘‘होय. ते म्हणाले, जब्बारला आत्मविश्वास वाटत असेल तर त्याने करावा. कारण त्याने अजून चित्रपट केलेला नाही.’’ आता बघा तेंडुलकर नावाच्या माणसाचं मोठेपण इथे दिसतं. ‘सामना’सारखी अत्यंत गंभीर विषयावरची पटकथा त्यांनी चित्रपटातील माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या हाती विश्वासाने दिली. सामनाच्या यशाचं खरं श्रेय तेंडुलकरांचं आहे. कारण सामनाची एकूण पटकथा तर ग्रेटच; शिवाय त्यातील संवाद आणि कंसातील सूचना या सर्व गोष्टी प्रचंड बारकाव्यांनिशी कथेला पुढे नेणाऱ्या होत्या.
त्याचबरोबर सामनातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा त्यांनीच ठरवलेल्या होत्या. त्यातील सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणजे हिंदुराव (निळुभाऊ) आणि मास्तर (डॉ.श्रीराम लागू). तेंडुलकरांनी या दोन व्यक्तिरेखा निळुभाऊ आणि डॉ. लागू यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिलेल्या होत्या. असं सर्व भव्य-दिव्य आणि जवळपास रेडिमेड स्क्रिप्ट समोर आल्यावर मी रामदासला सांगितलं की, दोन दिवसांत वाचून कळवतो. त्याप्रमाणे संहिता वाचल्यावर रामदासाला कळवलं की, ‘हो, मी तयार आहे फिल्म करायला.’ मग तेंडुलकरांना भेटलो. त्यांना म्हणालो, ‘‘खूपच आवडलं; मला करायला आवडेल.’’ त्यावर तेंडुलकर नेहमीच्या शैलीत मान हलवून म्हणाले ‘‘बरं, काय वाटलं अजून?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही इतकं अप्रतिम लिहिलं आहे. मला त्यात कुठेही बदल करावासा वाटत नाही. आता फक्त हे सगळं पडद्यावर कसं आणायचं, एवढाच काय तो विषय आहे.’’
प्रश्न : ‘सामना’च्या स्क्रिप्टविषयी, कथानकाविषयी काय सांगाल?
- ‘सामना’ची कथा, पटकथा आणि संवाद सगळं तेंडुलकरांचं. एक तर सामना त्यांनी थेट पटकथेच्या रूपातच लिहिला होता. कथेचं सूत्र सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आणि त्याला अचानक भेटलेला मास्तर यांच्याभोवती फिरतं. कारखान्याचा चेअरमन हा राजकीय डावपेचात मुरलेला अत्यंत व्यवहारी मनुष्य आणि मास्तर हे पात्र स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं पण स्वातंत्र्यानंतर भ्रमनिरास झालेलं. मास्तर हे पात्र, त्या चेअरमनचे यश समजून घेताना त्या यशाच्या काळ्या बाजूबद्दल प्रश्न विचारत-विचारत सहकाराच्या सत्तेनं निर्माण केलेल्या गुंत्यांचं भावविश्व उलगडवण्याचा प्रयत्न करतंय.
आता सामनाचा दिग्दर्शक म्हणून आलेला अनुभव सांगतो. खरं तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सामनाचं सर्व क्रेडिट तेंडुलकरांना; कारण सामना हे मी निवडलेलं कथानक नाही, खरं तर त्यांनीच मला निवडलंय.! त्याचबरोबर सामनातील प्रमुख कलाकार तेंडुलकरांनीच निवडलेले. तसंच, मी कथानकाला कुठेही वळण दिलेलं नाही; तेंडुलकरांचा त्यामागचा सोशिओ-पोलिटिकल विचार जास्तीत जास्त खोलवर पोहोचवण्याचं काम काटेकोरपणे करायचं होतं. त्यासाठी मी तेंडुलकरांकडून त्यांचा यामागचा विचार समजून घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी उडवून लावलं. म्हणाले, ‘‘अशी पाखरे येती’च्या वेळेस मी तुला काही सांगितलं का? फक्त वाचून दाखवलं आणि तू तुझ्या पद्धतीने करून दाखवलंस. मग आताही तसंच कर ना.’’ मी म्हणालो, ‘‘दौंडला जाऊन मी काही गोष्टी पाहिल्यात; पण सोशिओ-पोलिटिकल अँगल मला अजून नीट स्पष्ट होत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘अरे वेड्या, तेवढंच थोडं आयुष्य असतं? त्यापलीकडेही आयुष्य असतं. समजून घ्यायचं ठरव, बरोबर समजेल! आणि एवढं करून अडलंच कुठे, तर विचार.’’
खरं तर तेंडुलकरांनी मला पुन्हा विचार करायलाच सांगितला. माझ्या कल्पनाशक्तीवर आणि एकूण विश्लेषणावर त्यांनी विश्वास दाखविला. (या निमित्ताने एक गोष्ट सांगितली पाहिजे. ती अशी की नॉट ओन्ली सामना, त्यांच्या हयातीत आमचा परिचय झाल्यापासून अखेरपर्यंत त्यांनी मला सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातील पेच सोडवताना मार्गदर्शन केलं, दिशा दिली, आधार दिला. खरं तर, ही वॉज अ पार्ट ऑफ माय लाइफ!) सामना करताना त्यातलं कथानक महत्त्वाचं होतंच, परंतु त्याहीपेक्षा तेंडुलकरांचा सोशिओ-पोलिटिकल विचार जास्त महत्त्वाचा होता. कारण ‘घाशीराम कोतवाल’ असो किंवा ‘अशी पाखरे येती’ असो; यातूनही तेंडुलकर सोशियो-पोलिटिकलच बोलत होते. त्यातला फरक एवढाच की, वेगवेगळ्या काळाबद्दल आणि वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत होते. सामनाच्या कथानकातून तेंडुलकर तळागाळातल्या जनतेच्या (बारीक) शोषणाबद्दल बोलत होते. त्यांनी ‘सामना’ लिहितानाच भोवतालच्या (आमच्यासारख्या) लोकांना इशारा दिला होता की, ‘हा सिनेमा सहकारातील प्रबळ सत्तास्थानांबद्दल आहे; प्लीजऽ बी केअरफुल!’ दोन प्रमुख व्यक्तिरेखांभोवतीच हा सिनेमा आहे. आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासूनच्या काळातील दोन परस्परविरोधी प्रवृत्तींचा तो संवाद आहे. यातल्या एका पात्राने (चेअरमन) स्वातंत्र्य मिळालं, तेव्हाच समाजपरिवर्तनासाठी सत्ता हाच उत्तम मार्ग मानलेला आहे.
आणि दुसऱ्या पात्राने गांधींबरोबर चळवळीसाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे, त्याला स्वातंत्र्यानंतरचं चित्रच मान्य नाही. त्याला सतत असं वाटतंय की, ज्यासाठी आपण लोकशाही मिळवलीय, ती आता दिसत नाही. आंबेडकरांनी घटनेतून दिलेली स्वातंत्र्य-समता-न्याय ही तत्त्वे त्याला प्रत्यक्षात आलेली दिसत नाहीत. त्याला मानवता हरवत चालल्याचं दु:ख आहे. शिवाय, माणसाला काही काळासाठी बधिर आणि संभ्रमित करणाऱ्या दारूच्या नादाला हा मास्तर लागल्याने तो अजूनच कोंडीत पकडला गेलाय! त्यातच मास्तरची मुलगी अपघातात निवर्तलेली असल्याने तो उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे मास्तरच्या आयुष्याची ट्रॅजेडी आणि चेअरमनचा सत्ता-व्यवहार यांतील हा संवाद आहे. तेंडुलकरांनी तो सुरेख रचला आहे. चेअरमनला मास्तर अगदी अपघाताने भेटतात. दोघांनाही पहिल्यांदा भेटताना पुढे त्यांच्यात निर्माण होणाऱ्या नात्याची अजिबातच कल्पना नाही. या दोघांच्या संवादात एकाने (मास्तराने) दुसऱ्याला (चेअरमनला) प्रश्न विचारायचेत की, बाबा रे, तू इतका यशस्वी झालास; तर तुझ्या यशाचं गमक काय आहे? हा देश तुझ्या यशाच्या पद्धतीनेच (मार्गाने) पुढे जाणार आहे? मास्तर प्रश्न विचारताना पुढाऱ्याच्या आत्मसन्मानाला एक प्रकारे आव्हानच देतोय. अपराधाची जाणीव असणाऱ्याला हा मास्तर चॅलेंज देतोय. हा मास्तर हे काळजाला भिडणारे प्रश्न सार्वजनिक व्यासपीठावरून विचारत नाही, तर तो ते थेट विचारतोय.
खरं तर हा सिनेमा आला तेव्हा काही लोक म्हणाले होते की, यातला मास्तर व हिंदुराव एकच आहेत. म्हणजे ‘मास्तर हा हिंदुरावचा अंतरात्मा आहे,’ असं काही लोक म्हणत होते. पण तसं ते नाही. कारण हा मास्तर कोशात बुडालेला आहे, हिंदुराव कुठल्याही कोशात नाहीत. आणि यातला मास्तर हिंदुरावच्या कॉन्शसला प्रश्न विचारतोय की, ‘तू सांग मला, मारुती कांबळे कुठे आहे? त्याचं काय झालं?’ आणि तेंडुलकर नावाच्या दूरदर्शी माणसाला पडलेला हा प्रश्न सामना चित्रपटाचा ‘की-पॉइन्ट’ आहे. आज 2014 मध्येसुद्धा मारुती कांबळेचं काय झालं, हा प्रश्न केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात उलगडलेला नाही. त्यामुळे तेंडुलकर मोठे ठरतात. भारतीय साहित्य-कलेच्या क्षेत्रातील आणि इतिहास व संस्कृतीबाबतीतील वर्तान व भविष्याचा दीर्घकालीन वेध घेण्याचा दूरदर्शी ॲप्रोच त्यांच्याठायी फारच भक्कमपणे आकाराला आलेला होता, हेदेखील यानिमित्ताने नोंदवले पाहिजे. सामनाच्या निमित्ताने आम्ही (तेंडुलकर आणि मी) सहकारातील नैतिक भ्रष्टाचाराबद्दल बोलत असलो, तरी सहकाराने ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत दिलेली समृद्धी आम्हाला मान्यच आहे. सहकार नसतं; तर आज जो बहुजन समाज सगळ्या क्षेत्रांत उंचावर दिसतो, तो दिसला नसता. हे आम्हाला केवळ मान्य आहे असे नसून, याबाबत सहकाराला योगदान देणाऱ्यांचे ऋणच आम्ही (आपण) मानत आहोत. म्हणजे, तुम्ही अगदी सामनामध्ये पाहा- जेव्हा हिंदुरावला अटक होते आणि पुढचा सत्ताधारी हिंदुरावपेक्षा वाईट आहे असं कळतं; तेव्हा हिंदुरावला ‘तुम्ही परत लवकर या’ असं सांगायला मास्तर विसरत नाही. सामना सिनेमातून तेंडुलकरांनी उपस्थित केलेले काही प्रश्न आणि काही प्रसंग सर्वकालीन आहेत. या प्रश्नांना माणसांच्या मनावर ठसवण्याचं काम दोन महान कलावंतांनी केलं आहे.
प्रश्न : ‘सामना’च्या दिग्दर्शनाच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
- मी आधीच म्हणालो की, महत्त्वाची पात्रं डोळ्यांसमोर ठेवून तेंडुलकरांनी सामना लिहिला. मला चित्रीकरणातच काय ती संधी होती. कोल्हापूर परिसरात खूप सहकारी साखर कारखाने आहेत म्हणून सामनाचं चित्रीकरण तिकडे करावं, असंच आम्ही ठरवलं होतं. विलास रकटेंच्या मदतीने काही साखर कारखान्याकडे आम्ही परवानगी मागितली; पण ती मिळाली नाही. अगदी पटवून सांगून देखील नकारच आला. मग वारणानगरला तात्यासाहेब कोरेंकडे गेलो. तिथे मात्र आदरातिथ्य झालं आणि मोकळ्या मनाने परवानगी मिळाली. पुढे काही भाग आम्ही राहुरीला बाबूराव तनपुरेंच्या कारखान्यावर शूट केला. गावाच्या शूटिंगसाठी जामखेड परिसराची निवड केली, आणि स्टुडिओसाठी कोल्हापूरचा भालजींचा जयप्रभा स्टुडिओ निवडला. आता सर्व काही माझ्यासमोर होते. पटकथा आणि कलाकार तयार झाल्यावर मला टेक्निकली पुढे जायचं होतं. पण सिनेमाच्या तांत्रिक बाबी बारकाव्याने मला फारशा माहीत नव्हत्या. अशा वेळी समर नखाते हा मित्र डोळ्यासमोर आला. त्याला मी सांगितलं की, ‘समर, मला लेन्स फारशा कळत नाहीत आणि शॉट डिव्हिजनचा कॉन्फिडन्स नाही. गड्या, तू मला मदत केली पाहिजेस.’’
समर हाच माझा यातला पहिला गुरू आहे. ही जबाबदारी त्याने प्रेमाने पार पाडली. मग डॉ.लागू आणि निळुभाऊंसारख्या महान कलावंतांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली. खरं तर तेंडुलकरांच्या संवादांना उठाव देण्यासाठी कलावंतांना त्यातील बारकावे सांगावे लागतात. परंतु इतक्या महान कलावंतांना माझ्यासारख्या अतिशय ज्युनिअर माणसानं कसं सांगायचं, हा माझ्यासमोर पेच होता. त्यामुळे आवश्यकता असली तरी ती कॅमेऱ्यापुरती ठेवायची, असं ठरवलं होतं. शॉट कसे शूट होणार आहेत, हे त्यांना सांगितलेलं नव्हतं! त्यांनी दोघांनी कसं व काय करायचं हे ठरवलेलं असेल, (ते दोघेही निभावून नेतील) असं मानून मी मुहूर्ताची तयारी केली. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी रामदास व मी भालजी पेंढारकर यांच्या (कोल्हापूर) स्टुडिओत गेलो. आमची दोघांची ती पहिलीच भेट. ते म्हणाले, ‘‘तुम्ही घाशीराम केलंय, तुमचं लोक खूप कौतुक करतायत. कोल्हापूरला एकदा-दोनदा येऊन गेलंय तुमचं नाटक, पण पाहायचा योग आलेला नाही. काही तरी पेशव्यांबद्दल वाद आहे त्यात, असं पण समजलंय. असो... तुमच्या कामाबद्दल मात्र कौतुक ऐकलंय. तर, मी येईन उद्घाटनाला.’’ भालजींचे आभार मानून आम्ही निघालो तेव्हा हाक मारून ते म्हणाले, ‘‘अरे, लताला बोलवा ना तुच्या उद्घाटनाला.’’ मला लता (असं) म्हटल्यावर कळलंच नाही. मी म्हणालो, ‘‘बाबा’’ ते म्हणाले ‘‘अरे, लता आलीय. दोन-तीन दिवस मुक्काम आहे. तिला निमंत्रण द्या ना, ती येईल!’’ आणि त्यांनी आवाज दिला, ‘‘लताऽऽ जरा बाहेर ये.’’ तर साक्षात लता मंगेशकर.! एकदम अविश्वसनीय वाटलं. डोळ्यांवर विश्वास बसेना.
मग मी नमस्कार करून परिचय सांगितला. तर दीदी म्हणाल्या, ‘‘तुच्याबद्दल ऐकलंय. बाळ(हृदयनाथ) सांगत असतो. तुमच्या ‘घाशीराम’ला भास्कर चंदावरकरांचं संगीत आहे ना? ते पं.रवी शंकर यांचे शिष्य आहेत.’’ मग मी दीदींना म्हणालो, ‘‘उद्या माझ्या पहिल्या सिमेनाचा मुहूर्त आहे. तुम्ही मुहूर्ताला आलात तर बरं होईल.’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी येऊन काय करू?’’ तर बाबा म्हणाले, ‘‘अगं, तू कॅमेरा स्टार्ट कर.’’ दीदी तयार झाल्या. मी अचंबित झालो. आपल्या पहिल्या सिनेमाच्या वेळी केवढे योगायोग घडत आहेत, असं मला वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी मुहूर्त ठरला व बाबा, दीदी आले. पहिला शॉट शूट करायचा होता. मेकअपचं काम निवृत्ती दळवी यांच्यामुळे फारच सोपं आणि जलद व्हायचं. कोट घालून डॉ. लागू माझ्यासमोर आले. म्हणाले, ‘‘जब्बार, बघ, मी तयार आहे. आता मी डॉ. लागू नाही, तुझा मास्तर आहे आणि हो, मुहूर्ताचं वाक्य कुणावर आहे?’’ मी म्हणालो, ‘‘निळुभाऊंवर. तर ते म्हणाले, तू निळुभाऊंना काही सांगितलंयस का, कसं करायचं ते?’’ मी म्हणालो, ‘‘नाही. आणि मी दोघांनाही काहीही सांगणार नाही. मी फक्त कसे शॉट घ्यायचे, एवढंच सांगणार,’’ तर ते म्हणाले, ‘‘म्हणजे? अरे, किमान आम्हाला लिंक तर सांगशील?’’ मी म्हणालो, ‘‘हो, तेवढं करणारच आहे.’’ त्यातच समर नखातेने मला सांगितलं होतं की, जास्त एक्सप्लेन केलं तर उगाचच नाट्यमयता वाढेल अन् गोंधळ होईल.
मग कॅमेरा तयार झाला. चंद्रकांत मांडरे यांनी फटमार केली. निळुभाऊ पहिल्या सीनसाठी सज्ज झाले. लताजींनी कॅमेऱ्यातून पाहिलं. कॅमेरामन सूर्यकांत लवंदे यांनी मला कॅमेऱ्यातून पाहायला सांगितलं. मला हवं ते त्यातून दिसत होतं. निळुभाऊ : जगदंबऽ जगदंबऽऽ (निळुभाऊंच्या खास खर्ज्याच्या आवाजात) तेव्हा माझ्याशेजारी उभे असलेले डॉ.लागू म्हणाले, ‘‘अरे बापरे! जब्बार, हा मुहूर्त झाल्यावर आपण बोललं पाहिजे, आवश्यक आहे.’’ त्यांना काय म्हणायचंय हे मला लक्षात आलं नाही. मुहूर्ताचा कार्यक्रम संपला. चहापाणी झालं. पाहुण्यांना निरोप दिला. मग डॉ. लागू मेकअपरूममध्ये म्हणाले, ‘‘जब्बार, तुझ्या लक्षात आलंय का? काय होतंय बघ निळुभाऊंचा आवाज खर्ज्यातला आणि माझा आवाजही खर्ज्यातलाच असला, तर सिनेमात दोन आवाज एकमेकांवर थ्रू-आऊट आदळतील आणि ते फार तापदायक होईल.’’ मी म्हणालो, ‘‘तुमचं बरोबर आहे, पण पीचमध्ये फरक राहील.’’ तर ते म्हणाले, ‘‘तसं नाही राजा, मला काही तरी बघावं लागेल. मी अगोदर निळुभाऊंना मुद्दामहून कन्सल्ट केलं नाही, कारण त्यांच्या आतून कसं काय येतंय, ते पाहू या- असंच मी ठरवलं होतं.’’ इथे मला एक बुद्धिमान नट दुसऱ्या बुद्धिमान नटाला कसं समजून घेतो, ते शिकायला मिळालं.
त्यानंतर त्यांनी मला आचार्य भागवतांच्या आवाजाच्या पीचमध्ये बोलून दाखवलं आणि जुगलबंदी होईल हे पटवून दिलं. नंतर त्यांनी निळुभाऊंना जागं करणारा खास आवाज काढला. डॉक्टरांच्या त्या आवाजाने निळुभाऊ आणि मी एकदम खूश झालो. निळुभाऊ म्हणाले, ‘‘क्या बात है डॉक्टर.! मजा येईल आता. चला पुढे’’ डॉक्टरांच्या बदललेल्या आवाजानंतर माझ्या लक्षात आलं की, तेंडुलकरांचा विचार आता खऱ्या अर्थाने खोलवर पोहोचू शकेल. कारण नॅचरली जे येईल, तेच चित्रपटाचा विचार पुढे घेऊन जाऊ शकणार होतं. चित्रपटात डॉक्टरांचा नंबर दोन होता, पण त्यांनी पकडलेला पिच अप्रतिम होता. तो त्यांनी स्वत:हून पकडलेला होता, हे श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे. सामनाचं शूटिंग तीन महिने चाललं, परंतु संपूर्ण शूटिंगमध्ये दोघाही कलाकारांना काहीही सांगावं लागलं नाही. दोघांनी दिग्दर्शक आणि पटकथाकाराच्या उद्देशाला तडा जाऊ न देता अभिनयाचा जो आविष्कार घडवला व चित्रपटभर जे चित्र उभं केलं, ते ग्रेटच! यात कॅमेरामन सूर्यकांत लवंदेचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. ब्लॅक ॲन्ड व्हॉइटमधील प्रकाशयोजना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाचे त्याचे कॅमेरा ऑपरेशन तर एकदम उत्तम. व्यावसायिक चित्रपटांच्या कल्पनेतून बाहेर येऊन त्याने सामनाचं चित्रीकरण फार चांगलं केलं.
सामनाच्या दिग्दर्शनातली आणखी एक गंमत सांगतो. जेव्हा मास्तरांसमोर मारुती कांबळेच्या खुनाचं कन्फेशन हिंदुराव करतात, तो सीन... त्या वेळी निळुभाऊ म्हणाले, ‘‘जब्बार, केवढा मोठा सीन आहे. एवढं पाठांतर कसं काय करणार?’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘शब्द मागेपुढे झालेले चालतील निळुभाऊ, पण तुम्ही आत साचलेलं बाहेर काढणारं बोलावं.’’ साडेचार मिनिटांच्या या सीनला आम्ही तीन तास शूट करत होतो. निळुभाऊंच्या बऱ्याच रिहर्सल घेऊन तो शॉट घ्यावा लागला. निळुभाऊंच्या ‘सामना’तील कन्फेशनवरून मला ‘फुटपाथ’ चित्रपटातील दिलीपकुमारचं कन्फेशन आठवतं. सामनामध्ये मी हिंदुरावाच्या कन्फेशनचा केलेला प्रयोग केवळ करायचा म्हणून केलेला नाही, हे कन्फेशन संपूर्ण सिनेमाचं सार आहे. एका माणसाला जिवे मारलंय व्हाय धिस कन्फेशन हॉन्ट्स? कारण हिंदुरावांनी कन्फेशन स्वत:च्या अंतरंगाला किंवा ‘आपलंस’ केलेल्या मास्तरांना दिलेलं आहे. हे सगळं झाल्यावर हिंदुराव मास्तरांना म्हणतात, ‘‘मास्तर, तुम्हाला सांगू? यामागे माझा उद्देश फक्त या भागाचं भलं करण्याचा होता; पण मारुती कांबळे मला नडत होता, म्हणून त्याला संपवावं लागलं.’’
हे एका राजकीय नेत्याचं कन्फेशन आहे. आणि हे आपल्याला का हॉन्ट होतं? कारण हे ऐकताना याच प्रकारचे अनेक राजकीय नेते आपल्यासमोर येतात. आपल्याला वाटतं की, ‘अरे, यांनीसुद्धा आपल्याला कन्फेशन द्यावं ना एकदा.’’ खरं तर असे खून इतरत्र घडत आहेत. पण इथे तेंडुलकरांचं वेगळेपण काय, तर सामनामधून त्यांनी अपराध नावाच्या गोष्टीचं सामाजिक आणि नैतिक अध:पतन दाखवलेलं आहे. त्यातून आर्थिक भ्रष्टाचाराच्या पलीकडच्या नैतिक भ्रष्टाचाराकडे तेंडुलकर लक्ष वेधून घेतात. आजही सगळे विश्लेषक आर्थिक भ्रष्टाचाराबद्दल बोलताना दिसतात. खरं तर आपल्याला हे माहीत आहे की, आर्थिक भ्रष्टाचार आवाक्यात आणण्यासाठी कायद्याची कठोरता हा पर्याय आहे; परंतु आपल्या समाजात सतत वाढत चाललेला नैतिक भ्रष्टाचार कसा संपुष्टात आणायचा, हा खरा प्रश्न आहे. तेंडुलकरांचं हेच वेगळेपण सामनातून आपल्यासमोर येतं. सामनातल्या मास्तरांनी नैतिक भ्रष्टाचार करणाऱ्या हिंदुरावला बोलतं करून, अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांनी अंतर्मुख व्हावं, असं आवाहन केलेलं आहे. मात्र आज तरी नैतिक भ्रष्टाचारावर आत्मशोध एवढीच सजा आहे.
प्रश्न : सामनामध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाची (नंतर लोकप्रिय झालेली) तीन गाणी निवडलीत. आणि त्यातलं एक गाणं तर लताजींनी गायलं आहे.. काय सांगाल याविषयी?
- सामना पटकथेवर काम करताना त्यातील महत्त्वाचे दुवे जोडण्यासाठी गाण्यांची मला नितांत आवश्यकता वाटली. त्याबाबत पहिल्यांदा तेंडुलकरांना विचारलं, तर ते म्हणाले, ‘‘काही गरज नाही. पार्श्वसंगीत द्या आणि पुढे जा.’’ भास्कर चंदावरकर यांनी ‘घाशीराम’च्या वेळी संगीत दिलेलं होतं; पण मला सामनामध्ये गाणी हवी होती. मग जगदीश खेबुडकरांकडून काही गाणी लिहून घेतली. त्यातील एका गाण्यासाठी भास्करनं कुठल्या तरी नव्या गायिकेला शोधलं होतं, पण मी अजून शोधात होतो. कारण ते गाणं मारुती कांबळेच्या खुनाच्या (रक्तपाताच्या) पार्श्वभूमीवर हिंदुरावांना हॉन्ट करण्यासाठी घ्यायचं होतं.
तर, मी मुहूर्ताच्या दिवशी चित्रीकरण झाल्यावर जेवणानंतर स्टुडिओत मागच्या बाजूला फेरफटका मारत होतो, तेव्हा व्हरांड्यात दीदी चहा पीत बसल्या होत्या. माझ्या अंगात कुठून बळ आलं माहीत नाही, दोन पावले पुढे गेलो. दीदींना नमस्कार केला. दीदी म्हणाल्या, ‘‘हे तुमचं चांगलं चाललंय. मुहूर्त छान झालाय.’’ मी म्हणालो, ‘‘पण एक टेन्शन आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘काय?’’ मी म्हणालो, ‘‘या चित्रपटासाठी मला गाणी घ्यायचीत. आम्ही जगदीश खेबुडकरांकडून दोन गाणी लिहून घेतलीत. त्यातल्या एका गाण्यासाठी माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही.’’ मग मी त्यांना मारुती कांबळेच्या खुनाचा सीन सांगितला आणि म्हणालो, ‘‘यातल्या निळुभाऊंच्या कॅरेक्टरला अपराधाची जाणीव होते, ती अधिक तीव्र करण्यासाठी मला गाणं पाहिजे. फार महत्त्वाचं गाणं चित्रीत करायचंय.’’ त्या माझ्याकडे बघायलाच लागल्या, नवखा माणूस गाणं मागतोय.
थोडं थांबून त्या म्हणाल्या, ‘‘बघू, काय गाणं लिहिलंय जगदीश खेबुडकरांनी?’’ मला काय झालं, कोण जाणे. ‘हा महाल कसला… कुण्या द्वाडानं घातला घाव... सख्या रे, सख्या रेऽ, सख्या रेऽऽ घायाळ मी हरिणी’हे गाणं मी जगप्रसिद्ध गायिकेसमोर (भास्करने दिलेली चाल लावून) चक्क गायिलो. त्या म्हणाल्या, ‘‘छान सांगितलंत तुम्ही हे.’’ मग एक दीर्घ पॉज घेऊन म्हणाल्या, ‘‘जब्बार, मला आवडलंय हे गाणं. तारीख कोणती देता येईल हे बघावं लागेल.’’ त्या एकदम तयार झाल्या, याचा मला प्रचंड प्रचंड आनंद झाला. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की, हे पिक्चरायझेशन कुणावर आहे? मी म्हणालो, ‘‘एका नाचणाऱ्या बाईवर आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी गाईन... मात्र, त्यासाठी एक्सप्रेसिव्ह मुलीला घ्या, म्हणजे त्या गाण्यातील शब्द व्यवस्थित पोहोचतील.’’ लताजींच्या होकाराचा मला प्रचंड आनंद झाला होता.
त्यामुळे धावतच आलो आणि रामदासला म्हणालो, अरे, दीदी गाताहेत. तर तो एकदम गडबडला. मग मी सांगितलं की, अरे, लताजी आपल्या चित्रपटासाठी गातायत. हे ऐकून तो एकदम हबकलाच. कारण आम्ही इकडून-तिकडून पैसे गोळा करून सिनेमा करत होतो. त्यामुळे लताजींचं मानधन आपल्याला परवडणार नाही, या विचाराने तो हादरला होता. मी म्हणालो, ‘‘अरे, नको काळजी करूस, त्यावर मार्ग निघेल.’’ हीच गोष्ट पुण्यात असलेल्या भास्करला फोनवरून सांगितली, तर त्याला मी गंमत करतोय, असंच वाटलं. डॉक्टरांना आणि निळुभाऊंना तर धक्काच बसला, कारण पटकथेत तसा काहीच संदर्भ नव्हता. पण कल्पना सांगितल्यावर त्यांना पटलं. मग दीदींनी तारीख दिली. आम्ही तयारी करून स्टुडिओत पोहोचलो. सगळी तयारी पूर्ण झाल्यावर दीदींचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘आज जरा आवाज बरा नाही. पुन्हा तारीख देते. त्याप्रमाणे करू या.’’ हा फोन ऐकून भास्कर म्हणाला, ‘‘मी म्हणालो होतो ना की, हे काही खरं नाही?’’ मी त्याला सांगितलं, ‘‘अरे, तसं नाहीये. खरंच त्यांचा आवाज चांगला नाहीय. त्या मला म्हणाल्यात, तुमच्या गाण्यातील पहिल्या ओळीसाठी खूप वरच्या आवाजात गावं लागणार आहे.’’ त्यानंतर त्या आल्या. त्यांना भास्करनेच गाणं समजून सांगितलं. त्यांनी त्याप्रमाणे गायलं.
पहिलाच टेक ओके झाला. भास्कर खूश झाला. त्या वेळी आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘दीदी, आम्हाला मानधन किती ते सांगा.’’ त्या म्हणाल्या, ‘‘हा तुमचा पहिलाच सिनेमा आहे. एक गुलाबाचं फूल घेईन मी, आहे ना?’’ आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो. यानिमित्ताने दीदींच्या मनाचा मोठेपणा सांगितला पाहिजे की, त्यांनी आजतागायत म्हणजे माझ्या ‘उंबरठा’ सिनेमापर्यंत एक पैसाही मानधन म्हणून माझ्याकडून घेतलेला नाही. हे गाणं हिंदुरावांवर होतं, मग मास्तरांच्या भटकंतीच्या पार्श्वभूमीवर एक गाणं यावं, ते तुकड्या-तुकड्यांत असावं असं मला वाटत होतं. डॉक्टरांना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘आवडेल मला! कारण मी ज्या भ्रमात चालतो, त्याला जोडणारं गाणं पाहिजे गड्या!’’ मग आमचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान एके दिवशी दौंडला जाताना रेल्वेस्टेशनला दिवाळी अंक आलेले एकदम दिसले. मौजेचा दिवाळी अंक घेतला. त्यात आरती प्रभूंची (चि.त्र्यं.खानोलकर) ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही कविता दिसताक्षणीच आवडली. मग दोन-तीन वेळा वाचली. आणि चक्क गाडी सोडून दिली. माझ्या पत्नीला कळवलं- दोन तासांनी पुढची गाडी आहे, मग येतो. भास्करला फोन केला तर म्हणाला, ‘‘काय?’’ म्हटलं, ‘‘अरे, मौजेच्या दिवाळी अंकात आरती प्रभूंची कविता आलीय. आपण जे शोधत होतो, तेच सापडलंय मला.’’ तो म्हणाला, ‘‘अरे वा!’’ मी म्हणालो, ‘‘गाडी सोडून दिलीय, जरा भेटू या.’’ भेटलो, त्याने वाचली, त्याला आवडली. पण म्हणाला, ‘‘ती मुक्त छंदातील आहे. जरा आरती प्रभूंची परवानगी घे, करू त्याचं गाणं.’’
मग लगेच आरती प्रभूंना फोन केला. त्यांना सगळी कथा सांगितली. ते म्हणाले, ‘‘अरे वा! मला चालेल ना, तेंडुलकरांना विचारा आणि करा.’’ त्यांना म्हणालो, ‘‘तेंडुलकरांना विचारतो. पण ती मुक्त छंदातील आहे.’’ ते म्हणाले, ‘‘ते काय असेल तुम्ही करा. तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कवितेचे शब्द तर बदलणार नाही ना?’’ असं करून मग ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे सामनाचं शीर्षकगीत केलं. आता त्या नुसत्या टायटलचा एवढा प्रभाव आहे की, गेल्या 40 वर्षांत या शीर्षकाची किती तरी संपादकीय येऊन गेली. मग चित्रपटातल्या गारुड्याच्या खेळासाठी काही तरी गाणं असावं, म्हणून शोध घेतला. काही मिळेना म्हणून मी निबंधाच्या शैलीत ‘या टोपीखाली दडलंय काय.’ अशा अर्थाच्या चार ओळी लिहिल्या. त्यावर भास्कर चंदावरकरनं संस्कार केले आणि त्याच निबंधवजा कवितेचं गाणं झालं. रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि डॉक्टर लागू या तिघांनी मिळून ‘या टोपीखाली दडलंय काय’ हे गाण गायलं. आज विचार करताना वाटतं, मारुती कांबळेच्या खुनाच्या पार्श्वभूीवर ‘सख्या रेऽ घायाळ मी हरिणी’ हे गाणं घेतल्याने चित्रपटाच्या गद्यात्मक रूपाला तरलता आली आणि त्याची रंगत वाढली.
प्रश्न : ‘सामना’ करताना डॉ. लागू आणि निळुभाऊ आपसात चर्चा करत होते का? की, त्यांना स्क्रिप्टच पुरेसं होतं?
- स्क्रिप्ट दोघांकडे होतं. दर दिवशीचं शूटिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा शॉट कोणता आहे, याबाबत त्यांच्यात चर्चा व्हायची; पण कोणता शॉट घेताना कॅमेरा कुणावर असणार आहे, हे त्यांना अजिबात माहीत नसायचं. मात्र, याबाबत दोघांनीही मला काहीच विचारलं नाही. उलट चित्रीकरण संपल्यावर मीच त्यांना विचारलं की, ‘‘तुम्ही मला शॉट, कॅमेरा, फोकस याबाबत काही का विचारलं नाही?’’ तेव्हा डॉक्टरांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘‘सगळंच आम्हा दोघांना अगोदर माहीत असतं ना, तर आम्ही कंडिशन्ड झालो असतो आणि इंप्रूव्हाइज झालो नसतो. यामध्ये जी उत्स्फूर्तता यावी लागते तिच्यासाठी हे बारकावे आणि ट्रॉली, कॅमेरा, शॉटची कक्षा एकत्र कळणं हे वेगळा परिणाम देऊन जातं. एक-दोन शॉट्सनंतर आपली देहबोली बदलते आणि त्यात एक चैतन्य येतं. म्हणून, तू जे करत होतास त्याला हात लावण्यात काहीही अर्थ नव्हता. आमच्यातल्या दिग्दर्शकाने तुझ्यावर अतिक्रमण करण्यात अर्थ नव्हता. त्यातून चांगल्या कलाकृतीवर अन्याय झाला असता. त्यातच त्यामध्ये गाणी आणल्याने एक तरलता आली आहे; कारण केवळ स्क्रिप्ट वाचून किंवा शॉट डिव्हिजन फक्त सांगून या सर्व बारकाव्यांचे पूर्वानुमान लावता येत नाही.’’
निळुभाऊ म्हणाले, ‘‘कॅमेऱ्याला ॲडजस्ट होणं महत्त्वाचं आहे; पण केवळ तेवढ्याने भागत नाही. आपली सर्व प्रकारची हालचाल कशी होते व ती किती नैसर्गिकपणे होते, हे महत्त्वाचं आणि याच गोष्टींना मार्क असतात. त्यामुळे काही गोष्टी आधी कळण्यात काहीच अर्थ नव्हता.’’ या दोन कलावंतांच्या प्रतिभेत ‘सामना’ची खरी उंची आहे. कशाचं काय करायचं, हे त्यांनी जाणलेलं होतं, मनाशी ठरवलेलं होतं; पण त्यांनी एकमेकांशी चर्चा करण्याला आणि अंतर्गत ठरवण्याला महत्त्व दिलं नाही. आज मी तुला सांगू शकतो विनोद, केवळ भारतातील नव्हे तर जगातील प्रसिद्ध नट मला माहीत आहेत. मार्लन ब्रँडो, रॉबर्ट डी नीरो, आपल्याकडचे दिलीपकुमार इत्यादी... पण निळुभाऊ व डॉ.लागू या दोघांचा अभिनय जागतिक किर्तीच्या नटांच्या तोडीचा आहे, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.
प्रश्न : ‘सामना’मध्ये ज्या फ्रेम तुम्ही वापरल्यात, त्या फारच काटेकोर आहेत. मी 17-18 वेळा हा सिनेमा पाहिला, तरी मला त्यांतली एकही फ्रेम चुकवावीशी वाटलेली नाही. त्यामुळे एडिटिंगविषयी काय सांगाल?
- आमचे एडिटर वैद्य अत्यंत अनुभवी होते आणि सामनाच्या कथानकाची रंगत त्यांना पूर्णपणे अवगत होती. ते म्हणायचे, तेंडुलकरांच्या संवादांवर अन्याय होता कामा नये, कारण त्यामध्ये खूप गर्भितार्थ दडलेले आहेत. त्यामुळे त्याला धक्का लागू द्यायचा नाही, हे आम्ही निश्चित केलेले होते. त्याचबरोबर यानिमित्ताने आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे ती अशी की, तेंडुलकरांना स्टील फोटोग्राफीचा उत्तम सेन्स होता. कुठल्याही सीनचा क्लोजअप कसा घ्यावा आणि लाँग शॉट कसा घ्यावा, याविषयी तेंडुलकरांशी आमची बरीच चर्चा झालेली होती. त्यामुळे ‘सामना’चे एडिटिंग आपोआपच रंगतदार झाले.
प्रश्न : ‘सामना’चं चित्रीकरण झाल्यावर तो प्रदर्शित होण्यापूर्वी तुम्ही त्याची ट्रायल तेंडुलकरांना दाखवली होती का? आणि, तेंडुलकरांची त्यावर काय प्रतिक्रिया होती?
- मंगेश देसाई यांनी साऊंड मिक्सिंग केल्यावर आम्ही तेंडुलकरांना चित्रपटाची ट्रायल दाखवली होती. आमचे एडिटर वैद्य यांनी तर आधीच ठरवलं होतं की, जेव्हा आपलं संपूर्ण एडिटिंग होईल, तेव्हाच तेंडुलकरांना सामना दाखवायचा. त्यामुळे गाण्यांसह चित्रपट तयार झाल्यावर तेंडुलकरांना आम्ही तो दाखवला. तर चित्रपटाची सुरुवातच ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याने झाली. ‘हे कुठून आणलं’ असे ते त्याच वेळी म्हणतील, असं वाटलं होतं; पण ट्रायल बघितल्यावर ते काहीच बोलले नाहीत. मग मीच त्यांना विचारलं- ‘‘मी तुमच्या पोलिटिकल कंटेटला तर कुठे धक्का लावलेला नाहीये ना? कारण तुमच्या शब्दांव्यतिरिक्त इथे आरती प्रभू आणि खेबुडकरांचे शब्द आहेत. संगीतही वेगळं आहे.’’ त्यावर त्यांनी मलाच प्रश्न विचारला, ‘‘अरे जब्बार, तुला नेमकं काय म्हणायचंय? कारण शेवटी तो चित्रपट आहे. मी पटकथा लिहिली, तेव्हाच त्यातलं माझं काम संपलेलं आहे. त्यामुळे मी सिनेमा कसा व्हिज्युअलाईज करेन, हे येतं कुठे? नाटकाची गोष्ट वेगळी असते. तिथे तू माझ्यापेक्षा फार काही वेगळं करू शकत नाही. अगदी ‘घाशीराम’मध्येसुद्धा. पण हा चित्रपट तुझा आणि तुझ्या टीमचा आहे. तुम्ही फायनल केलाय ना; यात काहीच बदल करू नका!’’
तेंडुलकर मला खूप कमी बोलल्यासारखे वाटले; त्यातच ते नाराज झालेत, असंही वाटून गेलं. त्यामुळे मी त्यांना विचारलं, ‘‘तुमच्या संहितेवर मी आक्रमण वगैरे केलंय, असं वाटतंय का तुम्हाला?’’ त्यावर तेंडुलकर म्हणाले, ‘‘होय, आक्रमण तर केलंयच ना; पण लव्हेबल आक्रमण आहे आणि आमच्या पोराने सिनेमा शिकता शिकता केलेलं आक्रमण आहे! आता शेवटी लोकांनी सिनेमा पाहायचाय ना! तू कंटेंटला हरवू न देता त्याच्यात मजा वाढवलीस. तू गाणी टाकलीस; पण खरं सांगू, आरतींचे शब्द माझ्या कंटेटला परावर्तित करणारेच आहेत. लताचं गाणं तर अप्रतिमच आहे. आणि हे बघ, शेवटी हा एक्सपिरिमेंट आहे. या चित्रपटातील गाण्यांनी हिंदुरावाच्या गिल्टला आणि मास्तरच्या मुलीच्या दु:खाला अधोरेखित केलेय. त्यातच स्मिता खूपच सुरेख पद्धतीने आलीय. त्यामुळे या सर्वांमध्ये गूढता खूप गडद झालीय. एकूणच, खूप छान जमलंय हे सगळं. त्यामुळे जसा केलाय तसा राहू दे.’’ तेंडुलकरांच्या या प्रतिक्रियेनंतर मला बरं वाटलं; पण तरीही ‘सामना’मध्ये मी ज्या गोष्टी हट्टाने आणल्या, त्या एका व्रात्य पोराचे हट्ट म्हणून तेंडुलकरांनी स्वीकारल्या आहेत. कारण मला सतत असं वाटलं की, ते ‘सामना’बाबत काहीसे अनस्पोकन राहिले; पण दुखावले मात्र नाहीत. मी जे केलं ते त्यांना आवडलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.
प्रश्न : ‘सामना’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्या काळातील चित्रपटक्षेत्रातील काही मान्यवरांचं मार्गदर्शन दिग्दर्शन करताना लाभलं का? किंवा ‘सामना’च्या निर्मितीत तेंडुलकर, डॉ.लागू, निळुभाऊ यांच्याव्यतिरिक्त बाहेरच्या काहींचं योगदान आहे का?
- ‘सामना’ करत असताना माझा भालजी (बाबा) पेंढारकरांशी संबंध आला. त्याविषयी अगोदर सांगतो. म्हणजे अगदी पहिल्या वेळीच मी बाबांना ‘सामना’चं कथानक थोडक्यात सांगितलं, तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, ‘‘अहो, असे विषय लोकांना आवडतात का? आणि अशा विषयात लोकांना रुची निर्माण झालीय का?’’ त्या वेळी मी त्यांना फार आत्मविश्वासानं सांगितलं की, ‘‘होय, आता समाज अशा विषयांत रुची घेतोय.’’ (सामना आम्ही करत होतो, तेव्हा सहकारी कारखाने येऊन दोन दशकं उलटली होती.) पुढे ‘सामना’ चित्रित झाल्यावर मी बाबांना म्हणालो, ‘‘तुम्हाला दाखवायचाय.’’ ते म्हणाले; ‘‘पण काही बोलेन, सांगेन; ते तुला चालेल का?’’ मी ‘हो’ म्हणालो आणि त्यांना दाखवला.
त्या वेळी ‘सामना’त गाणी मिक्स केलेली नव्हती. बाबांनी ‘सामना’चा गद्य भाग पाहिला. सीनच्या वेळा कागदावर लिहून ठेवल्या आणि संपल्यावर म्हणाले, ‘‘हा चित्रपट माझा नाही, त्यामुळे तुम्ही जो काही केलाय त्यावरच बोलू या. पहिल्यांदा- तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं मला. आठ-नऊ मिनिटांचे सीन दोनच नटांवर चित्रित करणं आणि त्यातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, हे फार अवघड काम असतं; पण तुम्ही फार उत्तम केलंत. हा सिनेमा हजार लोक बघत असले आणि टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी तुम्ही प्रेक्षकांच्या मनातदेखील शांत अस्वस्थता निर्माण करताय. हे एकूण फारच छान जमलंय. फक्त एक-दोन ठिकाणी निळुभाऊ फार क्लोज आल्याने त्याला एक लूजपणा येतोय. तर, तेवढं बदलता येतंय का बघा; बाकी उत्तम!’’ मी म्हणालो, ते मुद्दाम केलंय. तरीही ते म्हणाले,‘‘पण बघा, विचार करा.’’ मग आम्ही वैद्य आणि निळुभाऊंशी चर्चा केली. निळुभाऊ म्हणाले, ‘‘पाहा- नव्याने शूट घ्या, दोन्हींची तुलना करा आणि निर्णय घ्या.’’ मग मी बाबांनी सांगितलेल्यापैकी काही बदल त्यात केले.
अण्णांची (व्ही.शांताराम) ‘सामना’ला शाबासकी मिळाली. ते एवढंच म्हणाले, ‘‘तुमच्यावर बंगाली सिनेमाचा प्रभाव दिसतोय. कारण तुम्ही ‘सामना’मध्ये मध्यलयीशी फारच खेळलात. पण फारच छान!’’ त्यावर मी अण्णांना म्हणालो, ‘‘लोक याला बोलपट म्हणणार नाहीत ना?’’ अण्णा म्हणाले, ‘‘कुठलाही भारतीय (हिंदी) सिनेमा बोलल्याशिवाय पूर्णच होत नाही. शेवटी संवाद हीच मानवी भाषा आहे. तुम्ही थिएटरचे असल्याने तुम्हाला हा कॉम्प्लेक्स जाणवतो. विसरून जा ना. तुमच्या चित्रपटाचं स्वागत लोक निश्चित करतील. आणि तरीही काही लोक म्हणालेच की,बोलपट आहे, तर म्हणू द्या!’’ बाबा आणि अण्णांच्या अशा महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आम्हाला फार प्रेरणा देऊन गेल्या. वेगळं काही तरी करण्याची आणि तेंडुलकरांच्या भूमिकेचं चीज झाल्याची भावना मनात दाटून गेली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या दोन मान्यवरांशिवाय इतर अनेकांकडून कौतुक झालं. काही लोकांकडून टीकाही झाली. ‘हा चित्रपट दाखवायचा नाही, यावर बंदी घालायची’ असे ठराव काही सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या अधिकारमंडळात पास केले. म्हणजे पाहा कसं होतं वसंतदादा पाटील म्हणाले, ‘‘तुम्ही घाशीराम उत्तम केलंत, मला फारच आवडलं; पण ‘सामना’मध्ये तुम्ही तेंडुलकरांच्या फार आहारी गेलात.’’ दुसरीकडे पुण्यातील प्रतिक्रिया- ‘‘सामना उत्तम, मास्तर ग्रेट... पण तुमचं ‘घाशीराम’ नाही आवडलं. तुम्ही उगाचच इतिहास वेगळ्या पद्धतीने उकरत बसलात!’’ बाकी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा सर्वांनीच त्या वेळी ‘सामना’चं कौतुक केलं होतं. सर्वसामान्य लोकांना ‘सामना’ फारच आवडला होता, हे नक्की.
प्रश्न : ‘सामना’ प्रदर्शित झाल्यावर काही दिवसांतच आपल्या देशात आणीबाणी आली. अनेक लोक आणीबाणीतील काही गोष्टी ‘सामना’मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात, विशेषत: हिंदुराव म्हणजे इंदिराजी आणि जे. पी. म्हणजे मास्तर... काय सांगाल?
– आणीबाणीचा आणि या चित्रपटाचा तसा काही संबंध नाही. काही गोष्टी तशा दिसतायत, त्या फारच पुसट आहेत. कारण ‘सामना’ स्थानिक पातळीवर बोलतोय, तर आणीबाणीचे संदर्भ पूर्णत: राष्ट्रीय आहेत. पण हो- यात जो दोन प्रवृत्तींचा संबंध लोक जोडतात, तो तेंडुलकरांच्या दूरदृष्टीचा भाग आहे. कारण ‘सामना’मधली हिंदुरावची सभा उधळणं, त्यानंतर हिंदुराव गायब होणं. त्यातच त्यानंतर येणारा सत्ताधारी वाईट आहे हे कळल्यावर मास्तर हिंदुरावांना म्हणतात, ‘शिक्षा भोगा आणि तुम्ही परत या!’ या सर्व गोष्टींतून तेंडुलकरांची राजकीय दृष्टी अधिक योग्य पद्धतीने भविष्याचा वेध घेऊ शकत होती, असं म्हणावं लागेल. इथे कदाचित जेपींची चळवळ तुम्ही जोडू शकता.
प्रश्न : ‘सामना’ला अभूतपूर्व यश मिळालं. त्याच वेळी (1975) अगदी बर्लिनच्या इंटरनॅशनल फेस्टिव्हलला गेला याविषयी काय सांगाल?
- खरं तर ज्या दिवशी आम्ही बर्लिनच्या विमानात बसत होतो, त्याचवेळी एअरपोर्टच्या बाहेर (मुंबईच्या) धावपळ सुरू होती. बर्लिनला पोहोचल्यावर आम्हाला कळलं की, आपल्या देशात आणीबाणी लागू झाली आहे. ‘सामना’ला अभूतपूर्व यश देशात मिळाल्यावर ‘सामना’ बर्लिनच्या फेस्टिव्हलला सिलेक्ट झाला. त्याचा योग असा की, रशियाच्या टीमने विख्यात अभिनेत्री नर्गिस यांच्याबरोबर मुंबईत ‘सामना’ पाहिला. त्यांना आवडला. खरं तर ‘सामना’ बर्लिनला जाण्याचं श्रेय जातं ते नर्गीसजींना. नर्गिसजी त्या वेळी राज्यसभेवर होत्या. त्यांना ‘सामना’बद्दल कळलं होतं, त्यामुळं त्यांनी रशियाच्या टीमला ‘सामना’ पाहायचं सुचवलं आणि ‘सामना’ बर्लिनसाठी निवडला गेला. बर्लिनला जाण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारने खूप मदत केली. त्या वेळी सुशीलकुमार शिंदे सांस्कृतिक मंत्री होते. त्यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना सांगून, आमच्या विमानाच्या तिकिटांची व्यवस्था केली. मग आम्ही जर्मन सबटाइटल्स देऊन तिथल्या स्पर्धेसाठी ‘सामना’ सज्ज केला.
फेस्टिव्हलमध्ये सिनेमा दाखवल्यानंतर तिथे कर्टन कॉलची प्रथा होती. म्हणजे सर्वप्रथम दिग्दर्शक स्टेजवर जातो; तो आधी निर्मात्याला व मग इतर कलाकारांना स्टेजवर बोलावून ओळख करून देतो. ‘सामना’ सिनेमा संपल्यावर जेव्हा मी, झब्बा-कुर्त्यातील सोफेस्टिकेटेड डॉ. लागूंची मास्तर म्हणून आणि चुरगाळलेल्या पायजम्यातील निळुभाऊंची क्रूर राजकारणी हिंदुराव म्हणून ओळख करून दिली; तेव्हा लोकांचा विश्वासच बसेना. टाळ्यांनी व जल्लोष म्हणावा अशा आरोळ्यांनी लोकांनी दाद दिली. परीक्षकांपैकी भारतीय असणाऱ्या सुखदेवांनी ‘दोनपैकी एक कलाकार प्राईज घेऊन जाईल कदाचित!’ असंही म्हटलं. नर्गिसजीही त्या वेळी जर्मनीत होत्या, हे त्यांनी रामदासला कळवून आम्हाला आश्चर्यचकित करून टाकलं. मिर्झा नावाच्या त्यांच्या मित्राकडे त्यांनी पार्टी ठेवली होती, तिथे तर चक्क शॅम्पेनची बाटली घेऊन त्यांनी आमच्या सिनेमाचं यश सेलिब्रेट केलं. एक कलाकार असण्याव्यतिरिक्त नर्गिसजींची सामाजिक बांधिलकी वाखणण्याजोगी आहे. त्या पार्टीत आमचा चित्रपट हा त्यांचा स्वत:चा असल्याप्रमाणेच नर्गिसजी व सुनील दत्त हे दोघेही ते यश साजरं करताना दिसले. (संजय व नम्रता ही दोन मुलेही त्यावेळी त्यांच्यासोबत आली होती.) भेटणाऱ्या प्रत्येकाला ‘यू मस्ट सी अवर न्यू काइंड ऑफ इंडियन सिनेमा’ असं सांगताना आम्ही त्यांना पाहिलं.
प्रश्न : शेवटचा प्रश्न... चाळीस वर्षांपूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात काय बरे-वाईट बदल तुम्हाला दिसताहेत?
- ‘सामना’मधील भ्रष्टाचार ही जस्ट सुरुवात होती; समाजाला खाणारा राक्षस हे त्याने आज घेतलेलं स्वरूप तेव्हा नव्हतं. आणीबाणीनंतरच्या पंधरा-वीस वर्षांत नैतिक भ्रष्टाचार ही संकल्पना अधिक वर आलेली दिसते. आज फोफावलेला आर्थिक भ्रष्टाचार कायद्याच्या काटेकोर अंलबजवणीने आटोक्यात आणता येऊ शकेल; परंतु नैतिक अध:पतनाचे समोर येणारे रौद्र रूप भयंकर आहे. सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे, आर्थिक भ्रष्टाचाराचं कोणीही उघड समर्थन करीत नाही, मात्र नैतिक भ्रष्टाचार सर्वांनी गृहीत धरल्यासारखा आहे. घाशीराम कोतवाल, सामना किंवा पु.लं.चा ‘तीन पैशांचा तमाशा’ म्हणाया सर्वांतून दिसलेला नैतिक भ्रष्टाचार 1975 नंतर फोफावलाय. परंतु, तेव्हाचे दोन प्रश्न आजही अनुत्तरित आणि चिरंतन आहेत. ते म्हणजे मारुती कांबळेचं काय झालं? आणि आत्मशोध!
आणखी एक गोष्ट म्हणजे आताची माध्यमं. सध्या माध्यमं ज्या गतीने एखाद्या घटनेचा इमला रचतात, तेवढ्याच गतीने तो खालीही येतो म्हणजे तेच आणतात. याचं कारण माध्यमांकडून सर्वंकष विचार होत नाही. आपल्या देशात आणीबाणी आली होती. त्यानंतर सत्तापरिवर्तन होऊन जनता पक्ष आला, त्यानंतर काही दिवसांत जनता पक्ष सत्तेवरून पायउतार झाला. हे सर्व आपल्या देशात भराभर घडलं आहेच ना! आज मात्र आपल्या देशात राजकारणातले रॅपिड चढ-उतार माध्यमांत खऱ्या अर्थाने येताना दिसत नाहीत. आज जगभरात मानवता तिथे लोकशाही आणि लोकशाही तिथे मानवता असं समीकरण झालेलं दिसतं. हुकूमशाही व जुलमी राजवटीत लोकशाहीसाठी लढे उभे राहताना दिसत आहेत. मात्र, जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतातील बहुतांश राजकारण्यांकडून मानवता मोठ्या प्रमाणात हरवत चाललेली दिसते. हा माझ्या दृष्टीने सर्वांत मोठा आणि गंभीर व चिंतनीय स्वरूपाचा बदल आहे.
लोकप्रतिनिधींचं नैतिक अध:पतन हे समाजाला विनाशाकडे नेणारं आहे. म्हणून डॉ.आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या सार्वत्रिक समतेचा भाग म्हणून, या प्रस्थापित व्यवस्थेला मारुती कांबळे प्रश्न विचारणारच आणि त्याला उत्तर देण्याची जबाबदारी सर्वांची बनते. मारुती कांबळे आपल्याला नडला म्हणून एखादा राजकारणी त्याला संपवू शकतो का? तर नाही! मारुती कांबळे हे प्रतीक आहे. कुठल्याही शोषित, दबल्या गेलेल्या समाजाचं, समूहाचं ते प्रतिबिंब आहे. त्यामुळे एक व्यक्ती संपल्याने संविधानाने बहाल केलेल्या स्वातंत्र्य-समतेचा आग्रह धरणारा मारुती कांबळे संपणार नाही. आपण व्यवस्था म्हणून समूहाने राहत आहोत. त्या समूहाचं नियंत्रण लोकशाही मार्गाने आणि मानवतेचा आग्रह धरणाऱ्या व्यवहाराने घडले पाहिजे. हिंसाचाराला, भेदनीतीला थारा न देता, एकदिल होण्यासाठी (लोकशाही मार्गाने) संविधानाशी बांधील राहून आपल्या राजकारण्यांनी काम करावे, हीच अपेक्षा! तेंडुलकरांना तरी ‘सामना’मधून वेगळं काय म्हणायचं होतं?
मुलाखत: विनोद शिरसाठ
शब्दांकन : किशोर रक्ताटे
Tags: किशोर रक्ताटे सामना जब्बार पटेल विनोद शिरसाठ मुलाखत साधना दिवाळी अंक kishor raktate samana jabbar patel vinod shirsath mulakhat diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
Kumar- 29 May 2025
अत्यंत सुंदर हृद्य मुलाखत..
save