डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कामगारांना गिळणारा करोशी भारतात कधी स्वीकारणार?

भारतातसुद्धा कामाच्या जागी मॅनेजमेंट वा सहकाऱ्यांच्या उपद्रवामुळे वा अतिरिक्त ताणामुळे कामगार आत्महत्या करतात अथवा त्यांना हृदय वा मेंदूविकार होतो. त्यात काम करतानाची परिस्थिती किती जबाबदार असते,  याची कोणतीही चौकशी होत नाही. अशा घटनांचे आकडे मोठेही असतील, पण हे आकडे जाहीर केले जात नाहीत. त्यामुळे याची व्याप्ती किती, हे माहिती होत नाही. कामगार संघटना व स्वैच्छिक स्वयंसेवी संघटनांनी जपान, तैवानसारख्या देशांपासून प्रेरणा घेऊन या मुद्यांवर जनजागृती करण्याची गरज आहे; जेणेकरून करोशीला बळी पडणाऱ्यांना भरपाई मिळू शकेल आणि या प्रकारचे मृत्यू रोखण्यासाठीची पावले उचलली जाऊ शकतील. 

गुजरात येथील स्टेट बँकेतील सुरेन्द्रनगर शाखेतील कर्मचारी शिवलालभाई परमार नोटाबंदीवेळेस रजेच्या दिवशीही ड्युटीवर हजर राहिले होते, सतत बारा तास काम केले होते. त्यानंतर तब्येत बिघडल्याने घरी गेले आणि रात्री त्यांचं निधन झालं. (15/12/2016, दैनिक गुजरात समाचार). याच सुमारास दोन दिवस सतत रात्रंदिन उशिरापर्यंत काम केल्यानंतर बडोद्यातील पंजाब नॅशनल बँकेचे असिस्टंट मॅनेजर रमेशभाई तडवींची तब्येत बिघडली. खूप ताप आल्यानंतर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. खूप ताप आल्यानंतरही बँकेत चिक्कार गर्दी होत असल्याने त्यांना काम करावे लागले होते. (20/11/2016 दैनिक, गुजरात समाचार) हालोल गावामधील बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर राजकुमार अरोरा यांचं कामाच्या ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या तिघांचेही मृत्यू भारतीय कायद्यानुसार नैसर्गिक गणले जातील; पण जर ते तिघंही जपानमध्ये असते, तर हे मृत्यू करोशीमुळे झाले असं समजले जाऊन त्यांच्या वारसांना नुकसानभरपाई मिळाली असती.

कामाचं नेहमीपेक्षा जास्त ओझं असल्यानं ताण आला की, त्यामुळे हृदय किंवा मेंदूचा स्ट्रोक आला व मृत्यू झाला, तर त्याला जपान, कोरिया, तैवान, हाँगकाँगमध्ये करोशी गणले जाते. जपानमध्ये अशा घटना व्हायला लागल्या की, कामगार कारखान्यात मशीनजवळ उभे राहून काम करत असता अचानक पडतो. जवळपासचे कामगार त्याला उभे करण्यासाठी धावून जातात, पण त्या कामगाराचे निधन झालेले असते. अशा घटनेनंतर तपास केल्यावर जर आढळले की, कामगाराचा मृत्यू तो उभा असतानाच झालेला आहे आणि तो पडल्यावर मृत झालेला नाही; तर मग असं खूप जास्त काम केल्याने तो मरतो, हे नक्की करण्यात आलं आणि या रोगाचं नामकरण झालं ‘करोशी’. कामाच्या अतिरिक्त भाराने, त्या कारणाने कामगाराने आत्महत्या जरी केली तरी ते या श्रेणीतच येतं. माणूस असहाय होऊन जातो. त्याच्यापाशी दुसरा उपाय उरत नाही, तेव्हा तो आत्महत्या करतो. अशी आत्महत्या ही करोशी गणली जाते. हा जपानी शब्द आहे आणि आता तो तैवान, कोरिया, चीन, हाँगकाँग यांसारख्या देशांमध्येही वापरला जातो.

चीन, कोरिया, तैवानमधे इलेक्ट्रॉनिक्सच्या कारखान्यात तरुण महिलांना अकुशल कामगार म्हणून कामावर ठेवतात. त्या टॉयलेटचा वापर करतात तेवढ्या वेळेचाही पगार कापण्यात येतो, जेणेकरून त्या महिला टॉयलेटचा वापर करणार नाहीत. या भगिनींवर लैंगिक अत्याचारही करण्यात येतो. यामुळेही अशा तरुणी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

जपान :

जपानमध्ये ही समस्या जाहीरपणे चर्चेत आणण्याचे श्रेय कामगार संघटना आणि प्रसारमाध्यमांचे आहे. जपानमध्ये मात्र 17 टक्के कामगारच युनियनशी संलग्न झालेले असल्यामुळे त्यांचा आवाज दुबळा आहे. एके काळी जपानमध्ये नोकऱ्या कायम असायच्या व सिनिऑरिटीनुसार पगारात चढ-उतार असायचा. आता जपानी कंपन्या नियमित कायम कामगारांऐवजी अनियमित, हंगामी कामगारांना कामावर ठेवतात. त्यांना पगार कमी दिला जातो. 1985 मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला, त्यानुसार 13 उद्योगांमध्ये हंगामी कामगार ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सूट 2003 पासून प्रत्येक उद्योगाला देण्यात आली. जसजशी हंगामी कंत्राटी कामगारांची संख्या वाढत गेली, तसतशी कायम कर्मचाऱ्यांची संख्या रोडावत गेली. या हंगामी वा कंत्राटी कामगारांना प्रमोशन देण्यात येत नाही. बऱ्याच कंपन्या अशा कामगारांना बोनस, पेन्शन वा विम्याचे लाभही देत नाहीत.

जपानी कायद्यानुसार, कोणत्याही वाजवी कारणाशिवाय कामगारांना कामावरून काढता येत नाही. आता कंपन्या बडतर्फऐवजी निवृत्त हा शब्द वापरून कामगाराला काढून टाकतात. ओव्हरटाइमचा खर्च वाचवण्यासाठी कामगाराला मॅनेजर वा एक्झिक्युटिव्हचे लेबल लावतात. काही कंपन्या फिक्स ओव्हरटाइमसारखे शब्द वापरून शोषण करतात.

काझुया निशीगाकी नावाचा कामगार स्वतःच्या आईबरोबर राहत होता. वडील नव्हते. काझुया एकुलता एक होता. फुजित्सु एस.एस.एल.मध्ये त्याला नोकरी मिळाली, परंतु अतिकामामुळे तो मृत झाला. आईला मोठा धक्का बसला.

26 वर्षांचा मोरीनामा एका पबमध्ये नोकरी करत होता. त्याने सांगितलं, ‘‘मला वाटतं, मी आजारी आहे. फार अवघड वाटतं, मी त्वरेने काम करू शकत नाही. मला कुणी मदत करा.’’ शेवटी 21 फेब्रुवारी 2012 रोजी त्याने आत्महत्या केली.

क्युशुना मियाझाकी प्रांतात काम करणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणाने आईला सांगितलं, ‘‘माझ्याच्याने इथे काम करवत नाही. सोडून देऊन? घरी येऊ का?’’ आईने ‘नाही’ सांगितलं,  ‘‘आता नको सोडूस, कारण आपल्या इथल्या प्रांतात गावात नोकऱ्या नाहीत.’’ त्या तरुणाने आयुष्य संपवले.

ताकाहाशी मात्सुरी एकट्या आईबरोबर लहानाची मोठी झाली. पुष्कळ मेहनतीने ती टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये शिकली. डेन्टत्सुमध्ये ती नवी कर्मचारी म्हणून 2015 मध्ये भरती झाली. सततचा ओव्हरटाइम व सुट्टीच्या दिवशीही काम करत राहिल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली  ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरला तिने चिठ्ठी लिहून डोर्मेटरीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आणि आयुष्य संपवले. ती 24 वर्षांची होती. तिने चिठ्ठीत आईला लिहिले होते की- ‘प्रिय आई, मी या जीवनास कंटाळले आहे. आता अधिक सहन होत नाही. माझ्या मृत्यूला तू स्वतःला जबाबदार धरू नकोस. तू श्रेष्ठ आई आहेस. तुझे खूप-खूप आभार.’

अधिकाधिक वेळ काम केल्यामुळे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी तेथे ‘ओव्हरवर्क डेथ प्रिव्हेन्शन ॲक्ट’ नावाचा कायदा करण्यात आला. हा कायदा 5 कोटी 20 लाख लोकांनी अर्ज दिल्यावर नॅशनल असेंब्लीने केला. जाणारा जातोच, कंपन्यांना काही होत नाही. सरकारने नेमलेल्या समितीने स्वीकारलेल्या अहवालाची करोशीपीडित संघटनेद्वारे कठोर टीका करण्यात आली. संघटनेने म्हटलेय की, या शिफारशी स्वीकारण्यात आल्या तर आता महिन्यातून जास्तीत जास्त 100 तास ओव्हरटाइम करता येईल, अशी सुधारणा करण्याचा अर्थच हा होईल की- कामाच्या वाढीव तासांना सरकार मंजुरी देतेय. पंतप्रधान शिंझो एबेंच्या नेतृत्वाखालील या समितीने महिन्याला 45 तास आणि वर्षाला 360 तास ओव्हरटाइम करता येईल, ही सूचना स्वीकारली आहे. परंतु सणासुदीला (जसे दिवाळी, ख्रिसमस- ज्या वेळेस खरेदी होत असते.) किंवा अन्य प्रसंगी कोणत्याही एका महिन्यात 100 तास ओव्हरटाइम करता येईल. ओव्हरटाइमसाठी दैनिक वा साप्ताहिक मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. हे फारच जोखमीचे आहे, असे करोशीपीडित संघटनेचे 68 वर्षांचे पुढारी लेमिको तेरानिशीने सांगितलं. 24 वर्षीय मात्सुरी ताकाहाशीने अतिरिक्त कामामुळे डिप्रेशनचा बळी म्हणून आत्महत्या केली. तिची आई युकिमीने सांगितलं, ‘‘माझ्या मुलीने लिहिलं, ‘जर तुम्ही ऑफिसमधे 20 तास असता, तर तुम्ही जगताच कशासाठी, तेच समजत नाही. मी नक्कीच ठरवू शकत नाही की, जगण्यासाठी काम करते की कामासाठी जगतेय?’ कामाचे तास लांबवण्याच्या कोणत्याही कायद्यास मंजुरी देता कामा नये.’’ या कायद्यातून पाच वर्षांसाठी डॉक्टर, ड्रायव्हर आणि बांधकाम कामगारांना वगळण्याच्या निर्णयाचीही संघटनेने टीका केली. तोशिरो नाकाहारा नावाच्या बालरोगतज्ज्ञाने जास्त तास काम केल्याने डिप्रेशन आल्यावर हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची माता नाकोरीने विचारलं, ‘‘काय सरकार पाच वर्षांपर्यंत आणखी कामगार मरू देणार का?’’

स्थानिक निवडणुकीचे 2013 मध्ये वार्तांकन करणारी नॅशनल ब्रॉडकास्टर, एनकेएचमध्ये काम करणारी 31 वर्षीय पत्रकार मीवा सादोचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने निवडणुकीनंतर तीन दिवसांनी झाला. मीवाने महिनाभरात 30 दिवसांमध्ये केवळ 2 सुट्ट्या घेतल्या होत्या. तिने सर्व मिळून 159 तास ओव्हरटाइम केला होता. तिच्या मृत्यूनंतर कामगार विभागाकडे चौकशी सोपवण्यात आली होती आणि 2017 मध्ये ही गोष्ट स्वीकारण्यात आली की, तिचा मृत्यू करोशीमुळे झालाय.

एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीच्या एका कर्मचाऱ्याने 2015 मध्ये महिन्यात 180 तास ओव्हरटाइम केला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशातील कामाचे स्वरूप- ‘वर्क कल्चर’ बदलण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. एका अंदाजानुसार, जपानमध्ये 20 टक्के कर्मचाऱ्यांवर करोशीच्या कारणाने मृत्यूची जोखीम टांगलेली आहे. ही माणसं महिन्याला 80 तासांपर्यंत ओव्हरटाइम करतात.

तैवान :

तैवानमध्ये या समस्येचा स्वीकार व्हायला अजून बऱ्याच अडचणी आहेत. तिथे शाबित करण्याची जबाबदारी (बर्डन ऑफ प्रूफ) दावेदारावर म्हणजेच कामगारावर टाकलेली आहे. तिथे या ओव्हरटाइमच्या आकडेवारीचाच अभाव आहे. विशेष करून हंगामी व कंत्राटी कामगारांची ही समस्या आहे. त्यात डॉक्टरांचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग खूपच आवश्यक आहे. डॉक्टराने कार्यकारणसंबंध प्रस्थापित केला, तरच पीडिताला फायदा मिळतो वा मिळेल.

तैवानमध्ये गेल्या काही वर्षांत करोशीच्या घटना समोर यायला लागल्यात. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटेस्टिक्सच्या आकडेवारीनुसार 2011 ते 2018 च्यामध्ये 619 कामगारांना अतिरिक्त कामाच्या बोजामुळे हृदयविकार (कार्डिओव्हस्क्युलर) व मेंदूतील नसांच्या (सेरिब्रल व्हस्क्युलर) आजार असल्याचे निदान झाले. त्यापैकी 221 जणांचे मृत्यू झाले आणि 153 जण कायमचे अपंग झाले. आता हा एक महत्त्वाचा व्यावसायिक आजार होऊन बसलाय. दर आठवड्याला एक कामगार याला बळी पडत आहे. परंतु यावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांना वाटतं की, हे आकडे हिमनगाचे टोक आहे. कारण अनेक किस्से दडलेले आहेत, उघड झाले नाहीत. अनेक कामगार कामाच्या तासांचे पुरावे सादर करू शकत नाहीत, त्यामुळे होणारा आजार स्वीकारला जात नाही किंवा कायद्याप्रमाणे कामगारांना विम्याचे संरक्षण दिले जात नाही, या कारणाने ते नुकसान भरपाईपासून वंचित राहतात.

करोशी हा आजार वाढण्याचे कारण कामाचे वाढीव तास हे आहे. तैवानच्या कामगार खात्याद्वारे प्रकाशित आकड्यांप्रमाणे गेल्या वर्षी कामगारांनी 2033 तास काम केले होते. वर्षातील 50 आठवडे आणि आठवड्यात 48 तास काम केले तर 2400 तास होतात. आठवड्यात 5 दिवस रोज 8 तास, तर 50 आठवड्यांत 2000 तास काम होते. एनएनएसओच्या (नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशन) अहवालानुसार भारतातील शहरांमध्ये कामगार आठवड्यात 60 ते 84 तास काम करत असतात. शहरांमध्ये 68 ते 70 टक्के कामगार 48 तासांपेक्षा जास्त काम करतात. जगात सरासरी 43 तास कामगार काम करतात. परंतु विकसित देशांमध्ये हा आकडा बराच खाली आहे.

तैवानच्या कायद्याप्रमाणे महिन्यात जास्तीत जास्त 46 तास ओव्हरटाइम काम करता येतो. याचा अर्थ आठवड्यात सरासरी 11.5 तास ओव्हरटाइम होतो, म्हणजेच रोजचा दीड तास. भारतात फॅक्टरी ॲक्टनुसार 3 महिन्यांत जास्तीत जास्त 90 तास काम केलं जाऊ शकतं. तसं तर कामगारांपैकी फार कमी जणांना फॅक्टरी ॲक्ट लागू होतो, अशा युनिटमध्ये ते काम करतात. जिथे हा कायदा लागू होतो, तिथेही तो क्वचितच अमलात आणला जातो. अतिरिक्त कामामुळे हृदयविकार व मेंदूतील आजार तसेच मानसिक व्याधी आणि आत्महत्या नोंदवल्या गेल्यात. तैवानमध्ये 2009 या वर्षात कामामुळे होणारे मानसिक आजार ओळखण्यासाठी मार्गदर्शिका तयार करण्यात आली, जी जपानच्या मार्गदर्शिकेच्या आधारे तयार झाली होती. कामामुळे मानसिक आजार हे नुकसानभरपाईस पात्र झाले, तरीही अशा आजाराचा स्वीकार फार कमी झालाय. गेल्या 9 वर्षांत 28 जणांना भरपाईसाठी स्वीकृत ठरवण्यात आले, ज्यातले बहुतेक पोस्टट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर होते. कामामुळे आत्महत्या, ताण, लैंगिक छळ, कामाच्या जागी हिंसा, गुंडगिरी, खोडसाळपणा (बुलिइंग), अतिरिक्त कामामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अजूनही स्वीकार होत नाही. आत्महत्येच्या किती केसेसमध्ये भरपाई दिली गेली, याची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली नाही. भरपाईसाठीचे मापदंड पूर्ण करणे अवघड असल्याची बाब टीकेची धनी झालीय. जागतिक आरोग्य संस्थेद्वारे 2019 मध्ये इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिझेस (रोगांचे वर्गीकरण)च्या अकराव्या आवृत्तीत बर्न आऊट  व्यवसायामुळेही होतं, हे स्वीकारलं गेलंय.

तैवानमध्ये 2010 ते 2018 या वर्षांत 6 मृत्यू, 15 हंगामी अपंगत्व, 7 कायमचे अपंगत्व मिळून एकूण 28 घटनांची नोंद करण्यात आली. अतिरिक्त कामामुळे होणाऱ्या आजारांत हृदयविकार, मेंदूविकार व मानसिक आजारच गृहीत धरले गेले. बऱ्याच वेळापासून तुम्ही थकलेले असाल (फटिग), लक्ष केंद्रित करू शकत नसाल; तर त्या कारणाने इजा होऊ शकते. दि.23 जुलै  2014 रोजी ट्रान्स एशिया एअरवेजची फ्लाईट नं.222 कोसळल्यामुळे 48 प्रवासी मृत्यू पावले. त्याप्रकरणी चौकशी झाल्यावर त्यात कामगार कायद्याचे उल्लंघन आणि वर्कआऊटचे महत्त्वाचे योगदान होते, असे नोंदवण्यात आले. अनेक कामगारांना आजारी वा थकलेले असतानाही कामावर जावे लागते. अनेकांना आठवड्याची सुट्टीही मिळत नाही. जास्त तास काम केल्याने त्यांचे संतुलन राहत नाही. जन्मसंख्यादर व घटस्फोटाचे दर यावरही आणि पती-पत्नीच्या आंतरिक संबंधांवरही याचा परिणाम होतो. या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘आयलँड ऑफ ओव्हरवर्क’ नावाचे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात अतिकामामुळे पीडित झालेल्यांच्या व्यथा कथास्वरूपात आहेत. या कार्यकर्त्यांनी चालू कामाबरोबरच ओव्हरटाइम करत चार वर्षांत हे कार्य पूर्ण केलं. या आशेने की, या विषयावर आलेला अंधार दूर होईल.

कोरिया :

कोरियात अतिरिक्त कामामुळे जास्त मृत्यू व आत्महत्या होत आहेत. सन 2015 मध्ये 559 कामगारांनी आत्महत्या केल्या. दर वर्षी तेवढेच कामगार आत्महत्या करतात; परंतु तिथले कायदे असे मृत्यू स्वीकारत नाही- म्हणजेच कंपन्यांना जबाबदार धरत नाही आणि त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी लागत नाही. जे घडतं ते  सगळं सिद्ध करण्याची जबाबदारी कुटुंबावर राहते. मृत्यू वा आत्महत्येस अतिरिक्त काम जबाबदार आहे, ही गोष्ट कुटुंबीय सिद्ध करू शकत नाहीत. मृत्यू अचानक येतो. कुटुंब हतबुद्ध होते. त्यांचं रोजचं जगणं विस्कटून जातं. ते त्यासाठी स्वतःलाच जबाबदार धरतात आणि अतिरिक्त कामाचा मुद्दा कुणी उचलत नाही; उलट स्वतःला असहाय समजतात.

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबासमोरच समाजाद्वारे प्रश्न उभे केले जातात. परिस्थिती इथपर्यंत गेली होती, तर तुम्ही काय करत होता वा काय केले? लक्ष का नाही दिलंत? तुझ्या नवऱ्याला ही सोडून दुसरी नोकरी धरायला का नाही सांगितलं? अशा प्रश्नांमुळे कुटुंब अशा दुर्घटनेसाठी स्वतःलाच दोषी मानते आणि ते लांच्छन वा कलंक लागल्याचे कुटुंब अनुभवते. अशी समग्र सामाजिक परिस्थिती बाकीचे मुद्दे उठवण्यास पोषक राहत नाही.

हळूहळू कोरियन समाजात या बाबतीत जागृती होत आहे. जुलै 2017 पासून जे पीडित आहेत, ते महिन्यातून एकदा एकत्रित येतात आणि समस्येवर चर्चा करतात.

हाँगकाँग :

हाँगकाँगमध्ये आठवड्याचे 40 तास किंवा त्यापेक्षा कमी तास काम करत असलेल्या कामगारांची संख्या 4,15,200 आणि 40 ते 44 तास काम करणाऱ्या कामगारांची संख्या 7,59,000 आहे. परंतु 16,53,000 कामगार असे आहेत की, जे 44 ते 72 तासांपेक्षा जास्त काम करतात. रोज 12 तास काम 6 दिवस केले, तर आठवड्याचे 72 तास होतात. म्हणजेच काही तर आठवड्यात यापेक्षाही जास्त काम करत असतील. इस्टेट मॅनेजमेंट, सिक्युरिटीचे 37,800 कामगार, रस्त्यावरचे वाहनव्यवहार करणारे 5700 कामगार, किरकोळ विक्री करणारे 4900, अन्य वाहनव्यवहार- स्टोरेज पोस्ट, कुरियरचे 4400, रेस्टॉरंटमधील 4200, बांधकाम क्षेत्रातील 3000, उत्पादनातील 1000 आणि अन्य 3200 कामगारांचा यात समावेश होतो. हे प्रमाण एकूण कामगारांमध्ये 2.3 टक्के आहे.

हाँगकाँगमध्ये 2013 ते 2018 या वर्षांत अतिकामामुळे हृदयविकार, मेंदूविकार वा अन्य आजारांमुळे 561 कामगार मृत्यू पावले. त्यात हृदयविकारामुळे 362, मेंदूविकारामुळे 120, तर अन्य आजारांमुळे 153 कामगारांचे मृत्यू झाले. परंतु हे सगळे अतिरिक्त कामामुळे झाले का, हे अजून नक्की झाले नाही. कोणतीही चौकशी झाली नाही, कोणतीही भरपाई दिली गेली नाही.  ‘असोसिएशन फॉर द राईट्‌स ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्‌स व्हिक्टिम्स’ नावाची संस्था यावर काम करत आहे.

भारतात काय?

भारतातसुद्धा कामाच्या जागी मॅनेजमेंट वा सहकाऱ्यांच्या उपद्रवामुळे वा अतिरिक्त ताणामुळे कामगार आत्महत्या करतात अथवा त्यांना हृदय वा मेंदूविकार होतो. त्यात काम करतानाची परिस्थिती किती जबाबदार असते,  याची कोणतीही चौकशी होत नाही. अशा घटनांचे आकडे मोठेही असतील, पण हे आकडे जाहीर केले जात नाहीत. त्यामुळे याची व्याप्ती किती, हे माहिती होत नाही. कामगार संघटना व स्वैच्छिक स्वयंसेवी संघटनांनी जपान, तैवानसारख्या देशांपासून प्रेरणा घेऊन या मुद्यांवर जनजागृती करण्याची गरज आहे; जेणेकरून करोशीला बळी पडणाऱ्यांना भरपाई मिळू शकेल आणि या प्रकारचे मृत्यू रोखण्यासाठीची पावले उचलली जाऊ शकतील.

गुजरातीमधून मराठी अनुवाद : डॉ. जयंत गुजराथी
frjayantgujarati6@gmail.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके