डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

Nimbkar Agricultural Research Institute (NARI)  या संस्थेचे संस्थापक बॉन निंबकर यांचे 25 ऑगस्टला निधन झाले, तेव्हा ते 90 वर्षांचे होते. कृषी क्षेत्रातील त्यांचे काम हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यासंदर्भात त्यांचा स्वत:चा व त्यांच्यावर लिहिला गेलेला एक लेख आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. मात्र या अंकात त्यांच्या पत्नीने लिहिलेला हा लेख त्यांच्या एकूणच कामाविषयी उत्सुकता वाढवणारा आहे. - संपादक

बॉनची आणि माझी पहिली भेट दोन्ही कुटुंबांच्या परस्पर मैत्रीसंबंधातून झाली. त्यासाठी आम्ही लोणावळ्याला त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे आम्हां दोघांना बोलायला संधी मिळावी म्हणून आम्ही बागेत फिरत होतो. तो म्हणाला, ‘‘मला खरं म्हणजे डॉक्टर व्हायचं होतं, पण मग ॲग्रिकल्चरल सायन्सेसमध्ये बी.एस्सी. केलं.’’ मी म्हटलं ‘का?’ तो म्हणाला, ‘‘माझ्या वडिलांचं असं मत पडलं की, डॉक्टर पैशाला पासरी आहेत. पण नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करणं हे जास्त आव्हानात्मक आहे. ते मला पटलं म्हणून मी शेतीत जायचं ठरवलं.’’ एवढंच बोलणं झालं. पण नंतर तो मुंबईहून शेती बघायला फलटणला जाताना आमच्या पुण्याच्या घरी थांबे, गप्पा मारी, मला कुठेतरी बाहेर घेऊन जाई. त्याने ठरवलं असलं पाहिजे की ही मुलगी मला आवडली आहे. मी तिच्याशीच लग्न करणार.

माझी आई इरावती कर्वे ही या बाबतीत परंपरावादी असल्यामुळे ती म्हणाली, ‘‘तुम्ही एकत्र हिंडता-फिरता, लग्नाला अजून अवकाश आहे, तर तुमचा साखरपुडा करा.’’ डॅडी व ममी (बॉनचे आई-वडील) मुंबईहून साखरपुड्याला आले. डॅडींनी मला एक मोठा दागिन्यांचा सेट दिला!

माझी आई (इरू) म्हणाली, ‘‘बघ हो, तो गोरापान, दिसायला सुंदर. तू काळीसावळी.’’

‘‘मी काय वाईट आहे का दिसायला?’’

‘‘वाईट नव्हे गं, पण त्याच्याइतकी सुंदर नव्हेच.’’

शेवटी साखरपुडा केला, पण लग्नाला फार अवकाश नव्हताच. कारण बॉनला सप्टेंबरच्या टर्मला परत कॉलेजात जायचं होतं आणि त्या दिवसांत बोटीने जायचं म्हणजे दीड-दोन महिने लागायचे. तत्पूर्वी पासपोर्ट, व्हिसा हे सगळं करायचं होतं. ‘‘माझा देश बघायला तू माझ्याबरोबर यायला पाहिजे’’, असे त्याने सांगितले. आम्ही निरनिराळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये अर्ज करीत होतो. माझे कॉलेजचे मार्क्स वगैरे चांगले होते, तर मला कॅलिफोर्नियातल्या एका युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळत होती. पण त्याला ॲरिझोना युनिव्हर्सिटीत (जी जरा डावी  समजली जाते) ॲडमिशन मिळाली. परदेशांत राहायचं तर एकत्र राहण्यातच अर्थ आहे, असं म्हणून आम्ही दोघांनी टूसॉन या ॲरिझोना युनिव्हर्सिटीच्या गावी राहायचं ठरवलं.

इकडे लग्न कसे करावे या बाबतीत आमचे मतभेद झाले. मला रजिस्टर्ड लग्न हवं होतं, तर त्याला तो पाच-सहा वर्षे अमेरिकेत राहून आल्यामुळे पारंपरिक लग्न हवं होतं. शेवटी तडजोड म्हणून मी वैदिक लग्न करायचं ठरवलं. हा एक अगदी छोटा अर्ध्या तासाचा विधी असतो. त्यात आंतरपट, मंगलाष्टकं असले काही प्रकार नसून केवळ अर्ध्या तासात लग्न उरकते. आमच्या घरासमोरच मांडव घातला होता. जेवण वगैरे उरकून त्याच रात्री बॉन मला घेऊन फलटणला आला. आधी एकदा त्याने मला फलटणला आणून त्याचे घर दाखवले होते, अशा खेडेगावात तुला राहायला आवडेल का, म्हणून विचारायला. मी त्याला सांगितलं की मला शहरात राहायचा उबग आला आहे, आणि मला खेड्यातच राहायला आवडेल.

आणखी एक गोष्ट म्हणजे डॅडींनी (त्याच्या वडिलांनी) सांगितलं होतं की, लग्नाचा खर्च आपण निम्मा-निम्मा वाटून घ्यायचा. दिनू (माझे वडील) पक्के हिशेबी. त्याने सगळ्या खर्चाचे हिशेब चोख ठेवले होते. एकूण चार हजार रुपये खर्च होता, तो त्यांनी दोन-दोन हजार असा वाटून घेतला.

जेमतेम पाच-सहा दिवस घरी फलटणला राहून आम्ही मुंबईला गेलो आणि भारताचा किनारा सोडला. बॉनला बोटीच्या प्रवासाची सवय होती, पण मला सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. ते अगदी चैनीचं राहणं वाटलं. बोटीवर वेळ घालवायला आम्ही काय करत असू आठवत नाही, पण निदान आम्हाला एकमेकांशी ओळख करून घ्यायची संधी मिळाली. बोटीवर अमेरिकन नाटकासाठी संगीत लिहिणारे दोन गृहस्थ होते. त्यांनी माझ्याबद्दल एक गाणे लिहिले.

There was a girl named Jai,
who came abroad very shy,
but within a week she began to speak
like a regular USA guy.

म्हणजे जाई नावाची एक बुजरी मुलगी बोटीवर आली, एका आठवड्यातच ती एखाद्या अमेरिकन माणसासारखी बोलायला लागली. बॉन हे ऐकून नुसता हसत असे.

आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो तेव्हा बंदरावरच एक सेकंडहँड गाडी विकत घेऊन आम्ही बॉनच्या आजोबांना- आईच्या वडिलांना भेटायला गेलो. त्यांनी माझं इतकं प्रेमानं स्वागत केलं की, मला अगदी भरून आलं. त्यांच्याकडे पाच-सहा दिवस राहून तीच गाडी घेऊन आम्ही थेट दुसऱ्या टोकाला टूसॉनला जायला निघालो. वाटेत काही मुक्काम करीत असे पोहोचलो. आम्हाला फ्लॅट वगैरे मिळेपर्यंत चार-पाच दिवस एका कुटुंबात राहिलो. मग फ्लॅट मिळाल्यावर तिकडे गेलो. काही दिवसांनी बॉन म्हणाला, ‘‘हा फ्लॅट फार महाग आहे’’, म्हणून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. पहिला फ्लॅट 75 डॉलर्स महिना भाड्याचा होता, तर दुसरा 45 डॉलर्स. आम्ही भारतातून तीनशे डॉलर्स महिना इतकेच पैसे आणू शकत होतो. त्यावरच आम्हाला राहावे लागत होते. पुढे कॉलेज सुरू झाल्यावर फी वगैरे त्यातूनच भरायची. तरी हे स्टेट कॉलेज असल्यामुळे बरीच फी माफ होती.

आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की, आमचं पहिलं मूल अमेरिकेत जन्मलं पाहिजे. कारण माझी आई व बॉनचे वडील फार आक्रमक असल्यामुळे ते आम्हाला हवं तसं मूल वाढवू देणार नव्हते. पुढे मी गर्भार राहिले तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत (म्हणजे जून-जुलै-ऑगस्ट) मूल जन्मावे असा आम्ही बेत केला. उन्हाळ्याच्या सुटीच्या तोंडावर मूल जन्मले म्हणजे पुन्हा कॉलेज सुरू होईतो ते तीन महिन्यांचे होईल असा हिशेब. इथे आणखी एक अडचण उद्‌भवली. टूसॉनच्या जवळ एक कॅथॉलिक हॉस्पिटल होते. तिथे नाव नोंदवायला गेलो तर ते म्हणाले, ‘‘जर अशी परिस्थिती उद्‌भवली की, आई किंवा मुलाचा जीव वाचवता येईल, तर आम्ही मुलाचा जीव वाचवू, कारण त्याचा बॅप्टिझम (बारसे) झालेला नसेल, आणि आईचा झालेला असेल.’’ बॉन म्हणाला, ‘‘हा शुद्ध मूर्खपणा आहे. मुलं आणखी होऊ शकतील, पण माझी बायको जगली पाहिजे.’’ तेव्हा मग टूसॉनपासून दहा-बारा मैल लांब अशा दुसऱ्या सेक्युलर हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं. नंदिनी वजनाने कमी म्हणजे साडेचार पौंडाची जन्मली. हॉस्पिटल आम्हाला सोडेना. शेवटी ट्रॉपिकल देशात काम केलेल्या एका डॉक्टरला बोलावले. ती म्हणाली, ‘मुलगी चांगली जोराने दूध पिते आहे ना, मग झालं तर.’ तेव्हा शेवटी दोन-तीन दिवसांत आम्हाला हॉस्पिटलमधून सोडलं. नंदिनीला (मुलीचं नाव लगेचच ठेवलं म्हणजे ते लगेच रजिस्टरमध्ये जातं) वाढवण्यात मजा येत होती. एकीकडे अभ्यासही चालू होता. आम्ही आलटून-पालटून क्रेडिट्‌स घेत होतो, म्हणजे नंदिनीला एका मोठ्या ढकलगाडीत घालून त्यात तिचे लंगोट, दुधाच्या बाटल्या असे सामान घेऊन युनिव्हर्सिटीच्या आवारात बसत होतो. माझी एम.ए.ची थोडी क्रेडिट्‌स राहिली होती, ती मी संपवली. बॉनने त्याच्या पीएच.डी.साठीचं सगळं कोर्सवर्कही संपवलं. आता फक्त थिसीस लिहायचा राहिला. तर डॅडींनी ‘भारतात लगेच परत ये’, असा निरोप पाठवला. आम्ही आलो. त्यानंतर एक-दोनदा बॉनने थिसीससाठी अमेरिकेत परत जाण्याचा प्रयत्न केला, पण इथलं आयुष्य सुरळीतपणे सुरू झालेलं असल्यामुळे तो प्रयत्न बारगळला. त्याचा थिसीस काही वर्षे अधूनमधून डोकं वर काढणारी गोष्ट झाली.

आम्ही अभ्यास संपवून परत येताना पुन्हा त्यांच्या आजोबांकडे थोडे दिवस राहून यायचं ठरवलं. या वेळी ते उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी शिपबॉटम नावाच्या गावी राहत होते. मला त्या नावाची फारच मजा वाटली. तिथली हवाही गरमच होती. तिथे बीचवर एक गंमत झाली. कुणी समुद्रात खोलवर जातंय का, ओहोटीत सापडतंय का वगैरे पाहणारे अधिकारी असत. त्यातील एक जण नंदिनी वाळूत खेळत असताना तिच्याकडे बघून म्हणाला, ‘मुलगा आहे की मुलगी?’ मी म्हटलं, ‘मुलगी.’ तो म्हणाला, ‘मग तिला अशी कमरेच्या वर उघडी ठेवून चालणार नाही. एक वर्षाची मुलगी!’ शेवटी आम्ही बाजारात जाऊन तिला घालायला एक ड्रेस खरेदी केला.

शिपबॉटमहून आम्ही न्यूयॉर्कला आलो आणि तिथून भारतात परत. आमचं सुरळीत आयुष्य सुरू झालं.

आमची राजाळे गावी शेती होती. ते फलटणहून सुमारे 14 कि.मी. होते. तिथे द्राक्षांची बाग होती. मला वाटतं एकरभर द्राक्षं होती. द्राक्षाच्या हंगामात आम्ही रोज तिकडे जाऊन चांगली झालेली द्राक्षं तोडून आणत असू. लाकडी खोक्यांतून दोन थर पॅकिंग करून मग त्या खोक्यांना खिळे मारायचे. शेतावरच्या गड्यांची मदत असायचीच. चार-चार किलो वजन करून पेट्या भरायच्या. मग आम्ही तिथून निघून पेट्या घेऊन नीरा स्टेशनला जायचो. आमची प्लिमथ नावाची गाडी होती. त्याची मागील सीट काढून त्यात 20-30 पेट्या भरायच्या. मग नीरेहून बेळगाव, हुबळी येथील व्यापाऱ्यांच्या नावाने बुकिंग करून पावत्या घ्यायच्या. आणि मग रात्री उशिरा घरी यायचं. दर दोन-तीन दिवसांनी द्राक्षतोड व्हायची. व्यापाऱ्यांच्या पट्ट्या यायच्या- त्यानुसार पुढील माल कुणाला पाठवायचा हे ठरवायचे.

मी फलटणला गाई, म्हशी, कोंबड्या पाळल्या होत्या. गाई-म्हशी दूध पुष्कळ द्यायच्या, तर मी घरच्यापुरते ठेवून बाकी रतीब घालीत असे. धारा काढायला आणि रतीब घालायला एक गडी ठेवला होता. तो दूध घरात आणायचा आणि मी दूध मोजून रतिबापुरते किटलीत भरून देत असे. महिनाअखेर त्या सगळ्या लोकांना बिले जात. सगळ्यांचा हिशोब ठेवीत असे. राजाळ्याहून कडबा किंवा विटांचा चारा येत असे. त्यातील उरले सुरले भाग आणि जनावरांचे शेण, एक मोठा विटांचा हौद बांधला होता त्यात टाकले जाई. धार काढणारा गडी रजेवर असला तर मी गवळीवाड्यात निरोप पाठवून तिथल्या कुणाला तरी पैसे देऊन बोलावीत असे. एकदा धार काढणाऱ्या गड्याने मला फसवले. ते माझ्या लक्षात कसं आलं की, रतिबाचे पैसे वसूल करणाऱ्याने एक चिठ्ठी आणली. ती वेड्यावाकड्या अक्षरांत लिहिली होती. (त्या गड्याच्या) आणि त्याच्यावर जादाची रक्कम लिहिली होती. मी ताबडतोब त्या गड्याला काढून टाकले.

घरात दररोज ताक घुसळून लोणी काढलं जाई. लोणी निघालं, की चंदाचा हात पुढे. तिच्या हातावर लोण्याचा गोळा पडला, की पुढे काम सुरू. ताक पुष्कळ व्हायचे, ते न्यायला रोज आपली भांडी, किटल्या घेऊन बायका यायच्या. पुढे आमच्या घराच्या आसपास वस्ती पुष्कळ वाढली तेव्हा भाकड झालेली जनावरे मी एकेक करून विकून टाकली, रतीब हळूहळू बंद केले. शेवटची एक गाय उरली होती ती एका गड्याला देऊन टाकली.

आम्ही पोल्ट्री ठेवली होती, त्यात व्हाइट लेगहॉर्न जातीच्या कोंबड्या होत्या. त्या अंड्यावर आल्या, की नंदिनी आणि मंजू लक्ष ठेवून असायच्या. कोंबडी कॅक-कॅक असं ओरडली की, त्या धावत यायच्या आणि कोंबडीचे शेपूट वर करून अंडं अलगद झेलायच्या. मी अंडीही विकत असे. आमच्याकडे शंभरेक कोंबड्या होत्या.

याच सुमारास बॉनने निंबकर सीड्‌स ही कंपनी सुरू केली. नुसती शेती करण्यात त्याला रस वाटेना. प्रथम त्याने कर्नाटकातून लक्ष्मी ही कपाशीची जात आणली. इथला मान्सून उशिरा असल्यामुळे ही जात लवकर पक्व होणारी असल्याने पावसातून निसटेल म्हणून. ती इथे खूप लोकप्रिय झाली, पण पुढे सरकारने त्या जातीला परवानगी नाकारली. मग बरीच खटलेबाजी होऊन बॉन त्यात जिंकला. पुढे हायब्रिड ज्वारीचं बी त्यानं आणवलं. अमेरिकेतील कोकर सीड कंपनीतून त्यानं मागवलं. त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याने वसंत-1 ही जात काढली. त्या काळच्या वर्तमानपत्रांतून ‘हायब्रिडचा बादशहा’ म्हणून त्यावर खूप टीका झाली, पण तो बधला नाही. मला वाटतं आजसुद्धा ही जात बुटकी असल्यामुळे वाऱ्याने, पावसाने पडत नाही, आणि दाणे मालदांडीपेक्षा लहान असले तरी कणीस भरगच्च असते. बॉन म्हणे, ‘शेवटी ज्वारी तुम्ही सबंध खात नाही, पीठ करूनच खाता ना. मग काय फरक पडतो? उलट ह्या जातीतून जास्त पीठ मिळते.’ पुढे ह्या जातीचा बराच प्रसार झाला. पुढे निंबकर-1 आणि निंबकर-391 या कापसाच्या जातीचा त्याने विकास केला. त्या खूप लोकप्रिय झाल्या. त्यांचे बीसुद्धा त्याने मुळात अमेरिकेतूनच आणले व त्याच्यावर काही प्रक्रिया करून या जातींचा विकास केला. निंबकर सीड्‌स अशा नावाचे दुकान काढून तो फलटणमध्ये हे सगळं बी विकत असे. मग पुढे निंबकर सीड्‌स प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी काढून ती रजिस्टर केली. प्रथम स्टाफ फारसा नव्हता म्हणून मी त्याची सगळी कागदपत्रं, पत्रव्यवहार हा घरीच करीत असे. मी भराभर टाइप करीत असे, तेव्हा मला काही ते जड जात नसे. पुढे स्टाफ वाढल्यावर मी त्याला म्हटलं, ‘आता तू दुसरं कुणीतरी या कामासाठी घे. मला माझं लेखन करायचं आहे.’ एव्हाना मुली शाळेत जाण्याएवढ्या मोठ्या झाल्या होत्या. तेव्हा मी खूप लवकर उठून त्यांचा नाश्ता, शाळेची तयारी करून देत असे, तेव्हा माझं लेखन बंद करीत असे. सकाळच्या शाळेची घंटा साडेसहा-पावणेसातला व्हायची. त्या काळात मी खूप लेखन केलं. सुमारे 80 गोष्टी लिहिल्या, त्या Sunday Standerd, Times of India  ची literery suppliment, The Hindu, Imprint Carvan  अशा अनेक ठिकाणी छापून आल्या. मग मी कादंबरी लेखनास सुरुवात केली. कादंबऱ्या मात्र इंग्रजीत लिहिल्या.

पुढे 1967 मध्ये बॉनने Nimbkar Agricultural Research Institute  सुरू केली. जे प्रयोग निंबकर सीड्‌समध्ये केले जात होते, त्यांना योग्य प्रायोगिक अधिष्ठान मिळवून दिले. तिथे माझा भाऊ नंदू याला मुख्य (डायरेक्टर) नेमले. तो त्याआधी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात नोकरी करीत होता. नापास केलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी पास जाहीर करायचे या गोष्टीला तो वैतागला होता. तेव्हा ‘नारी’मध्ये यायला तो तयार झाला. मग बॉनने स्टाफ जमा करायला सुरुवात केली. कपाशीवर काम करायला, हायब्रिड ज्वारीवर काम करायला, गोड ज्वारी (ज्याच्या घाटात साखर असते.) शुगरबीटवर काम करायला माणसे नेमली. मला वाटतं शुगरबीटवर काम करणारा बॉन पहिलाच. पण शुगरबीट साखर कारखान्यात पाठवावे लागायचे. त्याचा लगदा प्रोसेसिंगमध्ये वापरायचा आणि चोथा जनावरांना खायला घालायचा. पण कारखान्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. खरं म्हणजे बीटची दोन पिके उसाइतक्या अवधीत काढता येतात आणि त्याचे उत्पन्न तेवढेच मिळते. पण कारखाने आणि शेतकरी या दोन्हींनीही त्याला नकार दिला. आता त्याचा थोडाफार प्रसार होतो आहे, पण बॉन काळाच्या पुढे होता असा याचा अर्थ.

बॉनने स्टाफ जमा केला, पदराला खार लावून त्यांचे पगार दिले. कल्पना अशी की, त्यांनी पुढे प्रकल्प आणावेत व सरकारी मदत मिळवावी. निंबकर सीड्‌समधल्या विक्रीचे पैसे त्यात होतेच. तो स्वत:साठी काही ठेवत असे. पैसे जसे येत तसे जात. घरखर्च सगळा मी भागवत असे. तेव्हा येतील ते पैसे अशा तऱ्हेने खर्च करायला त्याला मुभा होती.

डॅडींनी दोन खाजगी ट्रस्ट स्थापन केले होते, नंदिनी व मंजूच्या नावाने. तिसरी मुलगीच झाली म्हणून ते फार नाराज होते. त्यांनी सगळा दोष बॉनला दिला. "You have a negative personality, that'swhy you have only daughters."  ‘ माझ्या इतर इन्कममध्ये नंदिनी व मंजूच्या नावाने 300-300 चे चेक दरमहा यायचे, त्याचीही भर पडत असे. मग चंदाच्या नावाने ममींनी पैसे ठेवले. त्याचे काय झाले आठवत नाही.

बॉन पाच-सहा वर्षे आईच्या व वडिलांजवळ राहून शाळेत गेला न्यू टॉउनमध्ये. त्यांचा स्वभाव इतका गोड होता की, बॉनच्या वाढीच्या वयात त्यांचाच प्रभाव बॉनवर पडला म्हणून त्याचा स्वभाव इतका गोड झाला. बॉन स्वत:वर काही खर्च करीत नसे. त्याचे कपडेसुद्धा मी शिवून घ्यायची. फक्त त्याची एक टेन गॅलन म्हणतात तशी हॅट होती. ती घालून तो ट्रॅक्टर चालवीत असे. एकदा आमची चारचाकी गाडी बंद पडली. तेव्हा आम्ही बैलगाडीत बसून फलटणला आलो. तो गाडीवान म्हणाला, ‘‘बघा, शेवटी माझी बैलगाडीच तुमच्या उपयोगी आली.’’ त्या गाडीवानाचं नाव एकनाथ आणि त्याला एकच डोळा होता.

0

रोज संध्याकाळी आम्ही आवारात फेऱ्या मारीत होतो. मी त्याला म्हणे, ‘‘तू पाय उचलून टाक, असा ओढत चालू नकोस. मी माझ्या मुलीला- जी डॉक्टर आहे- दाखवलं. तेव्हा ती म्हणाली, "Signs of early Parkinsons.". तिला जे कळलं होतं ते मला कळलं नाही. मग सुरू झाल्या निरनिराळ्या तपासण्या. ह्याला किती तरी वर्षे झाली, किती ते मला आठवत नाही. नंतर अर्थातच मला त्याचा अर्थ समजला, चांगलाच समजला. तरीही त्याचं काम नेहमीप्रमाणे सुरू राहिलं.

डोळे अधू झाले होते म्हणून तो अनेक लोकांकडून वाचून घ्यायचा, लिहून घ्यायचा, फोनाफोनी करायचा. त्याच्या कामात काही खंड पडला नव्हता. मुख्य म्हणजे मला वाटतं dopamine ह्या औषधांमुळे. अशी किती तरी वर्षे गेली. मग हळूहळू activities कमी होऊ लागल्या. तरीही तशी बरीच वर्षे गेली. तो उठून संडासात वगैरे जायचा, मग मला फ्लश करायला सांगायचा. मग टीव्ही लावून द्यायला सांगायचा, लक्ष देऊन बघायचा. मग त्याची देखभाल करणारा मुलगा नसला तर मला चहा करून द्यायला सांगायचा. त्यात टोस्ट बुडवून द्यायला सांगायचा. बेसनाचा अर्धा लाडू (एवढंच त्याचं रेशन होतं.) चवीने खायचा. मग एक दिवस कशाला हात लावला नाही. मंजूच्या मते हे चांगलं लक्षण नव्हतं. मग चाचण्या वगैरे करायला हॉस्पिटलमध्ये भरती केले. असं दोनदा झालं. मग मात्र त्याची प्रकृती ढेपाळली. तरीही त्याचं लेखन-वाचन (इतरांकरवी) चालूच राहिलं. पण ते थोडंच दिवस. मध्येच तो काही तरी सरळ बोलायचा. एक दिवस एकदम मला म्हणाला, ‘चिंचा’. मी म्हटलं, ‘चिंचा काय?’ तो म्हणाला, ‘पिकल्या का?’ मी म्हटलं, ‘अजून खूप अवकाश आहे पिकायला. तू झोप आता.’ पण पिकलेल्या चिंचा त्याने पाहिल्याच नाहीत. त्याच्या पुष्कळ आधीच तो निघून गेला.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके