डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तिने कॅप्सूल भरलेली बाटली परत हातात घेतली. त्या कॅप्सूलमध्ये बंदिस्त असलेले ते छोटे कण किड्यासारखे वळवळू लागले अन् बघता बघता त्यांचा आकार मोठामोठा होत गेला. ते भयानक हिंस्र जनावर बनले. त्या भयानक अजगरांनी आ वासून चोहो बाजूंनी सलमाला घेरून टाकले आणि तिच्या दिशेने ते सरपटू लागले. आपले गरगरणारे मस्तक दोन्ही हातांनी दाबीत थरथरत तिने त्या भयानक भुतावळीकडे पाहिले आणि, होय... ज्या बाटलीमध्ये तिने फुलवलेली, हळुवारपणे जोजवलेली अनेक रंगीबेरंगी स्वप्ने अगदी सुखरूपपणे बंदिस्त होती; ती बाटली तिने विलक्षण घृणेने, तिरस्काराने खिडकीबाहेर भिरकावून दिली.

सुभान अल्ला! कोणता दिवस उगवला आज! मिसेस सुबहानीच्या मुखड्यावर देवदूतासारखे अलौकिक हास्य फुलले होते. सुहास्य वदनाने ती सलमाचे अभिनंदन करीत म्हणाली, ‘‘मुबारक हो, मिसेस खालिद! पण बाळाचा जन्म झाल्यावर तोंड गोड केलं पाहिजे हं, सांगून ठेवते! कित्येक वेळा असे अचानक उपटणारे सुखसुद्धा असह्य यातनांप्रमाणे काळजाला कडकडून डसते. सलमासुद्धा ह्या अचानक बसलेल्या धक्क्याने अवाक झाली. हा सुखद धक्का तिला पेलवत नव्हता. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आज हा कसला दिवस उजाडला! दिवस आणि तारखा मोजता मोजता बिचारी अगदी थकून गेली होती. अख्खा दिवस तिला खायला उठे. एकेक तास, एकेक क्षण तिला पहाडासारखा वाटे. चालता चालता तिची अगदी दमछाक झाली होती. घराची  साफसफाई, खालिदबरोबर हिंडणे-फिरणे, मैत्रिणींबरोबर ढीगभर शॉपिंग, कॉलेजमध्ये शिकवणे सर्व काही ती करीत होती. पण हे सर्व अगदी चुटकीसरसे संपून जाई आणि मग रात्र येई. लांबलचक, वैराण, एकाकी, काळी भयानक रात्र तिच्या चहूबाजूंनी पसरे आणि ती एकटी रात्रीच्या त्या भयानक शांत, खोल खोल गुहेमध्ये बुडून जाई. दूर आउट-हाउसमध्ये आपाचे तान्हे बाळ रडे, आणि आया धडपडत उठून त्या दोन महिन्यांच्या तान्हुल्याला बदाबदा मारू लागे, ‘‘मर मेल्या! अवलक्षणी कार्ट कुठलं! दर वर्षी येतात मेली, जळूसारखी माझं रक्त लुचायला!’’ 

पण आज हे काय! मिसेस सुबहानी आपल्या चेहल्यावर ते दिव्य, अलौकिक हास्य फुलवीत सलमाला म्हणत होती, ‘‘मिसेस खालिद ही घ्या तुमची औषधं. आणि हो, ही कॅप्सूल अगदी रोज न विसरता नियमितपणे घ्यायची हं! कारण तुमच्या केसमध्ये अबॉर्शनचा धोका संभवतो. सलमाने ती बाटली आपल्या मुठीमध्ये घट्ट पकडून ठेवली. अबॉर्शनचा धोका, परत ती भयानक गुहा. पहाडासारखा दिवस. एखाद्या रंगीत पिक्चरमधून भराभरा दृश्ये बदलतात, त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू नजरेसमोरून झरझर पुढे पुढे सरकत होती. कॉर्निसवर ठेवलेल्या त्या रंगीत विदूषकाचे खिदळणे साऱ्या खोलीभर दुमदुमले. 

किती तरी वेळा सलमाच्या मनात आले होते, कधी काळी डॉक्टरांनी अशी गोड बातमी ऐकवलीच तर आपली काय प्रतिक्रिया होईल? प्रत्येक वेळी हाच विचार मनात येऊन अतीव सुखाने मोहरलेली तिची काया थरथरू लागे. पण आज ते रम्य स्वप्न मोहक रंगांमध्ये बुडून वास्तवाच्या रूपामध्ये तिच्यासमोर ठाकले असता ती अगदी मुकाट्याने बसून राहिली. मग थरथरत कॉटवर कोसळली आणि तिने घड्याळाकडे नजर वळवली. नऊ वाजून दहा मिनिटे. बरोबर नऊ वाजता मिसेस सुबहानीने तिला ही आनंदाची बातमी दिली. पण नेमक्या ‘त्या’ क्षणापर्यंत येऊन पोहोचायला किती शतके लोटली! हेच स्वप्न सलमा कधीपासून बघत होती खुदाच जाणे. एका पूर्ण मानवाचे शिल्प साकार होणे ही केवढी मोठी मजल आहे! कोणास ठाऊक, कोणकोणती तथ्ये त्याच्या पूर्णत्वामध्ये सामावली जातात. सृष्टीच्या मेन स्विचचा स्वामी, फटकन ताऱ्यांचे लखखते दिवे मालवू शकणारा, भर मध्यरात्री सूर्याला खेचून आणणारा मानव! अशा असामान्य मानवाला जन्माला घालणे सोपे काम थोडेच आहे ? अचानक सलमाला जाणवले.

ती खूपच वजनदार झाली आहे. अतिशय महत्त्वाची असामी बनली आहे! उशाशी ठेवलेली ती कॅप्सूलने भरलेली बाटली उचलून तिने एक कॅप्सूल काढून आपल्या तळहातावर ठेवली. त्या पांढन्याशुभ्र पारदर्शी कॅप्सूलच्या आत लालभडक छोटे छोटे दाणे चमचमत होते. अगदी तुच्छ कण. पण हे इवले इवले कण भविष्यातील सर्व संकटांना पार नेस्तनाबूत करणार आहेत. आपल्याला एका कॅप्सूलमध्ये सुखरूप ठेवणार आहेत. सकाळी ऑफिसला जाताना खालिदने चौकशी केली ‘‘काय गं, कॅप्सूल घेतली नाहीस?’’

खालिदसुद्धा मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होता. हे सोनुले आपल्याला 'अब्बा' म्हणून हाक मारेल, आपल्याला आजोबा, पणजोबा बनवेल, त्याच्यासाठीच तर आपण एवढा घाम गाळला. हे घर उभारले. असंख्य स्वप्ने सजवली. त्या शोकेसमध्ये खच्चून भरलेल्या खेळण्यांसारखी कपाटात भरलेली खेळणी, टॉफी, मिठाई, बिस्किटांचा खाऊ, बागेत फुललेली फुले... सारेच जण कोणाच्या तरी आगमनाची उत्कंठेने वाट पाहत आहेत. आणि आमच्या ह्या बेगमसाहिबा बघा... कॅप्सूल घ्यायलाच विसरल्या. छे:! ती बरी विसरेल? रात्रभर तिच्या मनात हाच तर विचार घोळत होता. ब्रेकफास्टनंतर कॅप्सूल घ्यायची आहे. पण ब्रेकफास्टनंतर खालिदने जेव्हा तिला आठवण करून दिली, तेव्हा ती आळसावून तशीच बसून राहिली. खरे तर तिला वाटत होते.

या बंद प्राचीराच्या निर्मितीमध्ये खालिदनेसुद्धा भाग घ्यावा. त्याने स्वतःच्या हाताने आपल्याला कॅप्सूल देऊन मग ऑफिसला जावे. म्हणजे दिवसभर ती आपल्या समोरील सर्व संकटांना दूर सारून एका रंगीबेरंगी स्वप्नामध्ये बुडून जाईल. पण ऑफिसला जाताना खालिदला असते चोचले पुरविण्याचे कधी तरी भान असते का? खालिद निघून गेल्यावर तिनेच कॅप्सूलची बाटली उचलून तिच्यातून एक कॅप्सूल काढून आपल्या तळहातावर ठेवली. खिडकीच्या उजेडात ती तिच्याकडे निरखून पाहू लागली. कॅप्सूलमधील त्या चमकत्या कणांतून एक सोनुले साकार होऊ लागले- गुडघे पोटाशी घेऊन मुटकुळे करून एक शिशू तिच्या गर्भाशयामध्ये झोपला होता. हेच छकुले जेव्हा मोठे होईल... खूप मोठे... सलमाला मान उंचावून त्याच्याकडे बघावे लागेल. त्या...त्या हरीकडे बघावे लागते तसे.. हरी तिच्या शेजारी राहत होता.... अठरा-एकोणीस वर्षांचा स्मार्ट, सुंदर आकर्षक तरुण. कोणताही  कपडा त्याच्या अंगावर खुलत असे. सकाळी आपल्याच तंद्रीमध्ये गुणगुणत, शीळ घालीत तो कॉलेजला जायला निघे तेव्हा सलमा आपल्या बाल्कनीमध्ये उभी राहून डोळे भरून त्याच्याकडे बघे. आमचे नन्हेमियाँसुद्धा एवढे मोठे होतील, अगदी यांच्यासारखे...’’ एक दिवस हरीला तिचा पाठलाग करणाऱ्या नजरेची जाणीव झाल्याचे तिच्या लक्षात आले, तशी ती घाबरली. शीः! आपल्याला तो भलतीसलती बाई तर समजणार नाही ना? तीस वर्षांची एक बाई एखाद्या तरण्याबांड मुलाकडे असे टक लावून पाहाते का? मुठीमध्ये कॅप्सूल आवळून ती बाल्कनीमध्ये आली. हरी आपल्या लॉनमध्ये मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळत होता. तेवढ्यात दारावर कोणीतरी घंटी वाजवली. एकदम घाबरून सलमाने कॅप्सूल बाटलीत टाकली.

‘‘खालिदमियाँ ऑफिसात गेले वाटतं ?’’ माजिद... तिचा मोठा दीर आला होता. त्याचा चेहरा ओढलेला दिसत होता. तो अगदी गळून गेला होता. सलमा त्याच्या शेजारच्या सोफ्यावर बसली. ‘‘काय झाले भाईजान? सगळे ठीकठाक आहे ना?’’  ती खरंच घाबरून गेली होती. ‘‘अगं, आतापर्यंत बळजबरीने पैसे हिसकावून घेऊन जात होता. पण....काल...मात्र घड्याळ...’’ माजिदचे शब्द घशातच अडकले, सतरा-अठरा वर्षांच्या वयात आलेल्या मुलाला एखादा बाप दुसऱ्यासमोर एकदम चोर कसे म्हणेल? सलमाच्या हृदयावर वज्राघात झाला. तिचे डोळे भरून आले. स्वतःला पोरबाळ नसल्याने सलमा व खालिद दोघेही आपल्या भावंडांच्या मुलांमध्ये जीव रमवीत; त्यांच्या अडीअडचणींमध्ये आवडीने लक्ष घालीत. सलमाला तर राशिद खूपच आवडेल, पण माजिदभाई आणि भाभींची मुलांना घडविताना कोण जाणे काय चूक झाली... राशिद आणि त्याची दुसरी भावंडे

दिवसेंदिवस हाताबाहेरच जाऊ लागली होती. आता..... आता तर… 
"तुझ्या भाभीने रात्रीपासून रडून रडून गोंधळ घातला आहे. जरा सवड काढून ये आणि तिला समजाव बरं.’’ 
खिन्न मनाने अन् जड पावलाने माजिदभाई पडदा सारून निघून गेले. 
‘‘भाभीजान रडत बसल्येय?’’ सलमाच्या जिवाचा थरकाप उडाला. चार-चार सुंदर, धष्टपुष्ट, निकोप प्रकृतीच्या, बुद्धिमान मुलांची भाग्यवान माता!
किती वेळा तरी तिच्या मनात असा विचार डोकावला होता- ‘‘मी ह्या लेकरांची अम्मीजान असायला हवी होते. पण...पण... माझे घड्याळ... पैसे, माझ्या घराची अब्रू, प्रतिष्ठा... हाय अल्ला!’’ ती नखशिखान्त थरारली. 
‘‘नाही गं बाई!.... माझा बेटा असा 'आवारा' मुळीच होणार नाही. मी त्याला एक इमानदार अन् साध्या दिलाचा इन्सान घडवीन. त्याच्या आसपास संकटे, दुर्गुण, धोके मुळीच फिरकू देणार नाही.’’ 
‘‘दुल्हन पाशा! दुल्हन पाशा...! डोळा लागलाय वाटतं!" 

“जी! चरण स्पर्श करते छोटे अब्बा!" सलमाने कॅप्सूलची बाटली टेबलावर ठेवली. आणि आपल्या चुलतसासऱ्यास लवून आदाब केला. 
"जीती रहो बेटी... सकाळी बिस्मिल्लाहबीने सांगितले.’’ 
‘‘नसीबे आदा (दुश्मनां) उनका मिजाज कुछ नासाज है! तुझी प्रकृती बिघडलेय, डॉक्टरीण आली होती. अल्लाह खैर करे।"
"तसं विशेष काही नाही छोटे अब्बा! मी अगदी ठणठणीत आहे. जरा पोटात दुखत होते." 
तोंडावर हात ठेवून ती हळूच हसली. ‘इश्श!’ आपली प्रकृती आता भलतीच सुधारणार आहे हे छोटे अब्बांना थोडेच सांगायचे? "तुमची तब्बेत कशी आहे अब्बा हुजूर? फारच रोडावलेले दिसता." 
खरोखरच छोटे अब्बा फारच खंगले होते. सगळ्या परिवारात त्यांच्याइतका प्रामाणिक, प्रामाणिक सरळमार्गी मनुष्य कोणी नसेल. कधी खोटे बोलणे नाही, दुसऱ्याला दुखावणे नाही. पण बिचाऱ्यांच्या वाट्याला केवढे खडतर आयुष्य आले! ऐन तारुण्यात बायकोचा मृत्यू, सगळे जावई एक नंबरचे अप्पलपोटे, मतलबी... आपल्या पोळीवर तूप ओढून येणारे निघाले... यांना दोन्ही हातांनी भरपूर लुटले. सुना आल्या.... एकीलाही सासरा आपल्याजवळ नको होता. मुलांनी इस्टेटीची वाटणी करून घेतली आणि आता हे बापुडवाणे होऊन ह्या घरातून त्या घरात धक्के खात वणवण हिंडत होते. वकील त्यांच्या तोंडाला पाने पुसत होते, नोकर त्यांना नागवून सूंबाल्या करीत. लहान लहान शेंबडी पोरेसोरेसुद्धा त्यांचा मामा करून त्यांच्याकडून चार-दोन रुपये लाटीत. छोट्या अब्बांना सर्व कळत होते. पण ते कधीही कोणाला नावे ठेवत नसत. कोणाच्याविरुद्ध ब्र काढीत नसत.

पाहावे तेव्हा आपले कण्हत कुंथत, धडपडत सर्व नातेवाइकांच्या अडीअडचणीत सहभागी होण्यास जात. सगळे जण त्यांची टवाळी करीत. गुडघ्याएवढ्या त्या पोराटोरांची त्यांची नकल करताना हसता हसता मुरकुंडी बळे. 
सलमाला आज ह्या सर्व गोष्टी आठवल्या. छोटे अब्बांना पाहून तिच्या मनात आलं. हे तर नेकी आणि सचोटींचा अगदी आदर्श पुतळा आहेत. नरम इतके, जशी अल्लातालाची गाय. प्रत्येक मातेचे हे स्वप्न असतेच, हे खरे असले तरी दुनियेने त्यांना मऊ लागले म्हणून अगदी कोपराने खणून घेतलेय. आणि अतिशय गोडीने वीट आणणाऱ्या मिठाईसारखे त्यांना ओकून टाकलेय. सचोटी आणि नेकीच्या मार्गावरून जाणाऱ्यांना जग असेच विनाशाच्या गर्तेत ढकलून पुढे जाते. ऐ मेरे मौला! माझ्या काळजाचा घड.... माझ्या बाळाला या छोटे अब्बांइतके नेक, सरळ नको बनवूस.’’ 
सलमाने यावरून विचार केला. 
"बहुरानी, तुझी प्रकृती बरी दिसत नाही. तू आराम कर." 
तिला गप्पगप्प बसलेली पाहून छोटे अब्बा उठले. साधासुधा सरळमार्गी मनुष्य कोणी नसेल कधी. 
"मी जरा छोट्या बहूकडे जाऊन येतो. तिचं ब्लडप्रेशर परत वाढलंय." आपल्या छडीच्या आधाराने छोटे अब्बा उठले आणि कसेबसे लटपटत बाहेर पडले.
"ही मंडळी आजच्या दिवसात मला कॅप्सूल काही खाऊ देतील असे दिसत नाही!" सलमा उठली. अकरा वाजले होते, कॅप्सूल अगदी सकाळी खायची होती. मिसेस सुबहानी एवढ्यात चेक-अपसाठी आली तर! ती बाटली उचलतच होती, पण परत खाली बसली. 
आयाने दारावरचा पडदा सारून म्हटले, "डॉक्टरसाहेब आले आहेत, बीबीजी!" 

‘‘आदाब अर्ज! सुबहानी भाई!" 
ती उठून उभी राहिली. डॉक्टर सुबहानी अगदी घोड्यावर बसूनच आले होते. आल्याआल्या ब्लडप्रेशर चेक करण्यासाठी तिच्या हातावर पट्टी बांधत ते म्हणाले. "मैमूनाची आज मॉर्निंग ड्यूटी होती. जाताना तुमचं चेक-अप करण्यास सांगून गेली होती. सगळे ठीक आहे ना?"
"हो हो." अत्यानंदाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. ती डॉक्टर सुबहानीच्या चेहऱ्याकडेच टकमक पाहत राहिली. हाय अल्ला! एवढा मोठा डॉक्टर केवळ मैमूनाच्या मैत्रीमुळे वेळात वेळ काढून आपल्याला पाहायला आलाय. दोघा मियाँबीवीकडे साऱ्या जगातील ढीगभर डिग्र्या आहेत. शहरातील हे नाणावलेले डॉक्टर. पण किती प्रेमळ; किती मोठ्या मनाचे. अबॉर्शनचा घोका टाळण्यासाठी सलमाच्या अवतीभोवती सुरक्षिततेचा कडेकोट बंदोबस्त करीत आहेत. डॉक्टर मैमूनाच्या उपचारांमुळेच तिला आज आई होण्याचे भाग्य लाभले होते. डॉ. सुबहानी अतिशय लोकप्रिय डॉक्टर होते. शहरातील सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची वाहवा होत होती. सर्व वर्गांतील लोक त्यांना नावाजत होते, त्यांच्या गुणांचे गोडवे गात होते. दोघेही किती सुंदर, हसतमुख, सुसंस्कृत. मियाँबीबींमध्ये किती अलोट प्रेम! अगदी दूधसाखरेप्रमाणे एकमेकांत विरघळून गेले होते. दोघेही निष्णात डॉक्टर, गोजिरवाण्या मुलांचे माता-पिता होते. अल्लामियांने सारी सुखे त्यांच्या झोळीत ओतली होती. अगदी भरभरून. रोग्याला त्यांचा स्पर्श होण्याचीच खोटी, त्याचा रोग एकदम छूऽमंतर होई. आज सलमाची नजर डॉ. सुबहानीच्या चेहऱ्यावरून दूर होण्याचे नावच घेत नव्हती, ते अगदी हसतहसत तिच्या प्रकृतीची चौकशी करीत होते. विचारपूर्वक पथ्यपाण्याच्या अगदी बारीक सारीक सूचना करीत होते. कोणत्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, हे समजावीत होते. लक्षपूर्वक तिचे ब्लडप्रेशर चेक करीत होते. डॉ. सुबहानींच्या दणकट मजबूत हातामध्ये तिचा नाजूक, कोमल दंड होता. त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचा प्रभाव सलमाच्या व्यक्तिमत्त्वावर पसरला होता. ती एका थोर मानवाच्या निर्मितीमध्ये गुंतली होती. उंचापुरा, तगडा, हसतमुख, स्वतःच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असलेला, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एक आदर्श, अलौकिक मानव! मानवतेचा आदर्श पुतळा ! म्हणूनच तर नव्वद टके मातांना आपला मुलगा डॉक्टर बनाया असे मनापासून वाटत असते ना! डॉक्टर! मलासुद्धा म्हातारपणी एका डॉक्टरची गरज भासेल, माझे ब्लडप्रेशर चेक करणारा माझ्या काळजाच्या

जखमांवर हळुवारपणे फुंकर मारणारा, त्यांच्यावर थंडगार मलमाचा बोळा फिरवणारा, माझ्या आतल्या रक्ता-मांसाचा डॉक्टर... डॉक्टर… 
"झोप येतेय वाटतं तुम्हांला? ही या इंजेक्शनची रिॲक्शन आहे. चला, आडव्या व्हा बघू." डॉक्टरांनी आपल्या ममताळू हातांनी हळुवारपणे तिला सोफ्यावर झोपविले आणि फोन उचलून ते डायल करू लागले. 
"हॅलो ! मी डॉक्टर सुबहानी बोलतो. हे पहा सिस्टर, त्या अकरा नंबरला एवढ्यातच इंजेक्शन देऊ नका. फार तगडी असामी आहे बरं. चांगला मासा गळाला लागलाय, त्याच्याकडून प्रथम बरीच रक्कम वसूल करू दे. हो, हो, मी संध्याकाळी येतोच क्लिनिकमध्ये." 

पेंगत असलेल्या सलमाची झोप खाडकन उडाली. सहस्र इंगळ्या डसाव्यात अशा वेदनेने तिच्या संपूर्ण देहाची काहिली झाली, तिच्या मनाची तगमग वाढली. रागाने फणफणत अन् अत्यंत तिरस्काराने तिने डॉ. सुबहानीस.. त्या दगडाचे काळीज असणाऱ्या लालची माणसास 'खुदा हाफिज' म्हटले. किती निर्दयपणे त्याने तिच्या दंडामध्ये सुई खुपसली होती! कोण जाणे, त्या सुईमध्ये कसले जहर भरले होते! सलमाच्या संपूर्ण शरीरामध्ये हे हलाहल पसरले. तिने कॅप्सूल भरलेली बाटली परत हातात घेतली. त्या कॅप्सूलमध्ये बंदिस्त असलेले ते छोटे कण किड्यासारखे वळवळू लागले अन् बघता बघता त्यांचा आकार मोठामोठा होत गेला. ते भयानक हिंस्र जनावर बनले. त्या भयानक अजगरांनी आ वासून चोहो बाजूंनी सलमाला घेरून टाकले आणि तिच्या दिशेने ते सरपटू लागले. आपले गरगरणारे मस्तक दोन्ही हातांनी दाबीत थरथरत तिने त्या भयानक भुतावळीकडे पाहिले आणि, होय... ज्या बाटलीमध्ये तिने फुलवलेली, हळुवारपणे जोजवलेली अनेक रंगीबेरंगी स्वप्ने अगदी सुखरूपपणे बंदिस्त होती; ती बाटली तिने विलक्षण घृणेने, तिरस्काराने खिडकीबाहेर भिरकावून दिली.
 

अनुवाद : हेमा जावडेकर

Tags: अनुवाद - हेमा जावडेकर मूळ कथा - जीलानी बानो ‘कॅप्सूल’ translation - hema jawadekar उर्दू कथा jilani bano 'capsule' Tag - urdu story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके