डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सध्या मालदीव देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मुळे 1983 च्या बॅचचे आय.एफ.एस. (भारतीय विदेश सेवा) अधिकारी असून, 1984 ते 88 आणि 1995 ते 98 अशी एकूण सात वर्षे ते जपानमधील भारतीय दूतावासात कार्यरत होते. त्यांच्या ‘माती, पंख आणि आकाश’ व ‘नोकरशाईचे रंग’ या दोन मराठी पुस्तकांत जपानमधील वास्तव्याच्या अनुभवावर आधारित अतिशय मार्मिक व विश्लेषणात्मक लेखन आले आहे. गेल्या आठवड्यात जपानमध्ये झालेल्या भूकंप व सुनामी या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेला हा लेख, जपान आणि जपानी माणूस, जपानवरील आपत्तीचा इतर देशांवर होणारा परिणाम आणि जपानपासून आपण काय शिकावे या तीनही घटकांवर सम्यक्‌ व सकारात्मक भाष्य करणारा आहे. - संपादक

नेमकी कशी सुरुवात करायची? कुठून सुरुवात करायची? विशेषत: ज्या गोष्टीचा आरंभ, आशय आणि शेवट कशाचेच मोजमाप करता येत नाही अशा कथेला हाताळायचे कसे?

सेंदाईला मी समुद्र काठावर उभा आहे. नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर मी दहा मिनिटं हलकीफुलकी सहस्रपावली करत समुद्रावर येतो. दूरवर पसरलेली समुद्राची निळाई आणि तिच्यावर झुकलेली आकाशाची निळाई! दोन्ही बघता बघता देहभान विसरतो. अकल्पित आनंदाचा अनुभव घेतो. चमचमणारी सूर्यकिरणं, खालीवर होणाऱ्या धपापणाऱ्या लाटा, किनाऱ्याला भिडल्यानंतर फेसाळत विरून जाणाऱ्या लहरी मनात अनेक गूढ अनाकलनीय प्रश्न उभे करतात. कुठून आल्या? कशा मिळाल्या? कशा विरल्या आणि परतीच्या प्रवासात पुन्हा सागराला जाऊन मिळाल्या? ही ऊर्जा कुठून येते? हे मंथन कशासाठी? हा सागर असा एकाच वेळी इतका प्रशांत आणि इतका बंडखोर का?...

एकदम पायाखालची जमीन हादरली. भूकंप? विमानतळाचा भव्य परिसर थरथरतोय. हा जगावेगळा भूकंप. मी पाय रोवून घट्ट उभा. न थांबणारा भूकंप? दूरवरच्या इमारतींमधली एक अचानक खाली घसरली. पायाखालची जमीन दुभंगणार की काय? समुद्रापासून थोडा मागे मोकळ्या जागेवर आलो. लहानपणी काळ्या माळ्या घुंगुरमाळ्या करत दोन्ही हात बाजूला करून दरवेशासारख्या फेऱ्या मारून थांबले की जमीन खालीवर होतेय असं वाटायचं. नेमकी तीच अवस्था. आपण कोलमडून पडणार की काय? भूकंप अनुभवण्यात मी वाकबगार झालोय असं वाटायचं, पण हा प्रकार काही वेगळाच. कसा तरी मी स्थिर झालो आणि हँडसेटवर एन.एच.के. टीव्ही लावला. रिश्टरवरचा 8.9 चा भूकंप संपूर्ण उत्तरपूर्व जपानभर. आजवरचा सर्वांत मोठा. सुनामीची पूर्वसूचना. उंच जागेवर जा. मी भेलकांडत पळू लागलो. टेकडीच्या दिशेने. विमानतळाचे टवके उडालेले होते. पुढच्या वसाहतीतील अनेक घरे वेगवेगळ्या ठिकाणी जखमी झाल्यासारखी होती. माणसांचा लोंढा हळूहळू मोठा होत होता. अशा विपन्नावस्थेतील धावण्यातही मला एक जपानी शिस्त दिसली आणि हसू आलं. जपानी माणूस मरतानासुद्धा व्यवस्थित कपडे घालून शिस्तबद्ध रीतीने ओठावर मर्यादित विनम्र हसू ठेवून ‘सुमीमासेन’ (माफ करा... मी निघतोय)म्हणत मरणार. भूकंप आणि सुनामीचा सायरन आणि त्यात मरणाचा विचार.

सहज मागे पाहिले आणि... डोळे बाहेर येतात की काय? मघाच्या शांत समुद्रात या इतक्या उंच लाटा कशा? शक्यच नाही. दहा मीटर की पंधरा? सत्य की स्वप्न? मृगजळ की सुनामी? मघाचा भूकंप आणि आता या लाटा. ही धावणारी जनता... मी धावतोय, अंगातल्या सगळ्या अवयवांना एकवटून... मधूनच मागे पाहतोय- समुद्राने आपली तटबंदी केव्हाच ओलांडली आहे. तो बुलेट एक्स्प्रेससारखा बुलंद वेगाने विमानतळात घुसतोय. या लाटांची लांबी-रुंदी, उंची... कशालाच परिमाण नाही. विमानतळातून वसाहतीत... आता जे हातात सापडेल त्याला धडकत त्याची रपेट सुरू आहे. बोटी, गाड्या, घरं, माणसं, अख्खा टर्मिनल... विमानंसुद्धा... हाहाकार... मी धावतोय... प्राण घेऊन... कल्पनेपलीकडचं काही घडतंय... असं काही घडणार नाही अशी खात्री नव्हती, पण असं घडेल याची अजिबात कल्पना केली नव्हती.

कुठल्याशा क्षणी त्या लाटांनी मला आपल्या ओंजळीत घेतलं. आपण सर्फिंग करत आहोत की काय?... पुढच्याच क्षणी मी कुठेतरी भिरकावला गेलो. सरपटत जाऊन मी कुठेतरी आपटलो. आजूबाजूला बांधकामाचं सामान, कंटेनर, घरं, खांब, तुळया, वॉशिंग मशीन. मी पुन्हा कुठेतरी फेकला गेलो. आता कुठं जातोय याची दिशा मी ठरवत नव्हतो. पाण्यातील सुप्त शक्ती मला पिंगपाँगसारखी नाचवत होती. मी हातातली वस्तू चाचपून पाहिली. इमारतीचा दरवाजा असावा. मी घट्ट पकडून ठेवलं. मी जमिनीवर होतो की समुद्रात... जिवंत की मृत?

दवाखान्यात डोळे उघडले तेव्हा आपण जिवंत आहोत याचे आश्चर्य वाटले. आजूबाजूला कुणीच ओरडत नव्हतं. आक्रंदत नव्हतं. पण वातावरणातल्या गांभीर्यात स्मशान शांततेपेक्षा काहीतरी फार फार भयानक मायावी शक्तीने सगळ्यांना पछाडलं असावं असा आभास होता.

0 0

सेंदाईच्या समुद्र काठावर उभा राहून तिथलं सौंदर्य मी आकंठ प्यालो आहे. त्यानंतरचं वर्णन भूकंप, सुनामी आणि त्यामुळे झालेल्या वाताहतीचं जे चित्र समोर आलं त्यावरून मी चितारलं आहे. पण प्रत्यक्षात जे घडलं आहे, घडत आहे आणि चार दिवस ओलांडून या क्षणापर्यंतही जे अघटित थांबलेलं नाही, त्याचं वर्णन अशक्य आहे. अजूनही भूकंपानंतरचे उत्तरधक्के बसताहेत, अणुभट्‌ट्यांमधून किरणोत्सर्गाची गळती सुरू झाली आहे आणि इतक्या महाप्रचंड शोकांतिकेनंतरही शोकांतिकेचं पूर्ण स्वरूप समोर यायला किती वेळ लागेल याचा अंदाजही कुणाला करता येत नाहीये.

जीवित व वित्तहानीचा अंदाज पाश्चिमात्त्य विमा कंपन्या करत असल्या तरी या क्षणी अचूक अंदाज शक्य नाही. ओत्सुची शहराच्या साडेसोळा हजार लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या पडझडीखाली दबून गेली आहे. गावातील एक सुपर मार्केट आणि मंदिर सोडल्यास एकही इमारत उभी नाही. मिनामी सानरिकु या शहरातील मृतांची संख्या एक हजाराच्या वर गेली आहे आणि दहा हजारांचा अजून ठाव नाही. याशिवाय सेंदाई मिनामीसोमा आणि नामिये या शहरांतून प्रचंड विनाशचित्रं पुढे आली आहेत. राजधानी तोक्योपासून फार दूर नसलेल्या उत्सुनोमिया शहरात सात हजार इमारतींना हानी पोहोचली आहे. उपरोल्लेखित प्रत्येक शहरातील जवळजवळ सगळंच उद्‌ध्वस्त झालं आहे. इस्पितळं, नगरपालिका, शाळा, कार्यालयं, विमानतळ, शिपयार्ड, एवढेच काय पोलीस ठाणीसुद्धा. माणसं घाबरून उंच इमारतींवर गेली, पण पाच पाच मजल्यांपर्यंत पोहोचलेल्या पाण्याने इमारतीच वाहत गेल्या. लोक छपरांवर बसून होते, पण वाहत चालले होते. गाड्यात बसलेले होते, पण वाहत चालले होते. काही समजण्यासारखं राहिलं नाही. घरांच्या इमारतींवर गाड्या जाऊन बसल्या. झाडांवर छोटी विमानं अडकली, चक्क बोटच एका उंच इमारतीच्या छपरावर स्थानापन्न झाली. रेल्वेच्या रेल्वे गायब झाल्या आणि काही डबे दऱ्यांमध्ये जाऊन पडले. ज्ञात इतिहासामध्ये नैसर्गिक आपत्तीचं असं चित्र पाहिलेलं मला तरी आठवत नाही.

1923 चा कान्तो भूकंप ज्यात टोक्यो शहर जळून खाक झाले आणि दीड लाख लोक मेले ती शोकांतिका आणि दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपानची कहाणी हृदयद्रावक आहेच. भूकंप, सुनामी आणि आण्विक संकटाने ग्रासलेल्या आजच्या जपानचे चित्र अधिक थेट येऊन भिडते. कदाचित आपण हे जवळून पाहतो आहोत म्हणूनही असेल. पण तसे नसावे, कारण या आपत्तीने फक्त जमीन हादरली आणि पाठोपाठ सुनामी आली, एवढेच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीचा समतोल बदलला आहे. जपान तेरा फूट बाजूला सरकला, किनारपट्टी बदलली आणि हे जे पृथ्वीच्या वजनाचे पुनर्वाटप झाले त्यामुळे दिवसाची लांबी एक दशलक्षांशपेक्षा कमी सेकंदाने घटली.

भूकंपप्रवण पॅसिफिक पट्टी दर वर्षी साडेतीन इंच उत्तर अमेरिकेच्या पट्टीखाली घुसते आहे. बहुतेक ठिकाणी या पट्‌ट्या जोडल्या गेलेल्या असल्या तरी या हालचालीमुळे उत्तर अमेरिकन पट्टीवर जोर पडतो. या भूकंपाचा परिणाम पृथ्वीच्या अक्षावरही झाला. साडेसहा इंचाने हा अक्ष झुकला. भूगर्भशास्त्र, भूगोल यांच्या दृष्टीनेही हा अनर्थ ऐतिहासिक म्हणावा लागेल. या भागातला तीनशे वर्षांतला हा सगळ्यांत मोठा भूकंप. जशी इंडोनेशियातील 2004 च्या 9.1 तीव्रतेच्या आणि कॅलिफोर्नियातील 1992 च्या 7.3 तीव्रतेच्या भूकंपाची भविष्यवाणी कुणीही वर्तवली नव्हती तसाच याही भूकंपाविषयी वैज्ञानिकांना थांगपत्ता नव्हता. भूकंप संशोधनाच्या क्षेत्रात काही मूलभूत गृहीतके चुकीची तर नाहीत?

या भूकंपाने झालेल्या आर्थिक नुकसानीचे चित्र उभारणे अवघड आहे. जवळजवळ दोन दशकांच्या मंदीनंतर अर्थव्यवस्था सुधारत असताना आलेल्या या संकटाने जपानची अर्थव्यवस्था तर कोसळलीच आहे, पण जपान जगातली तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती असल्याने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम होणार आहे. जपान भारताच्या व्यापारी, तांत्रिक, गुंतवणूक क्षेत्रांतील प्रमुख भागीदार आहे, तो आपल्याला कर्ज देणारा सगळ्यांत मोठा देश आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर, गुंतवणुकीवर व प्रकल्पांच्या प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जपानच्या अर्थव्यवस्थेला कित्येक लाख कोटी डॉलर्सचा फटका लागणार आहे. उत्तरपूर्व जपानची संपूर्ण पुनर्बांधणी करण्याचे आव्हान फार प्रचंड आहे. वीज, पाणी, रस्ते, घरे सर्वांची पुनर्आखणी करावी लागेल. माणसांची विस्कळीत जीवने पुन्हा सांधता आली पाहिजेत. अशा घटना फक्त जीवितहानीच आणीत नाहीत, त्यांच्यामुळे व्यापारउदीम बिघडतो. कंपन्या, कारखाने बंद पडतात, वाहतूक कंपन्या ठप्प होतात, पुरवठा साखळी विस्कळीत होते, वित्तीय संस्था व बाजार कोसळतात. अर्थात अशा वेळी आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याची संधी काही कंपन्यांना मिळते, पण विमा कंपन्या आणि पुनर्विमा कंपन्यांना फटका बसतो. अशा कंपन्या मुख्यत: युरोपात आहेत.

विशेषत: रिफायनरींमध्ये लागलेल्या आगीमुळे ऊर्जा क्षेत्रातील मागणीवर परिणाम होणार. जागतिक बाजारातील क्रूड तेलावर याचा परिणाम निश्चित असेल. काही वाहन कंपन्यांनी जपानमध्ये उत्पादन थांबवले आहे. अशा वेळी भारतातून होणाऱ्या सुट्या भागांच्या निर्यातीवरही हमखास परिणाम होणार, पुरवठासाखळ्या व वाहतूक विस्कळीत झाली. जपानमधील रेल्वे व विमानतळांवर नव्हे तर अमेरिकेच्या तटावरील बंदरांवरही लगेच प्रभाव पडला. आता तर हजारोंच्या संख्येने जपानमधील विदेशी नागरिकच नव्हे तर जपानी नागरिकही आण्विक उत्सर्गापासून वाचण्यासाठी देश सोडून जाताहेत. यातही अनेकांना आर्थिक धक्का बसणार आहे. अर्थात काही व्यक्ती व उद्योगांना अशा संकटातही फायदा होईल. संकटग्रस्तांना मदतीसाठी, विशेषज्ञ, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ यांची गरज भासेल. शिवाय तंबू, वैद्यकीय सामान, जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, त्यातील धोके गृहीत धरूनही. आण्विक ऊर्जा संघटना सुरक्षा नियम कडक तर करतीलच, पण काही असुरक्षित प्रकल्प बंद करण्याची सक्तीही करतील, कुणी सांगावे? काही असो, प्रत्येक देशाला भविष्यात आण्विक ऊर्जाप्रकल्प सुरू करताना या संकटातून धडे घेतल्याशिवाय पर्याय नाही, पण जे लोक इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना इतिहासाची पुनरावृत्ती शिकवते.

या भयनाट्याचा अन्वयार्थ काय? या घटनेपासून जपानला कोणते धडे शिकावे लागतील? भारताने व जगाने या घटनेपासून काय बोध घ्यावा? जगाच्या व मानवी संस्कृतीच्या सद्य:स्थितीतील कल्पनांवर व जीवनपद्धतीवर याचा काही परिणाम होईल का? नैसर्गिक आपत्ती आणि त्यासाठी लागणारी देशांची, समाजांची व व्यक्तींची तयारी या संदर्भात या आपत्तीतून काय धडे घेता येतील? संपूर्ण मानवजातीच्या भविष्याच्या संदर्भात ही घटना काही सूचित करते काय?

हे सगळे प्रश्न जटिल असले आणि त्यांची उत्तरे त्याहून जटिल असली तरी विचार करणे आता माणूस टाळू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत कॅट्रिना वादळाने घातलेला गोंधळ पूर्ण नैसर्गिक होता असे मानले तरी वारंवार येणाऱ्या या आपत्तींचा मानवी जीवनाशी, विशेषत: त्यामुळे झालेल्या तापमानबदलातून होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींशी शास्त्रीय संबंध आपण जोडू शकलेलो नाही. आपल्याकडे लातूरचा भूकंप झाला ती संपूर्ण नैसर्गिक घटना होती, पण प्रचंड जीवित हानी होण्याचे मुख्य कारण घरांची रचना, नशिबावर भिस्त आणि त्यामुळे अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीचा अभाव, घटना घडल्यानंतर काय काळजी घ्यावी याबद्दलच्या जाणिवांचा पूर्ण अभाव आहे असे मानायला जागा आहे. शिवाय जनतेचे अज्ञान, निरक्षरता, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याविषयीची उदासीनता आणि अंधश्रद्धा या गोष्टीही जीवित व वित्तहानीला कारणीभूत आहेत यात शंका नाही.

1986 साली युक्रेनच्या चेर्नोबिल आण्विक प्रकल्पातील अपघाताला संपूर्णपणे माणूस जबाबदार होता. आजही किरणोत्सर्गामुळे माणसेच नव्हे तर तेथील पिके, जमीन आणि नद्यासुद्धा त्या संकटातून बाहेर पडलेल्या नाहीत. 1984 मधील भोपाळचा अपघात हाही माणसाने स्वत:वर लादलेल्या संहाराचा एक अत्यंत ‘निकृष्ट’ नमुना होता. तेथील जनता एखाद्या दु:स्वप्नासारख्या त्या स्मृती घेऊन पिढ्यान्‌पिढ्या जगणार आहे. मागील वर्षी हैतीत झालेल्या भूकंपात सगळी राजधानी नष्ट झाली. त्यानंतरच्या लुटालुटीत उरलेसुरले संपले. आजही पोर्ट ऑफ प्रिन्स हे शहर नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांचे प्रतीक म्हणून पाहता  येईल. संकटांचे स्वरूप पूर्णत: नैसर्गिक किंवा पूर्णत: मानवनिर्मित असू शकते, पण त्या संकटाचा सामना कसा केला जातो यात मात्र त्या त्या देशातील संस्कृती, व्यवस्थापन, प्रशासन, विचारपद्धती, कार्यपद्धती, वैयक्तिक- सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील सचोटी या सर्वांचे हुबेहूब प्रतिबिंब पडते. कॅट्रिनाच्या आपत्तीनंतर त्या शहरात प्रचंड लुटालूटही झाली. लातूरच्या भूकंपानंतर काही दिवसांतच विदेशातून आलेल्या मदतसाहित्याचे ट्रक परस्पर पळवून तंबू, बॅटरी, पॅकबंद खाद्यपदार्थ इतरत्र विकण्याचे प्रकार ऐकिवात आले. भोपाळच्या नुकसान भरपाईतील पैशांचा अपहार करून मध्य प्रदेशातील भारतीय प्रशासनातील दांपत्याने अडीचशे कोटींपेक्षा अधिक धनसंचय केला. मानवनिर्मित संकटांना आपल्यातीलच काही माणसे किती तीव्र बनवतात याची अनेक उदाहरणे देता येतील.

गुजरातच्या 2001 च्या भूकंपात अंजरजवळ कोसळलेल्या घराच्या ढिगावर बसून एक माणूस आपली स्टीलची तिजोरी तोडून त्यातील दागिने काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने बुलडोजर येऊन सगळे घरच साफ होईल या चिंतेत त्या ढिगाखाली असलेल्या त्याच्या 16 वर्षाच्या मुलाकडेही लक्ष द्यायला किंवा त्याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे असा विचार करायला त्याच्यापाशी वेळ नव्हता. संकटे माणसाच्या खऱ्या अंतरंगावर स्वच्छपणे प्रकाश पाडतात; समारंभ, सोहळे किंवा उत्सव नव्हेत. जपानमधील महासंहारात आपणा सर्वांसाठी अनेक धक्के लपले आहेत. जपानचा इतिहास संकटांनी खचाखच भरलेला आहे. जो देश पायाखाली भूकंपप्रवण जमीन आणि डोंगरमाथ्यावर ज्वालामुखी घेऊन जगतो, ज्या देशाची तीन चतुर्थांश जमीन खडकाळ, डोंगराळ आहे आणि ज्या देशाकडे म्हणावी अशी कोणतीच नैसर्गिक साधनसंपत्ती नाही तो देश जगातल्या सगळ्याच गरीब राष्ट्रांमध्येही खालच्या पायऱ्यांवर असायला हवा. पण हा छोटा देश, मागच्या वर्षी चीनने ओव्हरटेक करेपर्यंत, जगातली दुसरी आर्थिक महासत्ता होता. आता जपानचा तिसरा क्रमांक आहे. ही जादू रक्त आणि घाम यांच्या जोरावरच होते. जपानचे नशीब जपानी लोकांच्या हातात आहे.

जपानमध्ये 1923 च्या भूकंपात राजधानी संपूर्ण नष्ट झाली, पण काही वर्षांतच त्या देशाने दुसऱ्या महायुद्धात युरोप, रशिया व अमेरिकेलाच आव्हान दिले आणि सामुराईसारखा शेवटपर्यंत झुंजत राहिला. जपानचा शेवटचा नागरिक जिवंत असेपर्यंत झुंज चालली असती, पण जगाच्या इतिहासातील पहिले दोन अणुबाँब हिरोशिमा आणि नागासाकीवर पडले आणि देवाचा अवतार समजल्या जाणाऱ्या जपानच्या सम्राटाचा आवाज मानवनिर्मित यंत्रातून (रेडिओद्वारे) पहिल्यांदाच प्रत्येक जपानी माणसाच्या कानावर पडला : ‘जपानने शरणागती पत्करली’. त्यावेळेस भारताचा स्वातंत्र्याचा लढा शेवटच्या पर्वात होता. स्वतंत्र होताच भारताने जपानला सर्व प्रकारची मदत केली. त्यातला स्वस्त दरातील लोहाचा पुरवठा जपानच्या स्टील व पर्यायाने औद्योगिक क्रांतीचा कणा ठरला. केवळ दहाएक वर्षांत म्हणजे 1958 पासून जपानने कर्ज घ्यायच्याऐवजी कर्ज द्यायला सुरुवात केली.

भारताला जपानचे पहिले ‘कर्ज’ घेण्याचा मान मिळाला. त्यानंतरच्या चारपाच दशकांतील आपली व जपानच्या प्रगतीची तुलना फार उपयुक्त ठरेल. डॉलरच्या तुलनेत आपला चारवर असलेला रुपया पंचेचाळीस-पन्नासवर घसरला तर त्याच डॉलरच्या तुलनेत पाचशेच्या आसपास गेलेला येन 90-100 या श्रेणीपर्यंत येऊन, त्यापेक्षा अधिक चढू नये म्हणून जपान्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तो तिथे स्थर झाला. दरम्यान आपल्या कच्च्या लोहापासून जपान्यांनी तयार केलेले स्टील आणि स्टील वापरून केलेली उत्पादने आपण आयात करू लागलो. इलेक्ट्रॉनिक्सपासून औद्योगिक यंत्रांपर्यंत आणि रोबोटिक्सपासून पर्यावरणातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या क्षेत्रांत जपानची आघाडी आहे. याचे श्रेय कदाचित, नैसर्गिक साधनांपासून पूर्णपणे वंचित अशा जपानला कल्पनातीत अशा आपदांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी शिस्त, सहनशीलता, कमालीचे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आशावाद या मानवी गुणांना परिपूर्ण करण्याशिवाय पर्याय नव्हता, याच गोष्टीला जाते.

आपला प्रकार नेमका याच्या विरुद्ध आहे. सुजलाम्‌ सुफलाम्‌ भूमी, अमर्याद नैसर्गिक संपत्ती, विविध प्रकारचे हवामान, फळाफुलांचे वैविध्य दीर्घ व संपन्न वैचारिक वारसा असलेल्या आपल्या देशात आपण नैसर्गिक आपदांना सामोरे जाण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि मानवी जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, जगणे सुसह्य व्हावे यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. आपले राष्ट्रीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनही त्यामुळे आपोआप गुणवत्ताहीन होऊन जाते.

गेल्या काही दिवसांत जपानवर कोसळलेल्या महाआपत्तीत या देशातील नागरिकांनी आपल्या वागणुकीने काही विलक्षण गोष्टी जगाला दाखवून दिल्या आहेत. 11 मार्चपासून आजपर्यंत लुटालुटीचे एकही प्रकरण निदर्शनास आले नाही. प्रचंड मोठ्या भूप्रदेशात नुकसान झाले असूनही, आक्रंदन करणारी, ओरडणारी किंवा कोणत्याही करुणा किंवा दयेची मागणी करणारी एकही प्रतिमा समोर आलेली नाही. अन्न, पाणी, औषधे व वीज इत्यादी आवश्यक गोष्टींचा प्रचंड तुटवडा असूनही कुठेही रडारड, भांडाभांडी, रेटारेटी हा प्रकार नाही. लोक रांगेत आठ आठ तास उभे असतात, पण आरडाओरड नाही आणि पों पों हॉर्नबाजी नाही. अशा आपदांच्या वेळी आपल्याकडे टीव्हीच्या स्क्रीनवर येण्यासाठी अतिविशिष्ट लोकांची झुंबड उडते. वस्तूंचे वाटप, मदतकार्याचे श्रेय हेलिकॉप्टरची धूळ आणि पत्रकार परिषदा यातून उठणारी वावटळ दिसते. अशा संकटाच्या वेळेस नेतेमंडळी येऊन फक्त संकटाचे गांभीर्यच कमी करत नाहीत तर अनेकदा ते मनुष्याच्या पातळीवरूनच घसरतात. जपानमध्ये यांतील एकही गोष्ट नाही. अमर्याद आणि बेजबाबदार विधानेही केली जात नाहीत. सर्व काम मुख्य कॅबिनेट सचिव करतात. छोटी विधाने, माहितीपूर्ण. बाकी सगळ्या गोष्टी कामातून दिसताहेत. प्रसंगाचे गांभीर्य समजावे म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच सम्राटांनी जनतेला आवाहन केले ते या वेळेस रेडिओऐवजी टीव्हीमधून. त्यांचा संदेश? ‘प्रसंग बाका आहे, आशा सोडू नका. संकटावर मात करा.’

असे काय आहे ते जपानी लोकांना इतके वेगळे बनवते? थोडे त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहू या. हैती, कॅट्रिना, चिली आणि (भारतासह) इतरत्र नैसर्गिक संकटांनंतर लुटालुटीचे प्रसंग दिसले. जपानमध्ये मात्र सुपर मार्केटस्‌नी किंमती कमी केल्या आणि स्वयंचलित यंत्रांच्या मालकांनी पेये मोफत वाटली. कारण जपानमध्ये ‘संकटाचा सामूहिक सामना’ ही कल्पना आहे. इतरत्र अशा संकटात नीतिमत्ता फेकून दिली तरी चालते असा काहींचा समज होतो. इथे मात्र इतरांना दोषी धरून चुका करतानाही कोणी दिसत नाही, कारण प्रत्येकजण ‘मी काय करू शकतो?’ या विचारात तन मन धन केंद्रित करतो आहे. जपानी माणूस मिळून मिसळून राहणे आणि एकमताने काम करणे याला प्राधान्य देतो. संकटांचा वापर टीआरपी वाढवण्यासाठी करत नाही. याशिवाय जपानी जीवन ‘आदर आणि सन्मान’ यांना महत्त्व देते. चोरीचे समर्थन करण्याचे तत्त्वज्ञान त्याला माहीत नाही, त्यांची आचारसंहिता निर्वाचन आयोग बनवत नाही, त्यांची संस्कृती ठरवते. शिवाय नैसर्गिक साधनांच्या अभावाने जपानी माणूस स्वभावत: काटकसरी, साधा आहे. तो आहे त्या परिस्थितीत जुळवून घेतो.

जपानी आणि इतर देशांमधील देशप्रेमात काय फरक आहे? जपानी लोक देशावर प्रेम करतात आणि देशासाठी चांगले आहे ते करतात, इतरत्र लोक देशावर प्रेम करतात, पण जे स्वत:ला चांगले वाटेल तेच करतात. जपान काही गुन्हेगारीमुक्त समाज नाही, पण तिथे शिक्षणाने फार चांगली भूमिका पार पाडलेली आहे. या शिक्षणात सामूहिकता, सर्वांबद्दल आदर, जीवनावर श्रद्धा या गोष्टींवर भर आहे. कसे वागावे हे जपानमध्ये फार चांगल्या पद्धतीने जनतेच्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळेच अरिष्ट कोसळताच काही तासांत अत्यंत व्यवस्थितपणे मदतकार्याला सुरुवात झालेली दिसली. आपल्या जीवनाशी खेळ खेळत पन्नासभर जपानी लोक फुकुशिमातील अणुभट्‌ट्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताहेत. याचे कारण त्याग आणि नम्रता या गुणांवर जपानी संस्कृतीत प्रचंड जोर दिला गेला आहे.

अर्थातच आपल्या दीर्घ इतिहासात जपानने धर्म, भाषा व वांशिकता इतकेच नव्हे तर शिक्षण, वर्तणूक, व्यवहार, व्यापार यांच्यात एकसंधता निर्माण केली आहे. प्रशिक्षणावर जपानइतका भर क्वचितच एखादा देश देत असेल. भूकंपाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्राथमिक शाळेपासून कार्यालये, हॉटेले, इस्पितळे यांना वेळोवेळी सराव करावा लागतो. गल्लोगल्ली जाऊन याबाबत प्रात्यक्षिके दाखवली जातात व प्रत्येकाने आणीबाणीत कसे वागावे याची कल्पना दिली जाते. घरात हेल्मेट, बॅटरी, आवश्यक खाद्यपदार्थ व पेये इत्यादींची सतत तयारी ठेवावी लागते. यामुळेच लाखोंच्याऐवजी जीवितहानी हजारोंत किंवा शेकड्यांतच होते. वर्षभरात शेकडो जाणवणारे व हजारो न जाणवणारे भूंकप होतात, पण याबाबतचे भय आणि त्याचे अवास्तव स्तोम मला माझ्या तेथील वास्तव्यात कधीच दिसले नाही.

जपानी लोकांमध्ये ‘समानता’ दिसते आणि त्यामुळेच सामाजिक तणाव नाही. दंगेधोपे नाहीत. कॅट्रिना वादळाच्या वेळी मागे सोडले गेलेले लोक मुख्यत: गरीब होते. मागे राहिलेल्यांना लुटालूट  करण्यातही ‘सामाजिक न्याय’च प्रदान करत आहोत असे वाटले असणार, पण जपानमध्ये कंपन्यांचे सीईओसुद्धा फार मोठ्या रकमांचे पगार घेत नाहीत, त्यांच्या आणि इतरांच्या पगारांतील फरक माफक असतो. आपल्याकडे आणि अमेरिकेत मात्र अंबानी आणि मित्तलांकडे आपण कौतुकाने पाहतो, पण संधी मिळाली तर झोपडपट्टीतील लोकच काय मध्यम आणि उच्च मध्यम वर्गातील लोकही काय करतात हे गुजरातमधील दंगलीतही दिसून आले. लोक एकमेकांना मारतात, जाळतात आणि दिसेल ते लुटतात. पण विवेक जपण्याच्या बाबतीत जपान्यांनी संपूर्ण जगावर मात केली आहे. याशिवाय जपानी लोक निसर्गाचा आदर करतात. पर्यावरणाला जपतात. ही श्रद्धा त्यांना जीवन जगायला बळ देते. याला काही अंशी बौद्ध धर्मही जबाबदार आहे. शांती आणि अहिंसा जपानमध्ये पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. थोडक्यात जपानी लोकांच्या दृष्टीने प्रवास हा ध्येयप्राप्तीइतकाच महत्त्वाचा असतो.

या सगळ्यांतून माणसाने काय घ्यावे?

सर्वप्रथम जगभरच्या विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी आणि राजकीय नेत्यांनी आण्विक शक्तीच्या आवश्यकतेचा तातडीने विचार करणे आवश्यक आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड आणि लिथुवानिया यांनी आपल्या जुन्या अणुभट्‌ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अणुशक्ती कितीही मोहक वाटत असली तरी तिचे दुष्परिणाम मानवजातीचा सर्वनाश करू शकतात. अक्षय ऊर्जा हीच खरी ऊर्जा, सूर्याच्या रूपाने, पाण्याच्या रूपाने, वाऱ्याच्या रूपाने ती सर्वत्र सतत व फुकट निसर्गाने दिली आहे.

दुसरी गोष्ट, नैसर्गिक संकटे येणारच. याहून अधिक भयावह संकटे येणार नाहीत याचीही खात्री देता येणार नाही. म्हणून माणसाने या बाबतीत अधिक सजग असणे महत्त्वाचे. पृथ्वीची उत्क्रांती अजून सुरूच आहे. बिग बँग आणि ब्लॅकहोल या दोहोंमधील हा सतत उत्क्रांतीचा टप्पा. यात भूकंप, ज्वालामुखी, वादळे, चक्रवात, वणवे सगळे येणारच. त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षण व तयारी हा ‘जन्म-मृत्यूचा’ प्रश्न आहे. तो उद्यावर ढकलून चालणार नाही. प्रत्येक गावाला ‘आणीबाणीचे नियोजन’ असले पाहिजे.

तिसरी बाब, पर्यावरणाबाबत अधिक जागरूकता न दाखवणे म्हणजे आपली सार्वजनिक आत्महत्या आहे. जैविक विविधता, वनस्पती आणि प्राणिमात्रांची विविधता, जंगल, पाणी, डोंगर, भूगर्भ यांचे पावित्र्य जपण्याची शपथ घेणे आणि त्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. मानवनिर्मित तापमान बदल, जंगलतोड, प्रदूषणे यांच्यातून निर्माण होणाऱ्या संकटांतून वाचण्याचा हाच एक मार्ग आहे.

चौथी गोष्ट, आर्थिक विकासाच्या नवीन आदर्शाची आवश्यकता. निसर्गाचे अमर्याद शोषण आणि भौतिकाचा बेलगाम मोह यांच्यामुळे उद्योजकतेपासून भांडवलशाहीपर्यंत, तंत्रज्ञानापासून धर्मकारणापर्यंत सगळेच पोखरून निघाले आहे. सगळ्या जगाची ‘गरज’ भागवेल इतकी नैसर्गिक संपत्ती आहे, पण एका व्यक्तीची ‘हाव’ पूर्ण करण्यासाठी मात्र ती अपुरी आहे, असे गांधी म्हणत. माणसाची उद्योजकता अधिक आशयघन, निर्मितिक्षम आणि समतोल करता येणार नाही का, हा प्रश्न वारंवार मला सतावतो. तसे करता आले नाही तर सर्वनाश मला तरी अटळ दिसतो.

पाचवा महत्त्वाचा मुद्दा, माणूस, मानवता आणि आपली पृथ्वी (खरे तर विश्व) यांना जोडणारा धागा आहे आणि आपण सगळे आपल्या या लाडक्या व विलक्षण सुंदर पृथ्वीची बाळे आहोत ही जाणीव पसरणे. संकटात आणि आनंदात आपण एक आहोत ही भावना जागवणे. जपानमधला किरणोत्सर्ग कॅलिफोर्नियाला केव्हाच पोहोचलाय, तिथल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम दृश्य आणि अदृश्य रीतीने संपूर्ण मानवजातीवर होत आहे. तसेच लिबियात गडाफी काय करतो आहे याचाही परिणाम प्रत्येकावर होतोय. (18000 भारतीयांना लीबियातून परत आणावे लागेल) हे टाळायचे असेल तर भाषा, प्रांत, धर्म, देश व वांशिकतेचे वांझोटे मुखवटे काढून आता या जगाशी नाते सांगणे आवश्यक आहे.

सहावा व सगळ्यांत महत्त्वाचा धडा, माणसाच्या उज्ज्वल भविष्यावरचा विश्वास ढळू न देणे. भले 2012 च्या जगबुडीविषयीच्या अफवा असोत वा प्रलय, नरसंहार, सर्वनाशाच्या कथा असोत, या जगावरची श्रद्धा ढळू न देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ एवढ्यासाठी मूल्यं, शिक्षण, शिस्त, शास्त्रीय व नैतिक बैठक व चारित्र्य संवर्धन यांची आवश्यकता आहे. परवाच्या ‘टाइम’मध्ये 2045 साली माणूस आणि यंत्र यांतील द्वैत संपून एक नवीन व अधिक श्रेष्ठ ‘मानवयंत्र’ किंवा ‘सिंग्युलॅरिटी’ पैदा होणार आणि तो मनुष्यजातीचा शेवट ठरणार अशा अर्थाचा खूप महत्त्वाचा लेख आलेला आहे. आज जैवशास्त्र, जैवअभियांत्रिकी, क्लोनिंग, इंद्रिय आरोपण, रोबोटिक्स, मेंदूचा व मानसशास्त्राचा अभ्यास व संगणक शास्त्रातील मती कुंठित करणारी प्रगती एका नवीन माणसाला जन्म देते आहे. तो सकारात्मक, आनंदी व जगभर सुसंवाद निर्माण करणारा हवा असेल तर त्यासाठी सदसद्‌विवेक जागा ठेवावा लागेल. माणसाचे उज्ज्वल भविष्य या एकमेव गोष्टीवर अवलंबून आहे.

जपानवर माझे खास प्रेम आहे. जसे पहिले प्रेम- तसा विदेश सेवेतला जपान माझा पहिला देश. तिथले वास्तव्य हेही एक प्रेमप्रकरणच आयुष्यातले. जिथे खूप शिकायला मिळते, माणसामाणसांमध्ये एक तृप्त शांतता आणि सुसंवाद असतो आणि काळ सुखासमाधानात जातो ते प्रेमप्रकरणच. तिथे मी सात वर्षे काढली. भाषा शिकलो, माणसे जोडली, कामे केली. प्रवास केला. तिथला झालो. त्या देशावर गेल्या काही दिवसांत कोसळलेली आकाशाची कुऱ्हाड मी स्वत:च अनुभवली. काळीज तुटणे काय असते ते मला सतत जाणवते आहे. माझ्या सगळ्याच मित्रांच्या सुरक्षेची खबर मिळालेली नाही, पण मेलेला प्रत्येकजण माझ्याच भावकीतला होता हेही मला माहीत आहे.

पण म्हणून मी निराश नाही. या क्षणी, या प्रचंड आव्हानाच्या वेळी नवनिर्मितीचे आणि नव्या आकांक्षांचे कोंभ तिथे फुटत असतील, एका बाजूला आलेल्या संकटाला तोंड देणे आणि दुसरीकडे उद्यासाठीची नव्याने तयारी करणे हा जपानी स्वभाव आहे, धर्म आहे. आणि ते त्यांचे मूल्यही आहे. अंधारात ते सतत उजेडाची स्वप्ने बघत असतात. जपानी शाळेत मी एक कविता शिकलो होतो. ‘इमा दोको का दे असा गा हाजिमात्ते इरू’- ‘या क्षणी कुठे ना कुठे पहाट होतच आहे’ पहाट होणार, सूर्य उगवणार एवढेच नव्हे तर तो पुन्हा जगावर चमकणार अशी माझी श्रद्धा आहे.

Tags: भारतीय विदेश सेवा पर्यावरण भूकंप जपान ज्ञानेश्वर मुळे indian forigen services IFS earth quake japan dnyaneshwar mule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके