डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

इथे येणारे काही प्रवासी बौध्दस्थळांना भेट देऊन परत गेले. काही मात्र बुध्दाचा खरा मार्ग आणि त्याचा ज्ञानवंश  यांच्याबाबत अधिक आकलनाच्या अपेक्षेपोटी भारतीय पंडितांसह प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी व भाषा  शिकण्यासाठी आलेले होते. इथून परत जाताना ते बौध्द तत्त्वज्ञानाशी संबंधीत पुस्तके,  अवशेष व कलाकृती सोबत घेऊन गेले.  त्यामुळे आपली आणि त्यांची भूमी यांच्या संबंधांतील जवळीक वाढण्यास मदतच झाली. भारत आणि श्रीलंका येथे त्यांनी  जे पाहिले व ज्याचा अभ्यास केला त्याआधारे त्यांनी जपानी बौध्दांच्या धार्मिक पध्दती व स्थापत्यशैलीला नवा आयाम दिला.  जॅफी यांच्या प्रतिपादनानुसार, 19 व्या शतकात जपान आणि भारत यांच्यादरम्यानचा प्रवास दोन नव्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांमुळे शक्य झाले- वाफेच्या इंजिनाचे जहाज आणि रेल्वे. सुरुवातीला जपान आणि दक्षिण आशिया यांच्यादरम्यान असलेले आदान-प्रदान कालांतराने संपूर्ण आशियांतर्गत झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारत-जपान यांच्यादरम्यान  (विशेषत: कापूस उत्पादनांचा) व्यापार भरभराटीला आला, तोपर्यंत एकमेकांपासून अविभक्त असणाऱ्या दोन महान  आणि प्राचीन संस्कृतींमधील संवाद अधिक दृढ होत गेला. ‘पॅन एशियनिझम’ या संकल्पनेनुसार विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी आशियावरील युरोपचे प्रभुत्व संपुष्टात आणण्याच्या  ध्येयाने खंडांतर्गत ऐक्याचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला,  त्यामुळेही ही सांस्कृतिक देवाण-घेवाणाची प्रक्रिया सुलभ  झाली.

ख्रिसमसच्या दिवशी लिहिलेला हा लेख वाचकांच्या हातात पडलेला असेल तेव्हा नवे वर्ष सुरू झालेले असेल. त्यामुळे  मी असे ठरवले आहे की,  किमान या आठवड्यात तरी एखाद्या ज्वलंत विषयावर लेख नको, तर तसा हा आहे.  

परदेशातील स्मारकांना किंवा स्मृतिस्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करणाऱ्या जपानी पर्यटकांची एक ठाशीव व साचेबध्द  प्रतिमा जगभर आहे. एका संकेतस्थळावर तर असे म्हटले आहे, ‘जगभरात ‘जिथे तिथे आढळणारे’  अशी जपानी पर्यटकांची  प्रतिमा तयार झाली आहे. सामान्यतः हा किंवा ही पर्यटक एखाद्या सहलगटाचा भाग असतात;  जिथे एखादा लहानसा झेंडा फडकवत त्यांचा वाटाड्या दिवसभराच्या नियोजनानुसार जलद गतीने गटाचे संचलन करत असतो. आणि कॅमेरा,  व्हिडिओ रेकॉर्डर,  कदाचित एखाद्या पक्ष्याचा आवाज टिपण्यासाठी टेपरेकॉर्डरसुध्दा, एवढे ओझे हे पर्यटक स्वतःसोबत वागवत असतात. अशा गटांतील व्यक्तींचे कपडेही (काही किरकोळ वेगळेपणासह) साधारणत: एकसारखेच दिसतात. या सहलगटांचे  भटकंतीचे नियोजनही समान असते; आणि गटांतील सदस्यांप्रमाणेच, एकसारखीच दिसणारी प्रवासी वाहनेही एकमेकांच्या  मागोमाग जातात.’  
    
एकविसाव्या शतकात दोन देशांदरम्यान प्रवास करणे पूर्वीच्या काळाच्या तुलनेत बरेचसे सोपे झाले आहे. देशविदेशात  तात्काळ ये-जा करता येते. पहाव्याशा वाटणाऱ्या ठिकाणी अगदी कमी वेळात धावती भेट देता येते. त्यामुळे ताजमहाल, अजिंठा व वेरूळ, व्हिक्टोरिया मेमोरियल, हुमायून कबर आणि अशा शेकडो ठिकाणी जपानी पर्यटकांचे वर्ग जत्थे करताना  दिसतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारताला भेट देणाऱ्या जपानी  प्रवाशांचे प्रवासवर्णन वाचताना मला हे उलगडले की,  त्या काळची गोष्टच फार वेगळी होती. त्यातील नोंद घेण्यालायक गोष्ट  अशी की, ते सर्व प्रवासी यात्रेकरू आणि साधक होते; आताच्याप्रमाणे सुख-साधक नव्हते. ‘सिकिंग साक्यमुनी : साऊथ  एशिया इन द फॉर्मेशन ऑफ मॉडर्न जॅपनीज बुध्दीझम’ या रिचर्ड जॅफी यांच्या ताज्या पुस्तकामध्ये त्या यात्रेकरूच्या व साधकांच्या कथा पुन्हा उजागर केल्या गेल्या आहेत.
      
नान्जो बुन्‌ (Nanjo Bun'yu - 1849 -1927)  हा भारताला भेट देणाऱ्या अगदी सुरुवातीच्या जपानी प्रवाशांपैकी एक  होता. ऑक्सफर्डमध्ये मॅक्सम्युलरसह त्याने संस्कृतचे अध्ययन केले होते आणि त्यातून बुच्या भूमीविषयी जाणून घेण्याची  त्याची जिज्ञासा जागृत झाली होती. 1887 मध्ये तो भारतात आला. त्यानंतर भारतातील वा श्रीलंकेतील किंवा दोन्ही  ठिकाणच्या बौध्द तीर्थस्थळांना भेट देणाऱ्या जपानी विव्दानांचा ओघ सुरू झाला. जॅफी लिहितात त्यानुसार,  दक्षिण  आशियाच्या मध्यभागांतून येणाऱ्या प्राचीन बौध्द प्रवाशांचे हे साहसी प्रवास म्हणजे काही जपान ते युरोप प्रवासांदरम्यान  जाण्या-येण्याला सोयीस्कर केंद्रे निवडून,  संधी मिळताच हाती घेतलेल्या उथळ सहली नव्हत्या. जपानी लोक दक्षिण  आशियातील या संकटमय बौध्द तीर्थयात्रांचा धसका बाळगून असत (आणि या प्रवासादरम्यान कित्येक जपानी बौध्द मृत्यूही  पावत असत),  यांवरून 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जपानी बौध्द प्रवाशांसाठी दक्षिण  आशिया किती महत्त्वाचे स्थान बजावत होता हे अधोरेखित होते. 
       
इथे येणारे काही प्रवासी बौध्दस्थळांना भेट देऊन परत गेले. काही मात्र बुध्दाचा खरा मार्ग आणि त्याचा ज्ञानवंश  यांच्याबाबत अधिक आकलनाच्या अपेक्षेपोटी भारतीय पंडितांसह प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी व भाषा  शिकण्यासाठी आलेले होते. इथून परत जाताना ते बौध्द तत्त्वज्ञानाशी संबंधीत पुस्तके,  अवशेष व कलाकृती सोबत घेऊन गेले.  त्यामुळे आपली आणि त्यांची भूमी यांच्या संबंधांतील जवळीक वाढण्यास मदतच झाली. भारत आणि श्रीलंका येथे त्यांनी  जे पाहिले व ज्याचा अभ्यास केला त्याआधारे त्यांनी जपानी बौध्दांच्या धार्मिक पध्दती व स्थापत्यशैलीला नवा आयाम दिला. जॅफी यांच्या प्रतिपादनानुसार, 19 व्या शतकात जपान आणि भारत यांच्यादरम्यानचा प्रवास दोन नव्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांमुळे शक्य झाले- वाफेच्या इंजिनाचे जहाज आणि रेल्वे. सुरुवातीला जपान आणि दक्षिण आशिया यांच्यादरम्यान असलेले आदान-प्रदान कालांतराने संपूर्ण आशियांतर्गत झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारत-जपान यांच्यादरम्यान (विशेषत: कापूस उत्पादनांचा) व्यापार भरभराटीला आला, तोपर्यंत एकमेकांपासून अविभक्त असणाऱ्या दोन महान  आणि प्राचीन संस्कृतींमधील संवाद अधिक दृढ होत गेला. ‘पॅन एशियनिझम’ या संकल्पनेनुसार विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी आशियावरील युरोपचे प्रभुत्व संपुष्टात आणण्याच्या  ध्येयाने खंडांतर्गत ऐक्याचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला,  त्यामुळेही ही सांस्कृतिक देवाण-घेवाणाची प्रक्रिया सुलभ  झाली.
       
हा पॅन एशियनिझम दोन प्रकारचा होता. पहिल्या प्रकारामध्ये सर्व आशियायींमधल्या आध्यात्मिक तत्त्वांच्या  महत्त्वावर भर होता,  त्याव्दारे त्यांना भौतिकतावादी युरोपीय आणि अमेरिकनांच्या विरोधी भूमिकेत उभे केले गेले. आणि  दुसऱ्या राजकारणभारित प्रकारानुसार,  युरोपीय व अमेरिकन वसाहतवादी शक्तींविरोधातील संघर्षामध्ये जपानकडे आशियायी  देशांच्या संघटनाचे (अपरिहार्य व रास्त) नेतृत्व म्हणून पाहिले गेले. या दुसऱ्या प्रकाराबद्दल जॅफी लिहितात, ‘यशस्वी  आधुनिकीकरण,  लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक सुधारणा यांच्यामुळे युरोप व अमेरिका यांच्याविरुध्दच्या संघर्षात जपान  हा इतर आशियायी देशांचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा एकमेव देश होता.’  कावागुची एकाई (Kawaguchi Ekai - 1866-1945)  ही ‘सीकिंग सांक्यमुनी’ या पुस्तकातील मध्यवर्ती व्यक्ती आहे.  या जपानी विव्दानाने जवळपास दोन दशके भारत आणि तिबेट येथे व्यतीत केली. त्यांपैकी पूर्ण सात वर्षे तो बनारसला राहिला. हिंदूंच्या या पवित्र शहरात त्याच्या गुरुजनांशी असणाऱ्या दैनंदिन व्यवहाराचे वर्णन जाफी यांनी असे केले आहे- ‘साडेपाच  वाजता झाझेन (झेनपंथीयांचा ध्यानप्रकार) आणि स्नानाने कावागुचीच्या दिवसाची सुरुवात होत असे. साडेनऊ वाजेपर्यंत तो  धम्मसंगिनीचे इंग्रजी भाषांतर वाचत असे. त्यानंतर दोन तास संस्कृत वाचन आणि व्याकरणाचा अभ्यास चाले. मग तीस  मिनिटांत भोजन उरकून काही काळ विश्रांती घेऊन तो दुपारी दोन ते पाच तोंडी संस्कृत भाषांतराचा सराव करीत असे. आणि  पुढे साडेसहा वाजेपर्यंत संस्कृत व्याकरणाची उजळणी करत असे. 
     
संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असा तासभर तो विद्यार्जनासाठी जाई. पुन्हा रात्री दहा वाजेपर्यंत तोंडी भाषांतराचा सराव व पुढे तासभर उजळणी!’  असे हे जपानी ‘प्रवासी’  आपल्याला आज दिसणाऱ्या जपानी पर्यटकांहून पूर्णपणे वेगळे होते.  आधुनिक भारताच्या राजकीय कल्पनाविश्वात जपान ही सुभाषचंद्र बोस आणि त्यांची इंडियन नॅशनल आर्मी यांना आश्रय  देणारी भूमी आहे. तर आधुनिक भारताच्या तंत्रज्ञानाच्या कल्पनाविेश्वात जपान ही अहमदाबाद व मुंबई या दोन औद्योगिक  केंद्रांना अत्यल्प वेळात आणि कार्यक्षमपणे जोडणारी भूमी आहे. ‘सीकिंग साक्यमुनी’ हे पुस्तक आपल्याला आय. एन. ए. आणि बुलेट ट्रेनपूर्वीच्या अशा काळात घेऊन जाते,  ज्या काळात आध्यामिक प्रेरणांनी भारताकडे आकृष्ट झालेल्या जपानी  लोकांनी या दोन देशांना जवळ आणले होते.

(अनुवाद: सुहास पाटील)

Tags: कावागुची एकाई रिचर्ड जॅफी बौध्द नान्जो बुन्‌ ख्रिसमस रामचंद्र गुहा Richard jyafi kavaguchi ekais bauodhha bun Nanjo khrismas Ramchandra guha रामचंद्र गुहा कालपरवा जपानी पर्यटक : पूर्वीचे आणि आताचे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 

प्रतिक्रिया द्या

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात