डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

तसे पाहिले तर इहवादी अध्यात्माचा विचार स्वामी रामदासांइतका तरी जुना आहे. साने गुरूजींचा  समतेचा आग्रह व विज्ञानप्रेम त्यांच्या ह्या कल्पनेला आधुनिक जगाच्या संदर्भात एक विशेष अर्थ देतात.... निफाडच्या सामाजिक परिषदेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे धर्माला कर्मकांडातून मुक्त करून मानवतेच्या उच्च आदर्शांशी त्याचा समन्वय करणे जरुरीचे आहे. सानेगुरुजींनी व्यक्त केलेले विचार ह्या कार्याला अतिशय उपयोगी ठरतात.

'अद्वैतांचा अशा रितीने जीवनात साक्षात्कार कोणता भारतपुत्र करू पाहात आहे? आपण सर्वत्र डबकी निर्माण केली आहेत! आधी एकेका जातीचे डबके आणि त्या डबक्यात पुन्हा आणसी डबकी! डबकी करून राहणारे व अहंकाराने टरोटरों करणारे आपण सगळे बेड़ूक झालो आहोत! चिखलात उड्या मारावयाच्या व चिखल खायचा हे आपले पवित्र ध्येय झाले आहे!

अश्रूंचे कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साने गुरुजींच्या लेखणीला चीड आली की आगळी धार चढलेली दिसते. भारतीय संस्कृतीच्या उदात्त आध्यात्मिक विचारांचे साने गुरुजींना फार आकर्षण होते. पण ह्या उदात्त विचारांचा व व्यवहाराचा जो घटस्फोट झाला त्याची त्यांना फार चीड होती. त्यांची ही चीड 'भारतीय संस्कृति’ ह्या त्यांच्या ग्रंथात अनेक वेळा प्रकट झाली आहे. 

अद्वैत व अस्पृश्यता एकत्र नांदू शकत नाहीत असे ठणकावून सांगणारे साने गुरुजी अध्यात्म, अद्वैत, आस्तिकता वगैरे शब्दांचा मूलगामी अर्थ करतात. त्यांना अभिप्रेत असलेली आध्यात्मिकता उपनिषदकालीन ऋषींच्या संकल्पनांशी जुळणारी आहे. आपल्या धर्ममार्तंडांनी व परंपरांनी पोषीत किंवा परलोकासाठीच राखून ठेवलेल्या अध्यात्माला साने गुरुजींना जीवनात व समाजकारणात आणावयाचे होते. ‘अद्वैताचा साक्षात्कार ह्या प्रकरणात ते म्हणतात - 

'मांगल्यावर ज्याची श्रद्धा, तोच खरा आस्तिक! अद्वैत निर्माण करू पाहील तोच खरा आस्तिक! आस्तिक ऋषीस प्रत्यक्ष दृश्य संसारात अद्वैत पहावयाचे होते. दृश्य संसारातील विरोध वैषम्ये दूर करण्यासाठी प्रयत्न न करता परलोकाच्या गप्पा मारणारे ते खरोखर नास्तिक होत! तो खरा आस्तिक – की जो आजूबाजूला जे दिसत आहे त्याला सुंदरता आणू पाहतो.' साने गुरुजींना पाहिजे आहे एक प्रकारचे इहवादी अध्यात्म. हे इहवादी अध्यात्मच आजच्या व उद्याच्या विज्ञानयुगाचे तत्त्वज्ञान व धर्म बनू शकेल. 

तसे पाहिले तर इहवादी अध्यात्माचा विचार स्वामी रामदासांइतका तरी जुना आहे. साने गुरुजींचा समतेचा आग्रह व विज्ञानप्रेम त्यांच्या ह्या कल्पनेला आधुनिक जगाच्या संदर्भात एक विशेष अर्थ देतात. त्यांचे विज्ञानप्रेम त्यांनी ईशावास्य उपनिषदातील दोन श्लोकांच्या केलेल्या अर्थघटनात स्पष्ट दिसते. ईशावास्य उपनिषदाच्या नऊ, दहा व अकरा या तीन श्लोकांत विद्या व अविद्या यांचा समन्वय साधण्यास सांगितले आहे. अविद्या शब्दाच्या अर्थाविषयी बरीच चर्चा झालेली आहे. शंकराचार्य अविद्येचा अर्थ माया असा करतात. रामानुजाचार्य सकाम कर्म असा अर्थ करितात. प्रसिद्ध गुजराती कवी उमाशंकर जोशी ईशावास्य उपनिषदावरील त्यांच्या लेखमालेत 'अनेकाचे ज्ञान’ असा अर्थ करतात. साने गुरुजी अविद्येचा अर्थ भौतिक ज्ञान असा करितात व श्लोकांचे मर्म समजण्यासाठी हा अर्थ फार उपयुक्त ठरतो. ईशावास्य उपनिषदातील ते श्लोक पुढील प्रमाणे :

अन्धं तमः प्रविशन्ति  ये ऽ विद्यामुपासते ।। 

ततो भूय इव ते तमो य उ विद्याया रताः ।। 9 ।। 

(जे अविद्यची उपासना करितात ते घोर अंधकारात जातात, पण जे विद्येच्या अभ्यासात मग्न रहातात ते त्यापेक्षाही अधिक निबिड अंधकारामध्ये प्रवेश करतात.)

विद्या चाविद्यां च यस्तद्वेदोभय सह ॥ 

अविद्यया मूत्युं तीत्व्वा विद्यया ऽ मृतमश्नुते ।। 11 ।।

(विद्या आणि अविद्या व उभयतांमध्ये संबंध जोडणारे ज्ञान ज्याला होते तो अविद्येच्या साहाय्याने मृत्यूला ओलांडून जातो आणि विद्येने अमृताचा आस्वाद घेतो.)

श्लोकांचा अर्थ विशद करताना साने गुरुजी म्हणतात, "भौतिक ज्ञानाने आपण मृत्यु तरतो म्हणजे हा मृत्युलोक तरतो; संसारातील दुःखे, रोग, संकटे यांचा परिहार करतो. जो केवळ विद्येला भजेल किंवा केवळ अविद्येला भजेल तो पतित होईल. एवढेच नव्हे तर हे उपनिषद सांगते की केवळ अविद्येची उपासना एक वेळ पत्करली परंतु केवळ आध्यात्मात रमणारा तर फारच घोर नरकात पडतो. कारण विज्ञानाची उपासना करणारा संसाराला, निदान स्वतःच्या राष्ट्राच्या संसाराला तरी शोभा आणील. अध्यात्म व भौतिक शास्त्र यांत कोणत्या एकाचीच कास धरावयाची असेल तर ईशोपनिषद म्हणते 'भौतिक शास्त्राचीच कास धर.' 

ईशावास्याने दिलेला हा महान संदेश व हा इशारा आपण दुर्दैवाने शेकडो वर्ष विसरलो. 

'आजच्या विज्ञानालादेखील अध्यात्म मंजूर आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होईल हे सांगणारे ते अध्यात्म नव्हे, तर आपणासकट सर्व चराचर सूष्टीत एकत्व बघणारे व त्यांच्यांत संवाद साधणारे ते आध्यात्म. आइन्स्टाइनच्या विज्ञानाने कल्पिलेले विश्वचित्र न्यूटनच्या काळाच्या विश्वचित्राहून भिन्न आहे. न्यूटनच्या कालांत विश्व म्हणजे अनेक वेगवेगळ्या घन ( material ) पदार्थानी बनलेले एक विशाल यंत्र समजले जात होते. आपल्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत वैज्ञानिकांनी प्रगत उपकरणांच्या व त्याहून अधिक प्रगत गणिताच्या मदतीने अणुरेणूच्या चिमुकल्या जगात डोकावून पाहिले. आइन्स्टाइनने समग्र विश्वालाच प्रयोगशाळा बनविले आणि आपले आश्चर्यकारक सिद्धांत मांडले. या शोधांमुळे संपूर्ण विश्वचित्र बदलून गेले आहे. वस्तूंच्या वेगळेपणाची आणि घनतेची कल्पना लोप पावली आहे. सबंध विश्व हे घटना आणि संबंधांचे एक अभिन्न जाळे आहे, अशी कल्पना आजचे विज्ञान करते आणि त्यामुळे वस्तू व त्या वस्तू ज्या एकत्वाशी अभिन्नपणे निगडित आहेत ते एकत्व ह्या दोन्हींचा अभ्यास अपरिहार्य बनला बाहे. पर्यावरण शास्त्रासारखी शास्त्र ही या अभ्यासाची सुरुवात आहे.

आज काही लोक विज्ञानाने दिलेले फायदे हे सैतानाने फाउस्टला दिलेल्या फायद्यांसारखे आहेत असे म्हणतात. सुख सोयी मिळवून आपण आपला आत्मा विकला असे त्यांचे मत आहे. पण हा विचार एकांगी आहे. विज्ञानाने सुखसोयी दिल्या, एवढेच नव्हे तर विज्ञान सामाजिक उत्क्रांतीचे एक साधन बनले. समतेची जी मूल्ये आजचा समाज स्वीकारतो तो कदाचित पूर्वीच्या कोणत्याही समाजाने स्वीकारली नव्हती. उलट काही बुद्धिप्रामाण्यवादी अध्यात्म, धर्म वगैरे निव्वळ थोतांड आहे असे म्हणून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. साने गुरुजींना हे दोन्ही मंजूर नव्हते. निफाडच्या सामाजिक परिषदेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे धर्माला कर्मकांडातून मुक्त करून मानवतेच्या उच्च आदर्शशी त्याचा समन्वय करणे जरुरीचे आहे. सानेगुरुजींनी व्यक्त केलेले विचार ह्या कार्याला अतिशय उपयोगी ठरतात.

Tags: धर्म अद्वैत आस्तिक आध्यात्म Uniqueness Religion Theist #Spirituality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके