डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी शेतीतही फेल फास्ट ऐवजी प्लॅन बेटर आहे!

मला वाटतं की, जास्तीतजास्त कंपन्यांनी या क्षेत्रात उतरावं. अन्यथा सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा भार आमच्यासारख्या छोट्या कंपन्यांवर येतो. जास्त कंपन्या या क्षेत्रात आल्या तर बाजारपेठ उपलब्ध होईल. मला वाटतं, या क्षेत्राला उद्योजकतेची दिशा मिळाली पाहिजे. आज पोल्ट्रीसारख्या क्षेत्रात उद्योग वाढले आहे, तसं स्वरूप ‘ए2’ दूध असेल किंवा सेंद्रिय शेतमाल असेल यासाठी तयार झालं पाहिजे. आजही सेंद्रिय शेती क्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहे. म्हणून मला वाटतं की, या क्षेत्राकडे मोठ्या कंपन्यांनी यावं. त्यामुळे मी या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. 

प्रश्न - तुमचे बालपण, कुटुंब आणि गावाविषयी आम्हांला सांगाल का?

- मी लहानाचा मोठा शहरी भागातच झालो. माझे वडील सरकारी आयटीआयला शिक्षक होते. माझ्या वडिलांचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आहे. कासारे नावाचं एक छोटं गाव आहे. आणि माझं आजोळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे नावाचं गाव आहे. माझे आजोबा गुजरात पोलिस खात्यात असल्याने ते गावी राहत नसत. त्यामुळे माझे वडीलही कधीच कासारे गावात राहिले नाहीत. माझ्या वडिलांचं शिक्षण त्यांच्या मामाच्या गावीच झालं. शिक्षण घेऊन ते मुंबईला आयटीआय शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यामुळे माझा मूळ गावी राहण्याचा संबंध कधी आला नाही. माझा जन्म आजोळात झाला असला तरी मी वाढलो शहरी भागातच! वडील उल्हासनगरला नोकरीला असल्याने माझं चौथीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. मात्र वडिलांची सतत बदली व्हायची. म्हणून मलाही शहरं बदलावी लागली. माझे मित्र बदलत गेले. त्यामुळे बालपणीच्या अशा फारशा आठवणी नाहीत. मी दोन वर्षे पनवेलमध्ये राहिलो. एक वर्षं अहमदनगरच्या रयत शिक्षण संस्थेत होतो. त्यानंतर आठवी ते बारावी मी धुळ्यात शिकलो. कारण वडिलांची धुळ्याला बदली झाली होती. थोडक्यात, मी गावात राहिलोच नाही. माझी जडणघडण शहरातच झाली.

प्रश्न - शेतीची कुठलीच पार्श्वभूमी नव्हती का?

- धुळ्याला आमच्याकडे शेती नव्हती. आमच्या फार आधीच्या पिढीने शेती केली होती, पण ती त्यांनीच विकली. त्या अर्थाने आम्ही भूमिहीन झालो. माझ्या वडिलांच्या आजोबांनीसुद्धा शेती केली नाही. तेही छोटासा व्यापार करत होते. पण माझ्या मामाकडे शेती आहे. त्यांचं कुटुंब शेतीसंपन्न होतं. एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्याकडे 120 एकर शेती होती. 70-80 जनावरं आणि बैलगाड्या त्यांच्याकडे होत्या. शेतात सगळ्या प्रकारची पिकं घेतली जायची. भाजीपाला, केळी, चिकू, पेरू अशी वेगवेगळी पिकं त्यांच्या शेतात होती. त्यामुळे मामाचं कुटुंब सधन होतं. आणि अशा सधन शेतकरी कुटुंबात मी दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांमध्ये राहायला जायचो.

प्रश्न - प्रत्येकाला लहानपणी मामाच्या गावाला जाणं आवडतं. तुम्ही सुट्ट्यात मामाच्या गावाला जात होतात. त्या वेळच्या अनुभवाविषयी सांगाल का?

- हो. आज मला तिथली शेती आठवताना वाटतं की,  ती परग्रहावरची शेती आणि शेतकरी कुटुंब होतं. माझे आजोबा आणि आजोबांचे भाऊ एकत्र कुटुंबात राहत होते. आजोबांना आठ मुली आणि त्यांच्या भावाला आठ मुलं-मुली असं एकूण सोळा बहीण-भावांचं ते कुटुंब होतं. त्यांची मुलं म्हणजे आम्ही 70-80 जण उन्हाळ्याच्या सुट्टीत  एकत्र जमायचो, असं ते चित्र होतं. आजच्या पिढीला असं चित्र पाहायलाच मिळत नाही. आम्ही मामाच्या गावी गेलो की, जास्त वेळ शेतात असायचो. रात्री आम्ही सर्व भावंडं अंगणात झोपायचो. आमची सकाळ व्हायची ती आजोबांच्या भारदस्त आवाजाने. आजोबा शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना दिवसभराची कामं मोठ्या आवाजात सांगायचे. मला तेव्हा त्यांचं खूप अप्रूप वाटायचं की, आजोबांच्या हाताखाली एवढी सगळी माणसं काम करायला आहेत. सकाळ झाली की, अंघोळीसाठी गावातल्या नदीवर जायचो. नाश्ता आणि दुपारचं जेवण बनवण्यासाठी मीठ वगळता सगळं काही घरच्या शेतातलं असायचं. तेल, गूळ, दूध, डाळी, ज्वारी, बाजारी वगैरे सगळं काही घरच्या शेतात पिकवलेलं असायचं.

प्रश्न - या काळात आपण शेती केली पाहिजे असा विचार कधी मनात आला का?

- कधीच नाही. कारण तसा माझा थेट शेतीशी संबंध नव्हता. मामाकडे असताना आम्हांला छोटी-मोठी कामं सांगितली जायची. मला आठवतं, आम्हां मुलांना दोन कामं प्रामुख्याने सांगितली जायची, एक म्हणजे

गाई-म्हशी चरायला सोडल्या जायच्या, तेव्हा त्यांचं शेतात पडलेलं शेण गोळा करणं आणि दुसरं म्हणजे, कापूस वेचणीच्या वेळी साडीची एक झोळी आमच्या कंबरेला बांधली जायची. कापूस वेचून आम्ही त्या झोळीत टाकायचो. यापलीकडे मी शेतातली काहीच कामं केली नव्हती. मला अजून आठवतं, चाळीसगावला कृषी उत्पन्न बाजार समिती होती. आमचे मामा बैलगाडीत शेतमाल भरून बाजार समितीत विकायला घेऊन जायचे. आम्हा मुलांसाठी शेतमालाने पूर्ण भरलेल्या बैलगाडीच्या वर बसणं ही पर्वणी असायची. आम्ही भर उन्हात बाजार समितीत जायचो, तिथे व्यवहार कसे चालायचे ते माहीत नव्हतं. आम्ही बाजारात जायचो, कारण मामा आम्हांला गोड शेव खायला द्यायचे. तिथल्या बाजारात कसा व्यवहार होतो वगैरे यातलं आम्हांला काहीही कळायचं नाही. त्यामुळे आपण मोठे होऊन शेती करावी, असं कधी वाटलं नाही. मुळात भविष्यात काय करायचं हेच माहीत नव्हतं.

प्रश्न - बारावीनंतर कुठे शिक्षण घेतलं?

- बारावीनंतर मी इंजिनिअरिंगसाठी संगमनेरला गेलो. तिथं माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीनिमित्त मी पुण्यात आलो. हा सगळा प्रवास बघाल तर मी पूर्णतः शहरी वातावरणातच वाढलो आहे.

प्रश्न - बारावीच्या शिक्षणानंतर तरुणांसमोर प्रामुख्याने ‘करिअर’चा प्रश्न उभा असतो. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्राला ‘करिअर’ म्हणून निवडलं होतं?

- वडील आयटीआय शिक्षक असल्याने त्यांची सतत बदली होत राहिली. आम्ही एकाच शहरात तीन-चार वेळा घरं बदलत असू. कारण आम्हांला स्वतःचं असं घर नव्हतं. त्यामुळे मला वाटायचं की, स्वतःचं आपलं हक्काचं घर असलं पाहिजे. माझ्या वडिलांच्या मामेभावाने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्याने घरात सतत चर्चा चालायची की, इंजिनिअरिंगला खूप वाव आहे वगैरे. त्यामुळे वडिलांनी ठरवलं होतं की, याला इंजिनिअर करायचं. त्यामुळे इंजिनिअरिंग करणं हा काही माझा निर्णय नव्हता. त्याला अनेक इतरही घटक कारणीभूत होते. मेडिकल किंवा इंजिनिअरिंग एवढेच दोन पर्याय त्या वेळी माहीत होते. दुसरं म्हणजे मला मेडिकल क्षेत्र आवडलं नाही, म्हणून मी अकरावीला ‘बायोलॉजी’ विषय घेतला नाही. एक प्रकारे मी मेडिकला जाण्याचा पर्याय स्वतःच बंद करून टाकला होता. त्यामुळे इंजिनिअरिंगला जाणं आपसूकच झालं. तो ठरवून घेतलेला निर्णय नव्हता. कारण एवढंच होतं की, इंजिनिअरिंगच्या खाली काही करायचं नव्हतं, आणि त्याच्या पलीकडचं माहीत नव्हतं. त्यामुळे मी बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश घेतला.

प्रश्न - संगमनेरला बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स करताना कॉलेज जीवनातले काय अनुभव होते?

- बी.ई.च्या तिसऱ्या सत्राला असताना अनेक जण सांगायचे की, एम.बी.ई. करायला पाहिजे. आणि करायचं असेल तर ‘आयआयएम’सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटसमध्ये केलं पाहिजे. कारण तिथे शिक्षण घेतलेल्या मुलांना खूप जास्त पगार मिळतो. मला अजून आठवतं की, ‘आयआयएम’मधून कोणाला किती पॅकेज मिळालं याची ऑनलाइन आर्टिकल्स यायची. मी त्या आर्टिकल्सची कात्रणं गोळा करायचो. कारण त्या वेळी माझं एकच ध्येय होतं की, आपण निम्न-मध्यम वर्गातून इथंपर्यंत आलोत. घरी नेहमी पैशाची चणचण असते. वडील स्वतःचं घर बांधू शकले नाहीत. त्यामुळे स्वतःचं घर बांधायचं, एवढंच माझं स्वप्न होतं. त्यासाठी मोठं पॅकेज असलेली नोकरी करायची. पण याचा अर्थ मला पैशाचा खूप हव्यास होता, असं काही नव्हतं. इंजिनिअरिंग तसं मजा करण्यात गेलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आमच्या कॉलेजला कॅम्पससाठी काही कंपन्या आल्या होत्या. आणि त्यातच माझी एका कंपनीसाठी निवडही झाली.

प्रश्न - पुण्यात नोकरी केली. पण नोकरीत तुमचं मन रमत नव्हतं, काय कारण होतं?

- मी एक-दीड वर्षं नोकरी केली. आणि मला असं जाणवायला लागलं की, मी आयुष्यभर नोकरी करू शकत नाही. त्याचं कारण आजही मला कळत नाही. नोकरीत मी कसलंही कौशल्य आत्मसात करू शकलो नाही, आणि माझं मन त्या कामात रमलंही नाही. माझ्याकडे व्यावहारिक जगात उपयोगी पडेल असं कुठलंही कौशल्य नव्हतं, फक्त एक इलेक्ट्रॉनिक्सची पदवी तेवढी होती. मग मी विचार करायला लागलो, नवनवीन लोकांना भेटायला लागलो.  या काळात मी राजकीय-सामाजिक विषयांबाबत अजिबात जागरूक नव्हतो. मला त्या काळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे, असं कुणी विचारलं असतं, तर त्याचंही उत्तर देता आलं नसतं. मला आज वाटतं, माझं आयुष्य त्या काळी खूप ‘बोअरिंग’ होतं. 2008 मध्ये महाराष्ट्रात राज ठाकरेंचं मराठी-अमराठी मुद्द्यावरून आंदोलन खूप गाजत होतं. त्या आंदोलनाची प्रचंड चर्चा आजूबाजूला चालू होती. मी आयटीत काम करत होतो आणि तिथेसुद्धा अमराठी माणसं होतीच. त्यामुळे आमच्या कंपनीतसुद्धा मराठी-अमराठी माणसांमध्ये खूप वादविवाद चालायचे. पण मला यातलं काहीच माहीत नव्हतं. राजकीय-सामाजिक विषयांपासून इतका अनभिज्ञ होतो की, राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा नसून पुतणे आहे, हेदेखील मला माहीत नव्हतं. या विषयावर चर्चा चालायच्या, तेव्हा मी एकटा पडायचो. मग मी नियमितपणे सगळ्या वृत्तवाहिन्या पाहायला सुरुवात केली. टीव्हीवर दररोज चार तास बातम्या पाहणं, वेगवेगळे कार्यक्रम पाहणं सुरू केलं. त्यातून मी फार जागरूक झालो, असं मला वाटायला लागलं. आणि यातून मी राज ठाकरेंचा समर्थक झालो. पण ती सगळी वरवरची माहिती होती, असं आज मला वाटतं.

प्रश्न - राज ठाकरे यांच्या समर्थकापासून ते डॉ.अभय बंग यांच्या ‘निर्माण’पर्यंतचा प्रवास कसा झाला?

- मी दररोज चार तास मराठी आणि इंग्लिश वृत्तवाहिन्या पाहत होतो. त्याची एवढी सवय झाली होती की, 9 वाजताचा ‘प्राइम टाइम शो’ चुकवला तर मला रात्री झोप लागायची नाही. त्याच काळात मी निखिल वागळेंचा ‘ग्रेट भेट’ हा कार्यक्रम न चुकता पाहू लागलो. तोवर मी निखिल वागळेंचा चाहता झालो होतो, कारण त्यांची मुलाखत घेण्याची शैली मला आवडली होती. एके दिवशी ‘ग्रेट भेट’मध्ये डॉ.अभय बंग यांची मुलाखत चालू होती. आणि नेमकं त्याच दिवशी मी रात्री उशिरा घरी आलो. त्यामुळे मुलाखतीचे मी शेवटचे 15 मिनिटंच पाहू शकलो. पण त्या 15 मिनिटांमध्ये अभय बंग त्यांच्या ‘निर्माण’ ह्या उपक्रमाविषयी बोलत होते. ते बोलताना ‘निर्माण’चा उद्देश सांगत होते, आणि ते सगळं मला ‘रिलेट’ व्हायला लागलं होतं. कारण मला आयुष्यात काय करायचं हे माहीत नव्हतं. तोवर वृत्तवाहिन्यांवरचे कार्यक्रम पाहून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या स्फोटाला मी नुसतं साठवून ठेवत होतो. मी फक्त म्हणायला, राजकीयदृष्ट्या जागरूक झालो होतो. पण त्यातही मी एका बाजूला झुकलो होतो, असं आता वाटतं. अभय बंग यांची ती मुलाखत पाहून मी ‘इम्प्रेस’ झालो. इंटरनेटवर पुन्हा पूर्ण मुलाखत पाहिली. आणि मग मी ‘निर्माण’साठी अर्ज केला.

प्रश्न - ‘निर्माण’मध्ये काय शिकायला मिळालं?

- डॉ.अभय बंग यांनी 2006 मध्ये ‘निर्माण’ सुरू केलं. ‘जीवनाचा अर्थपूर्ण शोध’ अशी निर्माणची ‘टॅगलाइन’ आहे. तरुणांच्या सुप्त गुणांना दिशा देणं, त्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना अवगत करणं, आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी त्या कौशल्याच्या किंवा अनुभवाच्या जोरावर उभं करणं हा ‘निर्माण’चा मूळ उद्देश आहे. तिथली मुलाखतीची मोठी प्रक्रिया पार करून मी ‘निर्माण’शी जोडला गेलो. 2009 आणि 2010 ही दोन वर्षे गडचिरोलीत होतो. माझ्यासाठी तिथलं वातावरण नवीन होतं.

‘निर्माण’मध्ये चार वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये स्वतःला ओळखण्यापासून ते जगाच्या वेगवेगळ्या समस्यांपर्यंत अनेक विषय असतात. आरोग्य, पर्यावरण, व्यसनमुक्ती, शेतमजुरांचे प्रश्न, किंवा दारूबंदीचा प्रश्न असेल अशा समस्येची मुळापासून उकल करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेली माणसं तिथं मार्गदर्शन करायला येत. त्यातून बऱ्याच गोष्टींची माहिती मिळायची. पण तोवर मी राजकीय अंगानेच अधिक विचार करत होतो. अभय बंग यांना मी राजकारणाबद्दल विचारलं तेव्हा राजकारणाची परिभाषा सांगताना ते म्हणाले, ‘‘राजनीती म्हणजे फक्त पक्षीय पातळीवरचं राजकारण एवढ्यापुरतं सीमित नाही, तर आपण दररोज जी कृती करतो आणि निर्णय घेतो तीसुद्धा राजनीती आहे. राजनीतीचं अंतिम ध्येय समाजहित असेल तर त्यासाठी  पक्षीय राजकारण हा एक मार्ग आहे. पण त्या व्यतिरिक्तदेखील इतरही मार्ग आहेत.’’ आणि त्यातून माझी राजकारणाबद्दलची धारणा व्यापक होत गेली.

दुसरीकडे ‘निर्माण’मध्ये संजय पाटील नावाची एक व्यक्ती आली होती. ते ‘बीआयएफ’मध्ये शास्त्रज्ञ होते. ते देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी काम करत होते. त्यांनी आम्हांला बीज स्वतंत्रतेचं महत्त्व आणि त्याभोवतीचं अर्थ-राजकारण सांगितलं. त्यातून शेतीविषयाचे अनेक पदर उलगडत गेले.त्यांच्यामुळे शेतीबद्दल अधिक सजग झालो. त्यांच्या बहुआयामी संशोधनातून आलेलं उत्तर होतं, कमी खर्चाची विषमुक्त शेती! हा विचार मला सैद्धांतिक पातळीवर पूर्णतः मान्य होता. पण मी पुण्यात यायचो आणि शेतकऱ्यांना भेटायचो, तेव्हा शेतकरी विषमुक्त शेतीला आर्थिकदृष्ट्या सफल होणारा प्रयोग मानत नव्हते. त्यामुळे मी स्वतः कमी खर्चातील विषमुक्त शेती करायचा निर्णय घेतला.

प्रश्न - शेती करायचा निर्णय तर तुम्ही घेतला. पण तुमची घरची शेती नव्हती. मग तुम्ही शेतजमीन विकत घेतली. सुरुवातीला शेती करताना काही अडचण आली का?

- स्वतःचं घर नव्हतं म्हणून काहीतरी स्थावर मालमत्ता आपल्याकडे असावी, अशी स्वामित्व हक्काची भावना माझ्या मनात होतीच. पण काही मित्रांनी असंही सांगितलं की, भाड्याने शेती घेशील, मेहनत घेऊन पीक घेशील आणि कदाचित त्याच वेळी शेतमालक म्हणेल की, मला नाही द्यायची शेतजमीन भाड्याने! मग अशा वेळी तुझी अडचण होईल. त्यापेक्षा तू स्वतः शेतजमीन खरेदी कर. म्हणून मी पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये दोन एकर शेतजमीन विकत घेतली. माझ्याकडे दोन एकर शेत विकत घेण्यापुरतेच पैसे होते. मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिथल्या बॉसेसना माझी धडपड दिसत होती. त्यांनी मदत म्हणून माझ्यासोबत काही शेती विकत घेतली. अशी एकूण अकरा एकर शेतजमीन आम्ही तीन-चार जणांनी विकत घेतली. शेतजमीन विकत घेताना काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे प्रचंड अडचणी आल्या.

सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तेव्हासुद्धा असंख्य अडचणी येत होत्या. अडचण आली की, सेंद्रिय शेतीतील जाणकारांना भेटायला जायचो, त्यांच्याशी चर्चा करायचो, खूप प्रश्न विचारायचो. दुसरा काही पर्याय माझ्याकडे नव्हता. कारण आपल्याकडे सेंद्रिय शेतीबद्दलचं ‘डॉक्युमेंटेशन’ उपलब्ध नव्हतं. त्यामुळे पहिली दोन वर्षे मी आंधळेपणाने विषमुक्त शेतीच्या काही पद्धतींचा अवलंब केला. त्यातून माझं आर्थिक नुकसानही झालं. त्या वेळी मला कळालं की, विज्ञान ‘युनिव्हर्सल’ असतं, पण ‘टेक्निक’ मात्र खूप ‘कस्टमाइज’ असायला पाहिजे. पुढे हळूहळू कळत गेलं की, काय ‘टेक्निक’ असायला हव्यात. मग तिसऱ्या वर्षी शेतात चांगलं पीक यायला लागलं.

प्रश्न - सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेतीत केवळ गाईचं शेण आणि गोमूत्र याचाच वापर केला जातो का? सेंद्रिय खत-औषध कसं तयार केलं जातं?

- शेतामधील उपलब्ध संसाधनांचा जास्तीतजास्त वापर करणं हा खूप वरवरचा भाग आहे. मुळात सेंद्रिय शेती म्हणजे ‘नैसर्गिक परिसंस्थे’ला धक्का न लावता त्या परिसंस्थेला पोषक वातावरण निर्मिती करणं. किंवा त्यात फार ढवळाढवळ न करणं आपल्याकडे रासायनिक  खतं-औषधं उपलब्ध नव्हती तेव्हा अशा पद्धतीने शेती केली जात होती. त्यातून चांगलं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे मातीचा पोत टिकवणं, पाणी शोषून घेण्याची क्षमता टिकवणं, मातीचा ‘ऑर्गनिक कार्बन’ टिकून ठेवणं, पिकांवर रोगराई येऊच नये म्हणून काळजी घेणं, एकच एक पीक न घेणं आणि सापळा पिकं घेणं या सगळ्या गोष्टी सेंद्रिय शेतीत केल्या जातात. थोडक्यात, शेतीला कमी खर्च येईल अशी ही पद्धती आहे. शेण आणि गोमूत्र यांचाही सेंद्रिय शेतीसाठी वापर केला जातो. चांगलं पीक येणारं देशी बियाणं वापरणंसुद्धा महत्त्वाचं आहे. पण एवढंच सेंद्रिय शेतीसाठी पुरेसं नाही. तर सेंद्रिय शेतीला कुक्कुटपालनाची, शेळीपालनाची किंवा ‘डेअरी फार्मिंग’ची जोड द्यायला पाहिजे.

प्रश्न - या सर्व धडपडीच्या काळात ‘ओ भाजीवाला’ असा एक प्रयोग तुम्ही केला होता. तो नेमका काय होता?

- मी सेंद्रिय शेती करायला लागलो तेव्हा सेंद्रिय मालासाठी बाजारपेठ उपलब्ध नव्हती. कृषी उत्पन्न बाजार समितीतसुद्धा सेंद्रिय शेतमालाला भाव मिळायचा नाही. मी आठवड्यातले चार दिवस आयटीत आणि तीन दिवस शेतीत काम करत होतो. आणि त्याच काळात शहरी भागात सेंद्रिय शेतमालाविषयी जागरूकता निर्माण होत होती. त्यामुळे शहरी भागात अशा शेतमालाला मागणी आहे, असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी शेतकरी आणि शहरी ग्राहक यांना ‘डिजिटली’ जोडण्याचा निर्णय घेतला. त्यातून ‘ओ भाजीवाला’ ही वेबसाइट सुरू केली. सेंद्रिय शेतीतला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत होतो. पुढे तो प्रयोग अनेक कारणांनी फसला. पण त्याच प्रयोगात खऱ्या अर्थाने ‘द ऑर्गनिक कार्बन’ कंपनीचं बीज रुजलं होतं.

प्रश्न - तुम्ही ‘द ऑर्गनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करण्यामागे काय प्रेरणा होती? असं का वाटलं की, आपण जास्तीतजास्त शेतकऱ्यांना जोडून घेतलं पाहिजे.

- 2011मध्ये मी प्रत्यक्ष सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. पुढे नोव्हेंबर 2015 मध्ये नोकरी सोडली. तोवर शेती आणि नोकरी दोन्ही गोष्टी करत होतो. एप्रिल 2016 ला मी ‘द ऑर्गनिक कार्बन’ कंपनीची स्थापना केली. त्यापूर्वी मी ज्या आयटी कंपनीत काम करत होतो, त्या कंपनीचे मालक संजय देशपांडे त्यांच्याशी मी ‘बिझनेस मॉडेल’विषयी भरपूर चर्चा करायचो. त्यातून माझ्या लक्षात आलं की, शेतमालाला रास्त दर न मिळणं, भरघोस उत्त्पन्न न मिळणं आणि त्यासाठी लागणारं ज्ञान नसणं ह्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. दुसरीकडे चांगला भाजीपाला न मिळणं, ‘केमिकल फ्री’ भाजीपाला न मिळणं या शहरी ग्राहक वर्गाच्या समस्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी काम करायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असं ‘बिझनेस मॉडेल’ उभं राहिलं पाहिजे. एनजीओ किंवा लोकवर्गणीतून असं ‘मॉडेल’ उभं केलं तर त्यावर प्रचंड मर्यादा येतात. त्यामुळे आम्ही शेतकरी आणि ग्राहक यांच्या हितसंबंधाची योग्य सांगड घालण्यासाठी ‘द ऑर्गनिक कार्बन’ ही कंपनी सुरू केली.

प्रश्न - तुमच्या कंपनीशी आज किती शेतकरी जोडले गेले आहेत? सेंद्रिय शेतीकडे वळल्यामुळे त्यांच्या शेती उत्पन्नात,  शेतजमिनीत आणि पीक पद्धतीत काय बदल झाले?

- कंपनी सुरू केली तेव्हा आम्हांला भाजीपाल्यापासून सुरुवात करायची होती. कारण तोवर मी भाजीपाल्याची शेती करत होतो. आमचा शेतकऱ्यांचा गट त्या वेळी किरकोळ बाजारात भाजीपाला आणि फळांचा पुरवठा करू शकत नव्हता. भाजीपाला ही क्लिष्ट ‘कमोडिटी’ आहे. एकाच घरात अनेक प्रकारचा भाजीपाला देणं ही प्रक्रिया किचकट होती. पण ग्राहकांना महिना ‘सबस्क्रिप्शन’ भाजीपाला पुरवण्याचं आम्ही ठरवलं होतं. आमच्या शेतीच्या केंद्रस्थानी देशी गाई होत्या. कारण शेण आणि गोमूत्रातून सेंद्रिय खतं-औषधं तयार करणं सोपं जातं. आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा पुण्याच्या आजूबाजूच्या भागात धारवाड समुदाय स्थायिक झाला होता. या समुदायाकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून खूप साऱ्या गीर गाई होत्या. पण त्यांच्या गाईच्या गुणवत्तापूर्ण दुधाला चांगला भाव मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो आणि दुधावर काम करायचं ठरवलं. 2017 मध्ये आम्ही दुग्धजन्य पदार्थांचं पहिलं ‘प्रॉडक्ट’ बाजारात आणलं. नंतर हळूहळू इतरही ‘प्रॉडक्ट्‌स’ आम्ही बाजारात आणले. आज 85 शेतकऱ्यांकडून आम्ही दोन्ही वेळचं दूध घेतो. पूर्णतः सेंद्रिय ‘सर्टिफाइड’ अशी 45 प्रकारची  ‘प्रॉडक्ट्‌स’ आमच्याकडे आहेत आणि 442 शेतकऱ्यांकडून हा विविध प्रकारचा सेंद्रिय शेतमाल आम्ही विकत घेतो.

प्रश्न - दुधावर कशी प्रक्रिया केली जाते? त्या आम्हाला काय सांगाल?

- रांजणगावला आमचा दूध प्रक्रिया प्रकल्प आहे. त्यामुळे शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि मंचर या भागातले शेतकरी आमच्याशी जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात आमची ‘प्रोसेसिंग युनिट्‌स’ आहेत. त्यामुळे शेतातच त्यावर प्रक्रिया केली जाते. आम्ही शेतकरी गटातील दोन शेतकऱ्यांना सर्व शेतमाल एकत्र गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे. यातल्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांकडून दूध घेतानाच दुधाची गुणवत्ता तपासली जाते. त्यावरून शेतकऱ्यांसुद्धा कळतं की, त्यांच्या दुधाला किती भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांकडचं दूध एकत्र करून पुढे ‘प्रायमरी प्रोसेसिंग’साठी येतं. तिथे दूध थंड केलं जातं आणि दुधाची तपासणी केली जाते. तिथून मुख्य ‘प्रोसेसिंग युनिट’ला म्हणजेच रांजणगावला दूध आणलं जातं. या ‘प्रोसेसिंग युनिट’मध्ये ‘मायक्रोबायोलॉजी’ची टीम दुधाची 17 ‘पॅरामीटर’वर चाचणी करते. आणि या सगळ्या चाचण्या करूनच दुधाचं ‘पॅकेजिंग’ केलं जातं.

प्रश्न - ‘हम्पी2’ या नावाने तुम्ही दूध विकता. ‘ए2’ दुधाचा पुरवठा थेट ग्राहकांना करता. ‘ए1’, ‘ए2’ हा नेमका काय प्रकार आहे? साधारणतः गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध असं म्हटलं जातं.

- ‘ए2’ ही खरं तर ‘सायंटिफिक टर्मिनालॉजी’ आहे. दुधामधून मिळणारी प्रथिने ‘ए1’ किंवा ‘ए2’ प्रकारची असतात. सोप्या भाषेत ज्या दुधातून ‘ए1’ प्रथिने मिळतात त्याला, ‘ए1’ दूध म्हणतात आणि ज्या दुधातून ‘ए2’ प्रथिने मिळतात त्याला ‘ए2’ दूध म्हणतात. 2006-07 मध्ये यावर भरपूर अभ्यास झाला आहे. त्या अभ्यासानुसार, ‘ए1’ प्रथिनयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर ‘ए2’ प्रथिनयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि त्याचे त्यांनी पुरावेसुद्धा दिले आहेत. ‘डेव्हिल इन द मिल्क’ अशा नावाचं एक पुस्तकसुद्धा आहे. त्यामध्ये या गोष्टींचा ऊहापोह केला आहे. 2009 मध्ये मी नारायणगावला एका कार्यशाळेला गेलो होतो, तेव्हा मला हा सगळा प्रकार लक्षात आला. पण याबद्दल अनेकांची मतमतांतरं आहेत. भारतीय देशी गाईचं दूध ‘ए2’ असतं, असं विज्ञान सांगतं. दुसरा मुद्दा म्हणजे, ‘धवल क्रांती’च्या दरम्यान भारतात जर्सी गाई आयात केल्या होत्या. त्यामुळे त्या भरपूर प्रमाणात आपल्याकडे आहेत. मात्र आजही शेतकऱ्यांना या 15-20 लीटर दूध देणाऱ्या गाई परवडत नाहीत. त्याचं कारण जर्सी गाई सतत आजारी पडतात, त्यांना खायला चारासुद्धा खूप जास्त लागतो आणि मग त्यातून उत्पादन खूपच कमी मिळतं. म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचं आणि दुधातून मिळणाऱ्या मोबदल्याचं समीकरण जुळत नाही. म्हणून आम्ही देशी गाईच्या दुधापासून बनवलेले ‘प्रॉडक्ट्‌स’ ‘हम्पी2’ या नावाने विकतो. यात शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य तो भाव मिळतो.

प्रश्न - आज तुमच्या कंपनीतलं दूध ग्राहकांपर्यंत काचेच्या बाटलीतून पोहोचतं. मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यातून दूध विकलं जात असताना तुमची कंपनी काचेच्या बाटलीचा वापर का करते?  

- भारतातील एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी 19 टक्के हरितगृह वायू उत्सर्जन चुकीच्या शेती पद्धतीमुळे होतं, असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा, मी त्यावरचे काही संशोधन वाचले. त्यातून मला ‘क्लायमेट सेफ ॲग्रीकल्चर’ किंवा ‘क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चर’ची संकल्पना समजली. मी करत असलेल्या विषमुक्त शेतीपद्धतीसारखीच ती शेतीपद्धत होती. उदा. गव्हाचं काड जमिनीत कुजवणं वगैरे पद्धतीचा त्यामध्ये वापर केला जात होता. आणि मीही तेच करत होतो. फक्त त्यांचं शेतमालाचं ‘पॅकेजिंग’ आकर्षक असतं, त्यामुळे आपणही त्यांच्या शेतमालासारखंचं ‘पॅकेजिंग’ केलं पाहिजे, असा विचार मनात आला. त्यामुळे आमच्या बाटलीवर We are the Group of Climent Smart, Regenerative, Digital Organic Farmers असं  लिहिलं आहे. आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा आमच्यासमोर पाच समस्या होत्या. 1) क्लायमेट स्मार्ट- पर्यावरण पूरक शेती आपल्याकडे केली जात नव्हती. 2) न्यूट्रिशन सेक्युरिटी- ग्राहकवर्गाला मिळणारं अन्न पोषणयुक्त नव्हतं. 3) लॅक ऑफ डिजिटायझेशन- शेती तंत्रज्ञानाचा अभाव होता. 4) ऑर्गनिक फार्मिंग मॉडेल- सेंद्रिय शेतीचं ‘मॉडेल’ नव्हतं. 5) मार्केट- मागणी आणि पुरवठ्याचं सूत्र माहीत नव्हतं. यामुळे शेतीच्या समस्यांवर काम करणं गरजेचं होतं. म्हणून ‘क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चर’ करायचं असेल तर काचेच्या बाटलीचा आपण वापर केला पाहिजे असं आम्ही ठरवलं. खरं तर काचेचा बाटल्याचा वापर करण्याचा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण होता. कारण दररोज काचेच्या बाटल्या सुरक्षितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि ग्राहकांकडच्या बाटल्या गोळा करून पुन्हा वापरात आणणं, असं ते चक्र आहे. दिवाळीचा एक दिवस वगळता आम्ही 364 दिवस काम करतो. आजवर आम्ही काचेच्या बाटलीतून जेवढं दूध विकलं, त्यातून 27 हजार किलोग्रॅम इतकं प्लास्टिक जमिनीत जाण्यापासून वाचवला आहे.

प्रश्न - काचेच्या बाटल्यातून दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवताना बाटल्यांचं काही नुकसान होतं का?

- पहिले सहा महिने खूप अडचणी आल्या. टीम छोटी आणि नवीन होती. आम्हांला फारसा अनुभवही नव्हता. मला आठवतं, आम्ही सुरुवातीच्या काळात तीन लाख रुपयांच्या  काचेच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. आणि त्यातल्या जवळपास निम्म्या बाटल्या गायब झाल्या होत्या. मग हळूहळू शिकत गेलो. प्रक्रियेमध्ये काही बदल केले, दूध पोहोचवणाऱ्या टीमच्या पगारात वाढ केली, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आणि अनेक प्रक्रियेत सुव्यवस्थितता आणली. परिणामी, आज दुधाची रिकामी बाटली ग्राहकांकडून परत येण्याचं सरासरी प्रमाण 98.23 टक्के एवढं आहे. पॅकेजिंगसाठी प्लास्टिक पिशवीचा खर्च 3 रुपये प्रतिपिशवीप्रमाणे येतो. आणि आम्हांला काचेच्या बाटलीसाठी पॅकेजिंग खर्च 2 रुपये 20 पैसे एवढाच येतो. त्यामुळे काचेच्या बाटलीचं धोरण आम्ही स्वीकारलं.

प्रश्न - सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालावर केला जाणाऱ्या एकरी खर्चानुसार बाजारात त्या शेतमालाला भाव मिळतो का?

- नाही मिळत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगला भाव न मिळणं हीच मोठी समस्या आहे. जेव्हा एखादा शेतकरी पहिल्यांदा सेंद्रिय शेती करू लागतो, तेव्हा त्याचं उत्पन्न थोडं कमी होतं. याचं कारण सेंद्रिय शेतीकडे वळण्यापूर्वी रासायनिक खतांचा भडीमार करून शेतकऱ्यांनी जमीन खराब केलेली असते. आणि ज्यांचं सेंद्रिय शेती करूनसुद्धा उत्पन्नात काहीच घट होतं त्यांनी रासायनिक खतांचा कमी आणि शेत खताचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असतो, असं दिसतं. सेंद्रिय शेती करताना सरासरी 20 ते 30 टक्के उत्पन्न कमी होतं, पण उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुखी होत नाही. मला वाटतं की, प्रमाणित पण गुणवत्तापूर्ण उत्पन्नावर शेतकऱ्यांनी भर द्यायला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता, विविध प्रकारची पिकं घेतली पाहिजेत. 

प्रश्न - आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तुम्ही कंपनीचे संस्थापक म्हणून या स्पर्धेकडे कसे पाहता?

- मला वाटतं की, जास्तीतजास्त कंपन्यांनी या क्षेत्रात उतरावं. अन्यथा सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा भार आमच्यासारख्या छोट्या कंपन्यांवर येतो. जास्त कंपन्या या क्षेत्रात आल्या तर बाजारपेठ उपलब्ध होईल. मला वाटतं, या क्षेत्राला उद्योजकतेची दिशा मिळाली पाहिजे. आज पोल्ट्रीसारख्या क्षेत्रात उद्योग वाढले आहे, तसं स्वरूप ‘ए2’ दूध असेल किंवा सेंद्रिय शेतमाल असेल यासाठी तयार झालं पाहिजे. आजही सेंद्रिय शेती क्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहे. म्हणून मला वाटतं की, या क्षेत्राकडे मोठ्या कंपन्यांनी यावं. त्यामुळे मी या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. भविष्यात स्पर्धा वाढली तर शेवटी गुणवत्ता हाच उद्योगाचा मूलभूत आधार असेल. त्यामुळे मला स्पर्धेची चिंता नाही.

प्रश्न - सेंद्रिय शेतीतल्या संधींबद्दल आजच्या तरुणांना काय सांगाल?

- सेंद्रिय शेतीच नव्हे तर एकूण शेतीक्षेत्रात अमाप संधी आहेत. ‘पॅनडेमिक’नंतरचा काळ लक्षात घेता, भारतात पुढची काही वर्षे शेतीक्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत वाढ  होईल. अशा काळात तुमच्याकडे एखाद्या शेती समस्येचं उत्तर असेल तर तुम्ही कृषी उद्योजक होऊ शकता. मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते. माझ्याकडे एक व्हिजन होतं, ज्यातून मी गुंतवणूकदारांना पाठीशी उभं करू शकलो. त्यामुळे स्वतःच्या ‘आयडियाज’वर विश्वास असला पाहिजे. आई-वडील आणि मित्रांचा विश्वास मिळवा. मला वाटतं, तुमची पहिली ‘आयडिया’ जवळच्या लोकांना सांगा. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. ते जर म्हणाले, की तुझ्या ‘आयडिया’त दम आहे. तर मग त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटा. आजच्या ‘डिजिटल’ युगात तज्ज्ञांना भेटणं खूप सोपं झालं आहे. आज ‘लिंक्ड’ किंवा ‘टि्वटर’च्या माध्यमातून इलॉन मस्कलासुद्धा तुम्ही लिहू शकता. फक्त तुमची ‘आयडिया’ त्यांचं लक्ष वेधणारी पाहिजे. एकदा या लोकांकडून ‘आयडियाज’च्या बाबतीत ‘व्हॅलिडेशन’ मिळालं की, तुम्ही बिनधास्त कामाला सुरुवात करा. मी ‘फेल फार्स्ट’ऐवजी ‘प्लॅन बेटर’ या मताचा आहे.

मुलाखत व शब्दांकन : धनंजय सानप
Mob. 9850901073

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयवंत पाटील
jay@theorganiccarbon.com

सेंद्रिय शेतकरी


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके