.....हा विचार आला की मोठेपणाचे सगळे विचार जिथल्या तिथे जिरतात आणि वाटते भोवतालच्या जीवनाची नाही तर नाही, स्वतःची तरी थोडीशी ओळख पटण्याच्या काही जागा आहेत.....
पंचतंत्रात, काही आंधळे 'हत्ती' ची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करायला गेल्याची एक गोष्ट आहे. एका आंधळयाला तो खांबासारखा वाटला. दुसऱ्याला सापासारखा तर हत्तीच्या कानापर्यंत हात पोहोचलेल्या तिसऱ्याला तो सुपासारखा वाटला. जीवनाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करताना जवळ जवळ पंचतंत्रातल्या त्या आंधळयांसारखीच अवस्था होते. शाळेत दशांश अपूर्णाकांचे भागाकार नावाचा एक गणिताचा प्रकार असे. त्या भागाकारात कधी भाग तुटायचा नाही. कागद संपेपर्यंत भाज्य आणि भाजकाचे युध्द चालूच ! बाकी पूज्य राहून हे युध्द संपल्याची घोषणा करण्याचा प्रसंगच येत नसे. भाग तुटला- तुटला असे वाटायचे पण वजाबाकी केली की पुन्हा आपला कुठला तरी अपूर्णांक तहाची बोलणी पुरी न करू देणाऱ्या एकाद्या हटवादी राजकीय पक्षासारखा आपला मतभेद जाहीर करीत एकदा भाज्यांचे रूप धारण करून उभा आहेच !! संपूर्ण छेद गेला आहे आणि जीवनाची पाटी उलटी टाकून ही गणिते घालणाऱ्या त्या अज्ञात पंतोजीच्या आमंत्रणाची आपण वाट पाहात उभे आहोत असा प्रसंग येण्याची कधी शक्यता आहे असे वाटत नाही. उत्तर बरोबर आहे असा कधी भरवसा वाटावा तोच बाजूच्या विद्यार्थ्यांच्या पाटीवरील उत्तराकडे नजर जाऊन त्याचे आणि आपले उत्तर निरनिराळे आहे असे पाहून पुन्हा आपल्या उत्तराबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, अशीच अवस्था आयुष्याचे गणित सोडवतानाहि होते.
जीवनाची ओळख पटली असे वाटेपर्यंत जीवनाचा तोंडवळा बदलतो. आणि मग गडकऱ्यांच्या धुंडिराजाप्रमाणे एकाचे नाव आणि दुसऱ्याचे गाव असला घोटाळा निर्माण होतो. जीवन नावच्या व्यक्तीकडे टेलिफोन असावा परंतु त्याचा नक्की नंबर ठाऊक नसावा आणि फिरवला नंबर की 'राँग नंबर' असे 'हलो हलोला हलकट उत्तर' यावे, हाच नेहमीचा अनुभव !! परंतु आपण आंधळे आहोत. आपण हत्ती बित्तीच्या फंदात न पडता उंदीर मांजर म्हणजे काय ते समजाऊन घेऊन समाधान मानू या असा सुज्ञ विचार ज्याप्रमाणे पंचतंत्रातल्या त्या आंधळ्यांच्या डोक्यात आला नाही त्याचप्रमाणे स्वतःची कुवत न जाणता जीवनाची ओळख करून घेण्याचे माझेहि प्रयत्न चालू असतात ! राणीच्या बागेत वाघ सिंह पाहूनदेखील ज्याप्रमाणे माकडे पाहाण्याची इच्छा उरतेच त्याप्रमाणे थोर महात्म्यांची चरित्रे पाहून देखील स्वतःमध्येहि काही पाहाण्यासारखे आहे असे वाटून आत्मनिरीक्षण करण्याची माझी खोड जात नाही. रांगोळीतून सुंदर आकृति तयार करण्यापूर्वी बायका ठिपके घालतात. आणि त्या ठिपक्यांच्या आधाराने आकृति काढतात. मीहि जीवनातल्या अनुभवांचे असे ठिपके घालण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्यातून जीवनाचा जो तोंडावळा निर्माण होतो तो मात्र माझा मलाहि पाहवत नाही. आणि मानवी जीवन हे असे नसावे म्हणून घाईघाईने त्या ठिपक्यांसकट ती आकृति मी पुसून टाकू लागतो. तेवढ्यात अगदी आमंत्रण दिल्यासारखा कोणीतरी निंदक ती आकृति पाहायला हजर असतो आणि सूपवाला आंधळा खांबवाल्या आंधळ्याला जसा फिदीफिदी हसला असेल तसा मला हसतो. मी मनात म्हणतो: 'अरे तू तरी ह्या जीवनाचा चेहरा नीट काढून दाखव ना मला!!’ आजपर्यंत हे जीवन म्हणजे काय ते ओळखले म्हणणाऱ्या लोकांच्या अनुभवांची गाठोडी उलगडून तरी हाताला काय लागते? मानवी जीवनासंबंधींची ही चिकित्सा सामान्यतः एकच प्याल्यातल्या तळीरामाला तपासणाऱ्या वैद्य डॉक्टरांच्याच चिकित्सेसारखी आहे.
लहानपणी ध्रुव, प्रल्हाद वगैरे बालभक्तांच्या कथा वाचून जीवनात परमेश्वरप्राप्तीखेरीज इतर सारे काही झूट आहे असे मला प्रामाणिकप वाटे. मी स्वतः ध्रुव होण्यात महत्त्वाची अडचण म्हणजे मला फक्त एकच आई होती. आपल्याला देवाच्या प्राप्तीसाठी का होईना पण एक छोटीशी सावत्र आई असती तर काय बहार झाली असती असा भाविक विचार माझ्या त्या कालातल्या चिमुकल्या डोक्यात आला आणि तो विचार मी माझ्या सख्ख्या आईला बोलूनहि दाखवला. पाचच मिनिटात सख्खी आई ही देखील कधी कधी सावत्र मातेवर कशी ताण करू शकते त्याचा साक्षात्कार माझ्या हुळहुळणाऱ्या चिमुकल्या पाठीला झाला आणि त्यानंतर मला जो देव आठवला तितक्या उत्कटतेने ध्रुवालाहि आठवला होता की नाही देव जाणे !! प्रल्हाद होण्यात आपले वडील हिरण्यकश्यपूसारखे दुष्ट नाहीत, नव्हे ते उलट आपल्याला वेळच्या वेळी संध्या कर म्हणून सांगतात हाहि खोडा जबरदस्त होता. त्यामुळे बालभक्तांच्या पवित्र यादीत जाण्याची आमची इच्छा तशीच मावळली. पुढे वाढत्या वयाबरोबर जीवनाची वाढती ओळख झाली आणि ध्रुवाप्रमाणे प्रकाशमान होणारा अढळतारा सोडाच पण सभोंवतालचा अंधार स्पष्टपणे दाखवणारा म्युनिसिपालिटीचा कंदील होण्याचीहि आपली पात्रता नाही हे कळले!
जीवन परमेश्वरस्वरूप आहे हे ऐकून समर्थाच्या पावलापर पाऊल टाकायचे ठरविले. लहानपणी समर्थ म्हणे देवाचे चिंतन करण्यासाठी फडताळात लपून बसायचे. मातोश्री विचारायच्याः 'नारायणा, काय करतो आहेस बाळा?" नारायण सांगायचाः 'आई ऽ चिंता करितो विश्वाची!’ शनिवार सकाळ हा पाढे काढून नेण्याचा घातवार ! शुक्रवारी संध्याकाळी परमेश्वर आठवून कुठेतरी पोटमाळ्यावर लपून बसून आम्ही ध्यानस्थ बसावे आणि पाढे चुकविण्यासाठी पळालो असा हेतूंचा विपर्यास होऊन पाठ सडकून निघावी! समर्थांचे नाव झाले आणि मी ?... जाऊ दे. मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात म्हणतात.
थोरांची चरित्रे वाचल्यावर एवढेच पटले की त्याना जसे जीवन वाटले तसे काही ते खास नाही! त्या साऱ्यांची अवस्थाहि पंचतंत्रातल्या त्या आंधळ्यांसारखीच होती. कुणी फक्त जीवनातील सत्यच बोलून बसला; कोणी भक्तीचा कान धरला तर कोणी शौर्याची सोंड पाहिली. त्यांना जीवनाची ओळख पटली आहे ह्या भरवशाने पुढे निघावे तर भलतेच काही तरी उभे राहाते. सत्यवादी हरिश्र्चंद्राने स्वप्नांत दिलेले दान खरे केले ही गोष्ट दुनिया मानते! मला स्वप्नांत हेडक्लार्क माझ्या पाठीवरून प्रेमळपणाने हात फिरवून प्रमोशन देत आहे असे लाख वेळा दिसून देखील त्या बिचाऱ्याला हजारदा सांगून पटत नाही. उलट येरवडा, ठाणे वैगैरे स्थळांची शिफारस होते. हो, हे अपमान सांगायचे नाहीत असे मी ठरवले होते पण माझाहि नाइलाज आहे. कारण जीवनाची खरी ओळख मानापेक्षाहि अपमानाच्या प्रसंगातच अधिक होते, असा आपला माझा अनुभव आहे.
न्यायशास्त्रात ‘उपमा उत्प्रेक्षा-दृष्टांत’ हे काही प्रमाण मानीत नाहीत. अमुक अमक्यासारखे आहे हे तर्कशुध्द विधान समजले जात नाही. हा तार्किक दोष मान्य करूनहि जीवनाला 'लहरी बायकोची’ उपमा द्यावीशी वाटते. आता बायको नामक विधिघटनेपुढे तर्कशास्त्रानेहि हात टेकावेत हे विधान मान्य व्हायला हरकत नसावी.
इंग्रजी हवेप्रमाणे क्षणाक्षणाला बदलणारी लहरी बायको ज्याप्रमाणे तिच्या गरीब गाईसारख्या पतीपुढे पतीला गाईची उपमा चुकली परंतु उपमेत बैल बसत नाही-दीन- दुबळ्या पतीपुढे-बाकी दीनदुबळा पति हीहि व्दिरुक्तिच होते म्हणा-सरळ आपले नवऱ्यापुढे म्हणू-सदैव नुसती नवी प्रश्नचिन्हे निर्माण करीत असते त्याचप्रमाणे जीवनात नवी प्रश्नचिन्हे या पलीकडे दुसरे काही आढळत नाही। जो जो त्याचा अर्थ लावावा तो तो ते अधिक बिकट वाटू लागते. लहरी बायकोचा नवरा तिला खूष करण्याचा हमखास उपाय म्हणून दोन आण्यांची वेणी घेऊन येतो आणि त्याच दिवशी त्याची ती बायको भगिनी मंडळात कुण्या कुमारिकेचे ‘संसारातील काटकसर’ ह्या विषयावर व्याख्यान ऐकून आलेली असते. त्या कुमारी विदुषीने संसारातील सर्वात मोठी काटकसर म्हणून जीवनाच्या खर्चिक यादीतून 'नवरा’ हे कलमच गाळलेले असते. आणि ती वेणी पाहिल्यावर ह्या असल्या व्याख्यानाचा भयंकर परिणाम झालेली ती लहरी बायको डोक्यात राख घालते ! आणि दोन आण्याचे महत्त्व या विषयावर रात्रभर 'पडद्यातला पाठ' ऊर्फ 'कर्टन लेक्चर' देऊन रुपयाची वीज जाळते! निष्कर्ष इतकाच की जीवन समजावून घेण्याचा रामबाण उपाय नाही !! जीवनाच्या गणितात स्त्री ह्या घटकाचा भाग केव्हाहि तुटत नाही.
कचेरीला जाताना आपल्या मागे उभ्या असलेल्या बस स्टॉपवरच्या बाईला स्त्री-दाक्षिण्य म्हणून जागा दिली नाही तर तिचे उणे पाच नंबरच्या चष्म्यातून वटारलेले डोळे शंकराच्या तृतीय नेत्राच्या प्रखरतेने दिवसभर छळतात. म्हणून परत येताना एकाद्या कुमारिकेच्या बाबतीत स्त्रीदाक्षिण्य म्हणून अलीकडे सरकावे तर ती इंचभर हलायला तयार नसते! तरुण वयात प्रीतीच्या डोळ्यांनी पाहा म्हणून कोण्या रिकाम्या विव्दानाने लिहिलेले वाचून डोळ्यात प्रीतीचे काजळ घातले तर जगातून काळे करण्याची पाळी आली. ज्या काळात जीवनाचा रंग गुलाबी वाटला त्या काळी प्रेममय जीवन जगण्याचे भगीरथ प्रयत्न केले. कुठल्यहि गंगेला डोक्यावर घेऊन नाचायची तयारी ठेवली. पण नाही! जिथे सहा टाकावा तिथे कोणताहि तरंग येऊ नये आणि आपला एक खडा फुकट गेला ह्यापलीकडे पदरात काही नाही अशी अवस्था व्हावी !!
आंधळ्यांच्या गोष्टीतल्या सात आंधळ्यांनी एकत्र येऊन तरी सर्वोच्या अनुभवाच्या गोळाबेरजेतून हत्तीची मूर्ति डोळयांपुढे आणली असेल! जीवनात दुसऱ्याच्या अनुभवांचा काही उपयोग नाही! पुढच्यास ठेच तशीच मागच्यासहि ठेच! विशेषतः प्रेम या विषयात तर इतर मार्ग काही उपयोगाचे नाहीत. कुणीतरी उत्साहाच्या भरात सांगत येतो: "रोज ती आणि मी एका बसने जात होती. एकदा तिच्याजवळ सुटे पैसे नव्हते. मी दिले. ओळख झाली. वाढली. प्रेम जमले आणि लग्न झाले!" गावातल्या प्रत्येक बस स्टॉपवर दिवसदिवस काढलाय मी! शेवटी परिचयाच्या एका पेन्शनरने "काय हल्ली कंडक्टरांना पोषाख नसतो वाटते?" असा प्रश्न करून माझ्या ह्या प्रेममय जीवनाच्या उपासनेबद्दल जीवनाला काय वाटते ह्याचा मला अंदाज करून दिला. पण एक गोष्ट मात्र खरो की जीविताबद्दलचे बरेचसे ज्ञान त्या आठ दिवसात मला जितके झाले तितके कॉलेजच्या आठ वर्षात झाले नाही.
जीवनाची ओळख करून घ्यायला मध्यस्थ घेतला की काम बारगळले! पुस्तके आणि दुसऱ्यांचे अनुभव ह्यातून जीवनाची ओळख करून घ्यायची म्हणजे नकाशावरून नद्यांचे सौंदर्य पाहाण्यासारखे आहे! ह्यावरून आठवले, पूर्वीच्या नकाशात संस्थानांचा रंग पिवळा असे. कोकणातल्या एका संस्थानांतली तांबडी माती पाहून नकाशा किंवा ते संस्थान ह्या दोहोपैकी कशात तरी काही तरी गफलत आहे असे मला नेहमी वाटायचे !
मानवी जीवन इतक्या विविध स्वरूपात पुढे येते की त्यातून लघुत्तमसाधारण असे साम्य काढणे जवळजवळ अशक्य! एका महान् लेखकाचे मी मनःशांतीवर व्याख्यान ऐकले, त्याची एकूण गीतेतल्या स्थितप्रज्ञासारखी मूर्ति, कोणत्याहि परिस्थितीत मनाचा समतोलपणा घालवू न देण्याविषयी त्याने कळकळीने सांगितलेले विचार ऐकून वाटले की ह्याला सापडला जीवनाचा अर्थ! त्याच्या दर्शनासाठी त्याच्या बंगबर गेलो. सामान्यतः अपेक्षा अशी की बालकवीच्या निर्झराप्रमाणे खळाळून हसत त्याने माझे स्वागत करावे. पण जीवन इतके सरळ असते तर काय पाहिजे होते! त्याच्या दारातच पाटी होती. 'कुत्र्यापासून सावध रहा !!’ मनःशांतीवरील व्याख्यानाची माझी धुंदी गेली नव्हती! जीवन उदबत्तीच्या धुरासारखे संथ आणि सुगंधी वाटू लागले होते. त्या धुंदीत मी पाटी वाचली नाही आणि वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे या नादात आत शिरलो. पाचच मिनिटात माझ्या शिंप्याने मला फक्त कोटाचेन अस्तरच शिवून दिल्याचा भास व्हावा अशी त्या सनर्थाघरच्या श्वानाने माझी अवस्था केली. स्वतःला जेमतेम सावरून त्या कुत्र्याचा कपाळमोक्ष करावा म्हणून दगड उचलतो तोच त्या सज्जनाची वाणी विजेसारखी कडाडली आणि पंधरा मिनिटातच बर्फाच्या राशी असलेल्या हिमालयातून लाव्हा निघावा तशी त्या सज्जनानी जिव्हा आग ओकू लागली. मी अंतर्बाह्य रक्तबंबाळ होऊन परतलो. परत जाताना 'ते फाटक नीट लावून घ्या' असा त्या संताने लष्करी थाटात हुकूम दिला. फाटकावरची 'कुत्र्यापासून सावध राहावे ही पाटी वाचताना, आणि त्याच्या मालकापासूनहि’ अशी छोटेशी पुस्ती जोडावी असा दुष्ट विचार माझ्या डोक्यात आला! पण निमूटपणे फाटक बंद करून फाटका कोट आणी त्याहूनहि अधिक फाटलेले धोतर सावरीत मी निघालो.
ह्याच काय पण अनेक जीवनविषयक तत्त्वज्ञानावर बोलणाऱ्या विव्दानांनी मला सदैव धोका दिला आहे. एकढा मोठा कार्लाईल ‘माणसाच्या कपड्यावरून त्याची पारख होते' म्हणतो. सामान्यतः हे कोणालाहि पटावे. पण माझा अनुभव मात्र निराळा आहे. पांढरा डगला, पांढरी पाटलोण आणि पांढरा शुभ्र असा डोकीला रूमाल ह्यासारखा डौलदार पोशाख नाही असे सर्व लोक म्हणतात म्हणून मीहि तसला पोशाल शिवला. पूर्वीचे दिपोटी असला पोशाल करावयाचे. बाहेरगावी प्रवासाला जाताना पोशाख डौलदार असला तर इतर प्रवाशांचा नव्या प्रवाशाला डब्यात घेताना विरोध मावळतो! मी त्याच पोशाखात प्रवासाला निघालो. गावातला टांगेवाला सुध्दा हे कूळ सामानसुमान असले तरी तंगड्या तोडीत जाणारे म्हणून ढुंकूनदेखील माझ्याकडे पाहात नाही हा माझा नेहमीचा अनुभव. परंतु त्या दिवशी एका टांगेवाल्याने मला चक्क 'रावसाहेब सवारी स्टेशन का?' असे विचारले. त्या गुंगीतच मी टांग्यातून स्टेशनवर आलो. नुसती पिशवी होती हातात. पण हमाल 'दिवाणबहादूर’ म्हणाला म्हणून पिशवी त्याच्याजवळ दिली. गाडी आली. मी गाडीजवळ जाऊ लागलो. थर्ड क्लास सोडाच पण सेकंड क्लासमधले प्रवासीदेखील मला बोलावू लागले! एका गृहस्थाने तर टाळ्या वाजवून मी त्याच्या डब्यात यावे म्हणून हट्ट घेतला. पोषाखाचा इतका प्रभाव असेल अशी कलना नव्हती! मी मनात म्हणत होतो: "मित्रा कार्लाइला, तुला जीवनाची गुरुकिल्ली सापडली." इतक्यात माझ्या कानावर त्या प्रवाशाचे शब्द आदळले : "हे पाहा पुढल्या स्टेशनवर एक चहा आणि आमलेट घेऊन ये!" माझा पांढरा डगला, पाटलोण आणि फेटा ह्या डौलदार वेषाने मी तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा दिसतो असे मला खूप वाटले होते परंतु त्याला मात्र मी आगगाडीतल्या फिरत्या उपहारगृहाचा खानसामा वाटलो. कपड्याच्या मोठेपणाचा माझा हा अनुभव !! वर मौज ही की लोक कार्लाईलच्या मागून जातील आमच्यासारख्या जीवनात पडलेल्या लोकांमागून कोणी येणार नाही. पण असे वेळी अवेळी अपमान सोसलेल्या आमच्यासारख्या सामान्यांनी घातलेल्या अनुभवाच्या ठिपक्यांतून जी जीवनाची आकृति तयार होते तिचा तोंडावळा मात्र फार काळ टिकून रहातो.
स्वतःला विनोदबुध्दी असली तर जीवनाची ओळख लवकर पटते असे विव्दानांनी गंभीरपणाने प्रतिपादन केले आहे. स्वतःला विनोदबुध्दी आहे असा गैरसमज होतो आणि स्टेशनातला साधा बावळट हमाल तडाखा देतो. माझा एक स्वतःला विनोदी समजणारा मित्र आणि मी परगावाहून परत येत होतो. माझ्या हातात फिरकीचा तांब्या आणि पिशवी आणि माझा मित्र मासिकातल्या मुखपृष्ठांवर प्रवासाला निघालेल्या तरुणांच्या चित्रात असतो तसला पोशाख आणि हातात सुंदर कातडी बॅग घेतलेला. आम्ही स्टेशनवर आलो. हमालाने माझा अवतार पाहून मला डावलले आणि माझ्या मित्राला 'साहेब हमाल?' म्हणून विचारले. लगेच आमच्या मित्राने आपल्याजवळ फार सामान नाही हे सांगायचे सोडून "हं मलाच उचल" असे तोऱ्यांत त्या हमालाला म्हटले. मीहि हसून विनोदात भागी दाखविलो. लगेच तो हमाल, आमच्या मित्राने मलाच उचल म्हटलेले ऐकून म्हणाला "थांबा साहेब, आणि तिघे आणतो. मडक्याला हे रावसाहेब आहेतच!" एकूण माझा सुतकी चेहरा आणि वाढलेली दाढी पाहात त्या हमालाने आमची नेमणूक आघाडीवर केली होती. तेव्हांपासून मी कानाला खड़ा लावला की, हमाल, टांगे वाले, खानावळींतले वाढपी असल्या जीवनाच्या ऐन धकाधकीत वावरणाऱ्यांशी भलता विनोद कामाचा नाही. त्यांना जीवनाची ओळख पटलेली आहे. जीवनातली अवघड गणिते सोडवण्याची त्यांची उघडतोंडी पध्दत आहे, लेखी नाही. ते जीवनाची ओळख करून घेण्यासाठी धावत नाहीत. जीवन हस्तांदोलन करीत त्यांना सामोरे येते.
आणि शेवटी जीवनाची ओळख म्हणजे तरी काय स्वतःचीच ओळख ना? ती तरी अखेरपर्यंत आपली आपल्याला कुठे पटते ? चिल्लर यशांनी हुरळून जाऊन, आपण आपल्यालाच कोणीतरी थोर मानायला लागतो, व इतरांनीहि तसे मानावे अशा अपेक्षा बाळगायला लागतो. आपला स्वतःचाच उल्लेख आपण विसरतो. सगळ्या जगाने मात्र आपल्याला ओळखले पाहिजे असा दावा जगाविरुध्द आपण मांडू लागतो. आणि मग स्वतःची केळवणे आणि कौतुके करून घेण्याचे मार्ग तरी शोधू लागतो किंवा गडकऱ्यांच्या इंदुबिंदुप्रमाने 'सगळ्या मेल्यांचा डोळा रूपावर. गुणाला किंमतच नाही' अशा थाटात आपण एकूण अकारण उपेक्षित आहोत असे भासवून जगात हसे करून घेतो. स्वतःबद्दल असा काही गंड निर्माण झाला की मला वाटते माणसाने जीवनाने कोट्यवधि अंगांनी दर्शन घडवणाऱ्या मुंबईसारख्या अफाट शहरात जावे.
मला पुष्कळदा कुठे आपले नाव छापून बिपून आले की तेवढेच बरे वाटते. चार परिचित मित्र, नवा महाराष्ट्र केवळ माझ्याकडे आता आशेने पाहू लागल्याचे सांगतात. अशा वेळी जरा छाती फुगू लागते आणि तेवढ्यात मुंबईला गेल्यावर बाजूच्या चौपाटीशी स्पर्धा करणारा अफाट जनसमुदाय पाहिला की आपले क्षुद्रत्व पटू लागते. वाटते की स्वतःला मी कितीहि मोठा समजत असलो तरी ह्या गर्दीत चेंगरून जिवाचे काही बरे वाईट झाले तरी कुठे काय पत्ता लागणार आहे? फार तर पाच सहा दिवसांनी कुठे तरी ओळ छापून येईल. मयताचे नाव पी. एल्. देशपांडे आहे असे त्याच्या खिशात सापडलेल्या रेल्वे पासावरून कळते. हा विचार आला की, मोठेपणाचेच सगळे विचार जिथल्या तिथे विरतात आणि या भोवतालच्या जीवनाची नाही तर नाही स्वतःची तरी थोडीशी ओळख पटण्याच्या जगात काही जागा आहेत !
['ऑल इंडिया रेडियो मुंबई केंद्र' यांच्या सौजन्याने]
Tags: मानवी विचार जीवनाचा प्रवास आयुष्याचे धडे पु.ल.देशपांडे पु.ल.देशपांडे यांचे विचार पु.ल.देशपांडे जीवनाची ओळख weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या