डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘टाइम’ मॅगझिनच्या 4-14 फेब्रुवारी 2019 च्या अंकातील ‘लेव्हलिंग द प्लेइंग फील्ड’ या लेखाचे हे भाषांतर. लेखक जॉन लँचेस्टर विचारवंत व साहित्यिक आहे. भांडवलवादात नीतिमूल्ये असायलाच हवीत हे वारंवार ठसवणे, हा लँचेस्टरचा लक्षणगुण आहे. तितपत ‘डावेपणा’ सोडला, तर तो पारंपरिक ब्रिटिश उदारमतवादी आहे!

नंदा खरे

दावोसमध्ये दर वर्षी मोठे भांडवलदार व जागतिक अर्थव्यवस्थेचे चालक यांचे संमेलन भरते. या वर्षी त्या संमेलनात वाढत्या विषमतेवर काळजी व्यक्त केली गेली. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा अहवाल नोंदवतो की, विषमतेचा प्रश्न धोकादायक आणि विषारी पातळी गाठून पुढे झेपावतो आहे. आज शांघाय ते सॅन फ्रॅन्सिस्को याचीच चर्चा आहे.

मोठ्या अर्थव्यवस्था चाचपडत का होईना, (2008 च्या) अर्थविषयक संकटाबाहेर पडत आहेत. त्यासाठीच्या उपाययोजनांचा खरा लाभ मात्र आधीच श्रीमंत असलेल्यांना मिळतो आहे. यूएसएमधील सर्वांत श्रीमंत 0.1 टक्का लोकांची संचित संपत्ती तळातल्या 90 टक्के लोकांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. तेथे प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांची (1978) वेतने प्रातिनिधिक कामगारांच्या वेतनांच्या तीसपट असत, आज ते प्रमाण 312 पटींवर गेले आहे. आज यूएसए जगातील सर्वांत श्रीमंत व प्रबळ राष्ट्र आहे; तेथील आयुर्मान (expectancy of life at birth) घटते आहे, कारण गरीब लोक श्रीमंतांपेक्षा सुमारे पंधरा वर्षे कमी जगताहेत. यातून अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका येथील समाजामध्ये वैफल्याचा भाव जागतो आहे आणि तो समाज राष्ट्रवादी व जनवादी पक्षांना निवडून देत आहे. सन 2017 व 2018 च्या दावोस परिषदा (ज्या भांडवली अर्थरचनेचा ‘गड्डा’ असतात) ‘बाजारपेठी भांडवलवादात मूलभूत सुधारणांची गरज’ असल्याचे सांगत आहेत. हे सर्वथा अनपेक्षित आहे.

अशी स्थिती भांडवलवादाला नवी नाही. सामाजिक व लोकशाही दबावांप्रमाणे बदलणे, ही त्या वादाची पारंपरिक ताकद आहे. एकोणिसाव्या शतकात उजव्या पक्षांनी कामगार संघटना आणि सामाजिक विमा योजना स्वीकारल्या (जे बाजारपेठी मूल्यांशी फटकून होते); आज मात्र भांडवलवादी विचारवंत व राजकारणी मुक्त बाजारपेठेला सार्वभौम मानून ‘अर्थव्यवस्थांना नैतिक परिमाणही हवे’, हे नाकारताहेत. विषमता वाढल्याने भांडवलवादाचा नैतिक पायाच खचतो आहे. बहुतांश प्रजाजनांना जास्त सुखकर आयुष्य घालवण्याच्या संधी भांडवलवाद देतो. हाच त्या वादाचा नैतिक पाया असू शकतो. तशी खात्री जर नसेल, तर भांडवलवादाचे समर्थन कसे करता येईल? आज एक जनमतचाचणी  (गॅलप पोल) सांगते की- 45 टक्के अमेरिकन तरुणांचे भांडवलवादाविषयी चांगले मत आहे. दोनच वर्षांपूर्वी हे प्रमाण 57 टक्के होते. ही परिस्थिती एकाच वेळी ‘जैसे थे’ही आहे आणि स्फोटकही. कोणतेच सत्ताधीश प्रश्न सोडवायला खरे बदलाचे प्रयत्न करत नाहीत, हे झाले जैसे थे. नागरिक मात्र काळजीत, अस्वस्थतेत, असुरक्षित अवस्थेत, म्हणजेच स्फोटक स्थितीत आहेत.

यातच समाजावर मोठा आघात करणारे कृत्रिम प्रज्ञा ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऊर्फ AI तंत्रज्ञान अनेक उत्पादनतंत्रे आणि सेवा पुरवण्याची तंत्रे मानवविरहित, स्वयंचलित करत आहेत. हे रोजगारावर- आजच्या समाजाच्या सर्वांत दुबळ्या अंगावर मोठाले परिणाम करेल. विषमता असुरक्षिततेच्या भावनेवर धडकेल. एकीकडे रोजी-रोटीला मुकलेले कोट्यवधी लोक, तर दुसरीकडे ‘मी जिंकलो’ म्हणणारे मूठभर- यामुळे समाजाला एकत्र, एकसंध ठेवणे अशक्य होईल.

काही क्षेत्रांत स्वयंचलित प्रणालींचे परिणाम आजच जाणवू लागले आहेत. या शतकाच्या पहिल्या दशकातच ऐंशी लाख अमेरिकन कारखान्यांतील कामगारांनी नोकऱ्या गमावल्या. यापेक्षा वेगळे अनेकानेक ‘रोजगार’ स्वयंचलित यंत्रे व त्यांची मदत घेणाऱ्या प्रणाली करू लागतील. अमेरिकेत आज अठरा लाख ट्रक-ड्रायव्हर्स आणि पस्तीस लाख कॅशियर्स आहेत. स्वयंचलनाला AI ची जोड मिळणे ‘युगप्रवर्तक’ परिणाम घडवेल.

‘आजच्या स्वयंचलित व्यवस्थांची सुधारित आवृत्ती’ असा AI चा विचार करून भागणार नाही. वाफेच्या इंजिनानंतर विजेवर जसे बरेच विविध उत्पादन करता येते तसेच AI हे ‘सामान्य तंत्रज्ञान’, जनरल-पर्पज तंत्रज्ञान आहे. ही तंत्रे मानवी व्यवहारांच्या सांदीकोपऱ्यांपर्यंत पोचून सामाजिक-आर्थिक रचनाच बदलून टाकतात. डेमिस इसाबिस सांगतो, ‘काहींना AI चे परिणाम औद्योगिक क्रांतीच्या दर्जाचे असतील असे वाटते, तर काहींना त्याहून वरच्या पातळीचे असतील असे वाटते.’ इसाबिस हा ‘डीप माइंड’ या गुगलच्या छत्राखालील कंपनीचा सहसंस्थापक आहे. ती कंपनी मशीन लर्निंग (AI!) वर आधारित ॲप्स घडवते, अत्युच्च दर्जाचे.

(आज 1. वाफेची इंजिने, 2. वीज, 3. साध्या स्वयंचलित प्रणाली व 4. AI - आधारित प्रणाली यांना औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे मानतात. औद्योगिक क्रांती ऊर्फ इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचे हे चार IR-1, IR-2,

IR-3  आणि IR-4 या आद्याक्षरांनी ओळखले जातात.)

AI चे परिणाम समाजाने हाताळण्यात वा ‘झेलण्यात’ वेळ किंवा वेग ही कळीची बाब असते. जसे, इ.स.1900 मध्ये 38 टक्के अमेरिकन शेती करत, 25 टक्के उद्योगांमध्ये होते (आणि उरलेले 37.7 टक्के सेवाक्षेत्रात होते). आज 1.5 टक्का माणसे शेतीवर जगतात. 7.9 टक्के कारखान्यांत काम करतात (उरलेले 80.6 टक्के सेवाक्षेत्रात आहेत). पण हे बदल सुमारे सव्वाशे वर्षांत पाच पिढ्यांवर होत गेले. दर वेळी एका प्रकारच्या पेशातून ‘मोकळे’ झालेले लोक इतर पेशांत सामावले जायला वेळ मिळत असे. सन 1900 चे सेवाक्षेत्र 2.4 कोटींचे होते, जे आज 15 कोटींना रोजगार देते. आजच्या सेवाक्षेत्रातील बहुतेक पेशे गेल्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वातच नव्हते. आपला अनुभव सांगतो की, पुरेसा वेळ मिळाला तर आपण समाज म्हणून हे बदल पचवू शकतो. आपल्याकडे आज वेळ आहे का?

कोणत्या वयाची व्यक्ती किती वय ‘गाठेल’ याच्या शक्यता ठरवता येतात. आज ब्रिटनमध्ये जन्माला येणारी मुलगी शंभर वर्षांचे वय गाठेल, ही शक्यता आज ऐंशीव्या वर्षांत असलेल्या ‘ब्रिटनी’च्या शंभरीपेक्षा जास्त आहे. आता पूर्ण शतक जगणाऱ्या व्यक्तीचे कार्यरत आयुष्य किती असेल आणि ते एकाच एका पेशात असेल का, या प्रश्नांचा विचार करा. बहुधा एकच व्यक्ती दीर्घायुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे पेशे स्वीकारेल. हे स्वीकारल्याशिवाय आपल्याला सामोरे येणारे जग, त्यातले कामाचे स्वरूप समजणारच नाही.

व्यक्ती म्हणून आपल्याला नव्या जगासाठी कशी तयारी करावी लागेल, ते (काहीसे) स्पष्ट आहे. कामे बदलत राहतील आणि दर वेळी नवी कौशल्ये शिकावी लागतील. सगळे आयुष्यच असे नवनव्या शिक्षणाचे, तयारीचे, सरावाचे असेल. त्यासाठी शिकावे कसे, हे शिकावे लागेल. ते सोपे नसेल. त्यासाठी वृत्तींमध्ये लवचिकपणा, बदलांना सामोरे जायची तयारी लागेल; तेही सोपे नसेल. शिक्षण-प्रशिक्षण-पुनर्प्रशिक्षण करण्याची सोयही लागेल. तरी सुट्या व्यक्तींनी काय करायचे ते ठरवणे (तुलनेने) सोपे असेल. समाजाचे चित्र आकलणे सोपे नाही. ते अस्थिरतेचे चित्र असेल. सामाजिक आणि राजकीय इतिहास सांगतो की, माणसांना अस्थिरतेबद्दल घृणा, hate वाटते. हे एक तत्त्व आज आपण नव्याने शिकत आहोत.

व्यक्ती (रोजगार घेणारे), कॉर्पोरेट्‌स (रोजगार देणारे) आणि सरकार (नियंत्रण करणारे) यांच्या संबंधांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. येल विश्वविद्यालयाचा समाजशास्त्री जेकब हॅकर याने ग्रेट रिस्क-शिफ्ट- महान साहसी-बदल असा एक शब्दप्रयोग घडवला, जो मी उसना घेतो. कलाकार (नट-नट्या, गायक-वादक) जसे एकेक काम संपवत नव्या ‘गिग’ची वाट बघतात, तसे आज अनेक व्यक्तींना करावे लागत आहे. आजवर हे मुख्यतः कॉर्पोरेट्‌सना करावे लागे, जे आज व्यक्तींनाही करावे लागत आहे.

त्याचबरोबर सकल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपीत कॉर्पोरेट्‌सचा हिस्सा वाढतो आहे, तर कामगारांचा हिस्सा घटतो आहे. नफे वाढताहेत, तर वेतने घटताहेत. आणि हे ‘योगायोगा’ने होत नाही आहे. पण सर्वच व्यक्तींना साहसी-बदल झेपत नाहीत. त्यांना सामाजिक सुरक्षा कवचाची गरज पडेल. ते बेकारी-भत्ता या स्वरूपाचे नको, तर कामाला आधार देणारे हवे. कर्मचारी, कंपन्या आणि सरकार यांना मिळून एक नवे कल्याणकारी राज्य- वेल्फेअर स्टेट घडवावे लागेल. त्यात सतत शिक्षण घेण्याची गरज असेल याची दखल घ्यावी लागेल.

देशांतर्गत विषमतेला सामोरे जावे लागेल. त्यावर उपाय शोधण्यात सरकारची अर्थविषयक भूमिका केंद्रस्थानी असेल. सरकारला खांदे उडवून निष्क्रिय राहता येणार नाही, ही आजच्या जनवादी निवडणुकांमधून मतदारांनी दिलेली सूचना आहे. विषमता आमच्या नियंत्रणापलीकडे आहे, हे स्पष्टीकरण वा ही सबब सरकार देऊ शकणार नाही. बाजारपेठ विषमता आटोक्यात आणू शकत नाही. लोक, कॉर्पोरेट्‌स व सरकार यांना एकत्रपणे करांची रचना बदलूनच विषमता सौम्य करता येते.

AI क्रांतीच्या रचनाकारांमध्येही काहींना हे मान्य आहे. यॅन लेकुन हा डीप लर्निंग प्रणालींच्या आघाडीच्या शिलेदारांपैकी आहे. तो आज फेसबुकचा AI प्रमुख आहे. तंत्रज्ञानामुळे वाढणारी विषमता या विषयावर तो अनेक अर्थतज्ज्ञांशी बोलत असतो. चर्चांचा निष्कर्ष तो सांगतो. ‘सर्वांनाच सरकारने कर-आकारणीतून संपत्ती आणि उत्पन्नाचे (जास्त समन्यायी) वितरण करून हवे आहे.’ (मुक्त बाजारपेठी अर्थतज्ज्ञ हे नाकारतात.)

बाजारपेठ जास्त सक्रिय करायला हवी. यूएसएने एकाधिकारविरोधी अँटाय-ट्रस्ट व तसले कायदे कित्येक वर्षे वापरलेलेच नाहीत. केबल टीव्ही, विमानसेवा, ऑनलाईन जाहिरातींपासून शेतीपर्यंत अनेक क्षेत्रांत आज कॉर्पोरेटक्षेत्राचे, सत्तेचे विघातक एकत्रीकरण झाले आहे; ते यामुळेच. अर्थव्यवस्थेचे मोठाले भाग आज रॉबर बॅरन्सच्या (पुंड-धनिकांच्या) हातात गेले आहेत. कॉर्पोरेट नफे उफाळताहेत आणि वेतने गोठल्यासारखी झाली आहेत. कामगारांना भांडवली व्यवस्थेवर विश्वास ठेवायची कारणे उरलेलीच नाहीत.

हे असेच चालू राहिले, तर ‘विनर टेक्स ऑल’; म्हणजे एक पक्षच सारे ‘घेतो’, तर दुसरा कंठशोष करत राहतो- अशी स्थिती येईल. काही क्षेत्रे डेटासेन्सिटिव्ह, विदा-हळवी आहेत. त्यांमधले कळीचे शोध लावणाऱ्या AI कंपन्या ती क्षेत्रे बळकावतील. त्यांचे नफे आणि समभागांच्या किमती प्रचंड वाढतील. सोबतच त्यातून अनेकानेक रोजगारसंधी नष्ट होतील. स्वयंचलित कार्स, ड्रायव्हरलेस कार्स हे क्षेत्र अशा टप्प्यावर आहे. दोनेक वर्षांत तो प्रकार प्रत्यक्ष वापरात येईल.

आजच अशा ‘कलां’मुळे- ट्रेंड्‌समळे काही कंपन्या काही दशके अकल्पनीय श्रीमंत झाल्या आहेत; त्यांचे काय करायचे? हिशेबनिशी युक्त्या-प्रयुक्त्या वापरून, आपल्या देशांबाहेर (ऑफ-शोअर) आपल्या कंपन्यांची नोंदणी करून या कंपन्या नफ्यांवरचे करभार चुकवताहेत. ज्या समाजांमध्ये राहून या कंपन्या हे करताहेत, त्यांना त्या कर देत नाहीत; उलट त्या समाजापासून सत्य लपवताहेत. त्या भविष्याची गोड-गुलाबी स्वप्ने दाखवणारे थिंक-टँक्स उभारताहेत. ते सोडून सध्याच्या आपल्या परिसरातील आयुष्यांचा विचार या कंपन्यांनी करायला हवा.

नागरिकांना आयुष्यभर गरज पडेल ते शिक्षण देणे, जास्तीत जास्त न्याय्य होत जाणारी करव्यवस्था घडवणे, कॉर्पोरेट्‌सना आज दिले जाणारे संरक्षण जरा हलके करणे; हे सारे सरकारने करायला हवे. त्यासाठी सरकार-जनता-कंपन्या अशी भागीदारी रचावी लागेल. या अपेक्षांमधले- आशांमधले सर्वांत भोळसट, सर्वांत अकल्पनीय वाटणारे अंग म्हणजे (तिन्ही भागीदारांपैकी) अभिजनांची नवी मूल्ये स्वीकारण्याचे.

अभिजनांना नव्या रचनेत जबरदस्तीने सामील केले जायला नको असेल, तर त्यांनी स्वतःला बदलायला हवे. AI तंत्रज्ञानाची लाट सामावून घेणे, हे आजच्या भांडवलवादापुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

काहींना नव्या वातावरणाशी जुळते घेण्याची, नवी कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच मिळणार नाही. त्यांच्यापाशी नव्या जगाला उपयुक्त अशी कौशल्ये नसतील, सुरक्षितताही नसेल. ते निरुपयोगी- ‘यूजलेस’ असतील. सगळे जग AI च्या निर्मम, निष्ठुर नियंत्रणात जाईल आणि आजच्या जनवादी चळवळी सौम्य वाटाव्यात, अशा कृती तंत्रप्रगत विकसित देश करतील.

अनुवाद: नंदा खरे 

Tags: टाईम मॅगझीन अनुवाद नंदा खरे जॉन लँचेस्टर leveling the playing field translation nanda khare john lanchester time magazine weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जॉन लँचेस्टर

ब्रिटीश विचारवंत व साहित्यिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात