डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

80 वर्षांपूर्वीच्या कादंबरीतील एक प्रकरण

बसून राहिलेल्या पुरुषांनी समजून घेण्यासाठी डोळे विस्फारत सर्व ऐकून घेतलं. काही काळ असाच जाऊ दिला, तर चालणार नाही का? शक्य आहे की, पुढील वर्ष चांगलं ठरेल. पुढील वर्षी कपाशीचं किती पीक येईल, ते ईश्वरच जाणतो. आणि इतकी सर्व युद्धं सुरू असताना- कापसाला काय भाव मिळेल, तेही ईश्वरच जाणो. ते कापसापासून स्फोटकं बनवतात का? आणि सैनिकांचे पोशाख? भरपूर युद्ध करा आणि पाहा, कापसाचे भाव गगनाला भिडतील. पुढील वर्षी शक्य आहे. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रा करून वर पाहिलं. परंतु, आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही. ती बँक - दैत्य बँकेला सदासर्वकाळ नफा मिळवावाच लागतो. ती कुणाकरता थांबून राहू शकत नाही. ती थांबली, तर मरूनच जाईल. नाही, म्हणजे कर वाढतच जातात; परंतु दैत्य बँकेची वाढ थांबली, तर ती मरूनच जाते. क्षणभरही थांबू शकत नाही ती.

शेतजमिनींचे मालक वारंवार गावात आले किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक वारंवार मालकांचे प्रवक्ते गावात आले. ते बंद वाहनांतून आले आणि जमिनीचा कस जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या हातांच्या बोटांनी कोरड्या जमिनीला स्पर्श करून पाहिला. आणि काही वेळा ते जमीन खोदण्यासाठी मोठी गिरमिटं घेऊन शेतांमध्ये पोहोचले- मातीची चाचणी करण्यासाठी. खंडाने वहिती करणाऱ्या कुळांच्या घरांचे दरवाजे उन्हाने तडकून निघालेले होते. ती बंद वाहनं शेतांच्या बाजूच्या रस्त्याने येऊ लागली की, ती कुटुंबं अस्वस्थ होऊन दरवाज्यांशी उभी राहत होती आणि सुरू झालेल्या अशा सर्व गोष्टी पाहत होती. अखेरीस, ते मालक लोक आपल्या मोटारगाड्या घेऊन थेट त्यांच्या घरांच्या आवारात येऊन थडकले. गाडीतच बसून राहून, खिडक्यांच्या काचा खाली करून ते थाटात त्या कुटुंबांना बोलणी करण्यास बोलावू लागले. कुटुंबातील पुरुषमंडळी काही वेळ मोटारगाड्यांच्या बाजूला उभी राहिली आणि नंतर खाली जमिनीवरच उकिडवी बसली; धूळमातीत रेघोट्या काढण्यासाठी त्यांनी काड्याही सोबत आणलेल्या होत्या.

घरांचे दरवाजे उघडेच होते आणि त्यांतील बायका दरवाज्यात उभं राहून काय सुरू आहे, ते पाहत होत्या; मुलंही त्यांच्यामागे येऊन उभी राहिली. अनवाणी असलेली ती मुलं एक पाऊल दुसऱ्या पावलावर टेकवून, पायांच्या बोटांनी मातीशी चाळा करत, डोळे ताणून पाहत होती. घरातील पुरुषमंडळी त्या मालकांशी काय बोलत आहेत त्याकडे बायका आणि मुलं लक्ष ठेवून होती. ते स्तब्ध होते.

मालकांपैकी काही जण असे होते की, त्यांना जे काही करायला लागत होतं, त्याचा तिटकारा वाटत असल्याने जरा दयाबुद्धीने वागत होते आणि काही जण रागात होते. कारण, त्यांना दुष्ट व्हावं लागण्याचा तिटकारा वाटत होता आणि काही जण अत्यंत थंडपणे वागत होते, कारण त्यांना पूर्वीच याची जाणीव झालेली होती की, भावनाशून्य झाल्याशिवाय कुणीही मालक बनू शकत नाही. त्यांच्यातील सर्वच जण त्यांच्या स्वतःच्याही आकलनापलीकडे ठरेल, अशा मोठ्या बिकट परिस्थितीत सापडले होते. त्यांतील काहींना गणिती आकडेमोड करण्याचा तिटकारा होता, काही जण घाबरून गेलेले होते आणि काही जणांनी मात्र गणितभक्तीचा मार्ग पत्करला होता. कारण, मानवी विचार आणि भावभावना यांपासून दूर राहण्यासाठी गणितभक्तीच्या आसऱ्याला जाणं सोईस्कर ठरत होतं. जमिनीची मालकी जर का एखाद्या बँकेकडे किंवा पत-पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे गेलेली असेल, तर मालक म्हणत होता, त्या बँकेला- किंवा त्या कंपनीला- त्या जमिनीची गरज आहे. त्यांना ती जमीन पाहिजे आहे- पाहिजेच आहे- आग्रहपूर्वक पाहिजे आहे- स्वतःकडे असायलाच हवी, असं वाटायला लावणारी आहे. जणू काही ती बँक किंवा कंपनी ही एक अक्राळविक्राळ दैत्य होती, जिला विचार व भावना होत्या आणि जिने त्यांना जाळ्यात पकडलेलं होतं.

अखेरीस, बँक वा कंपनीच्या कृतींसाठी हे मालक लोक कोणतीच जबाबदारी स्वीकारणार नव्हते, कारण ती माणसं होती व दास होती आणि बँक वा कंपनी या यंत्र होत्या, स्वामी होत्या- एकाच वेळी दोन्ही. काही मालक-माणसांना अशा भावनाशून्य, थंडगार आणि शक्तिमान अशा स्वामींचे आपण दास असल्याचा अभिमान वाटत होता. मालक-माणसं आपल्या गाडीत बसून राहिली आणि त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या- तुम्हाला माहितीये जमीन निकृष्ट झालेली आहे. तुम्ही ती किती वर्ष खरवडत बसलात, ते ईश्वरालाच माहीत.

खंडकरी कुळातील पुरुषमाणसांनी माना डोलावल्या. नीटसं न उमजल्याने ते विचार करत राहिले आणि धूळमातीत रेघोट्या काढत राहिले. आणि हो, त्यांना एक मात्र माहीत होतं की, ईश्वर सर्व जाणून आहे. जर का धूळ उडत राहिली नाही, माती जमिनीला घट्ट धरून राहिली आणि जमिनीचा पृष्ठभाग टिकून राहिला, तर ही जमीन तितकीशी वाईट ठरणार नाही.

मालक लोक आपला मुद्दा पुढे रेटत राहिले- तुमची जमीन कशी आहे, ते तुम्ही ओळखून आहात, दिवसेंदिवस निकृष्ट होत चाललेली आहे. कपाशी जमिनीचे काय हाल करते, ते तुम्हाला माहितीये; तिचं सर्वस्व लुटून घेते, तिचं सर्व रक्तच शोषून घेते.

बसकण मारून बसलेल्या माणसांनी मान डोलावली- त्यांना माहीत होतं, ईश्वर जाणून होता. त्यांनी आलटून- पालटून वेगळी पिकं घेतली, तर ती पिकं पुन्हा त्या जमिनीत जीव ओततील.

हं... पण आता फार उशीर झालेला आहे. मालक लोकांनी त्या दैत्याची काम करण्याची व विचार करण्याची पद्धत कशी आहे आणि तो त्यांच्यापेक्षा कसा सशक्त आहे, ते सर्व समजून सांगितलं. माणूस एक वेळ जमीन जरूर आपल्या ताब्यात ठेवू शकतो- जर तो खाऊ-पिऊ शकत असेल आणि कर भरू शकत असेल, तर; करू शकतो तो तसं.

हो, तो तसं करू शकतो- पण कुठवर? एके दिवशी पिकाची नासाडी होईस्तोवर आणि त्याला बँकेकडे कर्जाऊ पैशासाठी हात पसरावे लागेस्तोवर.

परंतु, तुम्ही एक समजून घ्या- बँक वा कंपन्या असं करू शकत नाहीत, कारण अशा प्राण्यांना श्वास घेण्यासाठी हवा लागत नाही आणि खाण्यासाठी डुकराचं मांस लागत नाही. ते केवळ नफ्याने श्वास घेतात आणि पैशांवरील व्याज खातात. जसे तुम्ही हवेविना, डुकराच्या मांसाविना मरून जाता, तसेच ते नफ्याविना, व्याजाविना मरून जातात. ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, पण ती तशीच आहे आणि आहे हे असं आहे.

बसून राहिलेल्या पुरुषांनी समजून घेण्यासाठी डोळे विस्फारत सर्व ऐकून घेतलं. काही काळ असाच जाऊ दिला, तर चालणार नाही का? शक्य आहे की, पुढील वर्ष चांगलं ठरेल. पुढील वर्षी कपाशीचं किती पीक येईल, ते ईश्वरच जाणतो. आणि इतकी सर्व युद्धं सुरू असताना- कापसाला काय भाव मिळेल, तेही ईश्वरच जाणो. ते कापसापासून स्फोटकं बनवतात का? आणि सैनिकांचे पोशाख? भरपूर युद्ध करा आणि पाहा, कापसाचे भाव गगनाला भिडतील. पुढील वर्षी शक्य आहे. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रा करून वर पाहिलं.

परंतु, आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही. ती बँक - दैत्य बँकेला सदासर्वकाळ नफा मिळवावाच लागतो. ती कुणाकरता थांबून राहू शकत नाही. ती थांबली, तर मरूनच जाईल. नाही, म्हणजे कर वाढतच जातात; परंतु दैत्य बँकेची वाढ थांबली, तर ती मरूनच जाते. क्षणभरही थांबू शकत नाही ती.

....

बसकण मारून बसलेली पुरुषमंडळी पुन्हा खाली मान घालून बसली. आम्ही काय करावं, अशी तुमची अपेक्षा आहे? पिकातला आमचा वाटा कमी केला, तर तो आम्ही स्वीकारू शकत नाही- आधीच आम्ही अर्धपोटी आहोत. लहान लेकरांना तर सारखी भूक लागते. कपडेही धड नाहीत आमच्याकडे, आहेत ते विटके फाटके असे. सर्व शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे सारख्या दर्जाचे कपडे असले, तर बरं असतं; नसल्यास एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाण्याची लाज वाटते.

आणि मग अखेरीस, मालक मंडळी मूळ मुद्यावर आली. खंडाने जमिनी कसायला देण्याची पद्धत आता उपयोगाची ठरू शकणार नाही. आता ट्रॅक्टरवर बसून काम करणारा माणूस बारा किंवा चौदा कुटुंबांचं काम एकहाती करू शकेल आणि तो आता त्या कुटुंबांची जागा घेईल. त्याला मजुरी द्या आणि सर्व पीक तुम्ही घ्या. आम्हाला तसं करावंच लागेल. आम्हाला असं सर्व करणं प्रशस्त वाटत नाही, परंतु तो दैत्य आजारी आहे. त्या दैत्याला काही तरी झालेलं आहे.

पण, तुम्ही कापसाच्या लोभाने केवळ पऱ्हाटीचीच लागवड करून जमिनीची वाट लावून टाकाल.

आम्ही जाणतो. ही जमीन मृतवत होण्याआधी आम्ही कपाशीचं झटपट पीक घेऊ आणि मग जमीन विकून टाकू. ‘ईस्ट’कडील (1) अनेक जणांना येथील भू-खंड मालकी-हक्काने विकत घेण्यात स्वारस्य आहे.

खंडकरी माणसं अवाक्‌ होऊन, मान वर करून त्यांच्याकडे पाहू लागली. पण आमचं काय होईल? आम्ही दोन वेळचं कसं खाणार?

तुम्हाला ही जमीन सोडून जावं लागेल. तुमचे नांगर आता या आवाराच्या द्वारातून बाहेर जातील.

आणि आता मात्र ती बसलेली माणसं रागाने उठून उभी राहिली. ग्रॅम्पाने ही जमीन बळकावली होती आणि त्यासाठी त्यांना काही ‘इंडियन्स’ची (2 ) हत्या करून त्यांना हुसकावून लावावं लागलं होतं. आणि पांचा तर जन्मच इथला त्यांनी इथलं रानगवत आणि साप दोन्ही नष्ट केले. मग पुढे एक वर्ष खराब गेलं आणि त्यांना थोडे पैसे कर्जाऊ घ्यावे लागले. आणि आमचा जन्मही इथेच झाला. त्या दरवाजाशी पाहा- तिथेच आमच्या मुलांचाही जन्म झाला. आणि पांनासुद्धा कर्ज घ्यावं लागलं. मग बँकेने जमिनीचे मालकी-हक्क घेतले, पण इथे वसलेले आम्ही इथेच राहिलो आणि आम्ही या जमिनीत जे पिकवलं, त्यातील थोडा अंश आमच्या वाट्याला आला.

आम्ही ते जाणून आहोत- सर्व काही. आम्ही नाही, कर्ती-करवती बँक आहे. बँक माणसासारखी नसते. किंवा, पन्नास हजार एकर जमिनीचा मालक- तोसुद्धा माणसासारखा नसतो. हे सर्व त्या अक्राळविक्राळ दैत्याचं काम आहे.

नक्कीच, खंडकरी ओरडले, पण ही आमची जमीन आहे. आम्ही या भूमीची मोजणी केली आणि तिची भू-खंडांमध्ये विभागणी केली. आम्ही या भूमीवर जन्म घेतला, प्राण सोडले आणि स्वतःला मारून घेतलं. जरी ही जमीन चांगली नसली, तरी ती आमचीच आहे. त्यावर जन्मलो, काम केलं आणि मेलो- असं सर्व झाल्यानेच ती आमची आहे. अशा गोष्टींनीच मालकी ठरत असते, आकडे खरडलेल्या एखाद्या कागदाने नाही.

माफ करा आम्हाला. हे आमचं काम नाही, त्या दैत्याचं आहे. बँक माणसांसारखी नसते.

हो, पण बँक माणसांचीच बनलेली असते.

नाही. तिथेच तुमची चूक होत आहे - गल्लत करत आहात तुम्ही. बँक माणसांपेक्षा काही तरी भिन्नच असते. असं होतं की, बँक जे करते त्याचा बँकेतील प्रत्येक माणूस तिटकाराच करतो आणि तरीदेखील बँक तसं करते. मी सांगतो न तुम्हाला, बँक म्हणजे, माणसापेक्षा बरंच विशाल असं काही तरी आहे. ती दैत्यच आहे. माणसांनी तिला घडवलं, परंतु, माणसं तिच्यावर नियंत्रण करू शकत नाहीत.

खंडकऱ्यांनी आक्रोश केला, ग्रॅम्पाने इंडियन्सची हत्या केली, ‘पां’नी जमिनीसाठी साप मारले. आता असं होऊ शकतं की, आम्ही बँकेला मारून टाकू- बँक ‘इंडियन्स’ आणि सापांपेक्षा वाईट आहे. आमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी आम्हाला आमच्या ग्रॅम्पा आणि ‘पां’नी केला, तसा संघर्ष करावा लागेल.

आता मालक मंडळी क्रुद्ध झाली. तुम्हाला जावं लागेल.

पण, ही जमीन आमची आहे, खंडकऱ्यांनी आक्रोश केला, आम्ही...

नाही. बँकेची, त्या दैत्याच्या मालकीची आहे. तुम्हाला जावंच लागेल.

आम्हाला बंदुका मिळवाव्या लागतील, जशा आमच्या ग्रॅम्पाने ‘इंडियन्स’ आले तेव्हा मिळवल्या, तशा. मग काय कराल?

ठीक आहे - प्रथम शेरिफ येतील आणि नंतर लष्कराची कुमक येईल. तुम्ही इथे राहणं सुरू ठेवलंत, तर तुम्ही चोरी करत आहात, असं समजलं जाईल; तुम्ही वास्तव्य सुरू ठेवण्यासाठी कुणाची हत्या केलीत, तर तुम्ही खुनी ठराल. दैत्य काही माणूस नाहीये, परंतु तो त्याला जे पाहिजे ते करण्यास माणसांना प्रवृत्त करू शकतो.

पण, आम्ही गेलो, तर जाणार कुठेऽ? कसे जाणाऽर? आमच्याकडे पैसा-अडका काही नाही.

माफ करा, मालक मंडळी म्हणाली- बँक, पन्नास हजार एकरवाले मालक हे काही यासाठी जबाबदार ठरू शकत नाहीत. जी जमीन तुमची नाहीये, त्यावर तुम्ही वसलेले आहात. एकदा का तुम्ही सीमा पार करून गेलात की, तुम्हाला रस्त्यात कपाशी वेचण्याचं काम मिळू शकेल. असंही होऊ शकतं की, तुम्ही निराश्रितांच्या छावण्यांत आश्रय घ्याल. नाही तर, तुम्ही पश्चिमेला कॅलिफोर्नियात का नाही जात? तिथे कामं मिळू शकतात आणि तिथे कधीच थंडीही फार नसते. इतकंच काय, तिथे तुम्ही कुठेही पोहोचा आणि झाडावरील संत्री काढण्याचं काम करा. इतकंच काय, तिथे काही न काही पिकं घेतली जातात आणि अशा शेतांत तुम्हाला काम मिळू शकतं. तुम्ही तिथे का नाही जात? असं म्हणून मालकमंडळींनी आपल्या गाड्या सुरू केल्या आणि ते तिथून निघून गेले.

.........

दुपारच्या वेळी कधी तरी ट्रॅक्टरच्या चालकाने एका खंडकऱ्याच्या घरापाशी आपला ट्रॅक्टर थांबवला... ज्या खंडकऱ्यांना अजून हुसकावून लावलेलं नव्हतं, ते त्या चालकाला भेटायला आले- त्याने गॉगल आपल्या डोळ्यांवरून काढलेला होता आणि संरक्षक ‘मुखवटा’ही काढलेला होता- त्या गॉगलमुळे त्याच्या डोळ्यांभोवती लहान पांढरी वर्तुळं उमटलेली होती आणि नाका-तोंडाभोवती एक मोठं पांढरं वर्तुळ उमटलेलं होतं.... काही वेळाने ज्या खंडकऱ्याला ते ठिकाण सोडून निघून जाणं शक्य झालेलं नव्हतं, तो ट्रॅक्टरजवळच्या सावलीत जाऊन बसला आणि चालकाला म्हणाला-

‘तू जो डेविस’चा मुलगा, होय नाऽ?

होव, बराबर. चालक म्हणाला.

होव ना, मंग येक सांग - तुमी आसं काम काऽहून करते? - अन्‌ त्ये बी सोताच्या लोकाईच्या इरोधात?

दिसाले तीन डॉलर भेटते. रातीच्या जेवनाची मारामार होती; त्यासाठी इतंतितं काम करा लागत होतं अन्‌ त्या गोठीचं लई बेकार वाटत होतं - कंधीमंधी ते बी भेटंत न्होतं. घरी बायको हाऽये, लेकरं हायेऽ. साऱ्याले खाले लागतेऽ. दिसाले तीन डॉलर अन्‌ ते बी हररोज भेटते, बस्स.

ते बराबर हाये म्हनाऽ, खंडकरी म्हणाला. पन, तुले तीन डॉलर भेटले, तं त्याच्यासाठी पंधरा-बीस परिवारायच्या पोटावर पाय पडते नाऽ, भौऽ. शंभर-येक लोकाईले आज गाव सोडून जा लागलं नाऽ, भटकून राह्यले तेऽ, तुह्यावाल्या तीन डॉलरपायीऽ. बराबर हाय काऽ हे?

मग चालक म्हणाला, त्याचा इचार मी नाई करू शकत. मले माह्या लेकरांचा इचार करा लागते. दिसाले तीन डॉलर अन्‌ ते बी हररोज भेटते. वक़त बदलून राह्यला, मिस्टरऽ; तुले माहीत नाई काऽय? तुह्यापाशी दोन, चार नाई तं धा हजार येकर जमीन अन्‌ येक ट्रॅक्टर इतकं कम से कम नसंन नाऽ, तं तुमी लेको, आता जगूच शकत नाई. पिकं देनेवाली जमीन आपल्यासारख्या ल्हान लोकाईले आता नाही पुरत. आपन कोनी ‘फोर्ड’सारखे बडे उद्योगवाले नाई आन्‌ आपलीवाली एखांदी टेलिफोन कंपनी बी नाई, म्हनून आपन गया काढून लडतो काऽय? आताची पिकंच अशी हायेऽ, त्याले कोन काय करनारऽ? त्याचं कोनीच काई करू शकत नाई. कुठं तरी तीन डॉलर भेटून जाईन, असी कोशीस करा लागते. तोच येक रस्ता हायेऽ.

त्या खंडकऱ्याने त्यावर विचार केला. मोठी मजेदार गोठ हाये, नाईऽ? जर मान्साची सोताच्या मालकीची थोडीबहुत संपत्ती असंन, तं ती संपत्ती म्हंजेच त्यो, त्याचाच भाग अन्‌ ती संपत्ती बी त्याच्यावानीच. त्यानं आपल्यावाल्या मालकीचा जमीन-जुमला काऽहून घेतला असंन - यासाठी का, त्याले आपल्या वावरात मोकया मनानं चाल्ता याले पाह्यजे, अन्‌ त्याचे सारे वेव्हार पाह्यनं जमलं पाह्यजे, अन्‌ काई भलं होत नसंन, तं त्याचं त्याले दुख झालं पाह्यजे; अन्‌ पानी चांगलं आलं, तं मनाले सुख भेटा पाह्यजे- असं सारं जमलं, तं ते संपत्ती म्हंजे त्योच- अन्‌ येक परकारे तो तिच्यापरिस बी मोठा बनते, कारन ते संपत्ती त्याच्या मालकीची अस्ते. त्याले शेतीमंधी फायदा बी नाई भेटला, तरी बी त्याच्या संपत्तीसंग तो मोठाच अस्ते नाऽ?

थोडा आणखी विचार करून खंडकरी पुढे म्हणाला, पन तसं असंन तं मंग मान्साले अशी संपत्ती भेटू दे जा- जी त्याले दिसनारच नाई, किंवा अशी, ज्यात लुडबुड कराले त्याला वक़तच भेटनार नाई, आन्‌ ज्यावर आरामानं चालू शकंन, अशा जमिनीपतुर पोहोचनं त्याले जमनारच नाई - मंग, तुमी कसं म्हनाल का, ती संपत्ती म्हंजेच त्यो मानूस. त्याले जे पाह्यजे, ते त्यो करू शकनार नाई; त्याले पाह्यजे तसा त्यो इचार करू शकनार नाईऽ. संपत्ती म्हंजे मानूस, त्यो आता हाये, त्यापरिस बी ताकदवान. अन्‌ त्यो छोटाच, मोठा नाईऽ. त्याच्या ताब्यामंधी जे असंन तेच फकस्त मोठं - अन्‌ त्यो त्या संपत्तीचा सेवक, असं बी असंन.

चालकाने हातात धरलेल्या मोठ्या ब्रँडधारी ‘पाय’चा मोठा चावा घेतला आणि बाकीचा फेकून दिला. वक़त बदलला हाये, हे माहीत नाई का तुलेऽ? असा मोठा इचार करून लेकराईचं पोट नाई भरता येत. दिसाले तीन डॉलर कमवा लागते अन्‌ लेकरांचं पोट भरा लागते. दुसऱ्या लोकाईच्या लेकराची फिक़र करन्याचं काई कामच नाईऽ- त्याईच्यासाठी कोनी तुमाले बोलावत नाई. तुह्यासारख्या भोपंजी गोठी बोललं, तं इज्जत भेटते, पन येका दिसाले तीन डॉलर नाई भेटऽत. तुमी ते तीन डॉलर सोडून दुसऱ्याच गोठींची फिक़र केली, तं मोठे मान्सं तुमाले रोजचे तीन डॉलर नाई देनाऽर.

करीब-करीब शंभर लोकाईले आज घरदार सोडून रस्त्यावर या लागलं नाऽ, तुह्यावाल्या त्या तीन डॉलरपायी. कुठं जानार तेऽ?

अरे होव, बरी आठोन झाली, चालक म्हणाला, तू लौकर घर सोडून गेला तं बरं होईन. रातीच्या जेवनानंतर, मी तुह्यावाल्या घराच्या गेटच्या अंदर घुसनार हाये.

हां, म्हंजे, तूच होय त्यो नाईऽ ज्यानं आज सकायी माह्यीवाली विहीर भरून टाकलीऽ, हां.

होव, माहीत हाये मलेऽ. सारं येका सीद्या लाइनमंधे करन्यासाठी करा लागलं मले तसं. पन, रातीच्या जेवनानंतर मी तुह्यावाल्या आवाराच्या गेट’च्या आत घुसनार हायेऽ, होऽव, आंधीच सांगून राह्यलो तुलेऽ. सारं लाइनमंधे आना लागते मले. अन्‌ होव- तू माह्या बुढ्याले- ओल्ड जो डेव्हीसले वयखतं, म्हनून मी तुले हे सारं सांगून राह्यलो. मले आदेश भेटला हाये का, जिथं कुठं बी गाव सोडून निंघून गेला नाई, असा परिवार भेटंन, तिथं जर का, माह्या हातून काई अपघात झाला तं... तुले माहीत हायेऽ, मी ट्रॅक्टर घेऊन एखांद्याच्या घराच्या येकदम नजीक गेलो अन्‌ ठोस लागल्यानं जर का त्याचंवालं घर पडलं तं- हां... त्यासाठी मले दोन डॉलर भेटू शकते. अन्‌ माहीत हायेऽ, माह्या ल्हान्या लेकराले आतापरिस कंधी बी पायात घालाले बूट भेटले न्होते.

हे घर... म्या माह्या सोताच्या हातानं बांधलं हायेऽ. पानी गयाले नोको, म्हून छतावर लाकडी पटल्या ठोकन्यासाठी म्या सारे वाकडे-कुकडे झालेले जुने खिळे सीदे केल्ते. छपराचे तिरके वासे म्या सोतानं गासडी बांधन्याच्या तारेनं कयकचून बांधले होते. घर माह्यवालं हाये. म्या ते बांधलं हायेऽ. तू त्याले धक्का लावूनच पाह्य - म्या रायफल घेऊन खिडकीत बसलो दिसंन तुलेऽ. तू नजीक जरी आला नाऽ, तरी जसा सशाले पक्का नेम धरून मारते नाऽ, तसा मारंन तुलेऽ.

करनारा मी नाई हायेऽ, भौ. या कारवाईमंधी मी माह्या मनानं काईच करू शकत नाई. मी जर हे काम केलं नाई, तं मले भेटलेलं काम माह्या हातून जाईन. अन्‌ हे पाह्य- तू जर का मले मारून टाकलं, तं काय होईनऽ? ते तुले फासावर चढोतील; अन्‌, तुले फासावर चढोन्याअगुदरच ट्रॅक्टरवर दुसरा मानूस बसला असंन अन्‌ तो तुह्यवालं घर पाडून टाकंन. तू बारबार मान्साले मारनार नाही हायेस.

आसं हाये, नाईऽ, खंडकरी म्हणाला. तुले आदेश कोन देल्ला? म्या त्याचा पिच्छा करतो. त्यालेच मारून टाका लागते.

गल्लत करून राह्यला तूऽ. त्याले बँकेकडून आदेश भेटला हायेऽ. बँकेनं त्याले सांगितलं का, ‘त्या लोकाईले हाकलून दे, नाई तं तुह्यावाला जॉब जाईन.’

आस्सं! मंग बँकेचा अध्यक्ष हाये, संचालक मंडल हायेऽऽ. म्या रायफलमंधी दाबून काडतूसं भरंन, अन्‌ थी रायफल घेऊन बँकेमंधी जाईन.

चालक म्हणाला, येक जन मले सांगत होता का, बँकेले ‘ईस्ट’कडून आदेश भेटते. तिथून असा आदेश होता का, ‘शेतजमिनीतून नफा होतो असं दाखवून द्या, नाही तर तुमची बँक बंद करून टाकण्यात येईल.’

पन, हे सारं जाऊन थांबते कुठंऽ? आमी कोनाले मारू शकतोऽ? उपासमारीनं मारून टाकनाऱ्याले माराच्या आंधी मले मरून नाई जायचं हायेऽ, होऽव.

मले नाई माहीत. आसं बी असंन नाऽ का, मारन्यावानी कोनी नसंनच. आसं बी असंन का, कोनी मानूस हे सारं करत नसंनच. तू म्हनला, तसं बी असंन का, संपत्तीच हे सारं घडवत आसंन. बरं, हे पाह्य, ते काई असंन, मले भेटली ते ऑर्डर मी तुले सांगून देल्ली, झालं.

मले इचार करा लागंन, खंडकरी म्हणाला. आपल्या साऱ्यालेच इचार करा लागंन. हे सारं बंद करन्याचा काई तं रस्ता असंनच नाऽ. इज पडली वा भूकंप झाला, तशातली तं गोठ नाई नाऽ हीऽ? मान्सानंच बनोलेली काई तरी गोठ आपल्या जीवनात आली हाये, अन्‌ बाय गॉड, अशी गोठ आपन बदलू शकते, होव.

खंडकरी प्रवेशद्वाराशी ठाण मांडून बसला आणि चालकाने ट्रॅक्टरचं इंजिन सुरू केलं... प्रवेशद्वाराच्या पलीकडील जमिनीला ट्रॅक्टरने एक दणदणीत छेद दिला... ट्रॅक्टर पुन्हा मागे आला. मागे येताना त्याच्या लोखंडी गार्डने घराच्या एका कोपऱ्याचा लचका काढला, भिंत कोसळून पडली आणि नंतर त्या छोट्या घराला एक असा जोरदार हिसका दिला की, ते त्याच्या पायापासून उचकटलं गेलं आणि बाजूला उमळून पडलं... चालकाच्या डोळ्यांवर गॉगल होता आणि त्याच्या नाका-तोंडावर रबरी मुखवटा होता. ट्रॅक्टरने धडधडत जमीन कापत एक सरळ रेघ आखली; त्या धडधडण्याने हवेत आणि जमिनीत कंपनं निर्माण झाली. हे सर्व होत असताना खंडकरी रोखून पाहत होता, त्याच्या हाती रायफल होती. त्याची बायको त्याच्याशेजारी उभी होती आणि त्यांच्यामागे स्तब्ध मुलं. ते सर्व तिथून निघून जाणाऱ्या ट्रॅक्टरकडे पाहत राहिले.

टीपा -

1. ‘ईस्ट’कडील: पूर्व अमेरिकेतील अनेक धनाढ्य लोकांना ओक्लाहोमा व मध्य/दक्षिण अमेरिकेतील (यू.एस.) जमिनी ताब्यात घेऊन भांडवलदारी पद्धतीच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात स्वारस्य होतं. प्रस्तुत ‘ईस्ट’चा संदर्भ इथे ‘ईस्ट अमेरिके’तील गुंतवणूकदार या अर्थाने अभिप्रेत.

2. ‘इंडियन्स’: अर्थात ‘इंजन्स’ अर्थात, मूलनिवासी अमेरिकन लोक.

सध्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन आकार घेत आहे. काही नव्या धोरणांमुळे आपल्या हितांवर मोठी कुऱ्हाड कोसळू शकते, याची जाणीव होऊन लाखो शेतकरी आंदोलनात स्व-प्रज्ञेने सामील झाल्याचं चित्र आहे. ती जाणीव समजून घ्यायची तर ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ हे कादंबरी खरोखरच अंतःदृष्टी देणारी ठरू शकते.

भांडवल-केंद्री धोरणामुळे विस्थापित झालेल्या मध्यम-छोट्या शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी जॉन स्टाइनबेक यांची ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही दीर्घ कादंबरी 1939 मध्ये प्रथम प्रकाशित झाली. आज ऐंशी वर्षं उलटून गेली, तरीदेखील तिचा आशय आपल्याकडे आजही मोठा बोलका ठरतो. तत्कालीन अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या आणि विस्थापितांच्या व्यापक समस्येचं राजकीय-सामाजिक संदर्भासह व मानवी दृष्टिकोनातून आकलन साध्य व्हावं, यासाठी स्टाइनबेक यांनी अत्यंत सर्जनशीलतेने या कादंबरीची रचना केली आहे. या कादंबरीचा मी केलेला अनुवाद नुकताच प्रकाशित झालेला आहे. त्यातील पाचव्या प्रकरणातील काही निवडक ‘भाग इथे उद्‌धृत करत आहे. ‘नव्या’ आर्थिक नीतीमुळे शेतकरी आपल्या जमिनींवरून कसा हुसकला गेला, त्याची सुरुवातीची प्रक्रिया सर्जनशीलतेने चितारणाऱ्या या भागाचा आणि आज आपल्या आंदोलक शेतकऱ्यांना वाटणारी विवंचना यांचा परस्परसंबंध काय आहे, ते सुज्ञ वाचकांच्या सहजच लक्षात येईल.

- मिलिंद चंपानेरकर

----

ग्रेप्स ऑफ रॉथ

जॉन स्टाईनबेक
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पृष्ठे 671, किंमत 700 रुपये
रोहन प्रकाशन, पुणे
फोन : 020-24497823

(जागतिक स्तरावर विशेष गाजलेल्या या कादंबरीला सार्वकालीन महत्त्व आहे, त्यामुळे तिचा अनुवाद मराठीत होणे हे विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यातील एका प्रकरणाचा काही भाग येथे पुनर्मुद्रित केला आहे. - संपादक)

Tags: कादंबरी नवे पुस्तक रोहन प्रकाशन मिलिंद चंपानेरकर जॉन स्टाईनबेक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जॉन स्टाईनबेक

अमेरिकन लेखक (1902 - 1968)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके