डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

विख्यात कलावती श्रीमती ज्योत्स्ना भोळे आणि मास्तर कृष्णराव म्हणजे संगीताच्या रेशमी स्वरबंधात गुंफलेली महाराष्ट्राची दोन तेजस्वी रत्नेच! श्री. सुधाकर अनवलीकर यांनी 'बोला, अमृत बोला' हा मास्तरांच्या आठवणींचा संग्रह रसिकतेने आणि साक्षेपाने रसिकांहाती दिला. त्याच्या प्रारंभी श्रीमती ज्योत्स्ना भोळे यांनी पुरस्कारार्थ एक हृदयंगम ललित निबंध लिहिला. आपल्या आठवणी गुंफल्यानंतर त्यांनी लिहिलं आहे... 'आठवणींचे असे भाग्यशाली क्षण कसे वळवाच्या पावसासारखे येतात आणि आले आले म्हणता निघूनही जातात. स्मृतीच्या कवेत सामावून ठेवावेत म्हटलं तरी सामावत नाहीत.' ज्योत्स्नाबाईंचे हे शब्द या विशेषांकात आवर्जून देत आहोत.

1932. साली पहिल्यांदा मास्तर कृष्णरावांची बैठक ऐकली ती देवधरांच्या क्लासमध्ये. मला वाटतं ती सकाळी झाली होती. गवई म्हटला की, खूप जोरकस गाणारा, गमकाच्या ताना मारणारा असा माझा समज होता. पण मास्तरांचं गाणं ऐकलं आणि अतिशय तरल आवाज असलेला, स्वतःला पाहिजे तसा गळा फिरवणारा, गोड गायकी असणारा गवई म्हणजे मास्टर कृष्णराव असा माझा समज झाला, त्या वेळी मास्तराचं नाव खूप गाजत होतं. 1941 साली 'नाट्यनिकेतन' ही संस्था रांगणेकरांनी स्थापन केली. पहिलं नाटक आशीर्वाद'. 42 साली 'कुलवधू' हे नाटक बसवायला घेतलं. डी. पी. कोरगावकर हे संगीत देणार होते आणि त्यांनी एका गाण्याला चाल पण लावली. नंतर ते कुठे सिनेमात अडकले कोण जाणे! तालमी चालू पण संगीत दिग्दर्शकाचा पत्ता नाही. किती वाट पाहणार? 9 ऑगस्ट ही तारीख पण ठरली होती.

एकदम रांगणेकरांच्या डोक्यात आलं की, मास्तर महिन्यातून 15  दिवस मुंबईला येतात. दादरला त्यांचा एक फ्लॅट आहे. श्री. रांगणेकरांनी मला विचारलं, 'मास्तरांना विचारू का?' मी म्हटलं : 'जरूर. रांगणेकर तसेच मास्तरांकडे गेले आणि त्यांना नाटकाचं कथानक सांगितलं. 'ज्योत्स्नाबाई  गाणार आहेत. तर मग जरूर चाली देतो" मास्तर म्हणाले. या गोष्टी आठ-दहा दिवसांतल्याच आहेत. लगेच रांगणेकरांनी नाटकातले प्रसंग सांगितले.

मास्तरांनी स्वतःचे शब्द घालून एक चाल म्हणून दाखवली. पहिलं गाणं, 'क्षण आला भाग्याचा.' नंतर दुसऱ्या  अकांत 'मनरमणा', तिसऱ्या अंकात 'बोला अमृत बोला' या सर्व चाली एका दिवसातल्या.

दुसऱ्या दिवशी हीरोच्या म्हणजे मा. अविनाशच्या (गणपतराव मोहिते) चाली. मग मास्तर तालमीला यायला लागले. चाली बसत चालल्या. ‘कुलवधू’ च्या पहिल्या प्रयोगाची तारीख ऑपेरा हाऊसवर 9 ऑगस्ट ही पक्की झाली. प्रयोगाच्या दोन दिवस आधी मास्तरांच्या डोक्यात आलं, एक 'द्वंदगीत' घालावं. मी म्हटलं, "चाल कधी करणार? आणि शब्द कसे पाठ होतील?" पण मास्तरांना आमच्याबद्दल भलताच विश्वास होता. रविवारी प्रयोग आणि आदल्याच शुक्रवारी हे 'द्वंद्वगीत' जन्माला आलं. भाग्यवती मी त्रिभुवनि झाले. कुबेर माझा धनी.' गाण्यातून भाग्य हा शब्द खूप वेळा आला; पण त्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्यापासून इतकी नाना तऱ्हेची संकटं उभी राहिली की, विचारू नका! मला अगदी वाटायचं हे नाटक काही रंगभूमीवर उभं राहत नाही. 

शेवटलं संकट म्हणजे पहिलाच प्रयोग बंद. 'चले जाव' ची चळवळ सुरू झाली. 'गांधी महाराज की जय' या घोषणांनी मुंबई दुमदुमली. मी ऑपेरा हाऊसवर जायला निघालेली. तो मोठा समुदाय पाहून कुणाच्या तरी घरात शिरले. 9 तारीख गेली. 16 गेली आणि 23 तारखेला सकाळी ऑपेरा हाऊसला पहिला प्रयोग झाला आणि दुपारी दामोदर हॉलमध्ये. 2 3 ऑगस्टला एका सुंदर नाटकाची जन्म झाला. सकाळी 9 वाजता ऑपेरा हाऊसचा मखमली दर्शनी पडदा घंटानादाने वर गेला. तो पहिला प्रयोग, ती सुंदर सकाळ मी कधीच विसरणार नाही. 

पहिल्याच अंकातलं "किती तरि आतुर प्रेम अपुले" हे अविनाशांचं गाणं. अंकाच्या शेवटी सारंग रागातलं पद 'का वदती' हे होतं- सारंग त्या वेळी इतका सुंदर वाटला! सर्व वातावरण नुसतं भारून गेलं होतं. प्रेक्षक हळूहळू नाटकात रमू लागले होते. भानुमतीची (मी) एन्ट्री आणि लगेच 'भाग्यवती मी' हे गीत. नंतर क्षण आला भाग्याचा. जो प्रयोग रंगू लागला म्हणून सांगू! लोकांना वेगळं पण चांगलं असं काही मिळत होतं. एकापेक्षा एक वरचढ गाणी, तसेच नाटकातले प्रसंग. मास्तर कृष्णराव पहिल्या प्रयोगाला हजर होतेच. 'मनरमणा मधुसूदना' या भजनाची

चाल जरा बाळबोध वळणाची आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं. मी भीत भीत मास्तरांना म्हटलं," ही चाल थोडी वेगळी केली तर बरं होईल. फारच साधी वाटते.' लगेच मास्तर म्हणाले, 'कोण म्हणतं? या गाण्याला वन्समोअर पडला नाही तर मी संगीत दिग्दर्शनाचं काम सोडून देईन.' काय हा आत्मविश्वास! आणि झालंही तसंच. भजन संपल्यावर जेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बन्समोअर मिळाला तेव्हा मास्तर ‘विंग' मध्येच होते. मी आत गेल्यावर ते मला म्हणाले, "काय सांगितलं होतं मी? पटलं ना?" नंतर शेवटच्या भैरवीनं तर कळस गाठला. 'बोला’ ने थिएटर नुसतं भरून गेलं. लोक नाटकावर, संगीतावर आणि आमच्यावर बेहद्द खूष होऊन गेले. असा झाला ‘कुलवधू' चा पहिला प्रयोग. 

नंतर एक होता म्हातारा, कोणे एके काळी, भाग्योदय' या नाटकांना मास्तरांनी चाली दिल्या. नाटक आणि संगीत यांचा जेव्हा नीट मेळ बसतो तेव्हाच ती गाणी लोकांच्या तोंडी बसतात आणि मास्तरांनी ते सिद्ध केलं. 'एक होता म्हातारा' मधली गाणी आणि चाली छान होत्या. त्यातलं 'छंद तुझा मजला' हे गाणं लोकांना खूप आवडलं होतं. नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1953 साली मास्तरांचा निकटचा सहवास घडला. आम्ही चीनच्या दौऱ्यावर बरोबर गेलो. आम्हा सर्वाना ते जुन्या कंपनीच्या गोष्टी सांगून हसवायचे. मुंबईहून दयमंयी जोशी (नृत्य), विलायतखाँ (सतार), मधुकर इंदूरकर (तबला). पुण्याहून मी, हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव, मधुकर गोळवलकर ही मंडळी होती. 

दीड महिना आम्ही चीनमध्ये होतो. आमचा पहिला कार्यक्रम पेकिंग या राजधानीत झाला. तेव्हा तिथले आपले राजदूत राघवन म्हणून होते, ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या देशात वंदे मातरम् आपण शेवटी म्हणतो; पण तिथे आम्ही ठरवलं होतं की कार्यक्रम सुरूच मुळी 'वंदे मातरम्’ ने करायचा. तसा तो सुरू झाला. आम्ही बसून गाणारे. म्हणून माईकची व्यवस्था खाली केली होती. पण 'वंदे मातरम्' आम्ही उभं राहून म्हटलं त्यामुळे ते बाहेर कमी ऐकू गेलं. आमचे नेते बंगाली होते- सेनगुप्ता. माणूस जरा तऱ्हेबाई कच होता. आत आले नि म्हणाले, 'पुअर शो, पुअर शो!' आम्हांला काही कळेचना. म्हणाले, "वंदे मातरम् उद्यापासून म्हणायचं नाही. मला खूप बाई ट वाटलं, आणि रागही आला. 

मी म्हटलं 'काय म्हणून बंद करायचे? याच राष्ट्रगीतानं सुरुवात करायची. मी सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि असाच कार्यक्रम सुरू होणार म्हणून त्यांना सांगितलं. पुढच्या कार्यक्रमाच्या नंतर राघवन् सौ. सह आत आले आणि म्हणाले, राष्ट्रगीत ऐकताना माझे डोळे भरून आले. इतकं सुंदर तुम्ही सर्वांनी म्हटलं की माझे अंतःकरण भरून आलं. 'मी डायरीत त्यांची सही घेतली. एक दिवस आमचा व एक दिवस चिनी कलावंतांचा कार्यक्रम व्हायचा. नाटक, संगीत व नृत्य फक्त दोन तास. मधुकर गोळवलकर आमच्या कार्यक्रमाचे निवेदन इंग्लिशमध्ये करायचे. नंतर इंटरप्रीटर त्यांचे चिनी भाषेत निवेदन करायचे. कलावंतांचे नाव घेताना ते मजेशीर उच्चार करायचे, मास्तरांचं नाव 'फूल अंद्रीकर' असे उच्चारायचे. 

एकंदर दीड महिन्यात आम्ही पेकिंगपासून आठ दहा गावांत कार्यक्रम केले. मास्तरांच्या जेवणाखाण्याकडे मीच लक्ष देत असे. जेवण झालं की विचारायचे "ज्योत्स्नाबाई, जेवू ना? बघा. नाही तर प्लेटमध्ये झुरळे वगैरे उकडून ठेवली नाहीत ना! अशा एकेक गंमतीत दिवस मजेत जायचे काय झालं कोण जाणे, एक दिवस जेवण झाल्यावर माझ्या पोटात खूप कळा यायला लागल्या. बाकीची मंडळी 'चायनीज ग्रेट वॉल' बघायला गेली होती. मी आणि हिराबाई अशा दोघीच हॉटेलवर होतो. इतक्यात वसंतराव परांजपे मला भेटायला आले, तर मी कॉटवर तळमळते आहे. त्यांनी हिराबाईकडे चौकशी केली. वसंतरावांनी लगेच मला हॉस्पिटलमध्ये नेले. रात्री साडेदहापर्यंत पोटदुखी कायम होती. 

आम्हाला वाटलं फूड पॉयझनिंग झालं असावं. पण तो किडनी अ‍ॅटॅक होता. मास्तर हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आले आणि मला पाहून त्यांना आपले अश्रु आवरेनात. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला जायचं होतं. मास्तर म्हणाले, 'मी जात नाही. ज्योत्स्नाबाईंना अशा स्थितीत टाकून मला जाववत नाही.' मीच मग त्यांना सांगितले की मास्तर जा तुम्ही. दमयंती थांबते आहे माझ्यासाठी. मास्तर फार हळवे होते स्वभावानं. दीड महिन्यांने आमचा दौरा संपला ‘हिंदी चिनी भाई भाई' म्हणता म्हणता शस्त्र घेऊन उठले की वर्षात! मास्तरांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना घरी भेटायला गेलं की आधी ते रडायचे. मला अतिशय बाई ट वाटायचं. गोव्याच्या पद्धतीचं खाणं काही अंशी त्यांना खावंसं वाटे. ते मी घरी नेऊन देत असे. 

एकदा त्यांनी मला असंच काय काय घेऊन या, म्हणून सांगितलं आणि मी कुठंतरी बाहेरगावी गेले होते. मास्तरांचं दुखणं जास्त झालं. घरी आल्यावर माझी सून नंदा म्हणाली, "आई, मास्तरांना जास्त बरं नाही. तुम्ही त्यांना कबूल केलं होतं, सोजी आणि खदखद करून आणते म्हणून. आधी तुम्ही भेटून या." भेटायला गेले. मास्तर बरे होते. मी विचारलं 'कधी घेऊन येऊ, गोव्याचे पदार्थ? एक दिवस डबा घेऊन गेले. मास्तरांनी मनापासून सर्व खाल्लं. संगीत कला अकादमीचं अ‍ॅवॉर्ड घ्यायला मास्तर दिल्लीला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे सेक्रेटरी श्री. मेनन पुण्याला आले होते. त्यांच्या घरी त्यांचा सत्कार झाला. आम्ही सर्वजण होतो- भीमसेन, हिराबाई, के. डी. दीक्षित, पी.एल.. वसंतराव वगैरे. पी. एल. म्हणाले, 'ज्योत्स्नाबाई चार शब्द बोलतील.' मी काय बोलणार? पण जे चार शब्द निघाले त्यांनी सर्वांचे डोळे पाणावले, एवढंच मला आठवतं. पी. एल. म्हणाले, 'ज्योत्स्नाबाई, बोलता येत नाही म्हणालात आणि आम्हाला रडवलंत ना!"ते अंतःकरण बोललं, मी नव्हे!"

Tags: गणपतराव मोहिते चीन मधुकर इंदूरकर विलायतखाँ दयमंयी जोशी मधुकर गोळवलकर हिराबाई बडोदेकर पू.ल. देशपांडे  मास्तर कृष्णराव ज्योत्स्ना भोळे Ganapatrao Mohite china Madhuakar indurkar Vilayatkha damayanti Joshi Madhukar Gowalkar Hirabai Badodekar P.L. Deshapande Mastar Krushanrao Jotsna Bhole weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके